मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चांगुलपणाची शिक्षा… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ चांगुलपणाची शिक्षा… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

(घरात किंवा एखाद्या कार्यक्रमात उरलेलं अन्न तुम्ही गरीबांना दान म्हणून देणार असाल, तर‌ त्यापूर्वी हे आवर्जून वाचावे !) 

साधारण महिन्याभरापूर्वीची गोष्ट असेल. मी राहतो त्या चौकापासुन काही अंतरावर एक लहान गल्ली आहे त्या गल्लीतल्या अपार्टमेंट मधुन राहणारे बरेचसे भाडेकरू I.T. मध्ये काम करणाऱ्यांपैकी आहेत. त्यांच्यापैकीच सुरज हा एक माझा मित्र आहे. मुळचा सोलापूरचा असणारा हा तरुण अभियांत्रिकीची पदवी मिळवून आता नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झाला आहे.

अविवाहित असल्यानं तो आणि त्याच्याच कंपनीतील अजून दोघे असे फ्लॅट भाड्याने घेऊन राहतात. एखाद्या रविवारी सकाळी चहाच्या निमित्तानं आम्ही अधुन मधुन भेटत असतो. अशाच एका सकाळी चहाच्या कपासोबत त्याने ऐकवलेला हा अनुभव.

..

“शनिवारी रात्री आमची जोरदार पार्टी झाली होती. घरमालकाच्या कडक सुचना असल्यानं आमच्या पार्ट्या घराबाहेरच साजऱ्या होतात. रात्री बऱ्याच उशिरा आम्ही आटोपतं घेतलं. अन्न बरंच शिल्लक राहिलं होतं, काही काही पदार्थांना तर अक्षरश: हात सुद्धा लावलेला नव्हता. अन्न वाया घालवणं माझ्या जीवावर आलं होतं, त्या मुळे मी त्यांना पार्सल करून देण्याची विनंती केली. रात्री खूप उशिरा आम्ही फ्लॅटवर परत आलो. मी आल्या आल्या सर्व अन्न फ्रीजमध्ये ठेवुन दिलं आणि झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा सकाळचे अकरा वाजले होते, दोन्ही मित्र अजूनही घोरत होते. मला चहाची खूप तलफ आली होती पण चहा बनवून घ्यायचा कंटाळा आला होता, दूध विकत आणण्यापासून तयारी होती.

असेच जाऊन खाली चौकातल्या टपरीवर चहा घ्यावा आणि परत येताना दूध घेऊन यावं असा विचार करून मी शॉर्ट्स आणि टी शर्ट वर बाहेर पडलो. चांगला एकाला दोन कप कडक चहा झाल्यावर थोडं बरं वाटलं.

..

मग जरा आजुबाजुला लक्ष गेलं, टपरी चौकातच असल्यानं गर्दी बऱ्यापैकी असते आणि गर्दी असते म्हणून मग भिकारीही बरेच असतात. असाच एक हडकुळा, गालफडं बसलेला, एका हाताने फाटक्या शर्टचा गळा घट्ट आवळुन धरलेला एक वयस्कर भिकारी माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि दीनवाणेपणाने काहीतरी पुटपुटत एक हात पुढं केला. मी शक्यतो पैसे देत नाही पण बऱ्याचदा जुने पण धडके कपडे, वापरात नसलेल्या वस्तु वगैरे देत असतो. त्याला पहाताच मला फ्रीजमधल्या अन्नाची आठवण झाली. आम्ही तिघांनी खाऊन सुद्धा बरचसं उरलं असतं एवढं अन्न शिल्लक होतं. त्यातील त्याला थोडंसं द्यावं म्हणुन मी त्याला विचारलं, त्यानंही मान डोलावून होकार दिला. मग पुढं मी आणि माझ्या मागुन रखडत्या पावलांवर तो असे फ्लॅटजवळ आलो. त्याला फाटकाबाहेरच थांबवून मी आतुन अन्नाची काही पॅकेट्स प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणली आणि त्याच्या हातात दिली. त्यानं एकवार त्याच्याकडं पाहीलं आणि कृतज्ञतेने दोन्ही हात जोडुन मला नमस्कार केला. आणि त्याच रखडत्या चालीने हळू हळू निघून गेला. मलाही हातुन एक चांगलं काम घडल्याचं समाधान वाटलं.

..

पाहता पाहता रविवार संपला आणि दुसऱ्या दिवशीचे वेध लागले. माझी सकाळची ९ वाजताची ड्युटी असते त्यामुळं मी आठ वाजताच घरातुन बाहेर पडतो. अंघोळ आटोपुन आरश्यासमोर भांग पाडत असताना कसला तरी आरडाओरडा आणि गोंधळ माझ्या कानावर पडला. काय झालंय ते पहावं म्हणुन मी दार उघडुन बाल्कनीमधून खाली डोकावून पाहिलं. सोसायटीच्या गेटबाहेर झोपडपट्टीतल्या असाव्यात अश्या वाटणाऱ्या आठ दहा स्त्रिया आणि सात आठ पुरुषमंडळी वॉचमन समोर कलकलाट करत हातवारे करत होती. मी बाल्कनीतुन खाली पहात असताना त्यांच्यातील एकाचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि तो माझ्याकडे बोट दाखवून काहीतरी ओरडायला लागला आणि मग सर्वच जण वरती पाहत गोंगाट करायला लागले.

..

मला कश्याचीच कल्पना नव्हती. तेवढयात वॉचमनने मला खूण करून खाली बोलावलं. दरवाजा लोटुन घेऊन मी खाली गेलो. त्या घोळक्यात तो कालचा भिकारीही दिसत होता पण त्याच्या आदल्या दिवशीच्या आणि त्या वेळच्या रूपात आता जमीन अस्मानाचा फरक होता. आदल्या दिवशी पुटपुटल्यासारखा येणार आवाज आता चांगला खणखणीत येत होता आणि कंबरेत वाकुन रखडत चालणारा म्हातारा आता चांगला दोन पायांवर ताठ उभा होता. मला समोर पहाताच त्यानं माझ्यावर एक बोट रोखुन अर्वाच्य शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली आणि मग बाकीचे लोकही ओरडु लागले.

..

मला नक्की काय घडतंय तेच कळत नव्हतं. अजून दहा पंधरा मिनिटे गोंधळ झाल्यानंतर मग मला असं सांगण्यात आलं की, मी आदल्या दिवशी दिलेलं अन्न खाऊन त्यांच्यातील एक लहान मुलगा आजारी पडला, त्याला दवाखान्यात न्यावं लागलं आणि त्यापोटी झालेला खर्च सात हजार रुपये हा मी द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. 

..

ते ऐकून मी सर्दच झालो, वास्तविक तेच अन्न आम्हीही रविवारी दुपारी खाल्लं होतं आणि आम्ही ठणठणीत होतो. आता त्यांच्यातल्या बायका पुढं झाल्या आणि त्यांनी अक्षरश: मला चहूबाजुंनी घेरून शिव्यांचा दणका उडवला. एव्हाना अपार्टमेंट मधील प्रत्येक बाल्कनीतुन चेहरे डोकावून पहायला लागले होते. मला मेल्याहुन मेल्यासारखं झालं होतं. तोपर्यंत मित्रही खाली आले होते.

..

ते लोक सरळ सरळ आम्हाला लुटतायत हे कळत असुनही काही करता येत नव्हतं. आमच्या अगतिक अवस्थेची त्यांना कल्पना आल्यामुळं आता त्यांच्यातील पुरुष मंडळी आमच्या अंगाशी झटायला लागली. बहुतांशी लोकांच्या तोंडाला आंबुस वास येत होता. मी कशीबशी सुटका करून त्यांच्या घोळक्यातून बाहेर आलो आणि पोलिसांना फोन लावावा म्हणून फोन बाहेर काढला (इतक्या वेळ फोन बाहेर काढला नव्हता, न जाणो त्यांनी कदाचित हिसकावूनही घेतला असता.)

..

“काय करताय साहेब ?” मला वॉचमनने विचारलं. “पोलिसांना फोन करतोय” मी उत्तरलो. “काही फायदा नाही साहेब, या लोकांना काही फरक पडत नाही. उलट उद्या पुन्हा शंभरभर लोकं येऊन गोंधळ घालतील, तुम्ही कशाला दिलात त्यांना खायला?” वाॅचमन म्हणाला.

..

माझ्या चांगुलपणाची ही परिणीती पाहून मी हबकुन गेलो होतो. वॉचमन मराठी होता, माझ्याच जिल्ह्यातील होता. अखेरीस त्याने पुढं होऊन रदबदली केली आणि दोन हजारांवर सौदा तुटला. मी आणि माझ्या मित्रांनी निमूटपणे पैसे गोळा करून त्यांच्या हातात दिले तेव्हाच जमाव हलला. 

..

माझ्या निर्णयाबद्दल मी क्षणोक्षणी पस्तावत होतो.

हल्ली मी उरलेलं अन्न फक्त कुत्र्यामांजरांनाच खाऊ घालतो किंवा चक्क फेकुन देतो. आणि गंमत म्हणजे तो म्हातारा भिकारी अजूनही मी दिसलो कि निर्लज्जपणे फिदीफिदी हसत माझ्यापुढे हात पसरतो “दादा, द्या काही गरिबाला पोटाला !”

..

माझ्या चांगुलपणापायी झालेली हि शिक्षा माझ्या नेहमीच स्मरणात राहणार आहे”

..

ता. क. हल्ली पुण्यात तरी हा धंदा जोरात सुरू आहे असं दिसतं. आदल्या दिवशी शिळं पाकं अन्न घेऊन जायचं, अन दुसऱ्या दिवशी अख्खी वस्ती आणुन राडा करायचा. दिवसाला सात आठ हजार रुपयाला मरण नाही.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हातात सगळं आयतं पाहिजे….!!!! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ हातात सगळं आयतं पाहिजे….!!!!लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

नागरीक मी भारत देशाचा

हातात सगळं आयतं पाहिजे….!!!! 

 

वीज कधी वाचवणार नाही

बील मात्र माफ पाहिजे….!!!! 

 

झाड एकही लावणार नाही

पाऊस मात्र चांगला पाहिजे….!!!! 

 

तक्रार कधी करणार नाही

कारवाई मात्र लगेच पाहिजे….!!!! 

 

लाचेशिवाय काम करणार नाही

भ्रष्टाचाराचा मात्र अंत पाहिजे….!!!! 

 

कचरा खिडकीतून बाहेर टाकीन

शहरात मात्र स्वच्छता पाहिजे….!!!! 

 

कामात भले टाईमपास करीन

दर वर्षी नवा वेतन आयोग पाहिजे….!!!! 

 

जातीच्या नावाने सवलती घेईन 

देश मात्र धर्मनिरपेक्ष पाहिजे….!!!! 

 

मतदान करताना जात पाहीन

जातीयता  मात्र बंद झाली पाहिजे….!!!! 

 

कर भरताना पळवाटा शोधीन

विकास मात्र जोरात झाला पाहिजे….!!!! 

 

नागरीक मी भारत देशाचा

हातात सगळं आयतं पाहिजे….!!!! 

            हातात सगळं आयतं पाहिजे….!!!! 

कवी – अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘स्वर्गाच्या दारावर पोचल्यावर…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘स्वर्गाच्या दारावर पोचल्यावर…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

झाडावरून गळून पडलेलं, कोमेजलेलं, सुगंध मालवलेलं निस्तेज फूल वाऱ्याबरोबर हेलखावे खात हळुवार मातीवर पहुडलं…..

मातीने त्याच्या नाजूक पाकळयांना जोजवत विचारलं, “काही त्रास नाही ना झाला ?”

सुकून गेलेल्या फुलाने देठापासून देह हलवण्याचा असफल प्रयत्न केला आणि पाकळयांनीच नाही म्हणून खुणावलं. 

काही क्षण असेच गेले…

आपल्या कुशीत घेण्यास आतुर झालेल्या मातीने पुन्हा कातर आवाजात विचारलं, “झाडावरून गळून पडल्याचं खूप दुःख होतंय का ? फार वाईट असतं का हे सर्व ?”

म्लान पाकळ्यावर मंद स्मित झळकलं. 

फुल म्हणालं, “निमिषार्धासाठी वाईट वाटलं..कारण झाडाशी, पानांशी, गुच्छातल्या सोबती फुलांशी, उमलत्या कळ्यांशी, ओबड धोबड फांद्यांशी आता ताटातूट होणार म्हणून वाईट वाटलं. 

पण पुढच्याच क्षणाला आनंदही वाटला. जितका काळ झाडावर होतो तेंव्हा वारा येऊन कानात गुंजन करायचा, पाकळयांशी झटायचा, झोंबायचा… कधी त्याचा राग यायचा तर कधी त्याच्यासोबत अल्लड होऊन उडत जावं असं वाटायचं….. पण तेंव्हा मी झाडाचा एक भाग होतो त्यामुळे माझा एकट्याचा निर्णय घेण्यास मी स्वतंत्र नव्हतो… “

“तू आता स्वतंत्र झालास खरा, पण आता तू क्षणाक्षणाला कोमेजत चाललायस …. आता काय करणार ?” – मातीचा प्रश्न.

दीर्घ उसासा टाकत फूल म्हणालं, “आता वारा जिकडे नेईल तिकडे मी जाईन… वाऱ्यावर स्वार होऊन जीवात जीव असे तोवर जमेल तितके जग पाहून घेईन… मग एकेक पाकळ्या झडतील, देठापासून तुटून पडेन… पण जिथं अखेरचे श्वास घेईन तिथल्या मातीशी एकरूप होईन. त्या मातीचं एक अंग होऊन जाईन आणि तिच्या कुशीत येऊन पडणाऱ्या नव्या बीजासाठी खत होऊन जाईन, त्या बीजातून अंकुरलेल्या रोपा वर कोवळ्या फुलांचा एक टवटवीत गुच्छ असेल, माझं कर्म चांगलं असेल तर मीही त्या गुच्छात असेन !”

फुलाचं उत्तर ऐकून सदगदीत झालेल्या मातीने त्याच्या सुरकुतल्या पाकळयांचे हलकेच चुंबन घेतले. 

काही वेळ निशब्द शांतता राहिली आणि पुढच्याच क्षणी मंद वाऱ्याची एक झुळूक आली आणि फुलाला त्याच्या अंतिम सफरीवर घेऊन गेली… 

आपलं आयुष्यही असंच आहे….  आपलं जीवन ही तसेच – एक फूल आहे…. 

संसार कुटुंब आप्तेष्ट मित्र ही सगळी त्या झाडाची भिन्न अंगे. आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या की कुणी स्वखुशीने त्यातून बाहेर पडतो तर कुणा कमनशिबींना परागंदा व्हावं लागतं. 

मग सुरु होतो एका जीवाचा एकाकी सफर, जो आपल्याला आयुष्यातलं अंतिम सत्य दाखवून देतो. 

… आयुष्यातली सत्कर्माची शिदोरी मजबूत असली की हा प्रवास सुसह्य असतो, इथं आपल्याला मदत करायला कुणी येत नसतं….  नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं. आपणही असेच पंचतत्वात विलीन होतो आणि प्रारब्धात असलं तर जीवनाच्या पुष्पगुच्छात पुन्हा अवतीर्ण होतो !

…. स्वर्गाच्या दारात उभे असताना काही आठवणी उफाळून आल्या… 

….जीवन सुंदर तर आहेच पण ते अर्थपूर्णही व्हावे !

लेखक : अज्ञात

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुख म्हणजे नक्की काय असतं! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ सुख म्हणजे नक्की काय असतं! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

सोलापूर इथल्या एका संस्थेने माझं दोन दिवसांचं मोटिवेशनल शिबिर आयोजित केलं होतं.

विविध वयोगटांतले आणि विविध व्यवसायातले शिबिरार्थी उत्साहाने सामील झाले होते.

शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा विषय होता,’आनंदाने कसं जगावं?’

मी साऱ्या शिबिरार्थींना एक कॉमन प्रश्न विचारला आणि नोटपॅडमधल्या कागदावर आपापलं उत्तर लिहून द्यायला सांगितलं.

प्रश्न अगदी साधा होता,

‘सुख म्हणजे काय?’

उत्तरं अगदी भन्नाट होती.

एकाने लिहीलं, निरोगी दीर्घायुष्य म्हणजे सुख.

एकाने लिहिलं, घरात पत्नीने तोंड बंद ठेवणं म्हणजे सुख.

एक उत्तर होतं, सकाळी उठल्यावर संडासला साफ होणं म्हणजे सुख.

एकाचं उत्तर होतं, म्हातारपणी मुलं आधाराला जवळपास असणं म्हणजे सुख.

कुणाचं उत्तर होतं, भरपूर पैसा गाठीशी असणं म्हणजे सुख.

तर कुणी लिहीलं होतं की शरीर धडधाकट असणं म्हणजे सुख.

सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या.

साऱ्या शंभर शिबिरार्थींच्या सुखाच्या कल्पना जेव्हा मी एकत्र केल्या तेव्हा लक्षात आलं,

प्रत्येकजण कोणत्या तरी एका बाबतीत दु:खी आहे.

म्हणजे कुणाची बायको भांडखोर आहे, कुणाला बद्धकोष्ठाचा त्रास आहे, कुणाची मुलं त्यांच्यापासून दूर आहेत.आणि ती उणीव त्या प्रत्येकाला टोचते आहे.

म्हणजे उरलेल्या नव्व्याणव टक्के बाबतीत तो सुखी आहे.

म्हणजेच काय तर प्रत्येकजण नव्व्याणव टक्के सुखी आहे आणि फक्त एक टक्का दु:खी आहे.

हे केवळ एक टक्का दु:ख आपण चघळत बसतोय आणि उरलेल्या ९९% सुखाकडे दुर्लक्ष करतोय.

आहे की नाही गंमत?

मी जेव्हा त्या साऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली तेव्हा सारेच चकित झाले.

हीच तर सुखाची गंमत आहे.

आपण सुखात असतो. पण आपण सुखात आहोत हेच आपल्याला माहित नसतं.

जेव्हा काही कारणामुळे त्या गोष्टीची आपल्या आयुष्यात उणीव निर्माण होते तेव्हा आपल्याला कळतं, अरे… एवढा वेळ आपण सुखात होतो.

लहान असताना वाटतं, लहानपण म्हणजे परावलम्बित्व.

केव्हा एकदा मोठे होतोय आणि स्वत:च्या पायावर उभे रहातोय!

मोठं झाल्यावर वाटतं, किती टेन्शन रे बाबा.

प्रत्येक गोष्टीत टेन्शन.

जागा शोधायचं टेन्शन.

कर्जाचे हप्ते भरायचं टेन्शन.

ऑफिसमध्ये साहेबांना तोंड द्यायचं टेन्शन.

त्यापेक्षा बालपण किती सुखाचं होतं.

गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यावर वाटतं,

‘संसारसंगे बहु कष्टलो मी!’

केव्हा एकदा मुलं मोठी होतायत आणि या जबाबदाऱ्यांतून मोकळा होतोय.

मुलं मोठी  होतात तेव्हा आपण वृद्ध झालेलॊ असतो.आणि गात्रं कुरकुर करू लागतात.

तेव्हा वाटतं, अरे तो बहराचा काळ किती सुखाचा होता!

माझे एक ज्येष्ठ मित्र रवीन्द्र परळकर अलीकडे बऱ्याच दिवसांनी मला भेटले.

शिळोप्याच्या गप्पा झाल्या. म्हटलं,“थोडे वाळलेले दिसताय. बरं नव्हतं की काय?”

तर ते म्हणाले, “प्रोस्टेट्च्या त्रासाने आजारी होतो.काय झालं,  एक दिवस रात्री लघवी कोंडली.प्रोस्टेट ग्लॅंड वाढल्यामुळे त्याचा भार ब्लॅडरवर आला होता आणि लघवीलाच होईना.ओटीपोटावर भार असह्य झाला.मी वेदनांनी गडाबडा लोळू लागलो.अख्खी रात्र पेनकीलर घेऊन काढली.

दुसऱ्या दिवशी फॅमिली डॉक्टरना घरी बोलवलं, तर ते म्हणाले- युरॉलॉजिस्टकडे घेऊन जा.युरॉलॉजिस्टकडे जाऊन ॲडमिट व्हायला दुपारचे अकरा वाजत आलेले.म्हणजे गेले पंधरा सोळा तास मला लघवीला झालं नव्हतं.वेदना असह्य होत होत्या.

ब्लॅडर फुगून पोटातच फुटायची भीती निर्माण झाली होती.शेवटी एकदाचं मला ॲडमिट करुन घेण्यात आलं.आणि ब्लॅडर पंक्चर करुन सर्व युरीन बाहेर काढण्यात आली.त्या क्षणी माझ्या मनात विचार आला,

‘आपल्याला दिवसातून वेळेवर लघवीला होणं ही सुद्धा किती सुखाची गोष्ट आहे.’ “

परळकरांचं उदाहरण हे सुखाच्या शोधात दु:खी असलेल्या प्रत्येकाचं प्रातिनिधिक उदाहरण आहे.

हातपाय धडधाकट आहेत.

दोन घास पोटात जातायत हे सुख नव्हे काय?

 रामराय कृपाळु होऊन पावसा- पाण्यापासून रक्षण करतोय हे सुख नव्हे काय?

घराबाहेर पडल्यावर मागे एक वाट पहाणारं दार आहे, हे सुख नव्हे काय?

’एका लग्नाची गोष्ट’ या प्रशांत दामलेंच्या नाटकातलं गाणं मला आठवतंय,

‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?

काय पुण्य असलं की ते, घरबसल्या मिळतं?’

मित्र हो, जाणिवांच्या खिडक्या सताड उघड्या ठेऊन विचार कराल, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही खूप सुखी आहात.

चला तर मग, सगळ्या तक्रारी उडवून लावा.सारी निराशा झटकून टाका आणि आनंदाने जगू लागा.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “श्रीमंती” – कवी :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “श्रीमंती” – कवी :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

भूतकाळातील व वर्तमानातील

सर्व गोष्टी लक्षात राहणे

चष्म्याशिवाय बघता व वाचता येणे

कानाने सुमधुर संगीत व संवाद ऐकू येणे

बत्तिशी शाबूत असणे व

ऊस-चिक्की खाता येणे

सुंदर फुलांचा सुगंध घेता येणे

ही खरोखरच साठीनंतरची श्रीमंती आहे

 

लिमलेटच्या गोळ्या व कॅडबरी खाता येणे

आपण लिहिलेले दुसऱ्याला वाचता येणे

कुठल्याही कागदपत्रांवर

एकसारखी सही करता येणे

जिन्याच्या पायऱ्या आधाराशिवाय

पटापट उतरता येणे

डोक्यावरती केशसंभार

(फक्त त्याचा ) भार असणे

ही खरोखर साठीनंतरची श्रीमंती आहे

 

आपल्या गरजेपुरते निवृत्तीवेतन असणे

कर्जाचा कोणताही भार डोक्यावर नसणे

आपली मुलेबाळे आपल्या जवळ असणे

नातवंडांचे कोडकौतुक करायला मिळणे

मनात आले की सहलीला जाता येणे

ही खरोखरच साठीनंतरची श्रीमंती आहे

 

शाळा-कॉलेजमधले

बालमित्र-मैत्रिणी संपर्कात असणे

नोकरीमधले सहकारी

अधूनमधून भेटणे

सहजच आठवण आली म्हणून

नातेवाईकांनी फोन करणे

आधुनिक काळातील सर्व

गॅझेट्स लीलया वापरता येणे

कुटुंबामध्ये सुसंवाद आनंद

व मनःशांती असणे

इतके सर्व असेल तर

हीच खरी

अगदी फुलटूस श्रीमंती आहे

 

कवी : अज्ञात

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘सुट्टी’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

सुट्टी’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

हल्ली जरा सुट्टी मिळाली, की जगबुडी झाल्यासारखे लोक ‘विकेन्ड’ साजरा करायला कुटुंबाला घेऊन निघतात. जाण्यायेण्यात सात-आठ तास (ट्रॅफिक नसेल तर), तिथे जाऊन गर्दीत मिसळून थातूरमातूर साईट सिईंग करायचं किंवा रिसॉर्टच्या रूममध्ये टीव्ही पहात झोपून राहायचं.

सुट्टी संपवून दमून यायचं आणि दुसऱ्या दिवशी कामाला जुंपायचं!

आपण नक्की का जातो वीकएंडला?

कशापासून लांब पळतो?

मला वाटतं,रोजची चाकोरी मोडणं हा त्यामागील महत्त्वाचा हेतू असतो.

चाकोरी म्हणजे काय?

नवऱ्याची नोकरी, मुलांच्या शाळा आणि बायकोचं घरकाम?

चाकोरी म्हणजे रोजची मेल्स, व्हाट्सऍप, फेसबुक, टीव्ही, गर्दी, ट्रॅफिक? मग हे मोडायला, ह्यापासून आराम मिळवायला परत त्यातच का जायचं?

सुट्टीच्या दिवशी घरातलं वायफाय आणि टीव्ही बंद करून टाकावे. फोन स्वीचऑफ करून कपाटात ठेवावा. मुलांची अभ्यासाची पुस्तके दप्तरात भरून ठेवावी. किचनचा गॅस बंद ठेवावा. खूप गप्पा माराव्या. मुलांशी खेळावे, वयस्कांना वेळ द्यावा, बाहेरून ब्रेकफास्टसकट सर्व मिल्स मागवावी.

सर्वांना मान्य असेल तर जवळचे भावंड किंवा जिवलग मित्रांना सहकुटुंब घरी बोलवावे. गप्पांचे फड जमवावे, पत्ते खेळावे, गाणी ऐकावी, वाद्यावरची धूळ झटकून त्यावर एखादा साज छेडावा, मस्त पुस्तक वाचावे.

बायकोला सकाळी सायंकाळी स्वहस्ते चहा करून द्यावा.

नको ती गर्दी, नको ते ट्रॅफिक, नको ते ड्रायव्हिंग!

विकेन्ड कधी एन्ड होईल ते कळणारसुद्धा नाही. एन्ड न होणाऱ्या अनेक आठवणी देत!

अनावश्यक प्रवास तसेच प्रदूषण टाळा ! आनंद मिळवण्यासाठी लांबचा प्रवास किंवा पैसे खर्च केलेच पाहिजेत असे नाही.

आपणच पुढील पिढीला चुकीच्या सवयी लावत आहोत असं नाही ना ?

लेखक  :अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ इतके मला पुरे आहे – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

इतके मला पुरे आहे लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

बसायला आराम खुर्ची आहे

हातामध्ये पुस्तक आहे

डोळ्यावर चष्मा आहे

इतके मला पुरे आहे ।।१।।

*

निसर्गामध्ये सौंदर्य आहे

निळे आकाश आहे

हिरवी झाडी आहे

सूर्योदय, पाऊस, इंद्रधनुष्य आहे

इतके मला पुरे आहे ।।२।।

*

जगामध्ये संगीत आहे

स्वरांचे कलाकार आहेत

कानाला सुरांची जाण आहे

इतके मला पुरे आहे ।।३।।

*

बागांमध्ये फुले आहेत

फुलांना सुवास आहे

तो घ्यायला श्वास आहे

इतके मला पुरे आहे ।।४।।

*

साधे चवदार जेवण आहे

सुमधुर फळे आहेत

ती चाखायला रसना आहे

इतके मला पुरे आहे ।।५।।

*

जवळचे नातेवाईक आहेत,

मोबाईलवर संपर्कात आहेत

कधीतरी भेटत आहेत,

इतके मला पुरे आहे ।।६।।

*

डोक्यावरती छत आहे

कष्टाचे दोन पैसे आहेत

दोन वेळा दोन घास आहेत

इतके मला पुरे आहे ।।७।।

*

देहामध्ये प्राण आहे

चालायला त्राण आहे

शांत झोप लागत आहे

इतके मला पुरे आहे ।।८।।

*

याहून जास्त आपल्याला काय हवे आहे?

जगातील चांगले घेण्याचा

आनंदी आशावादी राहण्याचा

विवेक हवा आहे

इतके मला पुरे आहे ।।९।।

*

शरीर माझे योग्य साथ देते आहे,

स्मृतीची मला साथ आहे,

मी कुणावरही आज अवलंबून नाही

इतके मला पुरे आहे ll10ll

*

इतकेच मला पुरे आहे!

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आणि मला दुर्गा सापडली…” – लेखिका :डॉ. स्मिता दातार ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “आणि मला दुर्गा सापडली…” – लेखिका :डॉ. स्मिता दातार ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

सिक्किमजवळच्या पेलिंगला नेमकी आमच्या यांची कॉन्फरन्स घोषित झाली. नवरात्राचे दिवस. यांच्या आग्रहामुळे मला जावंच लागलं. मनात मात्र घरचं नवरात्र हुकल्याची हुरहुर होती.

आमची गाडी त्या दिवशी सारखा त्रास देत होती. गाडीच्या ड्रायव्हरच्या मावशीचं घर रस्त्यावरच होतं. वळणावळणाच्या त्या रस्त्यावर एका घराशेजारी गाडी थांबली. घरासमोर बरीच  मुलं  खेळत होती. लहान -मोठी, गोबर्‍या लाल गालांची, बसक्या नाकाची.

गाडीचा आवाज ऐकून एक मध्यमवयीन बाई बाहेर आली आणि आमच्या  ड्रायव्हर भीमला म्हणाली, ‘ताबा तस खै ?’ कसा आहेस ? भीमने आमची ओळख करून दिली. ही कुंती, माझी मावशी. जरा कुरकुरणार्‍या गाडीची डागडुजी  करायला भीम गाडी घेऊन गेला.

कुंती अगदी चारचौघींसारखी दिसत होती. सिक्कीमी बायकांचा  गुडघ्यापर्यंत येणारा बाखू  तिने घातलेला. कान लोंबेपर्यंत, कानाची पाळी फाकवणारे कानातले झुमके, अकाली पडलेल्या सुरकुत्या आणि चेहेर्‍यावर हसू. तिचं वय असेल सहज पन्नाशीला आलेलं. पण कुंती गरोदर होती. या वयाची बाई गरोदर बघून मला धक्काच बसला. एक बारकं  मूल तिच्या कडेवर होतं. एक पाठीशी झोळीत बसून तिच्या मागून वाकून मिचमिच्या डोळ्यांनी  आमच्याकडे बघत होतं. इतक्यात झोपडीतून नुकतीच चालायला लागलेली, नीट चालणारी पण शेंबूड पुसणारी आणखी दोन तीन पाठोपाठची मुलं बाहेर आली. कुंतीनं आमचं स्वागत केलं. तिने हाक मारल्यावर झोपडीच्या मागच्या उतारावर शेतात काम करणारा एक चौदा पंधरा वर्षांचा मुलगा धावत आला आणि आम्हाला बसायला त्यानं एक बाक आडवा केला. कुंतीला तोडकं  मोडकं  हिन्दी येत होतं. पण तिथल्या एका मुलाला  नीट हिन्दी येत होतं. त्याच्या मदतीने आमचा संवाद सुरू झाला.

माझ्या चेहर्‍यावरचं आश्चर्य बघून कुंतीनेच संभाषणाची सूत्र हातात घेतली. “दीदी, ही सगळी माझीच मुलं. ”  “तुझी म्हणजे, तुझी स्वत:ची?” मी उडालेच. “हो. माझी, माझ्या पोटची. ” “पण.. आपला कायदा आहे ना.. दो या तीन.. ”  कुंतीला या प्रश्नांची अपेक्षाच असावी. “हो, आहे ना कायदा. आणि मुलांची संख्या वाढवली तर सरकारवर त्यांचा बोजा टाकायचा नाही, हे ही ठाऊक आहे. माझी मुलं आणि आम्ही स्वावलंबी आहोत. आम्ही आमच्या शेतात राबतो, पिकवतो. रोज कमावतो, रोज खातो. साठवून ठेवायला मात्र आमच्याकडे पैसे नाहीत. “

त्यापुढे कुंतीने जे सांगितलं, ते या पृथ्वीतलावरचं वाटलंच नाही मला.

कुंती आणि दोरजा, तिचा नवरा, दोघं पेलिंगच्या कष्टकरी लेपचा जमातीतले. हिमालयाच्या  निसर्गरम्य पहाडात हातावर पोट  असलेलं त्यांचं कुटुंब. दोरजा सैन्यासाठी लाकूडफाटा सीमेवर पोचवण्याचं काम करायचा. कुंती गावातल्या बायकांबरोबर लाकडं गोळा करायला जायची. देशाला आपली तेवढीच मदत. कुंती कधी दोरजासोबत मिरची-भाकरी सैनिकांसाठी पाठवायची. त्यांचा मोठा मुलगा राम, विसाव्या वर्षीच सैन्यात भरती झाला. कुंतीला त्याचं  कोण अप्रूप. सगळ्या गावाला तिने त्याचा गणवेष कौतुकाने फिरून दाखवला. दाजूमुळे ( मोठा भाऊ )  आणि घरातल्या देशप्रेमी वातावरणामुळे धाकट्या दोघांना ही सैन्यात जायचे वेध लागलेले. राम काश्मीर सीमेवर तैनात असताना, अवघ्या बावीसाव्या वर्षी  त्याला वीरमरण आलं. हिमालयातला बर्फ वितळेल, असा कुंतीचा शोक चालला होता. तिला मुलगा गेल्याचं दु:ख होतंच. पण मुलाची देशसेवा अर्ध्यावर राहिली, याची तिला जास्त खंत होती.

कुंतीच्या धाकट्या दोघांनी दाजूचं स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं आणि कुंतीने आपला निर्णय दोरजाला सांगितला. मला देशासाठी लढणारे सैनिक निर्माण करायचे आहेत. नाहीतरी माझ्यासारखी स्त्री देशाची सेवा कशी करणार ? दोरजाने आधी तिला समजावलं. नातेवाईकांना वाटलं ती वेडी झालीये. पण नंतर दोरजाला कुंतीच्या ठाम निर्णयाचा अंदाज आला. मुलांच्या लष्कर भरतीत कुंतीच्या संगोपनाचाच वाटा होता. दोरजाला फक्त कुंतीच्या प्रकृतीची काळजी वाटत होती. कुंती म्हणाली, “दोरजा, तू फक्त साथ दे. आपण कष्ट करू, मुलांना स्वावलंबी बनवू. त्यांना देशासाठी घडवू आणि देशालाच अर्पण करू. मला शक्य आहे तोपर्यंत मला हे करू दे. ” दोरजा म्हणाला, “पण एखाद्या मुलाला हे पटलं नाही तर. ” ” ज्याला नाही पटणार, तो दोन वर्ष  देशसेवा करून नंतर आपलं  आयुष्य जगू शकतो. माझ्या दुधाचं हे मुलांवर असलेले कर्ज त्यांनी फेडावं, असं  सांगेन मी त्यांना. “आणि कुंतीच्या घरात वर्ष दोन वर्षात पाळणा हलू लागला.

“चांगल्या  कामाला निसर्गही साथ देतो, दीदी. माझं  वय काय ठाऊक नाही. पण अजून तरी कूस फळतेय. मुलांना अंगाई म्हणून मी  देशाचीच गाणी गाते. माझी मुलं ही फार गुणी आहेत. माझं ऐकतात. आमच्यासारखंच देशाचं  प्रेम त्यांनाही आहे. ” मध्यंतरी भीमाची बहीण वारली. तिच्या नवर्‍याने दुसरं लग्न केलं. पोटच्या पोरांना परकं  केलं. “मी म्हटलं, आण त्यांना इकडे. आता माझ्या पिल्लांसोबत  तिचीही मुलं  वाढताहेत. पण  अट त्यांनाही तीच. सैन्यात भरती व्हायचं. मुलांना  तायक्वांडोचं शिक्षण, रोज पहाडात दौड लावायचा सराव सक्तीचा केलाय मी. “ती परत हसली. “सैन्यात नंबर लागायला हवा ना, म्हणून जरा सक्ख्त आई झालेय. ” कुंती एकीकडे दोन मुलींना आणि एका मुलाला, सैनिकांसाठी भाकर्‍या कागदात बांधायला सांगत होती. दोरजाची गाडी सीमेकडे जायला निघेल म्हणून ती त्यांना घाई करत होती. शेतातल्या भाज्या आणि मिरच्यांचा वानवळा ही सोबत जायचा होता.

हिमालयाच्या कुशीतल्या, बर्फाळ पहाडावर, एक निरक्षर आई, आपलं  मातृत्व देशाला अर्पण करत होती. त्यासाठी तिनं  स्वत:चं शरीर पणाला लावलं होतं. मला माझीच  लाज वाटली.

पण माझं नवरात्र हुकलं नव्हतं. आज  मनात चांगल्या विचारांची  घटस्थापना झाली होती.

कुंती हसली. तिच्या सुरकुत्या मला विलक्षण सुंदर दिसल्या. माझी दुर्गा  माझ्यासमोर होती.

लेखिका :डॉ. स्मिता दातार

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मानवांना आलेले एक पत्र… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ मानवांना आलेले एक पत्र… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

प्रिय पृथ्वीनिवासी मानवांनो ,

तुम्ही एकही झाड लावू नका. ती आपोआप उगवतात.तुम्ही फक्त ती तोडू नका.

तुम्ही कुठलीही नदी स्वच्छ करू नका. ती प्रवाही आहे. स्वतः स्वच्छच असते.तुम्ही फक्त तिच्यात घाण टाकू नका.

तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी लागू नका. सर्वत्र शांतताच आहे. तुम्ही फक्त द्वेष पसरवू नका.

तुम्ही प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. ती क्षमता निर्सगात आहे. फक्त त्यांना मारू नका आणि जंगले जाळू नका.

तुम्ही माणसं काहीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नका. सर्व व्यवस्थितच आहे. फक्त तुम्ही स्वतःच व्यवस्थित राहा.

तुमचा निसर्ग.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तुम्हाला कोण आनंदात ठेवतं?… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ तुम्हाला कोण आनंदात ठेवतं?… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधील एका महिलेला विचारले,”तुमचा नवरा तुम्हाला आनंदात ठेवतो का?”

तिच्या शेजारी बसलेल्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो आत्मविश्वासाने पत्नीकडे बघू लागला. त्याला पूर्ण खात्री होती, की ती ‘हो’ असंच म्हणेल. कारण तिने लग्न झाल्यापासून कधीच काहीही तक्रार केलेली नव्हती.

पण त्याच्या बायकोने स्पष्ट आवाजात उत्तर दिलं,”नाही.” ती म्हणाली, “माझा नवरा नाही ठेवत मला आनंदात!”

तिच्या पतीला हे अनपेक्षित होतं. तेवढ्यात ती पुढे म्हणाली, “मला माझ्या नवऱ्याने आनंदात ठेवले नाही, मी स्वत:च आनंदात राहते.

मी आनंदी असावं की नाही याच्याशी त्याचा काहीच संबंध नाही. माझा आनंद पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे.

कुठल्याही परिस्थितीत, आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मी आनंदीच राहते. जर माझा आनंद कुणा दुसऱ्यावर, एखाद्या वस्तूवर किंवा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून राहिला तर ते माझ्यासाठीच कठीण होऊन बसेल.

आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते. माणसं, संबंध, आपलं शरीर, हवामान, आपले ऑफिसातले बॉस, सहकारी, मित्र, आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य… ही यादी न संपणारी आहे.

त्यामुळे काहीही झालं तरी आपण आनंदी राहायचं, हे मीच ठरवायला हवं ना! माझ्याकडे खूप काही असलं काय किंवा काहीच नसलं काय, मी आनंदीच असते!

मला कुठे बाहेर जायला मिळालं काय किंवा घरात बसून राहावं लागलं काय, मी आनंदीच राहीन. मी श्रीमंत असले काय किंवा गरीब राहिले काय, मी आनंदीच असेन.

माझं लग्न झालेलं असलं तरी लग्ना आधीही मी आनंदीच होते. कारण मी आनंदी आहे ती माझ्या स्वत:मुळे!

माझं जगणं दुसऱ्या कुणापेक्षा जास्त चांगलं आहे म्हणून मी आयुष्यावर प्रेम करते असं नाही, तर आनंदात राहायचं हे मी स्वत:च ठरवलं असल्यामुळे मी आनंदी आहे. माझ्या आनंदाची संपूर्ण जबाबदारी मीच घेतली असल्यामुळे माझ्याबरोबर जगणाऱ्या कुणालाही मला आनंदी ठेवण्याचं ओझं बाळगावं लागत नाही. त्यामुळे माझ्याशी बोलता- वागताना त्यांना अतिशय मोकळेपणा जाणवतो.

आणि यामुळेच मी इतकी वर्ष आनंदात संसार करू शकले. तुमचा आनंद कधीही दुसऱ्या कुणाच्या हाती जाऊ देऊ नका.

बोध : वातावरण चांगलं नसलं तरी आनंदी राहा. आजारी असलात तरी आनंदी राहा. कठीण परिस्थितीत, पैसे नसले तरी आनंदी राहा. कुणी तुम्हाला दुखावलं, कुणी तुमच्यावर प्रेम करत नसलं, अगदी तुम्ही किती मौल्यवान आहात हे ठरवू शकत नसलात, तरी आनंदी राहा. तुम्ही स्त्री, पुरुष कुणीही, कितीही वयाचे असा. असाच विचार करायला हवा; नाही का?

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print