☆ सात सुरांची साथ नव्यांची… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
… तू जो मेरे सुर मे सुर मिलाके, संग गाले, तो जिंदगी हो जाए सफल… सा रे ग म प ध..नी सा… ये म्हणा कि गं तुम्ही पण माझ्या बरोबर.सात सुरांची साथ नव्याची ऑडिशनला आपल्याला उदया जायचयं! आहेना लक्षात? आपल्या सातही जणींची फायनला निवड पक्की होणारच.केशरबाई तू काळी दोन मधे सुरु करशील.पिवळाक्का तुम्ही काळी चार घ्या बरं. उदयाचा विठूचा गजर टिपेला न्या. तुम्ही दोघी करडू दिदी यमनचा षड्ज द्रुतलयीत लावाल. मी आणि ग्रे ताई मालकंस नि भैरवी ने मंद्र सप्तकात सांगता करू.
…परिक्षक कोणी असले तरी आपण घाबरायचं नाही. घाबरायचं त्यांनी आपल्याला. एक सुरात म्याँव म्याँव करून त्यांना सळो कि पळो करु.पायात घुटमळत राहू.तोंड पुसत पुसत त्यांना आपली निवड करायला भाग पाडू.नाहीतर अंगावर फिस्कारुन येउ म्हणावं हि धमकी देऊ.आमच्या शिवाय स्पर्धा होणे नाही!आम्ही नसलो तर स्पर्धा उधळून लावू. इतकंच नाही तर विजेते आमच्यातलेच असतील.बाहेरचा कुणी दिसलाच तर स्पर्धेत फिक्सिंग झाले असण्याचा संशयाचा धुरळा मेडियात उडवू देउ अशी तंबीच त्यांना देउ या; आणि आपले सगळेच नंबर आले तर स्पर्धा खेळी मेळीत निकोप वातावरणात झाली,उदयाच्या नव्या गायकांना प्रोत्साहन प्रेरणा अश्या स्पर्धेतून मिळते,म्हणून अश्या स्पर्धा सतत होणं गरजेचे आहे असं मेडियाला मुलाखत देताना तोंड फुगवून सांगूया.यातूनच जे आयोजक, ठेकेदार यांचे उखळ कायम पांढरे होत जाईल. टीआरपी वाढला कि स्पर्धेचे एपिसोड वाढतील.चॅनेल वाल्यांची चांदी आणि नव्या गायकांची एक्सपोजरची नांदी होईल.तेव्हा उदया
“… सारे के सारे गा मा के लेकर गाते चले….” कोरस हम साथ साथ मे म्हणू या… “
शिक्षण – B.A. (Hons.) Mum. Uni. अर्थशास्त्रातील पदविका
जन्म – 02/06/1958 – निपाणी
दी सांगली बँकेत1979 पासून- कारकून पदाने सुरू झालेली कारकीर्द. 2011 रोजी सीनियर मॅनेजर पदावरून आय.सी.आय.सी.आय बँकेतून (विलींनकरणा नंतर) निवृत्त. सध्याचे वास्तव्य विश्रामबाग सांगली.
निवृत्ती नंतर लेखन सुरु केले. कथा, ललित लेखन,पहिला चहा (स्फुट लेखन), चित्र कथा सारखे लेखन.विविध लेखन स्पर्धेत सहभाग आणि यशस्वी मानाकांने प्राप्त. दिवाळी अंकातून कथांना प्रसिध्दी. ‘कथारंग’ पहिले पुस्तक प्रसिध्द.
… जे जे पेरतो ते तेच उगवते हा सृष्टीचा नियम आहे ,हे तर तुम्हा आम्हा सर्वांना विदीत आहेच…प्रत्येक भागातली अशी सुफलाम भूमी हि सोन्याची खाण असणारी भूमी वाटतं असते…निसर्गाचे वरदान लाभलेली , नदी, नाले, ओढे ,तळी, बावी ,विहिरी जलाने तुडुंब भर भरून वाहू लागल्या की कृषीवलाच्या चेहऱ्यावर आनंद पसरवते. जे पिकतं ते सोनच असतं…उन्हाळातल्या मशागतीपासून रोहिणीची वाट पाहात मृगाची सरीने भूमी भिजली कि पहिला उगवणारा आशेच्या हिरव्या हिरव्या कोवळ्या कोंबाकडे पाहून कृषिवल त्याची निगराणी करत जातो..श्रावणातल्या हिरवाईने वसुंधरा शालूने सलज्ज नवथर नवयौवना दिसते…आश्विनला ती परिपक्व होते.. हिरवे पणा च्या जागी पिवळेपणाची परिपक्वता येते… जीवन परिपूर्ण झाले या कृतार्थतेने समाधान तिथे विलसत असते.पश्चिमेचा वारा वाहू लागतो आणि त्यावेळी उभ्या असलेल्या शेतातील पिकाचे तुरे डोलू लागतात. जणू काही सृष्टीचे गुणगान गात असताना मग्न झालेले दिसतात… आता लवकरच आपलं या भुमीशी असलेलं नातं संपणार आहे.. ही मोहमाया सोडून जायचे दिवस आले आहेत.. आसक्ती पासून मुक्ती मिळवायची हीच वेळ आलेली असते…
… अन् आपली सर्वांची जिवनानुभवता याहून काही वेगळी असते का? पिकलेपण म्हणजे अगणित कडू गोड अनुभवांची संपन्नता नसते काय? हा अनमोल सोनेरी विचारांचा ठेवा पुढील पिढीला द्यायचा हेच सुचवत नसते काय? पिकलेपणात सोनेपण दडलेलं नसते काय?
“नमस्कार पंत, उद्याच्या कार्यक्रमाचे लक्षात आहे ना तुमच्या ?”
“अरे असा कसा विसरेन मी ?आयुष्यात पहिल्यांदा माझ्या आणि हिच्या हातून, तुझ्या नवीन फॅक्टरीच गुढीपाडव्याला उदघाट्न होतंय ह्याचंच अप्रूप आहे आम्हां दोघांना !”
“पंत, अहो तुमच्याच कल्पनेतून ह्या फॅक्टरीचा जन्म झालाय, मग त्याच्या उदघाटनाचा मान तुम्हाला नको का द्यायला ?”
“मोऱ्या, हरवलेला चष्मा कसा शोधायचा यावर बसल्या बसल्या, चष्म्याला ट्रॅकर लावायची कल्पना सुचली मला आणि तू मेहनतीने फॅक्टरी काढून ती प्रत्यक्षात आणतोयस ह्यातच आनंद आहे !”
“पंत तुम्हाला सांगतो, माझ्या त्या चष्म्याच्या ट्रॅकरची जाहिरात मी नुसती द्यायचा अवकाश, पहिल्या आठवड्यात दीड लाख चष्म्याच्या ट्रॅकरची ऑर्डर आल्ये मला !”
“अरे व्वा, परत एकदा तुझं अभिनंदन !”
“बरं पंत, येतो मी, उद्याची सगळी तयारी करायची आहे, त्यामुळे…”
“अरे जाशील रे मोऱ्या, पाच मिनिटांनी काही फरक पडणार नाही ! आता मी काय सांगतो ते नीट ऐक !”
“बोला ना पंत !”
“अरे तुझ्या या चष्म्याच्या ट्रॅकरमुळे माझ्यासारख्या सिनियर सिटीझनची चष्मा कुठे ठेवला आहे तो शोधायची सोय झाली हे खरं आहे, पण आजकालच्या तरुण मुलांसाठी सुद्धा एक अत्यंत उपयोगी अस डिव्हाईस तू काढावंस असं मला वाटत !”
“पंत, म्हणजे मला तुम्ही एखाद्या नवीन प्रॉडक्टची आयडिया तर नाही ना देत ?”
“अगदी बरोब्बर मोऱ्या !”
“आता मला धीर धरवत नाहीये पंत, लवकर, लवकर सांगा तुमच्या नवीन प्रॉडक्टची आयडिया !”
“सांगतो, सांगतो ! पण त्याच्या आधी मला एक सांग मोऱ्या, हल्ली तुझं मॉर्निंग वॉक काय म्हणतंय ?”
“सॉरी पंत, सध्या नव्या फॅक्टरीच्या कामात मॉर्निंग वॉकला जायला जमत नाही मला !”
“बरं, बरं, मी समजू शकतो तुझी अडचण ! मोऱ्या, हल्ली मी मॉर्निंग वॉकला गेलो ना, की एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते !”
“कोणती पंत ?”
“अरे आपले मुंबईचे कावळेदादा आणि इतर पक्षी तारा आणि काड्या जमा करून घरटी बांधायला लागलेत, आहेस कुठे ?”
“पंत, म्हणजे यंदा पाऊस वेळेवर पडणार म्हणायचा तर !”
“असं म्हणायला हरकत नाही मोऱ्या !”
“म्हणजे पंत, तुम्ही मला नवीन प्रॉडक्टची आयडिया देणार आहात, ती पावसाशी संबंधित तर नाही ना ?”
“मोऱ्या गाढवा, उगाच तुझ्या नसलेल्या अकलेची फाटकी छत्री उघडून, अक्कल झाकायचा प्रयत्न करू नकोस !”
“तसं नाही पंत, तुम्ही एकदम कावळे, चिमण्या, घरटी, पाऊस या विषयी बोलायला लागलात म्हणून….”
“मोऱ्या, अरे त्या मुक्या पक्षांना सुद्धा येणाऱ्या संकटाची, त्यांच्यासाठी पावसाळा हे एक प्रकारचे संकटच म्हणायचं, चाहूल लागते आणि आपण स्वतःला या विश्वात सर्वात बुद्धिमान म्हणवणारे मानव येणारे संकट ओळखू शकत नाही, याचीच मला खंत वाटते !”
“पंत, जरा मला समजेल असं बोलाल का ?”
“मोऱ्या मला सांग, आपल्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा अवयव कोणता ?”
“आता हे काय पंत ? तुम्ही एकदम हवामानाच्या अंदाजावरून शरीरशास्त्रावर घसरलात की !”
“ठीक आहे, तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल तर तू आता निघ ! आम्ही दोघं उद्या….”
“असे रागावू नका पंत, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आपला मेंदू !”
“बरोब्बर मोऱ्या आणि आपला मेंदू शाबूत असेल तर सगळंच अलबेल असतं, हॊ का नाही !”
“म्हणजे तुम्ही मला सुचवणाऱ्या नवीन प्रॉडक्टचा संबंध आपल्या मेंदूशी आहे तर !”
“आहे, आहे, तुझा मेंदू थोडातरी कार्यरत आहे म्हणायचा !”
“पंत आता जास्त ताणून न धरता नवीन प्रॉडक्टची आयडिया सांगितलीत तर बरं होईल !”
“अरे मोऱ्या त्याच काय आहे ना, तुमची हल्लीची तरुण पिढी, मोटरसायकल वरून वेगाच्या नशेत, ट्राफिकचे नियम न पाळता रस्त्यावरून नुसती सुसाट पळत असते !”
“तुम्ही म्हणता ते खरं आहे पंत, आजकाल असं झालं आहे खरं ! पण त्याचा नवीन प्रॉडक्टशी काय संबंध ?”
“अरे 95% तरुण हेल्मेट न घालता सुसाट वेगाने मोटरसायकल चालवून स्वतःच्या आणि पदचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असतात !”
“अगदी बरोबर पंत !”
“तर मोऱ्या, माझ्या डोक्यात काय आलं सांगतो, कुणीही हेल्मेट न घालता गाडी चालवायचीच नाही मुळी.”
“पंत, सरकारी नियमच आहे तसा, पण लक्षात कोण घेतो ?”
“म्हणून मी काय म्हणतो मोऱ्या, तू असं एखाद हेल्मेट तयार कर, की ते घातलं तरच मोटरसायकल चालू होईल ! चालवणाऱ्याच्या डोक्यावर हेल्मेट नसेल तर गाडीच चालू होणार नाही ! कशी आहे माझी नवीन प्रॉडक्टची आयडिया ?”
“भन्नाट आयडिया आहे पंत ! बघतो कसं काय जमतंय ते आणि काही सुचलं तर तुम्हाला नक्की कळवतो !”
“मोऱ्या जमेल तुला ! अरे इच्छा तिथे युक्ती असं कुणीस म्हटलंच आहे !”
“बरं येतो मी पंत !”
“आणि एक लक्षात ठेव, अशा हेल्मेटची जेंव्हा फॅक्टरी काढशील तेंव्हा….”
☆ लेखांक# 8 – मी प्रभा… नावात काय आहे ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
माझं नाव प्रभा सोनवणे! गेली पंचेचाळीस वर्षे मी या नावानेच ओळखली जाते,साहित्य क्षेत्रात जी काही लुडबुड केली, ती आता नावारूपास आली आहे, कवयित्री, लेखिका, संपादक म्हणून प्रभा सोनवणे हे नाव लोकांना माहित आहे, परवा पासपोर्टचं नूतनीकरण करायला गेलो, त्या आधी एजंटने सांगितले होते आधार कार्डावर जसं संपूर्ण नाव आहे तसंच पासपोर्ट वर असायला हवं, म्हणजे नव-याच्या नावासकट! मग त्या संपूर्ण नावाची गॅझेट मधे नोंद करून घेतली त्यासाठी पैसा, वेळ वाया घालवला, पासपोर्ट ऑफिस च्या बाहेर एजंट ने सांगितले तिथे स्क्रीन वर नीट पाहून घ्या नाव आणि पत्ता बरोबर आहे का! तरीही व्हायचा तो घोटाळा झालाच, पत्ता चेक केला,नाव चेक करायचं राहून गेलं, पूर्वी पासपोर्ट वर “सोनवणे प्रभा” एवढंच नाव होतं ते तसंच राहिलं! नव-याचं नाव जोडायचं राहून गेलं, म्हणजे ज्या साठी केला होता आट्टाहास…..ते राहूनच गेलं!
प्रसिद्ध इंग्रजी लेखक शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? पण नावात बरंच काही आहे. आई सांगायची तिला माझं नाव मृणालिनी ठेवायचं होतं पण त्या काळात देवबाप्पा हा सिनेमा खूप गाजला होता (माझा जन्म १९५६ सालचा आहे) त्यातल्या “चंदाराणी ” नावाचा बराच प्रभाव होता, माझ्या मामांनी माझं नाव चंदाराणी ठेवलं आणि आईला आवडत असलेलं एक चांगलं नाव मला मिळालं नाही!
लग्नानंतर सासूबाईंनी प्रभा नाव ठेवलं, आजीला आवडत असलेलं “नूतन”, गुरूजींनी क अक्षरावरून नाव ठेवायला सांगितलं म्हणून “कात्यायनी” ही नावं सुद्धा मी वापरली आहेत. कारण असं वाटतंच आपलं एक छानसं नाव असावं.
पण आता वयाच्या पासष्टाव्या वर्षी प्रभा हेच नाव स्वतःचं वाटतं कारण गेली पंचेचाळीस वर्षे तिच माझी ओळख बनली आहे. प्रभा सोनवणे या नावाला स्वतःची एक प्रतिमा निर्माण करता आली, या नावाची जनमानसात एक छाप आहे…..म्हणूनच या मालिकेचं नाव आहे…… मी…. प्रभा अर्थात हे शीर्षक मंजुषा मॅडमनी सुचवलं आहे!
वैदिक काळातील विद्वान स्त्री म्हणून मैत्रेयीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. मित्र ऋषीं ची कन्या म्हणून तिचे नाव मैत्रेयी. त्रेतायुगात तिचा जन्म झाला. तिचे वडील मिथिलेचा राजा जनक याच्या दरबारात मंत्री होते.
एकदा जनकराजाने वादविवाद सभेचे आयोजन केले . त्या सभेत याज्ञवल्क्य ऋषी आले होते. ते यजुर्वेदाचे प्रमाण तक याद्निक सम्राट महान तत्त्वज्ञ व न्याय शास्त्रज्ञ महर्षी होते. ते यज्ञ करण्यात इतके निपुण होते की यज्ञ करणे त्यांच्या साठी कपडे बदलण्याइतके सोपे होते म्हणून त्यांचे नाव यज्ञवल्क्य.यज्ञ+ वल्य=यज्ञवल्क्य. याज्ञवल्क्य असेही म्हणतात. मैत्रेयीने त्यांना वादात पराभूत केले. ते म्हणाले मी तुझा शिष्य होऊ इच्छितो. ती म्हणाली तुम्ही माझे शिष्य होऊ शकत नाही. माझे पती व्हा. जनक राजाच्या आज्ञेवरून दोघे पती-पत्नी झाले. याज्ञवल्क्य ऋषींना पहिली पत्नी होती कात्यायनी. ती कात्यायन ऋषींची कन्या. ती आश्रमाची सर्व व्यवस्था पाहत असे. मैत्रेयीला अध्यात्म, चिंतन, वाद-विवाद यात गोडी होती.
काही दिवसानंतर याज्ञवल्क्य ऋषींना गृहस्थाश्रम सोडून वानप्रस्थाश्रम स्वीकारावा असे वाटले. दोन्ही पत्नींना बोलावले व संपत्तीची समान वाटणी करूया म्हणाले. मैत्रेयी म्हणाली आत्मज्ञान हवे आहे. या संपत्तीतून ते मिळेल का? ऋषी म्हणाले नाही ती म्हणाली.मला ही क्षुल्लक संपत्ती नको. तुमच्या ज्ञानसंपत्तीचा वाटा मला हवा. मला अमरत्व हवे आहे.तुम्हाला नक्की ते ज्ञान आहे म्हणून तुम्ही येथील मोहन सोडून ते ज्ञान संपादन करण्यासाठी जात आहात ना? रेशीम ना खूप आनंद झाला त्यांनी तिला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. जीवन, जगत, आत्मा, परमात्मा यांचे गूढ रहस्य तिला समजावून सांगितले. जगात फक्त प्रियतम आत्मा आहे त्याला जगातील सर्व वस्तू व संबंध प्रिय आहेत. आत्मा दृश्य श्रवणीय चिंतनशील ध्यान करण्यासारखा आहे कारण त्याचे दर्शन श्रवण,मनन,चिंतनाने होते. आत्म्याचे महत्त्व चारी वेद इतिहास पुराणे उपनिषदे सूत्रे मंत्र यात आहे. महान आत्म्याचे श्वास व आश्रय आहे. आत्म्याचे दर्शन श्रवण मनन निविध्यासन यांच्याद्वारे पचवावे लागते. त्यासाठी वनवास व्रत, इतर साधना करावी लागते. ही एकत्वाची उपासना अमरत्वाची अनुभूती देते. मग अद्वैत विविध रूपे व विकारांना विराम मिळतो मग श्रवण चिंतन वगैरे काही लागत नाही. मैत्रीचे समाधान झाले. तिला आत्मज्ञान प्राप्त झाले. तिने उपनिषद लिहिले. तिने आपल्या विद्वत्तेने संपूर्ण स्त्री जातीचे मूल्य वाढवले. धर्मपालन करूनही पत्नी ज्ञानसंपदा वाढवू शकते हे तिने सिद्ध केले. अशा या सुशील शांत निस्वार्थी साधवी सहनशील चरित्रवान ज्ञानसंपन्न मैत्रेयीला कोटी कोटी कोटी प्रणाम .
उभया भारती ही मंडनमिश्र यांची पत्नी होती. मंडन मिश्र हे वेदांती पंडित होते. दोघे पती-पत्नी अति विद्वान असून आदर्श जोडपे होते. ते दोघे मध्य प्रदेशातील बिहार राज्यात माहिष्मती नगरी येथे राहत होते. मंडनमिश्र आदि शंकराचार्यांचे समकालीन असून वेदांती पंडित होते. मंडनमिश्र हे ब्रह्म देवाचा अवतार व उभया भारती सरस्वतीचा अवतार असे मानले जाते.
शंकराचार्य अत्यंत विद्वान होते. त्यांना संन्यास मार्गाचा प्रचार करायचा होता. पण त्यापूर्वी त्यांना मंडनमिश्र यांच्याशी वादविवाद करण्यास सांगितले गेले. म्हणून शंकराचार्य माहिष्मती नगरीत आले. त्यांनी तेथे मंडनमिश्र यांचा पत्ता विचारला असता लोकांनी सांगितले” ज्यांच्या घराच्या दरवाजावर एका पिंजऱ्यात बंदिस्त असलेले , पोपट संस्कृत मधून अमूर्त विषयांवर चर्चा करत असतील ते त्यांचे घर होय.” त्याप्रमाणे शंकराचार्य तिथे आले. एका पिंजऱ्यात मैना आणि पोपट बंदिस्त असून त्यांच्यात चर्चा रंगली होती विषय खालील प्रमाणे होते.
1) वेद स्वप्रमाणित आहेत की नाहीत?
2) कर्माचे फळ कर्म सिद्धांत देतो की ईश्वर
3) जग नित्य आहे की अनित्य आहे?
हे संभाषण ऐकून शंकराचार्य आश्चर्यचकित झाले व त्यांनी मंडनमिश्र यांना वाद-विवाद सभा घेण्यास सांगितले. त्यासाठी योग्य व्यक्ती म्हणून उभया भारतीने न्यायाधीश बनावे असे ठरले. या वादामध्ये जो पराभूत होईल त्याने विजेत्या चा आश्रम स्वीकारावा असे ठरले. मंडन मिश्र हरले तर त्यांनी संन्यास धर्म स्वीकारावा व शंकराचार्य हरले तर त्यांनी विवाह करून गृहस्थाश्रम स्वीकारावा असे ठरले.
दोघे अतिशय विद्वान असल्यामुळे वाद-विवाद अतिशय गतिशील आणि मनोरंजक होता. दोघेही ज्ञानाचे दिग्गज होते. भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास दोघांचा उत्तम होता.
उभया भारती गृहिणी होती. तिला खूप दैनंदिन कामे होती. तिने एक युक्ती काढली. दोघांच्या गळ्यात एक सारखे फुलांचे हार घातले. ज्याच्या गळ्यातील हारातील फुले सुकतील तो पराभूत व ज्याच्या गळ्यातील हारातील फुले टवटवीत असतील तो विजयी असे तिने सांगितले. हरलेल्या माणसाला खूप राग येतो. त्याच्या शरीरात उष्णता वाढते व त्यामुळे फुले सुकतात. तिच्या विद्वत्तेवर,नि:पक्षपातीपणावर , शहाणपणा वर दोघांचा विश्वास होता.
अठरा दिवसानंतर तिने पाहिले की मंडनमिश्र यांच्या गळ्यातील हार सुकलेला आहे. तिने शंकराचार्यांना सांगितले, तुम्ही पूर्ण विजेता ठरू शकत नाही. मी मंडनमिश्र ची अर्धांगी आहे. तुम्ही त्यांना जिंकून अर्धे अंग जिंकले. आता माझ्याशी वाद-विवाद करून मला जिंकला तरच तुम्ही विजेता ठराल. शंकराचार्यांनी मान्य केले.
तिने त्यांना कामुक कला आणि विज्ञान यांच्या विषयी प्रश्न विचारले. शंकराचार्यांनी कबूल केले मला यातील ज्ञान नाही. मी बाल ब्रह्मचारी आहे. उभया भारतीने युक्तिवाद केला” तुम्ही सर्वज्ञ आहात ना? मग काम शास्त्राचे ज्ञान तुम्हाला का नाही? भारतीय संस्कृतीने “काम” पुरुषार्थात समाविष्ट केलेला आहे. मग तो त्याज्य आहे का? जर मानवी जीवन निर्मितीचा तो आधार आहे तर तुम्ही त्याच्याकडे तुच्छतेने का पाहता?कामशास्त्राचा अभ्यास केला तर संन्यासधर्माला धक्का बसतो का? तुम्ही स्वतःला सर्वद्न्य समजता पण तुम्ही लग्न केले नाही .कामशास्त्राचे अजिबात ज्ञान नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरे दिलीत तरच तुम्ही विजेता बनाल.”
शंकराचार्य हार मानायला तयार नव्हते त्यांनी तिच्याकडून मुदत मागून घेतली. परकाया प्रवेश करून एका राजाच्या अंतःपुरात राजाचे रूप घेऊन ते काही महिने राहिले. लैंगिकतेचे पूर्ण ज्ञान मिळवले.व पुन्हा मूळ रूपात
येऊन उभया भारतीच्या या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. तिचे समाधान झाले. तिने शंकराचार्यांना ” सर्वात मोठा वैदिक विद्वान ” घोषित केले. मंडनमिश्र यांनी ठरल्याप्रमाणे संन्यास धर्माचा स्वीकार केला. उभया भारती शापमुक्त झाली व स्वर्गात निघून गेली.
अशा या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वाच्या उभयाभारतीला प्रणम्य शिरसा वंद्य , वंद्य, वंद्य.
वैदिक काळामध्ये लोपामुद्रा, आदिती, विश्वावरा, इंद्राणी, सर्परागिणी, शाश्वती अशा अनेक ऋषिका होऊन गेल्या. वेदांच्या स्तोत्रांच्या किंवा मंत्रांच्या जाणकार, त्यांचे रहस्य समजून घेणाऱ्या, त्यांचा प्रचार करणाऱ्या त्या सर्व स्त्रिया ऋषिका नावाने प्रसिद्ध आहेत. आपण आज जहू या ऋषिके ची माहिती घेऊया.
ऋषिका जुहू ब्रह्मवादिनी होती. ब्रह्मवादिनी म्हणजे उपनयन करणारी आणि अग्निहोत्र करणारी. वेदांचा अभ्यास करणारी आणि घरातील लोकांची निस्वार्थ सेवा आणि स्वेच्छेनं मिळालेल्या अन्नपाणी पैशांनी जगणारी. ब्रह्मा + वादिनी= ब्रम्ह .ब्रम्हाला साक्षात आत्मतत्व म्हणतात. . ब्रह्मतत्त्वाचे अध्ययन करू इच्छिणारी ब्रह्मवादिनी. तिचे उपनयन करुन तिला वेदाध्ययन करता येत असे .खूप तपस्या करून ब्रम्हाचे ज्ञान रसिकांना पोचवण्याचे काम ब्रह्मवादिनी करते.
ऋषिका जुहू आणि ब्रह्मदेव हे पती-पत्नी होते म्हणून तिला ब्रह्म जाया असेही म्हणतात. काही कारणाने ब्रह्मदेवाने तिचा त्याग केला. पण ऋषिका जुहू अजिबात घाबरली किंवा विचलित झाली नाही. ती पतिव्रता होती. धर्मपरायण होती आणि म्हणून तिचा धर्मपरायण निर्णायक मंडलावर पूर्ण विश्वास होता. त्या काळात पत्नीचा त्याग करणे हा मोठा अपराध मानला जात असे .अशा पतीना प्रायश्चित्त घ्यावे लागत असे. वायू अग्नी सूर्य सोम आणि वरुण या देवतानी ब्रह्मदेवाला प्रायश्चित्त दिले. सर्वात प्रथम सोम राजाने ब्रह्मदेवाला या पवित्र चारित्र्याच्या स्त्रीचा निसंकोचपणे स्वीकार करण्यास सांगितले. वरूण देवता आणि मित्र म्हणजे सूर्याने देखील त्यास अनुमोदन दिले. मग अग्नि देवतेने तिचा हात धरून तिला तिच्या पतीकडे सोपवले. सर्व देवांनी ब्रह्मदेवाला सांगितले तुझ्या पत्नीने खूप तपस्या केली आहे. त्यामुळे तिचे रूप अति उग्र झाले आहे. तिला शत्रू कधीच स्पर्श करू शकणार नाही. तिचे चारित्र्य शुद्ध आहे. ती पापी मुळीच नाही.ती तेजस्विनी आहे. निष्पाप आहे. निरपराध आहे.निर्दोष आहे .तिच्यावर अन्याय होता कामा नये. ब्रह्मदेवाला ते पटले आणि ऋषिका जुहूचा पत्नी म्हणून त्याने स्वीकार केला. पण ब्रह्मवादिनी असूनही ऋषिका जुहू ला अन्यायाविरुद्ध लढावेच लागले.
खरं तर आपल्याकडे स्त्रीमुक्तीचे वारे बऱ्याच दिवसांपासून वाहू लागले आहेत. पण अजुनही बऱ्याच स्त्रियांना खूप अन्याय सहन करावे लागत आहेत पण महाभारतातील स्त्रियांकडे पाहिले तर आपण किती सुखी आहोत असे वाटू लागते. अशा दोन स्त्रिया म्हणजे अंबिका आणि अंबालिका.
महाभारतात काशी नरेश इंद्रद्युम्न याची कथा आहे. त्याला तीन मुली. अंबा, अंबिका आणि अंबालिका. तिघीही सुस्वरूप आणि सद्गुणी होत्या. त्या उपवर होताच राजाने त्यांचे स्वयंवर मांडले. सर्व राजाना आमंत्रणे दिली पण भीष्म ब्रह्मचारी व त्याचा सावत्र भाऊ विचित्रवीर्य नावाप्रमाणेच दुबळा होता म्हणून त्या दोघांना आमंत्रण दिले नाही. भीष्माला खूप राग आला आणि तो अगंतुकपणे सभामंडपात दाखल झाला. तिथे सर्वांनी त्याची चेष्टा सुरू केली.” विना आमंत्रण का आला? , भिष्मप्रतिज्ञा मोडली का? ब्रह्मचर्य सोडले वाटते.” भीष्माला खूप राग आला .त्याने आव्हान दिले मी सर्वांसमक्ष या तिघींना हस्तिनापूरला घेऊन जाणार आहे. सर्व राजांनी त्याच्यावर हल्ला केला. पण भीष्माने सर्वांना पराभूत करून या तिघींचे अपहरण केले व रथात घालून हस्तिनापूरला आणले. माता सत्यवती खुश झाली व तिने तिघींना सांगितले की तुम्ही माझा मुलगा विचित्रवीर्य याच्याशी विवाह करा. अंबे ने नकार दिला व ती शाल्व राजाकडे परत गेली. पण या दोघींना दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी निमूटपणे विचित्रविर्याशी विवाह केला. विचित्रविर्याचा अकाली मृत्यु झाला . सत्यवतीने भीष्माला आग्रह केला की तू प्रतिज्ञा मोडून या दोघींशी विवाह कर आणि कुरूवंशाला वारस दे. त्याने सांगितले मी प्रतिज्ञा भंग करणार नाही पण माते तुझाच पुत्र आपला वंश पुढे चालवील. सत्यवतीला आपल्या पहिल्या मुलाची आठवण झाली आणि तिने व्यासांना आवाहन केले. मातेच्या आज्ञेनुसार व्यास नियोग पद्धतीने राज्याला वारस देण्यास तयार झाले. एखाद्या स्त्रीचा पती जेव्हा वंश निर्माण करण्यास असमर्थ असतो तेव्हा ती दुसऱ्या पुरुषाकडून पुत्रप्राप्ती करून घेऊ शकते. पण होणाऱ्या पुत्रावर पतीचाच पिता म्हणून अधिकार राहतो याला नियोग पद्धती म्हणतात .सत्य वतीने अंबिकेला व्यासांकडे जाण्यास सांगितले. नाइलाजाने ती गेली पण व्यासांचे उग्र रूप पाहून घाबरली आणि तिने डोळे मिटून घेतले. व्यासाने सत्यवतीला सांगितले तिला अत्यंत तेजस्वी पुत्र होईल पण तो आंधळा असणार आहे. आणि जन्मांध धृतराष्ट्राचा जन्म झाला. सत्य वतीने अंबालिकाला व्यासांकडे पाठवले. तिने डोळे उघडे ठेवले पण ती लाजेने पिवळी पडली. तिच्या पोटी पंडु रोगग्रस्त पांडू चा जन्म झाला. सत्यवती ने पुन्हा अंबिकेला डोळे उघडे ठेवून व्यासांकडे जा असे सांगितले. ती स्वतः जाण्यास धजावली नाही . तिने आपल्या रूपात एका दासीला सजवले आणि व्यासांकडे पाठवले. व्यासांनी सत्यवतीला सांगितले हिला होणारा पुत्र वेद विद्या पारंगत आणि नीतिवान निपजेल. मातेला दिलेले वचन पूर्ण करून व्यास तपश्चर्येला निघून गेले.
अंबिका आंधळ्या पुत्राची आई बनली. अंबिका शब्दाचा अर्थ देवी पार्वती , दुर्गा असा आहे पण असहाय अंबिका काही करू शकली नाही. राजमातेचा मान तिला मिळाला पण त्याचे अंधत्व तिला आयुष्यभर छळत राहिले. अंबालिका दुबळ्या पांडू कडे पाहून आयुष्यभर जळत राहिली. दासी पुत्र विदुर सर्वगुणसंपन्न असुनही व्यासांचा पुत्र म्हणून त्याला मान मिळाला नाही दासीपुत्र म्हणूनच सगळ्यांनी त्याची हेटाळणी केली आणि त्याची आई आयुष्यभर खंतावत राहिली. आजची कुठलीच स्त्री हे सहन करणार नाही कारण आपल्याला शिकवले आहे,”मुकी बिचारी कुणीहका, अशी मेंढरे बनू नका.”
अंबिका आणि अंबालिका त्यांचा कुठलाही दोष नसताना मूक अश्रू ढाळत बसल्या त्याचे काय?
एक सूडाचा प्रवास महाभारतातील अंबेचे जीवन हा स्त्रीत्वाचा हुंकार आहे. दोन महापराक्रमी पुरुषांच्या अहंकारात तिच्या आयुष्याची माती झाली तिच्या जीवाची प्रचंड तगमग झाली आणि सूडा कडे प्रवास सुरू झाला.
खरंतर ती काशीराजाची प्रेमळ सुस्वरूप हुशार कन्या. तिला अंबिका आणि अंबालिका नावाच्या दोन बहिणी होत्या.तिघी वयात येताच काशीराजाने त्यांचे स्वयंवर मांडले. त्यात भीष्म व त्यांचा सावत्रभाऊ विचित्रवीर्य यांना जुन्या वितुष्टामुळे आमंत्रण नव्हते. भीष्मांना खूप राग आला आणि ते स्वयंवर स्थळी आले. त्याच वेळी सौबल चा राजा शाल्व याला अंबेने माळ घातली. चिडलेल्या भीष्माने तिथे सर्व राज्यांशी युद्ध करून त्यांचा पराभव केला आणि अंबा ,अंबालिका, आणि अंबिका या तिघींचे हरण करून, रथात घालून ते आपल्या नगरीत परत आले. व आपला सावत्र भाऊ विचित्रवीर्य यांच्याशी लग्न करण्यास सांगितले. साहसी अंबेने स्पष्ट सांगितले मला शाल्वाशीच लग्न करायचे आहे मी त्याला तन-मन-धनाने वरले आहे. तिच्या इच्छेनुसार भीष्माने तिला शाल्वाकडे पाठवले. पण शाल्वाने तिचा स्वीकार केला नाही. तो म्हणाला ” भीष्माने तुझे हरण केले. परपुरुषाच्या स्पर्शाने तू भ्रष्ट, पतित झाली आहेस. तुझा कौमार्य भंग झाला आहे.” असहनीय उपेक्षा आणि प्रेम भंगाचे दारुण दुःख घेऊन ती भीष्मा कडे परत आली. “तुम्ही मला पळवून आणलेत, आता लग्न करा. ज्या स्त्रीचे हरण झाले त्या स्त्रीला वडिलांचे दरवाजे बंद असतात.” असे म्हणाली. भीष्म म्हणाले “मी आजन्म ब्रह्मचर्याची शपथ घेतली आहे “. बाणेदार आंबा म्हणाली,” मला तेच हवे. तुमची प्रतिज्ञा मोडण्यासाठीच मी आले आहे. प्रतिज्ञा मोडलेल्या व्यक्तीला जीवंतपणी नरक यातना भोगाव्या लागतात तीच पीडा मला तुम्हाला द्यायची आहे.”भीष्माने नकार दिला. आणि सूडाने पेटलेल्या अंबेने त्यांना धमकी दिली,” तुमच्या मृत्युचे कारण मीच असेन.” आणि वैफल्यग्रस्त होऊन ती जंगलात भटकत राहिली. तिथे तिला परशुराम ऋषींचा शिष्य होत्रवाहण भेटला. त्यांनी सांगितले भीष्माला किंवा शाल्वाला योग्य धडा शिकवण्याचे काम माझे गुरु करतील. त्याच्याबरोबर ती परशुराम ऋषींकडे आली व त्यांना म्हणाली,” मला न्याय हवाय. केवळ स्पर्शाने कौमार्य बाधीत होते तर आजन्म ब्रह्मचर्याचे व्रत घेतलेल्या भीष्माने कोणत्या अधिकाराने मला स्पर्श केला? परपुरुषाबद्दल अनुराग ठेवणारी स्त्री सर्पिणी प्रमाणे विषारी असते आणि ती पूर्ण कुटुंबाचा घात करते असे म्हणून त्याने मला परत पाठवले याचा अर्थ काय? परशुराम खरं तर तिची समजूत घालत होते पण तिचा युक्तिवाद त्यांना पटला. तिला मदत करण्यासाठी त्यांनी भीष्माला बोलावले पण भीष्म आले नाहीत. परशुराम ऋषी खूप संतापले आणि तेच भिष्मा वर चाल करून गेले. दोघेही तुल्यबळ योद्धे. तेवीस दिवस घनघोर युद्ध झाले. दोघांनी महाभयंकर अस्त्रांचा मारा सुरू केला. आता पृथ्वीचा विनाश होईल या भयाने नारदादी देवांनी मध्यस्थी करून युद्ध थांबवले. परशुरामाने तिला सांगितले आता मी तुला न्याय देऊ शकत नाही पण माझे गुरु आणि आराध्यदैवत भगवान महादेव यांच्याकडे तू जा. ते नक्कीच योग्य मार्ग दाखवतील. अंबेने अरण्यात घोर तपश्चर्या सुरू केली. गंगामातेने स्वतः तिची खूप समजूत घातली. पण अंबे ने जिद्द सोडली नाही. शेवटी शंकर प्रसन्न झाले पण ते म्हणाले या जन्मी त्यांचा मृत्यु करता येणार नाही. पुढच्या जन्मी तुझ्यामुळेच त्यांचा मृत्यू होईल. अंबेने स्वतःच लाकडी चिता रचून त्यात उडी घेतली व आत्मसमर्पण केले.
पुढच्या जन्मी शिखंडी च्या रूपाने तिने द्रुपद राजाच्या घरी जन्म घेतला. महाभारताचे घनघोर युद्ध सुरू झाले. शिखंडी अर्जुनाचा सारथी होता. 18 दिवस घनघोर युद्ध झाले. पितामह भीष्मांनी पांडवांच्या सैन्याची धूळधाण उडवली. शिखंडीच्या आड लपून अर्जुनाचा रथ त्यांच्या समोर आला. शिखंडी ला पाहून मी महिलेविरुद्ध शस्त्र उचलत नाही असे सांगून भीष्मांनी आपली शस्त्रे खाली ठेवली ती संधी साधून अर्जुनाने मर्मी घाव घातला आणि भीष्म धारातीर्थी पडले.
महाभारतातील सर्वात दाहक मृत्यू होता. अशाप्रकारे अंबेने आपला पण पूर्ण केला. अपमान आणि विटंबना असह्य झालेली एक स्त्री एका महानायकाच्या मृत्यूचे कारण बनली. जन्मजन्मांतरीच्या सूडाची कहाणी तिथली संपली पण तुमच्या आमच्या मनात ती सदैव घोळ तच राहणार. तिचा संपूर्ण जीवन प्रवास म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा लढा, मनपसंत पती निवडण्याच्या स्त्री अधिकाराचा लढा आणि अन्यायाविरुद्ध सर्वस्व झोकून दिलेला लढा.
सावित्री ही सृष्टी कर्त्या ब्रह्मदेवाची पत्नी. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली . महाप्रलयानंतर भगवान नारायण बराच काळ योग निद्रेत मग्न होते. ते जागृत झाले तेव्हा त्यांच्या नाभीतून एक दिव्य कमळ उगवले. त्या कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रम्हा हा विश्वाचा मूळ निर्माता, प्रजापती, पितामह आणि हिरण्यगर्भ आहे. पण अख्ख्या विश्वात त्याचे मंदिर फक्त राजस्थान येथील पुष्कर सरोवरात आहे. याचे कारण त्याची पत्नी सावित्री हिने दिलेला शाप.
ब्रम्हा कृतयुगे
पूज्यस्त्त्रेतायां
यज्ञ उच्चते !
द्वापरे पूज्यते
विष्णूवहं
पूज्यश्चतुर्ष्वपि
( ब्रम्हांडपुराण)
कृतयुगात ब्रम्हा पूज्य, त्रेतायुगात यज्ञ पूज्य, द्वापार युगात विष्णू पूज्य व चारही युगात मी( शिव) पूज्य आहे. असे ब्रम्हांड पुराणात सांगितले आहे. या श्लोकावरून सुरुवातीच्या काळात ब्रम्हा ची पूजा प्रचलित होती हे समजते. त्यानंतर वैदिक धर्मात यज्ञयागा ला प्राधान्य मिळाले.
ब्रह्मा आणि त्यांची पत्नी सावित्री यांनी एकदा मोठा यज्ञ करायचे ठरवले. सृष्टीचे कल्याण व्हावे म्हणून त्यांनी पुष्कर येथे यज्ञाचे आयोजन केले. नारदादी सर्व देव , ब्राह्मण उपस्थित झाले. यज्ञा चा मुहूर्त जवळ आला पण सावित्री चा पत्ता नव्हता. मुहूर्त साधण्यासाठी भगवान विष्णूच्या आदेशाने ब्रह्माने नंदिनी गायीच्या मुखातून एका स्त्रीची निर्मिती केली. तिचे नाव गायत्री ठेवले. पुरोहितांनी ब्रम्हाचे तिच्याशी लग्न लावले व यज्ञास सुरुवात केली. इतक्यात सावित्री तेथे आली. आपल्या जागी गायत्री पाहून ती रागाने बेभान झाली. तिने ब्रम्हा ला शाप दिला की ज्या सृष्टीच्या कल्याणासाठी यज्ञ सुरू केलास आणि माझा विसर पडला त्या सृष्टीत तुझी पूजा कोणीही करणार नाही. तुझे मंदिर बांधण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा नाश होईल. पतिव्रतेचा शाप खरा ठरला व आज तागायत ब्रह्मदेवाचे मंदिर कुठेही बांधले गेले नाही. तिची शापवाणी ऐकून सर्व देव देवता भयभीत झाले त्यांनी तिला शाप मागे घेण्याची विनंती केली. काही वेळाने तिचा राग शांत झाला व तिने ऊ:शाप दिला या पृथ्वीवर के वळ पुष्कर मध्ये तुझी पूजा केली जाईल. तेव्हापासून पुष्कर खेरीज कुठेही ब्रह्मदेवाचे देऊळ नाही व पूजाही केली जात नाही.
सावित्रीने ब्रम्हा ला शाप दिलाच पण विष्णूनेही साथ दिली म्हणून त्याला ही शाप दिला की तुम्हाला पत्नी विरहाच्या यातना भोगाव्या लागतील. भगवान विष्णू ने राम अवतार घेतला त्यावेळी त्याला 14 साल पत्नी विरह सहन करावा लागला. नारदाने ब्रह्माच्या विवाहाला संमती दिली म्हणून नारदाला शाप दिला तुम्ही आजीवन एकटेच रहाल. नारद मुनींचे लग्न झाले नाही. ब्राम्हणांनी हे लग्न लावले म्हणून सर्व ब्राह्मण जातीला शाप दिला तुम्हाला कितीही दान मिळाले तरी तुमचे समाधान कधीच होणार नाही तुम्ही कायम असंतुष्टच रहाल. ज्या गायीच्या मुखातून गायत्री निर्माण झाली त्या गाईला शाप दिला की कलियुगात तुम्ही घाण खाल. व हे सारे अग्नीच्या साक्षीने घडले म्हणून अग्नीला शाप दिला की कलियुगात तुमचा अपमान होईल. राग शांत झाल्यावर कोणाचेही न ऐकता ती पुष्कर तीर्था च्या मागे रत्नागिरी पर्वतावर निघून गेली. त्या ठिकाणी सावित्री मंदिर बांधले आहे. समुद्रसपाटीपासून दोन हजार तीनशे फूट उंचीवर ते मंदिर आहे. तिथे जाण्यासाठी शेकडो पायऱ्या चढाव्या लागतात. पण भाविक लोक आजही तिथे जातात.
राजस्थानात पुष्कर मध्ये ब्रम्हा इतकेच सावित्रीला पूज्य मानतात. तिला सौभाग्यदेवता मानतात. स्त्रिया भक्तिभावाने तिथे तिची पूजा करतात. तिथे मेंदी बांगड्या बिंदी तिला अर्पण करून भक्तिभावाने ओटी भरतात आणि सौभाग्याचे दान मागतात. इथे राहून सावित्री आजही आपल्या भक्तांचे रक्षण करते. अशी ही तेजस्वी पतिव्रता. पण अन्याय सहन करू शकली नाही. व तिचा राग योग्य असल्यामुळे ब्रह्मदेवाचे ही तिच्यापुढे काही चालले नाही. या सर्व प्रकारा मध्ये गायत्रीची काहीच चूक नव्हती म्हणून तिने तिला कोणताही शाप दिला नाही हे तिचे मोठेपण. आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या या मानी देवतेला कोटी कोटी प्रणाम.