मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ यमपत्नी… – सौ. वर्षा विनायक पांडे ☆ प्रस्तुति – सुश्री संध्या पुरकर

? वाचताना वेचलेले ?

☆ यमपत्नी… – सौ. वर्षा विनायक पांडे ☆ प्रस्तुति – सुश्री संध्या पुरकर ☆ 

आपण आजवर सर्व देवांच्या “सौं.” चे म्हणजे देवींच्या  बद्दल ऐकले आहेच पण यमाची यमी नेहमीच दुर्लक्षित राहिली. एक वर्षापासून जिचा नवरा अहोरात्र कामावर आहे अश्या या “यमपत्नी” चे मनोगत ऐकायला नको का..?

लेखिका : सौ. वर्षा विनायक पांडे, लक्ष्मीनगर, नागपूर

यमिणबाई म्हणाल्या यमाला आता कंटाळले बाई,

किती तुमचे टार्गेट्स, घरी येण्याची नाही तुम्हाला घाई..

 

तुम्हाला ऑर्डर देणारा तो भगवंत,

घरात स्वतः आहे निवांत..

 

बालाजी तिरुपतीत उभा,

मारुतीचा आतल्या आत नुसताच त्रागा..

 

विठ्ठल आहे रुक्मिणी संग,

होत नाही शंकराची समाधी भंग..

 

सरस्वतीच्या वीणेच्या शांत आहेत तारा,

लक्ष्मी शांततेने घालते विष्णूला वारा..

 

सगळे करतायत “वर्क फ्रोम होम”,

तुम्ही मात्र सतत “नॉट ऍट होम”..

 

सगळे कसे जोडी जोडीने बंद मंदिराच्या दारात,

तुम्ही आपले सतत पुढच्या “पिक-अप” च्या विचारात..

 

अश्या कश्या सगळ्या यंत्रणा माणुसकीला झाल्या फितूर,

तुम्ही दवाखान्याबाहेर एकेकाला उचलण्यास आतुर..

 

तुमच्या वागण्याचं बाई आजकाल मला काही कळत नाही,

तुमच्या कामाला नियम, पद्धत काही राहिलीय की नाही..

 

ऍम्बुलंस, विमान, गाड्या-घोड्या आणि अगदी ऑटोमधुनही घालताय तुम्ही राडा,

जाऊ द्या ना यमदेवा, बरा आहे ना आपला संयमी आणि संथ रेडा..

 

उचलाउचलीचे हे सत्र आता तुमचे पुरे झाले,

आपल्या सात पिढ्यांचेही टार्गेट आता पूर्ण झाले..

 

पुरे झाले काम आता आवरा तुम्ही स्वतःला,

पांढऱ्या चादरीच्या सोबत राहून काळा रंग ही मलूल झाला..

 

काय होता तुम्ही, केवढी होती तुमची शान,

पण अशा अतिरेकी वागण्याने घालवला तुम्ही तुमचा मान..

 

घरातले कर्ते हात उचलण्यात कोणता आहे पुरुषार्थ,

कोरोनाला उचलून दाखवा आणि सिद्ध करा तुमचे सामर्थ्य..

 

सिद्ध करा तुमचे सामर्थ्य …………….. ??

 

संग्राहक –  सुश्री संध्या पुरकर 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – २ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – २ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[1]

जळतय

तळमळतय

हे विशाल वाळवंट

की

थोडा तरी

जीव लाव रे

हिरव्या प्राणांच्या

लाडक्या तृणपात्या

पण

हिरव्याच तोर्‍यात

मान उडवत ते

नाक मुरडून हिरवंगार

दुष्ट हसतं

आणि भिरभिरत जातं

दूर…दूर…

 

[2]

पृथ्वीचे आसूच

फुलवत ठेवतात

तिचं हसू

 

[3]

मुळं कशी?

जमिनीमधल्या

फांद्या जशी

फांद्या कशा?

हवेमधली

मुळं जशी

 

[4]

ही प्रचंड पृथ्वी

उग्र आणि कठोर

पण

किती मीलनसार झाली

तृणपात्यांच्या संगतीनं ……

 

≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print