मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ कुटुंबातील मॅनर्स… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ कुटुंबातील मॅनर्स… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की, समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं आणि ओवलेला दोरा संपला तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा. दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं.

पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे. एकत्र कुटुंब असायचं. गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं आंघोळीला जाण्यापुर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं. दुसऱ्यानं तिसऱ्यासाठी, जेणेकरुन वेळ आणि इंधन बचत व्हायचीच पण गैरसोयही टाळता यायची.

सुबत्ता वाढत गेली तसतशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवनशैलीही बदलत गेली. आता दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही, पण याचा अर्थ तो करायचाच नाही असं मात्र नाही.

आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमानं नीट पुरवणी आत ठेऊन निश्चित जागी ठेवला तर दुसऱ्याला ताजा पेपर वाचल्याचा फील येतो नि शोधाशोध पण करावी लागत नाही.

पाण्याची बाटली आपण रिकामी केली तर लगेच भरुन फ्रीज मधे ठेवली तर ही साखळी चालू राहून एकालाच हे काम करावं लागत नाही.

बेसिनपाशी हँडवाॅश संपत असतं. ज्याला कळेल त्यानं रिफिल करायचं हा नियम केला तर कोणालाही त्रास होणार नाही.

पाण्याचा ग्लास, चहाचे कप आपापले धुवून, घासून ठेवायचे हा नियम घरात पाळला तर भांडी कमी साठतील.

खाऊ, फळं, नियमित खाल्ले जाणारे पदार्थ किंवा  कात्री, स्टेपलर, सेलोटेप सारख्या वस्तू एकाच जागी ठेवणे. आपली टर्न आल्यावर संपल्या नि बिघडल्या तर आठवणीने आणणे, ही काळजी घेणे.

घर सगळयांचं असतं. सगळी जबाबदारी गृहिणीची असं म्हणून जबाबदारी झटकून न टाकता एकत्र रहाण्याचे मॅनर्स सगळयांनीच शिकायची गरज आहे. प्रेमात आणि नात्यात एकमेकांसाठी कामं केली जातात पण त्यामुळेच एकत्र जगण्याच्या शिस्तीला तडा जातो नि चुकीच्या सवयी लागतात.

घर ही एक संस्था समजून घराची एक शैली एक नियमावली जरुर तयार करा. हे एक लहानसं युनिट समजा. देशात अराजकता माजू नये म्हणून कायदे असतात तसे घरातही काही नियम असले पाहिजेत तरच त्याचं हाॅटेल होणार नाही (खरंतर हाॅटेलचे सुध्दा नियम असतातच).

ही एक संधी आहे. घराला घरपण देण्याची. सगळे घरात आहेत, काही एकत्र सवयी लावून घेतल्या तर भविष्यात नक्कीच फायदा होईल.

आपल्या घरामध्ये कोणाचाही फोन आला तर एकमेकांना त्यांचे निरोप न विसरता देणे घरातील कोणाकडेही मित्र मैत्रीण आल्यास त्यांचे यथोचित स्वागत करणे.घरी येणारी व्यक्ती ही कुटुंबाची मैत्री आहे समजून त्यांचे आदरातिथ्य करूया. घरातील प्रत्येक वस्तूवर व्यक्तींची नावे असलीच पाहिजेत असे नाही. बहुतेक सर्व वस्तू कॉमन असतात. त्याला ही घर पण म्हणतात.तसेच घरातील कोणतीही खाण्यापिण्याची वस्तू संपविण्यापूर्वी कोणी खायचे राहिले नाही ना ? अशी चौकशी करावी. घरातील प्रत्येकाचे दिवसभराचे काम, अंदाजे वेळापत्रक,उद्योगातील आर्थिक व्यवहार एकमेकांना माहिती असण्याची आवश्यकता आहे.

कुटुंबातील माहेरची किंवा सासरची व्यक्ती असो सर्वांचे समान आदरातिथ्य असावे अशा प्रकारच्या गोष्टींना कुटुंबातील मॅनर्स किंवा संस्कार असे म्हणतात, याचे खूप चांगले परिणाम पुढील पिढीवर होतात.

संस्कार संस्कार म्हणजे आणखी वेगळं काही नसतं.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “इतिहासातील ‘हिट अँड रन‘ प्रकरण…” – लेखिका : डॉ. सुनीता दोशी ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “इतिहासातील ‘हिट अँड रन‘ प्रकरण…” – लेखिका : डॉ. सुनीता दोशी ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

महाराणी अहिल्याबाई होळकर

पुण्यात कल्याणी नगर येथे घडलेले ‘हीट अँड रन’ प्रकरण बरंच चर्चेत आहे सध्या…!सुरुवातीला मुलाला शिक्षा म्हणून 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला आणि समज देऊन सोडून दिलं ही चर्चा खूपच रंगली…!  आपल्या मद्यपान केलेल्या अल्पवयीन मुलाला…, जो नशेत अतिशय वेगाने गाडी चालवत होता…आणि त्याच्या हातून घडलेल्या अपघातात दोघांचा जीव गेला…त्याला वाचवण्यासाठी आजोबा आणि वडील गैरमार्गाचा वापर करत होते… पैशाने कायद्याला…माणुसकीला विकत घेऊ पहात होते…!  

या पार्श्वभूमीवर एक घटना खूपच विचार करण्यासारखी आहे…! 31 मे…राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती…!सर्व देशभर ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली…! त्यांच्याच जीवनात घडलेला एक प्रसंग या पार्श्वभूमीवर अतिशय बोलका आणि डोळ्यात अंजन घालणारा आहे…!

हा प्रसंग जरी त्या वडिलांना आणि आजोबांना सांगितला असता, तरी निबंध लिहिण्यापेक्षा आहे तो परिणामकारक झाला असता…. असं मात्र वाटत रहातं…! 

“राजमाता अहिल्यादेवी होळकर…!”एक आदर्श व्यक्तिमत्व …! दानशूर…कुशल प्रशासक … वीरांगना…अतिशय न्यायप्रिय… दूरदृष्टी असलेल्या… पुरोगामी विचाराच्या… शिवभक्त…आणि… प्रजाहितदक्ष…पुण्यश्लोक…  महाराणी  अहिल्यादेवी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एक प्रसंग…

अहिल्यादेवी यांचा पुत्र मालोजी रथामधून जात असताना रस्त्यामध्ये एक वासरू बागडत उड्या मारत  रथासमोर येते… वासराला त्या रथाची धडक बसते आणि ते वासरू  मृत्यूमुखी पडते…!मालोजीराव तसेच पुढे निघून जातात…! जवळच त्या वासराची आई… म्हणजेच गाय उभी असते…! आपलं बाळ गेलेलं तिच्या लक्षात येते… अतिशय दुःखी अशी ती गाय त्या वासराभोवती गोल गोल फिरते आणि शेवटी त्या वासराच्या बाजूला बसून राहते…! काही वेळाने त्याच रस्त्यावरून अहिल्यादेवीचा रथ  जातो… त्यांना हे दृश्य दिसते… आणि लक्षात येते की कुठल्यातरी अपघातामध्ये हे वासरु गेलेले आहे…!  त्यांना अतिशय वाईट वाटते… चौकशी केल्यानंतर कळते की हे कृत्य आपल्या मुलाच्या हातून घडले आहे…! त्या  अतिशय संतापतात…! आणि अतिशय रागात घरी येतात…आपल्या सुनेला विचारतात….”जर एखादया आईसमोर तिच्या बाळाला कोणी आपल्या रथाखाली चिरडलं … आणि ती व्यक्ती न थांबता तशीच निघून गेली….तर काय न्याय द्यायला हवा…?”

सून  म्हणते…,”  ज्या पद्धतीने त्या व्यक्तीने  वासराला चिरडले …त्या पद्धतीनेच त्या व्यक्तीला देखील मृत्युदंड द्यायला हवा…!”

अहिल्यादेवी दरबारामध्ये मुलाला बोलवून घेतात आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावतात…! तो मृत्यू देखील ज्या पध्द्तीने वासराला चिरडले गेले…त्याच पध्द्तीने…!  मालोजीरावांना हात पाय बांधून रस्त्यावर टाकण्यात येते…! परंतु मालोजीरावांच्या अंगावर जो रथ घालायचा…त्याचे सारथ्य करायला कोणीच तयार होत नाही…! मालोजीरावांना माफ करावे म्हणून प्रजाजन अहिल्यादेवींना खूप विनंती करतात…! परंतु आता त्यांचा निर्णय झालेला असतो… त्यांनी एकदा दिलेला निर्णय परत बदलायचा विषयच नसतो…!    

शेवटी अहिल्यादेवी स्वतः हातात लगाम घेतात … त्या रथावर चढतात आणि त्या रथाचे सारथ्य करतात…! परंतु एक अद्भुत घटना त्या वेळेस घडते…! अहिल्यादेवींच्या रथासमोर ती गाय येऊन उभा रहाते…! कितीही हाकलून दिले तरी ती गाय पुन्हा पुन्हा त्या रथाला आडवी येते… ! जणू ती सांगते की…’ हे अपत्य विरहाचे दुःख फार वाईट आहे… एका आईच्या हातून आपल्या बाळाचा मृत्यू होऊ नये …आणि आईला हे दुःख सहन करायला लागू नये …! ‘ 

ह्या घटनेने सर्वजण अवाक होतात…!  अहिल्यादेवींची समजूत काढतात…! शेवटी अहिल्यादेवी आपल्या मुलाला माफ करतात…!

ही घटना ऐकून अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात…! प्रत्येक स्त्रीमध्ये एक ‘आई ‘असते…! त्या आईने दुसऱ्या आईला न्याय देण्यासाठी आपल्या स्वतःच्या मातृत्वाचा देखील विचार केला नाही…! आपल्या पोटच्या पोराला इतकी कठोर शिक्षा त्यांनी सुनावताना मातृत्वावर कर्तव्याने विजय मिळवला होता…! परंतु त्या क्षणी त्यांच्या मनामध्ये विचारांची किती वादळे उठली असतील…? मन किती खंबीर करावं लागलं असेल…!  खरंच विचार करण्यापलीकडेच आहे सारे …!

आज अशा न्यायाची खरंच खूप गरज आहे…पैशाने न्याय विकत घेऊ पाहणाऱ्यांसाठी…! आणि अशा इतिहास घडविणाऱ्या इतिहासातल्या घटना समाजापुढे ठेवण्याची गरज आहे…  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींची जयंतीच्या निमित्ताने…!

हीच खरी अहिल्यादेवींनी वाहिलेली आदरांजली …आणि हेच कदाचित समाज-प्रबोधनही असेल…!

लेखिका : डॉ सुनिता दोशी

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आता द्या निकाल… – लेखक : ओशो ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ आता द्या निकाल… – लेखक : ओशो ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

रात्रीच्या गडद अंधारात चोर त्या घराच्या आवारात शिरला.

एका खिडकीतून अल्लाद आत शिरण्यासाठी तो आवाज न करता त्या खिडकीवर चढला आणि अचानक काड्काड् आवाज करत ती खिडकी मोडली, चोर खाली पडला, त्याचा पाय मोडला. घरमालक जागा झाला. त्याने चोराला रक्षकांच्या ताब्यात दिलं.

दुसऱ्या दिवशी भलतंच आक्रीत झालं. ‘ त्या घरमालकाने तकलादू खिडकी बनवल्यामुळेच आपला पाय मोडला, त्याची त्याने नुकसान भरपाई द्यायला हवी,’ असा खटलाच चोराने दाखल केला होता.

खटल्याच्या दिवशी न्यायालयात अभूतपूर्व गर्दी उसळली होती.

घरमालक न्यायाधिशाला म्हणाला, “ महाराज, हा काय उफराटा प्रकार आहे? हा माणूस माझ्या घरात चोरी करायला शिरत होता. तो माझं केवढं नुकसान करणार होता. त्यात त्याच्या चुकीने माझ्या घराची खिडकी मोडली आणि मीच नुकसान भरपाई द्यायची? “

न्यायाधिशाने चोराकडे पाहिलं. चोर म्हणाला, “ मी चोरी करणार होतो. केली नव्हती. यांचं नुकसान होणार होतं, झालेलं नाही. माझं नुकसान मात्र झालेलं आहे आणि ते यांच्या चुकीमुळे झालेलं आहे. कधीतरी खिडकीवर कोणी, भले चोर का होईना, चढू शकतो, याचा विचार करून मजबूत खिडकी बांधणं हे याचं काम नव्हतं का? “

न्यायाधीश म्हणाले, “ याचं म्हणणं बरोबर आहे. तुमचं काय म्हणणं आहे.? “

घरमालक म्हणाला, “ महाराज, मी हे घर बांधताना बांधकाम कंत्राटदाराला पूर्ण पैसे दिले होते. त्याने तकलादू बांधकाम केलं असेल, तर माझा काय दोष? “

कंत्राटदाराला न्यायालयात हजर केलं गेलं.

तो म्हणाला, “ मी पूर्ण पैसे घेतले. चांगला माल आणला. चांगले कारागीर आणले. त्यांना चांगले पैसे दिले. आता ही खिडकी बांधणाऱ्या कारागिराने तरीही चूक केली असेल, तर माझा काय दोष?”

कारागीराला न्यायालयात हजर केलं गेलं. 

तो म्हणाला, “ मी भिंत नीटच बांधली होती. त्यातली चौकट बसवताना सुताराने गडबड केलेली असणार. त्यात माझा काय दोष?”

सुतार न्यायालयात हजर झाला.

तो म्हणाला, “ महाराज, माझ्या हातून गडबड झालीये यात शंका नाही. पण, त्यात माझा दोष नाही. मी ही खिडकी बसवत असताना अगदी मोक्याच्या वेळेला एक रूपसुंदर स्त्री समोरून गेली. तिच्यामुळे माझं लक्ष विचलित झालं. तिने इंद्रधनुषी रंगाची ओढणी घेतली होती, हे मला अजूनही आठवतं. आता सांगा यात माझा काय दोष?”

त्या स्त्रीला बोलावलं गेलं. 

ती म्हणाली, “ मी त्या दिवशी तिथून गेले, हे खरंच आहे महाराज. पण, माझ्याकडे नीट पाहा. मी किती सामान्य रंगरूपाची स्त्री आहे. माझ्यासारख्या स्त्रीकडे कोणी रस्त्यात वळूनही पाहणार नाही. या सुताराचं माझ्याकडे लक्ष गेलं ते माझ्या इंद्रधनुषी दुपट्ट्यामुळे.” तिने तो झळझळीत दुपट्टा काढला आणि सगळं न्यायसभागार मंत्रमुग्ध झालं. खरंच तो दुपट्टा नजरबंदी करणारा होता. ती स्त्री म्हणाली, “ या दुपट्ट्याला हा रंग लावणारा रंगरेझच खरा दोषी आहे.”

“बोलवा त्याला,” न्यायाधिशांनी हुकूम दिला.

ती स्त्री लाजून म्हणाली, “ बोलवायचं कशाला? माझा पतीच आहे तो आणि या न्यायालयातच हजर आहे.” 

तिने पाय मोडलेल्या चोराकडे बोट दाखवलं आणि त्याने कपाळावर हात मारून घेतला.

लेखक – ओशो

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वाचन नसलेली पिढी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ वाचन नसलेली पिढी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

(वाचन नसलेली पिढी म्हणजे आशा नसलेली पिढी  (भारतीय अभियंत्याच्या पत्राचा उतारा))

“शांघायला जाणाऱ्या फ्लाइटवर, झोपेच्या वेळी, केबिनचे दिवे बंद होते; मी लोकांना iPads वापरून जागे करताना पाहिले, मुख्यतः आशियाई; ते सर्व गेम खेळत होते किंवा चित्रपट पहात होते.” 

खरंतर मी तो पॅटर्न पहिल्यापासून पाहिला.

जेव्हा मी फ्रँकफर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर होतो तेव्हा माझ्या लक्षात आले की बहुतेक जर्मन प्रवासी शांतपणे वाचत होते किंवा काम करत होते, तर बहुतेक आशियाई प्रवासी खरेदी करत होते आणि किंमतींची तुलना करत हसत होते.

आजकाल अनेक आशियाई लोकांना बसून पुस्तके वाचण्याचा धीर नाही. 

एकदा, एक फ्रेंच मित्र आणि मी एका रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होतो आणि या मित्राने मला विचारले: “सर्व आशियाई चॅट किंवा इंटरनेट का सर्फ करतात, परंतु कोणीही पुस्तके का वाचत नाही?”.

मी आजूबाजूला पाहिले, आणि खरंच ते होते. 

लोक फोनवर बोलतात, मजकूर संदेश वाचतात, सोशल मीडियावर सर्फ करतात किंवा गेम खेळतात. 

ते मोठ्याने बोलण्यात किंवा सक्रिय असल्याचे ढोंग करण्यात व्यस्त आहेत; 

गहाळ असलेली एकमेव गोष्ट म्हणजे शांतता आणि विश्रांतीची भावना. 

ते नेहमी अधीर आणि चिडखोर, रागावलेले आणि तक्रार करणारे असतात…

प्रसारमाध्यमांच्या मते, चीनमध्ये सरासरी व्यक्ती प्रतिवर्षी केवळ ०.७ पुस्तके, व्हिएतनाममध्ये ०.८ पुस्तके, भारतात १.२ पुस्तके आणि कोरियामध्ये प्रतिवर्षी ७ पुस्तके वाचतात. 

केवळ जपान पाश्चात्य देशांशी तुलना करू शकतो ज्यात प्रति व्यक्ती प्रति वर्ष 40 पुस्तके आहेत; 

एकट्या रशियामध्ये प्रति व्यक्ती प्रति वर्ष 55 पुस्तके आहेत. 

2015 मध्ये, 44.6% जर्मन लोक आठवड्यातून किमान एक पुस्तक वाचतात – नॉर्डिक देशांसाठी समान संख्या.

आकडेवारी दर्शवते की वाचन नापसंत होण्याची तीन मुख्य कारणे आहेत.

📚 – एक म्हणजे लोकांची खालची संस्कृती (शिक्षण नव्हे). 

त्यामुळे लोक नेहमी भेटल्यावर खूप बोलतात आणि कंटाळा न येता दिवसभर गप्पा मारतात. 

ते नेहमी इतर लोकांच्या कथांबद्दल उत्सुक असतात, सतत सामाजिक नेटवर्क अद्यतनित करतात आणि संप्रेषणाच्या महत्त्वपूर्ण गरजा असतात.

📚 – दुसरे म्हणजे, त्यांना लहानपणापासून वाचनाची चांगली सवय लावली जात नाही. 

त्यांच्या पालकांना पुस्तके वाचण्याची सवय नसल्याने तरुणांना त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या संगोपनात तसे वातावरण मिळत नाही. 

लक्षात ठेवा, मुलाचे व्यक्तिमत्त्व प्रामुख्याने कुटुंबाद्वारे घडवले जाते.

📚 – तिसरे म्हणजे ‘परीक्षाभिमुख शिक्षण’, त्यामुळे लहान मुलांना बाहेरची पुस्तके वाचायला वेळ आणि ऊर्जा मिळत नाही. 

बहुतेक ते पुस्तके देखील वाचतात, म्हणून ते परीक्षांसाठी असतात. 

जुन्या अभ्यासपद्धतीच्या वातावरणामुळे अभ्यासाची सवय लागणे, पदवी मिळवणे आणि नंतर वाचन करणे बंद झाले.

इस्त्राईल आणि हंगेरी हे जगातील सर्वाधिक वाचले जाणारे दोन देश आहेत. 

इस्रायलमधील सरासरी व्यक्ती वर्षाला ६४ पुस्तके वाचते. 

मुलांना समजायला लागल्यापासून, जवळजवळ प्रत्येक आई आपल्या मुलांना शिकवते: “पुस्तके हे शहाणपणाचे भांडार आहेत, जे पैसे, खजिना आणि शहाणपणापेक्षा अधिक मौल्यवान आहेत जे कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.

हंगेरीमध्ये सुमारे 20,000 लायब्ररी आहेत आणि 500 लोकांमागे सरासरी एक लायब्ररी आहे; 

लायब्ररीत जाणे हे कॉफी शॉप किंवा सुपरमार्केटमध्ये जाण्याइतकेच चांगले आहे. 

हंगेरी हा जगातील सर्वात लक्षणीय पुस्तके वाचणारा देश आहे, ज्यात दरवर्षी 5 दशलक्ष लोक नियमितपणे वाचतात, देशाच्या लोकसंख्येच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त. 

ज्यू हे एकमेव लोक आहेत ज्यांना निरक्षर नाही; 

भिकाऱ्यांकडेही नेहमी पुस्तक असते. 

त्याच्या दृष्टीने पुस्तके वाचणे हा लोकांचा न्यायनिवाडा करण्याचा उत्कृष्ट गुण आहे.

जे लोक वाचतात त्यांची विचार करण्याची पद्धत खूप वेगळी असते आणि त्यांच्याकडे चमकदार कामगिरी नसली तरी त्यांची मानसिकता खूप चांगली असते. 

पुस्तकांचा केवळ व्यक्तीवर परिणाम होत नाही;त्याचा समाजावर परिणाम होतो.

ज्ञान ही शक्ती आहे आणि ज्ञान ही संपत्ती आहे.  जो देश किंवा व्यक्ती पुस्तके वाचणे आणि ज्ञान संपादन करणे याला महत्त्व देतो तो नेता असेल.

एक महान विद्वान एकदा म्हणाले: “एखाद्या व्यक्तीच्या विचारांच्या विकासाचा इतिहास हा त्याचा वाचन इतिहास आहे. किती लोक पुस्तके वाचतात आणि कोणत्या प्रकारची पुस्तके निवडतात हे ठरवते की समाजाचा विकास होईल की मागे राहील.”

लक्षात ठेवा: वाचनाशिवाय शर्यत ही आशा नसलेली शर्यत आहे.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “त्या तरुतळी विसरले गीत …” – लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “त्या तरुतळी विसरले गीत …” – लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

आपल्या स्वतःच्या कवितेच्या दोन ओळी किंवा शब्द कुठे लिहून ठेवण्याआधी अगदी मनातल्या मनात हरवून जातात तेव्हा होणारी मनाची घालमेल शब्दात न सामावणारी असते. आपली कविता दुसऱ्याने स्वतःच्या नावाने किंवा नाव न देताच माध्यमावर दिली की जीवाची होणारी बेचैनीही शब्दातीत असते. एकूणच, कविता हरवणे हा अनुभव शब्दात व्यक्त करणे आणि ती व्याकुळ अवस्था इतरांपर्यंत पोहोचवणं सोपे नव्हे. 

परंतु कवी वा.रा कांत यांच्यासारखा  कवी कवितेचे हे हरवणं इतक्या उत्कटपणे काव्यातून व्यक्त करतो की त्या काव्याचं एक अविस्मरणीय असं विरहगीत म्हणूया किंवा भावगीत  पिढ्यान पिढ्या मनाचा ठाव घेत आहे. 

“त्या तरुतळी  विसरले गीत” हे वा.रा कांत यांचं गीत एका “हरवण्याच्या” अनुभवातून आकारलं आहे. वा. रा कांत हे नांदेडचे कवी सायकल घेऊन नोकरीच्या ठिकाणी  जात असत. हा रस्ता रानातून जात असे. तिथेच एका तळ्याकाठी असलेल्या  झाडाखाली बसून ते अनेकदा कविता लिहीत असत. या कविता किंवा सुचलेल्या ओळी एका वहीत लिहून ठेवत असत. एक दिवस घरी परतल्यावर आपण कवितांची वही  त्या झाडाखालीच विसरलो हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग मनाची झालेली घालमेल व्यक्त करताना शब्द त्यांच्या समर्थ लेखणीतून  आले –  

“ त्या तरुतळी विसरले गीत “ 

जेव्हा जेव्हा मी हे गीत ऐकत असे  तेव्हा अपुऱ्या राहिलेल्या भेटीची ही व्याकुळ आठवण आहे असं मला वाटत असे. “हरवलेल्या वही”ची ही गोष्ट कळल्यावर मात्र ह्या गीतातील शब्दांचे संदर्भ मनाला अधिकच अस्वस्थ करू लागले. 

आपली वही उद्या मिळेल का? ही. मनाची घालमेल सांगणार तरी कुणाला? मनाच्या या अवस्थेतून   वा,रा कांत यांच्यातील सृजनशील कवी कडून कशा ओळी लिहिल्या जातात बघा –  

त्या तरुतळी विसरले गीत

हृदय रिकामे घेऊनि फिरतो, 

इथे तिथे टेकीत

मुक्या मना मग भार भावना

स्वरातुनी चमकते वेदना

तप्त रणे तुडवीत हिंडतो, ती छाया आठवीत.

आपण आणखी कविता लिहू शकतो, लिहिल्या जातील इतकी विशाल प्रतिभा आपल्याकडे आहे हे जाणणाऱ्या कवीच्या मनात गेलेल्या कवितांची हुरहूर आहेच. 

“विशाल तरु तरी फांदी लवली”

दुसऱ्या दिवशी सकाळी साशंकपणेच ते त्या तळ्याकाठी   पोचतात तेव्हा काय आश्चर्य? 

त्यांची वही तिथे असतेच पण ती झाडाखाली नुसतीच पडलेली नाही. तर झाडाला रेलून आपल्या सख्याची  वाट बघत उभ्या असलेल्या एका सुंदर तरुणीच्या हातात ती वही आहे असे दृश्य त्यांना दिसते. आणि ते लिहून जातात – 

मदालसा तरुवरी रेलुनी

वाट बघे सखी अधिर लोचनी

पानजाळि सळसळे, वळे ती, मथित हृदय कवळीत

आणि त्या तरुणीचं वर्णन करताना शब्दचित्रच रेखातात –

पदर ढळे, कचपाश भुरभुरे

नव्या उभारित ऊर थरथरे

अधरी अमृत उतू जाय परि, पदरी हृदय व्यथीत.

वाट बघून ती तरुणी जणू शिणली आहे, थकलेली आहे. कवीची अवस्था तरी  कुठे वेगळी आहे? कवितेच्या वही साठी वणवण करून माझाही देह (तनु ) थकलेला आहे. मात्र  दोघांची परिस्थिती त्या क्षणी  अशी एक  अशी असली तरी दोघांच्याही हृदयातील  आकांक्षा मात्रवेगवेगळी आहे. दोघांच्यात असलेले हे साम्य आणि विरोधाभास  वा.रा  कांत किती सुंदर शब्दात लिहून गेलेत  –  

उभी उभी ती तरुतळि शिणली

भ्रमणी मम तनु थकली गळली

एक गीत, परी चरण विखुरले, द्विधा हृदय-संगीत तरुतळी गीत विसरल्यानंतर झालेली मनातील घालमेल उत्कटतेने व्यक्त करणारं भावगर्भ  असं  हे गीत यशवंत देवां सारख्या संवेदनशील संगीतकाराला भावणं हा आणखी एक सुंदर योग. कवीच्या भावना उत्कटपणे व्यक्त करणारं हे गीत यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलं  आणि ते गाण्यासाठी  साक्षात सुधीर फडके यांचा आवाज लाभावा? हा सुवर्ण योग ?  आपण आपल्या पुरते तरी याला रसिकांचे भाग्य समजूया.   

त्या तरुतळी विसरले गीत कवितेमागची कथा संपूर्णपणे  खरी असो वा नसो. तो विचार दूर सारून.

“ तप्त रणे तुडवीत हिंडतो” 

 “त्या तरुतळी विसरले गीत” 

..हे शब्द  सुधीर फडके यांच्या आवाजात कानावर येतात तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी  आपल्याला व्याकुळ आणि भावनावश करतात इतके मात्र खरे.    

लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एक छानशी गोष्ट – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

एक छानशी कथा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

एका प्रवासी बोटीचा भर समुद्रात अपघात होतो.

त्याच बोटीवर एक जोडप (पती-पत्नी) प्रवास करत असतात. 

ते दोघेही एकमेकांचे जीव की प्राण असतात. बोटीच्या अपघातामुळे ते एकमेकांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात. 

त्यांची नजर आधारासाठी काहीतरी शोधण्यासाठी चहूकडे भीरभीरत असते. 

आणि अचानक त्यांना एक जीवरक्षक बोट दिसते. 

एका म्हणीत म्हटलेल आहे की, 

“डुबत्याला काठीचा आधार”

अगदी तसच होते, ते दोघेही जिवाच्या आकांतान त्या जीवरक्षक बोटीजवळ येतात.

परंतु त्यांची घोर निराशा होते.  त्यांना दिसत की, बोटीत फक्त एकच जागा शिल्लक आहे. 

पती, पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेउन जीवरक्षक बोटीत उडी मारतो. 

पत्नी बुडत्या बोटी वर थांबते.

बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकड़े पाहून जीवाच्या आकांताने काही तरी ओरडून सांगण्यांचा प्रयत्न करते. 

शिक्षक गोष्ट सांगायचे थांबवतात. 

वर्गात निरव शांतता  

वर्गातील प्रत्तेक विद्यार्थी अगदी मन लावून तल्लीन होवून गोष्ट ऐकण्यात गुंग झालेला असतो. 

अनपेक्षितपणे शिक्षकांनी गोष्ट सांगायची का थांबवली हा प्रत्तेकालाच प्रश्न पडलेला असतो. आणि तेवढ्यात शिक्षक  वर्गातील मुलांना विचारतात की, 

पत्नी पतीला काय म्हणाली असेल?

बहुतेक विद्यार्थी तर्क करुन सांगतात की, पत्नी पतीला म्हणाली असेल, 

‘मला तुम्ही धोका दिलात, मी तुम्हाला ओळखलेच नाही, तुम्ही स्वार्थी आहात..!’ 

प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपआपली मते मांडली. तेवढ्यात शिक्षकांचे एका विद्यार्थ्याकडे लक्ष जाते. 

एक मुलगा मात्र गप्पच असतो.

शिक्षक त्याला विचारतात, “अरे, तुला काय वाटते ते पण सांग!”

तो मुलगा म्हणतो, 

“गुरुजी, मला वाटत, त़ी म्हणाली असेल, मुलांना सांभाळा..!”

शिक्षक चकित होउन विचारतात, “तुला ही गोष्ट माहीत आहे का?”

तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो, *”नाही गुरुजी, मला माहित नाही. पण; माझी आई वारली तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती!”

“तुझे उत्तर बरोबर आहे!”

शिक्षक हलकेच म्हणाले.

बोट बुडाली. पतीने घरी जाउन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केल.

खूप वर्षानंतर, वार्धक्याने त्या पतीला जेंव्हा मरण आले तेंव्हा, त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना, त्याच्या मुलीला एक डायरी सापडते.

त्यातून असे समजते की, तीच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो. 

आणि ती त्यातून वाचणार नसते. त्यामुळे पतीला स्वत: जीवंत रहाण्याव्यतिरिक्त दूसरा पर्यायच नसतो.

त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते, “तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती. पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून याव लागल!”

ही गोष्ट आपल्याला सांगण्या मागचा एवढाच उद्देश की,  चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठीमागे, कधी कधी मोठी गुंतागुंत असते. जी आपल्या सहज लक्षात येत नाही.

त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाहीबद्दल लगेच मत बनवून घेउ नये.

जे कोणत्याही कामात पुढाकार घेतात, ते मुर्ख असतात म्हणून नव्हे तर त्याना त्यांची जबाबदारी कळते म्हणून.

जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून नव्हे,तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.

जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला खरा मित्र मानतात म्हणुन…!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वास्तवातली मूल्ये… लेखक : श्री ओंकार दाभोडकर ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆

सौ. राधिका भांडारकर

? वाचताना वेचलेले ?

☆ वास्तवातली मूल्ये… लेखक : श्री ओंकार दाभोडकर ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆

काल लोकलमधे ३-४ मंडळींमध्ये रावणाचं कौतुक करणारं डिस्कशन सुरू होतं. प्रोपागंडा रुजत रुजत सार्वत्रिक मत कसं तयार होतं याचं लाईव्ह प्रात्यक्षिक बघितलं. खोटे हिरो निर्माण करण्याचा प्रकार हसून, गंमत म्हणून सोडून देण्यात आला की सामान्य माणूस कसा घडत जातो याची जाणीव अधिकच ठळक झाली. 

कथा कादंबऱ्या म्हणून प्रसिद्ध झालेली पुस्तकं गाजतात, चर्चा होतात आणि वास्तवाचा अन त्याहून महत्वाचं – मूलभूत मूल्यांचा – सगळा कचरा होऊन बसतो.

रावण त्याच्या गुणांमुळे आदर्श वाटावा असं बरंच काही होतंच त्यात. ज्ञानी, तपस्वी, कर्तबगार, योद्धा…बऱ्याच अनुकरणीय गोष्टी होत्या. रामायणात त्यांची दखल घेतली गेली आहेच. परंतु रावण समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्व होऊ शकत नाही. कारण त्याच्या दुर्गुणांमुळे सगळे सद्गुण मागे पडले.

अहंकारी, दुराग्रही, वासनांध – हेच रावणाचं खरं रूप आहे. हे रूप न ओळखता रावण ग्रेट वाटायला लागला तर ती फक्त सुरुवात असते. हळूहळू आपल्याला श्रीराम कमी महत्वाचे वाटायला लागतात. मग श्रीरामांचे गुण – ज्यांमुळे श्रीराम “श्रीराम” ठरतात – ते झाकोळले जायला लागतात. छत्रपती शिवराय याच श्रीरामाचं चरित्र शिकून स्वराज्य निर्मितीसाठी प्रेरित झाले हे आपण विसरायला लागतो. 

हळूहळू नाळ तुटत जाते.

रावणाने सीता मातेला तिच्या मर्जी विरुद्ध स्पर्श न करणे मोठं आदर्श वर्तन समजलं जातं. एका महिलेच्या अपहरणाचं समर्थन करायला “फक्त युद्ध टेक्निक म्हणून”, “बहिणीच्या अपमानाचा बदला म्हणून” वगैरे कारणं दिली जातात.

मग श्रीरामांनी सीतेची परीक्षा घेतली, प्रेग्नन्ट बायको जंगलात सोडली…हे सगळं खटकायला लागतं.

पण आपल्याला खरी स्टोरी माहितीच नसते. सांगितली गेलेली नसते. त्या स्टोरीचे पर्स्पेक्टिव्हच समजावून सांगितले जात नाहीत. प्रोपागंडा सशक्त होत जातो.

रावणाने सीता मातेला स्पर्श करण्यामागे त्याचं चरित्र नव्हे – हतबलता होती. 

रंभेवर केलेल्या बलात्कारा नंतर चिडून नलकुबेराने “यापुढे कुठल्याही स्त्रीला तिच्या इच्छेशिवाय स्पर्श जरी केलास तरी भस्म होशील” हा शाप दिला होता रावणाला. रावण “असाच” होता. विलासी, भोक्ता, बलात्कारी. राजा असणं, बलवान असणं रावणाने “असं” मिरवलं. वाट्टेल त्या स्त्रीचा, आसक्तीचा भोग घेऊन. (वाल्मिकी रामायणात, ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्यानंतर रावणाने त्रिलोकात माजवलेला हाहाकार स्पष्ट मांडला आहे. स्त्रियांच्या अपहरणासकट. सीतेला आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न करताना रावण हीच शेखी मिरवतो.)

दुसरीकडे राजपुत्र श्रीराम.

पत्नी अदृश्य झाली म्हणून “जाऊ दे!” म्हणून दुसरं लग्न न करणारा. तिच्यासाठी उद्विग्न होणारा. तिला शोधत भटकणारा. ३००० किलोमीटर पायपीट करून अपहरणकर्त्या बरोबर युद्ध करून तिला मुक्त करणारा. 

आणि आपल्या पत्नीवर अमर्याद प्रेम असूनही – स्वतःचं राजकीय, जबाबदार स्थान न विसरणारा.

जनतेचा आपल्या राणीवर विश्वास असायला हवा हे ओळखणारा.

सीता एका रामाची बायको नव्हती फक्त. ती महाराणी पदावर विराजमान होती. सिंहासनावर बसलेला राजा विष्णूचा अवतार मानून त्याला दिशादर्शक मानणाऱ्या समाजाचा काळ होता तो. तिच्या पोटी जन्मणारं अपत्य पुढे सिंहासनावर बसणार होतं. सीता त्या राज्याची माता होती.

जनतेचं मन मातेबद्दल कलुषित झालं असेल तर लोक पित्याला मानतील?

सिंहासनावर त्यांची श्रद्धा टिकून राहील? स्थैर्य असेल राज्यात? 

मुळात असं राज्य टिकेल?

जनतेला काही कळत नाही – असं म्हणून सोडून देता येत नसतं. सिंहासनावर बसलेल्या राजाला – जर तो रावणासारखा उन्मत्त, बेफिकीर, बदफैली नसेल तर – हा सगळा विचार करावा लागतो. तेच त्याचं पहिलं कर्तव्य असतं. तो नवरा नंतर असतो – सर्वात आधी तो जनतेचा राजा, प्रतिपाळ करणारा असतो.

म्हणून त्याने स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी अतिशय कठोर नियम पाळायचे असतात.

हे चूक नाही का? सीतेवर हा अन्याय नाही का? लव-कुशवर हा अन्याय नाही का?

आहेच. रामासकट – सीता, लव-कुश या स्वतंत्र व्यक्तींवर हा अन्याय नक्कीच आहे. पण राजा – राणी – राजकुमार यांचं हे कर्तव्य आहे. दुर्दैवी वाटेल कदाचित. पण स्वायत्त यंत्रणांची विश्वासार्हता टिकवायची असेल तर हे अत्यावश्यक आहे.

आधुनिक काळात हे कसंसंच वाटत असेल कदाचित. पण आजही इंग्रजीत जेव्हा Caesar’s wife must be above suspicion म्हटलं जातं तेव्हा कौतुकाने मान डोलावतोच आपण. सिझरच्या बाबतीत झटकन सहमत होणारे आपण, श्रीरामांनी स्वतःच्या आवडीनिवडीवर, स्वातंत्र्यावर, सुखावर सतत, जन्मभर पाणी सोडलं हे सहजच विसरून जातो.

महत्वाच्या राजकीय पदावर विराजमान असलेल्याना व्यक्तिस्वातंत्र्य एका मर्यादेतच असणार. त्यांच्यासाठी नैतिकतेचे नियम अधिक कठोर, अधिक अरुंद असणार.

पूर्वीही असंच होतं – आजही असंच आहे. (किमान असायला हवं!)

वाट्टेल तसं वागण्याचं स्वातंत्र्य सामान्य व्यक्तीला ठीकाय.

राजाला ते स्वातंत्र्य नाही.

सीझरला ही नाही, त्याच्या पत्नीला ही नाही.

हे भान श्रीरामांना होतं.

म्हणून ते श्रीराम होते.

सत्तेत धुंद झालेला, वाट्टेल तेव्हा वाट्टेल ते करणारा रावण – म्हणूनच – पंडित, महादेवाचा भक्त वगैरे असूनही – आपला आदर्श होऊच शकत नाही.

म्हणूनच – राम की रावण, अर्जुन की कर्ण – हा निर्णय कादंबऱ्या वाचून करू नये.

मूळ चरित्र वाचून, समजून मग करावा.

कारण मुद्दा राम की रावण या दोन व्यक्तींचा नाहीच.

तो तसा कधीच नसतो.

मुद्दा या दोन्ही नावांमागील मूल्यांचा असतो.

ती मूल्यं सर्वात महत्वाची.

म्हणूनच श्रीराम महत्वाचे!

जय श्रीराम!

लेखक : श्री ओंकार दाभोडकर

प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ’आई ही आई असते‘ — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ’आई ही आई असते‘ — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर 

– जराशी गंमत. 

  • आयझॅक-न्यूटनची आई : पण खायच्या आधी ते सफरचंद स्वच्छ धुतलंस तरी का??
  • आर्किमिडीजची आई : गाढवा ! रस्त्यावर नागडा पळत जायला लाज वाटली नाही का? आणि ही पोरगी, युरेका, आहे तरी कोण?
  • एडिसनची आई : अर्थात मला फार अभिमान वाटतो तुझा, इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावल्याबद्दल. पण आता घालव तो दिवा आणि झोप मुकाट्यानं !
  • जेम्स वॅटची आई : सारखं झाकण उडताना आणि पडताना बघत राहिलास, तर तो भात करपेल की रे टोणग्या! गॅस बंद कर आधी तो!
  • ग्रॅहम बेलची आई : ह्या डबड्याचा शोध लावलास ते ठीक. पण याद राख, पोरी बाळींनी रात्रीअपरात्री फोन केले तर मला चा ल णा र नाही!
  • मोनालीसाची आई : तुझ्या दातांच्या क्लिपांवर इतका खर्च करून शेवटी असं मोजकंच हसलीस होय!
  • गॅलेलियोची आई : मेल्या! तुझ्या त्या टेलेस्कोपचा उपयोगच काय, जर त्यातून माझं मिलानोमधलं माहेर दिसत नसेल तर??
  • कोलंबसची आई : कुठेही जा, कितीही फिर, पण घरी एक चार ओळींचं पत्र खरडायला बिघडतं काय म्हणते मी?!
  • मायकल अँजेलोची आई : इतर पोरांसारखा भिंतीवर रेघोट्या मार रे. ते छतावरचे राडे साफ करायला कंबरडं मोडतंय की माझं!
  • बिल गेट्सची आई : दिवसभर त्या कॉम्प्युटरला चिकटून असतोस, हरकत नाही. पण अडल्ट साईट बघताना दिसलास तर माझ्याशी गाठ आहे, सांगून ठेवते !
  • फॅरेनहाइटची आई : त्या उकळत्या पाण्याशी खेळत बसलास तर मी चहा कधी टाकणार?!
  • अलबर्ट आईनस्टाइनची आई : कॉलेजचा ग्रुप फोटो आहे बाळा. जरा डोक्याला स्टायलिंग जेल वगैरे काहीतरी लाव की!

~~~~~●●○○■■○○●●~~~~~

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कालजयी…” – लेखक : प्रा. डॉ. श्रीकांत तारे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “कालजयी…” – लेखक : प्रा. डॉ. श्रीकांत तारे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

वपुंसोबत शेअर केलेलं असंख्य अविस्मरणीय क्षण मी मनाच्या गाभाऱ्यांत जपून ठेवले आहेत. मधूनच कुणीतरी भेटतं, वपुंचा विषय निघतो, नवीन काही आठवणी बाहेर येतात, अलगद मी भूतकाळांत शिरतो. ‘ज्या चहेत्यांमुळे आज आपण एका विशिष्ट उंचीला पोहोचलोय, ते चहेते म्हणजे आपलं सर्वस्व’ हे ब्रीदवाक्य असणारा आणि माणुसकी जपत आभाळाची ऊंची गाठणारा असा एक ‘कालजयी’ माणूस त्याच्या निर्वाणापर्यंत आपल्या मित्रपरिवारांत होता याकरता स्वत:चाच हेवा वाटू लागतो.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमांत, मंगला गोडबोल्यांची मुलाखत घ्यायला आलेली लेखिका नीलिमा बोरवणकर भेटली. कार्यक्रमानंतर एकत्र बसून जेवताना मी वपुंचं नाव घेतलं आणि नीलिमा रोमांचित झाली. खांदे उडवत म्हणाली ,

‘वपुंच्या ऐन उमेदीतील हा किस्सा तुला ठाऊक नसणार’. प्रीमियर ऑटोमोटिव्ह कंपनीचे उपाध्यक्ष होते केशव पोळ. पुण्यात कोथरूडला रहायचे. वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर किडनी बिघडल्या आणि आठवड्यातून दोनदा डायलिसीस करायचा सल्ला डॉक्टरांनी दिला.’

‘बाप रे, वय वाढत गेलं की डायलिसीस कठीण होत जातं.’ मी ऐकीव माहितीवर ज्ञान पाजळलं.

‘हो ना. त्यातून तीस वर्षांपूर्वीचं  डायलिसिस आजसारखं सोपं नव्हतं. पेशंटचे हाल व्हायचे. दोन दिवस दवाखान्यात रहावं लागायचं. घरी आलं की पुढल्या डायलिसिसची मानसिक तयारी करावी लागायची.

दवाखान्यातील त्रासाच्या धसक्यानं रात्र रात्र झोप लागायची नाही. पोळांची पत्नी मग वपुंच्या कथाकथनाची कॅसेट त्यांच्या डोक्याशी लावून त्यांचे पाय चेपत बसायची, वपुंनी सांगितलेली कथा डोक्यात घोळवीत, पोळ झोपी जायचे.’

माझ्या चेहऱ्यावर स्मित आलं. वपुंच्या कॅसेट्ची किमया मी स्वत: कितीदातरी अनुभवली आहे. एकबोटे, भदे, दामले, नळात जाऊन बसलेली भुताची पोरं वगैरे पात्रं, त्यांच्या तोंडचे संवाद मला अक्षरश: तोंडपाठ होते. कॅसेटच्या रूपाने वपु आमच्या घरांत शिरले आणि आमच्या कुटुंबाचा एक भाग झाले. मी नीलिमाला हे सारं सांगणारच होतो, तर मला हाताने थांबवत ती म्हणली,

‘थांब, रे, ही नुसती प्रस्तावना होती, खरा किस्सा तर पुढे आहे. पोळांची दगदग कमी व्हावी म्हणून प्रीमियर कंपनीनं त्यांना घरीच डायलिसीसचं मशिन बसवून दिलं. ओळखीचे एक डॉक्टर, बरोबरीला एक सहाय्यक, एक नर्स अशी टीम यायची, पोळांना घरीच डायलिसिस लावलं जायचं. गंमत म्हणजे, या दरम्यानही वपुंच्या कथाकथनाची कॅसेट त्यांच्या डोक्याशी लावून त्यांचं दुखणं हलकं करण्याचा प्रयत्न केला जायचा.’

मी ऐकतच राहिलो. तीस वर्षापूर्वी घरच्या घरी घरी डायलिसीस करता यायचं ही बातमी माझ्यासाठी आजही थक्क करणारी होती. मी माझं आश्चर्य नीलिमाला बोलून दाखवलं आणि तिनं समोरच्या टेबलवर हलकीशी थाप मारली.

‘बरोबर हेच वपुंना वाटलं. म्हणजे झालं काय की पोळांच्या पत्नीने वपुंना फोन केला एकदा. नवऱ्याचा आजार, घरी लावलेली मशीन, डायलिसीसचे निश्चित दिवस. हे सगळं बोलून झाल्यावर त्यांनी वपुंचे मनःपुर्वक आभार मानले. तुमच्या कथांचा आणि त्या रंगवून सागणाऱ्या तुमच्या आवाजाचा खूप आधार वाटतो माझ्या नवऱ्याला, डायलिसीस होत असतां मी त्यांचे पाय चेपते पण त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येतं ते तुमच्या आवाजाने. तुमचे ऋण फेडणं कठीण आहे वगैरे बोलल्या. वपुंनीही अगत्याने पोळांच्या प्रकृतीची माहिती करून घेतली, बाईंना धीर दिला. डोळे पुसतच, अतीव समाधानाने बाईंनी फोन ठेवला.’

निलीमा बोलत होती आणि मला वपुंबरोबर माझे टेलिफोनवर घडणारे संवाद आठवत होते. आपल्या चहेत्यांचे फोन घेताना एक नैसर्गिक आनंद त्यांच्या प्रत्येक शब्दांत जाणवायचा. वाचकाने केलेली त्यांच्या लेखनाची तारीफ, समीक्षा, आलोचना, त्याचे व्यक्तिगत प्रश्न, सल्ले, वपु श्रद्धेनं ऐकायचे. एखाद्या वाचकाशी बोलताना त्यांनी वेळेचा विचार केलेला माझ्या ऐकिवात नाही. वपुंच्या मधाळ आवाजाने, आणि आपण त्यांचे ‘खास’ आहोत या जाणीवेनं तृप्त होऊन वाचक फोन ठेवायचा. आठवून माझ्या चेहऱ्यावर आगळी चमक आली असावी, कारण आणि नीलिमा हसली. माझ्या मनातले विचार तिने नेमके ओळखले. माझी उत्कंठा पुरेशी ताणली गेलीय याची खात्री करून घेत तिने पुन्हा सुरुवात केली,

‘तर, या टेलिफोन संवादानंतर दोनेक आठवडे उलटले आणि एके दिवशी अचानक, वपुंचा फोन आला पोळांकडे. कथाकथनाच्या कार्यक्रमा निमित्त पुण्यांत येतोय, कार्यक्रम रात्री आहे, पण पोळसाहेबांच्या डायलिसीसचा दिवस असल्याने डायलिसीस मशीन ऑपरेट होताना बघण्याची इच्छा आहे अश्या अर्थाचा तो फोन होता. वपु आपल्या घरी येणार या नुसत्या कल्पनेनं पोळांकडे उत्साहाला उधाण आलं. त्याकाळी मोबाईल हातात आले नव्हते पण मुंबईहून ते येणार म्हणजे मुंबईहून कितीही लवकर निघाले तरी सकाळी दहा साडे दहाच्या आधी त्यांचं येणं शक्य नाही असा अंदाज पोळ कुटुंबीयांनी बांधला. आपला आवडता लेखक, कथाकथनसम्राट प्रत्यक्ष आपल्या घरी येणार म्हणून शक्तिहीन पोळही वेगळ्याच विश्वात वावरत होते. आणि तुला गंमत सांगते श्रीकांत, सकाळी आठ वाजताच पोळांच्या दारांत वपु हजर होते. भल्या पहाटे चार वाजता त्यांनी मुंबई सोडलं आणि सकाळी लवकर डायलिसीस करायचं असतं हे ठाऊक असल्यामुळे स्पेशल टॅक्सी करून वपुंनी पोळांची ही वेळ गाठली.’

‘माय गॉड. व्हेरी इंटरेस्टिंग.’

‘हो ना. पोळांकडे हीsSSS धांदल. डॉक्टर येऊन बसलेले, सहायक कामाला लागले आणि वपु घरात. एका खुर्चीवर शरीराचा डॉक्टर बसलेला तर दुसरीवर मनाचा. श्री व सौ पोळ यांना तर काय करावं सुचेना,डायलिसीस नित्याचं असलं तरी आज उडालेली त्यांची तारांबळ काही वेगळीच होती.’

निलिमाच्या कथेत मी गुंगत चाललो. पोळ कुटुंब, वपु आणि डॉक्टर यांचे सोबत एका खुर्चीवर मीही जाऊन बसलो. पोळांकडील गड्याने वपुंसोबत मलाही चहा दिला, घड्याळाकडे बघत असलेल्या डॉक्टरांना आग्रहाने मी चहा दिला, वातावरण अधिकाधिक खेळकर करणाऱ्या मस्त गप्पा मारत वपुंनी चहा संपवला, आपला आजार विसरून पोळ, वपुंच्या बोलण्याला, कोट्यांना खळखळून दाद देताहेत, टाळी घेण्यासाठी पुढे केलेला हात माझा आहे कि वपुंचा याकडे लक्ष न देता उत्साहाने टाळी देताहेत हे सारं मला स्पष्ट दिसत होतं. वपु माझ्या घरी आल्यावर होणारी धावपळ आठवत, काही वेळासाठी मी पोळांच्या घरचा एक सदस्य झालो. निलिमाचंही असचं काहीसं झालं होतं. या क्षणी माझ्याबरोबर बहुधा तीही पोळांकडे पोहोचली असावी. तिचा स्वर गंभीर झाला. रणांगणावरील देखावा धृतराष्ट्राला सांगताना संजयचा झाला असेल तसा.

‘तर डायलिसीसची तयारी झाली, पोळांना पलंगावर झोपवलं, सौ पोळांनी कपाटातून कथाकथनाची कॅसेट काढली आणि टेपरेकॉर्डरच्या खटक्याचा आवाज ऐकून, आतापर्यंत डायलिसीस मशीनचं सूक्ष्म निरीक्षण करत असलेले वपु अचानक पलंगापाशी आले. सौ पोळांना थांबवत म्हणाले, आज कॅसेट नाही, वपु आज स्वत: पोळांजवळ बसून नवीन कथा त्यांना सांगतील. सौ पोळ ह्बकल्याच हे ऐकून, मग भानावर येत त्यांनी गड्याला खुर्ची लावायला सांगितली, पोळांच्या डोक्याशी खुर्ची ठेवली गेली, आणि वपुंनी नम्रपणे ती खुर्ची नाकारली. सौ पोळांसाठी राखीव खुर्चीवर पोळांच्या पायाशी बसू द्यायची त्यांनी विनंती केली आणि सौ पोळ गहिवरल्या. डोळे पुसतच त्यांनी पायथ्याची खुर्ची रिकामी केली. वपुंची कथा प्रत्यक्ष त्यांचेकडून फक्त आपल्याला ऐकायला मिळणार या अवर्णनीय आनंदानं डॉक्टर, त्यांचे सहकारी, सौ पोळ प्रचंड भारावले. पोळांचं डायलिसीस सुरु झालं, त्यांच्या पायाशी वपु बसले, आपलं चिरपरिचित स्मित चेहऱ्यावर खेळवीत, धीरगंभीर आवाजांत त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली.’

किस्सा सांगता सांगता नीलिमा थबकली. शब्दांची जुळवाजुळव तिला करावी लागत असावी. ‘श्रीकांत, आणि….आणि कथा सांगता सांगता वपु चक्क पोळांचे पाय चेपू लागले. चारच श्रोते, पण सारेच अंतर्बाह्य थरारले, स्वप्नातही कल्पना न करू शकणारं दृश्य आपण आज बघतोय याची जाणीव तिथल्या साऱ्यांनाच होत होती. वपुंची कथा विनोदी असूनही श्री व सौ पोळांच्या डोळ्याला धार लागली.’

किस्सा संपवताना निलिमाच्या अंगावरील रोमांच मला स्पष्ट दिसत होता. माझ्या तर संवेदनाच खुंटल्या होत्या. मागे कधीतरी वपुंशी बोलत असतां, ’माझ्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ कथाकथनाच्या प्रयोगाला फक्त चारच श्रोते हजर होते’ असं त्यांनी म्हटलेलं मला नेमकं तेव्हाच आठवलं, कधीच सुटणार नाही म्हणून मनाच्या कोपऱ्यांत दडवून ठेवलेलं कोडं अचानक उलगडलं.

माणसं समजून घेत त्यांना आनंदात ठेवण्याची सातत्याने धडपड करीत जगलेल्या या ग्रेट लेखकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

लेखक : प्रा डॉ श्रीकांत तारे

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एक होती चिमणी आणि एक होता कावळा. 

चिमणीचं घर होत मेणाच, याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. 

एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. 

झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. 

कावळयाच घर होत शेणाच, ते गेले  पाण्यात वाहून, कावळा काकडला. आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवलं, 

चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. 

पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’ 

चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते’

थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’ 

चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला झोपवते’ इकडे कावळयाला खूप भूक लागली होती. 

पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला पण चिमणीने काही केल्या दार उघडले नाही.

 गोष्टीचा पुर्ण केलेला उत्तरार्ध – 

चिमणीचे सगळे काम आटोपले

ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की, 

अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. 

तिला विलक्षण अपराधी वाटलं. 

तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. 

ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता.

‘गेला असेल कुठेतरी… येईल परत’ 

…. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली. 

मात्र, रात्र मावळली… दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. 

चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … 

कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… 

तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं… 

अनेक दिवस उलटले …

चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. 

मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. 

एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला… 

तो ‘कावळ्याचा’ आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला काय आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. 

तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय! 

कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. 

कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, 

‘या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?’ 

कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,

– ‘तुला राग नाही आला माझा?’

– का यावा? 

– मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?

– छे छे ! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. 

तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती 

माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. 

माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोन्हीही गोष्टी ‘अतिक्रमणासारख्याच’ घडल्या असत्या नाही का?

. ..  आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर ‘अतिक्रमण’ करणे चूकच नाही का?

.. ..  म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.

– मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.

– चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. 

जेव्हा आपण एकटे आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती, जो दाखवत असतो आपल्याला वाट ..  आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या ‘घरट्यात’… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या ‘माझ्या माणसांमध्ये’

चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला –

— चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता.

चिमणीचे डोळे पाणावले… भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे… 

पण आज तिच्या पंखात पूर्वीइतकं बळ राहिलं नव्हतं….

आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय. 

– म्हणजे ?

– म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या ध्यानीच नसतं. 

ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात…

त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही

…. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो 

…’थांब मला जरा  करिअर करु दे…. थांब जरा मला आता घर घ्यायचय… थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब मला काम आहे … थांब मला विश्रांती घ्यायची आहे … थांब जरा मला आता ….’ आणि मग ही जंत्री वाढतच जाते.

त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात… त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं… आपल्या ते लक्षात नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा …. 

.. .. आपण फार एकटे झालेले असतो…. !!

– आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर? 

मला कोणाचीच  गरज नाही हा अहंपणा बाळगू नका 

– वेळीच ‘टकटक’ ऐकायला शिका.

वेळ प्रत्येकाची येते।।.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares