सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
***** पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन *****
☆ वलयांकितांच्या सहवासात – भाग १ – लेखक: डॉ. नितीन आरेकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
मला आठवतं तेव्हापासून त्याला मी, झाकीरकाका असं म्हणत आलोय. कारण तो माझ्या सगळ्यात धाकट्या काकाचा- रवीकाकाचा खास दोस्त. त्याला पहिल्यांदा पाहिला तो वयाच्या तिसर्या वर्षी. १९६९ साली. संध्याकाळी डेक्कन क्वीननं रवीकाका व अरुणकाका मुळे त्याला घेऊन आमच्याकडे कर्जतला आले होते. आमचा ८० वर्षांचा जुना वाडा होता. ते तिघं अचानक आले होते. पण आजीनं त्याला वाड्याच्या बाहेर उभं केलं. त्याच्यावरून भाकरतुकडा ओवाळून टाकला, पायावर दूध-पाणी घातलं आणि मग त्याला आत येऊन दिलं होतं. आमच्या बाजारपेठेच्या नाकावर कामतांचं वड्याचं दुकान होतं. रवीकाकाला त्यानं सांगितलं, “यार कर्जतका वडापाव खिलाओ. ” रवीकाकानं कामतांच्या हॉटेलातला वडापाव मागवला आणि त्यानं चवीनं वडा-पाव व सोबत तिखट मिर्ची खाल्ली. मला आठवतं त्याप्रमाणे, झाकीरकाका नंतर घरभर फिरला, मागे विहिरीवर गेला.
विहिरीचं पाणी स्वत: शेंदून काढलं, त्यानं हातपाय धुतले. गोठ्यातल्या म्हशीचं ताजं दूध मधुकाकांनी काढलेलं, त्यांच्यासमोर हातात ग्लास धरून उभा राहिला व थेट तसंच ते दूध प्यायलं. त्यावेळी मला ह्या साध्या गोष्टींचं महत्त्व कळलं नव्हतं. पण आज या लेखाच्या निमित्तानं आठवणींचा गोफ उलगडत असताना, त्यावेळपर्यंत आंतरराष्ट्रीय कीर्ति मिळवलेल्या त्या माणसाचं साधंपण सर्वप्रथम लक्षात आलं.
त्या संध्याकाळी झाकीरकाका कोपर्यावरच्या मारुतीकाका मगर यांच्या दुकानात दाढी करायला गेला. तिथं त्याला कळलं की मारुतीकाका हे भजनी आहेत. तो लगेच त्यांना म्हणाला, “रातको रवी के यहाँ आ जाना. हम लोग बजानेवाले है. ” त्या रात्री रवीकाका, अरूणकाका त्याला घेऊन जवळच असलेल्या प्रभा आत्याच्या घरी गेले. तिच्या घरच्या दिवाणखान्यात हे सारी रात्र गाणं बजावणं करत बसले होते. नंतर कधी तरी आठवणी जागवताना रवीकाका म्हणाला त्या रात्री प्रभाआत्याच्या घरी गजाननबुवा पाटील, लीलाताई दिवाडकर, प्रभा आत्या, कल्पनाआत्या कुलकर्णी (हिचं नुकतंच निधन झालं) असे सारे गायले, शांताराम जाधव हार्मोनियमवर होते, मारुतीकाका टाळ घेऊन साथीला होते. त्या दिवशी गजाननबुवांची गायकी ऐकून झाकीरकाका त्यांना म्हणाला होता, “आप तो भजन के गोपीकृष्ण हो” बाकी सारी मंडळी हौशी होती. पण, झाकीरकाकाला तो कोणाबरोबर तबला वाजवतो, यात फारसा रस नव्हता. तो तबल्याचा आनंद घेत होता. दुसर्या दिवशी सकाळी डेक्कन एक्स्प्रेसने तो सवाई गंधर्व सोहळ्यात तबला सोलो सादर करायला गेला. तो त्याचा सवाई गंधर्व सोहळ्यामधला पहिला कार्यक्रम होता.
त्यानंतर झाकीरकाका कर्जतला रवीकाकाच्या सांगण्यावरून १९७१, ७२, ७३ आणि नंतर बेडेकरांच्याकडे पाडव्याच्या निमित्ताने संगीत सोहळा असे, तेव्हा १९७५ साली आला. त्या प्रत्येक वेळी त्याच्यातला साधेपणा मनात घर करून गेला. कोणताही झब्बा पायजमा घालायचा आणि तबला वाजवायचा. कपड्यांपेक्षा त्याचं संगीताकडे अधिक लक्ष असायचं. आणि तो इतका देखणा आहे की त्याला काहीही साजून दिसतं.
झाकीरकाकाची एक सवय आहे. तो तुमची ओळख झाल्यानंतर व नंतर जवळचा परिचय झाल्यानंतर तुम्हाला एखादं टोपणनाव देतो. मला लहानपणापासून ज्या टोपणनावानं सारे हाक मारत तेच टोपणनाव तो आजही वापरतो. त्याच्याशी परका माणूस जरी बोलला तरी त्या व्यक्तीला तो परकेपणाची जाणीव कधी करून देत नाही.
त्याने मराठीत मुलाखती दिल्या पण शब्दांकन दिलं नाही. ‘ऋतुरंग’च्या अरुण शेवते यांनी मला सांगितलं की २००३ च्या दिवाळी अंकासाठी तुम्ही उस्तादजींच्या जडणघडणीविषयी त्यांची मुलाखत घ्या व तिचं शब्दांकन करता येईल का ते बघा. माझं ते पहिलं शब्दांकन असणार होतं. मी रवीकाकाला सांगितलं, निर्मला बाछानी म्हणून झाकीरकाकाच्या सचिव आहेत, त्यांना सांगितलं आणि झाकीरकाका मुलाखतीला तयार झाला. शब्दांकनकार होण्यासाठी मला पहिला आशीर्वाद मिळाला तो उस्ताद झाकीर हुसेन यांचा.
१९८७ च्या सुमारास दर रविवारी दुपारी सिद्धार्थ बसूचा एक ‘क्वीझ टाईम’ नावाचा शो असायचा. त्या क्वीझ शोमध्ये झाकीरकाका एकदा गेस्ट म्हणून गेला. मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो. त्या शो मध्ये सिद्धार्थ बसूने त्याला प्रश्न विचारला, “तू जगभर फिरलास. आता तुला भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यातला कोणता भेद सांगता येईल. ” त्यानं दिलेलं उत्तर आजही काळजावर कोरलं गेलं आहे. तो म्हणाला, “मी जेव्हा पाश्चिमात्य संगीतकारांना भेटतो, तेव्हा त्यांना हस्तांदोलन करून हॅलो माईक, हॅलो मार्क असं म्हणतो. पण जेव्हा मी पं. रवी शंकरजी, पं. शिवकुमार शर्माजी, पं. हरिप्रसाद चौरसिया, अशा दिग्गजांना भेटतो, तेव्हा त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करतो. दुसर्या बरोबरीच्या वयाच्या लोकांना भेटतो, तेव्हा दोन्ही हात जोडून ते जोडलेले हात हृदयाशी नेतो व मान झुकवून नमस्कार करतो आणि वयानं लहान असलेल्यांना हृदयाशी धरतो. ही माझी भारतीय संस्कृती आहे, ज्येष्ठांना मान देणारी आणि कनिष्ठांविषयी प्रेम व्यक्त करणारी. ” मला याचा अनुभव आहे.
तीन वर्षांपूर्वी अब्बाजींच्या, उस्ताद अल्लारखांसाहेबांच्या, बरसीला पद्मविभूषण बेगम परवीन सुलताना यांचं गाणं त्यानं आयोजित केलं होतं. त्यावेळी पहाटे पहाटे मी व रवीकाका षण्मुखानंद सभागृहात पोहोचलो होतो. परवीनजींचं गाणं सुरू व्हायचं होतं. त्यापूर्वी ड्रेसिंगरूममध्ये बरेच जण जमले होते. परवीनदीदी सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांच्या बाजूला अन्य ज्येष्ठ संगीततज्ज्ञ बसले होते. पहिला कार्यक्रम सुरू करून देऊन झाकीरकाका त्या ड्रेसिंगरूममध्ये आला, आणि परवीनदीदींच्या जवळ खाली जमिनीवर जाजम अंथरलं होतं त्यावर बसला. त्याला कोणी तरी बाजूच्या खुर्चीवर बसायचा आग्रह केला. तेव्हा तो हळूवारपणे म्हणाला, “परवीनजी ज्येष्ठ आहेत, त्यांच्याबाजूला बसणं योग्य होणार नाही. ” नंतर आम्ही उस्ताद आमीरखांसाहेबांच्या बरसीला एन्. सी. पी. ए. ला गेलो होतो. त्या दिवशी झाकीरकाका हा नवोदित उमद्या अशा सारंगीवादकाबरोबर- दिलशादखांबरोबर वाजवणार होता. कार्यक्रमाच्या सूत्रानुसार आधी दिलशादखां येणार आणि नंतर उस्ताद झाकीर हुसेन येणार असं होतं. मी व रवीकाका विंगेत होतो. उस्तादजींनी निवेदकाला क्रम बदलायला सांगितला आणि म्हणाले, “मी आधी स्टेजवर येतो व मी दिलशादला इंट्रोड्यूस करतो. ” त्याच्या नावाचा पुकारा झाल्यानंतर, रंगमंचावर पाऊल ठेवण्यापूर्वी त्यानं त्याच्या चपला बाहेर काढून ठेवल्या. मग रंगमंचावर शिरला. सर्व रसिकांना नम्रपणे कमरेतून वाकून नमस्कार केला आणि मग त्याने दिलशादखांबद्दल छानसं वक्तव्य केलं, ‘आज मी त्याच्याबरोबर पहिल्यांदा वाजवणार आहे’ असं सांगून मग श्रोत्यांना टाळ्यांच्या गजरात दिलशादखांचं स्वागत करावं अशी विनंती केली. एखाद्या ज्येष्ठाने नवोदिताचा इतका मोठा सन्मान कधी केला नसेल.
तो मूल्ये जपणारा माणूस आहे. ‘लोकसत्ते’तील माझी शब्दांकनं लोकांना आवडत होती. एका मोठ्या उद्योजकाला ती फार आवडली. त्यांच्या पत्नीनं मला शोधून काढलं. मला फोन करून त्यांच्या पतीचं आत्मकथन लिहिण्याची विनंती त्यांनी केली. मी फारसा तयार नव्हतो. त्याचं एक कारण म्हणजे ते अफाट श्रीमंत असले तरी त्यांचा व्यवसाय हा तंबाखूशी निगडित होता. मला कोणतीही व्यसनं नाहीत, मी व्यसनांना स्पर्शही केलेला नाही. मी प्राध्यापक आहे. त्यामुळे ते मला योग्य वाटत नव्हतं. पण माझे वडील म्हणाले, ‘एक वेगळं जीवन समजून घेता येईल. ‘ त्या उद्योगपतींचं जीवन खरोखरच समजून घेण्याजोगं होतं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांनी मला विचारलं, “या रक्तदान शिबिराला झाकीरजी भेट देऊ शकतील का?” विचाराल का? अब्बाजींची बरसी जवळ आली होती. आम्ही आदल्या दिवशी झाकीरकाकाकडे गेलो. मी झाकीरकाकाला विनंती केली, “अशा अशा कार्यक्रमाला तू येशील का?” त्यानं माझ्याकडे रोखून पाहिलं व पुढच्या क्षणी म्हणाला, “नहीं, मैं नहीं आऊंगा, पहले लोगों का खून चूसो बाद में खून भी लो।इस भारत में मैं दो सेलिब्रिटीज को जानता हूँ जिन्होंने आजतक किसी इंटॉक्सिकेशन से रिलेटेड कोई काम नहीं किया। एक बहोत बडा है जिसका नाम सचिन तेंडुलकर है और दुसरा बहोत छोटा है जिसका नाम झाकीर हुसेन है. ” मी अर्थातच त्या व्यक्तीचं आत्मकथन शब्दांकित केलं नाही.
– क्रमशः भाग पहिला
लेखक : डॉ. नितीन आरेकर
Tel:+91 880 555 0088
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈