तू नऊ दिवस नऊ रंग परिधान केलेस किंवा नाही केलेस तरी, हे कबूल आहे की, तू आहेस म्हणून रंगहीन आयुष्य रंगीत होतं!
केवळ शास्त्रात सांगितलंय म्हणून नाही, तर त्यानिमित्ताने वर्षभर कपाटात पडून राहणाऱ्या जरीच्या साड्या बाहेर पडून तुला उत्साहाने नेसायला मिळतात हे सत्य नाकारू शकत नाही!
दांडिया खेळलीस किंवा नाही खेळलीस, तरी आपण हे नाकारू शकत नाही की घरातील सर्वांच्या आयुष्याचा खेळ केवळ तू आयुष्यात असण्याने सुखकर होतो!
तू नऊ दिवस उपवास कर किंवा उठता बसता उपवास कर, तरी सर्वांना हे माहिती आहे की घरातल्यांची उपासमार होऊ नये म्हणून तू आयुष्यभर तुझ्या जीवाचं रान करतेस!
तू घट बसव किंवा तुझ्या देवीला फुलांनी सजव, पण पुरुषांच आयुष्य मात्र तूच सजवलं आहेस!
तू दिवा लाव किंवा पणती लाव, पण या विश्वाच्या निर्मितीपासून तुझ्यामुळेच पुरुषांच्या आयुष्यात प्रकाश आहे!
थोडक्यात काय तर…
तूच धरती आहेस…
तूच आकाश आहेस…
तूच सुरुवात आहेस…
आणि शेवटही तूच आहेस!
तुझ्याच कुशीत जन्माला येऊन तुझ्याच कुशीत विसावून निर्धास्तपणे आयुष्य जगणाऱ्या समस्त पुरुषांनी तुझ्यातील स्त्रीत्वाला सलाम करायला हवा!
प्रत्येक स्त्री मधील नारी शक्तीला मानाचा मुजरा!!
संग्रहिका – सौ.अंजली दिलिप गोखले
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ मैत्री मैत्रीच असते ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी☆
एकदा एका माकडाला ?अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर; त्यानं झोपलेल्या सिंहाचे ? कान ओढले.
सिंह उठला आणि रागानं गर्जना केली की, “ हे धाडस कोणी केलं ?
स्वतःच्या मृत्यूला स्वत:हून कुणी बोलावलं ? “
माकड : “ मी कान ओढले. महाराज, सध्या मला कोणी मित्रच नसल्यामुळे मी खूप उदास आहे?; आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका.”
सिंहानं हसून विचारलं ?: “ माझे कान ओढतांना, तुला कोणी पाहिलं तर नाही ना ?” ?
माकड : “ नाही महाराज.”
सिंह : “ मग ठीक आहे. आता असं कर. आणखी पाच-दहा वेळा माझे कान खेच, खूपच छान वाटतंय रे !”
या कथेचे सार :— एकटा राहून जंगलाचा राजाही कंटाळतो.
यावरून स्पष्ट होतं की मैत्री ही हवीच. म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा, ? त्यांचे कान ओढत रहा, म्हणजे चेष्टा मस्करी करत रहा. ? मेसेज येणे भाग्याचे समजा, कोणीतरी आपली आठवण काढतंय. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, देवाण घेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो. कंटाळवाणे होऊ नका. वयाला विसरा, मजा करत रहा. संसार प्रपंच तर सगळ्यांनाच आहे.
विश्वास ठेवा की, तुमचं मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू.
मैत्री – श्रीमंत किंवा गरीब नसते, मैत्री शिकलेली वा अडाणी कशीही असो – मैत्री मैत्रीच असते.
सहज वाटले मन मोकळं करावं ☺️.
संग्राहक : सुहास सोहोनी
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
आपल्या निर्मळ विनोदाने, कथाकथनातून सात दशके महाराष्ट्र हास्यरसाचा आस्वाद घेत होता, आता करोनाच्या महामारीमधे विनोद हाच सांगाती आवश्यक असताना आपण निघून गेलात..
आता बापाची पेंड कोण देणार, व्यंकूची शिकवणी कोण घेणार, शिवाजीचे हस्ताक्षर कोण पहाणार?
अवघी भोकरवाडी हळहळली..
गणा मास्तर
नाना चेंगट
बाबू पहिलवान
शिवा जमदाडे
सुताराची आनशी
सर्व आपले मानसपुत्र,
? भावपूर्ण श्रद्धांजली
संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
भारद्वाज ऋषींनी आपल्या “सौदामिनी तंत्र” या ग्रंथात विजांचे (Electricity) ५ प्रकार सांगितले आहेत. ते खालील प्रमाणे आहेत.
१) रेशीम, कोल्हा, ससा किंवा मांजर या प्राण्यांचे कातडे हवेत झटकले तर उत्पन्न होते ती ‘तडित्’ वीज. (पाश्च्यात शास्त्रज्ञ अद्याप हिचा काहीच उपयोग करीत नाहीत.)
२) स्फटिक, रेशीम, लाख वगैरे जिनसा एकमेकांवर घासल्यावर उत्पन्न होते ती ‘सौदामिनी’ वीज.
३) आकाशात ढगात उत्पन्न होते ती ‘चपला’, हिलाच विद्युत, चंचला असेही संबोधतात.
४) विद्युतकुंभ ( Battery ) मध्ये उत्पन्न होणारी वीज ती ’शतकोटी’. * अगस्त्य ऋषी हिला ‘मित्रावरुणौ’ म्हणतात. मित्र म्हणजे धन व वरुण म्हणजे ऋण वीज होय. कार्य करण्यासाठी शंभर कुंभ वापरावे लागतात म्हणून हिला ‘शतकुंभी’ अथवा ‘शतकोटी’ असेही म्हणतात.
५) लोहचुंबकाचे फिरण्याने उत्पन्न होऊन एका भांड्यात साठवली जाणारी ती ‘हादिनी’ वीज. वीज साठवण्याच्या भांड्याला हूद (Storage Battery ) म्हणतात.
वशिष्ठ, अगस्त्य व भारद्वाज यांनी विजेच्या शास्त्रांवर ग्रंथ लिहिले आहेत. विमानशास्त्रांवर नारायण, वाचस्पति, शौनक, गर्ग व भारद्वाज यांचे ग्रंथ आहेत.
वरील माहिती श्री कृष्णाजी विनायक वझे (१८६९ – १९२९) यांच्या लेखातून घेतली आहे. श्री कृष्णाजी विनायक वझे हे इंजीनिअर होते. त्यांनी सिंधमधील सिंधू नदीवर सक्करचे प्रसिध्द धरण बांधले, त्याबद्दल इंग्रज सरकारने त्यांना ’रावबहादूर’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता. पुढे लो. टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी इंग्रज सरकारची पदवी परत केली व स्वत:ला भारतीय शिल्पशास्त्राच्या संशोधनाच्या कार्यात वाहून घेतले. त्यांनी अनेक भारतीय प्राचीन वास्तु शिल्प शास्त्रांच्या ग्रन्थांचा अभ्यास केला. पण दुर्दैवाने त्यांचे बरेचसे लिखाण आज काळाच्या उदरात गडप झाले आहे. सध्या त्यांचे केवळ एकच पुस्तक उपलब्ध आहे. त्यांनी त्यांच्या या संशोधन कार्यात ज्या प्राचीन ग्रन्थांचा अभ्यास केला ती यादी केवळ पाहिली तरी थक्क व्हायला होते. त्यातीलही बरेचसे ग्रन्थ आज नष्ट झाले आहेत. पण जे आहेत त्यांचा अभ्यासही खूप मोठा आहे. अनेक संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करुन त्यावेळी आपला समाज किती प्रगत होता याविषयी सांगताना श्री वझे म्हणतात की, “ गेल्या ३० वर्षात संस्कृत ग्रंथांचा विचारपूर्वक अभ्यास केल्यावर भौतिक शास्त्रमय शिल्पात हिंदुस्तानात किती ज्ञान होते याबद्दलचा एक निबंध मी इतिहास संशोधक मंडळासमोर वाचला. मी आपल्या माहितीसाठी येथे इतकेच सांगतो की, वाफेच्या यंत्राखेरीज बहुतेक आधुनिक शिल्प (मशीन्स) आपल्याकडे एकेकाळी होती असे मला आढळून आले आहे.”
आजच्या शिक्षण पद्धतीविषयी श्री वझे म्हणतात की, ” इंग्रजी राज्य हिंदुस्थानात आल्यावर इंग्रजानी केलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी इंग्रजीतून शिक्षण देण्यास सुरवात केली. यामुळे इंग्रजी ज्ञान व त्याचा फैलाव हिंदुस्थानात झाला. तशातच सरकारी नोकऱ्यात ज्ञानापेक्षा इंग्रजी भाषेला अधिक प्राधान्य प्राप्त झाल्याने प्राचीन हिंदू ज्ञानाकडे लोकांचे दुर्लक्ष झाले. याचा परिणाम असा झाला की, भारतात विचार करण्यासारखे ग्रंथच नाहीत व सर्व उत्तम ज्ञान काय ते पाश्चिमात्यांकडेच आहे, अशी मोठ्या समजल्या जाणाऱ्यांची समजूत झाली. ज्याप्रमाणे वेदांतात हेगेल, कांट, शोपेनहार, प्लेटो, सॉक्रेटिस, मिल, ह्यूम यांच्या वेदांताचे जितके व जसे शिक्षण दिले गेले, तसे पतंजली, कणाद, जैमिनी, बादरायण यांच्या वेदांताचे दिले गेले नाही. हीच अवस्था इतर विषयांच्या बाबतीतही झाली.” ज्यांनी मोठमोठी राज्ये चालविली, किल्ले, कालवे, इमारती, पूल वगैरे बांधले, सूक्ष्म विचार करण्यात ज्यांची बुद्धी फार कुशाग्र अशी ज्यांची ख्याती, असे लोक भौतीक शास्त्रांशिवाय राहिले कसे ? अशी सहज येणारी शंकासुद्धा या पंडितांना आली नाही..
संग्राहक : माधव केळकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
स्वार्थाने बरबटलेल्या जगात आपल्याला यशापयशासकट जर कोणी स्वीकारत असेल, तर ते म्हणजे फक्त आपले आईबाबा. नेमके आपण त्यांना आपल्यापासून दूर करण्याचा अपराध करतो. ते त्याचीही खंत करत नाहीत. पिल्लं शरीराने आणि मनाने दूर गेल्याचे दु:खं सहन करतात आणि कधी चुकून जवळ आले, तर तितक्याच मायेने त्यांची चौकशी करतात. अशा प्रेमळ जन्मदात्यांना दुखवण्याचे पाप कधीही करू नका…
एक मेडिकलचे दुकान होते. औषध घेण्यासाठी लोकांची गर्दी होती. मेडिकलवाला शक्य तेवढ्या लवकर प्रत्येकाला अचूक औषध देत गर्दी कमी करत होता. त्याचा सहाय्यकही आपले काम चोखपणे पार पाडत होता. त्याचवेळेस रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला झाडाखाली एक बाई मेडिकलकडे बघत ताटकळत उभी होती. बहुदा ती मेडिकलमधील गर्दी कमी होण्याची वाट बघत असावी. मेडिकलवाल्याचे तिच्याकडे लक्ष गेले. तिची अस्वस्थता पाहून त्याने काही वेळ सहाय्यकाला दुकानाकडे लक्ष दे असे सांगून आजीकडे धाव घेतली.
आजीने त्याला पाहिले. तिला खुशाली वाटली. आजीच्या राहणीमानावरून ती मध्यमवर्गीय कुटुंबातली वाटत होती. मेडिकलवाल्याने तिला कोणते औषध हवे, असे विचारले. आजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. मेडिकलवाला म्हणाला, `काय झाले आजी, औषध घ्यायला पैसे नाही का?’आजी म्हणाली, `पैसे आहेत, पण मला हवे असलेले औषध तुझ्याकडे आहे का?’
मेडिकलवाला गोंधळला. त्याने आजीकडे औषधाचा कागद मागितला. तो आजीकडे नव्हता. आजी म्हणाली, `लेका, माझा मुलगा तुझ्याच वयाचा असेल. तो बायको मुलांना घेऊन दूर राहतो, दर सुटीत मला भेटायला येतो. पण गेली काही वर्षे तो भेटायला तर येत नाहीच, वरून न येण्याची कारणे चिठ्ठीत लिहून पाठवतो. म्हणून मला एकच औषध हवे आहे, मला मूल आहे हे विसरण्याचे…आहे का तुझ्याकडे तसे औषध???’
मेडिकलवाला नि:शब्द झाला. कारण, या औषधाची गरज आज अनेक पालकांना निर्माण झाली आहे, अद्याप या औषधाची निर्मिती झालेली नाही. खरोखरच असे औषध निर्माण झाले, तर म्हातारपणी कित्येक पालकांना होणाऱ्या वेदना तरी कमी होतील…!’
——मित्रांनो, सगळ्यात मोठे कोणते पाप असेल, तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या पालकांच्या डोळ्यात अश्रू येणे. त्या पापाचे प्रायश्चित्त कोणत्याही पुराणात दिलेले नाही. म्हणून हे पाप आपल्या हातून घडणार नाही, याची अवश्य काळजी घ्या !
संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
हा पदार्थ – पाव इंच आले, एक टेबलस्पून मीठ, ओव्हनचं टेम्परेचर, कुकरच्या शिट्ट्या … असं लिहिणार्या पुस्तकात बघून करता येत नाही त्यासाठी उगीच एवढंसं चिमटीभर मीठ, एक तारी पाक, मंद आच, दोन उकळ्या आणणे, कणीक थोडीशी सैलसर भिजवणे … ही भाषा यावी लागते. नारळ किसणे, कापणे, तुकडे करणे वगैरे म्हणणार्या मंडळीनी जरा सांभाळूनच यात पडावे.
—-नारळ गुहागरी असतील तर चव वेगळी ….
—-राजापुरी असतील तर चव वेगळी ….
—-दापोली आसूद या बाजूची गोडी वेगळी ….
—-नारळ तारवटी असेल अजून वेगळी ….
तर हे सगळे समजून गूळ कमीजास्त करायचा असतो.
मुळात नारळ उत्तम खवता यायला हवा. त्यात करवंटीची साल येता कामा नये. खवणीवर उकिडवं बसून खवल्यास खोबरं अधिक गोड लागतं. मधून मधून खोब-याचा तोबराही भरावा.
—-तांदूळ हा नवा असावा–.नव्या नवरी सारखा ! म्हणजे उकड ‘लग्न झाल्यानंतर पहिल्या काही दिवसातील नवरा बायकोच्या नात्यासारखी’ छान चिकट होते. आंबेमोहोर वा बासमती तांदूळ असेल तर मोदकालाच मोद होतो—-.तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत व ते शक्यतो सावलीत फडक्यावर वाळवावेत ….. ही पिठी आता जात्यावर घरी करणे अशक्य, म्हणून गिरणीत स्वतःच्या देखरेखीखाली—- भैय्याला, ” अरे भय्या, ये गहू पे मत डालो. दुसरा तांदूळ आयेगा ना पिसनेको उसके उप्पर डालो” वगैरे सांगून बारीक दळून घ्यावी.
—–गूळ अश्विनातल्या उन्हासारखा, लग्नात मामाने नेसवलेल्या अष्टपुत्रीसारखा पिवळाधमक असावा. किसल्यानंतर ताटात झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांची पखरण झाली आहे असे वाटले पाहिजे.
—-खोबरे आणि गूळ यांना मंदाग्नीवर शिजत ठेवावे. खोबर्याच्या संगतीत गूळ हळूहळू
विरघळत जातो व दोघे एकजीव होतात.
—-हे होताना— चमचाभर तांदळाची पिठी व थोडी प्रत्येक दाणा वेगळा असलेली खसखस भाजून घालावी.आणि वेलदोड्याची पूड करून थोडी पखरावी. ह्या सर्व पदार्थांचे सारण तयार करावे.
—-यातील ‘कुठल्या गोष्टी किती प्रमाणात’ ते आई, आज्जी, सासुबाई, आजेसासूबाई यांनी सांगावे व नवीन सुनेने ते एकत्र परतावे.
—–जेवढे तांदळाचे पीठ तेवढेच पाणी घ्यावे. त्यात चवीला मीठ, दोन चमचे साजूक तूप व एक छटाकभर तेल घालावे. नंतर मंद आचेवर ठेवून ते ढवळावे. दोन वाफा आणाव्यात.
—–पीठ अंतर्यामी भिजले आणि तूप-तेल यांच्या मर्दनाने शिजले पाहिजे.
—–सगळ्यात यापुढे खरी कसरत चालू होते.
—–ही उकड मळणे हा एक खास प्रकार आहे. त्यात एकही गाठ राहता कामा नये. कुठेही आणि कशीही वळणारी या उकडीची गोगलगाय व्हायला हवी.
——लिंबाएवढी उकडीची गोळी घ्यायची आणि या गोळीवर हाताने संस्कार करायचा. मध्यभागी ‘पुढील संसाराची जबाबदारी वाहू शकेल’ अशी थोडी मजबूत कणखर जाड ठेवून बाजूने संस्कारांचा, शिक्षणाचा दाब देऊन –तिला नाजूक, सुंदर मुलीसारख्या चिमटीने कडा दाबून चुण्या करुन सौष्ठव द्यावे.–आत सारण भरावे आणि सारणाचा भुंगा आत अडकला की कमळासारख्या पाकळ्या –म्हणजे नऊवारी नेसलेल्या या पापडीच्या नि-या अलगद, नाजूक
हाताने मिटत न्याव्यात.
—-स्वतःचे नसले तरी मोदकाचे नाक चाफेकळी हवे. नंतर या जोडीला मोदक पात्रात घालून मस्त वाफ आणावी.
—-असा लुसलुशीत मोदक पानात वाढला की या फुलाचे नाक रूपी देठ काढून टाकावे व मगाशी वाफेमुळे गुदमरलेल्या मोदकाच्या श्वासनलिकेत साजूक तूप ओतावे. मग हळूच पूर्ण मोदक उचलून तो आपल्या अन्ननलिकेत सरकवावा——.
——-तृप्तता म्हणजे काय … याचा याची देही याची डोळा प्रत्यय घ्यावा !!!
संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे
पुणे
भ्रमणध्वनी:- 9860006595
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’, एका रात्रीत तयार झालेल्या गाण्याचा किस्सा!!
श्री गणेश पुराणात अनेक चित्र विचित्र कथा आहेत. त्यामुळे भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्यापासून अनेकांनी गणपतीवर काहीतरी नाविन्यपूर्ण चित्रपट काढण्याचे प्रयत्न केले आहेत. चित्रपट निर्माते शरद पिळगावकर त्यापै़कीच एक! पिळगावकरांच्या लक्षात आले की अष्टविनायक संदर्भ असलेला एकही चित्रपट आजपर्यंत आलेला नाही. विषयाचं नाविन्य ही कोणतीही कलाकृती यशस्वी होण्याची पहिली खूण असते. चित्रपट निर्मिती हा इतका अवघड विषय आहे की प्रत्येक निर्मात्याला नवनव्या अडचणींना तोंड द्यावे लागते. निर्माता या आव्हानांना कसे सामोरे जातो यावर चित्रपट निर्मितीचा संकल्प पूर्णत्वाला जातो अथवा नाही हे ठरत असतं.
अष्टविनायक हा चित्रपटही याला अपवाद नव्हता. सुरुवातीला नायक म्हणून विक्रम गोखले यांची निवड करण्यात आली होती. पण त्यांच्या अटी आणि सूचना पाहून पिळगावकरांनी त्यांचा नाद सोडला. आता प्रश्न होता की नायक कोण होणार? सचिन पिळगावकर यांचे त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीत काम जोरात होते त्यामुळे घरीच नायक असूनही पिळगावकरांना नायक कोण हा प्रश्न पडला होता.
वडीलांची तारांबळ बघून सचिन एक दिवस म्हणाला, “मी अष्टविनायकमध्ये काम करतो. पण माझी एक अट आहे.”
आधीच विक्रम गोखलेंच्या अटींनी वैतागलेले शरद पिळगांवकर आपल्या मुलाला म्हणाले, “आता तुझ्यापण अटी? बरं, तरीपण तुझ्या अटी तर सांग.”
तेव्हा सचिन म्हणाला, “अष्टविनायक गाण्याच्या शूटींगच्या वेळी प्रत्येक ठिकाणी मी येणार. कटिग पेस्टिंग करून गाणं करायचं नाही.”
“डन”, शरद पिळगावकर म्हणाले. त्यांच्या दृष्टीने ही फार मोठी अडचण नव्हती.
आता नायिकेचा शोध सुरु झाला. भक्ती बर्वेंपासून अनेक नावं समोर आली. पण काही केल्या ते गणित जमेना. तेव्हा सचिनच्या मातोश्रींनी नाव सुचवलं- वंदना पंडित! आता ही वंदना पंडित कोण? असा प्रश्न अनेकांनी विचारायला सुरुवात केली. वंदना पंडित तेव्हा दूरदर्शनवर निवेदिका म्हणून काम करायची. झालं ठरलं, वंदना पंडित नायिका!
पण याच काळात तिचं लग्न ठरलं. त्यामुळे ती चित्रपटात काम करणार नाही असं तिचं उत्तर आलं. निर्मात्यांना अशा अडचणी फारशा कठीण वाटत नाहीत बहुतेक! कारण शरद पिळगावकरांनी निरोप पाठवाला, “लग्नाआधीच शूटिंग संपवलं तर?”
वंदना पंडित राजी झाली. होकार मिळाला. मुलीच्या वडीलांची भूमिका पंडित वसंतराव देशपांडे यांना द्यायचं ठरलं. पण तेव्हा वसंतरावांचे “कट्यार काळजात घुसली” चे प्रयोग जोरात चालू होते. त्यामुळे त्यांनी नकार दिला. पण पिळगावकर माणसांना राजी करण्यात हुषारच होते. त्यांनी पंडितजींना कसतरी पटवलं.
शूटिंग मार्गी लागलं.
“आली माझ्या घारी ही दिवाळी”, ‘”दाटून कंठ येतो” ही गाणी रेकॉर्ड पण झाली. पण यानंतर एक मोठा प्रश्न उभा राहिला, ज्याच्यासाठी भर मध्यरात्री पिळगांवकर दादरच्या ‘राम निवास’वर पोहचले आणि त्यांनी खालूनच हाका मारायला सुरुवात केली.
“अहो खेबुडकर. अहो खेबुडकर … “
जगदीश खेबुडकर राम निवासमध्ये राहत नव्हते. पण मुंबईत आले की त्यांचा मुक्काम रामनिवासवर असायचा हे पिळगांवकरांना माहिती होतं . आणि त्या रात्री खेबुड्कर मुंबईत आहेत हे पिळगावकरांना कळल्यावर ते थेट पोहोचलेच! पिळगावकरांना पाहून खेबुडकर खाली आले आणि चिंतेच्या सुरात विचारलं, “एवढ्या रात्री काय काम काढलंत?”
“गाडीत बसा. मग सांगतो”, पिळगांवकर म्हणाले. खेबुडकर आणखीच चिंतेत पडले.
“अष्टविनायकचं एक महत्वाचं गाणं आहे, आणि ते तुम्हीच करायचं.”
“पण अष्टविनायकची गाणी शांताबाई शेळकेंनी आणि शांताराम नांदगावकरांनी लिहिली आहेत ना? “
“हो, पण त्यांच्याच्यानं अष्टविनायकाचं गाणं होईना. ते तुम्हीच करणार ह्याची मला खात्री आहे.”
“अहो, पण मला अष्टविनायकांची काहीच माहिती नाही. मी त्यांपैकी एकही गणपती पाहिलेला नाही.”, खेबुडकरांनी त्यांची अडचण मांडली.
“त्याची काळजी करू नका.”, असं म्हणत पिळगावकरांनी अष्टविनायकांची महती आणि माहिती देणारी पुस्तिका त्यांच्या हातात ठेवली.
तोपर्यंत ते पिळगावकरांच्या घरी पोहोचले होते.
गाडीतून उतरता उतरता पिळगावकर म्हणाले, “खेबुडकर हे काम आज रात्रीच व्हायला हवे. उद्या रेकॉर्डिंग करायचं आहे. गणेश वर्णन लोक संगीताच्या बाजाचं करा म्हणजे झालं.”
एकेकाळी नमनाचं गाणं न ऐकलेल्या खेबुडकरांनी फक्कड लावणी लिहिली होती आणि ती गाजली पण होती. तेच खेबुडकर आता अष्टविनायकाचं गाणं लिहायला बसले होते ज्यांचं त्यांनी कधीच दर्शनही घेतलं नव्हतं. खेबुडकरांनी गणपतीचं स्मरण केलं. कागदावर श्रीकार टाकला आणि लिहायला सुरुवात केली.
कुडी झाली देऊळ छान काळजात सिंहासन
काळजात सिंहासन मधोमधी गजानन,
दोहीकडे रिद्धिसिद्धि उभ्या ललना,
अष्टविनायका तुझा महिमा कसा,
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा,
अष्टविनायका तुझा महिमा कसा,
जय गणपती, गणपती गजवदना!!
बघता बघता एकेक गणपतीचं वैशिष्ट्य-विशेष सांगता सांगता ते आठव्या गणपतीपर्यंत येऊन पोहोचले.
पाली गावच्या बल्लाळेश्वरा,
आदिदेव तू बुद्धीसागरा,
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख,
सूर्यनारायण करी कौतुक,
डाव्या सोंडेचे रूप साजिरे,
कपाळ विशाळ डोळ्यांत हिरे,
चिरेबंद या भक्कम भिंती,
देवाच्या भक्तीला कशाची भीती,
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा….
आणि ही महती लिहिता लिहिता सकाळ झाली होती. खेबुडकरांनी पेन खाली ठेवलं. पिळगांवकर त्याचीच वाट बघत होते. “आता चालीत म्हणून दाखवा.” ते म्हणाले आणि हे म्हणेपर्यंत अनिल-अरुणही येऊन पोहोचले.
सगळे प्रभादेवीच्या बाँबे साऊंड लॅबोरेटरीत पोहोचले. अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, मनिष वाघमारे असे गायक आधीच येऊन बसले होते. ळगांवकर खेबुडकरांना म्हणाले, “आज गायकाची जबाबदारी पण तुम्हीच पार पाडायची …”
आणि खेबुडकरांनी खडा आवाज लावला. सातव्या गणपतीपासून सुरुवात केली.
महड गावाची महसूर, वरदविनायकाचं तिथं एक मंदिर..
मंदिर लई सादसूदं, जसं कौलारू घर..
घुमटाचा कळस सोनेरी, नक्षी नागाची कळसाच्यावर..
सपनात भक्ताला कळं, देवळाच्या मागं आहे तळं..
मूर्ती गणाची पाण्यात मिळं, त्यानी बांधलं तिथं देऊळ..
दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती हो,
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो,
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा!!
गाणं झकास झालं. तब्बल १३ मिनिटाचं गाणं!! आधी केलेलं शूट रद्द करून गाण्याचं पुन्हा चित्रीकरण करण्यात आलं. हा चित्रपटाचा क्लायमॅक्स होता आणि तो सुपरहिट झाला. चित्रपटाचा रौप्य महोत्सव झाला.
अष्टविनायकाचा महिमा आणखी दुमदुमतच राहीला!! अशी ही कहाणी एका रात्रीत निर्माणा झालेल्या गीताची!
संग्राहिका – सौ. स्वाती रामचंद्र कोरे
खानापूर,जिल्हा सांगली
मो.9096818972
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈