श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “चिल्लर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
… कालपरवापर्यंत ही चलनी नाणी होती बाजारात…
… होतं त्याचं प्रत्येकाचं आपापलं मानाचं मुल्य….
.. दोन पैसै टाकले तर मिळत होती पार्लेची लिमलेटची गोळी..
… आंबट गोड चवीने तोंड स्स स्स करणारी…
… आणे बाराणे, चवली पावली नि अधेली…
… खुर्दा चिल्लरचा खुळखुळ वाजविणारी…
… नगदी नोटांचा कागदी सुळसुळाट होता कि तेव्हा..
.. फक्त तो धनिकांच्या पेढीवर नि गरिबांकडे लाजाळू…
… तांबा पितळ, शिसे, अल्युमिनियम धातूचीं नाणी
… भाव वधारला धातूंचा नि जमाना लोपला नाण्यांचा…
… शेवटी कागदी नोटाने नाण्यांवर मात केली…
… चिल्लर आता बाजारातून हद्दपार झाली…
… कुठे कधीतरी नजरेस पडते एखादे फुटकळ नाणे…
… सांगत असते आपले भूतकाळाचे गाणे केविलवाणे…
… आता रस्तावरचा भिकारी त्याला झिडकारतो..
… ना बाजारातला व्यापारी गल्ल्यात आसरा देतो…
.. देवाच्या पेटीत गुपचूप दान धर्म केल्याचा टेंभा मिरवतो..
… डोळे बंद असलेला देव भक्ताची दांभिक भक्ती ओळखतो…
… अन माणसाला तू कितीही महान झालास तरीही मजपुढे…
…. आजही चिल्लर आहेस हेच सुचवत असतो.. तसे
… नवी येणारी प्रत्येक पिढी जुन्या पिढीला चिल्लर समजत राहते..
… मुल्य हरवून बसलेली जुनी पिढी अवमुल्यनाच्या दुखाने अवमानित होऊन जाते…
… होतं त्याचं प्रत्येकाचं आपापलं मानाचं मुल्य…
… चिल्लर असलं म्हणून काय झालं?..
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈