मराठी साहित्य –  वाचताना वेचलेले ☆ मराठी भाषेचा सुंदर आविष्कार☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

 ☆ मराठी भाषेचा सुंदर आविष्कार☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

तुझ्यासाठी आज फक्त 

पावसाचा शृंगार केलाय—- 

 

इवल्याशा थेंबांचा 

कंबरपट्टा विणलाय—–। 

 

टपोऱ्या थेंबांचे 

डूल घातलेत कानात—– 

 

मोठ्ठ्या सरीची 

मोहनमाळ घातलीये गळ्यात—-। 

 

लवलवणाऱ्या हिरवाईची 

काकणं भरलीत हातात—–

 

टपटपणारया पागोळ्यांचा 

नाद गुंफलाय घुंगरात——-।

 

चमचमणाऱ्या बिजलीची 

चंद्रकोर रेखलीय कपाळावर—–

 

आणि सावळया मेघांची 

काजळरेषा पापणीवर——।

 

सप्तरंगी इंद्रधनू 

ल्यायलेय अंगभर—– 

 

वाऱ्याचा सळसळाट 

घुमतोय पदरावर——। 

 

तुला आवडतं ना म्हणून

मातीच्या सुगंधाचं 

अत्तरही माखलंय—–

 

अन गोजिरवाणं श्रावणफूल 

केसात माळलंय——।

 

बघ तरी सख्या——

 

तुझ्यासाठी 

आज 

नखशिखांत 

पाऊस 

बनून 

आलेय———!!

. .

काय सुंदर अविष्कार आहे, मराठी भाषेचा. . !!

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 11 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 11 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[61]

या क्षणी

 मी म्हणजे

 एक रस्ता

 रात्रीचा

पदरावांच्या

असख्या स्मृती

चाळवत बसलेला

 

[62]

तुझा उपाय माहत असतो मला

म्हणून तर दुखावतो मी तुला

प्रेम  करतो जीवापाड

म्हणूनच तुला शिक्षाही करतो.

 

[63]

अंधाराचा प्रवास

प्रकाशाच्या दिशेने

पण

अंधत्वाचा प्रवास

मृत्यूच्या दिशेने

 

[64]

गुलाब पाहणारी

नजर असेल त्याची

तरच त्याला

काटे दाखव.

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हृदयांतर ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ हृदयांतर ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

तात्वीक “भांडण” सर्वांशी होते, पण “शत्रुत्व” कुणाशीचं ठेवू नये…

खरं तर “मतभेद” एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम “भेद” ठेवू नये..

एखाद्याशी “वाद” घालावा, पण वादावादी न करता क्षणात “सुसंवाद” साधवा.

“अहंकार” हाच या सर्वांचं मुळ आहे, तो विनाकारण बाळगुन जगू नये..

शेवटी “मृत्यू” हे सुंदर, शाश्वत “वास्तव” आहे, त्याचे “स्मरण” असावे “भय” नसावे.

आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेल्या दिवसांचा “आनंद” उपभोग घेण्यासाठी, याचे “स्मरण” ठेवू या.

आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत याला खूप महत्व आहे.

“एक हृदय” घेऊन आलोय जाताना “लाखो हृदयात” जागा करुन जाता आलं पाहिजे.

 

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समृद्ध मराठीतील समृद्ध पडणे ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

? वाचताना वेचलेले ?

☆ समृद्ध मराठीतील समृद्ध पडणे ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ☆ 

झाडावरून पडलो 

मागे पडलो

प्रेमात पडलो

परीक्षेत कमी पडलो

इलेक्शन मध्ये पडलो

रणांगणात पडलो

धंद्यात पडलो

धंद्यात पडलो – ( नुकसान झाले )

दारू पिऊन पडलो

मी जरा पडलोय

दुसऱ्याच्या कमी पडलो

यात मी का पडलो बाबा ?

संभ्रमात पडलो

याला टक्कल पडलं बघ

कारभारात पडलो

काळाठिक्कर पडलो

कुठून चौकशीत पडलो कळत नाही

डोक्यावर पडला आहेस का ?

चेहरा पडला

टिपूर चांदणं पडलंय

अध्यात्मात पडलो

पदरात दान पडलं

चंद्राला खळे पडलंय

देवाच्या पायी पडलो

मला विसर पडला

माझे शेअर्स पडले

बायकोची गाठ पडली 

 

संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग सहावा ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग सहावा ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

विठ्ठल – कोकणी (सावंतवाडीकडची )

पंढरपूराच्या वेशीथंय

असा ल्हानशी शाळा एक

सगळी मुलां आसत गोरी

काळोकुट्ट मात्र एक

 

दंगो करता, मस्ती करता

धुमशान घालण्यात असा अट्टल

मास्तर म्हणतंत, काय करुचा

जाणा कोण, असात विठ्ठल.

 

-गौरी गाडेकर, मुंबई

फोन नं.9820206306

==============

 

विठ्ठल – गोव्याची कोकणी

 

पंढरपूराच्या वेशीयेर

आसा एक शाळा धाकली

सगळी भुरगी आसत धवी

एकूच आसा काळो खापरी

 

तोयच करता झगडी

धुमशाणा खूप

मास्तर म्हणता, कितये करू

जाणा कोण

आसत विठ्ठलाचे रूप

 

संध्या तेलंग, मुंबई

फोन नं.9833539290

==============

– समाप्त –

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग पाचवा ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग पाचवा ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

 

इठ्ठल – ही दखनीत : (जिला बागवानी म्हणूनही ओळखतात इथे.)

पंढरपूरके हदकने

हय एक न्हन्नी इस्कूल

सब छोरदा हय गोरे

एक हय काला ठिक्कर

दंगा कर्ता मस्ती कर्ता

खोड्या कर्नेमें हय आट्टल

मास्तर बोल्ता कर्ना क्या

भौतेक इनेच आचिंगा इठ्ठल 

इर्शाद बागवान

(आदिलनिजामकुतुबशहा जेथे होते तेथे ही भाषा तेथील मुस्लिम समाजात बोलली जाते. यातील पेठी वर्जन म्हणजे हैदराबादेतले मुसलमान आपसात बोलतात ती भाषा (धर्माचा उल्लेख केवळ भाषा कुणाच्यात बोलली जाते याकरता) असं म्हणतात. दखनीभाषेत साहित्यनिर्मितीही झालेय. )

====================

इटलो – आदिवासी पावरी बोली..

(नंदूरबार जिल्हा, धड़गाव तालुका आदिवासी पावरी बोली)

पंढरपूरन हिवारोपर,

एक आयतली शाला से 

अख्खा पुऱ्या 

काकडा से 

एक सुरू से 

जास्ती (जारखो) काल्लो 

कपाली करतलो, 

मस्ती करतलो 

चाड्या करण्याम

 से आगाडी पे !

काय करजे ?,

मास्तर कोयतलो,

काय मूंदु ,

ओहे इटलो  ? (विठ्ठल)

योगिनी खानोलकर

≠============

विठु – इंग्लिश 

आऊटसाइड पंढरपुर

देर इजे स्मॉल स्कूल

ऑल द किड्स आर व्हेरी फेअर

एक्सेप्ट फॉर वन ब्लॕक डुड

फनी अँड ट्रबल मेकर

ही इजे ब्रॕट ऑफ हायेस्ट ऑर्डर 

टीचर सेज व्हॉट टु डु?

माइट बी अवर ओन विठु

भाषांतरकार समीर आठल्ये

+91 98926 73624: 

============ =====

कन्नड ( ग्रामीण ) मध्ये

पंढरापूरद अगसी हत्तीर

ऐतेव्वा वंद सण्ण सालीमठा

एल्ल हुड्रू बेळाग सुद्द

वब्बन हुडगा कर्रगंद्र कर्रग ||

गद्दला माडतान,धुम्डी हाकतान

तुंटतना माडोद्राग मुंद भाळ

मास्तर अंतार एन माड्ली ?

इवनं इद्रू इरभौद इटूमावली ?

डॉ प्रेमा मेणशी

 बेळगावी, कर्नाटक

+91 98926 73624: 

============

विठ्ठल  – आगरी बोलीभाषा

पंढरपूरशे हद्दीन

हाय एक बारकी  शाला

बिजी पोरा गोरी

त्यामन एकस यो काला

दंगा करतं नावटीगिरी करतं

खोड्या कर्णेन जाम अट्टल

गुरजी हांगतं काय करणार

काय माहीत आहेल विठ्ठल

श्री अनंत पांडुरंग पाटील

उमरोळी पालघर

===============

क्रमशः ....

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग चौथा ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग चौथा ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

इठ्ठल – (परदेशी बोली)

पंढरपुरका येशीपास

हय एक छोटी शाळा

सब पोर्ह्यान हय गोरा 

एक पोऱ्यो कुट्ट काळो

दंगा करं मस्ती करं

खोड्या करबामं हय अट्टल

मास्तर कहे कई करू ?

कोनकू मालूम व्हयंगो इठ्ठल 

विजयराज सातगावकर

         – पाचोरा

=================

विठ्ठल – (पोवारी बोली )

पंढरपूरक् सिवजवर

से एक नहानसी शाळा

सप्पाई टुरा सेती गोरा

एक टुरा से भलतो कारा

दिंगा करसे मस्ती करसे

चेंगडी करनो मा से अव्वल

मास्तर कव्हसे का आब् करू?

नही त् रहे वु विठ्ठल !!

रणदीप बिसने

     – नागपूर

=========

विठ्ठल – (कोकणी सामवेदी बोली)

पंढरपूरश्या वेहीपा

एक बारकी शाळा हाय

आख्ये पोरे गोरेपान

पान एकूस काळोमस

खूप दंगोमस्ती करत्ये

खोडयो काडण्यात अट्टल

मास्तर हांगात्ये,

का कऱ्यासा,

कुन जाणे, ओस हायदे विठ्ठल ??

जोसेफ तुस्कानो

           – वसई

==========

विट्टल –  (झाडीपट्टी)

पंढरपूरच्या शिवं जवडं

यक छोटी शाडा

सर्वे पोट्टे हायेत भुरे

यक पोट्टा कुट्ट काडा

धिंगाने करते,मस्ती करते

खोड्या कराले हाये अट्टल

मास्तर म्हनतेत का करू बाप्पा

कोन जानं असन विट्टल।।

माधवी

====

विठ्ठल – (वारली)

पंढरपुराच्यें बाहांर आहें

बारकी एकुस साला

आखुटच पोयरें पांडरे-गोरे

एकुस होता काला

भरां करं मस्ती हों तों

भरां करं दंगल

गुर्ज्या म्हन् करांस काय?

आसंल जर्का विठ्ठल

 …मुग्धा कर्णिक

==========

विठ्ठल – (चित्पावनी)

पंढरपुराचे शीमालागी

से एक इवळीशी शाळा

सगळीं भुरगीं सत गोरीं

एक बोड्यो काळीकुद्र कळा

बोव्वाळ करसे, धुमशाणा घालसे

किजबिट्यो काढसे हो अव्वल

मास्तर म्हणसे  कितां करनार?

देव जाणे, सएल विठ्ठल

– स्मिता मोने अय्या

गोवा

============

इठ्ठल – वाडवळी बोली 

पंढरपुरश्या येहीवर 

हाय एक बारकी हाळा

तटे हात जकली पोरं गोरी

एक पोरं घणा काळा

दंगा करते मस्तीव करते

खोड्या करव्या हाय अट्टल

मास्तर बोलते करव्याह का?

कोणला माहीत अहेल इठ्ठल।।

— गौरव राऊत.

-केळवे माहीम

=========

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग दुसरा ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग दुसरा ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

इठ्ठल – (बागलाणी अहिराणी) 

पंढरपूर नी येसपन

शे एक उलशी शाळा

सर्वा पोऱ्या गोरापान

येकच पोरगा कुट्ट काळा!

दंगा करस मस्ती करस

खोड्या काढा मा शे अट्टल

मास्तर म्हणतस करवा काय

न जाणो व्हयी इठ्ठल!

वैभव तुपे

 – इगतपुरी 

=======

इठ्ठल  (आदिवासी तडवीभिल बोली)

पंढरपूरची शिवंजवळं

ह एक लहानी शायी

सबन पोऱ्हा हती गोऱ्या

एक पोऱ्या ह कायाकुच

गोंदय करतो मस्ती करतो

खोळ्या करवात ह अट्टल

मास्तर म्हणतंहती करशान काय ?

कोणाल माहित हुईन इठ्ठल

रमजान गुलाब तडवी

– बोरखेडा खुर्द ता. यावल

================

विठ्ठल – (वऱ्हाडी बोली)

पंढरपूरच्या येशीजोळ

लहानचुकली शाळा हाये;

सबन लेकरं हायेत उजय

यक पोरगं कायंशार॥

दांगळो करते, मस्त्या करते

खोळ्या कर्‍याले अट्टल.

गुर्जी म्हंतात कराव काय?

न जानो अशीन विठ्ठल ॥

  अरविंद शिंगाडे

           – खामगाव

===========

इठ्ठल –  (वऱ्हाडी अनुवाद)

पंढरपूरच्या वेसीजोळ

आहे एक लायनी शाळा

सारी पोर आहेत गोरी

एकच पोरगा डोमळा ॥

दंगा करते, दांगळो करते

खोळ्या करण्यात आहेत

पटाईत…

मास्तर म्हणते कराव काय

न जाणो अशीन इठ्ठल ।।

लोकमित्र संजय

            -नागपूर

==========

इठ्ठल – (आगरी अनुवाद)

पंढरपूरचे येशीजरी

यक हाय बारकीशी शाला

सगली पोरा हायीत गोरी

यक पोऱ्या कुट काला।।

दंगा करतंय मस्ती करतंय

खोऱ्या करन्यान हाय

अट्टल…

मास्तर बोलतान कराचा काय?

नायतं तो हासाचा इठ्ठल!

  तुषार म्हात्रे

   पिरकोन (उरण)

============

इट्टल (मालवणी अनुवाद)

पंडरपूराच्या येशीर 

एक शाळा आसा बारकी।

एकच पोरगो लय काळो:

बाकीची पोरां पिटासारकी।।

दंगो करता धुमशान घालता;

खोड्ये काडण्यात लय अट्टल।

मास्तर म्हणतंत करतंलास काय?

हयतोच निगाक शकता इट्टल।।

 मेघना जोशी

         – मालवण

==========

 

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग पहिला ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग पहिला ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

 एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये ! हा एक अत्यंत वेगळा प्रकार, प्रयोग वाचला. ज्यांना यात रुची आहे अशा सर्वांना मी हे सर्व, जमा करून अग्रेषित करीत आहे. ही सर्व प्रतिभा त्या त्या कवींची आहे. मराठी भाषेबद्दल आदर वाढविणाऱ्या या प्रयोगाबद्दल सर्वांचे आभार—- 

—–मकरंद करंदीकर

विंदा करंदीकर यांची मूळ कविता (जी मुळात लईभारी हे 🙂 ). मराठीच्या बहिणी असलेल्या अनेकानेक भाषांमधे. 

विठ्ठल (मूळ कविता)

पंढरपूरच्या वेशीपाशी

आहे एक छोटी शाळा

सर्व मुले आहेत गोरी

एक मुलगा कुट्ट काळा ॥

दंगा करतो मस्ती करतो

खोड्या करण्यात आहे

अट्टल

मास्तर म्हणतात करणार काय?

न जाणो असेल विठ्ठल ॥

 ©️ विंदा करंदीकर

============

 इट्टल – (नगरी बोली)

पंडरपुरच्या येसिपासी

हाये येक छुटी साळा

सर्वी पोरं हायेत गुरी

योक मुल्गा कुट्ट काळा

दंगा कर्तो मस्ती कर्तो

खोड्या कर्ण्यात बी आट्टल !

मास्तर म्हंती करनार काय ?

न जानू ह्यो आसन इट्टल !!! 

काकासाहेब वाळुंजकर

     – अहमदनगर

==============

इट्टल – (मराठवाडी बोली)

पंडरपूरच्या येशीपशी

हाय बारकी साळा एक

सगळी पोरं हायत गोरी

कुट्ट काळं त्येच्यात एक

आगावपणा करतंय पोराटगी करतंय

आवचिंदपणाबी करण्यात हाय 

आट्टल…

गुरजी मनत्यात करावं काय?

एकांद्या टायमाला आसंलबी इट्टल!

डॉ.बालाजी मदन इंगळे

        – उमरगा

===============

इठ्ठल – (लेवा गणबोली)

पंढरीच्या येशीपाशी

आहे एक छोटुशी शाया

सर्वे पोऱ्हय गोरे

एक पोऱ्या कुट्ट काया 

दंगा करतो मस्ती करतो

खोड्या कऱ्यात आहे अट्टल

मास्तर म्हने करे काय

न जानो अशीन इठ्ठल

प्रशांत धांडे

   – फैजपूर

=======

ईठ्ठल  – (अहिराणी रुपांतर)

पंढरपूरना शीवजोगे

एक शे धाकली शाया;

सम्दा पोरे शेतस गोरा

एक पोर्‍या किट्ट काया ||

दांगडो करस, मस्त्या करस

खोड्या कराम्हा शे अट्टल;

मास्तर म्हने काय करो ?

ना जानो हुई ईठ्ठल  ||

नितीन खंडाळे 

   – चाळीसगाव

==========

इठ्ठल – (तावडी अनुवाद)

 पंढरपूरच्या येसजोय

आहे एक छोटी शाया

 सम्दे पोरं आहेती गोरे

  एक पो-या कुट्ट काया ll

 दंगा करतो मस्ती करतो

 खोड्या क-यामधी आहे अट्टल

 मास्तर म्हनता करनार काय?

ना जानो असीन इठ्ठल  ll

प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे

     – जळगाव

==============

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी एक भूमिगत -भाग २ :: लेखक – कै. वासुदेव त्र्यंबक भावे ☆ प्रस्तुती – श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? वाचताना वेचलेले ? 

☆ मी एक भूमिगत -भाग २ :: लेखक – कै. वासुदेव त्र्यंबक भावे ☆ प्रस्तुती  – श्रीमती सुधा भोगले ☆  

(असा उपयोग बरेच ठिकाणी झाला व यश आले (च्या पुढे)?)

दि. ३१-१२-४२ रोजी मी भिवंडीत होतो. मात्र वर्तमानपत्रे मी फरारी झालो आहे असे सांगत होती. मी फरारी आहे असे जाहीर झाल्यानंतर सरकारने अगदी फोटो सहित माझी सर्व माहिती गोळा केली. व पोलिसांजवळ दिली. अखेर हुलकावण्या देता देता २२-१-१९४३ रोजी मला मुंबईत अटक झाली. मी भाई कोतवाल कटात आहे अशी बहुधा त्यांची खात्री झाली होती. मला ते त्या कटात गुंतवणार होते आणि म्हणूनच त्यांनी माझी भिती घेतली असावी. साळवी फौजदारानी अटकनाट्याचा सर्व खुलासा केला. एक फोटो दाखवला तो आमच्या चर्चा मंडळातला होता. माझे विद्यार्थी श्री सिकंदर अन्सारी यांनी फोटो काढला होता. त्यांच्याजवळून शाळेतल्या कोणी शिक्षकाने तो मागून घेतला आणि अवघ्या दहा रुपयात तो पोलिसांना देऊन टाकला. देशभरातील मोठ्या शहरात माझा तपासासाठी पोलिस गेले होते.  बक्षीसही जाहीर झाले होते. श्री. होनावर यांना मला पकडल्याबद्दल बक्षीसाचे पैसे मिळाले. माझ्या नावावर पैसे जमा करतो म्हणाले.  पण मी ती रक्कम गुप्त संघटनेकडे जमा करा असे सांगितले, ते त्यांनी मान्य केले. मी मात्र त्या प्रलोभनापासून अलिप्त राहिलो. विसापूर जेलमध्ये असताना माझी बहिण भेटायला आली. हे गाव अगदी आडवळणावर होते.  वाहनाची सोय नव्हती. त्यामुळे भेटायला येणाऱ्यांना खूप त्रासाचे पडे. नियमानुसार भेटीची वेळ सायंकाळी चार ते पाच अशी होती. मला ऑफिसात बोलवण्यात आले. श्री नूलकर जेल सुपरिटेंडेंट होते. ते मला नियम सांगून नियमाप्रमाणे तुला तुझ्या बहिणीला भेटता येणार नाही असे म्हणाले. मी तत्वभ्रष्ट व्हावे असा ते प्रयत्न करीत असावेत. मी नियम मोडून भेटीला जाण्याचा स्पष्ट नकार दिला. शेवटी थोड्या वेळाने मला परत जेलर श्री निकोल्स यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी मला भेटण्याची परवानगी दिली. माझी सुटका होत नव्हती, म्हणून माझी आई फार कष्टी होती. पण तरीही कुठल्याही प्रलोभनाला बळी पडून तत्वभ्रष्ट होण्याचा मोह मी निग्रहाने टाळला. माझ्या आईला सुटका न होण्याचे कारण कळावे म्हणून घरची मंडळी सचिवालयापर्यंत धडक मारून आली होती. सरकारने फार गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवले असे त्यांना सांगण्यात आले.’ माफी मागितली तरच विचार करू’,– माझ्या वडीलबंधूनीच त्यांना नकार दिला. ते म्हणाले,’इथे आम्हाला ही अट मान्य नाही, तिथे तो तर अजिबातच तयार होणार नाही!’ आईचे सांत्वन करण्यासाठी पूज्य सानेगुरुजी आमच्या घरी आले होते. त्यांचे उत्तम स्वागत झाले होते.. गहिंवरून ते माझ्या आईला म्हणाले होते, ‘तुमचे कसे सांत्वन करू? आम्ही सारे सुटलो, बाहेर आलो. तुमचा मुलगा मात्र इतके दिवस झाले तरी सुटत नाही!’ गुरुजींना खरे कारण माहीत असून सुद्धा ते कारण सांगू शकले नाहीत. 15 जानेवारी 1946 रोजी मी जेलमधून सुटलो. तब्बल साडेतीन वर्षानंतर मी मोकळी हवा चाखीत होतो. आमच्या स्वागतासाठी श्री. ग. प्र प्रधान आले होते. माझी सुटका झाल्यानंतर माझ्या आईला आणि सर्वांना आनंदाचे भरते येणे सहाजिकच होते. मी घरी आलो. घरच्या माणसांचा आनंद त्यांनी सत्यनारायणाची पूजा करून व्यक्त केला. गावातील वयोवृद्ध नागरिक, श्री. नानासाहेब जोग यांनी आमच्या घरी येऊन गळ्यात हार घालून माझा सत्कार केला. असाच सत्कार त्यांनी 1932 आली सुटून आलो तेव्हा ही केला होता. आणि माझा सामान्य माणसासारखा जीवनक्रम चालू झाला. भिवंडीतील उर्दू शाळेत त्यांनी मला नोकरीसाठी आग्रहाने परत बोलावले. मी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांत प्रिय शिक्षक होतो. 

मी देशभक्त नव्हतो. सत्तेची किंवा पैशाची हाव कधीच नव्हती. संघटनेत काम करण्याची इच्छा होती. त्या माध्यमातून समाजात नैतिक मूल्यांची जोपासना करण्याची इच्छा होती. पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मूल्याधिष्ठित जीवनावर कोणाची निष्ठाच दिसत नव्हती. आज स्वातंत्र्य मिळाले आणि उद्या लगेच निष्ठा नाहीशी झाली असे नव्हे. लोकशाही राबवता राबवता हळूहळू सत्ता आणि संपत्ती या रिंगणात आयुष्य फिरू लागले. माझ्यासारखे तत्व पाळणारे अनेक लोक होते. त्यांना खड्यासारखे बाहेर टाकून देण्यात आले. आमच्यासारख्यांची तत्त्वनिष्ठा नव्या राजकारणी लोकांना पेलण्यासारखी नव्हती. मी किंवा माझ्यासारखे अनेक लोक नव्या राजकारणाने सामावून घेतले असते तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. आम्ही सत्ता आणि संपत्तीच्या मोहात पडलो नसतो असे वाटत आहे. त्यामुळे असे म्हणायला, आम्हाला जागा मात्र नक्की आहे की ध्येयनिष्ठ दूर न करता त्यांना सामावून घेतले असते तर वेगळेच काही घडले असते.  

भारत माता की जय!भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो !!!

समाप्त

प्रस्तुती श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print