मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तो कृष्ण आहे… लेखक : अज्ञात ☆ सुश्री सुनीता जोशी ☆

सुश्री सुनीता जोशी 

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ तो कृष्ण आहे… लेखक : अज्ञात ☆ सुश्री सुनीता जोशी

 कृष्णाला बर्‍याच गोष्टी मिळाल्या नाहीत……

…. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला.

…. नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले.

…. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली.

…. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं.

 

कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने. ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला.

…. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो.

कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात.

…. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे………

 

पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे ….

सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे ….

द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे ….

मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे ….

सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे……..

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुनीता जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ह्याला आयुष्य म्हणावे काय ? – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ह्याला आयुष्य म्हणावे काय ? – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

 पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिध्दी

 लोळण घेतात पायात

 बिल गेटची पत्नी तरीही

 का घटस्फोट घेते ह्या वयात ?

*

शिक्षणाने माणूस समृद्ध होतो

आम्ही आहोत अजूनही भ्रमात

उच्चविद्याविभूषकांचे मायबाप

मग का असतात वृध्दाश्रमात ?

*

 हा डिप्रेशनचा शिकार

 तो आत्महत्या करतो

 ज्याला समजावं सेलिब्रिटी 

 तो एकाकीपणात मरतो

*

ज्यांनी कमावलं नाव

त्याला आनंद का मिळत नाही ?

काय चाटायचं ह्या मोठेपणाला

नातं आपुलकीचं जुळत नाही

*

 जळजळीत वास्तव सांगतो

 तुमचा विश्वास ह्यावर बसणार नाही

 गरीब, अडाणी, प्रामाणिक मजुरांचे

 मायबाप वृध्दाश्रमात दिसणार नाही

*

असं नाही त्यांचे घरात

नाहीत वादविवाद

पण घटस्फोट अन् वृध्दाश्रम

बोटावर मोजण्या एवढे अपवाद

*

 आजारी मायबापांचा इलाज 

 करतात किडूक मिडूक विकून 

 पण जिव्हाळ्याची अजूनही त्यांनी

 नाळ ठेवली आहे टिकवून 

*

व्यसनी, रागीट, नवरा

त्याला गरीबीची जोड

तरीही त्याची पत्नी बिच्चारी

करतेच ना तडजोड ?

*

 दु:ख हलकं करतात

 एकमेकांना भेटून

 एका शिळ्या भाकरीचा तुकडा

 खातात सारेजण वाटून

*

जेवढी लावतात माया

तेवढंच बोलतात फाडफाड

कितीदा तरी भांडतात

पण कुठे येतो ईगो आड ?

*

 उशाशी दगड घेऊन

 भर उन्हातही झोपी जातो

 काळ्या मातीत घाम गाळणारा

 बळीराजा कुठं झोपेची गोळी खातो ?

*

ना तोल ढळतो ना संयम

दु:खातही सावरण्याची आस

कारण अजूनही ह्या माणसांचा

आहे माणुसकीवर विश्वास

*

 पण हल्ली इन्स्टंट रिझल्टचे

 आले हे दळभद्री दिवस

 देव सुध्दा लगेच बदलतात

 जर पावला नाही नवस

*

एकत्र कुटूंब हल्ली

सांगा कुणाला हवं ?

कामा शिवाय वाटतं का

आपण कुणाच्या घरी जावं ?

*

 एकदा तरी बघा जरा

 आपल्या आयुष्याचा रोड मॅप

 कुणाचं कुणाशी पटत नाही

 काय तर म्हणे जनरेशन गॅप

*

सांगा बरं कुणावर ह्या

विकृत विचारांचा पगडा नाही

घर, बंगला, फ्लॅट असु द्या

दरवाजा कुणाचाही उघडा नाही

*

 बहुत अच्छे, बहुत खूब !

 क्या बात है ? बहुत बढीया !

 एवढ्या ओसंडून वाहतात प्रतिक्रिया 

 जागृत चोवीस तास सोशल मीडिया

*

आभासी दुनियेची चाले

कोरडी कोरडी ख्याली खुशाली

मोबाईलवर साऱ्या शुभेच्छा

मोबाईलवरच श्रध्दांजली

*

 काय बरोबर ? काय चूक ?

 मत मांडण्याचीही सत्ता नाही

 तो बंद घरात मरून पडला

 वास सुटला तरी शेजाऱ्याला पत्ता नाही

*

मुलं पाठवले परदेशात

आई संगे म्हातारा बाप कण्हतो

अंत्यविधी उरकून घ्या

पैसे पाठवतो असं पोटचा गोळा म्हणतो

*

 लेकराला पाॅकेटमनी, बाईक 

 अन् भलेही दिली जरी कार

 किती छान झालं असतं

 जर दिले असते संस्कार ?

*

होस्टेल, बोर्डींगात बालपणीच पाठवलं 

तो तुम्हाला का वागवणार ?

जमीन असो की जीवन

येथे जे पेरलं तेच उगवणार

*

 जीवशास्त्र शिकवलं

 जीवनशास्त्र शिकवा

 चुलीत गेली चित्रकला

 सांगा चारित्र्याला टिकवा

*

त्रिकोण, चौकोन, षट्कोन

ह्याला सांगा विचारेल कोण ?

ज्याचे जवळ नसेल

आयुष्याचा दृष्टीकोन

*

 विपरीत परिस्थितीतही 

 जपणूक केली पाहीजे तत्वाची

 व्याकरणापेक्षाही अंत:करणाची

 भाषा असते महत्वाची

*

चुकू द्या चुकलं तर

अंकगणित अन् बीजगणित 

माणसांची बेरीज करा

गुण नाहीत पण गुणवत्ता अगणित

*

 प्राणपणाने जतन करावे

 नाते शहर, खेडे, गावाचे

 मेल्यावरती खांदा द्यायला

 असावे चारचौघे जिवाभावाचे

*

मेल्यावर दोन अश्रू 

हीच आयुष्याची कमाई

ज्याने हे कमावलं नसेल

तो आयुष्य जगलाच नाही

*

 मिळून मिसळून वागावं

 आनंदानं छान जगावं

 तुम्ही सगळी मोठ्ठी माणसं

 म्या पामरानं काय सांगाव……

कवी : अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महालक्षुम्या आल्या, टेन्शन नका घेऊ ! – कवी : विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

महालक्षुम्या आल्या, टेन्शन नका घेऊ ! कवी : विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

महालक्षुम्या आल्या, महालक्षुम्या आल्या

घाबरून नका जाऊ

जेवढं होईल तेवढंच करा

टेन्शन नका घेऊ

*

काळाप्रमाणे काही गोष्टीत

बदल केले पाहिजे

सोळा भाज्या सोळा चटण्या

कमी केले पाहिजे

 

एवढेच लाडू तेवढ्या करंज्या

तरकटी नको बाई

काही धरायचं काही सोडायचं

काही होत नाही

(पूर्वीच्या काळी……)

एकत्र कुटुंब माणसं भरपूर

अन्न खाल्ल्या जायचं

थोडं जास्त झालं तरी

वाया नाही जायचं

*

गडी माणसं पाहुणे रावळे

चढाओढीने खायचे

Acidity, पोटात गुडगुड

काही नाही व्हायचे 

*

आता काळ बदलला आहे

घरोघरी माणसं चार

माऊल्यांनो खरंच जास्त

होऊ नका तुम्ही बेजार

*

भला मोठा स्वयंपाक करून

फेकून देऊ नका

अन्न पूर्ण ब्रह्म आहे

कधीच विसरू नका

*

सण करणं श्रद्धा असणं

हा भाग महत्वाचा

लक्षुम्यांनाही नवैद्य चालतो

फक्त भाजी भाकरीचा

*

जिवंत लक्ष्मीची बेजारी करण्यास

गौरी-गणपती येत नाहीत

थोडं कमीजास्त झालं तरी

कुणावरही कोपत नाहीत

*

तुमच्यावर राग राग करायला

देव थोडाच माणूस आहे

महालक्ष्मी असो गणपती असो

फक्त भक्तीचा भुकेला आहे

*

ऐपतीप्रमाणेच सगळं करा

रिन काढून नको सण

नको लायटिंग नको माळा

फक्त हवे शुद्ध मन

*

सगळ्यांनी सामील होणं

हे महत्वाचं असतं

खरंच ताण घेऊ नका

काही कामाचं नसतं

*

आमच्याकडे असं असतं

अन त्यांच्याकडे तसं

ताण न घेता काम करावं

जसं जमेल तसं

*

गाठीभेटी गप्पागोष्टी

सणासुदीला अपेक्षित असतात

प्रेम आपुलकी वाढण्यासाठीच

दसरा दिवाळी लक्षुम्या असतात

*

मंत्र जोर जोरात म्हणायचे

अन सासुशी करायची कट्टी

असं वागल्यावर कशी होईल

महालक्षुम्याशी गट्टी ?

*

राग अहंकार चांगला नसतो

गोडीगुलाबीने वागलं पाहिजे

फटकळ बोलणं सोडून देऊन

घालीन लोटांगण म्हणलं पाहिजे 

कवी : प्रा. विजय पोहनेरकर

छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) मो 9420929389

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जातीचं काय घेऊन बसलात राव ? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ जातीचं काय घेऊन बसलात राव? – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

जातीचं काय घेऊन बसलात राव.. अरे जात म्हणजे काय ? … माहित तरी आहे का.. ?

अरे कपडे शिवणारा शिंपी, ! तेल काढणारा तेली, !

केस कापणारा न्हावी. ! लाकुड़ तोडणारा सुतार. !

दूध टाकणारा गवळी. ! गावोगावी भटकणारा बंजारा. ! 

भांडी बनविणारा कासार, दागिने बनविणारा सोनार, मूर्ती- मातीची भांडी बनविणारा कुंभार, रानात मेंढी-

बकरी वळणारा धनगर.. !

पुजा-अर्चा, पौरोहित्य करणारा ब्राह्मण. !

बूट चप्पल शिवणारा चांभार, बागायती शेती करणारा-वृक्ष लावणारा माळी. !

आणि लढाई लढणारा क्षत्रिय. !

आलं का काही डोस्क्यात.. ?

आरं काम म्हणजे जात.

आणि सर्वात महत्त्वाचे वरीलप्रमाणे कामे आता कुठल्याही एका जातीचीच व जातीसाठी राहिली नाहीत.

आता शिक्षणाने व्यवसाय प्रत्येकाचे बदलले आहेत.

आता भांडत बसण्यापेक्षा जाती बदला……

आता इंजीनीयर ही नवी जात.

कॉम्प्युटर, केमिकल ही पोटजात.

“सी. ए” ही पण जात,

तर 

“एम. बी. ए” ही नवी जात.

डॉक्टर ही पण जात 

तर वकीलही जातच 

तर “शिक्षण” व “माणुसकी” हाच खरा धर्म.

बदला की राव कवाचं तेच धरुन बसलात!

घरीच दाढी करता नवं? … तेव्हा तुम्ही न्हावी होता 

बुटाला पालीश करता नव्हं?…. तेव्हा तुम्ही चांभार होता 

गैलरी टेरेसवर झाडे लावता ना ! बगीचा करता …. तेव्हा तुम्ही माळी होता 

घरच्या घरीच पुजा-अर्चा करता नव्ह?.. , , तेव्हा ब्राम्हण पण होताच की ?

आरं कामानं मोठं व्हा जातीनं न्हाय !

आरं तुम्ही ह्या जातीत जन्माला आला, हा काय तुमचा पराक्रम हाय व्हय?

मंग कशाला उगीचच बोंभाटा करता राव ?

तुम्ही शहरात/खेडेगावात राहत असाल.. तुम्ही आजारी पडल्यावर/अडीअडचणीला मदतीला सगळ्यात आधी धावून येतो तो तुमचा शेजारी/मित्र आणि तो तुमच्या वरीलप्रमाणे जुन्या जातीचा नसतोच हे मान्य कराल की नाही?

सगळ्याला आता आधुनिक पद्धतीने काम हाय !

सगळ्याला शिक्षण खुले हाय !

खूप शिकायचं काम करायचे ! 

माता पित्याचे- -गावाचे- जिल्हय़ाचे- राज्याचे- देशाचे नावलौकिक करायचे.

कधीतरी लक्षात घ्या की… ” जात फक्त राजकारणी लोकांनी स्वार्थासाठी जिवंत ठेवली आहे “

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दुर्लक्षित राणी – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

 

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ दुर्लक्षित राणी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

एक राजाला चार राण्या होत्या.

!  पहिली राणी इतकी सुंदर होती! कि तो तिला फक्त प्रेमाने बघत रहायचा?

!  दुसरी राणी इतकी सुंदर होती की, तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा!

!  तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा ?

!   चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!!

!   राजा म्हातारा झाला, तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणी म्हणाला, “मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का?”

!  राणी म्हणाली मी तुला इथेच सोडुन देणार आहे.

! राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली, “मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईल त्यापुढे नाही.

! राजाला अपारं दुखः झालं, त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले, “तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही ?

! तिसरी राणी म्हणाली, “मी तुम्ही गेल्याबरोबर दुसऱ्या कुणाबरोबर जाणार आहे, तुमच्याजवळ रहाणार नाही.

! आता मात्र राजाच्या दुखाःला पारावार राहिला नाही. तो विचार करू लागला. मी या राण्यांवर माझे पुर्ण जीवन घालवले! त्या कधीही माझ्या नव्हत्याच ? माझे जीवन व्यर्थ घालवले, फुकटं वेळ, पैसा, आयुष्य खर्च केले?

! तेवढ्यात राजाची चौथी राणी तेथे आली, जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिलं नव्हते? तिला अंगभर कपडे नव्हते की, तिच्या अंगावर मुठभर मांस नव्हते कि, दागिने नव्हते.

! ती म्हणाली, “तुम्ही जाल तिकडे येईल. नरकात असो की स्वर्गात, कोणत्याही प्रकारच्या जन्म असला तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. हे माझे तुम्हास वचनं आहे.

! राजा थक्कं होऊन समोर पहात राहिला, विचार करू लागला कि, जीला मी प्रेम सोडा, साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही, ना पुर्ण आयुष्यात जिचा कधी एक क्षणभर काळजी केली. ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे? राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागले. त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राण त्यागं केला.

! कोण होता तो राजा? कोण होत्या त्या तीन राण्या? कोण होती ती चौथी राणी? इतके प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग का केला.. ? त्या उलट ती चौथी राणी, जिच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही, पण तरीही एवढा त्याग का केला..

! तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसुन स्वतः आपणच आहोत.

🔸 आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवरचं सोडते ते म्हणजे आपले शरीर ज्याला आपण आयुष्यभर बघत रहातो.

🔸 आपली दुसरी राणी स्मशानापर्यंत आपल्याला सोडण्यास येते, ते आपली मुले, आप्तेष्ट, मित्र थोडक्यात समाज.

🔸 आपली तिसरी राणी, जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते म्हणजे, धन-पैसा आपल्या मृत्युनंतर आपली लगेच दुसऱ्याची होते.

🔸 आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे पुण्यकर्म जे आपण सदभावनेने नि:स्वार्थपणे, आणि विना अहंकाराने केले. जिच्याकडे बघण्यास आपणास अजिबात वेळ नाही, तरीपण जन्मोजन्मी आपल्याबरोबर येतंच असते… !

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बेस्ट झालं, आपल्यालास्वातंत्र्य मिळालं… – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ बेस्ट झालं, आपल्यालास्वातंत्र्य मिळालं… – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

बरं झालं, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं.

ते गोरे, साले रस्त्यामध्ये थूंकू देत नव्हते!

वेड्यासारखे रोज पाण्याने रस्ते धूत होते.

आपण किती भाग्यवान!

गुटका पान तंबाकू खाऊन

रस्त्यात कुठेही थूंकू शकतो!

छान झालं, स्वातंत्र्य मिळालं !!

ते इंग्रज, साले धान्यामध्ये भेसळ करू देत नव्हते.

मूर्खासारखे रेशनवर सकस धान्य देत होते.

आपण किती पुण्यवान

दूध अन्न औषधामध्ये

बेमालूम भेसळ करू शकतो.

बेस्ट झालं, स्वातंत्र्य मिळालं !

🤨

ते ब्रिटीश, साले शिक्षणाचा धंदा करू देत नव्हते!

अडाण्यासारखे दर्जेदार शिक्षण फुकटामध्ये देत होते !

आपण किती विद्वान!

शिक्षणाचा बाजार मांडून

पिढ्या बरबाद करू शकतो!

चांगलं झालं, स्वातंत्र्य मिळालं!

😱

ते जुलमी, साले अनाथ मुलांना भीक मागू देत नव्हते!

दळभद्र्यासारखे त्यांच्याकरिता अनाथाश्रम चालवित होते!

आपण किती दयावान!

अनाथ मुलांना पांगळे करून भीक मागायला लावू शकतो!

झकास झालं, स्वातंत्र्य मिळालं!

😩

ते मिशनरी, साले गरिब रूग्णांस हलाखीत मरू देत नव्हते!

ईश्वरसेवा समजून त्यांची सेवाशुश्रुषा करीत होते!

आपण किती करूणावान!

डाॅक्टरांचा संप घडवून रूग्णांचे हाल करू शकतो!

उत्तम झालं, स्वातंत्र्य मिळालं!

😟

ते फिरंगी, साले आपणाला लाच खाऊ देत नव्हते!

गाढवासारखे लाचखोरांस बुटांच्या लाथा घालीत होते!

आपण किती सचोटीवान!

लाचखोरांच्या मिळकतीमध्ये आपला वाटा ठेवू शकतो!

😟

बरं झाल, ते इंग्रज गेले !

पण जाता जाता, साले आपलं देशप्रेमही घेऊन गेले!

🇮🇳 एक भारतीय नागरिक 🇮🇳

लेखक : अनामिक

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मातृदिन…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “मातृदिन” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस “पिठोरी आमवास्या ” म्हणजेच “मातृ-दिन ” आहे.

ह्या दिवशी आई मुलांना वाण देते आणि मुलं आईच्या पाया पडुन आशिर्वाद घेतात ही खरी आपली पारंपारिक परंपरा आहे. आई-मुलाच नातं म्हणजे “वैश्विक नाते “. कारण आई मुलांचे सर्वस्व असते, आई मुलांचे विश्व असते. Mothers Day सेलिब्रेट करण्यापेक्षा पिठोरी आमवस्येच्या दिवशी आईच्या पाया पडावे. खरं तर आई- वडीलांच्या रोज पाया पडणे हे मुलांच कर्तव्य. पण हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात ते घडत नाही, त्याची अनेक कारणं आहेत. पण किमान मातृ-दिना निमित्त आपण आपल्या आईच्या पाया पडुन तिचे आशिर्वाद घेऊया. कारण तिच्यासाठी हेच खूप मोठ गिफ्ट असेल❗

श्रावण महिन्यात येणाऱ्या या पिठोरी अमावास्येला कुषोत्पतिनी अमावस्या असेही म्हणतात. तसेच या दिवशी “बैल पोळा ” सण देखील साजरा केला जातो❗

मे महिन्याचा दुसरा रविवार ‘मदर्स डे’ सेलिब्रेट करण्याची विदेशी पध्दत. कार्ड, फुले, केक ई. रेडीमेड भेटवस्तूंच्या माध्यमातून ‘मदर्स डे’ साजरा करतात. पण आपला पारंपारीक ‘मातृ-दिन’ म्हणजे श्रावणी अमावस्येचा दिवस, अर्थात पिठोरी अमावस्या. भारतीय मातृदिनाच्या या संकल्पनेत ‘रेडिमेड’ गोष्टींचा समावेश नसतो. म्हणून पिठोरी पूजनात सर्व काही नैसर्गिक असते.

करडू, तेरडा, गाजरा, पेवा, कललावी सह अनेक प्रकारची रानफुले रानातून आणली जातात. पूजेसाठी तांदळाऐवजी वाळू वापरतात, दिवेही पिठाचे बनवतात, घरातील मुलगा पिठोरीचे पूजन मांडतो. त्या वेळी हातात लव्याचा (लव्हाळे )कडा आणि आंगठी घातली जाते. केळी आणि काकडीचा प्रसाद दाखवला जातो. धातूच्या ताटाऐवजी केळीच्या पानांचा नैवेद्यासाठी आणि पंगतीसाठी उपयोग करतात. खिरीचा नैवेद्य असतो….. सर्व काही स्वकष्टाचं आणि निसर्गासह भारतीय संस्कृतीला साजेसं. लोकगीते आणि पारंपारीक फेऱ्यांचा नाच करून रात्र जागवतात❗

विशेष करून आगरी कोळी समाजात हा ‘मातृ-दिन’ मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कारण हा समाज पूर्वी ‘मातृसत्ताक’ होता. आईच्या गौरवार्थ अनेक सण आणि उत्सव या समाजात असतात याचे आश्चर्य वाटायला नको. आगऱ्यांच्या प्रत्येक गावी गावदेवीच्या रूपात आईचे मंदिर असते. गावोगावी आईच्या जत्रा मोठ्या उत्साहात होतात❗

रेडिमेड वस्तू भेट देवून साजऱ्या होणाऱ्या ‘मदर्स डे’ पेक्षा आपला पारंपरिक ‘मातृ-दिन’ जास्त अर्थपूर्ण वाटतो. ‘मदर्स डे’ जरूर साजरा करा … पण ‘मातृदिन’ विसरू नका.

“पिठोरी आई ” सर्वांना सुखासमाधानात ठेवो ‼

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आनंदी राहण्याची जादू…” – लेखिका : सौ. सुजाता शेठ (देसाई) ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “आनंदी राहण्याची जादू…” – लेखिका : सौ. सुजाता शेठ (देसाई) ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

हा एक प्रयोग समजा. कोणतंही एक लहानसं काम घ्या.

उदा. एका शर्टाला इस्त्री करणे, कपाटात पुस्तकं नीट लावणे, टिव्ही स्वच्छ पुसणे, सुरेख कांदा चिरणे… अट एकच ते काम तुम्ही मन लावून आपल्याला जितकं चांगलं येतं तितकं चांगल करायचं आहे. बिनचूक… दिसायला सुंदर… !

आता ते काम झाल्यावर आतून जे वाटतं ते अनुभवा, तो असतो आनंद. कधीकधी पहा आपण स्वतःशीच हसतो सुद्धा. आपण थोडं मागे जातो, कामाकडे पहातो आणि आपण खूश होतो. घर आवरल्यावर स्त्रिया घरभर नजर फिरवून तृप्त होतात किंवा आपली कार धुऊन चकचकीत झाल्यावर पुरुष पहात बसतात.. ! लहान मुलं तर काही तयार केल्यावर नाचतातच… !

हे काय आहे ? हा आनंद आतून येणारा… आतल्या चैतन्याला काम आवडल्याचा… !

हा आनंद बेस्ट मोटिवेशन आहे. बाहेर काही शोधायची गरज नाही. मला हा सापडलाय. सुरुवातीला हा आनंद खूप सुक्ष्म असतो; पकडावा लागतो. एकदा दिसू लागला की वाढत जातो आणि आपण अक्षरशः त्यात भिजून जातो. करायचं काय ? तर वरील पध्दतीने काम केल्यावर क्षणभर थांबायचं आणि आत कसं वाटतंय ते पहायचं, अनुभवायचं; मग दुस-या कामाकडे जायचं.

सकाळी उठल्या उठल्या आपण जे पांघरुण घेतलं होतं त्याची सुंदर सुबक घडी करा, आणि शेवटी त्यावर हात फिरवताना काय वाटतं ते पहा. पहिली कमाई झाली, आता दुसरं काम.. तिथल्या तिथे मोबदला तिथल्या तिथे बक्षीस… अशी ही अद्भुत यंत्रणा काम करताना पाहून थक्क व्हायला होईल.

मग हेच सुरु ठेवायचं दिवसभर… थकवा गायब… नैराश्य गायब… उदासिनता, मरगळ पळून जाईल… !

आपण काय करतो, कसंतरी करतो. मग आतून काम कसंतरी झालंय, असा फीडबॅक येतो, त्याने आपण दुःखी होतो. आता पुढचं काम करायला ऊर्जा कमी होते. दिवसभर हे कर्ज वाढत जातं.

उदा. सकाळी चादरीची घडी कशीतरी करुन फेकली तर आपल्याला दंड थोडीच भरावा लागणार आहे ? पण आतमधे कोणीतरी असतं ज्याला हे माहीत आहे की चादरीची घडी कशी करतात; तो नापास करतो. असे आपण स्वतःला नापास करत रहातो. मग माझ्यात आत्मविश्वास नाही, मला नैराश्य आहे… ई. ई. तक्रारी आपण करतो.

यापुढे ‘कसंतरी काम करतोय, त्यामुळे आतलं कर्ज वाढतंय’ हे लक्षात येईल. थोडा वेळ दिला तरी चालेल, पण चांगलं काम करायची सवय लावली तर वेळ वाचेल आणि आनंद मिळेल.

‘भरभर कर… काय खेळत बसलाय… चेंगटपणा नको’ असं आपण ऐकतो. गती वाढवणं म्हणजे काम कसंतरी करणं नाही. काम झाल्यावर मस्त वाटलं पाहिजे. कोणी टाळ्या वाजवणारं नसलं तरी आतून त्या आपल्याला ऐकू आल्या पाहीजेत.

काम उत्कृष्ट करुन ह्या आनंदाचं सायन्स अनुभवून आपण दिवसभर उत्साही राहू शकतो. थकवा निराशा टाळू शकतो. आजच्या काळाचे मनोशारिरीक आजार दूर करु शकतो. थकवा आणि आजार म्हणजे हे साठलेलं कर्ज आहे. आनंदच संपलाय करण्यातला !

हवंय एक लहानसं काम पूर्ण… संपूर्ण… आणि सुंदर… आतला आनंद बाहेर आला पाहिजे असं !

लेखिका : सौ. सुजाता शेठ (देसाई)

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एक नवीन बालकविता…” लेखक : श्री गणेश घुले ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “एक नवीन बालकविता…” लेखक : श्री गणेश घुले ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

बाबा, आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का….. ?

खेळण्यामधली खोटी बस, पेट्रोल टाकून जाळू का.. ?

*

टीव्ही मध्ये बघून शिकलोय, दगड कसा मारायचा.

आम्हालाही कळले आहे, झेंडा कसा धरायचा.

सहल काढा म्हणून आम्ही शाळा बंद करू का.. ?

बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का…. ?

*

घरामध्ये करू खोटी जमावबंदी लागू,

एका खोलीत एकजण रात्रभर जागू,

परीक्षा नको म्हणून उपोषण करू का.. ?

बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का.. ?

*

गुरुजींच्या बदलीची मागणी लावून धरू.

सारे मिळून शाळेला आम्ही दांडी मारू.

परिक्षेतले कमी मार्क वाढवून मागू का.. ?

बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का.. ?

*

घरामध्ये खोटा खोटा कर्फ्यु आपण लावू,

आई अडकेल किचनमध्ये, आपण हॉलमध्ये राहू,

पोलिसांना चुकवत चुकवत, इकडे तिकडे पळू का.. ?

बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का.. ?

*

पुतळ्याला काळे फासू, की खोटी गाय मारू?

आधी खोटी दगडफेक, मग जाळपोळ करू?

मोठ्या माणसासारखे आम्हीसुद्धा वागू का?

बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का.. ?

*

दंगलीनंतर आमच्यावर लागेल कोणता गुन्हा?

की राजकीय दबावाखाली सोडून देतील पुन्हा?

सगळे सोडून साधे सरळ संविधान वाचू का… ???

बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का.. ???

…….. सांगा ना…. ????

कवी: श्री गणेश घुले

औरंगाबाद. मो – 9923807980.

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एक गंमत सांगू तुला ?…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “एक गंमत सांगू तुला ?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

“एक गंमत सांगू तुला. ?”

 

लहानपणी चणे फ़ुटाणे खूप आवडायचे खायला..

पण दहा पैसेही परवडायचे नाहीत खिशाला..

म्हातारपणी रुपयांनी खिसा भरला

पण मोडके दात बघून चणे लागले चिडवायला…

 

एक गंमत सांगू तुला…?

 

लहानपणी वाटायचं,

नविन पुस्तके हवीत वाचायला..

पण चोरुन, लपुन, उसनी मित्रांची पुस्तके घेवून अभ्यास पूर्ण केला..

म्हातारपणी नवीन पुस्तकांचा ढीग येवून पडला

पण तो पर्यंत चष्म्याचा नंबर सोडावाॅटर झाला…

 

एक गंमत सांगू तुला….?

 

लहानपणी रिक्षातून आवडायचे फिरायला

पण सव्वा रुपायासुध्दा नसायचा कनवटीला..

म्हातारपणी ड्रायव्हर म्हणतो गाडी तयार आहे, चला फिरायला 

पण जीना उतरेस्तोवर

पाय लागतात लटपटायला…

 

एक गंमत सांगू तुला….?

 

लहानपणी १०✘१० ची खोली होती रहायला,

दमून भागून आलो की क्षणात लागायचो घोरायला..

म्हातारपणी चार खोल्यांचा मोठा ब्लाॅक घेतला,

पण एकेक खोली आ वासून येते खायला…

 

एक गंमत सांगू तुला……?

 

खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला,

फार फार आनंद झाला पण भिती वाटते मनाला.. !

मृत्युसमयी येईल का तो पाणी द्यायला,

का ई-मेलवरच शोकसंदेश पाठवेल आपल्या आईला.

 

…. म्हणून सांगतो मित्रांनो…… आताच जगणं शिका.

आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगा…

… ज्या क्षणी तुम्ही मरण पावता, त्या क्षणी तुमची ओळख एक ‘बॉडी’ बनुन जाते,

‘बॉडीला’ आणा, बॉडीला झोपवा,

लोक तुमच्या नावाने सुद्धा हाक मारत नाही.

म्हणून आव्हाने स्वीकारा,

 

आवडत्या गोष्टीसाठी खर्च करा,

आवडत्या लोकांना वेळ द्या,

 

पोट दुखेपर्यंत हसा, कोणी बालिश 

म्हणाले तरी चालेल.

 

मनसोक्त नाचा, लग्नात, वरातीत. जिथे मिळेल तिथे नाचा.

अगदी लहान बाळासारख़ं जगा.

कारण,

 

‘मृत्यु’ हा जीवनातला सर्वात मोठा लॉस नाहिये, लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला ‘जिवंतपणा’ मेलेला असतो.

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares