कविराज विजय यशवंत सातपुते
*कवीता माझी, मी कवितेचा. . . !*
(प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी का “विश्व कविता दिवस – 21 मार्च” पर उनके कवि-हृदय की विवेचना करता यह आलेख। आप इस आलेख के माध्यम से जान सकते हैं कि कविता उनके व्यक्तिगत जीवन से कितनी गहराई तक जुड़ी हुई है।)
*कवित्* हा मुळ शब्द. याचा अर्थ गुणगुणणे असा आहे. आशयघन शब्द रचना गुणगुणत असताना, काव्य गुण, शब्दालंकारांनी ती नटत जाते. मनात आकारते, कागदावर साकारते, ह्रदयसुता म्हणून जन्माला येते. कविता स्वतः जगते, व्यक्त झालेल्या शब्दातून.. आणि जगायला शिकवते मिळालेल्या अनुभुतीतून. म्हणूनच मी म्हणतो, ”कविता माझी. . . मी कवितेचा” !
कवितेमधून मनोरंजन व्हावे, यापेक्षा प्रत्यक्ष कविता जगताना, घेतलेल्या अनुभवांच प्रगटीकरण कवितांद्वारे व्हावे असे मला वाटते. कवितेमधून एक माणूस दुसर्याशी जोडला जावा. परस्परांमध्ये विश्वबंधुतेचं नात निर्माण व्हावं, या उद्देशाने कवितेची संवाद साधत गेलो. आणि या संवादातूनच माझी जडणघडण सुरू झाली.
*साहित्यिक म्हणजे मूर्तीमंत प्रतिभा* आणि *रसिक म्हणून मूर्तीमंत अक्षरे* असं मी मानतो.
या रसिकांनी (मूर्तीमंत अक्षरांनी) माझ्या प्रतिभा शक्तीला दिलेल वरदान म्हणजेच ही *अक्षरलेणी*
या कवितेन मला मुलीच प्रेम दिले. आता ही ह्रदयसुता रसिक घरी सुखाने नांदते आहे. एक ओळख जेव्हा कला कलाकारांना मिळवून देते तेव्हा तो कलाकार सर्वस्वी त्या कलेचा आणि त्या कलेवर प्रेम करणार्या तमाम रसिक मायबापांचा होऊन जातो.
कोरी पाटी जीवनाची. त्यावर कवितेचा श्रीगणेशा केला जातो. माझी कविता साधी सोपी आहे. त्यात उथळ पणा नाही. विद्रोहाचा टाळ्यांसाठी घेतलेला जातीवादी तडका नाही. ही कविता सौंदर्य वादी असली तरी व्याकरण दृष्ट्या सालंकृत आहे. माझ्या कवितेत स्वप्न रंजन असले तरी वास्तवाचे भान आहे. आशा वादी असली तरी मर्यादाशील आहे. कविता लाघवी आहे. माझ्या इतकाच रसिकांना ही तिने लळा लावला आहे.
*लेक माझी सासुराला आज आहे जायची
एक कविता द्यायची अन् एक कविता घ्यायची*
रसिकांनी दिलेली प्रतिक्रिया ही देखील एक कविता असते हे जेव्हा जाणवलं तेव्हा खर्या अर्थाने कविता जगायला शिकलो. कविता कशी असावी हे कळण्याअगोदर कविता कशी नसावी हे कवितेनच मला शिकवल. अबोल कविता बरच काही सांगून जायची. म्हणून जमेल तेव्हा जमेल तितके तिला तिच व्यासपीठ मिळवून देतो. ते ही कुठलाही अट्टाहास न करता. कविता ऐकायला देखील तितकीच आवडते जितकी सादर करायला आवडते. माझ्या इतकच रसिकांच्या मनात ही तीने घर निर्माण केले आहे.
”अक्षरांना अक्षरांची आस आहे लागली
काव्यप्रेमी रसिकांची इथेच वृत्ती दंगली.”
अशी भूमिका ठेवून, वाचन, लेखन, चिंतन, मनन कलाव्यासंग जोपासत आहे. अक्षर अक्षर नेणून निर्मिलेली ही कविता कधी छंद मुक्त तर कधी छंदोबद्ध होऊन समाजात सन्मानाने वावरते आहे. माझी कविता चारचौघात वावरताना तिच्या नावापुढे माझं नाव लावते याहून दुसरे *सौभाग्य* (शत जन्माचे भाग्य ) कोणते?
आज पूर्ण तीन दशके कविता माझी आहे. ती माझी आहे, माझी राहिल. माझ्या नंतरही आमचे नाते रसिक मनात जीवंत ठेवण्याइतकी कार्यप्रवण वाटचाल तिने केलेली आहे. म्हणूनच अभिमानाने सांगावेसे वाटते
*कविता म्हणजे पायसदान
कविता म्हणजे एक दुवा
माणूस माणूस जावा जोडत
जगण्यासाठी मंत्र नवा.! *
© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे.
मोबाईल 9371319798