मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकटेपणा – लेखक : ऐश्वर्य पाटकर – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? वाचताना वेचलेले ?

☆ एकटेपणा – लेखक : ऐश्वर्य पाटकर – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(‘थिंक पॉझिटिव्ह’ नावाचा एक दिवाळी अंक आज लायब्ररीत हाती आला.. आणि याची थीम आहे “एकटेपणा”. पूर्ण अंक याच विषयाला वाहिलेला आहे. या दिवाळी अंकातील “एकटेपणातून बाहेर येण्याचा रियाज!” हा श्री ऐश्वर्य पाटेकर यांचा लेख वाचनात आला. सदर लेखक हे पहिल्या युवा साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी आहेत आणि त्यांची ‘भुईशास्त्र’ आणि ‘जू’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या लेखातील एक सुंदर भाग खाली देत आहे…)

“मला आमच्या इथं गावातील बियावाल्या बाईची गोष्ट आठवते. बियावाली बाई. सतत बिया गोळा करत असायची. म्हणजे तेच तिचं आयुष्यभराचं काम होऊन गेलं होतं. जिथे बी खोचली तिथं झाड उभं राहायचं. हा तिचा हात गुण होता की झाडा-कोडावरची माया? माहित नाही.

मी तिला माझ्या लहान वयापासून पहात आलो. ती सारखी बिया गोळा करायची. तिने पेरलेल्या बियांमधून किती झाडे उगवून आली, याची मोजदाद कशी करणार? अगणित झाडं. ज्या झाडाकडे बोट दाखवलं ते झाड बियावाल्या बाईनेच लावलेलं असायचं. म्हणजे तसं पाहायला गेलं तर उगवून आलेल्या एकूण एक झाडांवर तिची मालकी होती. पण तिने तशी कुठल्याच झाडावर मालकी सांगितली नाही.

बियावाल्या बाईला मूलबाळ काही झालं नाही. त्याचेही तिला कधी काही वाटलं नाही. तिला एकदा आई म्हणाली होती, “आत्याबाई, तुम्हाला मुलबाळ झाले असतं तर आता नातू-पणतू तुमच्या अंगाखांद्यावर खेळले असते!”

तेव्हा तिचे उत्तर होतं, “नाही झालं तेच बरं! नाहीतर ही झाडा-कोडाची पोरं कुणी सांभाळली असती ?”

“कसा जन्म जावा ओ आत्याबाई तुमचा ?”

तेव्हा ही बिया वाली बाई म्हणाली, “जसा तुझा भाकरी थापत थापत जाणार तसा माझी झाडे लावता लावता! हा आता मला सांग तुझ्या भाकरी कुणी मोजल्या का ? माझी झाडं मात्र मोजली जातात. तुला काय वाटलं मला मुलाची आस नव्हती ? होती गं.. पार झुरणीला लागले होते. त्यावेळेला माझी आत्या आली मदतीला धावून. तिलाही मूलबाळ नव्हतं. तिने मला एक बी दिली. म्हणाली, “आपली कूस आपण नाही उजवू शकत मात्र मातीची तर उजवू शकतो ना… !”

दिलेली बी जेव्हा मी आळ्यात लावली तर चौथ्या-पाचव्या दिवशी मातीवर आलेला हिरवा पोपटी कोंब पाहून मी हरकले. जणू मीच बाळंत झाले. मग नादच लागला.. अन् तसही, किती लेकरा बाळावाल्या आया बाया होत्या माझ्या भवतीच्या. पण आज त्या एकट्याच उरल्या. मी तरी माझ्या झाडांसोबत आहे. माझ्या या लेकरा बाळांना पाय नाहीत, हे एका अर्थी बरंच झालं. ! त्यामुळे ते मला एकटीला सोडून नाही जाऊ शकत. “

खूप अंतर्मुख केलं बियावाल्या बाईंच्या या छोट्याश्या कथेने. वर उल्लेखलेल्या बियावाल्या बाईंना अशिक्षित, अडाणी कसं म्हणायचं ? एकटेपणाच्या जाळ्यात सापडू नये यासाठी तीन सूत्र नकळत आपल्या वागण्यातून देऊन जातात त्या…

पाहिलं सूत्र म्हणजे, “आपल्यातील पॅशन ओळखा, त्यात व्यस्त रहा. ” 

दुसरं, “आपलं दुःख कुरवाळणं थांबवून, जे आहे त्यातही माझ्या दृष्टीने कसं चांगलंच होतंय असा दृष्टिकोन ठेवा. “

आणि तिसरं, खूप महत्वाचे सूत्र म्हणजे, “आपण लावलेल्या झाडांवर कधीही आपली मालकी सांगू नका, थोडक्यात, detach राहायला शिका, दुसऱ्यांसाठी काही करण्याची सेवावृत्ती अंगी असू द्या. “

लेखक : ऐश्वर्य पाटकर 

संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कळीचं झालं फूल… कवयित्री : सुश्री शुभांगी देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

कळीचं झालं फूलकवयित्री : सुश्री शुभांगी देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

एक दिवस लेकीला आई हळूच बोले

रांधा, वाढा, उष्टी काढा.. दुसरे मी काय केले ?

*

लेक म्हणे हसून, श्लोक, ओव्या, सुरेल गाणी

तूच ना आम्हा ऐकवलेस

स्वच्छ वाणी, सुरेल शब्द

भांडार तूच खुले केलेस 

*

तुझा स्वयंपाक बघून बघून

मलाही लागली गोडी

तुझ्यातली अन्रपूर्णा

माझ्यातही आली थोडी

*

संस्कारवर्गात नाही आई

जावे लागले आम्हाला

कसे वागावे, कसे बोलावे

ठेवा तुझाच सर्वांना

*

नव्हते यू ट्यूब, नव्हते गुगल

तरी काहीच अडले नाही

तुझ्यासोबत बोलताना

गोष्टी कधीच संपल्या नाहीत

*

सण, सोहळे, लग्नकार्य

तुझेच इव्हेंट मॅनेजमेंट

जमाखर्च, देणीघेणी

तूच शिकवलीस अॅडजेसमेंट

*

आमच्या छोट्या दुखण्यांसाठी

डाॅक्टर आमचा तूच होशी

ओवा, हळद, शेवपा, हरडा

आजही असते माझ्यापाशी

*

तुझी रांगोळी, तुझे भरतकाम

कलात्मकता शिकवून गेली

माहित नाही कशी केव्हा

सुंदरता या जीवनी आली

*

पै पाहुण्यात वाढलो म्हणून

कंटाळा आजही येत नाही

माणसं जोडण्याची कला

जणू जगण्याचाच भाग होई

*

तरीही आई आता म्हणतेस

आयुष्यात मी काय केले

तुझ्याशिवाय का गं आई

माझ्यातल्या कळीचे फूल झाले? 

कवयित्री : सुश्री शुभांगी देशपांडे

चिकूवाडी, बोरीवली

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘आपल्या काळात…’ – लेखक : दलाई लामा –  अनुवाद : शोभा भागवत ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘आपल्या काळात…’ – लेखक : दलाई लामा –  अनुवाद : शोभा भागवत ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

आपल्या काळात इमारतींची उंची वाढली.

पण माणुसकीची कमी झाली

रस्ते रुंद झाले, पण दृष्टी अरुंद झाली.

खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली

घरं मोठी पण कुटुंब छोटी…

सुखसोयी पुष्कळ, पण वेळ दुर्मिळ झाला

पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग

माहितीचे डोंगर जमले, पण नेमकेपणाचे झरे आटले

तज्ज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या

औषध भरपूर, पण आरोग्य कमी झालं

मालकीची भाषा वाढली, मूल्यांची कमी

आपण बोलतो फार… प्रेम क्वचित करतो… आणि तिरस्कार सहज करतो…

राहणीमान उंचावलं. पण जगणं दळभद्री झालं

आपल्या जगण्यात वर्षाची भर पडली, पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही.

आपण भले चंद्रावर गेलो-आलो,

पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही.

बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत. पण आतल्या हरण्याचं काय?

हवा शुध्द करण्यासाठी आटापिटा, पण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय?

आपली आवक वाढली, पण नीयत कमी झाली

संख्या वाढली, गुणवत्ता घसरली

हा काळ उंच माणसांचा, पण खुज्या व्यक्तिमत्त्वांचा

उदंड फायद्यांचा, पण उथळ नात्यांचा

जागतिक शांतीच्या गप्पांचा पण घरातल्या युध्दांचा

मोकळा वेळ हाताशी, पण त्यातली गंमत गेलेली

विविध खाद्यप्रकार, पण त्यात सत्त्व काही नाही

दोन मिळवती माणसं, पण त्यांचे घटस्फोट वाढलेले

घरं नटली, पण घरकुलं दुभंगली

दिखाव्याच्या खिडकीत खूप काही मांडलेलें, पण कोठीची खोली रिकामीच.

हे पत्र तुमच्यापर्यंत पोचवणारं तंत्रज्ञान आज आहे

आणि आज आहे तुमचं स्वातंत्र्यही…

या पत्राकडे लक्ष देण्याचं किंवा न देण्याचं

यातलं काही वाटलं तर बदला…

किंवा… विसरून जा…

लेखक : दलाई लामा

अनुवाद : शोभा भागवत

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘तीच अनंत चतुर्दशी…’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘तीच अनंत चतुर्दशी…’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

ज्याक्षणी या शरीरात अडकणं संपेल

तो क्षणच अनंत – चतुर्दशी !

*

जेंव्हा अहम् आणि त्वम् एकजीव

होतील तीच अनंत – चतुर्दशी !

*

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 

बाप्पासारखा काही दिवसांचा

कोणी दीड, कोणी पाच

तर कोणी दहा दिवसांचा…

*

थोडा वेळ आहोत इथे

तर थोडं जगून घेऊया

बाप्पा सारखे थोडे 

लाडू मोदक खाऊन घेऊया…

*

इथे सर्वच आहेत भक्त आणि 

सगळ्यांमध्ये आहे बाप्पा

थोडा वेळ घालवू सोबत

आणि मारु थोड्या गप्पा…

*

मनामनातले भेद मिटतील

मिटतील सारे वाद 

एक होईल माणुस

आणि साधेल सुसंवाद…

*

जातील निघून सारेच

कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला

ना चुकेल हा फेरा

जन्माला आलेल्या कोणाला…

*

बाप्पासारखं नाचत यायचे 

आणि लळा लावून जायचे

दहा दिवसांचे पाहुणे आपण 

असे समजून जगायचे…

*

किंमत तुमची असेलही 

तुमच्या प्रियजनांना लाख

आठवणी ठेवतील जवळ 

अन् विसर्जित करतील तुमची राख…

*

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 

दीड दिवस अन् दहा दिवसाचा

हे जगणे म्हणजे एक उत्सव 

हा काळ दोन घडीच्या सहवासाचा…

कवी : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘सोनागाची’मधील दुर्गा – –… लेखक : श्री समीर गायकवाड ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ ‘सोनागाची’मधील दुर्गा – –… लेखक : श्री समीर गायकवाड ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

कोलकता येथील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार हत्या प्रकरणी बंगालमधील वेश्यांनी घेतलेली भूमिका ऐतिहासिक आहे! किंबहुना सामान्यांचे डोळे उघडणारी आहे! कथित सभ्य सामान्य माणसं या स्त्रियांपासून अंतर राखतात मात्र जेव्हाही कुठला महत्वाचा सामाजिक प्रश्न उद्भवतो तेव्हा या स्त्रिया त्यात उडी घेतात हा आजवरचा अनुभव आहे.

पीडितेला न्याय मिळावा म्हणून बंगालमधील वेश्यांनी मोर्चात सहभाग नोंदवला! यावेळी त्यांच्या हातात काही घोषणाफलक होते त्यावर लिहिलं होतं की,

प्रयोजने आमादे काचे आशून, किंतू नारी के धारशन कोरबे ना! 

প্রয়োজনে আমাদের কাছে আসুন, কিন্তু নারীকে ধর্ষণ করবেন না।

.. याचा अर्थ असा आहे – तुम्हाला जर इतकीच गरज पडत असेल तर आमच्याकडे या, परंतु कुठल्या स्त्रीवर बलात्कार करू नका!

याच अनुषंगाने या माता भगिनींनी त्यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्याची वंगभूमीमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे! याची माहिती घेण्याआधी दुर्गापूजेचा इतिहास जाणून घेणं अनिवार्य ठरतं!

सोनागाची हा कोलकत्यातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाइट एरिया आहे. या परिसराला इतिहास आहे. याचा एक पैलू धार्मिक आहे जो थेट दुर्गामातेशी संबंधित आहे! कोलकत्यात दुर्गापूजा उत्सवास सुरु होण्याच्या विशिष्ठ तिथी आहेत. त्या त्या दिवशी ते ते विधी पार पाडले जातात, कुंभारवाड्यात (बंगाली भाषेत कुंमारतुली) दुर्गामूर्ती बनवण्यास प्रारंभ करण्याचा दिवस दरसाली जाहीर होतो, त्याच दिवशी मूर्तीच्या निर्मितीस प्रारंभ होतो. मूर्तीसाठी दहा ठिकाणाहुन माती आणली जाते, तिचे पुण्यमाटी आणि निषिद्ध माटी असे दोन भाग पडतात. पुण्यमाटी मध्ये शेण असलेली माती, गोमूत्र असलेली माती, गंगेच्या काठची माती, कुंभाराच्या अंगणातली माती, देवालयातली माती, पर्वतातली माती इत्यादींचा समावेश होतो तर निषिद्ध मातीमध्ये वेश्यांच्या अंगणातल्या मातीचा समावेश होतो. या मातीला निषिद्ध म्हटलं गेलं असलं तरीही जोवर ही माती आणली जात नाही तोवर मूर्तीच्या निर्मितीस प्रारंभ होत नाही. शस्त्रसज्ज दहा भुजा असलेली दुर्गेची मूर्ती वेश्येच्या अंगणातल्या मातीशिवाय बनत नाही हे सत्य आहे आणि तो तिथला रिवाज झाला आहे. या मागची धारणा काय असावी याचं विश्लेषण करताना जाणकारांत मतभेद आहेत. पैकीचे दोनच महत्वाचे मुद्दे येथे मांडतोय.

वेश्यांकडे पुरुष जातात तेंव्हा त्यांच्या मनात नेमकं काय वादळ उठत असावं यावर आधारित पहिला विचार आहे. यानुसार जेंव्हा एखादा पुरुष वेश्येकडे जातो तेंव्हा त्याच्या मनातले सर्व विचार, वलय त्याने बाहेर टाकलेले असतात, वासना आणि देहविचार यांच्या बळावर तो तिच्या घरात शिरतो. म्हणजेच तो जेंव्हा तिच्या घरात शिरतो तेंव्हा त्याच्या मनात शून्य विचार असतात. त्यामुळेच त्याची पावलं पडलेली माती घेतली जाते ज्यात पुरुषाच्या मनात अन्य भावना नसतात. हे मत मला मान्य नाही, पण या मताला दुजोरा देणारे अनेक बंगाली पंडीत आहेत.

दुसरं एक मत आहे त्यानुसार दुर्गा आणि महिषासुर यांचं जेंव्हा युद्ध झालं होतं तेंव्हा त्यानं तिचं चारित्र्यभंग करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात तो यशस्वी ठरला नाही आणि शिवाय तो तिच्याकडून हरला देखील. दुर्गेच्या सर्व रूपांची पूजा होते पण तिच्या मलिन होऊ घातलेल्या रूपाची पूजा होत नाही, भलेही हे स्वरूप निषिद्ध असले तरी त्यातही एक देवांश आहेच हे कसे नाकारता येईल? मग आज ज्या स्त्रियांच्या वाट्यास हे भोग आलेले आहेत त्यांच्या अंगणातली माती आणल्याशिवाय संपूर्णत्व कसे येईल! या धारणांना अनुसरून तिथली माती आणली जाते नि मगच पहिली दुर्गा साकारते मग अन्य मूर्तिकार त्यांच्या प्रांगणात दुर्गा मूर्तीच्या निर्मितीत गुंततात हा तिथला रिवाज आहे!

तर यंदाच्या वर्षी सोनागाचीमधील भगिनींनी दुर्गेच्या निर्मितीसाठी आपल्या अंगणातली माती देण्यास नकार दिला आहे! एकीकडे स्त्रियांचे शोषण होतेय, दुसरीकडे सरकारे आवश्यक ती पावले उचलत नाहीत आणि यांचे शोषण तर अहोरात्र जारी आहे! मग स्त्रियांना न्याय नसेल तर निव्वळ दुर्गापूजा करून काय साध्य होणार आहे हा त्यांचा सवाल आहे!

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः हा श्लोक आपल्याकडे लोकप्रिय समजला जातो! स्त्रिया केवळ या श्लोकापुरत्या उरल्या आहेत का? वास्तवात त्या शौकासाठी उरल्यात की काय असे वाटण्याजोगी स्थिती आहे! याच मुद्द्याला अनुसरून सोनागाचीतील स्त्रियांनी हा निर्णय घेतला आहे.

दरबार ही सोनागाचीमधली सर्वात मोठी एनजीओ आहे. वीस हजार वेश्या भगिनी या एनजीओच्या सदस्य आहेत. यांची स्वतंत्र बँक देखील आहे, वैद्यकीय सेवाही आहे. शाळा काढण्याचा त्यांचा मानस आहे. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे वेश्यांनी वेश्यांसाठी चालवलेली एनजीओ अशी याची व्याख्या करता येईल. कालच दरबार’ची बैठक बोलवण्यात आली होती नि त्यात हा निर्णय घेण्यात आलाय. विशेष बाब म्हणजे कालीघाट ते सोनागाची आणि खिदीरपूर या परिसरात अनेक घरगुती नृत्यशाळा आहेत. या पूर्ण परिसरात जितके दुर्गा पंडाल आहेत त्यांना सरकार अनुदान देतं. गतसाली हे अनुदान ७०००० रुपये होतं यंदा सरकारने ८५००० रुपये अनुदान देऊ केलंय. पण या झुंजार स्त्रियांनी ते नाकारले आहे आणि आपला आवाज बुलंद केला आहे!

या स्त्री सोशल मीडियावर नाहीत. यांना समाज तिरस्काराने पाहतो, समाज यांची हेटाळणी करतो! सामाजिक मांडणीच्या उतरंडीत या सर्वात खाली आहेत. यांचं अफाट शोषण होतं! तरीही त्या सामाजिक लढ्यात हिरिरीने उतरतात, त्या बदल्यात समाजाकडून त्यांची एकच अपेक्षा असते ती म्हणजे किमान माणूस म्हणून तरी त्यांच्याकडे पहिले जावे! ही अपेक्षाही त्या कधी समोर येऊन मांडत नाहीत! जिवंत कलेवरं असणाऱ्या शोषित स्त्रिया आपला आवाज बुलंद करतात. त्या उलट आपण काय करतो हा प्रश्न हरेकाने स्वतःला विचारला पाहिजे!

सोनागाचीमधील माता-भगिनींचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो ! 💐

त्यांच्यातल्या दुर्गेला अभिवादन करतो !🙏

लेखक : श्री समीर गायकवाड

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “OUTLET – –.” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “OUTLET – –.” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

… लाखो जीव घेणार्‍या क्रूर “हिटलरने” शेवटी आत्महत्या केली !.

सुंदर विचार देणारे साने गुरुजी आत्मघात करुन घेतात.

मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे “स्वामी विज्ञानानंद”     मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.

आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे “ भैय्युजी महाराज ”    आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.

पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही “सुशांत सिंग राजपुतनं” नैराश्यातून आत्महत्या केली.

आणि आता सहा आठ महिन्यांपूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या “शीतल (आमटे) करजगी” आपलं जीवन संपवतात.

आजची नागपूरची बातमी उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरूच्या पत्नी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली.

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपल्या डोक्यावर सुमारे १८० कोटी रुपयांचे कर्ज झाल्यामुळे नितीन देसाई यांनी आत्महत्या केली.

 

– –  या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातून काय शिकायचं आपण?……..

पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरून शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी करावे लागणारे त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहित असतात.

माणुस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही. त्याच्या मनात वेगळी खळबळ असु शकते, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्‍याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी काय.. ? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली कबरच आहे हे विसरुन चालणार नाही.

 

भय्यूजी महाराजांनीआत्महत्या केल्यानंतर ABP माझा चॅनलने एक परिचर्चा घडवून आणली होती. त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र – श्री. अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. “ भैय्यूजी महाराज ” स्वतः एक “ अध्यात्मिक  गुरू होते.. परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील स्ट्रेस बाहेर काढायला त्याच्या जवळ outlet नव्हता. डॉ. शितल आमटे (बाबा आमटे यांची नात – त्याचंही अगदी भैय्यु महाराजासारखं झाले.)

 

इतकं महत्वाचं असतं का हे outlet? …. तर होय.

कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल धरण बांधलं आणि समजा त्याला outletच दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फुटेल. इतकं महत्वाचं असते हे waste weir 

… मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्वापासून सांधलेलं एक धरणच आहे. या शरीरात समस्यांची आवक अति प्रमाणात झाली तर हे शरीर रूपी धरण फुटेल की राहील?

 

मुंबई का तुंबते? कारण पुरेसे outlets राहिले नाहीत  

म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे outlet  वापरून आपल्या समस्या आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंर्तमनाचं outlet open करण्यासाठी meditation चा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं outlet म्हणजे आपले डोळे, ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूंचा बांध… वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दुःख, उपेक्षा….. पिस्तुलाच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा.. हे केव्हाही सोपं नाही का?

          

म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. बेस्ट outlet परिवार आणि मित्र! 

हसा ! बोला ! रडा ! भांडा !व्यक्त व्हा !!  मुक्त व्हा.. !!  

 

काळजी घ्या – – 

सोडून गेल्यावर  ” ᴍɪss ʏᴏᴜ”  म्हणण्यापेक्षा ….

सोबत आहे तोपर्यंत ” ᴡɪᴛʜ  ʏᴏᴜ ” म्हणा. आपुलकीची माणसं मिळायला खुप मोठं भाग्य लागतं.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुण्यात नवीन निनावी व्हायरस – लेखिका – सुश्री प्रिया माळी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ पुण्यात नवीन निनावी व्हायरस – लेखिका – सुश्री प्रिया माळी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

हा प्रसंग माझ्या घरातच घडला आहे. सोमवार दि. 29/7/2024 रोजी सकाळी 8. 00 वाजताच माझ्या आईचा फोन आला. मला कसे तरी होत आहे. मी लगेच चिंचवडवरून आईला पुण्यात आणले. डायरेक्ट जहांगीर हाॅस्पीटल गाठले. वरवर पहाता आईला विशेष काही झाल्याचे जाणवत नव्हते. डाॅक्टरांनी जुजबी औषधे दिली. आता 29, 30, 31 जुलै त्या औषधांवर उपचार चालू होते. पण या काळात  खाल्लेले अजिबात पचत नव्हते अगदी औषधेही पचत नव्हती. शुगर व डायबेटीसच्या गोळ्या अख्ख्याच्या अख्खया उल्टीवाटे बाहेर पडत होत्या. परत 1 ऑगस्टला जहांगीर हाॅस्पिटल गाठले. हाॅस्पीटलमध्ये अक्षरश पाय ठेवायलाही जागा नव्हती. रूम शिल्लक नाही, डे केअर काॅट शिल्लक नाही….

सगळ्यात विदारक परिस्थिती म्हणजे आठ दिवसांपुर्वी बायपास झालेल्या एका रूग्णाला घेऊन त्यांचे नातेवाईक आले होते. पण त्या पेशंटसाठीही बेड शिल्लक नव्हता. त्यालाही हाॅस्पीटल ॲडमिट करून घेत नव्हते. त्यामानाने आमची केस वरवर फार सोपीच वाटत होती. डाॅक्टरांनी आम्हाला सांगितले तुमचा पेशंट दुसरीकडे कुठेही न्या. आम्ही इथे औषध उपचार करणार नाही…

आता ओळखीने कोणत्या हाॅस्पीटलमध्ये बेड शिल्लक आहे का हे पहाणे सुरू झाले. रूबी, मंगेशकर, पुना हाॅस्पीटल, जोशी कुठेच बेड शिल्लक नाही. शेवटी काॅरपोरेशनचे एक डाॅक्टर त्यांच्या ओळखीने वडगाव शेरी येथील सिटी केअर मध्ये ॲडमिट करता येईल असे कळाले….

तो पर्यंत केस हातातून निसटत चालली होती. आईची शुध्द हरपली. ॲम्ब्युलन्सला बोलावूनही ॲम्ब्युलन्स आलीच नाही. बाहेर पाऊस धो धो कोसळत होता. शेवटी मलाच गाडी काढून हाॅस्पीटलपर्यंत आईला न्यावे लागले. आय. सी. यू. त दाखल करावे लागले. तिथे एम. आर. आय. व इतर टेस्टची सोय नाही मग डाॅक्टरच्या चिठ्ठ्या घेत आमची यात्रा सुरू झाली. मोठ मोठे हाॅस्पीटल पण पेशंट आपल्या दवाखान्यात येत आहे हे नुसते बघणारा स्टाफ. शेवटी एकेकाला कामाला लावत सगळ्या टेस्ट पुर्ण केल्या. कशातच काही आढळले नाही. परत आय. सी. यू. सलाईन N. S इत्यादी सोपस्कार चालूच होते. रात्रंदिवस आम्ही दवाखान्यात थांबलेलो. काय झाले  हे कळत नव्हते. थोडे फार सोडियम कमी झाले होते पण त्याने मेंदूवर अटॅक झाला होता. लोक ओळखण्यात अडचण येत होती. रात्र दिवस कळत नव्हते, खाण्या पिण्याचे भान नव्हते. जेवायला दिले तरी आत्ताच तर जेवले ना मी असे सांगत आई चालढकल करू लागली. नंतर नंतर बोलणेही दुरापास्त झाले. दवाखान्यात आजूबाजूला पाहिले तर असेच सगळे पेशंट. सत्तरच्या पुढचे सगळे. उलट्या व विस्मरणाने हैराण पेशंट…..

डाॅक्टरांना खोदून खोदून विचारल्यावर व्हायरल आहे एवढीच माहिती देत होते. पण व्हायरस unknown आहे हे सांगत होते. एवढ्यात….

दोन पेशंट दगावले व ओळखीमधले दोन जण दगावले. आता डाॅक्टरही अंदाजाने औषधे म्हणजे फक्त सलाईन व सोडियम सलाईन लावत होते. एका हाताला एकाच वेळेला दोन बाटल्या या प्रमाणे दोन हातांना चार बाटल्या चालू होत्या. नंतर तर पायातूनही सलाईन चालू केले. बरेच सलाईन कॅथेटरमार्फत युरिनवाटे बाहेरच पडत होते. आता कोणत्याच टेस्ट शिल्लक राहिल्या नव्हत्या.

आता अधून मधून शुध्दीवर आल्यावर आईचा घोषा सुरू झाला तुझ्या घरी मला ने. मी तुझ्या पाया पडते अशी विनवणी सुरू झाली. शेवटचा उपाय म्हणून काहीतरी सांगायचे म्हणून सांगितले तू चालल्याशिवाय डाॅक्टर  घरी सोडणार नाही म्हणाले आहेत. त्यासाठी तुला थोडे खावे लागेल हे सांगितल्यावर जिवाच्या निकराने आईने नारळपाणी एकदाचे संपवले आणि दोन तासांनी पाच सहा पावले एकदाची चालली. हट्टाने घरी आली. येताना मणिपाल हाॅस्पिटलमध्ये न्युरोसर्जनची अपाॅईंमेंट घेतली. तिथेही सगळे ओ के च रिपोर्ट आले. एकदाचे घरी आल्यावर एक दोन दिवसात एकदम ओ के झाली. आत्ता बरी आहे. पण…..

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजही डाॅक्टर खाजगीत हेच सांगत आहेत की  हा unknown virus आहे. यावर अजून तरी औषध नाही. सलाईन हाच मार्ग अवलंबावा लागत आहे. तसेच यापुढे गौरी गणपती व इतर सणांच्या काळात ह्या व्हायरसचे संक्रमण वाढणार आहे. पण सरकारी यंत्रणेने जी घोषणा करणे आवश्यक आहे ती केली जात नाही. तरी…….

सगळ्यांनी मास्क लावा, अनावश्यक गर्दीत जाणे टाळा. अंगावर दुखणे काढू नका. हे माझे नाही तर डाॅक्टरांचे सांगणे आहे. फक्त हे सांगणे खाजगीत बोलले जाते हे लक्षात घ्या….    

लेखिका : सुश्री प्रिया माळी

पुणे

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माणसाची ओळख… लेखक – अज्ञात  ☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

🌼 माणसाची ओळख… लेखक – अज्ञात  ☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

ज्यांच्याबद्दल अतोनात विश्वास असतो, ती माणसं कधीकधी इतकी धक्कादायक वागतात की त्या धक्क्याने आपण कोसळून जाऊ असं वाटू लागतं. जवळच्या माणसांनी केलेले विश्वासघात फार जिव्हारी लागणारे असतात. त्यामुळे लौकिक अर्थाने आपलं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी भावनिक पातळीवर कधीही न भरून निघणारी हानी झालेली असते.

माणसांवरचा विश्वास उडू लागतो अशाने फार हट्ट करावासा वाटत नाही मग कशाहीसाठी आणि कोणाहीसाठी. अर्थात या पासिंग फेजेस असतात. त्या येतात आणि पुरेशी वेदना सोसून झाल्यावर जातातही. आपण आपल्या मूळ स्वभावावर येतोच पुनःपुन्हा !

पण तरीही, फार जवळून अनुभवलं की प्रत्येकाचेच पाय मातीचे आहेत हे दिसू लागतं. मग आपण उदास होऊ लागतो. एवढ्यातेवढ्याने भारावून जाण्याचा आपला स्वभाव असू नये आणि कोणालाही पराकोटीचा आदर्श मानून बसू नये.

माणसं म्हटली की वर्तनात कमी जास्त गोष्टी व्हायच्याच आणि ते अगदी नैसर्गिक आहे. माणसांतली नाती पूर्णतः नि:स्वार्थ कधीही नसतात आणि त्यात वावगंही काही नाही, हे आपण लक्षात ठेवायला हवं. म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येत नाही.

प्रत्येक मानवी नात्यात अडचणी येतातच. पण त्या सगळ्या अडचणींवर, कसोट्यांवर मात करून अखेरपर्यंत आपल्या सोबत उरतात….. ती खरी आपली माणसं. ज्यांचे हात उगीचच निसटले ते प्रवासातले तात्पुरते सोबती होते इतकंच समजायचं आणि पुढे चालू लागायचं.

रस्त्यात सांडून गेलेले सगळेच मोती वेचून आणायचं त्राण आपल्यात नसतं आणि प्रत्येकवेळी तसा हट्टही आपण करायचा नसतो. निमूटपणे विनातक्रार आपल्यासोबत चालत आलेल्या पावलांवर भिस्त ठेवायची फक्त.

ती आणि तेवढीच माणसं फक्त आपली समजायची. ऊस काढताना कोयत्याने पाचट सोलून काढतात, तशी माणसांची निवड करत रहावी लागते कायम. सरावाने ‘ओरिजिनल’ माणसं ओळखू येतात आपल्याला. भले ती चुकत असतील लाखदा, पण आपला हात सोडून जाणार नाहीत, त्यांची आपल्यावर असलेली माया कदापि आटणार नाही.

अशी चांगली माणसंही असतात आपल्या आयुष्यात अनेक…. ती मात्र जपायला हवीत.

काही लोकांसाठी आपण केवळ ‘सोय’ असतो. ते त्यांच्या सोयीने आपल्याशी वागतात, गैरसोय वाटेल तेव्हा दूर जातात. आपल्याला कोणीतरी स्वतःच्या सोयीनुसार वापरलं आणि आपण मात्र किती जेन्युईनली ते माणूस जपण्याचा प्रयत्न केला हे जेव्हा लक्षात येतं, तो क्षण फार फार दुखरा असतो.

जगताना सगळीच माणसं लागतात आपल्याला…. नाही असं नाही. पण कोणावर विश्वास टाकायचा, कोणाला जवळ करायचं आणि कोणासाठी नात्यात काही अदृश्य भिंती कायम घालून ठेवायच्या हे आपल्याला ठरवावंच लागतं. नाहीतर आपला साधेपणा हा भाबडेपणाच्या मार्गाने जाऊन बावळटपणा ठरू शकतो.

माणसं जोखणं जमायलाच हवं. समोरच्या माणसाचं ‘असत्य’ रूप आपल्याला माहिती असूनही आपण ते माहिती नसल्यासारखं दाखवणं आणि त्याच्या वागण्यातून दिसणारे विरोधाभास अनुभवणं ही गमतीदार गोष्ट असते. खोटंनाटं, उलटंपालटं बोलून-वागून आपण समोरच्याला फसवू शकतो असं काही लोकांना वाटत असतं. त्यांच्या वर्तनातल्या विसंगती आपल्या लक्षात आलेल्या असतात. मग तर त्यांची कीव येते अक्षरशः….. का वागत असतील माणसं अशी? स्वतःसह इतरांना का फसवत असतील?

ज्यांच्याशी अगदी पटतच नाही, त्यांच्यासोबत सुद्धा वाद घालून किंवा स्पष्टीकरणं देऊन आपण आपलं मानसिक स्वास्थ्य घालवू नये असं मला वाटतं. कटुता आणून, खळखळ आवाज करत नाती संपवू नयेत. झाडावरून जितक्या सहजतेने फूल निसटतं, तितकी सहजता आपल्यात असावी. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून बाजूला होताना.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “शून्यातून विश्व – की –“ (पु. ल. देशपांडे यांच्या संग्रहातून) – संग्राहक : अज्ञात ☆ डॉ. शुभा गोखले ☆

डॉ. शुभा गोखले

? वाचताना वेचलेले ?

 “शून्यातून विश्व – की –“ (पु. ल. देशपांडे यांच्या संग्रहातून) – संग्राहक : अज्ञात ☆ डॉ. शुभा गोखले ☆

शून्यातून विश्व, 

     की विश्वातून शून्य …!!!

          टू रुम किचनचा 

               एखादा फ्लॅट …

                    दोन चार एकरचं 

                         फार्म हाऊस …,

                    एखादी चार चाकी गाडी 

               आणि भौतिक वस्तूंचं 

          प्रदर्शन मांडता आलं, की

     आपण म्हणतो …

अमक्या-तमक्यानं 

     शून्यातून विश्व 

          निर्माण केलं ….!!!

               म्हणजे होतंय काय, की 

                    सुख मिळेल, या आशेनं 

                    माणूस श्रीमंत होण्यासाठी

              धडपडतोय, पण सुखी 

          काही दिसत नाही …!!!

     आपणच म्हणतो, की

आमच्या लहानपणी खूप 

     मजा यायची …

          खूप करमायचं, 

               घर भरलेलं असायचं …

                    दिवस कधी मावळायचा 

               ते कळायचंच नाही …!!!

          मग आता

     काय झालं ???

मजा कुठं गेली ???

     एकटं एकटं का वाटतं …???

          छातीत धडधड का होते …???

               कशामुळं करमत नाही …???

                    कारण…

              “विश्व निर्माण करण्याची” 

          व्याख्या कुठंतरी चुकली …!!!

     विश्व निर्माण करणं 

म्हणजे …

नाती गोती जपणं …

     छंद जोपासणं …

          पाहुणे होऊन जाणं …

               पाहुण्यांचं स्वागत करणं …

                    खूप गप्पा मारणं …

               घराच्या उंबऱ्यात 

          चपलांचा ढीग दिसणं …

     खळखळून हसणं …

आणि …

     काळजातलं दुःख सांगून

          मोकळेपणानं रडणं …!!!

               या गोष्टी आपण

                    प्राप्त करू शकलो, तर …

               “शून्यातून विश्व 

          निर्माण केलं” असं म्हणावं ..

     तुम्हीच सांगा … 

आपल्या आयुष्यांत या 

     सर्व गोष्टींची वाढ झाली, 

          की घट झाली …???

               तुमचं खरं दुःख तुम्ही

                    मोकळेपणानं किती 

               जणांना सांगू शकता ???

          असे किती मित्र, शेजारी,

     नातेवाईक आपण निर्माण 

करू शकलो …???

     खूप कमी, 

          किंबहुना नाहीच …!!!

               मग आपण 

                    “विश्व निर्माण” 

                केलं कां …???

          तर नाही …

     मित्रहो, 

रजिस्ट्रीच्या कागदाच्या 

     फायली म्हणजे विश्व …???

          भौतिक साधनांची रेलचेल 

               म्हणजे विश्व …???

                    नाही …!!!

               लॉकरमध्ये ठेवलेले 

          हिरे मोत्यांचे दागिने 

     म्हणजे विश्व …???

मुखवटे घातलेल्या 

     चेहऱ्यांची गर्दी 

          म्हणजे विश्व …???

               नाही …!!!

                    हे समजून 

               घ्यावं लागेल …!!!

          मोठं बनण्याच्या

     दडपणामुळं …

आणि मग कामाच्या 

     व्यापामुळं …

          नाती दूर जाणार 

                असतील, …

                    इतरांना तुच्छ लेखण्यामुळं

               आणि अहंकारामुळं माणसं 

          जवळ येणार नसतील…

      दुःख सांगायला, 

मन हलकं करायला 

     जागाच उरणार नसेल, 

          तर …

               आम्ही शून्यातून 

                     विश्व निर्माण केलं,  

                की …

         विश्वातून शून्य…?????

(पु लं.च्या एका‌ संग्रहातून)

संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “Contact आणि Connection…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “Contact आणि Connection…” –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

Contact आणि Connection मध्ये नेमका काय फरक… ?

घटना न्यूयार्कमधील आहे. एका भारतीय साधूचे तिथे व्याख्यान झाले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले.

त्यातील एकाने साधूला विचारलं,

“साधू महाराज, तुम्ही आताच्या व्याख्यानात संपर्क (Contact) आणि लगाव (Connection) यावर बोलला.

पण ते गोंधळात टाकणार आहे. या दोन्हीमध्ये फरक काय ?”

साधुने मंद स्मित केले अन उत्तर देण्याऐवजी वेगळेच प्रश्न त्यांनी त्या पत्रकाराला विचारणे सुरु केले.

साधू : “तुम्ही न्यूयार्कचे रहिवासी का ?”

पत्रकार : “येस !! का हो ?”

साधू : “घरी कोण कोण असत?”

आपल्या प्रश्नाचे उत्तर टाळण्यासाठी साधूबाबा असं काहीतरी वेगळं विचारत आहेत असं त्या पत्रकाराला वाटलं. कारण त्याचा प्रश्न सार्वजनिक होता अन साधू तर खाजगी काहीतरी विचारत होते.

तरी मूळ प्रश्नाचे “उत्तर” मिळण्याच्या आशेने तो पत्रकार उत्तर देत गेला.

तो म्हणाला : “माझी आई आता नाहीये. वडील व आम्ही तिघे भाऊ बहीण ! सगळ्यांची लग्न झाली आहेत. सेपरेट बंगले असून सर्व सेटल आहेत. “

साधू : “तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलत असता का ?”

(आता मात्र त्या पत्रकाराला थोडा राग यायला लागला. )

साधू : “तुमच्या वडिलांशी शेवटचे तुम्ही कधी बोलला ? काही आठवतंय का ?”

पत्रकाराने राग आवरत सांगितलं : “बहुतेक एक महिना झाला असावा.

साधू : “तुमच्या बहीण भावाशी नेहमी भेटीगाठी करता का ? एक कुटुंबीय म्हणून शेवटचे तुम्ही कधी एकत्र भेटले?”

(आता पत्रकाराच्या कपाळावर घाम यायला लागला, की मुलाखत कोण कुणाची घेतेय?)

तरी त्याने उत्तर दिले : “गेल्या वर्षीच्या ख्रिसमसमध्ये भेटलो”

साधू : “त्यावेळी किती दिवस एकत्र होता?”

पत्रकार (हळवा होत) : “तीन दिवस होतो”

साधू : “तुम्ही बहीण भावांनी त्या काळात किती वेळ वडिलांच्या अगदी जवळ बसून घालवला ?”

(पत्रकार आता थोडा लाजिरवाणा होऊन, मान खाली घालून कागदावर काहीतरी रेघोट्या मारत बसला. )

साधू : “तुम्ही तुमच्या वडिलांसोबत नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीचे जेवण केले का ?” वडिलांना विचारलं का ? की कसे आहात? आईच्या निधनानंतर ते एकटे जगत होते तर वेळ कसा घालवला?”

(असं म्हणत त्या साधूने पत्रकाराला आपुलकीने जवळ घेतलं).

साधू : “बेटा, नाराज होऊ नको, लाजिरवाणा पण होऊ नको. तुला असं नकळत दुखावल्याबद्दल उलट मी माफी मागतो. पण तुझ्या मूळ प्रश्नाचे उत्तर यात होते. तू तुझ्या वडिलांच्या फक्त Contact मध्ये आहेस. मात्र तुझं त्यांच्याशी कोणतेही Connection नाहीय……

… You are not connected to him. आणि वडील संपर्कात असणं वेगळं अन त्यांच्याशी “लगाव” असणं वेगळं. कारण Connection हे नेहमी आत्म्याचे आत्म्याशी होत असते.

एकत्र बसणे, भोजन सहवास, एकमेकांची काळजी घेणं, डोळ्यांनी संपर्कात नव्हे तर डोळ्याची भाषा ओळखून त्यानुसार प्रतिसाद देणे, आपुलकीचा स्पर्श, हात हातात घेणं… हे सगळं Connection मध्ये येत. Contact मध्ये नाही… तुम्ही तुमची भावंडं, वडील यांच्या Contact मध्ये आहात पण कोणतेच Connection आपसात नाही. “ 

आता पत्रकाराच्या डोळ्यात पाणी आलं.

एक चांगला धडा गिरवून दिल्याबद्दल आभार मानून, पत्रकार त्यांना नमस्कार करून निघाला.

आज आपल्या भोवताली बहुतेक असंच दिसतयं….. आपण आपले सख्खे नातेवाईक, आपले मित्र, आपले शेजारी, सहकारी, समाज… सर्व फक्त contact मधे ठेवतो आणी गरज पडली की लगेच connection जोडतो…

सर्व एकमेकांच्या Contact मध्ये आहेत पण कुणाशी Connection (लगाव असा) काही नाही…

कसला संवाद नाही, कसल्या चर्चा नाहीत, सगळे स्वमग्न झालेत… !

आपण वरचेवर बदलत चाललोय…

हेच खरं आहे.. !

इतक्या वर्षाचे आपले संस्कार, आईवडील गुरुजींनी शिकवलेले ते सगळं विसरलं जातंय….

कुणाला जवळ करायचं, कधी जवळ करायचं, हे चांगलच समजायला लागलयं…

प्राधान्य कशाला द्यायचं हा भावनिक व्यवहार आपण चांगलाच अंगीकारला आहे…

गरज पडेल तेव्हा बघू ही वृत्ती आपण चांगलीच जोपासली आहे…

वाटलं तर प्रतिसाद द्यायचा नाहीतर मोबाईल सायलेंटवर होता म्हणून सोयीचं व ठेवणीतलं उत्तर तयार ठेवायचं… !

दाहक असलं… तरी सत्य हेच आहे…

… संपर्क, संवाद वाढवणं, एकमेकांना समजून घेणं, जाणून घेणं म्हणजेच connection..

वरील घटनेतील “साधू” म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले स्वामी विवेकानंद होते.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares