मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अपूर्ण कविता … कवी : श्री पुनीत मातकर ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ अपूर्ण कविता … कवी : श्री पुनीत मातकर ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

शाळा सुटल्याच्या दीर्घ घंटेचा

आवाज विरत नाही, तोच

सुसाट वेगानं मी पोहोचायचो

घराच्या दारात…

*

पाठीवरलं दप्तर फेकून

घोड्यागत उधळत

पोहोचायचो मैदानात,

मस्तवाल बैलासारखा

धूळमातीत बेभान होऊन

मिरवत राहायचो स्वतःचं

पुरुष असणं..

*

तीही यायची शाळेतून..

चार रांजण पाणी…

घरअंगणाची झाडलोट…

देव्हा-यातला दिवा लावून

ती थापायची गोल भाक-या

अगदी मायसारखीच

अन् बसून राहायची उंब-यावर..

रानातून माय येईस्तोवर

*

ती चित्रं काढायची..

रांगोळ्या रेखायची..

भुलाबाईची गाणी अन्

पुस्तकातल्या कविता

गोड गळ्यानं गायची….

धुणंभांडी..सडा सारवण

उष्टं खरकटं..सारं मायवानीच करायची

*

मी पाय ताणून निजायचो,

ती पुस्तक घेऊन बसायची….

दिव्याच्या वातीत उशिरापर्यंत…

*

एकाच वर्गात असून मास्तर

माझा कान पिळायचे

कधीकधी हातानं….

कधी शब्दानं …

“बहिणीसारखा होशील तर

आयुष्य घडवशील…” म्हणायचे,

मग करायचो कागाळ्या

मायजवळ…

*

मॕट्रिकचा गड

मी चढलो धापा टाकत..

तिनं कमावले मनाजोगते गुण,

बाप म्हणला

दोघांचा खर्च नाही जमायचा

त्याला शिकू दे पुढं…

टचकन डोळ्यात आलेलं पाणी

तसंच मागं परतवत

ती गुमान बाजुला झाली

पाठच्या भावाच्या रस्त्यातून…

*

ती शेण गोव-या थापत राहिली..

मायसंगं रानात रापत राहिली

काटे तणकट वेचत राहिली…

बाईपण आत मुरवत राहिली

*

तिच्या वाट्याचा घास घेऊन

मीही चालत राहिलो

पुस्तकांची वाट… 

कळत गेलं

तसं सलत राहिलं

तिनं डोळ्यातून परतवलेलं

पाणी…

*

तिला उजवून बाप

मोकळा झाला..

मायला हायसं वाटलं..

मी मात्र गुदमरतो अजूनही

अव्यक्तशा

ओझ्याखाली…

*

दिवाळी..रसाळी..राखीला

ती येत राहते

भरल्या मनानं..

पाठच्या भावाच्या वैभवानं हरखते..

बोटं मोडून काढते दृष्ट..

टचकन आणते डोळ्यात पाणी..

पाठच्या भावासाठी

जाताना पुन्हा सोडून जाते..

मनभरून आशीर्वाद…

*

ती गेल्यावर मी हुरहुरत राहतो

ज्योतीसारखा

जिच्या उजेडात ती

उशीरापर्यंत वाचायची पुस्तकं ,

पाठ करायची कविता…

जिची कविता राहिली माझ्यासाठी अपूर्ण….

कवी: श्री.पुनीत मातकर

गडचिरोली

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पिंपळ आणि आंबा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “पिंपळ आणि आंबा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

आपले दु:ख, तेवढ्या मोठ्या मात्रेचे नसतांना अचानक कुणीतरी मोठ्या मात्रेने सांत्वन करायला पुढे आले की, थोडे गोंधळायला होते. हे सांत्वन झिडकारावे की त्यामागचा आपलेपणा पाहून नम्रपणे  स्वीकारावे ? अशा संभ्रमात पडायला होते खरे..

बागेतल्या पिंपळाला असेच काहीसे त्यादिवशी झाले बागेतले आंब्याचे झाड त्याला सांगत होते, “बघवत नाही रे तुला पिंपळा.. शिशिर ऋतूने तुला अगदीच पर्णहीन, निस्तेज करून टाकलंय. पण धीर धर. काही दिवसातच वसंत सुरू होईल आणि येईल पुन्हा पालवी…. होईल पुन्हा पूर्वीसारखे रूप … होशील माझ्यासारखा…” 

शिशिरात पर्णहीन अवस्थेत निरव शांततेतली आनंददायी ध्यानावस्था अनुभवणाऱ्या पिंपळाला यावर काय बोलावे, हे क्षणभर समजेना..

अनेकदा दुसऱ्याचे सांत्वन करतांना त्याचा दुःखभार हलका करण्याच्या हेतूपेक्षा, आपण खूप सुखात आहोत याचा काकणभर का होईना अभिमान दाखविण्याचा हेतू सांत्वन करणाऱ्याच्या मुखावर झळकत असतो. पण हा हेतू दिसला तरी त्यावेळी तसे बोलता येत नाही, याची समज आणि उमज पिंपळाला होती..

मंद स्मित करून पिंपळ आब्यांला म्हणाला, “तुझ्या प्रेमळ शब्दांसाठी खूप आभार. पण एक सांगू.. मी अजिबात दु:खात नाही. सृष्टीने सहाही ऋतूत आपले प्रारब्ध आधीच लिहून ठेवले आहे. कोणत्या झाडाने केव्हा फुलावे, बहरावे, कोमेजावे सगळे सगळे. आपल्या हातात फक्त मुळं आहेत आणि त्यांच्याव्दारे जमिनीतून जीवनरस घेणे आहे,.हे एकदा,उमगले की दुःखाचा लवलेश नाही “ 

“आपली मुळं आत सारखीच आहेत. फरक दिसतो, तो  फक्त बाहेर.. जमिनीवर… पाने, फळे, फुले, खोड, उंची यात फक्त फरक. विविधता आणि सौंदर्यासाठी केलेला… हे एकदा कळलं की, आहे त्यात आनंद.

सुख-दुःखापलीकडील समाधानाचा, आनंदाचा अनुभव. आपल्या बाह्य रूपातल्या बदलांकडे पहाण्याची एक वेगळीच दृष्टी येते. एक समाधानी अवस्था येते. जिथे कुणाशीही तुलना नाही, तक्रार नाही. ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान।” 

पिंपळाच्या या बोलण्याने आंब्याचे समाधान झाले नाही. त्याने पिंपळाला विचारले, “खरे खरे सांग ! पर्णहीन झाल्याने तुझं रूप कुरूप झालय, पक्षी येईनासे झालेत, पानांची सळसळ नाही… याचे खरेच तुला दुःख नाही?”

धीरगंभीर आवाजात पिंपळ उत्तरला, ” नाही. अजिबात नाही. बाहेरच्या बदलणाऱ्या गोष्टींशी आपल्या सुखाला जोडून घ्यायचं आणि त्या गोष्टी बदलल्या की दुःखी व्हायचं, ही माणसं करीत असलेली चूक आपण का करायची? माझं सद्‌भाग्य की, तथागताचा सहवास मला लाभला आणि पानं, फुलं, फळं यापलीकडे जाऊन कायम मुळाकडेच पाहण्याची खोड मला लागली. ‘घट्ट  मूळ’ आणि ही ‘खोड’ असली की आनंदाला बाधा नाही. बाह्य बदलांकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाते ”

 “ तू म्हणतोस पाने नाहीत त्याचं दुःख. पण खरं सांगू ..  शिशिर ऋतू माझा ५-६ हजार पानांचा भार हलका करतो. ते २-३ महिने खूप हलकं हलकं वाटतं ! तू हे सुख नाही अनुभवू शकत.. पानांचा भार नाही.

सळसळ नाही, पक्षांचे आवाज नाही. त्यामुळे ध्यान समाधीही दीर्घकाळ लावता येते. अधिक मुळाकडे जाऊन चैतन्याचा स्रोत देहभर भरून घेता येतो. वसंताला सामोरे जाण्याची ही पूर्वतयारी असते. म्हणूनच वसंत आला रे आला की अवघ्या सात दिवसात माझ्या देहभर पालवी फुललेली दिसते “

आंब्याला हळूहळू पिंपळाचे विचार पटत होते. पिंपळ पुढे बोलू लागला.” कुणाला आपण किती प्रिय आहोत, यावर आपण आपली प्रियता ठरवू नये. तुझाही मोहोर कधी जळतो.. कधी गळतो.. फळं नाही येत तेवढी… लोकं नाराज होतात..  फळांच्या अपेक्षेने प्रियता, जवळीकता असली की ती कधीतरी लोप पावते. पण फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष प्रेम केलं की प्रियता कायम रहाते. अशा निरपेक्ष प्रेम करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या प्रेमाची आठवण म्हणून त्यांच्या वहीत, पुस्तकात पिंपळपान कायमचं ठेवतात. शिशिरात देहावरची पाने गळाली तरी ती वह्या-पुस्तकातील पाने तशीच असतात. त्यांना बघून मी धन्य होत असतो.”

आपल्या फळाला बाजारात मोठा भाव / प्रसिध्दी आहे, अशा समजुतीत असणाऱ्या आंब्याला पिंपळ आपल्याहून जाणीवेने, विचाराने खूप मोठा आहे, हे एव्हाना जाणवले होते. पिंपळाप्रती आदरभाव, कौतुक व्यक्त करावं म्हणून आंबा पिंपळाकडे वळला तर काय? पिंपळ डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. पर्णहीन पिंपळाचं झाड आंब्याला स्वतःहून सुंदर दिसलं..समाधानी जाणवलं…आणि  मुळाकडे जायची खोड लावून घेण्याचा निश्चय त्याने मनोमन केला.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बायको असतेच जरा सर्किट… – अनुवाद : सॅबी परेरा ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ बायको असतेच जरा सर्किट… – अनुवाद : सॅबी परेरा ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

[डॉक्टर ज्योत्स्ना मिश्रा ह्यांच्या  ‘औरतें अजीब होती है’ ह्या हिंदी कवितेचा मुक्तानुवाद]

बायको असतेच जरा सर्किट

रात्रभर झोपत नाही धड

पापण्यांची सुरूच असते फडफड

झोपेच्या दऊतीत बुडवून पापण्या

दिवसभराची डायरी लिहीत असते

दरवाजाची कडी, पोरांचं पांघरूण, नव-याचं मन

पुन:पुन्हा चाचपडून बघत असते

*

बायको असतेच जरा सर्किट

धड उठतही नाही सकाळी

झोपेतच सुरू होते कर्तव्याची दिवसपाळी

टिफीनमधे घेऊन कविता 

कुंडीतल्या आशेला देऊन पाणी 

ओठांवर गुणगुणत गाणी

नव्या दिवसाच्या नव्या आव्हानाला

भिडत जाते झाशीची राणी

जुळवून घेते सा-यांशी सूर

सर्वांच्या जवळ राहता-राहता

जाते स्वत:पासूनच दूर

*

बायको असतेच जरा सर्किट

स्वप्नंही धड पूर्ण पाहत नाही

अर्धवट स्वप्नं वा-यावर सोडून

पाहू लागते …

चुलीवरचं ऊतू जाणारं दूध

दोरीवरचे उडू पाहणारे कपडे

गॅलरीच्या कडेपर्यंत रांगत गेलेलं बाळ

अजूनही शाळेतून न परतलेली लेक

अडखळत पाय-या चढणारा नवरा…

*

बायको असतेच जरा सर्किट

कुठलंच काम धड करीत नाही

मधेच सोडून शोधू लागते

पोरांचे मोजे, पेन्सिली, पुस्तकं

स्वत:च्या काॅलेजच्या पुस्तकातलं मोरपिस, 

स्कर्टच्या खिशातली बोरं, करवंदं

लपाछपीतल्या लपायच्या जागा

मैत्रिणींचे चुकलेले, चुकवलेले हिशेब

उघडझाप करणा-या खिडक्या

पितळेच्या डब्यातल्या चवल्या, पावल्या, दिडक्या

*

बायको असतेच जरा सर्किट

भेटत राहते, दिवसाचे चोवीस तास

वेगवेगळ्या रूपात, अवतारात

कधी नाक्यावर काॅंन्स्टेबल

कधी ब्युटीकमधे ब्यूटीशियन

कधी बसमधे कंडक्टर

कधी आॅफीसात सहकारी

ती वहिणी, ती लेक, ती ताई

ती नर्स, ती दाई, ती आई

चपलेचा तुटलेला पट्टा

साडीच्या फाॅलपाठी लपवणारी

शाळेतली ती शिस्तप्रिय बाई

काॅरीडाॅरमधे झपझप चालत

नखातला आटा झटकणारी

सकाळी घाईत अंघोळ आटोपून आलेली

ती डाॅक्टरीन बाई

*

बायको असतेच जरा सर्किट

ओढत-ढकलत कसाबसा, दिवस पार करते मात्र

क्रूस घेऊन समोर, उभी असते रात्र

दिवसाइतक्याच सहजतेने रात्रीलाही भिडते

लेकरांसाठी भुतांना पिडते

सत्यवानासाठी देवालाही नडते

*

बायको असतेच जरा सर्किट

दुष्काळात पावसासाठी आसवं ढाळते

हाताच्या ओंजळीत फुलपाखरं पाळते

सरसरून वाहू लागतो वारा

भरभरून बरसू लागतात धारा

धरतीला येते ज्वानीची भरती

ती धावत सुटते … वाचवायला

दोरीवर वाळणारे कपडे, 

अंगणातले पापड, मसाले

छतावरील लोणचं, खारवलेले मासे …

*

बायको असतेच जरा सर्किट

सुखाच्या तीन-दगडी आश्वासनावर

अवघ्या आयुष्याचं आंधण ठेवते

हरेक डोंगरातून रस्ता खोदते

हरेक दरीवर पूल बांधते

कळीसारखी उमलत राहते

वा-यासारखी वाहत राहते

अंगणात पडलेला चांदण्यांचा सडा

वेणीत गुंफून केसात माळते

दिनरात डोळ्यांतून पाझरत राहते

आसवांच्या नदीत वाहत जाते

समुद्रात मिळतानाही आपला गोडवा जपते

*

बायको असतेच जरा सर्किट

डोक्याचं काम खुशाल सोपवते ह्रदयाकडे

कपाळाच्या क्षितिजावर मावळला सूर्य जरी

पहात राहते आशेने उदयाकडे

कारण…

बायको असते दुष्काळातली बरकत

बायको असते गाण्यातली हरकत

बायको असते तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं तर्कट !- 

अनुवाद : सॅबी परेरा

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एका म्हातारीची गोष्ट… – लेखक : बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ एका म्हातारीची गोष्ट… – लेखक : बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

“एक म्हातारी होती. ती झोपडीत राहत असे. ती अत्यंत गरीब होती. तिच्या झोपडीच्या बाहेर एक आंब्याचे झाड होते. त्या झाडाचे आंबे विकून ती आपले पोट भागवत असे; परंतु तिथले शेजारी तिचे आंबे चोरायला लागले. ती आणखी गरीब झाली. एके दिवशी एक साधू तिच्या झोपडीत आला आणि म्हणाला- म्हातारे मी भुकेला आहे, मला काहीतरी खायला दे. म्हातारी म्हणाली मी गरीब आहे. माझ्याकडे एकच भाकरी आहे; पण त्यातली अर्धी तुला देते. साधूने अर्धी भाकरी खाल्ली, पाणी प्यायला आणि प्रसन्न झाला. तो तिला म्हणाला. “म्हातारे तू गरीब असशील, परंतु तुला खरी माणुसकी आहे. तू अर्धी भाकर दिलीस – मी प्रसन्न आहे. कोणताही वर माग. म्हातारी म्हणाली, “मला असा वर दे की माझे शेजारी आंबे चोरायला आले आणि त्यांनी झाडाला हात लावला रे लावला की ते झाडाला चिकटून लटकत रहातील आणि माझ्या संमतीशिवाय ते सुटणारच नाहीत.” साधू म्हणाला ‘तथास्तु!’ दुसऱ्या दिवशी तिला सकाळी आठ-दहा शेजारी आंब्याला चिकटलेले दिसले. सर्व ओरडत होते, “म्हातारे सोडव!, म्हातारे सोडव! झाडाला पुन्हा हात लावणार नाही. आम्हाला क्षमा कर.” असे त्यांनी कबूल केल्यावर म्हातारीने त्यांना सोडून दिले.

आणखी काही वर्षे गेली. म्हातारी आणखी म्हातारी झाली. तिच्या मृत्यूची वेळ आली. तिच्या मरणाचा दिवस आला आणि तिला न्यायला यमराज आले. ती यमराजाला म्हणाली, मला आणखी काही वर्षे जगू द्या. यमराज म्हणाले, “नाही, ते शक्य नाही कारण तुझ्या कपाळावर मरीआईने आजचा दिवस मरणाचा लिहिला आहे. त्यामुळे तुला आजच न्यावे लागेल. परंतु तुझी शेवटची काही इच्छा असेल तर सांग.” म्हातारी म्हणाली, “माझ्या झोपडीच्या बाहेर एक आंब्याचं झाड आहे. मरणापूर्वी त्याचा एक आंबा मला खावासा वाटतो आहे.” आंबा आणायला यमराज स्वतः झाडाजवळ गेले. झाडाला स्पर्श केल्याबरोबर यमराज झाडाला चिकटले आणि ओरडू लागले, “म्हातारे सोडव, म्हातारे सोडव” म्हातारी म्हणाली, “एका अटीवर सोडवीन. मी स्वतः इच्छा करेन, त्याच वेळी मरेन. मला इच्छामरणी करशील तर तुला  सोडवेन.” यमराज म्हणाले. “तथास्तु!” त्यामुळे ती म्हातारी अजून जिवंत आहे आणि ती कधीच मरणार नाही. तिचे नांव आहे :

भारतीय लोकशाही !!

“संसदमार्ग – लोकशाहीचा राजमार्ग “ : पुस्तकातून साभार.

लेखक : बॅ. विठ्ठलराव गाडगीळ

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अरे , लग्न झालं वाटतं !… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अरे, लग्न झालं वाटतं ! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

जोपर्यंत गाव छोटं होतं

प्रत्येकजण प्रत्येकाला ओळखत होतं 

परकं , अपरिचित कुणीच नव्हतं , कोणीही असो ” आपलं ” होतं !

 

एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जायला कुठलंही वाहन लागायचं नाही.

आम्ही येउ का ? तुम्ही घरीच आहात का ? असं विचारावं लागायचं नाही .

माणसं सतत एकमेकाला भेटत रहायची , बोलत राहायची , सारं काही सांगत रहायची .

कुठल्यातरी निमित्याने भांडण झाल्या शिवाय संवाद खुंटतच नव्हता .

भांडण म्हणजे उगी थोडीशी कुरबुर , अर्थात दोन दिवसात ” दो ” व्हायची आणि पुन्हा बोलणं सुरू व्हायचं !

म्हणजे लहानपणी , गावाकडे , ” न करमन्याला वावच नव्हता .”

बरं सगळ्या गोष्टी जवळ होत्या 

दुकान , शाळा , राम मंदिर , मारुतीचा पार , बस स्टॅण्ड सगळं हाकेच्या अंतरावर , त्यामुळे चालणं व्हायचं आणि ओळखीचं माणूस दिसलं की बोलणं व्हायचं !

पुन्हा भजन , पूजन , रामायण , भागवत , हरिपाठ , देवळातल्या पंक्ती , दिंडी , पालखी , गुरवारची पंचपदी माणसाला रिकामपणच नव्हतं .

 

माणसं busy होती , पण income नव्हतं , त्याच्यामुळे स्पर्धा , आसूया , चिंता , काळजी या गोष्टींना थाराच नव्हता .

(मोठा टीव्ही, चार चाकी, मोठा बंगला.. इंग्रजी शाळा याचा विचार शिवायचा नाही…)

आणि बायांना तर भलतेच कामं होते .त्यांच्या वाट्याच्या कामाची नुसती यादी जरी नवीन पिढीने केली तरी त्यांच्या छातीत कळ येईल .

 

अजून एक गोष्ट ….

इंग्रजीचं फॅड अजिबात नव्हतं 

ABCD …….XYZ याचा संबंध फक्त शाळेत गेल्यावर , ते ही इंग्रजीच्या तासालाच !

आणि आता 

ABP माझा , CID , MRI , X-ray , Z-TV विचारूच नका .

आमच्या लहानपणी , 

This is Gopal . अन That is Seeta .हे दोन वाक्य पाचवीत गेल्यावर वाचता यायचे तरी जबरदस्त कौतुक व्हायचं !

आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुका घ्यायची आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पहायची की त्या पोराला एकदम कंडक्टर झाल्या सारखंच वाटायचं !

 

अहो कंडक्टर याच्यामुळे की …..आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने , 

हं sss काय रे बाळ मोठेपणी तू काय होणार ?

असा प्रश्न विचारला की ते पोट्ट हमखास म्हणायचं …..

मी मोठेपणी कंडक्टर होणार किंवा पोलीस होणार !

तुम्हाला खोटं वाटेल मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला किती परसेंटेज मिळालं असा प्रश्न कोणीही कुणाला विचारत नव्हतं 

फक्त एवढंच विचारायचे ….

पहिल्या झटक्यात पास झालास न ?

आणि आपण हो म्हणताच अख्ख्या गावाला आनंद व्हायचा !

म्हणजे पहा सुखाच्या , आनंदाच्या , मोठं होण्याच्या कल्पना किती छोट्या होत्या !

लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टीचा विस्तार होतो , त्या त्या गोष्टीतून दुःखच होतं .

तुम्ही बघा पूर्वी ….

गाव छोटं , घर छोटं , घरात वस्तू कमी , पगार कमी , त्याच्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी 

उसनपासन केल्या शिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता , तरीही मजा खूप होती!

 

तुम्ही आठवून पहा गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं !

उसनपासन करावंच लागायचं ……

साखऱ्या , पत्ती , गोडेतेल , कणिक या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसन्या मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता 

त्यामुळे कोणाकडे ” हात पसरणे ” म्हणजे काहीतरी गैर आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही .

उलट या गोष्टींची इतकी सवय होती की कोणत्याच गोष्टीचा ” कमीपणा ” वाटत नव्हता !

डोकं दुखल्यावर शेजाऱ्याकडे अमृत अंजनच एक बोटं उसन मागायला सुद्धा अजिबात लाज वाटली नाही .

घरातल्या वडील माणसासाठी 10 पैश्याच्या तीन मजूर बिड्या किंवा 15 पैशाचा सूरज छाप तंबाखूचा तोटा आणतानाही मान कशी ताठ असायची !

 

कोणतीच गोष्ट कोणापासून लपून रहातही नव्हती आणि तसा प्रयत्नही फारसा कुणी करत नव्हतं !

गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पहायला येणार ही बातमी लपून राहूच शकत नव्हती , कारण शेजाऱ्या-पाजाऱ्या कडून पोह्याच्या प्लेट , चमचे , बेडशीट ,

 तक्के , उषा , दांडी असलेले कपं आदी साहित्य मागून आणल्या शिवाय ” पोरगी दाखवायचा  कार्यक्रम ” होऊच शकत नव्हता !

आणि मित्र हो हीच खरी श्रीमंती होती , ते आत्ता कळतंय !

आणि हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं लग्न होऊन जातं तरीही कळत नाही !

जेंव्हा Status वर डान्सचा व्हिडीओ येतो तेंव्हा कळतं , अरे लग्न झालं वाटतं !

 

हे सगळं लिहिण्या मागचा एकच उद्देश आहे

भेटत रहा , बोलत रहा , जाणे-येणे ठेवा , विचारपूस करा …..

जेवलास का ?

झोपलास का ?

सुकलास का ?

काही दुखतंय का ? असे प्रश्न विचारतांना लागलेला मायेचा , काळजीचा , आपुलकीचा कोमल     स्वरच जगण्याचं बळ देत असतो !

 

माणसाशिवाय ,गाठीभेटीशिवाय , संवादाशिवाय काssssही खरं नाही !

कवी :अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ व.पु.काळे यांची एक बोधकथा – कथालेखक : व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

व. पु. काळे यांची एक बोधकथा – कथालेखक : व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

गावे का दुसऱ्याच्या मनासारखे ? हे समजावणारी सुंदर अशी व.पु.काळेंची बोधकथा

बायकोनं घरात मांजर पाळलेलं. तिचं ते खूप लाडकं. ती जेवायला बसली की तिलाही घेवून बसायची. एका वाटीत दूध भाकर कुस्करुन द्यायची. 

पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही. उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय. त्याचा त्याला प्रचंड राग यायचा… 

एकदा नवरा जेवायला बसलेला, आणि नेमकं मांजराने त्याच्या ताटात तोंड घातलं. नवरा चिडला आणि रागारागाने शेजारी असलेला पाटा त्याच्या डोक्यात घातला.  

घाव वर्मी बसल्याने मांजर बराच वेळ निपचित पडून राहीलं. ‘मेलं की काय’ अशी शंका येत असतांनाच ते अंग झटकून उठून बसलं. 

त्याने हळूच नवऱ्याकडे हसून बघीतलं, आणि चक्क ‘शॉरी यार, मी मघाशी तुझ्या ताटात तोंड घातलं. क्या करे आदत से मजबूर हूँ, पुन्हा नाही असं करणार..’ असं माणसासारखं बोललं. नवरा वेडा व्हायचाच बाकी..!

त्यानंतर मांजर नम्र आणि आज्ञाधारक झालं. ताटात तोंड घालणे तर सोडाच, दारातला पेपर आणून दे, 

टी पॉय वरचा चष्मा आणून दे…  अशी बारीकसारीक कामं ते करू लागलं.

मग काय, नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमली. ऑफिसमधून येताच मांजर दिसलं नाही की तो अस्वस्थ व्हायचा. ‘अग मन्या दिसत नाही गं कुठं ?’ बायकोला सतत विचारत राहायचा.

असेच काही दिवस गेल्यावर एकेदिवशी सोसायटीच्या गेटसमोर बेवारस कुत्री आणि मांजरं पकडून नेणारी महापालिकेची व्हॅन येऊन थांबली. 

मन्याने खिडकीतून ती व्हॅन बघितली. त्याच्या मनात काय आलं कोण जाणे, पण धावत जावून तो व्हॅन मधे बसला. 

नवऱ्याने हे बघितले.  हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो मन्यामागे धावला. मन्या व्हॅनमध्ये निवांत बसलेला.

नवरा म्हणाला, “मन्या, अरे इथं गाडीत का बसलायस? ही गाडी बेवारस मांजरासाठी आहे. तुझ्यासाठी नाही.”

“मला माहितेय..! पण मला जायचंय आता.” मन्या शांतपणे बोलला.

“मन्या, अरे असं काय करतोस? तू किती लाडका आहेस आम्हा दोघांचाही.  माझं तर पानही हालत नाही तुझ्याशिवाय. तू क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही. मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल मला सोडून निघालास ? ए प्लिज, प्लिज उतर रे आता.” काकुळतीला येवून नवरा बोलला.

मन्या गोड हसला, आणि बोलला, “तू माझ्यावर प्रेम करतोस? माझ्यावर?”

“म्हणजे काय शंकाय का तुला?”

“मित्रा, अरे मी जेंव्हा माझ्या मनासारखं वागत होतो,  हवं तिथं हवं तेंव्हा  तोंड घालत होतो, तेंव्हा मी तुझा नावडता होतो.  सतत रागवायचास माझ्यावर. अगदी माझ्या जीवावर उठला होतास तू एकदा

पण जेंव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो,  तुला हवं तसं करू लागलो…. तेंव्हा तुला आवडू लागलो. तू माझ्यावर प्रेम करू लागलास, यात नवल ते काय?” 

नॉट सो स्ट्रेंज यार…!!

वपुंची ही कथा खूप काही सांगून जाते……

जेंव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो, तेंव्हा ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून, की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो ?

समोरचा जो पर्यंत आपल्या मनासारखं वागत असतो, तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं. कारण त्याचं वागणं आपल्याला सुखावणारं असतं. 

पण जेंव्हा तो आपलं ऐकत नाही, आपल्याला हवं तसं वागत नाही, तेंव्हा त्याचं आपल्या सोबत असणंही आता नकोसं वाटतं. त्याला टाळत राहतो.

भेटलाच कधी तर त्याच्यावर चिडतो, रागावतो. त्यानं नाहीच ऐकलं की मग वर्मी घाव घालून नातंच संपवून टाकतो. ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं, त्याला क्षणात परकं करून टाकतो.

आश्चर्य आहे ? का वागतो असं आपण ? त्याच्यावर खरंच आपलं प्रेम असतं की निव्वळ time pass म्हणून केलेली खोटी भावनिक गुंतवणूक?

आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं.

अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, जेंव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो..!!

कथालेखक :  व.पु.काळे

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कोणती साडी नेसू ???? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ कोणती साडी नेसू ????  – – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

बायकांना पडणारा सर्वात मोठ्ठा गहन प्रश्न…

.. .. ..  कोणती साडी नेसू.. प्रत्येक बाईच्या आयुष्यात, ‘संध्याकाळी भाजी काय करू’? प्रमाणेच, ‘कोणती साडी नेसू’ हा प्रश्न पण फार ज्वलंत प्रश्न असतो. पुरूषांना जसं मयताला आणि लग्नाला एकच ड्रेस चालतो तसं बायकांचं मुळीच नसतं बरं…  बाहेर पडताना साडी चॉईस करणं बाईसाठी मोठंच  चॅलेंज असतं.  प्रत्येक प्रसंगाची साडी वेगळी असते. त्यातही बऱ्याच साड्या, ब्लाऊज अभावी बाद झालेल्या असतात. साड्या चांगल्या असतात. पण ब्लाऊज पुन्हा शिवावं इतक्या पण नसतात. 

तुमच्याकडे भले शंभर साड्या असल्या तरी त्यातली प्रत्येक साडी तुम्ही कुठेही नेसू शकत नाही. म्हणजे भाजी बिजी आणायला साधीशी वॉश अँड वेअर साडी नेसावी लागते. इथे साधी म्हणजे कॉटन नाही बरं. कॉटनची साडी मुलांच्या शाळेत वगैरे जायचं असेल, लायब्ररीत वगैरे, एखादी कामकाजी मिटींग असेल तेव्हा. वाढदिवस, डोहाळेजेवन वगैरेला जाताना अगदी लाईट जरी बॉर्डर असलेली. लग्नाला जाताना प्युअर सिल्क, कांजिवरम, वगैरे साड्या नेसाव्या लागतात. दहाव्याला, तेराव्याला वेगळ्या लाईट कलरच्या, बारीकशी किनार असलेल्या. त्यात पण समारंभ किती जवळच्या संबंधात आहे, त्याप्रमाणे साडीचा भारीपणा..  हलकेपणा ठरतो. गेलेली व्यक्ती म्हातारी होती की तरूण ह्यावरून पण बायका जरीची /  बिनजरीची असे प्रकार ठरवतात. म्हणजे म्हातारी व्यक्ती गेली की जरा साधीशी पण जरीबॉर्डरची नेसली तरी चालते. तरूण व्यक्ती गेली असेल तर मात्र दु:ख जास्त दाखवावं लागतं. मग जरा जास्त साधी साडी. 

साडी ठरवताना जिच्याघरी लग्न आहे तिला तुम्ही किती किंमत देता त्यावर पण साडी बदलते.काही जणी चांगल्या श्रीमंत साडी सम्राज्ञी असतात… साडी खरेदी हे ह्यांचं आद्य कर्तव्य. म्हणजे ह्यांचं जन्माला येण्याचं प्रयोजनच साड्यांची खरेदी हेच असावं असं वाटावं इतक्या साड्या घेतात.  

साडी नेसताना स्मरण शक्तीचा पण खूप कस लागतो. म्हणजे ही साडी आपण कोणाच्या घरच्या कार्यक्रमाला नेसलो होतो. तिथे तेव्हा कोण कोण होतं. कोणी कोणी ही साडी पाहिली आहे. आता ज्या कार्यक्रमाला चाललोय तिथे त्या आधीच्या कार्यक्रमाच्या कोण कोण येतील. ही सगळी व्हिडीओ फिल्म मनातल्या मनात प्ले करावी लागते. मग त्याप्रमाणे साडी ठरते. 

बरं एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपण चांगल्यातली साडी नेसून जावं तर बाकीच्या अगदी साध्या साड्यांमधे आलेल्या असतात. मग ‘बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना’ अशी आपली गत होते. आणि ते  पाहून आपण दुस-या तशाच कार्यक्रमाला साधीशी साडी नेसावी तर बाकीच्या झकपक साड्या नेसून आलेल्या असतात. पुन्हा पचका!! हे गणित तर मला कधीच जमलेलं नाही. अगदी क्वचित एखाद्या वेळेस आपण चुकून परफेक्ट साडी नेसली की मला धन्य धन्य होऊन जातं. 

बरं साडी कितीही सुंदर असली तरी बायका एकमेकींच्या साडीला कधी मोकळेपणी ‘छान आहे साडी’ असं म्हणत नाहीत. त्या नुसत्या डोळ्याच्या कोप-यातून तुमच्या साडीकडे बघत असतात. आणि अगदीच असह्य झालं तर अशी दखल घेतात.

“माझ्याकडेपण होती अशातली, खूप पिदडली मी. मग मागच्या वर्षी बहिणीला देऊन टाकली.” अशा शब्दांमधून आपण ठरवायचं हे साडीचं कौतुक होतं की पोस्टमार्टेम. 

खूप छान साडी बघून एखादी म्हणते, “हिच्यापेक्षा परवाच्या डोहाळे जेवणातली तुुझी साडी चांगली होती”.पुन्हा आपण कोड्यात. म्हणजे ही साडी चांगली नाही असं हिला म्हणायचं आहे, *पण मग ती साडी चांगली होती तर तेव्हा का नाही बोलली तसं?*असा विचारही मनात येतो.

त्यामुळे साड्यांनी कपाट ओसंडून वहात असलं तरी ‘कोणती साडी नेसू’ ह्या प्रश्नाचं उत्तर काही ते कपाट देऊ शकत नाही. म्हणजे साडया ठेवायला जागा नाही आणि नेसायला साडी नाही अशातली गत. त्यात आता ड्रेसेसची पण भर. ड्रेसेसमधे पण गावात वापरायचे वेगळे, पुण्या-मुंबईत वापरायचे वेगळे, फॉरिन टूरचे वेगळे. ट्रीपचे वेगळे. म्हणजे साड्यांचा जेवढा स्टॉक तेवढाच ड्रेसेसचा…  किती ते डोकं लावायचं बाईने. 

पुरूषांना दोन ड्रेस दिले तरी ते त्याच्यावर दोन वर्ष आनंदाने काढून टाकतील.उलट काही ऑप्शनच न ठेवल्याबद्दल आभार मानतील. त्यामुळे त्यांना ह्या गहन प्रश्नाला तोंड द्यावं लागत नाही परिणामी अनेक महत्वाची कामं त्यांच्या हातून पार पडतात.   

पण *बायका* बिचा-या .. ..  कोणती भाजी करू?.. कोणती साडी नेसू?.. ह्या दोन प्रश्नांपायीच केवळ आयुष्यात मागे पडतात….

लेखिका : अज्ञात 

संग्रहिका – सौ अंजली दिलीप गोखले 

मो 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नेसा –बांधा – घाला – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? वाचताना वेचलेले ?

नेसा –बांधा – घाला – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

वेगवेगळ्या कपड्यांसाठी मराठीत वेगवेगळी क्रियापदं आहेत. हीच खरी भाषेची श्रीमंती. पण नवख्या माणसाची त्याने थोडी अडचण होऊ शकते. कोणत्या कपड्याला कोणतं क्रियापद हे लक्षात राहत नाही आणि मग त्यातूनच साडी घालणे वगैरे गोंधळ होतात.

एक युक्ती सांगते. ती लक्षात ठेवा. म्हणजे हे असे गोंधळ टळतील. कोणती ती युक्ती ? पाहू.

एक लक्षात ठेवा. शिवलेलाच कपडा घालायचा. म्हणून लेंगा, सदरा, टोपी, पगडी, हाप्पँट या सगळ्या गोष्टी घालायच्या. पण बिनशिवलेला कपडा चुकूनसुद्धा घालायचा नाही. म्हणून साडी, धोतर वगैरे घालणं शक्य नाही.

असा बिनशिवलेला कपडा जर कंबरेखाली परिधान करणार असू तर तो नेसायचा. म्हणून धोतर, सोवळं, साडी, लुंगी नेसा.

हेच जर बिनशिवलेला कपडा कंबरेवर परिधान करणार असू तर तो घ्यायचा. म्हणून ओढणी, उपरणं घ्या. अगदी पदरसुद्धा घ्या.

आता जर अशा बिनशिवलेल्या कपड्याने सगळं अंग झाकणार असू तर तो पांघरायचा. म्हणून शेला, शाल पांघरा.

तोच बिनशिवलेला कपडा जर डोक्यावर परिधान करणार असू तर तो बांधायचा. म्हणून मुंडासं, पागोटं, फेटा बांधा.

आता याखेरीज काही अगदी वेगळी क्रियापदं काही मोजक्याच ठिकाणी वापरतात. तीदेखील पाहू.

म्हणजे मफलर गुंडाळतात. कधीकधी घाईघाईत साडीदेखील गुंडाळतात ! निऱ्या काढतात आणि खोचतात. कामाला सुरुवात करण्यापूर्वी पदर खोचतात. नऊवारी साडीचा किंवा धोतराचा काष्टा मारतात. असो.

हा लेख संपला आणि अनेकांच्या मनातला गोंधळ देखील ! आता बिनधास्त शर्ट अडकवा, पँट चढवा आणि कुठे बाहेर जायचं ते जा!

कवी : अज्ञात. 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वकिलाचं मन…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “वकिलाचं मन…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

पूर्वेचा सूर्य पश्चिमेला, 

कधी उगवणार नाही

वकिलांचे मन कुणास,

कधी कळणार नाही !!

*

सुरुवातीची पाच वर्षे

असे प्रतिक्षेचा काळ

मग हळू -हळू जुळते

या व्यवसायाशी नाळ

जीवनातील हा संघर्ष

कधी संपणार नाही !!

वकिलाचे मन कुणास,

कधी कळणार नाही !!

*

ढीगभर कागदपत्रांचे

करावे लागते वाचन

सर्वोच्च न्यायनिर्णयांचे

करीतसे अवलोकन

लौकीकांन्वये मानधन

कधी मिळणार नाही !!

वकिलांचे मन कुणास,

कधी कळणार नाही !!

*

ऑफीस-कोर्ट-ऑफीस

करुन कुणा नसे जाण

पक्षकारांच्या केसेसचा

वकिलांवरच असे ताण

वेळ स्वत:चे आयुष्यास,

कधी गावणार नाही !!

वकिलांचे मन कुणास,

कधी कळणार नाही !!

*

पगार नसे, पेन्शन नसे

मानधनावरच समाधान

केवळ आशेवर रंगवतो,

भविष्याचे सुस्वप्न छान

दु:ख स्वमनाचे कुणा,

कधी दावणार नाही !!

वकिलांचे मन कुणास,

कधी कळणार नाही !!

*

लोकांच्या न्यायासाठी

नेहमी लढत असतो

मुखावर हास्य ठेवून

मनातच कुढत असतो

स्वत:च्या हक्कांसाठी

कधी लढणार नाही !!

वकिलांचे मन कुणास,

कधी कळणार नाही !

*

कोर्टातील महत्वाचा

वकील सहकारी असे

न्यायाधिशांप्रमाणे तो

न्यायिक अधिकारी असे

दर्जा सुविधांचा त्यांना,

कधी लाभणार नाही !!

वकिलांचे मन कुणास,

कधी कळणार नाही !!

वकील मित्रमैत्रीण यांना समर्पित,

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “निळंशार गवत…” – लेखक : वैद्य परीक्षित शेवडे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “निळंशार गवत…” – लेखक : वैद्य परीक्षित शेवडे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

एक जुनी लोककथा आहे

एकदा एक गाढवाने वाघाला म्हटलं; “कसलं निळंशार गवत आहे बघ.”

वाघ म्हणाला; ” निळं गवत? उगाच काहीही काय सांगतो रे? गवत हिरवं असतं. हेही तसंच हिरवं आहे की.”

“अरे बाबा निळंच आहे हे गवत. तुझे डोळे खराब झाले आहेत.” असं म्हणून गाढवाने “वाघाचे डोळे खराब झाले आहेत” म्हणून सगळीकडे आरडाओरडा सुरू केला. 

यामुळे वैतागलेला वाघ सिंहाकडे गाढवाची तक्रार घेऊन गेला. पूर्ण प्रकरण सांगितल्यावर वाघ म्हणाला; 

“महाराज; गवत हिरवं असूनही गाढव मला मात्र निळंच असल्याचं सांगत राहिला. आणि बाकीच्या लोकांना पूर्ण प्रकरणही न सांगताच थेट माझे डोळे खराब आहेत म्हणून खुशाल माझी बदनामी करत सुटलाय. याला शिक्षा करा महाराज.” 

सिंहाने बाजूला पडलेल्या हिरव्यागार गवताच्या गंजीकडे शांतपणे पाहिलं आणि वाघाला चार चाबकाचे फटके मारायची शिक्षा सुनावली आणि गाढवाला सोडून दिलं !

या निर्णयामुळे हैराण झालेल्या वाघाने सिंहाला शिक्षेबद्दल विचारलं. 

” महाराज; इतकं हिरवंगार गवत समोर दिसत असूनही तुम्ही त्याला सोडलं आणि मलाच उलट शिक्षा? असं का महाराज?”

सिंह म्हणाला; ” शिक्षेचं गवताच्या रंगाशी काही देणंघेणं नाहीये. ते हिरवंच आहे; हे तुला मलाच काय .. सगळ्या जगाला माहिती आहे. पण तू वाघ असूनही एका गाढवाशी वाद घालत बसलास यासाठी तुला शिक्षा दिली आहे “

आपल्या आयुष्यात; त्यातही विशेषत: सोशल मीडियावर कोणाशी वाद घालत बसायचं याचा निर्णय नीट घेत चला ! सुप्रभात !!

लेखक – वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares