☆ देवाचे लक्ष आहे बरं का… – लेखक – अनामिक☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
एके दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले कि, एक आकर्षक बांद्याची व्यक्ती सस्मित समोर उभी होती. मी म्हटले, बोला! काय काम आहे?
ते म्हणाले, ठीक आहे भाऊ, तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होता म्हणून म्हटले आज भेटूनच घेऊ.
मी म्हटले, “माफ करा मी तुम्हाला ओळखले नाही. “
तेव्हा ते म्हणाले, “बंधू! मी भगवान आहे. तू रोज प्रार्थना करत होतास, म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्या बरोबर राहणार आहे. “
मी चिडत म्हटलं, “ही काय मस्करी आहे? ” “ओह ही मस्करी नाही सत्य आहे. फक्त तूच मला पाहू शकतोस. तुझ्या शिवाय मला कुणीही पाहू किंवा ऐकू शकणार नाही!
काही बोलणार इतक्यात मागून आई आली…
एकटा काय उभा आहेस, इथं काय करतोस? चल आत, चहा तयार आहे आत येऊन चहा पी. आई ला काही तो दिसला नाही.
आईच्या या बोलण्या मुळे आता या आगंतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास होऊ लागला. माझ्या मनात थोडी भीती होती. चहाचा पहिला घोट घेतल्या बरोबर मी रागाने ओरडलो.
अग आई, चहा मध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस? एवढे बोलल्या नंतर मनात विचार आला कि, जर आगंतुक खरोखर भगवान असेल तर त्याला आई वर रागावलेलं आवडणार नाही. मी मनाला शांत केले आणि समजावले कि, अरे बाबा, आज तू नजरेत आहेस. थोडे लक्ष दे…
मी जिथे असेल त्या प्रत्येक ठिकाणी ते माझ्या पुढ्यात आले… थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो, तर ते सुद्धा, माझ्या पुढे…..
मी म्हटले ” प्रभू, इथे तरी एकट्याला जाऊदे. “
आंघोळ करून, तयार होऊन मी देव पूजेला बसलो. पहिल्यांदा मी परमेश्वराची मना पासून प्रार्थना केली. कारण आज मला, माझा प्रामाणिक पणा सिद्ध करायचा होता.
ऑफिसला जाण्यास निघालो. प्रवासात एक फोन आला. फोन उचलणार, इतक्यात आठवले, आज माझ्यावर प्रभू ची नजर आहे, गाडी बाजूला थांबवली. फोन वर बोललो आणि बोलत असताना, म्हणणार होतो की, या कामाचे पैसे लागतील, पण का कोण जाणे, तसे न बोलता म्हटले तू ये! तुझे काम होईल आज”….
ऑफिस मध्ये पोचल्यावर मी माझे काम करत राहिलो. स्टाफ वर रागावलो नाही किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यां बरोबर वादविवाद केला नाही. रोज माझ्या कडून विना कारण अपशब्द बोलले जायचे. पण त्यादिवशी तसे काहीं न बोलता, काही हरकत नाही, ठीक आहे, होऊन जाईल काम, असे म्हणत सहज पणे सर्व कामे केली.
आयुष्यातील हा पहिला दिवस होता. ज्या दिवशी माझया दिनचर्येत राग, लोभ, अभिमान, दृष्टता, अपशब्द, अप्रमाणिकपणा, खोटेपणा कुठे ही नव्हता.
संध्याकाळी ऑफिस मधून निघून घरी जायला निघालो. कार मध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणालो, ” भगवान, सीटबेल्ट बांधा. तुम्ही पण नियमांचे पालन करा. ” प्रभू हसले. माझ्या आणि त्यांच्या चेऱ्यावर समाधान होते.
घरी पोचलो. रात्रीच्या भोजनाची तयारी झाली. मी जेवायला बसलो. प्रभू! प्रथम तुम्ही घास घ्या. मी असे बोलून गेलो. त्यांनीही हसून घास घेतला.
जेवण झाल्यानंतर आई म्हणाली, ” आज पहिल्यांदा तू जेवणाला नावे न ठेवता, काही दोष न काढता जेवलास! काय झाले? आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?
मी म्हटले, “आई, आज माझ्या मनात सूर्योदय झाला आहे. रोज मी फक्त अन्नच खात होतो. आज प्रसाद घेतला. माता आणि प्रसादात कधी काही उणीव नसते! “
थोडा वेळ शतपावली केल्यानंतर, मी माझ्या खोलीत गेलो आणि निश्चिन्त व शांत मनाने उशीवर डोके टेकवले… झोपी जाण्यासाठी… प्रभू नि माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, म्हणाले, ” आज तुला झोप येण्यासाठी, संगीत, किंवा औषध किंवा पुस्तकाची गरज भासणार नाही. ” खरोखर, मला गाढ झोप लागली.
ज्या दिवशी आपणास कळेल की, ‘तो’ पहात आहे, आपल्या हातून सर्व काही चांगले घडेल!
देवाचे लक्ष आहे बरं का….
लेखक : अनामिक
प्रस्तुती – श्री अनिल वामरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “जरूरी आहे आपल्यात बदल करण्याची…” – लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
☆
“ “ लेखक : अनामिक प्रस्तुती : शोभा जोशी
जरूरी आहे, आपल्यात बदल करण्याची!
“आज माझ्या युनिट टेस्टचा रिझल्ट आहे.
क्लासमध्ये बघायला या, नाही तर मी बोलणार नाही! “
… ही गोड धमकी आठवतंच मी माझ्या मुलीच्या दुसरीच्या वर्गात शिरलो.
माझ्या आधीही काही पालक हौसेनं निकाल बघायला आलेले. बाबापेक्षा आईंची संख्या जास्त.
मी बावरतच वर्गात नजर फिरवली. मला पाहताच अनपेक्षित लाभ झाल्यासारखी, मुलगी उठुन आनंदाने मला घेऊन टीचरकडे गेली न् म्हणाली.. “ माय फादर. ” मीही ‘गुडमॉर्निंग’ म्हणालो.
टीचरनी एक कागद दिला व म्हणाल्या, “ हिच्या नावापुढे सही करा. “
मुलीनं रोल नंबरवरुन नांव शोधलं. सही करताना लक्षात आलं की आधीच्या तिन्ही सह्या आईच्या होत्या. मनात विचार आला, ‘खरेच एवढे बिझी आहोत का आपण? ’
विचारातच सही केली. टीचरनी एक्झाम पेपर्स माझ्याकडे दिले न म्हणाल्या, “ बसून बघा सगळे पेपर. ” असं म्हणुन टीचर बाकीच्या पालकांच्या शंका सोडवू लागल्या.
मी तिच्या बेंचवर कसा तरी बसलो. बाजुला माझं बाळ. अगोदर सगळ्या पेपरवरचे मार्क्स पाहिले. ४० पैकी ३५, ३६. कुठे ३२.
– – टीचरजवळ १ मार्क गेला म्हणुन मुलांची काळजी करणा-यांची गर्दी बघुन, माझी मुलगी पहिल्या ५ मध्ये काय, १० मध्येही नसेल याची खात्री झाली. मीही मग चुकलेली प्रश्नोत्तरे बघायला लागलो.
(ह्या तिन्ही कथांना सखोल अर्थ आहे. कथा वाचून आपल्याला नक्कीच हसायला येईल.)
☆ एक – गहन ☆
मी एका लहान मुलाला आईस्क्रीम खाताना बघितलं. त्याची काळजी वाटून मी त्याला सहज बोललो,
‘आज खूप थंडी आहे हे आईस्क्रीम खाऊन तू आजारी पडशील! ‘
तो मुलगा उत्तरला –
‘माझी आजी १०३ वर्षांपर्यंत जिवंत राहिली.’
मी विचारलं,
‘आईस्क्रीम खाल्ल्यामुळे? ‘
तो म्हणाला – ‘ नाही, कारण तिने कधीच दुसऱ्याच्या कामामध्ये नाक खुपसले नाही! ‘
किती खोल अर्थ दडला होता त्या उत्तरात!
आता मला समजलं की मी इतक्या वेगाने का म्हातारा होत चाललोय – – –
– – कारण नसताना मी दुसऱ्याच्या कामात केलेली ढवळाढवळ. दुसरं काय!
**********
☆ दोन – थकलेला ☆
आज-काल जिथे तिथे घोटाळेबाज दिसून येतात. मी नुकताच बातम्यांमध्ये लोकांच्या बँक अकाउंटबद्दल बातम्या पाहात होतो – लोकांच्या खात्यांतून लाखो रुपये बघता बघता नाहीसे झाले होते आणि ते कुठे गेले याचा मागमुसही लागत नव्हता.
ती बातमी पाहून जाम घाबरलेलो मी माझ्या बाईकनं बँकेत गेलो. एटीएम मध्ये माझं कार्ड स्वाईप केलं, माझा पासवर्ड टाकला आणि माझ्या खात्यातली शिल्लक तपासली. माझ्या खात्यात शिल्लक असलेले साडेसातशे रुपये अजूनही माझ्या खात्यातच पडून होते. मी सुटकेचा निश्वास टाकला.
बापरे, माझ्या मनावरचा दड़लेला ताण आता हलका झाला होता. आता यापुढे पुन्हा कधी बातम्या ऐकणार नाही असं मी मनोमन ठरवून टाकलं. नको पुन्हा तो भयंकर तणाव!
एटीएम मधून बाहेर पडलो तेव्हा हे बघून मी मनानं आणखीनच हबकून गेलो.. कारण हे माझे साडेसातशे रुपये अजूनही तसेच माझ्या खात्यात शिल्लक असले तरी माझी मी नुकतीच पार्क केलेली बाईक मात्र आता जागेवर नव्हती.
**********
☆ तीन – थांबा ☆
एक तरुणी ट्रेनमध्ये चढली आणि आपल्या सीटवर दुसराच कोणी माणूस बसल्याचं तिनं पाहिलं. विनम्रतेने आपलं तिकीट तपासून बघितलं आणि ती म्हणाली, ‘ सर, मला वाटतंय आपण चुकून माझ्या सीटवर बसला आहात. ’
त्या माणसानं आपलं तिकीट काढलं आणि तिला ते दाखवत तो तिला रागाने ओरडून म्हणाला, ‘ हे तिकीट जरा नीट बघ. ही माझीच सीट आहे. तू आंधळी आहेस का गं? ’
त्या तरुणीने बारकाईने ते तिकीट तपासलं आणि तिने त्या माणसाशी वाद करणं थांबवलं. ती काही न बोलता त्या सीटपाशी उभी राहिली.
ट्रेन सुरू झाल्यावर काही वेळानं ती तरुणी खाली वाकून त्या माणसाला म्हणाली,
‘सर, तुम्ही चुकीच्या सीटवर नाही बसलात.. परंतु तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आहात. ही ट्रेन मुंबईला जातेय आणि तुमचं तिकीट आहे अहमदाबादचं.. ‘
तात्पर्य…
मनावर संयम असावा. आपण बोलण्यापूर्वी किंवा कृती करण्यापूर्वी विचार केला पाहिजे.
अन्यथा आपल्याला पश्चात्ताप करावा लागू शकतो.
फक्त ओरडण्याने जर सगळेच प्रश्न सुटले असते तर कदाचित या जगावर गाढवांनीच राज्य केलं असतं.
😂😂😂
☆
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ थोडा अंधार हवा आहे… – लेखक – अनामिक☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
हल्ली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो म्हणजे कधी अंधारच होत नाही. सगळीकडे इन्व्हर्टर असतात आणि अगदीच नसले तरी लोकं दुसऱ्या सेकंदाला मोबाईलचा लाईट लावतात आणि अंधार घालवतात. त्यामुळे दुसऱ्या क्षणी तुम्हाला तुमच्या पुढचं, आजूबाजूचं दिसू लागतं. पण तिथेच खरा प्रॉब्लेम आहे.
मला आठवतं आहे, आमच्या लहानपणी इन्व्हर्टर, मोबाईल नव्हते. मेणबत्त्या, कंदील हे ऑपशन्स होते. पण कधी रात्री लाईट गेले तर दुसऱ्या सेकंदाला आजीचा आवाज यायचा. “कोणीही जागचे हलू नका. आहे त्या जागेवर बसून आपापले डोळे २ मिनिटे घट्ट बंद करा आणि आम्ही डोळे घट्ट मिटायचो. मग २ मिनिटांनी आजीचा आवाज यायचा.. आता हळूहळू डोळे उघडा आणि आपोआप अंधारात दिसू लागेल. आणि खरंच आता थोडं दिसू लागलं असायचं. मला अजूनही याचं अप्रूप आहे. मुळात अंधारात असताना डोळे का मिटायचे, त्याने काय होणार पण डोळे मिटून उघडले की दिसू लागायचं हे खरं. मला वाटतं की जुन्या पिढीला हीच सवय होती कि अंधारात असलो की अजून घट्ट डोळे मिटून आत डोकावायचे. स्वतःचे डोह धुंडाळायचे. आपल्या जाणिवा, नेणिवाचे झरे मोकळे करायचे आणि मग वाटा स्पष्ट होत असाव्यात / दिसत असाव्यात. आणि आपणच शोधलेली आपली वाट असेल तर मग ती सुकर होते, त्याचं ओझं होत नाही आणि त्या वाटेवरचा प्रवास समाधान देणारा असतो.
माझ्या आजोबांचा पण लाईट गेले की एक आवडता डायलॉग होता. “अंधारात रस्ता दिसतो आणि उजेडात फक्त खड्डे दिसतात.. दिवे येई पर्यंत तुमचे रस्ते शोधा”.. लहानपणी मला हा विनोद वाटायचा पण हल्ली आजोबा आठवतात, त्यांचं वाक्य आठवतं आणि आता कुठे त्याचा अर्थ ६० वर्षांनी थोडाफार कळतो. स्वतःच्या तरुणपणी परिस्थितीच्या अंधारात त्यांनी कष्ट सोसले, वार लावून जेवले, शिकले, नोकरी केली, आपला रस्ता शोधला. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांना इंजिनिअर केलं, त्याची फळं आम्ही उपभोगतोय. कधी नव्हे तर परवा खूप वेळ लाईट गेले, इन्व्हर्टर बंद पडला तर किती चिडचिड. डेटाचा स्पीड थोडा कमी झाला आणि लॅग आला तर त्रागा. पिझ्झा अर्ध्यातासात डिलिव्हर नाही झाला तर फ्री ची मागणी. उजेडात फक्त खड्डे दिसतात हेच खरं.
पण हल्ली अंधारच होत नाही. मुळात अंधारच माहित नाही. आजूबाजूला सारखा लाईट असतो पण तो एनलायटन करू शकत नाही आणि डोळेच कघी न मिटल्यामुळे आत डोकावायची वेळच येत नाही. इन्व्हर्टर / मोबाईल च्या लाईट ने आजूबाजूचं दिसतं आणि फक्त आजूबाजूचं दिसलं तर फक्त स्पर्धा वाढते, पण वाट काही सापडत नाही. वाट सापडायची असेल तर आत डोकावता आलं पाहिजे. आपापले डोह धुंडाळता आले पाहिजेत. अंधारात तळाशी पोहोचणं सोपं होतं असावं. म्हणून अधून मधून थोडा मिट्ट अंधार हवा आहे.
लेखक : अनामिक
प्रस्तुती – श्री अनिल वामरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ वागणुकीची इस्त्री ! – लेखक : श्री सचिन मेंडिस ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
कधी कधी अगदी छोट्याशा चुका फार मोठं काही शिकवून जातात. मागच्या आठवड्यातील किस्सा घ्या. नवा कोरा, रेशमी कुर्ता इस्त्री करायला घेतला. मनात उत्सुकता होती, एकदम टापटीप दिसायला हवा. पण लक्षात आलं नाही की इस्त्री सुती कपड्यांसाठी तापवलेली होती. अतिशय उच्च तापमानावर. सरळ गरम इस्त्री कुर्त्याच्या छातीवर टेकवली आणि क्षणात… एक भला मोठा काळा डाग उमटला. थोडं सावरायच्या आतच एक अनपेक्षित, अक्राळ विक्राळ भगदाड. इस्त्रीची सेटिंग न पाहता सुती कपड्याचं उच्च तापमान रेशमी कपड्यावर लादण्याचा बेफिकीरपणा मला चांगलाच नडला होता.
ते भगदाड पाहून खूप वाईट वाटलं. पण त्या क्षणात एक वेगळाच विचार मनात चमकून गेला. आपण नात्यांमध्येही हेच करत नाही का? प्रत्येक माणूस वेगळ्या फॅब्रिकचा असतो. कुणी डेनिम, सहजपणे सगळं सोसून घेणारं. कुणी लिनन थोडं टोकदार पण व्यवस्थित सांभाळलं तर शिस्तीत बसणारं. आणि काही माणसं रेशमासारखी अतिशय नाजूक, हलकसं गरम तापमानही न झेलता येणारी.
पण आपण काय करतो? सगळ्यांना एकाच वागणुकीने हाताळायला जातो. आपल्या स्वभावाच्या तापमानात कुणी सहज बसतं, कुणी त्यात व्यवहार म्हणून सांभाळून घेतं, आणि काहीजण आपली रेशमी नाती सोडून कायमचे निघून जातात. आपण बोलतो, वागतो विचार न करता. आपल्या शब्दांची उष्णता समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या वस्त्रांना झेलता येईल का, याचा विचार करत नाही आणि मग जळालेले डाग पाहून आपल्यालाच वाईट वाटतं. खरं तर आपल्या स्वभावाच्या तापमानावर माणसं मोजायची नसतात, त्यांना त्यांच्या धाग्यांच्या ताकदीने समजून घ्यायचं असतं. प्रत्येक माणूस वेगळ्या फॅब्रिकचा असतो. त्याला समजून घेतलं तर नातं टिकतं, नाहीतर फक्त जळालेले ठसे उरतात.
काही नाती गरम इस्त्रीनेच नीट बसतात. थोडं स्पष्ट बोलावं लागतं, काही वेळा थोडं तापूनही घ्यावं लागतं. पण काही नाती मात्र फक्त गारवा ओळखतात. त्यांना उष्ण स्पर्श झेलताच येत नाही. बोलण्याच्या उष्णतेने जर नातं जळत असेल, तर समजून घ्या की तुम्ही योग्य तापमान ठरवलेलं नाही. आपण जर आपल्या संवेदनशीलतेचे तापमान व्यक्तीनुसार हाताळले, तर नाती सहज टिकतील, सुरकुत्या विरहित होतील आणि कुठेही न जळता सुंदर दिसतील.
पुढच्या वेळी इस्त्री हातात घेतली किंवा कुणासोबत संवाद साधला तेव्हा स्वतःला एकदा विचारून बघा, ही व्यक्ती सुती आहे की रेशमी? आणि त्यानुसार आपल्या वागणुकीचं तापमान ठरवा. सगळ्या नात्यांना सारखं तापमान लागू केलं की काही सुरकुत्याही नाहीशा होतात आणि काही नातीसुद्धा. जळलेला रेशमी कुर्ता एकवेळ शिवता येईल पण जळलेलं नातं पुन्हा विणता येईलचं असं नाही.
आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी काही ऋणानुबंध असतात.
निरपेक्ष प्रेमाने जवळ येणारी माणसं ओळखता आली पाहिजेत. कारण परमेश्र्वराने आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळावी म्हणून ती योजना केलेली असते पण आपण वारंवार त्यांना नाकारलं तर ते पुन्हा कधीही आपल्या जवळ येणार नाहीत. कारण सुसंधी वारंवार मिळत नाही.
लेखक – श्री सचिन मेंडीस
प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मी देव पहिला” – लेखक : अज्ञात☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
एका भयाण रात्री मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण पंधरा वर्षाचा एक मुलगा अभ्यास करताना पाहिला.
थंडीचे दिवस होते. कुडकुडत होता पण वाचनात मग्न होता.
हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ.
दिवसा कधी दिसत नसायचा.
खुप जिज्ञासा होती त्या मुलां बद्दल जाणण्याची.
एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो.
मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्या साठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊ.
रात्रीचे साडेबारा वाजले असतील.
मी त्या मंदिराकडे आलो.
तर तो मुलगा नेहमी प्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करत दिसला.
मी गाडी थांबवली. त्याच्या जवळ गेलो.
मला बघून तो गालातल्या गालात हसला.
जणू माझी त्याची जुनी ओळख असावी.
मी म्हणालो बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस?
सर माझ्या घरात लाईट नाही.
माझी आई आजारी असते.
दिव्यात रॉकेल घालून अभ्यास करायला. माझी ऐपत नाही.
बाळ तू मला बघून का गोड हसलास ?
सर तुम्ही देव आहात !
नाही रे!
सर तुम्ही माझ्या साठी देवच आहात.
ते जाऊदे तू जेवलास का?
मी तुझ्यासाठी खाऊचं पार्सल आणलं आहे.
सर म्हणूनच मी हसलो.
मला माहित होतं.
तो (देव) कोणत्याही रूपात येइल पण मला भुकेलेला नाही ठेवणार.
मी जेंव्हा जेंव्हा भुकेलेला असतो, तो काहींना काही मला देतोच.
कधी नवसाचे पेढे तर कधी फळ तो मला देऊन जातो.
आज मी भुकेलेला होतो पण निश्चिंत होतो.
मला माहित होतं…. तो काहीतरी कारण करून मला भेटायला येणार आणि तुम्ही आलात.
तुम्ही देव आहात ना !
मी निःशब्द झालो, नकळत माझ्या कडून पुण्याचं काम घडलं होतं.
रोज कर्जाच्या ओझ्याखाली दबताना देवाला कोसत होतो. त्याने आज मला देवाची उपाधी देऊन लाजवलं होतं.
त्याने तो अर्धवट खाऊ खाल्ला आणि म्हणाला, सर तुम्ही इथेच थांबा. मी अर्धं माझ्या आईला देऊन येतो.
माझे डोळे तरळले.
त्याला काही विचारण्या अगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं.
तो पाच मिनिटांनी परत आला.
त्याच्या ओंजळीत पारिजातकाची फुलं होती.
सर,
माझी आई सांगते, ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळभर फुलं तरी वहावीत.
क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं, तर तेही मला त्या मुलाच्या गोड हसण्यासारखं वाटलं.
नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं.
शाळा, कॉलेज, मंदिर बंद झाले.
देवळं ओस पडली. देवळांना कुलूप ठोकली आणि रस्त्यावर शुकशुकाट झाला.
असच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या देवळाकडे डोकावलं.
रात्रीची वेळ होती.
देवळाची पायरीवरील लाईट बंद होती आणि तो मुलगा कुठेच दिसला नाही.
वाईट वाटलं मला.
या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा ?
काय खात असेल ?
कसा जगत असेल ?
असे ना ना प्रश्न आ वासून उभे राहिले.
कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी प्राण गमावले.
असाच आमचा एक मित्र पॉजिटीव्ह होऊन दगावला.
मी त्याच्या अंत्य संस्काराला स्मशानात गेलो होतो. अंत्यसत्कार झाले.
सर्व आपल्या घरी निघाले.
निघताना हात पाय धुवावे म्हणून शंकराच्या मंदिरा शेजारील नळावर गेलो.
पाहतो तर तो मुलगा नळावर स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे धुऊन त्या स्मशानाच्या भिंतीवर वाळत टाकत होता.
मला बघून त्याने आवाज दिला,
सर….
अरे तू इथे काय करतोस ?
सर आता मी इथेच राहतो.
आम्ही घर बदललं.
भाडं भरायला पैसे नव्हते.
त्यातच लॉकडाऊन मध्ये शिव मंदिर बंद झालं आणि पायरी वरची लाईटही बंद झाली.
मग मला घेऊन आई इथे आली.
काही झालं तरी शिक्षण थांबता कामा नये असं तिनं सांगितलं आहे.
त्या शिव मंदिराचे दरवाजे बंद झाले पण ह्या शव मंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाहीत.
तिथे जीवंत माणसं यायची आणि इथे मेलेली.
ह्या लाईट खाली माझा अभ्यास चालू असतो.
सर मी हार नाही मानली.
आई सांगायची……..
ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार.
बरं… तुझी आई कुठे आहे ?
सर ती कोरोनाच्या आजारात गेली.
तीन दिवस ताप खोकला होता.
नंतर दम अडकला.
मी कुठे गेलो नाही.
इथे पडलेल्या तुटक्या, अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी दिला.
१४ दिवस इथंच ह्या खोपीत होम क्वाँरनटाईन राहिलो.
सरकारी कायदा मोडू नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो, असं ती सांगायची.
आईच्या अस्थी समोरच्या नदीत विसर्जित केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना जेऊ घातलं आणि आईच क्रियाकर्म आटपलं.
सर तरी मी हरलेलो नाही पण दुःख एव्हढच आहे की मी पास झालेलो पहायला आई ह्या जगात नाही.
ती जिथे ज्या जगात असेल तिथे खुप खुश असेल हे माझं यश बघून.
कालच माझा रिजल्ट लागला आणि मी शाळेत पहिला आलोय.
आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहेत पण आता तर खरी अडचण उभी राहिलीय.
ऑनलाईन अभ्यास करायला माझ्या जवळ मोबाईल सुद्धा नाही.
असो
सर,
तुम्ही का वाईट वाटून घेता ?
तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला ?
सर,
तुम्ही कुठे जाऊ नकात, इथेच थांबा.
त्याने छोट्याशा डब्यातून साखर आणली होती.
चिमूटभर माझ्या हातावर ठेवली.
सर तोंड गोड करा.
तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या तोंडावर त्या नळाचं पाणी मारून भानावर आलो.
भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतले.
सर,
मला माहीत होते, देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदात माझी पाठ थोपटायला नक्की येणार.
त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या खिशातला माझा नवा मोबाईल त्या मुलाच्या हातावर टेकवला आणि त्याची पाठ थोपटून निमूटपणे बाय करून स्मशानाबाहेर चालू लागलो.
आता दर महिन्याला मी त्याचा मोबाईल रिचार्ज करतो…
न सांगता.
खरा देव तर कधीच नाही दिसला पण,
मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला…
मी देव पाहिला…
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
(हे कोणी लिहिलं आहे हे माहीत नाही पण हे वाचल्यानंतर माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं. म्हणून मी शेअर करतोय… कारण मलाही कळले माणसातच देव आहे.)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈