मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ एका वडाची गोष्ट… – लेखक : श्री श्रीनिवास चितळे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ एका वडाची गोष्ट… – लेखक : श्री श्रीनिवास चितळे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

१९६७  साली चिपळूणला मोठा भूकंप झाला आणि चिपळूणच्या इतिहासाचा शे, दीडशे वर्षाचा साक्षीदार उन्मळून पडला, वडाच्या नाक्यावरचा वड भुईसपाट झाला, काही दिवसांनी एका समारंभात देवळात आधी भंगलेली मूर्ती विसर्जित करून नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करतात तशी नवीन वडाची फांदी त्या जागी स्थापित केली गेली, आमच्या दादानी घरातील भालावर खडूने लिहिले वड. दिनांक ४/२/१९६७. पूर्वी घरात मुल जन्माला आल कि अशी नोंद, घरातील भालावर खडूने करून ठेवायची जुन्या लोकांना सवय होती, माझ्या जन्माची नोंदही अद्याप तिथे होती. ” २८ मे १९५६, सकाळी ११. २० वाजता सिंधू प्रसूत झाली, मुलगा झाला “.

 चार, पाच  वर्षांनी गावातील स्त्रिया माझ्या चुलत्यांकडे आल्या व म्हणाल्या बन्या काका, वड मोठा झाला आहे, यावर्षी याची पूजा केलीतर चालेल का ? खूप लांब पागेवर पुजेला जायला लागत. दादा म्हणाले ठीक आहे, करतो सोय.

दादा तसेच उठले व वाण्याळीत खेडेकरांकडे गेले व म्हणाले महादेवशेठ, नाक्यावरच्या वडाची मे मध्ये मुंज करायला हवी, वडपौर्णिमेच्या पुजेला मुंज झालेला वड हवा.

महादेवाशेठ म्हणजे राजा माणूस, “बन्या, दणक्यात करू मुंज, सगळी तयारी कर, खर्च वाटेल तेवढा होऊदे “.

मुहूर्त काढला गेला, रीतसर मुंजीच्या पत्रिका छापल्या गेल्या, साग्रसंगीत बहिरीबुवा ते विन्ध्यवासिनी अशी देवाची आमंत्रण झाली. गावाला  सनई चौघाडयासह मिरवणूकीने आमंत्रणाची अक्षत फिरवली गेली, आणि सगळ गाव, तेव्हा लहान होत, घरातील मुलाची मुंज असावी अशा तयारीला लागला.

प्रत्यक्ष मुंजीच्या दिवशी तर धमाल, वडा भोवती मांडव घातलेला होता, प्रवेश दारावर केळीच तोरण, मुलीनी रांगोळ्या काढलेल्या, गावातील नवविवाहित जोडप्याकडे यजमानपद दिलेलं होत. दोन दिवस आधी ग्रहमक झाला होता, घरचे केळवण झाले त्याला शे शंभर माणसांची पंगत उठली होती. देवक ठेऊन झाल, अष्टवरघ्य, मातृ भोजन झाले आणि बरोबर १०. २३ मिनिटांनी कुर्यात बटोर मंगलम झाल, सनई, चौघडे, ताशे यांनी सर्व आसमंत दणाणून गेला. संध्याकाळी पालखीतून वडाच्या प्रतिकृतीची भिक्षाळा निघाली होती.

वड द्विज झाला. यज्ञोपवीत घातलेला, दृष्ट लागू नये म्हणून काजळाची तीट लावलेला, हळदी कुंकू लावलेला तो वड हि बटू सारखा देखणा व तेजःपुंज दिसायला लागला.

खेडेकरशेठ ना एक नवीन पैसा हि खर्च करावा लागला नाही, प्रत्येकाने स्वतःच्या घरच कार्य समजून सर्व सेवा फुकट दिली होती.

बासुंदी पुरीचा व १५० माणसांचा जेवणाचा खर्च मुंबई, पुण्यात स्थायिक झालेल्या चिपळूणकरानी उचलला होता.

त्या नंतर आलेल्या वड पौर्णिमेला स्त्रियांचीच नव्हे तर पुरुषांचीही रीघ वडावर लागली होती बटू पादोदक तीर्थ घ्यायला.

त्याकाळी माणसं  खूप साधी होती, हि अंधश्रद्धा नाही का अस विचारणारा एकही सूर तिथे नव्हता, होता तो एक उत्कृष्ठ सार्वजनिक कामाचा जल्लोष आणि आनंद.

श्रीनिवास  चितळे 

(फोटोत तो वड दिसतोय, ज्याची ही गोष्ट आहे.)

 

लेखक : श्री श्रीनिवास चितळे 

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “हेच तर ते देवदूत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “हेच तर ते देवदूत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

भर पावसात भिजत उभ्या असलेल्या तरूणास विचारले , “नुसताच भिजतो कश्याला?”

 तो उत्तरला “नही साब”.. त्याच्या डाव्या बाजूला जमिनीकडे बोट दाखवतं तो म्हणाला,

“इधर निचे बडा पाईपलाईन है. ढक्कन निकल गयेला है”

तो त्या मॅनहोलमध्ये कोणी पडू नये, म्हणून तिथे ऊभा होता!

रस्त्याखालचा पाईप पूर्ण भरला असावा, अन्यथा पाणी चक्राकार आत घुसताना दिसले असते. फुटभर ऊंचीचे पाणी वरून वेगाने जात होते. पायी चालणाऱ्याला वा दुचाकीवरून जाणाऱ्या कोणाला जाणवलेही नसते, की खाली खोल सांडपाण्याचा पाईप आहे!

मी अवाक झालो!

कोण होता हा? कोणासाठी हा असा पाण्यात ऊभा राहिलायं?

मी भरं पावसातं खाली ऊतरलो. त्याला म्हंटले, “बहोत बढिया, भाई!”

तो फक्त कसनूसं हसला आणि म्हणाला,

“बस, कोई गिरना नै मंगता इधर”

“कबसे खडा है?”

“दो बजे से”

घड्याळातं पाच वाजले होते..!

३ तास तसेचं ऊभे राहून याला भूक लागली असणारं. दुर्दैवाने माझ्याकडे काहीच नव्हते. सगळी दुकानेही बंदं. हा भूक लागल्यामुळे जागा सोडेल, असे काहीच चिन्ह नव्हते!

कुठल्या प्रेरणेने तो हे करतं होता? त्या घाण गुडघाभर ऊंचीच्या पाण्यात उभे राहून तो तीन तासांपासून कोणाला वाचवतं होता? आणि का? दोन वाजल्यापासून त्याने कित्येक  जणांना वाचवले असणार. कोणाला त्याची जाणीवही नव्हती. खुद्द याला तरी त्याची कुठे पर्वा होती?

ही अशी छोटी छोटी माणसें हे जग सुंदर करून जातात!

मागच्या डिसेंबरमध्ये दादरला फुटपाथवर एक आंधळा म्हातारा ‘कालनिर्णय’ विकतं बसलेला दिसला.

दुकानातून घेण्याऐवजी, याच्याकडून घेतलेले काय वाईट, असा विचार करून थबकलो.

“केवढ्याला ‘कालनिर्णय’, काका?”

“फक्त बत्तीस रूपये, साहेब” केविलवाणे तो म्हणाला. सकाळपासून एकही विकले  गेलेले दिसतं नव्हते. मी एक घेतले. पन्नासची नोट होती. ती त्याला दिली. हाताने चाचपडत तो ती नोट तपासतचं होता, की अचानक उंची कपडे घातलेला साठीतला एक देखणा गृहस्थ खाली वाकला.

“कितने का है ये?”

“बत्तीस रुपया”

“कितने है?”

“चौदा रहेंगे, साब”

ज्याला मराठी येतं नाही, असा हा माणूस मराठीतले कालनिर्णय कशासाठी विकत घेतोयं?

त्या माणसाने खिशातून साडेचारशे रुपये काढून त्याला दिले आणि ते सगळे कालनिर्णय बखोटीला मारले! 

मी आश्चर्यचकित..! छापील किंमतीत विकतं घेतोय, म्हणजे पुनर्विक्रीसाठी निश्चितच घेतं नाहीये. तसाही, कपड्यांवरूनही हा असले किरकोळ धंदा करणाऱ्यातला वाटतं नव्हता.

तो गृहस्थ थोडा पुढे गेला असेल. मला राहवलेचं नाही. मी थांबवून त्यांना विचारलेच!

हे मुळचें लखनौचे महोदय एअरइंडियातल्या मोठ्या पदावरून नुकतेचं निवृत्त झाले होते. शिवाजीपार्कात स्वत:चे घर होते. एकुलता एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता. लठ्ठ पेन्शन येत होती.

“वो बेचारा पंधरा कालनिर्णय बेचके कितना कमाता होगा? सौ, डेढसौ? वैसे भी बेचारे को सौ रुपये के लिए दिनभरं ऐसेही धुप मे बैठना पडता था. मैने ऊसका काम थोडा हलका करं दिया. बस इतनाही!”

मला काही बोलणेचं सुचले नाही! पण एवढ्या चौदा कालनिर्णयांचे तो करणारं काय होता?

“सोसायटी मे बहोत मराठी फ्रेंडस है, उन को बांट दूंगा!”

मी दिग्मूढ!

“तु एक मिनीट लेट आता, तो तुझे भी फोकट मे देता!” मला डोळा मारतं, हसतं तो लखनवी देवदूत रस्ता पार करून गेला सुद्धा!

माणूसकी याहून काय वेगळी असते? 

एखाद्या हॉस्पिटलबाहेर ‘तात्काळ रक्त हवे’ असा फलक वाचून, ऑफिसला वा घरात जायला ऊशीर होईल, याची तमा न बाळगतां रक्त देणारे कोण असतात? ते ही रांग लावून! 

कोण असतात हे? कुठल्या जातीचे? कोणत्या धर्माचे? ‘भैये’ असतात की ‘आपले’ मराठी?

मुंबईत रस्त्यावर चहा विकणारे लाखो ‘चायवाले’ आहेत. 

बहुतांश उत्तरेकडले. सकाळी चहा बनवल्यावर पहिला कपभरं चहा ते रस्त्यावर फेकतात.

दिवसाचा पहिला चहा रस्त्यावर न फेकता भिकाऱ्याला पाजणारा बांद्र्याचा एक ‘चायवाला’ मला माहिती आहे! सकाळी सकाळी भिकारी आलाचं नाही, तर एका भांड्यात तेवढा चहा बाजूला काढून, धंद्याला सुरूवात करतो!

“बर्कत आती है” एवढीचं कारणमिमांसा त्याने दिली होती.

डोळे ऊघडून पाहिले, तर असे असंख्य अज्ञात देवदूत आपल्याला ठायीठायी आढळतात, पण आपली नजरचं मेलेली असते.

परवा थायलंडमध्ये गुहेत अटकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी हजारो अनामिक हात मदतीस आले. 

गुहेतले पाणी पंपाने बाहेर काढावे लागले. ते पाणी कुठे फेकले?

ज्याच्या शेतातं ते पाणी फेकावे लागले, त्या शेतातलें तीन एकरातले ऊभे पिक या पाण्याने अक्षरशः वाहून गेले. एका छोट्या शेतकऱ्यासाठी हे प्रचंड नुकसान.

एका पत्रकाराने त्या शेतकऱ्याला या नुकसानीविषयी खोदून खोदून विचारले.

“नुकसानीचे काय एवढं? मुले वाचली ना? पेरणी परतं करता येईल. मुलांचे प्राण परतं आणता आले असते का?”

हे ऊत्तर ऐकूनचं डोळ्यात पाणी आल!

हे जग सुंदर आहे. ते सुंदर करणारे अनामिक देवदूत आजही या जगात आहेत आणि राहतीलही.

फक्त तो तिरस्काराचा, आत्मकेंद्री स्वार्थाच्या काळ्या काचांचा गॉगल डोळ्यावरून काढला पाहिजे!

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अन्नपूर्णा – लेखिका : सुश्री पूजा साठे पाठक ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ क्षणभर – लेखिका : सौ. कांचन दीक्षित ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

हल्लीच्या काळात चोवीस म्हणजे तसं फारच लवकर लग्न झालं होतं तिचं. कोकणातल्या एका गावात , खटल्याच्या घरात राहत असलेली ती. माहेरी नारळी पोफळीच्या बागा, अस्सल हापूस दारात आणि घरामागे समुद्राची गाज. एकत्र कुटुंब असल्याने तिला भरपूर लोकांची सवय होतीच पण घरात लहान असल्याने स्वयंपाक घरात जायची फार वेळ आली नव्हती. 

तिचं लग्न होऊन ती गेली जवळच्याच गावात. अंतराने जवळ असलं तरी शेवटी दुसरं गावच. इथे प्रत्येक गावाची वेगळी पद्धत. नवीन गावाहून आलेल्या मुलीला बघायला पुर्ण गाव येणार आणि बायका अगदी बारीक निरखून बघणार तिला. कोणी कौतुकाने, कोणी असुयेने तर कोणी असच मायेने. 

लग्नानंतर आलेला पहिलाच सण गुढी पाडव्याचा. दोन दिवस आधी बेत ठरला. गोणीतून समान काढून झालं. आंब्यांची रास लागली. दुसऱ्या दिवशी कोणी कधी उठून काय काय करायचं याची उजळणी झाली. ती नवीन नवरी असल्याने तिला अर्थात च लिंबू टिंबू कामे दिली होती, पण ही लगबग तिला नवीन नव्हती. 

जसा पाडवा जवळ आला तशी ती वेगळ्याच चिंतेने ग्रासली. ते एकमेव कारण ज्यामुळे तिला या पंक्ती च जेवण अजिबात आवडत नसे, ते म्हणजे बायकांची पंगत बसेपर्यंत होणारी उपासमार!

लहान होती तेव्हा मुलांच्या पंगतीत तिचं जेवण व्हायचं, पण मोठी झाल्यावर तिलाही थांबावं लागायच च. सकाळपासून तयारीची गडबड, स्वयंपाक घरातल्या धुराने चुरचुरणारे डोळे, वाढताना वाकून वाकून दुखायला लागलेली कंबर याने ती अगदी वैतागून जायची. बायकांची पंगत बसायला जवळ जवळ चार वाजायचे, मग समोर यायच्या गार भजी, उरलेल्या मोडक्या कुरडया, तळाशी गेलेला रस आणि कोमट अन्न. कितीही सुग्रास असलं तरी दमल्याने, भूक मेल्याने आणि गार अन्नाने तिची खायची इच्छा मरून जायची.

तिथे तरी आई मागे भुणभुण करता यायची. इथे? भूक तर सहन होत नाही आपल्याला, मग काय करायचं? असो, होईल ते होईल म्हणत ती झोपी गेली. 

सकाळी पाच वाजता बायका उठल्या. अंगणात सडा पडला, दोन धाकट्या नणंदा रांगोळी काढायला बसल्या. सगळ्यांना चहा फिरला आणि बायका जोमाने स्वयंपाक घरात कामाला लागल्या.चटणी , कोशिंबीर, पापड, गव्हल्यांची खीर, कुरडया, भजी , कोथिंबीर वडी,बटाटा भाजी,मटकी उसळ, पोळ्या, पुऱ्या, वरण भात , रस, रसातल्या शेवया आणि नावाला घावन घाटलं. पटापटा हात चालत होते. फोडण्या बसत होत्या. विळीचा चरचर आवाज येत होता. खमंग वास दरवळत होते. 

हिने दोन चार सोप्या गोष्टी करून मदत केली.अध्येच पोहे फिरले. वाटी वाटी पोहे असे काय पुरणार? पण पोटाला आधार म्हणून खाल्ले.

बारा वाजत आले. नैवेद्याचे ताट तयार झाले. देवाचा , वास्तूचा, गायीचा, पितरांचा नैवेद्य वाढला गेला.

आता पंगती बसणार! ती तयारीतच होती. माजघर पुन्हा एकदा केरसुणीने स्वच्छ झाले. ताटे मांडली, रांगोळ्या घातल्या गेल्या. पोरी सोरींनी लोटी भांडी ठेवली. 

मुलांची पंगत बसली. अर्धेमुर्धे खाऊन मुले उठली. तिने खरकटे काढले आणि माजघर पुसून घेतले. पुन्हा ताट मांडली, रांगोळ्या काढल्या.

आणि आतून सर्व पुरुष मंडळी आत आली. “चला सर्व अन्नपूर्णा !” आजे सासर्ऱ्यांचा दमदार आवाज आला तशा सगळ्या जणी बाहेर आल्या. “बसा पानावर” ते म्हणाले.

ही गांगरलीच ! हे काय वेगळंच? आता पुरुष मंडळींची पंगत असते ना?

पण सगळ्या बायका जाऊन पानावर बसल्या. हिलाही सासूबाईंनी हाताने खूण केली. ही पण अवघडून एका पानावर जाऊन बसली.

आजे सासर्ऱ्यांनी तिथूनच सर्वांना नमस्कार केला आणि पान सुपारी ठेवली.

“आज काय आणि रोज काय, पण या अन्नपूर्णा आपल्यासाठी जेवण रांधतात आणि आपल्याला गरम जेवू घालतात. म्हणून आजचा मान त्यांचा. त्यांनी केलेले गरम अन्न आधी त्यांना मिळावे म्हणून हा खटाटोप. अर्थात तो गरम घास आधी आपल्याला मिळावा हीच त्यांची धडपड असते पण आज आपण त्यांना आग्रह करायचा. सूनबाई, तुला माहित नसेल म्हणून सांगतो” ते तिच्याकडे बघत म्हणाले “तुझी आजे सासू एकदा अशीच उपाशी पोटी चक्कर येऊन पडली सणाच्या दिवशी. तेव्हा कुलदेवी स्वप्नात येऊन म्हणाली की जी अन्नपूर्णा राबते ती उपाशी राहून कशी चालेल? तेव्हापासून प्रत्येक पंगत ही पहिली मुलांची आणि दुसरी बायकांची असते आपल्याकडे!”

ती स्तिमित राहून ऐकत होती. 

इतक्यात खड्या थरथरत्या आवाजात “वदनी कवळ घेता” सुरू झाले. “रघुवीर समर्थ” चा घोष झाला आणि जेवणं सुरू झाली. मागून मुलं, पुरुष एक एक वाढायला आली. आग्रह कर करून भजी, रस वाढला जात होता. ती अजूनही धक्क्यातच होती ! गरम गरम पोटभर जेवण झालं आणि आपसूकच तिच्या तोंडून उद्गार निघाले

“अन्नदाता सुखी भव !”

लेखिका : सुश्री पूजा खाडे पाठक

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वटपॊर्णिमा तुझी… कवयित्री : सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ वटपॊर्णिमा तुझी… कवयित्री : सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले 

मैत्रिणींसारखी सज धज 

नव्या पैठणीची घडी मोड

नाजूक कलाकुसरीचे दागिने घाल अंगभर 

पण आरशात बघशील

स्वतःकडे

ते तुझ्या नजरेनं,

तुझ्यासाठी,

माझ्या नाही…..

दुसऱ्यासाठी सजवणं 

हा अपमानच तुझ्या 

आभूषणांसाठी !!

*

असणं सिद्ध केल्यावर

दिसणं सिद्ध करायचा

हा आटापिटा कशासाठी ?

गळ्याला काचणा-या,

बोटांना रुतणाऱ्या,

कानांना टोचणाऱ्या

या दागिन्यांपेक्षा

तुला- मला सुखवणारे किती दागिने

आहेत ना आपल्यापाशी?

*

चढावर बळ देणारा तुझा धीर, 

उतारावर थोपवणारा माझा संयम, 

होडी बुडत असताना

आलटून पालटून मारलेल्या

वल्हयातील इच्छाशक्ती….

माझ्या आधी तुला वाचवण्याची

माझी असोशी…. 

तुझ्यापेक्षा माझ्या उपाशी पोटानं

तुझी कासाविशी….

जिव्हाळ्याच्या एकाच विहिरीत सापडणारे

किती किती अस्सल मोती…!

*

वडाच्या फेऱ्यांपेक्षा 

घाल मला बाहूंची मिठी

आणि माझा विळखा

तुझ्या कमरेभोवती….

*

सवाष्ण म्हणजे सवे असणं

मध होऊन दुधात राहणं

सात जन्म पाहिलेत कोणी 

साथ निभावण्याची शपथ घेऊ…

माझ्यासाठी तू धागा

तुझ्यात मला गुरफटून घेऊ…

*

तू आधाराचा पार 

बांध माझ्या भोवती,

पारंबी होऊन मी 

झेपावेन तुझ्यासाठी…

*

अंगण असेल तुझ्या

आरस पानी हृदयाचे, 

पौर्णिमा होऊन

बरसेन मी तिथेच… 

अवतीभवती !

 

कवयित्री : संजीवनी बोकील

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ बघता बघता… – कवि : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ बघता बघता… – कवि : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

बघता बघता आई,

मी तुझ्यासारखी व्हायला लागले.

संध्याकाळ झाली की

हात जोडायला लागले.

 

आठवणीने तुळशीला दिवा लावते.

झोपाळ्यावर बसून

रामरक्षा ही म्हणायला लागले.

आणि झोपाळ्यावर डोलताना

कुठल्याही आठवणीनी डोळ्यात

पाणी साठवायला लागले.

 

चहाच्या कपाचा डाग पुसायला

पटकन फडकं शोधायला लागले.

धुतले नाही तरी त्यात

पाणी भरून ठेवायला शिकले.

 

कॉटनचे कपडे आणि मऊ स्पर्श

दोन्ही आठवणीने वापरायला लागले.

कपड्याचा दिसण्यापेक्षा

स्पर्शाचा आनंद 

शरीराला कळायला लागला.

 

रात्रीच्या जेवणानंतर 

थोडंसं गोड खावसं वाटायला लागलं.

स्वतःच्या पांढऱ्या होत जाणाऱ्या केसांकडे  पाहताना

तुझे काळे पांढरे लांब केस आठवायला लागले.

तुझ्या हातावरच्या सुरकुत्या

आता माझ्या हातावर उमटणार

याची वाट पाहायला लागले.

 

“म्हातारी झाले मी”

असं तू म्हणलीस कि मी,

अट्टाहासाने नाही म्हणायची.

आता मी म्हातारी झाले.

बघता बघता तुझ्यासारखी झाले.

 

काही दिवसांनी

दिसेनही तुझ्यासारखी.

आईची सावली अस कुणी म्हटलं

तर हरखून जायला लागले.

आई 

…. मी तुझ्यासारखी व्हायला लागले

 

कवयित्री : अज्ञात 

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सासू सासरे नकोत – मग अनाथ मुलाशी लग्न करा… लेखिका : श्रीमती प्राजक्ता गांधी ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सासू सासरे नकोत – मग अनाथ मुलाशी लग्न करा… लेखिका : श्रीमती प्राजक्ता गांधी ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक 

मुलींनो,

तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता, तसा तुमचा नवराही खूप लाडा-कोडात वाढलेला असतो. त्यालाही कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो. तुम्हांला वाटतं, तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो.

लग्नापर्यंत तोही शिक्षण, करिअर, मित्रपरिवार यात छान बिझी असतो. तेव्हा संसार करायचा त्याचा अनुभव तुमच्या सोबतच सुरू होतो.

आईबापाच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो, तितकाच त्याचाही असतो. त्याला सगळंच समजायला हवं, ही अपेक्षा आणि त्याला काहीच समजत नाही, हा तर्क दोन्ही अतिरेकी आहेत.

तुमची पाळी आल्यावर लगाबगीने तो तुमच्या उशा-पायथ्याशी बसेल, डोकं हातपाय चेपून देईल, अशी अपेक्षा करु नका. लाखो मुलांना असा काही त्रास असतो, हे माहीत नसतं. कारण त्यांच्या आईला (कदाचित्) तेवढा त्रास झालेला नसतो. तेव्हा गेट व्होकल. तोंड उचकटून सांगायचं, अमुक कर किंवा तमुक कर. सांगायचंही नाही आणि केलं नाही म्हणून तोंड पाडून बसायचं हे जमणार नाही.

नवऱ्याची आर्थिक लायकी काढताना, आपल्या बापाने आपल्याला काय लाईफस्टाईल दिलीय ते बघावं. आपण आपल्या हिकमतीवर काय करू शकतो ते आजमावावं आणि मग विषय काढावा.

तुम्ही जसं उंची, अनुरूपता, पगार, स्थावर जंगम इस्टेट, घरातलं स्थान बघून लग्न करता, तसं तो रुप, रंग, फिगर वगैरे बघून करतो. व्यवहार आहे तो. इमोशनल व्हायची गरज नाही. तुम्ही ठोकून वाजवून लग्न करणार आणि त्याने बघताक्षणी ‘हो’ म्हणावं, असं होत नसतं.

तुम्हाला तुमची आई प्रिय आहे, तशी त्यालाही त्याची आई प्रिय आहे. तुमच्या आईला जसा लेकीच्या संसारात इंटरेस्ट असतो, तसा त्याच्या आईलाही असतो. मुलगा म्हणजे काही देवीला सोडलेलं कोकरू नव्हे, विसरुन जायला. तो मजेत आहे न, त्याला काही त्रास नाही न, हे वेळोवेळी त्याचे आईबाप चेक करणारच.

सासूसासरे नक्कोच असतील, तर अनाथ मुलाशी लग्न करावं !

तुम्ही तासनतास आईशी बोलणार आणि तो दहा मिनिटं बोलला की तुमचा जळफळाट होणार, हे चालणार नाही. तुम्ही यायच्या खूप आधीपासून आई आहे त्याच्या आयुष्यात. तेव्हा शांत रहा. या मुद्द्यावरुन फालतू ब्लॕकमेंलिंग करु नका.

आईबरोबरच मित्र, मैत्रिणीही त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणार. त्या बाबतीत अडवणूक नको.

दळण, लाँड्री, स्वयंपाक, आला- गेला, स्वच्छता, आर्थिक बाबी, प्रवासाचं नियोजन इत्यादी बाबींत परफेक्ट नॉलेज असणाराच नवरा हवा असेल तर विधुराशी किंवा घटस्फोटीत मुलाशी लग्न करावं. त्यांना नक्कीच जास्त अनुभव असतो.

आणि परत एकदा, आपलं काय म्हणणं असेल, ते समोरून सांगावं. मुलांना आईने ‘मनातलं ओळखून दाखव बरं‘ सारखे फालतू गेम्स शिकवलेले नसतात. आणि हो, तुमच्या आईला त्याच्याकडून मान हवा असेल तर तुम्हीही त्याच्या आईशी नीट वागा.

खरे तर जनमानसात हा बदल होणे गरजेचे आहे.तेव्हाच मुलामुलींचे संसार खुशहाल  होतील व ते आनंदात राहतील.

लेखिका :श्रीमती प्राजक्ता गांधी

प्रस्तुती : श्रीमती उषा नाईक

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “माझी पहिली देवी…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “माझी पहिली देवी…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

अन्नपूर्णेमध्ये पहिली देवी  आपली आई!

आज जेव्हा आपण वयस्कर व्हायला लागलो, तेव्हा कळतं की आईने आपल्याला बिनतक्रार, किती कष्ट करून, रांधून खाऊ घातलं! घरात माणसं भरपूर. एकत्र कुटुंबपद्धती. येणारा पैसा तुटपुंजा. पण त्याही परिस्थितीत तिने सगळ्याची सांगड घालून आपल्याला चटणी, कोशिंबीर, भाजी, आमटी, भाकरी- पोळी असे रोजचे सुग्रास जेवण दिले. त्याकाळी इडली- वडे नव्हते. पण त्यातल्या त्यात जे नवनवीन करता येईल ,—-कधी सांजा, कधी उपीट, कधी गोडाचा शिरा, कधी थालीपीठ, धपाटी, डाळफळ, उपवासाची खिचडी भात, तांदळाची खिचडी, पोह्याचे पापड, उडदाचे पापड, तांदळाचे पापड, भरली मिरची, लोणच्याचे अनेक प्रकार, चिवडा, लाडू, साध्या पिठाचे लाडू….. किती सुंदर करत होती ते!

कोणतीही गोष्ट  तिने वाया घालविली नाही. दुधाचे साईचे पातेले स्वच्छ धुऊन ते कणकेत मिसळले. बेरी काढून, त्यातच कणीक भाजून, साखर घालून त्याचे लाडू केले. भाकरीच्या उरलेल्या छोट्याशा पिठात थोडेसे डाळीचे पीठ घालून शेवटचे धिरडे म्हणजे पर्वणी असायची. त्याशिवाय सणावाराला होणारे वेगवेगळे पदार्थ, चारीठाव स्वयंपाक, गरमागरम पुरणपोळ्या, आटीव बासुंदी, श्रीखंड– घरच्या चक्क्याचे–, खरवसाच्या वड्या–, कणसाची उसळ, वाटल्या डाळीची उसळ…. आपण केलेल्या भोंडल्यासाठी केलेले दहा दिवसाचे विविध प्रसादाचे पदार्थ… हे सगळं करताना तिच्याजवळ श्रीमंती नव्हती. पण कोंड्याचा मांडा करण्याची युक्ती मात्र होती आणि मनामध्ये इच्छाशक्ती होती. कोणताही पदार्थ बाहेरून मागवल्याचे कधी आठवत नाही. कारळ, जवस, शेंगदाणे यांच्या चटण्या सदैव डबा भरून घरात असत.भरली मिरची, कांद्याचे सांडगे, कोंड्याच्या पापड्या… किती पदार्थाने घरातले डबे भरलेले असायचे!

खरंच या सर्व माउलींनी आपलं सगळं आयुष्य घराला जपण्यात घालवलं. त्या सगळ्या अन्नपूर्णांना आज साष्टांग दंडवत ! त्यामुळे आपण सुदृढ, उत्तम विचारांचे, बळकट मनाचे झालो. अगदी टोपलीभर भांडी आणि बादलीभर धुणं पडलं तरी चिंता न करता खसाखसा घासून मोकळे होणारी, कधीही कुठेही न अडू  देणारी सुदृढ पिढी झालो, ही त्या माऊलींची पुण्याई आहे!

अन्नपूर्णांनो, तुम्ही होतात, म्हणून आम्ही अंतर्बाह्य सुदृढ झालो. तुम्हाला पुन्हा एकदा साष्टांग दंडवत!

लेखिका :अज्ञात

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समाधान… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ समाधान… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

नोकरी करणाऱ्याला वाटतं- धंदा बरा.

व्यवसाय करणाऱ्याला वाटतं – नोकरी बरी.

घरी राहणाऱ्याला वाटतं-  काहीतरी करावं पण घराबाहेर पडावं.

 

एकत्र राहणाऱ्याला वाटतं- वेगळा राहण्यात मजाआहे.

वेगळा राहतो त्याला वाटतं- एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही.

 

गावात राहणाऱ्याला वाटतं- शहरात मजा आहे.

शहरातला म्हणतो- गावातलं आयुष्य साधं, सरळ,सोपं आहे.

 

देशात राहतात त्यांना वाटतं- परदेशी जावं,

परदेशात राहणाऱ्याना वाटतं – आपण इथे खूप तडजोड करतो.

 

केस सरळ असणारी म्हणते- कुरळे किती छान.

कुरळे केसवाली म्हणते –  किती हा गुंता.

 

प्रेम ज्याला मिळते त्याला किंमत नसते व काही माणसे  प्रेम मिळावे म्हणुन जंग जंग पछाडतात . 

 

एक मूल असतं, त्याला वाटतं- दोन असती तर…

दोन असणाऱ्याला वाटतं – एकवाला मजेत..

 

मुलगी असली की वाटतं-

मुलगा हवा होता,

मुलगा असला की वाटतं-मुलीला माया असते.

ज्याला मूल नसतं तो म्हणतो- काहीही चालेल.

 

नावे ठेवणारे रामातही दोष बघतात,

कौतुक करणारे रावणाचीही स्तुती करतात.

 

मिळून काय ?

नक्की चांगलं काय ते काही केल्या कोणाला कळत नाही.

मी बरोबर आहे, पण सुखी नाही. दुसरा मात्र पक्का आहे,  तरी मजेत आहे.

 

किती गोंधळ रे देवा, हा?

 

म्हणून जे आहे ते स्वीकार करा आणि आयुष्य आनंदात जगा.आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपल्याला जगता आले पाहिजे.

 

म्हणून, तुकाराम महाराज म्हणतात,

ठेविले अनंते तैसेची रहावे

चित्ती असू द्यावे समाधान…!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ BE PRACTICAL! – लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ BE PRACTICAL! – लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

“चिटी  चावल  ले  चली,

बीच  में  मिल  गई  दाल।

कहे  कबीर  दो  ना  मिले,

इक ले , इक डाल॥”

अर्थात :

मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, ‘क्या बात है  देवा! तू भाताची सोय केलीच होतीस , आता वरणाचीही सोय झाली.’ पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.

तेव्हा कबीर म्हणाले, ‘वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.’

तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान डाळीने हिरावून घेतलं.

माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात.

साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना! एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा मोबाईल घेते, नि आठवडाभरातच त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद, एका आठवड्यातच संपुष्टात येतो. तो मनाशी म्हणतो, ‘इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवडाभर थांबलो असतो, तर काय बिघडलं असतं!’

विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात. हे मर्म लक्षात घेऊन शोषण,शासन व्यवस्था विकल्पांची लयलूट करतात.

ती बघून, ‘घेशील किती दोन करांनी’  अशी माणसाची अवस्था होते. त्याचं डोकं काम करेनासं होतं. अशी माणसं शोषण,शासन व्यवस्थांसाठी हाकायला खूप सोपी पडतात.

पूर्वी आजोबा-पणजोबांच्या काळातल्या वस्तूही, पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण तेव्हा इतके विकल्प नव्हते. (आणि ऐपतही नव्हती.)

आज असंख्य विकल्पांनी, वस्तूंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करुन टाकला आहे. परिणामी लोक चांगल्या वस्तूही भंगारात टाकू लागले आहेत.

भौतिक वस्तूंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे, कारण माणूसही भौतिकच आहे. नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे.

देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं, यासाठी आहेत. नुसतंच घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.

म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे समतोल तर टिकून राहतोच, माणसाचं समाधान आणि आनंदही त्यामुळे टिकाऊ बनतो.

कबीरांच्या या दोह्यात असा मोठा अर्थ दडला आहे.

चला तर मग आनंदी जगूया.  

लेखक :अज्ञात

प्रस्तुती :सौ. शशी नाडकर्णी- नाईक   

फोन  नं. 8425933533

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पावसाचं वय… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पावसाचं वय… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम 

काल मी पावसाला विचारलं

तुझं वय काय?

पावसानं मला सुंदर उत्तर दिलं,

जर तू पावसात सैरावैरा

आनंदात धावतअसशील

तर माझं वय १०

 

जर तू पावसात

कविता लिहित असशील

तर माझं वय १६

 

जर तुला पावसात

विरह जाणवत असेल

तर माझं वय १८

 

जर तुला पावसात

ट्रेकिंगला जावंसं वाटत

असेल,

तर माझं वय २४

 

जर तुला पावसात

गजरा घ्यावासा वाटत असेल

तर माझं वय ३०

 

जर तुला मित्रांसोबत

पावसात भिजत भजी

खावी, असं वाटत असेल

तर माझं वय ४०

 

जर तुला पावसात

छत्री घ्यावी लागली,

तर माझं वय ५०

 

मग मी पावसाला म्हणालो

“अरे, एक काय ते वय सांग,

 शब्दात गुंतवू नकोस!”

 

स्मितहास्य देऊन म्हणाला पाऊस,

 तू जसे अनुभवशील

तेच माझे वय!

 

पावसाळ्याच्या  ओल्याचिंब शुभेच्छा!

लेखक :अज्ञात

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares