मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “श्रीमंती” – कवी :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “श्रीमंती” – कवी :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

भूतकाळातील व वर्तमानातील

सर्व गोष्टी लक्षात राहणे

चष्म्याशिवाय बघता व वाचता येणे

कानाने सुमधुर संगीत व संवाद ऐकू येणे

बत्तिशी शाबूत असणे व

ऊस-चिक्की खाता येणे

सुंदर फुलांचा सुगंध घेता येणे

ही खरोखरच साठीनंतरची श्रीमंती आहे

 

लिमलेटच्या गोळ्या व कॅडबरी खाता येणे

आपण लिहिलेले दुसऱ्याला वाचता येणे

कुठल्याही कागदपत्रांवर

एकसारखी सही करता येणे

जिन्याच्या पायऱ्या आधाराशिवाय

पटापट उतरता येणे

डोक्यावरती केशसंभार

(फक्त त्याचा ) भार असणे

ही खरोखर साठीनंतरची श्रीमंती आहे

 

आपल्या गरजेपुरते निवृत्तीवेतन असणे

कर्जाचा कोणताही भार डोक्यावर नसणे

आपली मुलेबाळे आपल्या जवळ असणे

नातवंडांचे कोडकौतुक करायला मिळणे

मनात आले की सहलीला जाता येणे

ही खरोखरच साठीनंतरची श्रीमंती आहे

 

शाळा-कॉलेजमधले

बालमित्र-मैत्रिणी संपर्कात असणे

नोकरीमधले सहकारी

अधूनमधून भेटणे

सहजच आठवण आली म्हणून

नातेवाईकांनी फोन करणे

आधुनिक काळातील सर्व

गॅझेट्स लीलया वापरता येणे

कुटुंबामध्ये सुसंवाद आनंद

व मनःशांती असणे

इतके सर्व असेल तर

हीच खरी

अगदी फुलटूस श्रीमंती आहे

 

कवी : अज्ञात

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘सुट्टी’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

सुट्टी’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

हल्ली जरा सुट्टी मिळाली, की जगबुडी झाल्यासारखे लोक ‘विकेन्ड’ साजरा करायला कुटुंबाला घेऊन निघतात. जाण्यायेण्यात सात-आठ तास (ट्रॅफिक नसेल तर), तिथे जाऊन गर्दीत मिसळून थातूरमातूर साईट सिईंग करायचं किंवा रिसॉर्टच्या रूममध्ये टीव्ही पहात झोपून राहायचं.

सुट्टी संपवून दमून यायचं आणि दुसऱ्या दिवशी कामाला जुंपायचं!

आपण नक्की का जातो वीकएंडला?

कशापासून लांब पळतो?

मला वाटतं,रोजची चाकोरी मोडणं हा त्यामागील महत्त्वाचा हेतू असतो.

चाकोरी म्हणजे काय?

नवऱ्याची नोकरी, मुलांच्या शाळा आणि बायकोचं घरकाम?

चाकोरी म्हणजे रोजची मेल्स, व्हाट्सऍप, फेसबुक, टीव्ही, गर्दी, ट्रॅफिक? मग हे मोडायला, ह्यापासून आराम मिळवायला परत त्यातच का जायचं?

सुट्टीच्या दिवशी घरातलं वायफाय आणि टीव्ही बंद करून टाकावे. फोन स्वीचऑफ करून कपाटात ठेवावा. मुलांची अभ्यासाची पुस्तके दप्तरात भरून ठेवावी. किचनचा गॅस बंद ठेवावा. खूप गप्पा माराव्या. मुलांशी खेळावे, वयस्कांना वेळ द्यावा, बाहेरून ब्रेकफास्टसकट सर्व मिल्स मागवावी.

सर्वांना मान्य असेल तर जवळचे भावंड किंवा जिवलग मित्रांना सहकुटुंब घरी बोलवावे. गप्पांचे फड जमवावे, पत्ते खेळावे, गाणी ऐकावी, वाद्यावरची धूळ झटकून त्यावर एखादा साज छेडावा, मस्त पुस्तक वाचावे.

बायकोला सकाळी सायंकाळी स्वहस्ते चहा करून द्यावा.

नको ती गर्दी, नको ते ट्रॅफिक, नको ते ड्रायव्हिंग!

विकेन्ड कधी एन्ड होईल ते कळणारसुद्धा नाही. एन्ड न होणाऱ्या अनेक आठवणी देत!

अनावश्यक प्रवास तसेच प्रदूषण टाळा ! आनंद मिळवण्यासाठी लांबचा प्रवास किंवा पैसे खर्च केलेच पाहिजेत असे नाही.

आपणच पुढील पिढीला चुकीच्या सवयी लावत आहोत असं नाही ना ?

लेखक  :अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ इतके मला पुरे आहे – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

इतके मला पुरे आहे लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

बसायला आराम खुर्ची आहे

हातामध्ये पुस्तक आहे

डोळ्यावर चष्मा आहे

इतके मला पुरे आहे ।।१।।

*

निसर्गामध्ये सौंदर्य आहे

निळे आकाश आहे

हिरवी झाडी आहे

सूर्योदय, पाऊस, इंद्रधनुष्य आहे

इतके मला पुरे आहे ।।२।।

*

जगामध्ये संगीत आहे

स्वरांचे कलाकार आहेत

कानाला सुरांची जाण आहे

इतके मला पुरे आहे ।।३।।

*

बागांमध्ये फुले आहेत

फुलांना सुवास आहे

तो घ्यायला श्वास आहे

इतके मला पुरे आहे ।।४।।

*

साधे चवदार जेवण आहे

सुमधुर फळे आहेत

ती चाखायला रसना आहे

इतके मला पुरे आहे ।।५।।

*

जवळचे नातेवाईक आहेत,

मोबाईलवर संपर्कात आहेत

कधीतरी भेटत आहेत,

इतके मला पुरे आहे ।।६।।

*

डोक्यावरती छत आहे

कष्टाचे दोन पैसे आहेत

दोन वेळा दोन घास आहेत

इतके मला पुरे आहे ।।७।।

*

देहामध्ये प्राण आहे

चालायला त्राण आहे

शांत झोप लागत आहे

इतके मला पुरे आहे ।।८।।

*

याहून जास्त आपल्याला काय हवे आहे?

जगातील चांगले घेण्याचा

आनंदी आशावादी राहण्याचा

विवेक हवा आहे

इतके मला पुरे आहे ।।९।।

*

शरीर माझे योग्य साथ देते आहे,

स्मृतीची मला साथ आहे,

मी कुणावरही आज अवलंबून नाही

इतके मला पुरे आहे ll10ll

*

इतकेच मला पुरे आहे!

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आणि मला दुर्गा सापडली…” – लेखिका :डॉ. स्मिता दातार ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “आणि मला दुर्गा सापडली…” – लेखिका :डॉ. स्मिता दातार ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

सिक्किमजवळच्या पेलिंगला नेमकी आमच्या यांची कॉन्फरन्स घोषित झाली. नवरात्राचे दिवस. यांच्या आग्रहामुळे मला जावंच लागलं. मनात मात्र घरचं नवरात्र हुकल्याची हुरहुर होती.

आमची गाडी त्या दिवशी सारखा त्रास देत होती. गाडीच्या ड्रायव्हरच्या मावशीचं घर रस्त्यावरच होतं. वळणावळणाच्या त्या रस्त्यावर एका घराशेजारी गाडी थांबली. घरासमोर बरीच  मुलं  खेळत होती. लहान -मोठी, गोबर्‍या लाल गालांची, बसक्या नाकाची.

गाडीचा आवाज ऐकून एक मध्यमवयीन बाई बाहेर आली आणि आमच्या  ड्रायव्हर भीमला म्हणाली, ‘ताबा तस खै ?’ कसा आहेस ? भीमने आमची ओळख करून दिली. ही कुंती, माझी मावशी. जरा कुरकुरणार्‍या गाडीची डागडुजी  करायला भीम गाडी घेऊन गेला.

कुंती अगदी चारचौघींसारखी दिसत होती. सिक्कीमी बायकांचा  गुडघ्यापर्यंत येणारा बाखू  तिने घातलेला. कान लोंबेपर्यंत, कानाची पाळी फाकवणारे कानातले झुमके, अकाली पडलेल्या सुरकुत्या आणि चेहेर्‍यावर हसू. तिचं वय असेल सहज पन्नाशीला आलेलं. पण कुंती गरोदर होती. या वयाची बाई गरोदर बघून मला धक्काच बसला. एक बारकं  मूल तिच्या कडेवर होतं. एक पाठीशी झोळीत बसून तिच्या मागून वाकून मिचमिच्या डोळ्यांनी  आमच्याकडे बघत होतं. इतक्यात झोपडीतून नुकतीच चालायला लागलेली, नीट चालणारी पण शेंबूड पुसणारी आणखी दोन तीन पाठोपाठची मुलं बाहेर आली. कुंतीनं आमचं स्वागत केलं. तिने हाक मारल्यावर झोपडीच्या मागच्या उतारावर शेतात काम करणारा एक चौदा पंधरा वर्षांचा मुलगा धावत आला आणि आम्हाला बसायला त्यानं एक बाक आडवा केला. कुंतीला तोडकं  मोडकं  हिन्दी येत होतं. पण तिथल्या एका मुलाला  नीट हिन्दी येत होतं. त्याच्या मदतीने आमचा संवाद सुरू झाला.

माझ्या चेहर्‍यावरचं आश्चर्य बघून कुंतीनेच संभाषणाची सूत्र हातात घेतली. “दीदी, ही सगळी माझीच मुलं. ”  “तुझी म्हणजे, तुझी स्वत:ची?” मी उडालेच. “हो. माझी, माझ्या पोटची. ” “पण.. आपला कायदा आहे ना.. दो या तीन.. ”  कुंतीला या प्रश्नांची अपेक्षाच असावी. “हो, आहे ना कायदा. आणि मुलांची संख्या वाढवली तर सरकारवर त्यांचा बोजा टाकायचा नाही, हे ही ठाऊक आहे. माझी मुलं आणि आम्ही स्वावलंबी आहोत. आम्ही आमच्या शेतात राबतो, पिकवतो. रोज कमावतो, रोज खातो. साठवून ठेवायला मात्र आमच्याकडे पैसे नाहीत. “

त्यापुढे कुंतीने जे सांगितलं, ते या पृथ्वीतलावरचं वाटलंच नाही मला.

कुंती आणि दोरजा, तिचा नवरा, दोघं पेलिंगच्या कष्टकरी लेपचा जमातीतले. हिमालयाच्या  निसर्गरम्य पहाडात हातावर पोट  असलेलं त्यांचं कुटुंब. दोरजा सैन्यासाठी लाकूडफाटा सीमेवर पोचवण्याचं काम करायचा. कुंती गावातल्या बायकांबरोबर लाकडं गोळा करायला जायची. देशाला आपली तेवढीच मदत. कुंती कधी दोरजासोबत मिरची-भाकरी सैनिकांसाठी पाठवायची. त्यांचा मोठा मुलगा राम, विसाव्या वर्षीच सैन्यात भरती झाला. कुंतीला त्याचं  कोण अप्रूप. सगळ्या गावाला तिने त्याचा गणवेष कौतुकाने फिरून दाखवला. दाजूमुळे ( मोठा भाऊ )  आणि घरातल्या देशप्रेमी वातावरणामुळे धाकट्या दोघांना ही सैन्यात जायचे वेध लागलेले. राम काश्मीर सीमेवर तैनात असताना, अवघ्या बावीसाव्या वर्षी  त्याला वीरमरण आलं. हिमालयातला बर्फ वितळेल, असा कुंतीचा शोक चालला होता. तिला मुलगा गेल्याचं दु:ख होतंच. पण मुलाची देशसेवा अर्ध्यावर राहिली, याची तिला जास्त खंत होती.

कुंतीच्या धाकट्या दोघांनी दाजूचं स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं आणि कुंतीने आपला निर्णय दोरजाला सांगितला. मला देशासाठी लढणारे सैनिक निर्माण करायचे आहेत. नाहीतरी माझ्यासारखी स्त्री देशाची सेवा कशी करणार ? दोरजाने आधी तिला समजावलं. नातेवाईकांना वाटलं ती वेडी झालीये. पण नंतर दोरजाला कुंतीच्या ठाम निर्णयाचा अंदाज आला. मुलांच्या लष्कर भरतीत कुंतीच्या संगोपनाचाच वाटा होता. दोरजाला फक्त कुंतीच्या प्रकृतीची काळजी वाटत होती. कुंती म्हणाली, “दोरजा, तू फक्त साथ दे. आपण कष्ट करू, मुलांना स्वावलंबी बनवू. त्यांना देशासाठी घडवू आणि देशालाच अर्पण करू. मला शक्य आहे तोपर्यंत मला हे करू दे. ” दोरजा म्हणाला, “पण एखाद्या मुलाला हे पटलं नाही तर. ” ” ज्याला नाही पटणार, तो दोन वर्ष  देशसेवा करून नंतर आपलं  आयुष्य जगू शकतो. माझ्या दुधाचं हे मुलांवर असलेले कर्ज त्यांनी फेडावं, असं  सांगेन मी त्यांना. “आणि कुंतीच्या घरात वर्ष दोन वर्षात पाळणा हलू लागला.

“चांगल्या  कामाला निसर्गही साथ देतो, दीदी. माझं  वय काय ठाऊक नाही. पण अजून तरी कूस फळतेय. मुलांना अंगाई म्हणून मी  देशाचीच गाणी गाते. माझी मुलं ही फार गुणी आहेत. माझं ऐकतात. आमच्यासारखंच देशाचं  प्रेम त्यांनाही आहे. ” मध्यंतरी भीमाची बहीण वारली. तिच्या नवर्‍याने दुसरं लग्न केलं. पोटच्या पोरांना परकं  केलं. “मी म्हटलं, आण त्यांना इकडे. आता माझ्या पिल्लांसोबत  तिचीही मुलं  वाढताहेत. पण  अट त्यांनाही तीच. सैन्यात भरती व्हायचं. मुलांना  तायक्वांडोचं शिक्षण, रोज पहाडात दौड लावायचा सराव सक्तीचा केलाय मी. “ती परत हसली. “सैन्यात नंबर लागायला हवा ना, म्हणून जरा सक्ख्त आई झालेय. ” कुंती एकीकडे दोन मुलींना आणि एका मुलाला, सैनिकांसाठी भाकर्‍या कागदात बांधायला सांगत होती. दोरजाची गाडी सीमेकडे जायला निघेल म्हणून ती त्यांना घाई करत होती. शेतातल्या भाज्या आणि मिरच्यांचा वानवळा ही सोबत जायचा होता.

हिमालयाच्या कुशीतल्या, बर्फाळ पहाडावर, एक निरक्षर आई, आपलं  मातृत्व देशाला अर्पण करत होती. त्यासाठी तिनं  स्वत:चं शरीर पणाला लावलं होतं. मला माझीच  लाज वाटली.

पण माझं नवरात्र हुकलं नव्हतं. आज  मनात चांगल्या विचारांची  घटस्थापना झाली होती.

कुंती हसली. तिच्या सुरकुत्या मला विलक्षण सुंदर दिसल्या. माझी दुर्गा  माझ्यासमोर होती.

लेखिका :डॉ. स्मिता दातार

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मानवांना आलेले एक पत्र… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ मानवांना आलेले एक पत्र… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

प्रिय पृथ्वीनिवासी मानवांनो ,

तुम्ही एकही झाड लावू नका. ती आपोआप उगवतात.तुम्ही फक्त ती तोडू नका.

तुम्ही कुठलीही नदी स्वच्छ करू नका. ती प्रवाही आहे. स्वतः स्वच्छच असते.तुम्ही फक्त तिच्यात घाण टाकू नका.

तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी लागू नका. सर्वत्र शांतताच आहे. तुम्ही फक्त द्वेष पसरवू नका.

तुम्ही प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. ती क्षमता निर्सगात आहे. फक्त त्यांना मारू नका आणि जंगले जाळू नका.

तुम्ही माणसं काहीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नका. सर्व व्यवस्थितच आहे. फक्त तुम्ही स्वतःच व्यवस्थित राहा.

तुमचा निसर्ग.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तुम्हाला कोण आनंदात ठेवतं?… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ तुम्हाला कोण आनंदात ठेवतं?… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधील एका महिलेला विचारले,”तुमचा नवरा तुम्हाला आनंदात ठेवतो का?”

तिच्या शेजारी बसलेल्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो आत्मविश्वासाने पत्नीकडे बघू लागला. त्याला पूर्ण खात्री होती, की ती ‘हो’ असंच म्हणेल. कारण तिने लग्न झाल्यापासून कधीच काहीही तक्रार केलेली नव्हती.

पण त्याच्या बायकोने स्पष्ट आवाजात उत्तर दिलं,”नाही.” ती म्हणाली, “माझा नवरा नाही ठेवत मला आनंदात!”

तिच्या पतीला हे अनपेक्षित होतं. तेवढ्यात ती पुढे म्हणाली, “मला माझ्या नवऱ्याने आनंदात ठेवले नाही, मी स्वत:च आनंदात राहते.

मी आनंदी असावं की नाही याच्याशी त्याचा काहीच संबंध नाही. माझा आनंद पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे.

कुठल्याही परिस्थितीत, आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मी आनंदीच राहते. जर माझा आनंद कुणा दुसऱ्यावर, एखाद्या वस्तूवर किंवा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून राहिला तर ते माझ्यासाठीच कठीण होऊन बसेल.

आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते. माणसं, संबंध, आपलं शरीर, हवामान, आपले ऑफिसातले बॉस, सहकारी, मित्र, आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य… ही यादी न संपणारी आहे.

त्यामुळे काहीही झालं तरी आपण आनंदी राहायचं, हे मीच ठरवायला हवं ना! माझ्याकडे खूप काही असलं काय किंवा काहीच नसलं काय, मी आनंदीच असते!

मला कुठे बाहेर जायला मिळालं काय किंवा घरात बसून राहावं लागलं काय, मी आनंदीच राहीन. मी श्रीमंत असले काय किंवा गरीब राहिले काय, मी आनंदीच असेन.

माझं लग्न झालेलं असलं तरी लग्ना आधीही मी आनंदीच होते. कारण मी आनंदी आहे ती माझ्या स्वत:मुळे!

माझं जगणं दुसऱ्या कुणापेक्षा जास्त चांगलं आहे म्हणून मी आयुष्यावर प्रेम करते असं नाही, तर आनंदात राहायचं हे मी स्वत:च ठरवलं असल्यामुळे मी आनंदी आहे. माझ्या आनंदाची संपूर्ण जबाबदारी मीच घेतली असल्यामुळे माझ्याबरोबर जगणाऱ्या कुणालाही मला आनंदी ठेवण्याचं ओझं बाळगावं लागत नाही. त्यामुळे माझ्याशी बोलता- वागताना त्यांना अतिशय मोकळेपणा जाणवतो.

आणि यामुळेच मी इतकी वर्ष आनंदात संसार करू शकले. तुमचा आनंद कधीही दुसऱ्या कुणाच्या हाती जाऊ देऊ नका.

बोध : वातावरण चांगलं नसलं तरी आनंदी राहा. आजारी असलात तरी आनंदी राहा. कठीण परिस्थितीत, पैसे नसले तरी आनंदी राहा. कुणी तुम्हाला दुखावलं, कुणी तुमच्यावर प्रेम करत नसलं, अगदी तुम्ही किती मौल्यवान आहात हे ठरवू शकत नसलात, तरी आनंदी राहा. तुम्ही स्त्री, पुरुष कुणीही, कितीही वयाचे असा. असाच विचार करायला हवा; नाही का?

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जीवनाचं सार… – लेखक : सुश्री नीला शरद  ठोसर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ जीवनाचं सार… – लेखक : सुश्री नीला शरद  ठोसर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

आयुष्य फार सुंदर आहे  

खिशातून ५०रुपयाची एक नोट जरी पडली तर कावराबावरा अन् बेचैन होणाऱ्या माणसात आयुष्याची ५० वर्षे उलटली तरी परिवर्तन येत नाही. तो बिनधास्तच वागतो.काय दुर्दैव आहे !

स्मशानभूमीची सुरक्षा तपासणी किती कडक आणि मजबूत असते, हे तर विचारूच नका, साहेब! अहो, पैसातर फार दूरची गोष्ट आहे, इथे श्वासही सोबत घेऊन जाऊ देत नाहीत ! तुम्ही कितीही मोठे किंवा तुमची थेट वरपर्यंत ओळख असली तरी!

काळाचा कावळा आयुष्याच्या माठावर बसतो अन् रात्रंदिवस वय पितो.

माणूस मात्र समजतो: मी जगतोय!

माणूस खाली बसून पैसे आणि संपत्ती मोजतो: काल किती होते आणि आज ते किती वाढले आहेत आणि वरती तो हसणारा माणसाचे श्वास मोजतो : काल किती होते आणि आज किती उरले आहेत !

तर चला, ‘उरलेले’आयुष्य ‘अवशेष’ बनण्यापूर्वी त्याला ‘विशेष’बनवूया!

‘पासबुक’आणि ‘श्वास बुक’, दोन्ही भरावे लागतात. पासबुकात ‘रक्कम’ आणि श्वासबुकात ‘सत्कर्म’.

म्हणून

एकमेकांचा आदर करा. चुका विसरा. अहंकार टाळा.

 आयुष्य आहे तोपर्यंत हसत हसत घालवा. रडून वा भांडून तरी काय साध्य होणार?

जीवन जगताना खरंतर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे.

रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत,पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही.

रोजचा प्रवास आहे, पण प्रत्यक्षात आपल्याला कुठंही जायचं नाही.

ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही.

बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत.

ड्यूटी संपल्यावर सारं काही सुपूर्त केलं की झालं.

मित्रांनो जीवन सुंदर आहेच.फक्त आहे, त्याचा मनमुराद आनंद घ्या. काही घेऊन गेला नाहीत तरी सगळ्यांच्या मनात राहून जा. हेच जीवन आहे.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका :सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘दैव आणि कर्म…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘दैव आणि कर्म…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

आमच्या गल्लीत एक दुकानदार आहे.

मी त्याच्या दुकानावर गेलो व त्याला विचारले, “बाबा रे! मला एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचे उत्तर देऊ शकतोस का?”

तो म्हणाला, ” तुम्ही खुशाल विचारा, मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.”

मी विचारले, “माणूस मेहनत करतो. मग त्याला यश मिळाले,की तो म्हणतो, देवाने हे यश पदरात टाकले. मला सांग, दैव श्रेष्ठ की मेहनत?”

मला वाटले की, याची पुरती बोलती बंद होणार, पण त्याने जे उत्तर दिले ते ऐकून मी अवाक झालो.

बोलती  त्याची नाही तर माझीच बोलती बंद झाली.

त्याने उत्तर दिले. तो म्हणाला, “मला सांगा. तुमचा बँकेत सेफ डिपॉजीटचा लॉकर आहे? त्या लॉकरला दोन चाव्या असतात. एक तुमच्याकडे आणि एक बँक मॅनेजरकडे. लॉकर उघडताना त्या दोन्ही चाव्या लॉकरला लावाव्या लागतात. तरच तो लॉकर उघडतो.अन्यथा नाही.बरोबर ना?” मी म्हणालो,  “बरोबर, पण याचा मी विचारलेल्या प्रश्नाशी काय संबंध?”

तो म्हणाला,  “जसे बँक लॉकरला दोन चाव्या असतात, तशाच आपल्या मानवास नियतीने दोन चाव्या दिल्या आहेत . एक मेहनतीची चावी, ती आपल्या पाशी असते. तर दुसरी नशीबाची (दैव) चावी. ही त्या परमेश्वरापाशी असते.

आपण आपली चावी यशाच्या लॉकरला लावून द्यायची. जेव्हा परमेश्वर त्याच्याकडची चावी यशाच्या लॉकरला लावेल, तेव्हाच आपले यशाचे लॉकर उघडेल. अन्यथा नाही.

यशासाठी मेहनत व नशीब या दोन्ही चाव्या आवश्यक आहेत . त्याशिवाय यशाचे द्वार उघडणार नाही.

मानवाने मेहनत करता करता त्या परमेश्वराचे सतत नामस्मरण करत राहावे. तरच त्याला यश मिळेल, अन्यथा नाही. नुसती मेहनत करूनही उपयोग नाही व नुसती भक्ती करुनही उपयोग नाही.

यश मिळवण्यासाठी मेहनत व भक्ती दोन्ही आवश्यक आहे.

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्वान्त सुखाय…… लेखिका – सौ. विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ स्वान्त सुखाय…… लेखिका – सौ. विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

खाऊचे डबे सगळे रिकामे झाले.इतके दिवस मुलांसाठी,घरातील वयस्कर  लोकांसाठी करतो, ही मनातली तीव्र भावना.पण मुलांची आपापल्या दिशेने पांगापांग होऊन ही आता दोन चार वर्षे लोटलीत.वयस्कर मंडळी सगळ्याच्या पल्याड गेलेली आहेत.

तरीही..ठरावीक वेळेत डबे रिकामे होण्याचा क्रम काही चुकला नाही.मनात दबलेलं हसू हळूच ओठांवर आलं.मुलानांच कशाला,आपल्यालाही लागतंच की काहीतरी येताजाता तोंडात टाकायला.फक्त इतके दिवस मुलांच्या नावाखाली लपत होतं.आता उघड उघड मान्य करावं झालं. आपलेसुद्धा,डबे खाऊने भरुन ठेवण्यात  अनेक स्व-अर्थ दडलेले असतात.शेवटी एकच खरं…

स्वान्त सुखाय…!

चिवडा फोडणीस टाकायला घेतलाच.

सकाळचा माँर्निग वाँक घेऊन सोसायटीतल्या डॉक्टर काकू घरावरुन जात होत्या.मला किचन खिडकीत बघून त्यांनी हाक मारली, “बाहेर ये.बघ मी काय केलंय.तुला दाखवायचंय.” हँड एब्राँडयरी केलेला कॉटन कुर्ता त्यांनी मला उलगडून दाखवला.”व्वा! किती सुंदर वर्क, काकू!”मी त्या एंब्रॉयडरीवरून हात फिरवत म्हणाले.”आवडलं ना?छान झालंय ना ग?”

अर्थातच काकू. “किती नाजूक काम आहे हे.फार सुरेख.कलर काँंबिनेशनही परफेक्ट!”माझ्या नकळत…पावती देऊनही झाली.

“मैत्रिणीसाठी करतेय.तिला सरप्राईज देणार आहे.आणि ती जेव्हा बघेल तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मी अनुभवणार आहे.शरीराने दुसऱ्यासाठी करत असतो गं आपण.पण त्यातला खरा आनंद आपणच घेत असतो.हो ना?”

मी म्हटलं, ” हो.स्वांत सुखाय…!”

“काकू, मुलगा झाला मला.तुम्ही आठवणीने गरम गरम तूप-मोदक आणून खाऊ घातलेत  मला प्रेग्नसीत!आठवतंय काकू?”माझ्यासमोर लहानाची मोठी झालेली जयू आनंदाने सांगत होती.गणपती बाप्पाच आलेत!तिच्या आवाजातला आनंद मला सुखावून गेला.

माझं हे करणं म्हणजे तरी काय, मोदक करून खाऊ घालण्यातला आनंद  मीच अनुभवणं.म्हणजेच तर

 स्वान्त सुखाय!

नव्वदी पार केलेले आजोबा.मंदिर परिसर नित्यनेमाने स्वच्छ झाडत असतात.क्षीण झालेली त्यांची क्रयशक्ती .मीच एकदा त्यांना म्हटलं, “कशाला, आजोबा, या वयात झाडता?” “मला आनंद मिळतो बाळा. उगाच का कोण करेल?

माणूस फार लबाड, स्वतःच्या सुखासाठी करत राहतो,पण आव मात्र दुसऱ्याला आनंद दिल्याचा आणतो.

त्यापेक्षा सरळ मान्य करावं,

स्वान्त सुखाय..

मला आजकाल हा स्वान्त सुखाय चा मंत्र फार पटला,रुचला आणि पचनीदेखील पडला.

जिथे आपल्या क्षुल्लक अस्तित्वाने जगतकार्यात तसूभरदेखील फरक पडणार नाही,तिथे माझं कर्म कुणासाठी का असणार?ते फक्त आणि फक्त मला हवं असतं.त्यात माझा आनंद, सुख समाविष्ट झालेलं असतं.म्हणून आपण करत असतो.अहंकाराचे,    अट्टाहासाचे कवच इतके जाड असते की,त्या कर्मातून मिळालेला आनंद आपल्यापर्यंत पोहचतच नाही.’मी केल्याचा’ काटा,ते सुख,तो आनंद आपल्याला उपभोगू देत नाही. राग,अपेक्षाभंग, वैताग,दंभ या खाली सुखाच्या आनंदाच्या जाणिवाच बोथट होऊन जातात.

परवा आईला आंघोळ घालताना मी तिच्याभोवती  पाणी ओवाळत तिला म्हटलं,”झाली बरं ग तुझी चिमणीची आंघोळ.चला आता.पावडर गंध लावायचं ना तुला?” आजाराने शिणलेला तिचा चेहरा खुदुकन हसला. आणि ती म्हणाली, “तुम्हां पोरींचे लहानपण आठवलं ग!”

मी म्हटलं, “आता तू लहान झालीस.होय ना?”

तिचा ओला हात माझ्या चेहऱ्यावरून फिरला.

तिचं हसणं, तिचा तो ओला स्पर्श!

सुखाची भाषा याहून काय वेगळी असणार!

स्वान्त सुखाय चा हा किती देखणा आविष्कार!

माऊली म्हणतात-सत् चित आनंद.म्हणजे आत्म्याचे मूळ स्वरूप चिरंतन सुख आहे.तो सदैव सुख असतो.विकार जडलेले आहेत ते देह इंद्रियांना! परमेश्वरापासून सुखापर्यंत सारं सारं आपल्यातच तर आहे.बस्स्! आपण थोडा बहिर्मुख ते अंतर्मुख प्रवास करायला  हवाय.इतकंच तर!

लेखिका:सौ. विदुला जोगळेकर

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ साठीची ताकद… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ साठीची ताकद… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

साठीची सॉलिड ताकद असते. कसे ते सांगतो तुम्हाला!

कालचीच गोष्ट सांगतो.

मी, आमचा मुलगा, आणि बायको रस्त्याने जात असताना समोरून एक समवयीन जोडपे येताना दिसले.

मी त्यातल्या बाईकडे बिनधास्त एकटक बघत होतो. बायकोच्या देखत. ही आहे साठीची खरी ताकद.

जोडपे जवळ आले.

मी त्या बाईकडे बोट दाखवत तिला तिच्या नवऱ्याच्या देखत थांबविले.

ही आहे साठीची ताकद.

“संगीता ना तू?संगीता शेवडे?” इति मी.ही आहे साठीची ताकद.

ती थोडी थबकली.

आणि तिच्या नवऱ्याच्या देखत मानेला झटका देऊन केसांचा शेपटा पाठीवर झटकून, “अय्या… Sss… भाट्या ना तू?” असे किंचाळतच म्हणाली. भाट्या माझे शाळेतले टोपण नाव.तिची साठीची ताकद.

“कित्ती वर्षांनी दिसतोयस रे! काहीच फरक नाही तुझ्यात”.

मी ढेरी आत घेऊन हसलो.

“पण आता संगीता शेवडे नाही बरं का, मी संगीता फडके… हे माझे मिस्टर.” ती बाजूच्या, तिचा काका वगैरे वाटणाऱ्या माणसाकडे बोट दाखवते.

(“काय पण  टकल्या म्हातारा निवडलाय!” हे बोलण्याची छाती साठीत अजूनही होत नाही. हे मी मनातल्या मनातच म्हणालो.)

मी आपला तोंडदेखलेपणाने देखल्या देवा दंडवत करतो. “नमस्कार.”

त्याच्या कपाळाला मात्र आठ्या! फडकेचा शेजारी किंवा आजोळ बहुधा नेने किंवा लेले असावे.

मग एकमेकांच्या अर्धांगाची सविस्तर ओळख होते.

त्यात मी बायकोला “मी नाही का खूप वेळा सांगत तुला, ती खोपोलीच्या ट्रीप मध्ये,”सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला” गायलो होतो?

तीच ही संगीता!”

ही आहे माझी साठीची ताकद.

“अय्या तुला आठवतं आहे अजून ?” संगीता लाजत म्हणते.

तिची साठीची ताकद…

मी “हो, कसं विसरणार गं?” म्हणतो… परत एकदा माझी साठीची ताकद.

“मला इतकी वर्ष वाटत होते की मी तुला नाही म्हटल्यावर तू त्या सायली बरोबर लग्न केलेस.” परत तिचीही ही साठीची ताकद.

तिच्या नवऱ्याच्या कपाळावर आठ्या वाढतात.

पण तो हताशपणे बघत असतो.

माझ्या शेजारी निद्रिस्त ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत चुळबुळ करताना जाणवतो.

“नाही गं, माझं लग्न उशीरा झालं, सायली लग्न करून कधीच अमेरिकेत गेली होती.”… मी बायकोच्या देखत म्हणतो.आता परत माझी साठीची ताकद.

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी तिला हळूच विचारतो “येतेस का Starbucks मध्ये कॉफी प्यायला ?” माझी साठीची ताकद.

माझी बायको भुवया उंचावून बघते.

३५ वर्षांच्या संसारात तिला खात्री आहे,

मी काही Starbucksला जाण्याच्या भानगडीत पडणार नाही.

फार फार तर समोरच्या उडप्याकडेच बसणार… तिची साठीची ताकद.

नुकताच ३० वर्षाचा झालेला आपला पोरगा… “च्यामारी बाप या वयात सगळ्यांसमोर उघड उघड लाईन मारतोय!” असा आश्चर्यचकित चेहरा करून माझ्याकडे बघत होता.

मीही  पोराकडे बघून डोळे मिचकावत म्हणालो “अरे आम्ही पूर्वी पण कॉफीच प्यायचो.नाही का गं संगीता ?” माझी साठीची ताकद.

ती नवऱ्याला सांगते, “मी जरा ह्याच्या बरोबर तास भर गप्पा मारून येते.तू घरी जा आणि टॉमीला खायला घाल.”तिची साठीची ताकद.

तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर, “तास दोन तास तरी टळली ब्याद” चा आनंद स्पष्ट दिसतोय मला. पण तो लपवण्याचा क्षीण आणि निष्फळ प्रयत्न करतोय बापडा, “अगं, काही हरकत नाही.ये आरामात.” असं म्हणतो. त्याची साठीची ताकद.

“अरे पण तुझ्या बायकोची परवानगी आहे का ?” माझ्या पोटात बोट खुपसून संगीता.

“मला काय दगडाचा फरक पडतोय ?  या कधीही… नाहीतरी घरी येऊन काय दिवे लावणार आहेत कोलंबस ?”आता बायकोची  साठीची ताकद.

“फक्त येताना अर्धा किलो रवा आणि १ किलो साखर आण.” हुकुमी आणि जरबेच्या आवाजात मला.परत एकदा बायकोची साठीची ताकद.

संगीताचा नवरा कधीच गायब झाला.

माझ्या बायकोने दोन पावलं जायला म्हणून पुढे टाकली आणि वळली. “अरे हो.तुझा गोदरेजचा डाय संपलाय वाटतं. हल्ली जरा लवकरच संपतो. तो ही आण! खरे तर केसच कुठं आहेत रंगवायला? मला नेहमी आश्चर्य वाटते कुठे लावतोस कलप? आणि तुझ्या गॅससाठीच्या चघळायच्या गोळ्याही आणि कायम चूर्ण आणायला विसरू नकोस! नाहीतर सकाळी चिंतनघरात बसशील तासाच्या ऐवजी दीड तास आणि हात हलवत बाहेर येशील!” असं संगीताकडे जळजळीत नजरेने बघत तिने सांगितले… परत बायकोची साठीची ताकद.

बायकोचे माहेर कोकणात अडीवऱ्यातले आहे, म्हणजे सदाशिव पेठेतील “सौजन्याची” मर्यादा जिथे संपते तेथे तिथली सुरू होते.

संगीता त्यावर फिदीफिदी हसते.तिची पण साठीची ताकद.

मित्रांनो, अशी सगळी साठी भलतीच ताकदवान असते.

अनुभवलात की कळेलच!

लेखक : अज्ञात

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares