सौ.ज्योत्स्ना तानवडे
वाचताना वेचलेले
☆ तुजी यत्ता कंची? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
शनाया आईला विचारत होती, ‘आई तू किती शिकली आहेस गं?’
आज या प्रश्नाने आई किंचित गडबडली, मग मंद हसली. ‘
आज हे काय नवीन नवीन माझ्या शानूचं?’
‘अगं, आज शाळेत झिरो पिरेड (शून्य प्रहर) होता. त्यात मुलांनी आपल्या पालकांविषयी सांगायचे होते. कुणी म्हणालं, माझे बाबा डॉक्टर आहेत. कुणी म्हणालं, माझी आई सी ए आहे. कुणाचे आई बाबा दोघंही नावाजलेले वकील आहेत. असं काय काय सांगत होते. माझी वेळ आली तेंव्हा मला जसं सुचलं तसं मी बोलत गेले. माझी आई खूप खूप शिकली आहे. ती डॉक्टर आहे. मला जेंव्हा ताप येतो तेंव्हा ती माझ्या कपाळावर मिठाच्या पाण्याचा घड्या ठेवते. माझ्या पोटात दुखतं तेंव्हा ती मला ओवा मीठ देते. ती गायिका आहे, कारण माझ्याबरोबर ती गाण्याच्या भेंड्या त्याही सुरात लावते. आणि मला झोप येत नाही तेंव्हा ती देवा तुझे किती सुंदर आकाश म्हणते. ती उत्तम वकील आहे कारण माझ्यासाठी एखादी गोष्टं, एखादा क्लास किंवा एखादी वस्तू आवश्यक आहे असं तिला कळतं तेंव्हा माझ्या बाबाकडे माझी बाजू मांडून मला ती वस्तू आणून देते. मला कधी कधी क्षुल्लक भांडणाने इतर मुली खेळायला घेत नाहीत तेंव्हा माझी बाजू ती माझ्या वतीने पटवून देते आणि समेट करुन देते. ती उत्तम ज्योतिष जाणते कारण माझ्या मनात काय चाललंय ते तिला बरोबर कळते. माझ्यासाठी भविष्यात काय उत्तम आहे ते ती जाणते. ती उत्तम शेफ आहे, कारण बाहेरचं खाऊन माझं आरोग्य बिघडेल म्हणून उत्तमोत्तम पदार्थ ती मला घरीच बनवून देते. ती उत्तम ब्युटीशीयन आहे कारण माझ्या गँदरिंगसाठी ती मला घरीच तयार करते. ती उत्तम शिक्षिका आहे कारण मला कठीण वाटणारी गणितं ती मला पूर्ण समजेपर्यंत शिकवत रहाते. ती उत्तम टेलर आहे कारण माझ्या वाढदिवसासाठी उत्तम प्रतीचा ड्रेस ती घरीच मशीनवर शिवून देते. ती उत्तम मॅनेजर आहे कारण एकाचवेळी अनेक गोष्टी ती लीलया मॅनेज करते आणि शेवटी ती एक उत्तम मैत्रीण आहे आणि तिची आणि माझी मैत्री पार अवीट आहे. आई, तुला सांगू, सर्व मुलं आणि बाई तन्मयतेने ऐकत होती आणि माझं बोलणं झाल्यावर तास संपायची बेल होईपर्यंत बाई आणि मुलं टाळ्या वाजवत होती. मला खूप रडू आलं.’
आई ऐकत राहिली. आपली शानू एवढी मोठी झालीये. तिने शनायाला जवळ घेऊन कुरवाळलं.
‘आई, बाई पण मला असंच कुरवाळत होत्या प्रेमाने! म्हणत होत्या, हिची आई खूप भाग्यवान आहे.’
— आईला गहिवरून आलं. तिने देवाला दिवा लावला आणि तूप, गूळ, खोबऱ्याचा प्रसाद ठेवला. देव बोलला असता तर म्हणाला असता, ‘यांची इयत्ता जगातल्या कुठल्याच शाळेत नं धरणारी आहे. ही साक्षात माझी म्हणजे देवाची यत्ता आहे!’
लेखक – अज्ञात
प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈