मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – लेकुरवाळा – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– लेकुरवाळा – ? ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सावळ्या हरीचे रूप हे साजिरे 

संत मांदियाळी विठूचे गोजिरे ||

*

ज्ञाना तुका नामा हाती कडी घेती

निवृत्ती सोपान सवे चालताती

लेकुरवाळे रूप पाहुनी भान नुरे

सावळ्या हरीचे रूप हे साजिरे ||

*

वाळवंटी सारे संत जमा झाले

संतांच्या मेळ्यात देव दंग झाले

मायबाप हरी संगे विठू घोष पसरे

सावळ्या हरीचे रूप हे साजिरे ||

*

वारीची पर्वणी जीव शिव जमले

चंद्रभागा तीर नाचू गाऊ लागले

दंग पंढरी क्षेत्र नामाच्या गजरे

सावळ्या हरीचे रूप हे साजिरे ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ भक्तांची आण… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? भक्तांची आणश्री प्रमोद वामन वर्तक ☆

विरह विठुरायाचा 

होणार आजला दूर

सावळ्याच्या पंढरीला

येई भक्तीचा महापूर

*

धन्य झाली चंद्रभागा

सारी पंढरी रंगली

पांडुरंगाच्या दर्शनाने 

भक्ती रसात दंगली 

*

नको देवू तू अंतर

जीव तुटे तुझ्याविण

घडुदे वारी दरवर्षी

तुला भक्तांची आण 

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ नेमेचि येतो असा पावसाळा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – नेमेचि येतो असा पावसाळा – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

पडला पाऊस  | तुंबली मुंबई |

पोल खोल होई | यंत्रणेची ||१||

*

 नाल्यांची सफाई | करोडो मलिदा |

 कोणावर फिदा | प्रशासन ||२||

*

 रस्त्यावर खड्डे | खड्ड्यातून रस्ता |

 जीव झाला सस्ता | सामान्यांचा ||३||

*

पडताच सरी | प्रशासन जागे |

कंत्राटाचे धागे  | लपवाया ||४||

*

कारवाईची ना | कोणालाच भीती |

पावसाळे किती | पडोनिया ||५||

*

रस्त्यावर नदी | सार जलमय |

त्रासाची सवय | जनतेला ||६||

*

नेहमीची येतो | ऋतू पावसाळा ||

सोसाव्यात कळा | बिब्बा म्हणे ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ विठ्ठल विठ्ठल म्हणता… — दोन काव्ये ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ विठ्ठल विठ्ठल म्हणता… — दोन काव्ये ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

१ ) 

वारीमधे चालताना

डोईवर वृंदावन

गळा वैजयंती माळ

मुखे विठु गुणगान

*

एकरूप होती सारे

विठुमाऊली ओढीने

विठ्ठल विठ्ठल म्हणता

मिळे मना संजीवन

*

 आषाढाचे मेघ नभी

 सावळ्याचे रूप जणू

 ते  रिमझिम पडताना

  गोडी तया अभंगाची

*

  श्वास येतो आणि जातो

  त्याने मिळे देहभान

  वारीमधे चालताना

 मना ईश्वरीय आश्वासन

*

   विठू माऊलीची माया

   चंद्रभागेच्या पाण्यात

   तिच्या काठावर दिसे

   तीच वाळूच्या कणात

*

   दर्शनाचा लाभ होता

   पायी टेकताच डोई

   एक अनामिक ऊर्जा

   क्षणी संचारते देही

*

   देहातली  स्पर्श ऊर्जा

   जगण्याची साफल्यता

   माऊलीच मायबाप

   पांडुरंग बहिण बंधू भ्राता

*

   सर्व सुकूमार मृदू धागे

   जडलेत विठ्ठलाचे पायी

   पदराची सावली नित्य

   देते माझी रखुमाई

—  कवयित्री : नीलांबरी शिर्के

२ ) 

आली पावसाची सर

 हिंडे साऱ्या दिंडीभर

 पूर्ण दिंडीत ऐकु येई

 विठू नामाचा गजर

*

 सर वारीत फिरली

भक्तिरसात भिजली

 तिच्या थेंबाथेंबातच

 विठू माऊली भरली

*

 आता सरी  बरसणे

 वाटे अभंगाचे गाणे

 आषाढी पालखीचे

 आहे स्वरूप देखणे

—  कवयित्री : नीलांबरी शिर्के

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ निसर्ग… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – निसर्ग – ? ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

निसर्ग ही तर खरी आठवण करून देतो 

मायावी आरसा होऊन तुझ्या समोर येतो 

ढळलेल्या मनाचा दु:खी माणूस तेव्हा

 आवेगाने  सावरून कसा सुखी होतो

*

अद्भुत किमया अचानक अशी उजागर होते 

बघणाराला ऐश्वर्याचे दृष्टी दान मिळते 

हीच अपार किमया असते परमेशाची

इथेच नात्यांची नात्याशी खरी नाळ जुळते

*

तू तुझा म्हण किंवा हवंतर माझा म्हण

पण हे जगच या जगाचा नित्य परिपोष करते 

हेच माणसांनी कधी काळी विसरू नये

येवढीच त्या अनंताची माफक अपेक्षा असते 

*

आपण काय आज आहेत उद्या कदाचित नाही 

विश्व त्याचे अफाट सौंदर्य कायम जपत राहील 

औदार्याच्या खुणा त्याच्या जगाला दिसतील कायम

पण मुक्तपणे जगणारा चिरंजीव आत्मा येईल जाईल

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कृपेचे आभाळ… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – कृपेचे आभाळ – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

सुंदर लोभस | सखा पांडुरंग |

जीवनात संग | श्वासापरी ||१||

*

ललाटी शीतल | चंदनाचा टिळा |

शोभे हार गळा | तुळशीचा ||२||

*

सावळा विठ्ठल | कटेवरी कर | 

उभा वीटेवर | युगे युगे ||३||

*

मकर कुंडल | कर्ण झळकती |

तेज उधळती | दिव्यत्वाचे ||४||

*

सुवर्ण मुकुट | भव्य शिरावरी |

पंढरीत हरी | वैष्णवांचा ||५||

*

कुंतल कुरळे | सावळी ही काया |

हृदयात माया  | माऊलीच्या ||६||

*

लेकरांचा करे | माऊली सांभाळ |

कृपेचे आभाळ | धरोनिया ||७||

(चित्र सौजन्य :कु.ह्रदया सखाराम उमरीकर ) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “चल गं सखे…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– “चल गं सखे…” – ? ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर☆

चल गं सखे शिवारात जोडीनं जाऊ

तुझ्या माझ्या पिरतीच गोड गानं गाऊ

*

ढगाच पांघरून शिवाराची माती

तुझी माझी बैलगाडी डौलात जाती

तू माझी सजनी मी गं तुझा राऊ

तुझा माझ्या पिरतीच गोड गानं गाऊ

*

कस सांगू तुला माझ्या मनातलं राया

तुझ्या संग लाभतोया अत्तराचा फाया

काळजाचा ठाव घेत्यात पिळदार बाहू

तुझ्या माझ्या पिरतीच गोड गानं गाऊ 

*

मांडीवर पाय दे गं हातामधी हात

तुझ्या संग माझं सखे फुलतया नात

हुरुदाचं गुपित नजरेनं पाहू

तुझ्या माझ्या पिरतीच गोड गानं गाऊ

*

पायातल्या घुंगरात खुळखुळ दाटली

व्हटात डाळींब सखी मला भेटली

रानी तुझा शिणगार येडं नको लावू

तुझ्या माझ्या पिरतीच गोड गाणं गाऊ

 © सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चांदणे सांडूनी गेले ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “चांदणे सांडूनी गेले…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

मेघ नभीचे उतरले

चांदणे सांडूनी गेले

उजळले तन काटेरी

मन तेजपुंज झाले

*

सरी बरसता अंधारी

तन नक्षत्र पांघरले

रात्र कुशीतील भय 

वाऱ्यासवे पळाले !

*

काळोखाच्या पदरी

दीप तेजाचे पसरले 

नभातल्या चांदण्यांना

ओठी हसू उमटले !

*

निसर्गाचा साक्षात्कार 

फुलाविना हा बहार

किती सुंदर देखावा  

जणू वाटे चमत्कार

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वाट हळदुली झाली… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?


☆ वाट हळदुली झाली… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

आभाळ भरून आलं  

धरती भरात आली

पाऊस भूमी मिलना

वाट हळदुली झाली

*

हळदीच्या पखरणीने

जमीन दिसते देखणी

नव्हाळी चढे अंगावर

या फुलांच्या पखरणी

*

की वाट जाहली ही

जेजुरी गडाची वाट

खंडेरायाचा भंडारा

भक्ते उधळला दाट

*

वाट जेजुरीची हिच

हीच म्हाळसाईची वाट

जाता  पुढेच लागेल

असा बाणाईचा घाट

*

या  पिवळ्याची जादू

त्याच्या रंगातुन बोले

पीत फुलांची  पखरण

किती आठवात आले !

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “विठू सावळा…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– “विठू सावळा…” – ? ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर☆

फणस पहा हा लेकुरवाळा

जणू भासला विठू सावळा

संत मंडळी फणस रूपाने

अंगोपांगी लागला लळा

*

विठ्ठल विठ्ठल नाद घुमावा

आसमंत ही भरून जावे

पाने पिटती टाळ्या आणि

विठू नामाचे गाणे गावे

*

आषाढाचे रूप मनोहर

जिथे तिथे मज भेटे विठ्ठल

चराचराला हिरवाईतून

भक्तांना माऊलीच भेटेल

 © सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares