श्री कमलाकर नाईक
वाचताना वेचलेले
☆ “कवीची कीर्ती.. चोराला उपरती!…” – लेखक : श्री धनंजय कुरणे ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆
वाचून आश्चर्यानं थक्क व्हावं, अशी बातमी एका मित्रानं आज व्हाट्सअपवर पाठवली. आजच्या टाईम्समध्ये ती छापून आली आहे. बातमी आहे नेरळ मध्ये घडलेल्या एका विलक्षण घटनेबद्दल!
नेरळमध्ये राहणारे सौ. उषा आणि श्री गणेश घारे दहा दिवस गावाला गेले होते. गावाहून परत आल्यावर, ‘आपल्या घरात चोरी झाली आहे, ‘ हे त्यांच्या लक्षात आलं. घरातल्या काही वस्तू चोरीला गेल्या होत्या. मात्र एका खोलीच्या एका कोपऱ्यात घरातला LED टीव्ही पडलेला दिसला आणि शेजारी एक चिठ्ठी ठेवलेली दिसली…. ती चिठ्ठी दस्तूरखुद्द चोर महाशयांनी लिहिली होती…
त्यात लिहिलं होतं….
“मला माहिती नव्हतं की हे घर ‘कवी नारायण सुर्वे’ यांचं आहे. याबाबत मला आधी माहिती असतं तर मी हे घर फोडलंच नसतं आणि टी. व्ही. आणि इतर वस्तू चोरल्याच नसत्या!”
चिठ्ठीच्या शेवटी ठळक अक्षरात ‘SORRY’ असंही लिहिलं होतं.
सौ. उषा घारे या कवी नारायण सुर्वे यांच्या कन्या आहेत. सध्या त्या आपल्या पतीसोबत, नेरळला कै. नारायण सुर्वे यांच्या घरात रहात आहेत.
पोलिसांनी ‘चोराची चिठ्ठी’ ताब्यात घेतली आहे. दहा दिवसांच्या कालावधीत चोर अनेकदा या घरात आला असावा आणि एका खेपेदरम्यान त्याला ‘नारायण सुर्वे’ यांचं पोर्ट्रेट व फोटो दिसले असावेत… ‘आपण एका लोकमान्य कवीच्या घरी चोरी केली, ‘ याची त्याला खंत वाटली असावी, म्हणून त्यानं चोरलेला टीव्ही परत आणून ठेवला असावा, असा पोलिसांचा कयास आहे…. ‘ चोर फारसा शिकलेला नसावा हे त्याच्या बाळबोध लिखाणावरून सिद्ध होतं, ‘ असा पोलिसांचा अंदाज आहे.
घटना तशी छोटी पण असामान्य आहे. नारायण सुर्वे यांचा मृत्यू होऊन चौदा वर्षं झाली आहेत. पण त्यांच्या कीर्तीचं गारुड आजही असं आहे, की एका चोरालाही आपल्या कृत्याची उपरती व्हावी! व्वा! वाचून खूप छान वाटलं.
पाश्चिमात्य देशात साहित्यिकांना कसा मान मिळतो, याबाबतची हकीकत एका मित्राकडून पूर्वी ऐकली होती…. तो एकदा फ्रान्सच्या टूरला गेला होता. एका ठिकाणी जात असताना, हायवेवर एका विशिष्ट ठिकाणी सर्व गाड्या एकदम ‘स्लो’ होत होत्या आणि अगदी ‘वीसच्या स्पीडनं’ जात होत्या. मित्रानं टूर गाईडला याबद्दल विचारलं. तेव्हा तो म्हणाला, ” इथे हायवेच्या शेजारी आमच्या देशाला साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळवून देणारा एक लेखक राहतो. ‘त्याच्या सध्याच्या लेखनात व्यत्यय नको म्हणून सर्व गाड्या हळू चालवाव्या’ असं आवाहन सरकारनं केलं आहे!” हे ऐकून मी अक्षरशः उडलोच होतो.
आजची नेरळमधली बातमी वाचूनही अगदी अशीच अवस्था झाली.. मला वाटतं नारायण सुर्वेना आयुष्यात अनेक मान – सन्मान, पुरस्कार मिळाले असतील.. पण आजचा हा पुरस्कार फारच ‘वरच्या दर्जाचा’ आहे..
या ‘साहित्यप्रेमी’ चोर महोदयांमुळे ‘मजबूर’ सिनेमातला एक संवाद आठवला…
अमिताभ प्राणला म्हणतो,
“मायकल, सुना हैं कि चोरों के भी उसूल होते हैं!”
त्यावर प्राण म्हणतो,
“ठीक सुना हैं तुमने… चोरों के ही तो उसूल होते हैं!”
लेखक : धनंजय कुरणे
संग्राहक : श्री कमलाकर नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈