मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अनोखे व्रत नवरात्रीचे…. ☆ प्रस्तुती – सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  वाचताना वेचलेले ?

☆ अनोखे व्रत नवरात्रीचे ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे 

खरं तर हा लेख नसून मनापासून केलेलं एक आवाहन आहे.

नवरात्रात अनेक व्रते केली जातात. कोणी नऊ दिवस उपवास करतात,गादीवर झोपणं वर्ज्य करतात.वहाणा वापरत नाहीत, तर कोणी नऊ दिवस जोगवा मागतात. हल्ली एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. तसा तो वाईट नाही, पण त्याचा अतिरेक झाला आहे. मुख्य म्हणजे हा प्रकार धार्मिक नाही . कोण्या एका व्यापाऱ्याने स्वतःचा व्यवसाय वाढावा म्हणून नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या, ड्रेस वापरण्याची टूम काढली आणि सर्वांनी ती डोक्यावर घेतली. प्रत्येकीला ते सहज शक्य आणि परवडणारे असतेच असे नाही. कुणीतरी असली धार्मिक आधार नसलेली प्रथा चालू करतात आणि सर्वजण ती अंधपणे आचरणात आणतात. ह्या प्रथांची रूढी बनते

 चला तर आपण नवीन प्रथा सुरू करूया. नवरात्रातला प्रत्येक दिवस सत्कारणी लावायचा असे आपण व्रत घेऊया. उतायचे नाही  मातायचे नाही, घेतला वसा टाकायचा नाही हे पक्के करू या.

पहिला दिवस-  या दिवशी आपण स्वतःपासून सुरुवात करुया, स्वतःचे लाडकोड स्वतः पूर्ण करू या, हवं ते खाऊया आणि आवडते छंद जोपासूया. पण मनाशी एक गोष्ट पक्की करायची की मन मारायचं नाही, कुठलीही इच्छा दडपायची नाही. कुठल्याही कारणाने पुढे ढकलायचे नाही.

दुसरा दिवस–  हा दिवस आपल्या जवळच्या लोकांचे लाड.कौतुक करण्यात घालवूया. त्यांना आठवणीने  त्यांचं तुमच्या आयुष्यातलं महत्त्व जाणवून देऊया. प्रत्येकाला हे मनापासून ऐकायचं असतं.

तिसरा दिवस–  हा दिवस देऊया मैत्रिणींना आणि स्नेह्यांना.  दुरावले असतील तर फोन करा. जवळ असतील तर एकत्र ‌जमून आनंदात वेळ घालवा. ” माझ्यासाठी मैत्री किती महत्वाची आहे “ ही भावना त्यांच्यापर्यंत पोचू द्या.

चौथा दिवस-  या दिवशी गरजू व्यक्तींना मदत करायची. ही मदत पैसे, वस्तू, शब्द कोणत्याही स्वरुपात चालेल. मग ती व्यक्ती वृद्धाश्रम- अनाथ आश्रम येथील चालेल_

पाचवा दिवस  – विद्या “ व्रत “ आहे असं म्हणूया. शिक्षणासंदर्भात जिथे जेवढी जमेल तशी मदत करू या. विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य द्या, किंवा कुणाला काही शिकवा. शाळेला, ग्रंथालयाला मदत करा.

सहावा दिवस – हा दिवस राखून ठेवूया मुक्या प्राण्यांसाठी. ” गोशाळांना” भेट द्या. प्राण्यांना स्वतः चारा खाऊ घाला.  प्राणी संस्थांना मदत करा.

सातवा दिवस – हा दिवस निसर्गासाठी ठेवूया. एक तरी रोपटे लावूया, आणि निसर्गाचे संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखू या

आठवा दिवस – हा देशासाठी ठेवू या. माझा देश, माझे राष्ट्र, माझा जिल्हा यासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार करूया.  आपला परिसर स्वच्छ ठेवू या.  सरहद्दीवरील सैनिकांना दोन प्रेमाचे शब्द पाठवूया

नववा दिवस-  ” पूर्णाहुतीचा” दिवस. सर्व वाईट चालीरीती, रुढी आणि दुष्ट विचारांची आहुती देऊ या. सकारात्मक विचारांच्या  पुरणाच्या दिव्यात माणुसकीच्या ज्योती लावून त्याआदीशक्तीची आरती करु या. आपुलकीचा, एकात्मतेचा गोड प्रसाद वाटू या.

दहावा दिवस – सीमोल्लंघनाचा दिवस. आप़ण केलेल्या निर्धाराप्रमाणे, आपले मन नकारात्मक विचारांचा उंबरठा ओलांडून पुढे गेले आहे का हे बघा. मन मोकळं करा, लिहा बोला पण व्यक्त व्हा.  कारण विचार आणि कृती बदलणे हेच खरे सीमोल्लंघन होय .मग आनंदाचा सोनेरी दसरा आपल्या आयुष्यात कायम असेल आणि प्रसन्न झालेल्या आदिशक्तीचा कृपाशिर्वाद ही पाठीशी असेल.

—-ही सगळं करताना त्या त्या दिवसाच्या रंगाचे कपडे परिधान करू नका असे नाही.  पण नुसता कपड्याचा रंग बदलण्यापेक्षा आपले मळकट झालेले विचार बदलूया.

बोला मग हे व्रत घ्यायला आवडेल ना तुम्हाला?

आई जगदंबेचा उदो उदो

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देणाऱ्याची भूमिका कशी असावी ? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

 ☆ देणाऱ्याची भूमिका कशी असावी? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

आमच्या जी. एस्. मेडिकल कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापटांच्या एकत्रित काव्यवाचनाचा कार्यक्रम ठेवला होता. शनिवार दुपार होती ती. कार्यक्रम रंगला. संपला. मी या मंडळाचा त्या वर्षाचा कार्यवाह. मानधनाची पाकिटे तिन्ही कविवर्यांना दिली. 

विंदा म्हणाले, “तुमचे हाडाचे हॉस्पिटल कुठे आहे?”

“टाटाच्या समोर… जवळच आहे…. पाहायला जायचं आहे का कुणाला? …” मी म्हणालो.

विंदांचा वाटाड्या होऊन आम्ही ऑर्थोपेडीक सेंटरमध्ये गेलो. काही रुग्णांचा मुक्काम तिथे अनेक महिने असायचा. विशेषतः फ्रॅक्चरचे रुग्ण. घरात संडासापासूनच्या सोयीची कमतरता. त्यामुळे हॉस्पिटलात सक्तीचा निवास. नवीन पेशंट्सचा दट्ट्या असायचा. मग वॉर्डातले काही पेशंट्स पॅसेजमध्ये यायचे. पॅसेजमधून वॉर्डाबाहेरच्या मोकळ्या जागेत.

विंदाना ज्या बाईंना भेटायचं होतं त्या अशाच एका पॅसेजमध्ये होत्या. शाहीर अमर शेखांच्या पत्नी. आम्ही त्यांना “शोधून” काढलं. विंदांनी त्यांची चौकशी केली. खिशातून पाकीट काढलं. आमच्या मंडळाने दिलेल्या मानधनाच्या पाकिटात त्यांनी जिना चढतानाच थोडे पैसे (स्वतःजवळचे) भरले होते. ते पाकिट त्यांनी बाईंच्या हातात दिलं. 

“औषधासाठी होतील म्हणून शिरूभाऊंनी दिले आहेत. मी आज इथे कार्यक्रमाला येणार होतो. म्हटलं नेऊन देतो.”

थोड्या वेळाने आम्ही बाहेर पडलो. मीही विंदांबरोबर बसस्टॉपवर आलो. विचारू की नको अशा मनातल्या गोंधळावर मात करत मी प्रश्न विचारला. तोही घाबरतच. 

“तुम्ही त्यांना मदत केलीत, पण शिरूभाऊंचे नाव का सांगितलंत?…” 

शिरूभाऊ म्हणजे बहुधा त्यांचे मित्र श्री. ना. पेंडसे असावेत.

विंदांनी त्यांच्या खास नजरेने माझ्याकडे आरपार बघितलं.

 “असं बघा… घेणाऱ्याचं मन आधीच बोजाखाली असतं की आपल्याला कुणाकडून तरी मदत घ्यावी लागतेय… अशावेळी याचक होतं मन. देणाऱ्याकडून समोरासमोर घेताना त्रास वाढतो. कमी नाही होत… अशावेळी आपण निरोप्या झालो तर समोरच्याचा त्रास वाढत तरी नाही… शेवटी महत्त्वाचं काय… त्या व्यक्तीला मदत मिळणं… कुणी केली हे नाही….”

माझी विंदांशी काही ओळख नाही. ही आमची शेवटची भेट. पण माझ्या मनात त्या वेळी लागलेले हजारो वॅटचे लाईट अजून विझलेले नाहीत.

 देणाऱ्याने देताना, घेणाऱ्याच्या भूमिकेत स्वतःला नेणे …. ते सारे क्लेष क्षणभर अनुभवणे  …..  पुन्हा देण्याच्या भूमिकेत येणे …  आणि  “इदं न मम” असं म्हणत यज्ञवृत्तीने दान करणे.

मी empathy ची व्याख्या मानसशास्त्राच्या पुस्तकातून शिकण्याआधी कवीकडून शिकलो याचा मला अभिमान आहे…

 

डॉ. आनंद नाडकर्णी

(विषादयोग)

 

संग्राहक : सुहास पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नारीशक्ती ☆ संग्राहिका – सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ नारीशक्ती ☆ संग्राहिका – सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

तू नऊ दिवस नऊ रंग परिधान केलेस किंवा नाही केलेस तरी, हे कबूल आहे की, तू आहेस म्हणून रंगहीन आयुष्य रंगीत होतं! 

केवळ शास्त्रात सांगितलंय म्हणून नाही, तर त्यानिमित्ताने वर्षभर कपाटात पडून राहणाऱ्या जरीच्या साड्या बाहेर पडून तुला उत्साहाने नेसायला मिळतात हे सत्य नाकारू शकत नाही! 

दांडिया खेळलीस किंवा नाही खेळलीस, तरी आपण हे नाकारू शकत नाही की घरातील सर्वांच्या आयुष्याचा खेळ केवळ तू आयुष्यात असण्याने सुखकर होतो! 

तू नऊ दिवस उपवास कर किंवा उठता बसता उपवास कर, तरी सर्वांना हे माहिती आहे की घरातल्यांची उपासमार होऊ नये म्हणून तू आयुष्यभर तुझ्या जीवाचं रान करतेस!

तू घट बसव किंवा तुझ्या देवीला फुलांनी सजव, पण पुरुषांच आयुष्य मात्र तूच सजवलं आहेस!

तू दिवा लाव किंवा पणती लाव, पण या विश्वाच्या निर्मितीपासून तुझ्यामुळेच पुरुषांच्या आयुष्यात प्रकाश आहे!

थोडक्यात काय तर…

तूच धरती आहेस…

तूच आकाश आहेस…

तूच सुरुवात आहेस…

आणि शेवटही तूच आहेस!

तुझ्याच कुशीत जन्माला येऊन तुझ्याच कुशीत विसावून निर्धास्तपणे आयुष्य जगणाऱ्या समस्त पुरुषांनी तुझ्यातील स्त्रीत्वाला सलाम करायला हवा!

प्रत्येक स्त्री मधील नारी शक्तीला मानाचा मुजरा!!

संग्रहिका – सौ.अंजली दिलिप गोखले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 16 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 16 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[८१]

जितका मृदू

ईश्वराचा उजवा हात

तितकाच कठोर

त्याचा डावा हात

 

[८२]

दिवसाचं फूल माझं

पाकळ्या गाळल्या त्याने

विस्मृतीच्या खोल विवरात

पण संध्याकाळी

छान पिकलं ते

आठवणीचं सोनेरी फळ बनून          

 

[८३]

किती क्रूर असतात

माणसं !

किती कोमल असतो

माणूस

 

[८४]

धरतीनं झिडकारलं प्रेम त्याचं

म्हणून तडफडणार्‍या

कुणा अनाम देवाचा

व्याकूळ आक्रोशच

हे वादळ म्हणजे

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैत्री मैत्रीच असते ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ मैत्री मैत्रीच असते ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

एकदा एका माकडाला  ?अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर; त्यानं झोपलेल्या सिंहाचे ?  कान ओढले. 

सिंह उठला आणि रागानं गर्जना केली की, “ हे धाडस कोणी केलं ? 

स्वतःच्या मृत्यूला स्वत:हून कुणी बोलावलं ? “ 

माकड : “ मी कान ओढले.  महाराज, सध्या मला कोणी मित्रच नसल्यामुळे मी खूप उदास आहे?; आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका.”

सिंहानं हसून विचारलं ?: “ माझे कान ओढतांना, तुला कोणी पाहिलं तर नाही ना ?” ?

माकड : “ नाही महाराज.”

सिंह : “ मग ठीक आहे.  आता असं कर. आणखी पाच-दहा वेळा माझे कान खेच, खूपच छान वाटतंय रे !”

या कथेचे सार :— एकटा राहून जंगलाचा राजाही कंटाळतो.

यावरून स्पष्ट होतं की मैत्री ही हवीच. म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा, ? त्यांचे कान ओढत रहा, म्हणजे चेष्टा मस्करी करत रहा. ? मेसेज येणे भाग्याचे समजा,  कोणीतरी आपली आठवण काढतंय. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, देवाण घेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो. कंटाळवाणे होऊ नका. वयाला  विसरा, मजा करत रहा. संसार प्रपंच तर सगळ्यांनाच आहे.

विश्वास ठेवा की, तुमचं मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू.

मैत्री – श्रीमंत किंवा गरीब नसते, मैत्री शिकलेली  वा  अडाणी कशीही असो – मैत्री  मैत्रीच असते. 

सहज वाटले मन मोकळं करावं ☺️.

संग्राहक : सुहास सोहोनी 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “द. मा.” ☆ संग्राहिका – डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ “द. मा.” ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

“द. मा.”

?

असे कसे हो आम्हाला सोडून गेलात?

आपल्या निर्मळ विनोदाने, कथाकथनातून सात दशके महाराष्ट्र हास्यरसाचा आस्वाद घेत होता, आता करोनाच्या महामारीमधे विनोद हाच सांगाती आवश्यक असताना आपण निघून गेलात..

आता बापाची पेंड कोण देणार, व्यंकूची शिकवणी कोण घेणार, शिवाजीचे हस्ताक्षर कोण पहाणार?

अवघी भोकरवाडी हळहळली..

गणा मास्तर

नाना चेंगट

बाबू पहिलवान

शिवा जमदाडे

सुताराची आनशी

सर्व आपले मानसपुत्र,

? भावपूर्ण श्रद्धांजली 

 

संग्रहिका  : डॉ. ज्योती गोडबोले 

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 15 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 15 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[७७]

हे संध्याकाळचं आकाश

या क्षणी माझ्यासाठी

एक प्रचंड खिडकी आहे

दिवा पेटवून ठेवलेली

आणि त्यामागे  आहे

एक सोशीक प्रतीक्षा

           *

[७८]

प्रमदेच्या हास्यातून

खळखळते उसळते

संगीत….

जीवन प्रवाहाचे

         *

[७९]

रिकामा…निर्जल

शरदातला मेघ आहे मी

मला पहायचं आहे?

मग पहा ना

पिकलेल्या भातशेतातून

सळसळत चमचमणार्‍या

या सोनेरी चैतन्यातून

           *

[८०]

स्वर्गामध्ये डोकावणारी

धरतीची आसक्तीच

उसळते आहे

या उत्तुंग वृक्षांमधून

गगनचुंबी

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सौदामिनी तंत्र ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ सौदामिनी तंत्र ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

सौदामिनी तंत्र

भारद्वाज ऋषींनी आपल्या “सौदामिनी तंत्र” या ग्रंथात विजांचे (Electricity) ५  प्रकार सांगितले आहेत. ते खालील प्रमाणे आहेत.

१) रेशीम, कोल्हा, ससा किंवा मांजर या प्राण्यांचे कातडे हवेत झटकले तर उत्पन्न होते ती ‘तडित्‌’ वीज. (पाश्च्यात शास्त्रज्ञ अद्याप हिचा काहीच उपयोग करीत नाहीत.)

२) स्फटिक, रेशीम, लाख वगैरे जिनसा एकमेकांवर घासल्यावर उत्पन्न होते ती ‘सौदामिनी’ वीज.

३) आकाशात ढगात उत्पन्न होते ती ‘चपला’, हिलाच विद्युत, चंचला असेही संबोधतात.

४) विद्युतकुंभ ( Battery ) मध्ये उत्पन्न होणारी वीज ती ’शतकोटी’. * अगस्त्य ऋषी हिला ‘मित्रावरुणौ’ म्हणतात. मित्र म्हणजे धन व वरुण म्हणजे ऋण वीज होय. कार्य करण्यासाठी शंभर कुंभ वापरावे लागतात म्हणून हिला ‘शतकुंभी’ अथवा ‘शतकोटी’ असेही म्हणतात.

५) लोहचुंबकाचे फिरण्याने उत्पन्न होऊन एका भांड्यात साठवली जाणारी ती ‘हादिनी’ वीज. वीज साठवण्याच्या भांड्याला हूद (Storage Battery ) म्हणतात.

वशिष्ठ, अगस्त्य व भारद्वाज यांनी विजेच्या शास्त्रांवर ग्रंथ लिहिले आहेत. विमानशास्त्रांवर नारायण, वाचस्पति, शौनक, गर्ग व भारद्वाज यांचे ग्रंथ आहेत.

वरील माहिती श्री कृष्णाजी विनायक वझे (१८६९ – १९२९) यांच्या लेखातून घेतली आहे. श्री कृष्णाजी विनायक वझे हे इंजीनिअर होते. त्यांनी सिंधमधील सिंधू नदीवर सक्करचे प्रसिध्द धरण बांधले,  त्याबद्दल इंग्रज सरकारने त्यांना ’रावबहादूर’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता. पुढे लो. टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी इंग्रज सरकारची पदवी परत केली व स्वत:ला भारतीय शिल्पशास्त्राच्या संशोधनाच्या कार्यात वाहून घेतले. त्यांनी अनेक भारतीय प्राचीन वास्तु शिल्प शास्त्रांच्या ग्रन्थांचा अभ्यास केला. पण दुर्दैवाने त्यांचे बरेचसे लिखाण आज काळाच्या उदरात गडप झाले आहे. सध्या त्यांचे केवळ एकच पुस्तक उपलब्ध आहे. त्यांनी त्यांच्या या संशोधन कार्यात ज्या प्राचीन ग्रन्थांचा अभ्यास केला ती यादी केवळ पाहिली तरी  थक्क व्हायला होते. त्यातीलही बरेचसे ग्रन्थ आज नष्ट झाले आहेत.  पण जे आहेत त्यांचा अभ्यासही खूप मोठा आहे. अनेक संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करुन त्यावेळी आपला समाज किती प्रगत होता याविषयी सांगताना श्री वझे म्हणतात की, “ गेल्या ३० वर्षात संस्कृत ग्रंथांचा विचारपूर्वक अभ्यास केल्यावर भौतिक शास्त्रमय शिल्पात हिंदुस्तानात किती ज्ञान होते याबद्दलचा  एक निबंध मी इतिहास संशोधक मंडळासमोर वाचला. मी आपल्या माहितीसाठी येथे इतकेच सांगतो की, वाफेच्या यंत्राखेरीज बहुतेक आधुनिक शिल्प (मशीन्स) आपल्याकडे एकेकाळी होती असे मला आढळून आले आहे.” 

आजच्या शिक्षण पद्धतीविषयी श्री वझे म्हणतात की, ” इंग्रजी राज्य हिंदुस्थानात आल्यावर इंग्रजानी केलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी इंग्रजीतून शिक्षण देण्यास सुरवात केली. यामुळे इंग्रजी ज्ञान व त्याचा फैलाव हिंदुस्थानात झाला. तशातच सरकारी नोकऱ्यात ज्ञानापेक्षा इंग्रजी भाषेला अधिक प्राधान्य प्राप्त झाल्याने प्राचीन हिंदू ज्ञानाकडे लोकांचे दुर्लक्ष झाले. याचा परिणाम असा झाला की, भारतात विचार करण्यासारखे ग्रंथच नाहीत व सर्व उत्तम ज्ञान काय ते पाश्चिमात्यांकडेच आहे, अशी मोठ्या समजल्या जाणाऱ्यांची समजूत झाली. ज्याप्रमाणे वेदांतात हेगेल, कांट, शोपेनहार, प्लेटो, सॉक्रेटिस, मिल, ह्यूम यांच्या वेदांताचे जितके व जसे शिक्षण दिले गेले, तसे पतंजली, कणाद, जैमिनी, बादरायण यांच्या वेदांताचे दिले गेले नाही. हीच अवस्था इतर विषयांच्या बाबतीतही झाली.”  ज्यांनी मोठमोठी राज्ये चालविली, किल्ले, कालवे, इमारती, पूल वगैरे बांधले, सूक्ष्म विचार करण्यात ज्यांची बुद्धी फार कुशाग्र अशी ज्यांची ख्याती, असे लोक भौतीक शास्त्रांशिवाय राहिले कसे ? अशी सहज येणारी शंकासुद्धा या पंडितांना आली नाही..

संग्राहक : माधव  केळकर 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ओंजळ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ओंजळ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, करतल भिक्षा घेत असत’

‘करतल ‘ म्हणजे हाताच्या तळव्यावर मावेल इतकी..

मला हा शब्द खूपच आवडला..

म्हणजे प्रत्येक गोष्टीत समाधान मिळण्यासाठी जास्तीत जास्त माप म्हणजे ‘करतल’ असावे असे मनात आले.

करतल म्हणजे ओंजळभर !

आता हेच पहा ना.. 

खूप तहान लागली आणि ओंजळभर पाणी प्यायले तरी तृप्ती होते.

इतकंच काय ओंजळभर फुलांचा सुगंध मन व्यापून टाकतो.

आपल्या प्रियजनांचे हात आपल्या ओंजळीत घेतले की एक वेगळीच अनुभूती होते..

 

म्हणजे खूप दुःख झाले की आपल्याच ओंजळीत चेहरा झाकून मुक्तपणे अश्रूंना वाट करून दिली की मन हलके झालेच म्हणून समजा..

आणि कधी एखादा सुलज्ज चेहरा ओंजळीत आपला चेहरा झाकून आपला संकोच दूर करतो..

 

बाप रे… केवढे महत्व आहे ना ह्या ओंजळीचे..

 

म्हणजे परमेश्वरानेच खऱ्या समाधानाचे हे परिमाण आपल्याला ठरवून दिले आहे आणि त्याचा विसर पडता कामा नये असेच पटकन मनात आले.

 

दुसऱ्या च्या ओंजळीने पाणी पिऊ नये वगैरे वगैरे ह्या विचाराशी विरोधाभास दाखवणारे शब्द प्रयोग आहेत म्हणा…

 

पण आपण नेहमी राजहंस होऊन मोत्यांचा चारा टिपावा असे वाटते त्यामुळे त्या कडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केलेले बरे!

 

ज्ञानेश्वर महाराजांनी देखील समस्त विश्वाच्या शांती साठी परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि ‘पसायदान’ मागितले…l

आज लिहायला बसलो आणि माझ्या ओंजळभर शब्दांना दाद देणाऱ्या तुमच्या सगळ्यांची आठवण आली..

म्हणजे माझे ओंजळभर शब्द मी तुमच्या ओंजळीत टाकतो आणि तुमची भरभरून दाद मिळाली की त्याचे सोने होते..

 

आज तुमच्या हातात ओंजळ रिती केली आणि आपसूक हात मिटले गेले..

परमेश्वरासमोर जोडतो ना तसेच!

आणि मग मन भरून आनंदाची अनुभूती झाली हे वेगळे काय सांगू?

 

लेखक :  अनामिक

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ औषध ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ औषध ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

स्वार्थाने बरबटलेल्या जगात आपल्याला यशापयशासकट जर कोणी स्वीकारत असेल, तर ते म्हणजे फक्त आपले आईबाबा. नेमके आपण त्यांना आपल्यापासून दूर करण्याचा अपराध करतो. ते त्याचीही खंत करत नाहीत. पिल्लं शरीराने आणि मनाने दूर गेल्याचे दु:खं सहन करतात आणि कधी चुकून जवळ आले, तर तितक्याच मायेने त्यांची चौकशी करतात. अशा प्रेमळ जन्मदात्यांना दुखवण्याचे पाप कधीही करू नका…

एक मेडिकलचे दुकान होते. औषध घेण्यासाठी लोकांची गर्दी होती. मेडिकलवाला शक्य तेवढ्या लवकर प्रत्येकाला अचूक औषध देत गर्दी कमी करत होता. त्याचा सहाय्यकही आपले काम चोखपणे पार पाडत होता. त्याचवेळेस रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला झाडाखाली एक बाई मेडिकलकडे बघत ताटकळत उभी होती. बहुदा ती मेडिकलमधील गर्दी कमी होण्याची वाट बघत असावी. मेडिकलवाल्याचे तिच्याकडे लक्ष गेले. तिची अस्वस्थता पाहून त्याने काही वेळ सहाय्यकाला दुकानाकडे लक्ष दे असे सांगून आजीकडे धाव घेतली. 

आजीने त्याला पाहिले. तिला खुशाली वाटली. आजीच्या राहणीमानावरून ती मध्यमवर्गीय कुटुंबातली वाटत होती. मेडिकलवाल्याने तिला कोणते औषध हवे, असे विचारले. आजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. मेडिकलवाला म्हणाला, `काय झाले आजी, औषध घ्यायला पैसे नाही का?’आजी म्हणाली, `पैसे आहेत, पण मला हवे असलेले औषध तुझ्याकडे आहे का?’

मेडिकलवाला गोंधळला. त्याने आजीकडे औषधाचा कागद मागितला. तो आजीकडे नव्हता. आजी म्हणाली, `लेका, माझा मुलगा तुझ्याच वयाचा असेल. तो बायको मुलांना घेऊन दूर राहतो,  दर सुटीत मला भेटायला येतो. पण गेली काही वर्षे तो भेटायला तर येत नाहीच, वरून न येण्याची कारणे चिठ्ठीत लिहून पाठवतो. म्हणून मला एकच औषध हवे आहे, मला मूल आहे हे विसरण्याचे…आहे का तुझ्याकडे तसे औषध???’

मेडिकलवाला नि:शब्द झाला. कारण, या औषधाची गरज आज अनेक पालकांना निर्माण झाली आहे, अद्याप या औषधाची निर्मिती झालेली नाही. खरोखरच असे औषध निर्माण झाले, तर म्हातारपणी कित्येक पालकांना होणाऱ्या वेदना तरी कमी होतील…!’

——मित्रांनो, सगळ्यात मोठे कोणते पाप असेल, तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या पालकांच्या डोळ्यात अश्रू येणे. त्या पापाचे प्रायश्चित्त कोणत्याही पुराणात दिलेले नाही. म्हणून हे पाप आपल्या हातून घडणार नाही, याची अवश्य काळजी घ्या !  

संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print