मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “छापा की काटा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “छापा की काटा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

दोघांचीही निवृत्ती झाली होती,साठी कधीच ओलांडली होती.

अजूनही परिस्थिती ठीक होती,हातात हात घालून ती चालत होती.तो राजा ती राणी होती.जीवनगाणे गात होती,झुल्यावर- ती झुलत होती,कृतार्थआयुष्य जगत होती.

अचानक त्याची तब्बेत बिघडते,मग मात्र पंचायत होते.तिची खूपच धावपळ होते,पण कशीबशी ती पार पडते.

आता तो सावध होतो,लगेच इन्शुरन्स कंपनी गाठतो,वारसाची पुन्हा खात्री करतो,मृत्यूपत्राची तयारी करतो.

दुसर्‍या दिवशी बँकेत जातो,पासबुक तिच्या हातात ठेवतो, डेबीट कार्ड मशीनमध्ये घालतो,तिलाच पैसे काढायला लाव तो,पुन्हा तिला सोबत घेतो,वीज-पाण्याच्या ऑफिसात जातो, तिलाच रांगेत उभं करतो,बिल भरायचं समजाऊन सांगतो,

अचानक तिला सरप्राईज देतो,टचस्क्रीन मोबाईल हाती ठेव- तो,वाय-फाय नेटची गंमत सांगतो,ऑन लाईन बॅकींग समजा- ऊन देतो,तिलाच सर्व व्यवहार करायला लावतो,नवा सोबती जोडून देतो.

बाहेरच्या जगात ती वावरू लागते,प्रत्येक व्यवहार पाहू लागते, कॉन्फीडन्स तिचा वाढू लागतो.

निश्चिंत होत तो हळूच हसतो,बदल त्याच्यातला ती पहात असते,मनातलं त्याच्या ओळखतं असते,थोडं थोडं समजतं असते,काळजी त्याचीच करत राहते.

एक दिवस वेगळेचं घडते,ती थोडी गंमत करते आजारपणाचा बहाणा करते,अंथरूणाला खिळून राहते,भल्या पहाटे ती चहा मागते,

अन् किचनमध्ये धांदल उडते…चहात साखर कमी पडते, तरीही त्याचे ती कौतुक करते,नाष्ट्यासाठी उपमा होतो,पण हळदीच्या रंगात खूपच रंगतो,

दिवसामागून दिवस जातो,अन् किचनमधला तो मास्टर होतो.

कोणीतरी आधी जाणार असतं,कोणीतरी मागं रहाणार असतं…

पण मागच्याचं आता अडणार नसतं,अन् काळजीचं कारण उरणार नसतं,सह-जीवनाचं नाणं उडत असतं,जमीनीवर ते पडणार असतं,आधी काटा बसतो की छापा दिसतो,

प्रश्न एकच छळत असतो…

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फुलला बहावा…” ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “फुलला बहावा…” ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

सोनसळी लेऊन अंगावरती 

भरजरी शेला सोनेरी

काटक तनु तव झाकून घेसी,    

कुसुमे गुंफून सोनेरी

*

बहार म्हणावा की बहर म्हणावा      

रंग तव तनुचा झळकतो वर्ण सोनेरी

वसुधेची ही ऐश्वर्य संपदा, 

लोंगर लोंबती सुवर्ण रंगी सोनेरी…

(कवी अज्ञात) 

किंवा… 

सुवर्णाची फुले

सुवर्णाचे  मोती

मधे मधे पाचू

श्रीमंती ही किती?

*

मोजदाद  याची

करावी कशाने?

घ्यावे नेत्रसुख 

आनंदी मनाने

(कवयित्री नीलांबरी शिर्के) 

…. असा हा नजर खिळवून ठेवणारा …. ज्याचे वर्णन करण्यासाठी शब्दांनाही जणू बहर यावा असा बहावा … बहावा फुलला की ६० दिवसांनी पाऊस पडतो. याला पावसाचा ” नेचर इंडीकेटर ” असेही म्हणतात, या वर्षी हा लवकर फुलला आहे. आता साधारण 28 मे नंतर पाऊस पडेल. या झाडाला ‘ शॉवर ऑफ फॉरेस्ट ‘ असेही म्हणतात. आणि या वृक्षाचा अंदाज अचूक असतो …..  

कवयित्री इंदिरा संत यांनीही या देखण्या बहाव्याचं किती सुंदर आणि बोलकं चित्ररूप वर्णन केलंय बघा — …      

नकळत येती ओठावरती 

तुला पाहता शब्द वाहवा, 

सोनवर्खिले झुंबर लेऊन 

दिमाखात हा उभा बहावा।।

*

लोलक इवले धम्मक पिवळे 

दवबिंदूतुन बघ लुकलुकती, 

हिरवी पर्णे जणू कोंदणे 

साज पाचुचा तया चढवती ॥

*

कधी दिसे नववधू बावरी 

हळद माखली तनु सावरते 

झुळुकीसंगे दल थरथरता 

डूल कानिचे जणू हालते ।।

*

युवतीच्या कमनीय कटीवर 

झोके घेई रम्य मेखला, 

की धरणीवर नक्षत्रांचा 

गंधर्वांनी झुला बांधला॥

*

पीतांबर नेसुनी युगंधर 

जणू झळकला या भूलोकी, 

पुन्हा एकदा पार्थासाठी 

गीताई तो सांगे श्लोकी ।।

*

ज्या ज्या वेळी अवघड होई 

ग्रीष्माचा तुज दाह सहाया, 

त्या त्या वेळी अवतरेन मी 

बहावा रुपे तुज सुखवाया ॥

(कवयित्री :  इंदिरा संत) 

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आपला कायम पत्ता काय आहे…???” – लेखक : श्री नंदकिशोर मुळे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “आपला कायम पत्ता काय आहे…???” – लेखक : श्री नंदकिशोर मुळे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

मा. श्रीमती निर्मला सीतारामन यांचे विचारात पाडणारे प्रगल्भ चिंतन !

तिरुचिरापल्ली येथील आमच्या संयुक्त कुटुंबाच्या घरात आम्ही 5 ते 95 वर्षे वयोगटातील 14 जणं राहत होतो. सर्व मुले, नातवंडे, आजी-आजोबा जे कुणी होते ते त्यात अगदी आनंदाने आणि ‘समाधानाने राहिले, जगले …!’ पण आज, मी दोन्ही वडिलोपार्जित घरे सोडली आहेत.  ज्या बागेची माझी आई तासनतास निगा राखत़ होती, काळजी घेत होती तीचा आता पालापाचोळ्याने ताबा घेतला आहे. जांभुळ, शेवगा, काही कडुनिंब आणि पिंपळ मात्र अजून टिकून आहेत. परंतु हे ही खरं की सर्व सौंदर्य क्षणिक असतं. दुर्लक्ष झालेल्या गोष्टींवर नियमांचे नियंत्रण कसे राहणार ! दुर्लक्ष किती शक्तिशाली असतं हे आता लक्षात येते. असंख्य रंगांची मनमोहक फुलं होती … ती ही गेली.  माझी आई खारूताई, मोरांना रोज दाणे घालायची, त्या पक्षांच्या कुटुंबाचे काय झाले असेल याची मला हुरहूर वाटत असते.  बुलबुल, चिमण्या, पोपट, अन्य पक्षी, कोकिळा यांनी किलबिल चालू असे. माकडांची एखादी टोळी, जे कधीतरी महिन्यातून एकदा या ठिकाणी येऊन नासधूस करीत असत.

“माणसे निघून गेली की घर घर राहत नाही”.

सुरुवातीला मला विकावेसे वाटले नाही आणि आता जावेसे वाटत नाही. 

कालौघात तेथे राहणाऱ्या चौदापैकी दहा जण जग सोडून निघून गेली.

मी आमच्या आजूबाजूच्या परिसरात फिरले आणि एकेकाळी आयुष्याने भरलेल्या अनेक घरांची अशीच अवस्था झालेली मी पाहिली. काही जागा आता आईवडीलांना सोडून रहाणाऱ्या मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या अपार्टमेंट्सने घेतली आहे.

ओऽहो ! सारं कसं शांत शांत! सर्व काव काव संपली की!!

आपण घरे बांधण्यासाठी किती आटापिटा करतो, ताणतणावात जगतो, नाही?  खरं तर आमच्या मुलांना याची गरज असते का? किंवा त्याहूनही वाईट म्हणजे त्यासाठीची आपली मरमर !

पर्मेश्वरानी दिलेलं आयुष्य तसं पाहता एक भाडेतत्त्वावर मिळालेली संधी असते.  त्याला कुठल्याही वाटाघाटीच्या सीमा नसतात पण त्यावरही ताबा मिळवण्यासाठी आपण बॅंक हप्त्यांच्या ओझ्याखाली विवेकशुन्य जीवन जगत असतो.

एक दिवस, आपण प्रेमाने बांधलेले हे सर्व काही एकतर संपलेल असेल, भांडणात अडकलेलं असेल किंवा विकलं जाईल.

प्रत्येक वेळी मी ‘कायमचा पत्ता’ विचारणारा फॉर्म भरते तेव्हा मला आपल्या मानवी मूर्खपणाचेच हसू येतं.

झेनची एक कथा आहे की एक वृद्ध भिक्षू एका राजाच्या राजवाड्यापाशी गेला आणि त्याने रक्षकाला सांगितले की या अतिथी गृहात मला एक रात्र घालवायची आहे.” “तुला हा राजवाडा आहे हे दिसत नाही का?” रक्षक चिडून म्हणाला.  साधू म्हणाला, “मी दहा वर्षांपूर्वी इथे आलो होतो तेव्हा येथेच थांबलो होतो, तेव्हा येथे दुसरा कुणीतरी राजा होता. काही वर्षांनी, त्याची गादी कोणीतरी घेतली नंतर कोणीतरी. जिथे रहिवासी सतत बदलत राहतात ते एक अतिथीगृहच असतं.”

जॉर्ज कार्लिन म्हणतात “घर ही केवळ अशी एक जागा आहे जिथे तुम्ही बाहेर जाऊन खूप काही मिळवता अन् मिळवलेल्या सगळ्या गोष्टी येथे साठवत असता!”

जसजशी घरं मोठी होत जातात तसतशी कुटुंबं लहान होत जातात.  जेव्हा घरात सगळे असतात, तेव्हा आपल्याला एकांत हवा असतो आणि जेव्हा घर रिकामं पडतं, तेव्हा आपल्याला सगळ्यांचा सहवास हवा असतो!

आपल्या स्वप्नातलं घर बांधण्यासाठी जगणं सोडून देणाऱ्या व शेवटी, कायमस्वरूपी निवासस्थान म्हणून मानलेल्या अतिथिगृहातून निघून जाणाऱ्या माणसांवर पशू, पक्षी आणि प्राणी नक्कीच हसत असतील!

विवेकशुन्य मानवी इच्छा, अन् काय !!

स्वैर अनुवाद :  श्री नंदकिशोर मुळे

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कानाचे आत्मवृत्त… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ कानाचे आत्मवृत्त लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

मी आहे कान !

खरं म्हणजे ‘आम्ही आहोत ‘ कान !

कारण आम्ही दोन आहोत !

आम्ही जुळे भाऊ आहोत.

पण आमचं नशीबच असं आहे की आजपर्यंत आम्ही एकमेकांना पाहिलेलंही नाही.

कुठल्या शापामुळे आम्हांला असं विरुद्ध दिशांना चिकटवून पाठवून दिलंय काही समजत नाही.

दुःख एवढंच नाही,

आमच्यावर जबाबदारी ही फक्त ‘ऐकण्याची’ सोपविली गेल्ये.

शिव्या असोत की ओव्या,

चांगलं असो की वाईट,

सगळं आम्ही ऐकतच असतो.

हळूहळू आम्हांला ‘खुंटी’ सारखं वागविलं जाऊ लागलं.

चष्मा सांभाळायचं काम आम्हांला दिलं गेलं.

फ्रेमची काडी जोखडासारखी आम्हांवर ठेवली गेली.

(खरं म्हणजे चष्मा हा तर डोळ्यांशी संबंधित आहे.

आम्हाला मध्ये आणण्याचा प्रश्नच नव्हता.)

लहान मुले अभ्यास करीत नाहीत किंवा त्यांच्या डोक्यात काही शिरत नाही तेव्हा मास्तर पिरगळतात मात्र आम्हांला !

भिकबाळी, झुमके, डूल, कुडी हे सर्व आमच्यावरच लटकविलं जातं.

त्यासाठी छिद्र ‘आमच्यावर’ पाडावी लागतात, पण कौतुक होतं चेह-याचं!

आणि सौंदर्य प्रसाधने पहाल तर आमच्या वाट्याला काहीच नाही.

डोळ्यांसाठी काजळ, चेह-यासाठी क्रीम, ओठांसाठी लिपस्टिक!

पण आम्ही कधी काही मागीतलंय?

हे कवी लोक सुद्धा तारीफ करतात ती डोळ्यांची, ओठांची, गालांची!

पण कधी कुठल्या साहित्यिकाने प्रेयसीच्या कानांची तारीफ केलेली ऐकल्ये?

कधी काळी केश कर्तन करताना आम्हाला जखमही होते. त्यावेळी केवळ डेटॅालचे दोन थेंब टाकून आमच्या वेदना अजून तीव्र केल्या जातात.

किती गोष्टी सांगायच्या? पण दुःख कुणाला तरी सांगीतले तर कमी होते असे म्हणतात.

भटजींचे जानवे सांभाळणे, टेलरची पेन्सील सांभाळणे, मोबाईलचा ईअरफोन सांभाळणे ह्या मध्ये आता ‘मास्क’ नावाच्या एका नवीन गोष्टीची भर पडली आहे.

आणा, अजून काही नवीन असेल आणा टांगायला. आम्ही आहोतच खुंटीसारखे सर्व भार सांभाळायला !

पण तुम्ही हे आमचं आत्मवृत्त ऐकून हसलात ना? असेच हसत राहा. ते हास्य ऐकून आम्हांलाही बरं वाटलं.

हसते रहा, निरोगी  रहा ! …

टवकारलेत ना कान !

लेखक : अज्ञात

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुरणपोळी एक… वृत्तं अनेक… – सौजन्य :  श्री आनंदराव जोशी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ पुरणपोळी एक… वृत्तं अनेक… – सौजन्य :  श्री आनंदराव जोशी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एखाद्याचा “पुरणपोळी” या विषयावर किती अभ्यास असावा, त्याला “पुरण” किती आवडत असावं, त्याचा उत्तम नमुना . पुणे तेथे काय उणे  !

इंद्रवज्रा:

चाहूल येता मनि श्रावणाची

होळी तथा आणखि वा सणाची

पोळीस लाटा पुरणा भरोनी

वाढा समस्ता अति आग्रहानी ||

भुजंगप्रयात:

सवे घेउनी डाळ गूळा समाने

शिजो घालिती दोनही त्या क्रमाने

धरी जातिकोशा वरी घासुनीते

सुगंधा करावे झणी आसमंते || 

(जातिकोश – जायफळ)

वसंततिलका 

घोटा असे पुरण ते अति आदराने

घ्यावे पिळूनि अवघे मऊ कापडाने

पिळता फुटे गठुळ ते मऊसूत होते

पोळीमधे पसरते सगळीकडे ते ||

मालिनी 

अतिव मधुर ऐसे पुरण घ्यावे कराते

हळू हळू वळू गोळे पारिला सारणाते

कणिक मळूनी घ्यावी सैलशी गोजिरी ती

कडक नच करावी राहुद्या तैलवंती

मंदाक्रांता:

घ्यावी पारी करतळ स्थळी अल्प लावोन पीठी

ठेवा गोळी अतिव कुतुके सारणाची मधे ती

बांधा चंबू दुमडुनि करे सारणा कैद ठेवा

पाटा ठायी पसरूनि पिठा लाटण्या सिद्ध ठेवा ||

पृथ्वी

करे धरुन चेंडुला अधिक दाब द्यावा बळे

पटा धरुन लाटण्या सुकर होतसे आगळे

समान फिरवा रुळा पसरि चर्पटी सुस्थळे

असे न करता पहा पुरण बाहरी ओघळे ||

शार्दूल विक्रिडित:

हाताने उचला झणि प्रतल ते गुंडाळुनी लाटण्या

उत्कालू हलके तसे उलटता खर्पूस ही भाजण्या

वाफा येत जशा उमाळत सवे सूवासही दर्वळे

नाका गंध मिळे सवेच उदरी क्षूधा त्वरे उत्फळे…!!

सौजन्य :  श्री आनंदराव जोशी

(एक अस्सल पूर्वाश्रमी सदाशिव पेठी आणि आजीव पुरणपोळीचे उपभोक्ते ! )

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कुटुंब प्रमुखाला का जपायचं?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “कुटुंब प्रमुखाला का जपायचं?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

गावातलं एक शेतकरी कुटुंब.

आई, वडील व तीन मुलं, त्यांच्या बायका असं एकत्र कुटुंब.वडील शिस्तबद्ध, कष्टाळू, प्रामाणिक आणि मेहनती. एकट्याच्या बळावर त्यांनी आपलं घर पुढं आणलेलं. मुलंही चांगली निघाली.नंतर आलेल्या सुनाही त्याप्रमाणे एकजिनसी राहू लागल्या.

मात्र घरातली  कोणती कामं कुणी करायची,यावर गोंधळ होऊ लागला आणि कामं खोळंबू लागली. एकीला वाटायचं की,’ हे काम मी का करू? धाकटीने करावं.’ असं इतर दोघीनाही वाटायचं अन् त्यामुळे गुंता वाढत गेला.

वडिलांनी (म्हणजे सासऱ्यांनी) हे सगळं पाहिलं अन् एके दिवशी तिन्ही सुनांना बैठकीत बोलावून घेतलं. स्वतःच्या बायकोलाही हाक मारली आणि त्या चौघीत कामाबद्दल त्यांनी चक्क वाटणीच करून दिली.

ते म्हणाले, “सर्वांत लहान सून… हौशी आहे, नव्या काळातली आहे. आहार विहार कसा असावा, हे शिकलेली आहे. तर आजपासून घरचा सर्वांचा स्वयंपाक तिनं पाहायचा. बाकी दिवसभर मग तिनं वाटलं, तर इतरांना मदत करावी, मात्र त्याची सक्ती नाही. बाकी वेळ ती आरामदेखील करू शकते.

मधली सून…. नीटनेटकी आहे. टापटीप आहे. तर आजपासून तिनं घरची धुणीभांडी पाहायची.बाकी काही नाही केलं तरी चालेल.

थोरली सून…. जुन्या काळातली आहे.कष्टाळू आहे. शेतीभातीचे ज्ञान आहे.परंपरा रीतिरिवाज माहीत आहेत.तर आजपासून तिनं फक्त शेताकडं पहायचं.बाकी तिन्ही मुलं शेतात असतातच. त्यांना हातभार लावायचा. घरची बाकी कामं नाही केली तरी चालेल.

यावर मग सासू बोलली, “सगळ्यांना कामं सांगितलीत. मलाही काही काम सांगा की,मी काय करू ते.”

सासरा म्हणाला, “खूप वर्षं तू माझ्या बरोबरीनं कष्ट केले आहेस.त्यामुळं तुझ्यावर आता कामाचं ओझं टाकावं असं वाटत नाही.आराम कर, सुख घे.”

तर सासू म्हणाली, “तसं नको.नुसतं बसून आजारी पडेल मी ! काहीतरी काम सांगाच.”

सासरा म्हणाला, “बरं,मग एक काम कर.आजपासून घराची मुकादम तू. सगळीकडं लक्ष ठेवायचं.पै पाव्हणे पाहायचे आणि या तिन्ही सुना जिथं कुठं कमी पडतील, तिथं तू त्यांना पाठबळ द्यायचं.”

कामाची अशी वाटणी झालेली पाहून सगळ्याच बायका एकदम खूश !

आणि मग तेच घर पुन्हा शिस्तीत चालू लागले.गाडी रुळावर आली आणि अशाच एक दिवशी लहान सुनबाई स्वयंपाक करत होती.भाकरी भात वगैरे झाला होता. फक्त आता भाजी राहिली होती. भाजीही चिरून वगैरे तिने घेतली. कढई चुलीवर चढवली.फोडणी केली. नंतर चिरलेली भाजी टाकली. तिखट, मसाला, हळद टाकली. मीठ मात्र टाकलं नाही. का नाही टाकलं ? तर आधीच मीठ टाकलं तर भाजी शिजायला वेळ लागतो. म्हणून सुगरण गृहिणी नेहमी उकळीच्या वेळी मीठ घालते. (गोष्टीच्या निमित्तानं नव्या पिढीच्या महिलांना ही टीप दिली)

आणि रश्श्यासाठी पाणी टाकून उकळी यायची वाट पाहत बसली. इतक्यात निरोप आला की तिची माहेरी आलेली मैत्रीण आता सासरी जायला निघालीय. तर पाच मिनिटं तरी उभ्या उभ्या भेटून यावं असं तिला वाटल.

पण इकडं तर भाजीला उकळी यायची होती. त्यात वेळ जाणार होता.

मग ती धाकटी सुनबाई मधल्या सुनेकडं (म्हणजे जावेकडं) गेली. अन म्हणाली की, “माझी मैत्रीण निघालीय. मला जायचंय, तर आजच्या दिवशी जरा भाजीला उकळी आल्यावर मीठ तेव्हढं घालता  का ?”

त्यावर मधली जाऊ म्हणाली, “माझ्यापेक्षा लहान असून मला काम सांगतेस ? तुला काही संस्कार बिंस्कार आहेत की नाहीत? निघ तू…. तुझं तू बघ.”

धाकटी बिचारी नंतर थोरल्या जावेकडे गेली.

थोरलीने तर मधलीपेक्षा मोठा आवाज करून धाकटीला “तुझं तू बघ” म्हणून घालवून दिलं .

धाकटी मग तोंड लहान करून शेवटी हायकमांडकडे

(सासूकडे) गेली. तसं सासूनंही नकार देत… “तुझं तू पहा. मला आता कामं झेपत नाहीत बाई,” असं म्हणत तिला घालवून दिलं.

या एकूण प्रकारात इतका वेळ गेला की तिकडं तेव्हढ्या वेळेत भाजीला उकळी आली पण ! ते पाहून धाकटीने त्यात पटकन मीठ टाकून झाकण ठेवून ती गेली मैत्रिणीला भेटायला.

 

आणि मग या दोन सुना व सासू स्वतःशीच विचार करत बसल्या की,’आपण केलं ते चूक की बरोबर ?’

मधलीनं विचार केला,’कधी नव्हे ते धाकटी मदत मागायला आलेली.  आपण घालवून दिली. हे बरोबर नाही केलं आपण.’

असं म्हणत ती स्वयंपाघरात जाऊन त्याच भाजीत मीठ टाकून गेली.

थोरलीनंही तसाच विचार केला आणि थोड्या वेळानं तीही स्वयंपाकघरात जाऊन त्याच भाजीत मीठ टाकून गेली.

आणि सासूलाही पश्चाताप झाला, ‘नको होतं इतकं रागवायला तिला.’असं म्हणत  थोड्या वेळानं तिनंही स्वयंपाघरात जाऊन त्याच भाजीत मीठ टाकलं.

सर्वांनी स्वतःच्या मनाला दिलासा दिला की, आपण चुकलो होतो, पण नंतर दुरुस्ती केली.

पण आता जिथं एक चमचा मीठ पडायचं होतं, त्या भाजीत चार चमचे मीठ पडलेलं.

दुपारी सासरे जेवायला शेतातून घरी आले.

सुनेने त्यांच्यासाठी ताट वाढलं.

सासऱ्यांनी पहिलाच घास खाल्ला अन त्यांच्या लक्षात आलं, भाजी खारट झालीय.

त्यांनी सुनेला सांगितलं, “अग बेटा,घरात दही आहे का ? असेल तर वाटीभर आण.”

सुनेनंही पटकन जाऊन दही आणलं. सासऱ्यांनी ते त्या भाजीत मिसळून टाकलं अन मस्त मजेत जेवण करून शेताला निघालेसुद्धा.(बाय द वे दुसरी टीप : पदार्थात मीठ जास्त पडलं असेल तर दही टाकावं किंवा असेल तर बटाटा बारीक किसून टाकावा. काम होऊन जातं.)

नंतर तिन्ही मुले घरी जेवायला आली.

त्यांनाही जेवण वाढलं गेलं. मात्र त्यांनी पहिल्याच घासाला एकमेकांकडे पाहायला सुरुवात केली आणि खुणेनं “काही खरं नाही भाजीचं,” असं सांगितलं.

थोरल्या मुलानं आईला विचारलं, “आबा जेवून गेले का ?”

आईनं ‘हो’ सांगितल्यावर त्यानं विचारलं, “काय जेवले आबा?”

तर आई म्हणाली, “हेच जेवण की, जे तुम्हाला वाढलं आहे. पण आज काय माहीत, त्यांनी दही मागून घेऊन ते भाजीत टाकून खाल्लं, बाबा.”

यावर पटकन तिन्ही मुलं म्हणाली, “आम्हालाही दही आणा.”

त्याप्रमाणं मुलांनीही मग भाजीत दही मिसळून छान जेवण करून ते शेतात गेले.

नंतर जेव्हा बायका जेवायला बसल्या, तेव्हा त्यांना कळलं की मीठ जास्त पडलंय. सासूनं याबद्दल विचारणा केल्यावर सगळ्यांनी “मी पण मीठ टाकलं,”असं सांगितलं. शेवटी मग त्यांनीही भाजीत दही मिसळून जेवण केलं.

गोष्ट इथं संपलीय !

 एखाद्या गोष्टीवरून हमखास जिथं  वाद होऊ शकतो, मनं कलुषित होऊ शकतात, अशावेळी कुटुंब प्रमुख जो सल्ला देतो, जी कृती करून नकळत मार्गदर्शन करतो, तो बाकीच्यांनी मानला, तर मग वरील गोष्टीप्रमाणे  वाद न होता तो मुद्दाच अडगळीत पडतो आणि घरात एकोपा राहतो.

प्रश्न मीठ जास्त पडण्याचा नसतो तर नंतर त्यावर काय करावं ? याचा असतो.

प्रमुख म्हणून तो सासरा रागावू शकला असता. पण त्यानं तसं केलं नाही. कारण  बिनभिंतीच्या उघड्या शाळेत असे अनेक खारट अनुभव पचवून त्यात उपायाचं दही कसं मिसळायचं हे तो शिकलेला असतो. त्याची दही घेण्याची कृती नंतर मुलांनीही स्वीकारली अन तेही जेवण करून खूश झाले. वाद टळला.

कुटुंबप्रमुखाला म्हणून मान द्यावा. भले काही वेळा त्याचे निर्णय तुम्हाला चुकीचे वाटत असतील. पण तुमच्यापेक्षा चार पावसाळे त्यानं जास्त पाहिलेले असतात. त्या अनुभवाचं भांडारच ते तुमच्यासाठी उधळत असतात.

ते लाथाडू नका ! स्वीकारा !

त्यातच भलाई आहे!

लेखक :अज्ञात

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मुलांना मार…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “मुलांना मार…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

आजकालच्या मुलांना हे कधीच कळणार नाही. पूर्वीच्या काळी खालील कारणांसाठी पण मुलांना मार मिळत असे!

  1. मारल्यावर रडल्या बद्दल.
  2. मारल्यावर न रडल्या बद्दल.
  3. न मारता रडल्या बद्दल.
  4. मित्रांबरोबर खेळल्याबद्दल.
  5. मित्रांबरोबर न खेळल्याबद्दल.
  6. मोठी माणसे बसली असताना तिथून ये जा केल्याबद्दल.
  7. मोठ्यांना उत्तर दिल्याबद्दल
  8. मोठ्यांना उत्तर न दिल्या बद्दल.
  9. खूप वेळ मार न खाता राहिल्यावर.
  10. उपदेशपर गाणं गायल्याबद्दल.
  11. पाहुण्यांना नमस्कार न केल्या बद्दल.
  12. पाहुण्यांसाठी केलेला खाऊ खाल्ल्याबद्दल.
  13. पाहुणे जायला निघाल्यावर त्यांच्याबरोबर जाण्याचा हट्ट केल्याबद्दल.
  14. खायला नाही म्हटल्यावर.
  15. सूर्यास्तानंतर घरी आल्यावर.
  16. शेजाऱ्यांकडे खाल्ल्याबद्दल.
  17. हट्टी असल्याबद्दल.
  18. खूप उत्साही असल्याबद्दल.
  19. बरोबरच्या मुलांमध्ये भांडणात हरल्याबद्दल.
  20. बरोबरीच्या मुलांमध्ये भांडणात जिंकल्याबद्दल.
  21. खूप सावकाश खाल्ल्याबद्दल.
  22. भराभर खाल्ल्याबद्दल.
  23. मोठे जागे झाल्यावर झोपून राहिल्याबद्दल.
  24. पाहुणे खात असताना त्यांच्याकडे बघत राहिल्याबद्दल.
  25. चालताना घसरून पडल्याबद्दल.
  26. मोठ्यांच्या कडे पाहत उभे राहिल्याबद्दल.
  27. मोठ्यांशी बोलताना दुसरीकडे पाहिल्याबद्दल.
  28. मोठ्यांशी बोलताना त्यांच्याकडे न पाहिल्याबद्दल.
  29. मोठ्यांशी बोलताना एकटक पाहिल्याबद्दल.
  30. रडणार्‍या मुलाकडे पाहून हसल्याबद्दल.

उगाच नाही आपण इतके निर्मळ, शहाणे झालो…

लेखक:अज्ञात

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘वडिलांना पत्र…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘वडिलांना पत्र…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

प्रिय बाबा,

तुमचं आणि आईचं पत्र मिळालं.आपल्या भावना पाहून खूप वाईटही वाटलं. तुम्हाला माझी गरज आहे, हे कळतंय हो बाबा. आई आणि तुम्ही आता थकलाय. माझी तुम्हाला प्रचंड आठवण येते. मी जवळ असावं, असं वाटतंय. त्याला जबाबदार बाबा, मीही नाही आणि तुम्हीही नाही.

तुमच्या आशीर्वाद आणि इच्छेनं मी अमेरिकेत बिझी आहे. तुमच्या अभिमानाचे फळ  आहे मी, बाबा.

मला कळतंय, तुमच्या जवळ यायला पाहिजे, तुमचं दुःख वाटून घ्यायला पाहिजे , तुमच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत.पण या अमेरिकेत सगळं आहे फक्त वेळच नाही.कारण प्रांताची दुरी , मुलांचं शिक्षण , कामाचा लोड किती जरुरी आहे हे कसं सांगू तुम्हाला?  मनात असूनही मी तुमच्याकडे येऊ शकत नाही.

मला व्हाट्सअपवर खूप मेसेज येतात. आई -वडिलांच्या कष्टाचे , त्यागाचे , प्रेमाचे. वाचलं की खूप वाईट वाटतं. बाबा, या सगळ्याला मी एकटा जबाबदार आहे?

आज धाडस करून तुम्हाला प्रश्न विचारतोय की एवढी संवेदनाशून्यता माझ्यात कुठून आली? बाबा उत्तर देऊ शकाल ? मला लहानपणी कुठं माहीत होत की इंजिनिअरिंग काय आहे? परीक्षा काय आहे? पैसा काय आहे?

मला फक्त हेच कळत होतं की बाबांनी मला मिठीत घ्यायला पाहिजे , आईस्क्रीम- भेळ माझ्या बरोबर खायला पाहिजे. आईनं मला भरवायला पाहिजे, माझ्याशी खेळायला पाहिजे.

त्या वेळी माझ्यासाठीच तुम्ही कष्ट करत होता. कधी तुमच्या जवळ येऊन बसलो तर फक्त अभ्यास कर , हा क्लास जॉईन कर ,असं वाग, तसं वाग…. याव्यतिरिक्त बाबा आपण दुसरं काय बोललोय, तुम्हाला आठवतंय का?

आईने सतत दुसऱ्या नातेवाईकाची मुलं कशी आहेत, हे सांगता सांगता तिचं बाळ काय मागतंय, हेच तिच्या लक्षात आलं नाही.बाबा, मी तुम्हा दोघांची चूक काढत नाही. मी एवढा मोठाही नाही.

पण अमेरिका काय आहे, पोस्ट काय आहे , पैसा काय आहे ,सुविधा काय आहेत , रुतबा काय असतो हे सगळं मी तुमच्या मांडीवर बसून शिकलोय. आईच्या नजरेतून मला कळायचं की या गोष्टी तुमच्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत.

रात्रंदिवस फक्त आणि फक्त हेच शिकवलं की पोस्ट / आय आय टी /पैसा, मोठया पदांच्या नातेवाईकाची किंमत किती महत्त्वाची असते.

आईने जेवण देताना , दूध पाजताना , शाळेत जाताना , शाळेतून येताना हेच शिकवलं की माझा राजाबेटा खूप मोठा होणार , खूप पैसा कमावणार , हवेत उडणार आणि ह्या तुमच्या इच्छा पुऱ्या व्हाव्यात म्हणुन कितीतरी नवस केले.

बाबा, मला एवढं संवेदनाशून्य आयुष्य का दिलं? का असं मला घडवलं?

बाबा,आई, सगळा दोष माझाच आहे का हो?

 -आपला पुत्र

प्रत्येक आई वडिलांनी विचार करणं गरजेचं आहे की मुलांचा सर्वांगीण विकास करायचा की त्याला एक यंत्र बनवायचं?

शिक्षण तर अतिशय महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षा काकणभर जास्त महत्त्वाची आहे नैतिकता, राष्टप्रेम. मातीची गावाची आत्मीयता. आपण काही चूक तर करत नाही ना?

प्रत्येक आई बाबांनी विचार करावा असा विषय .

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महिला संपावर… – कवी : डी . आर. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ महिला संपावर… – कवी : डी . आर. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

महिला साऱ्या  संपावरती

जाऊन बसल्या अवचित

बघूनी त्यांचा रुद्रावतार

पुरुष झाले भयभीत

*

रोज सकाळी उठल्यावर

आयता  मिळे  चहा

हवं तेव्हा नाश्ता, जेवण

मिळत होते पहा

*

आंघोळीला पाणीदेखील

बायको देई गुणी

आता तोंड धुण्यासही

तांब्यात मिळेना पाणी

*

शाळेत मुले डबा घेऊन

जात  होती  कशी

आता कपभर चहा नाही

कोपऱ्यात पडली बशी

*

रविवारच्या दिवशी कसा

पूर्वी  मिळे  आराम

आता मात्र नशीबी आले

बारीकसारीक  काम

*

हॉटेलमध्ये करता जेवण

बिघडून  गेले  पोट

पैसे देऊन भोजन नाही

उगाच  बसली  खोट

*

घरात कुणी आले गेले

सरबराई  होईना

बाहेरूनच बोले पाहुणा

मध्ये  कुणी  फिरकेना

*

साऱ्यांचेच अडले घोडे

पाऊल  पुढे  पडेना

महिलांविना  कुणाचे

काम  एक  होईना

*

मुले, पुरुष, तरुण

सारेच गेले चक्रावून

कळली हो स्त्रीची महती

प्रचिती आली  पाहून

*

नम्रपणे  त्यांनी  केली

महिलांची मनधरणी

महापुरुषही लीन झाले

डोळ्यांत  आले  पाणी

*

खुदकन महिला हसल्या

वदल्या–” कशी वाटली नारी ?”

हात जोडुनी सारे बोलले

–” दुर्गे  दुर्घट  भारी “

कवी :श्री. डी. आर. देशपांडे

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आयुष्याच्या संध्याकाळी…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “आयुष्याच्या संध्याकाळी…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

आज आजी उदास आहे हे आजोबांच्या लक्षात आलं.

“काय झालं गं ?” आजोबांनी विचारलं. आजी म्हणाली, “अहो, आता थकवा येतो. आधी सारखं राहिलं नाही. आता गडबड गोंगाट सहन होत नाही. कुठे जायचं म्हटलं तर जास्त चालवत नाही. कधी भाजीत मीठ टाकायला विसरते, तर कधी जास्त पडतं. कशाकरिता हे एवढं आयुष्य देवाने दिलंय माहीत नाही!”

आजोबा म्हणाले, “देवाचा हिशोब मला माहीत नाही. आणि त्याच्या निर्णयात आपण ढवळाढवळही करू शकत नाही. जे आपल्या हातात नाही, त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या हातात जे काही आहे, त्याचा विचार करावा.अग, वयानुसार हे सर्व होणारच.आधीचे दिवस आठव ना. किती कामं करायचीस तू. पूर्ण घर तू खूप छान सांभाळलंस.मला कशाचीच काळजी नव्हती कधी.आता वयोमानानुसार हे सारं होणारच. पण त्यातूनच मार्ग काढायचा असतो. आलेला दिवस आनंदात काढणं आपल्या हातात आहे.जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर थोडे शारीरिक बदल होतातच. थोडे आपल्यालाही करायचे असतात. आपली आयुष्याची घडी परिस्थितीनुसार बदलायची असते. चल. आज सायंकाळी बाहेर जाऊ या आपण. तू छान ती नारंगी साडी नेस. रात्री आपण बाहेरच जेवू.”

आजोबा संध्याकाळी आजीला घेऊन बाहेर पडले व जवळच असलेल्या बसस्टाॕपवर जाऊन बसले.दोघे बराच वेळ तेथेच भूतकाळात रमत गप्पा मारत बसले. आजोबा म्हणाले, “अगं, पाय दुखत असतील तर मांडी घालून बस छानपैकी.नंतर पाणीपुरी शेवपुरी खाऊनच घरी जाऊ.” अगदी वयाला व तब्येतीला शोभेसे दोघांचे फिरणे झाले.

आजीची उदासी मात्र कुठे पळाली, हे तिला कळलंच नाही. ती अगदी ताजीतवानी झाली.

 मोबाईल पकडून आजीचा खांदा दुखतो, म्हणून आजोबांनी आजीसाठी मोबाईल स्टॅन्ड मागवला.आज आजीने आजोबांना सकाळीच सांगून टाकलं की मी आज सायंकाळी स्वयंपाक करणार नाही. काही तरी चमचमीत खायला घेऊन या.आजोबांनी आनंदाने आणलेले समोसे, ढोकळा, खरवस, दोन पुरण पोळ्या पाहुन आजी म्हणाली,”अहो.. एवढं का आणलंत?” आजोबा म्हणाले,”अगं, आज आणि उद्या मिळून संपेल की.” आजी आजोबांची पार्टी छान  झाली.

आजोबा बऱ्याच वेळा पासून एका बाटलीचं झाकण उघडायचा प्रयत्न करत होते. ते पाहून नातू म्हणाला,” द्या आजोबा मी उघडून देतो.” आजोबा म्हणाले, “अरे, नको, बाळा.मी उघडतो. आता आम्हाला प्रत्येक कामात वेळ लागतोच रे. जोपर्यंत करू शकतो, तोपर्यंत काम करायचं हे मी ठरवलंय. रोज फिरायला जाणं, भाजी आणणं , भाजी चिरणं , साफसफाई करणं , धुतलेले कपडे वाळत घालणं , वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालणं अशा कामांची जबाबदारी मी घेतली आहे.तुझ्या आजीला मदतपण होते आणि माझा वेळही जातो.”

वाहतं पाणी ‘धारा’ म्हणजे पुढे पुढे वाहत जाणारी उर्जा. तेच साचलेलं पाणी म्हणजे अनेक रोगांचा उगम. आयुष्याचं पण असंच आहे. शक्य तेवढं सक्रिय राहणं ही आवश्यकता असते. जे जमेल, जसं जमेल, जे आवडेल, जे झेपेल ते करत रहाणं गरजेचं आहे. चलतीका नामही जिंदगी है! वयाच्या ह्या वळणावर

एकमेकांचा हात प्रेमाने, काळजीने,विश्वासाने हातात घेणं ही उर्वरित आयुष्याची गरज आहे.

म्हणूनच  

प्रत्येक दिवस उत्सव म्हणून साजरा करा.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print