वाचताना वेचलेले
☆ “हयातीचा दाखला…” – लेखक : श्री मिलिंद पाध्ये ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆
काल सकाळी अगदी बँक उघडल्याउघडल्याच बँकेत जाऊन, नियमांनुसार आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून, मी जिवंत असल्याचं सिद्ध करून आलो.वरचं आमंत्रण मध्येच आलं नाही तर पुढचं वर्षभर पेन्शन सुरळीतपणे मिळावं म्हणून. मनात आलं, जवळजवळ चाळीस वर्षं
नोकरी केली; पगार घेतला आता पुढची चाळीस वर्षं पेन्शन खात जगायला मिळालं तर…..!
एक महत्त्वाचं काम हातावेगळं केल्याच्या समाधानात बँकेतून बाहेर पडलो आणि बाजूच्याच टपरीवरच्या ताज्याताज्या भज्यांचा घमघमाट नाकाशी दरवळला. जीभ चाळवली, पावलं थबकली. गरमागरम कांदा भजी आणि मग कडक चहा. सुख म्हणजे आणखी काय असतं, मनात आलं. ऑर्डर देणार तोच… तोच कालपरवाच व्हॉट्सअपवर वाचलेला कुणा डाएटीशीयनचा लेख आठवला…. वयानुसार बीपी-कोलेस्टेरॉल, शुगर किती असावं, कुठल्या वयात काय खावं-काय खाऊ नये, काय करावं-काय करू नये वगैरे वगैरे. हे सगळं पाळणारा शतायुषी होऊ शकतो, असंही त्यात लिहिलेलं आठवलं. शंभर वर्षं पेन्शन खायचं असेल तर आत्ता भजी खाऊन कसं चालेल, मनात आलं. एव्हढा तरी संयम पाळायलाच हवा, स्वतःलाच बजावलं आणि मागं फिरलो.
येताना वाटेवरच्या भाजीमार्केटमधनं मोड आलेली कडधान्यं आणि फळं घेतली. त्या डाएटीशीयनच्या म्हणण्यानुसार माझा आहार आता असाच असायला हवा होता. पुढची ३७ वर्षं आता हेच खायचं. निरामय जीवनाचा मार्ग आता आपल्याला सापडलाय, या आनंदात घराकडे येणारा मार्ग कधी संपला कळलंही नाही.
“पटापट आंघोळ, देवपूजा आटपा हं, आज तुमच्या आवडीची झुणकाभाकर, लसणाची चटणी…” बायकोचं वाक्य पुरं व्हायच्या आतच तिच्या हातात कडधान्य, फळं देत म्हटलं, “सखे, करूया फलाहार, नको झुणकाभाकर अन् जगूया आपण वर्षे शंभर.” काही बोलली नाही ती त्यावर, अवाक् का काय म्हणतात, तशी झाली असणार. तिनं झुणकाभाकरच खाल्ली. वर “नाही जगायचे मज फुकाचे वर्षे शंभर, चवदार चविष्ट खाऊनी मी जगणार मस्त कलंदर” म्हणाली. जेवल्यावर तिखटमीठ लावलेली पेरूची फोड खातखात, “मला नाही अळणी खायला आणि जगायला आवडत,” असंही म्हणाली.
“मी नाही येणार,” मी त्यांना म्हणजे कट्टयावरच्या माझ्या मित्रांना म्हटलं. वीकेंडला कुठल्याश्या रिसॉर्टवर जायचं ठरवत होते सारेजण.
खायचं -प्यायचं, गायचं- नाचायचं, हास्यविनोद – धमालमस्ती. पण मी “नाही” म्हटलं. शंभर वर्षं जगायचं तर असला बेबंदपणा करुन कसं चालेल? “तू आलंच पाहिजे” असा माझा फारच पिच्छा पुरवला त्यांनी, तेव्हा मग मी त्यांना माझा शंभर वर्षं जगण्याचा प्लॅन सांगितला, तर ते हसून कट्टयावरच गडबडा लोळले, म्हणाले, “च्युतिया आहेस साल्या. यातलं काही करणार नाहीस, खाणार-पिणार नाहीस तर मग शंभर वर्षं जगून करणार काय तू?” बँकेत लागण्यापूर्वीचे दिवस आठवले. नोकरीच्या शोधात असतांना दिलेल्या इंटरव्ह्यूजमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येत नसलं की मी असाच खजील होऊन समोरच्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांकडे बघत बसत असे.
“ऐकताय का, शेजारच्या जोशीवहिनी विचारत होत्या, चारधाम यात्रेला येताय का म्हणून. ते दोघं जातायत. एकमेकांना कंपनी होईल, ट्रिपही होईल आणि वर तीर्थयात्रेचं पुण्यही पदरी पडेल म्हणत होत्या. जाऊया ना?” रात्री बेडवर पडतापडता बायको विचारत होती. “छे, अजिबात नको. डोंगरदऱ्यांतून घोड्यावर बसून देवदर्शनाला जायचं म्हणजे केवढं रिस्की. च्यायला! घोड्याचा पाय घसरला तर वर जाऊन समोरासमोरच देवाचं दर्शन व्हायचं. त्यापेक्षा शंभर वर्षं पेन्शन घेत, देव्हाऱ्यातल्या देवाचं रोज दर्शन घेतलेलं बरं.” मी तिचा प्रस्ताव धुडकावून लावला. ती पुन्हा उठून बसली, म्हणाली, “शंभर वर्षं जगायचं, हे काय खूळ डोक्यात शिरलंय हो तुमच्या? आहे ते आयुष्य मजेत जगावं की माणसानं. पाडगांवकरांची कविता वाचली आहे ना तुम्ही … ‘सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा!’ तिने अख्खी कविता ऐकवायच्या आत डोक्यावरनं पांघरूण घेऊन झोपल्याचं सोंग घेऊन मोकळा झालो.
“गुड मॉर्निंग मंडळी,” वरच्या मजल्यावरचे पाटीलकाका हातातलं नुकतंच उमललेलं टवटवीत जास्वंदाचं फूल बायकोच्या हातात देत सोफ्यावर विसावले.
बायकोनं दिलेल्या थालीपीठाचा तुकडा मोडत ते मला काही विचारणार, तोच बायको म्हणाली “ते नाही खायचे असलं काही. काल हयातीचा दाखला देऊन आल्यापासून शतायुषी व्हायचं खूळ शिरलंय त्यांच्या डोक्यात.”
“च्यामारी, काय करणार आहेस रे तू शंभर वर्षं जगून? म्हणजे काही उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे आणि त्यासाठी जगायचं असेल इतकं, तर ठीक आहे. अदरवाईज हे नाही खाणार, ते नाही करणार, तिकडे नाही जाणार असं करत घरकोंबड्यासारखं शंभर वर्षं जगण्यात कसली मजा आहे? काही समजत नाही बुवा मला. एकविसाव्या वर्षीच समाधी घेणारे आपले ज्ञानोबा, पन्नासाव्या वर्षीच स्वर्गस्थ झालेले छत्रपती शिवाजी महाराज हे कुठे जगले होते शंभर वर्षं? पण ते काय करून गेले त्यांना मिळालेल्या आयुष्यात, हे वेगळं सांगायला नको. महर्षी कर्वे एकशे चार वर्षं जगले; पण स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी. तसं काही करणार आहेस का तू? वाटत तर नाही तसं – तुला काय आज ओळखतोय का मी? अरे आपण छोटी माणसं. म्हणूनच सांगतोय – माणसानं जिंदादिल रहावं नेहमी. खावं-प्यावं, हिंडावं-फिरावं, छंद जोपासावेत आणि हो, अडलेल्या नडलेल्यांना जमेल-झेपेल इतपत मदतही करावी. हा खराखुरा हयातीचा – तुझ्यातला माणूस जिवंत असल्याचा दाखला. काल बँकेत जाऊन करून आलास ती तू हयात असल्याची कागदोपत्री नोंद.”
दरवाज्यापर्यंत पोचलेले पाटीलकाका परत वळले आणि राजेश खन्नाच्या स्टायलीत म्हणाले … “बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए,लंबी नहीं….”
मनापासून हसलो. काकांनी दिलेलं जास्वंदाचं फूल आता जरा जास्तच टवटवीत दिसत होतं.
थालीपीठ खातखात “जिंदगी एक सफर है सुहाना” गुणगुणलो.
लेखक :श्री.मिलिंद पाध्ये
प्रस्तुती :सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈