ऑफिसच्या लंच ब्रेक मध्ये आलेली ती, मला पाहून पाय न वाजवता अंगावर पांघरूण घालून गेली,
शाल नव्हे, लेकीने मायची मायाच पांघरली,
कधी मोठी झाली कळलंच नाही..
लग्न, संसार, मूलबाळ, जबाबदाऱ्या, करिअर, सारं सारं सांभाळून ‘ गोळ्या घेतल्यास का, बरी आहेस का, डॉक्टरांकडे जाऊन आलीस का, दगदग करू नकोस, मी किराणा ऑर्डर केलाय..घरी येऊन जाईल, प्रवासाची दमलीयेस स्वयंपाक करू नको.. डबा पाठवतेय दोघांचाही, अजून काय काय अन् काय काय..
लेक होती ती माझी फक्त काही दिवस..त्यानंतर तिच्यात उमटली आईच माझी..
मीच नाही, आम्हा दोघांचीही आईच ती..
लोक म्हणतात, देव सोबत राहू शकत नाही म्हणून आई देतो,
आई तर देतोच हो, पण आईला जन्मभर माय मिळावी म्हणून आईची माया लावणारी लेक देतो..
मुलगा हा दिवा असतो वंशाचा पण मुलगी दिवा तर असतेच, सोबतच उन्हातली सावली, पावसातली छत्री, आणि थंडीत शाल असते आईची.. किंबहुना साऱ्या घराची…
हे शब्द तर नेहमीच वाचतो आपण, पण जाणीव तेव्हा होते जेव्हा आपलंच पिल्लू कोषातून बाहेर पडून पंख पसरू बघतं आपल्याला ऊब देण्यासाठी,
परी माझी इवलीशी खरंच कधी मोठी झाली कळलंच नाही……
सर्व आईना व लेकीना समर्पित
लेखक : अनामिक
प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ देवाविषयीचे प्रश्न — लेखक – अज्ञात ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆
१) देव कुठे आहे?
२) देव काय पाहतो?
३) देव काय करतो?
४) देव केव्हा हसतो?
५) देव केव्हा रडतो?
६) देव काय देतो?
७) देव काय खातो?
१)देव कुठे आहे? – जसे दुधात तूप कुठे आहे? तर दुधात तूप सर्वत्र आहे. तसेच देव सर्वत्र आहे. सर्व देशात, सर्व काळात व सर्व वस्तूत आहे.
तो नसे ऐसा ठाव असे कवण | सर्वत्र संपूर्ण गगन जैसे ||
– नामदेव…
विठ्ठल जळी स्थळी भरला | रिता ठाव नाही उरला ||
– ज्ञानदेव…
२) देव काय पाहतो? – जसे दिवा कुठे पाहतो? तर सर्व ठिकाणी पाहतो. तसा देव सर्वांना पाहतो. त्याचे डोळे विशाल आहेत.
‘मनोजगर्वमोचनं विशाललोल लोचनं’ |
– श्रीशंकराचार्य…
त्याच्या दृष्टीतून काहीसुद्धा सुटू शकत नाही. ना खारुताईची सेवा ना मांडव्य ऋषींनी काजव्यास केलेली दुखापत. कोणी असं समजू नये मला कोणी पाहत नाही. तो सर्वांना आणि सर्वत्र पाहतो.
३) देव काय करतो? – भक्तांचा सांभाळ व दुष्टांचे निर्दालन.
घेऊनिया चक्र गदा | हाची धंदा करितो ||१||
भक्ताराखे पायापाशी | दुर्जनासी संहारी ||
– तुकाराम…
तुका म्हणे आले समर्थाच्या मना | तरी होय राणा रंक त्याचा ||
– तुकाराम…
४) देव केव्हा हसतो? – जीव जेव्हा जननीच्या उदरात असतो तेव्हा देवास सांगतो, “या संकटातून मला सोडव. मी तुझा अंश आहे.” जीव म्हणतो, “सोहं, तू आणि मी समान.” पण जीव जेव्हा संकटातून सुटतो, बाहेर येतो तेव्हा म्हणतो, कोहं (क्यां)! मी कोण आहे?” देव तेव्हा हसतो. आणि देवास फसविणाऱ्या जीवाच्या मागे अहं लावून देतो. अहंमुळे जीव दु:ख भोगतो.
५) देव केव्हा रडतो? – भक्ताची दीन दशा पाहून. जेव्हा सुदामदेव श्रीकृष्णास भेटण्यास आले. त्यांनी सुदामाची दशा पाहिली. फाटके कपडे, पायात चप्पल नाही, शरीर कृश झालेले. हे पाहून देवास अश्रू आवरता आले नाहीत.
देव दयाळ दयाळ | करी तुकयाचा सांभाळ ||
– तुकाराम…
६)देव काय देतो? – देव सर्वांना सर्व देतो. देह देतो, इंद्रिय देतो, प्रेम, क्षमा शांती आणि शक्ति देतो.
देवे दिला देह भजना गोमटा | तया झाला फाटा बाधीकेचा ||
– तुकाराम…
दिली इंद्रिये हात पाय कान | डोळे मुख बोलाया वचन |
जेणे तू जोडसी नारायण | नाशे जीवपण भवरोग ||
– तुकाराम…
प्रेम देवाचे हे देणे | देहभाव जाय जेणे ||
– तुकाराम…
देव सर्वांना उचित तेच सर्व देतो. कारण हे सर्व देवाचेच आहे.
७) देव काय खातो? – देव प्रथम भक्ताचे दोष खातो.
माझ्या मीपणाचा करोनि फराळ | उरले खावयासी बैसला सकळ |
ऐसा भुकाळ हा नंदाचा गोवळ | यासी न पुरेची ग्रासीता माझा खेळ ||
– निळोबा…
यानंतर भक्ताचे चित्त हरण करतो व जन्म-मरणपण खाऊन टाकतो. हे सर्व केल्यानंतर भक्ताची बोरे अथवा कण्या खातो.
“सप्त द्विप नवखंड पृथ्वी भोजन किया अपार |
एक बार शबरीके घर, एक बार विदुरके घर स्वाद लिया दो बार ||”
भक्ताने सद्भावपूर्ण अर्पण केलेले पत्र, पुष्प, फळ, पाणी प्रार्थना अथवा साधा प्रेमाने केलेला नमस्कारसुद्धा आनंदाने ग्रहण करतो… अगदी भृगू ॠषिंनी मारलेल्या लाथेच्या पदचिन्हालाही श्रीवत्स चिन्ह म्हणून छातीवर ग्रहण केले!
देवाबद्दल अनंत प्रश्न आणि शंका आपल्याला असतात पण त्याचं असणं मान्य नसतं. साक्षीभावाने तो सर्वांबरोबर सर्वकाळ असतोच फक्त त्याच्या कुठल्याही स्वरुपाचे श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने स्मरण केले की तो आपल्या जीवनात कार्यशील होतो.
॥श्रीगुरुदेवदत्त॥
जय जय श्री स्वामी समर्थ
संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
बघून वाटलं की अरेच्या, ह्या तर सर्वच स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..!
पाहूया कसे ते..?
“दूध”
दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन:.. कुमारिका .
दूध म्हणजे माहेर .
दूध म्हणजे आईवडिलांशी नातं .
शुभ्र,
सकस,
निर्भेळ,
स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही,ते लगेच बेचव होतं.
त्यावेळी तिला आपल्यासारखं जग सुद्धा स्वच्छ ,सुंदर,निरागस दिसतं.
“दही”
कन्यादानाचं विरजण लग्नात दुधाला लागलं की कुमारिकेची वधू होते .
दुधाचं नाव बदलून दही होतं !
दही म्हणजे त्याच अवस्थेत थिजून घट्ट होणं !
लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत थिजून राहते.
दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. ” कितीही मारहाण करणारा, व्यसनी, व्यभिचारी, मनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला तरी ” स्त्री त्याच्याप्रती एवढी निष्ठा का दाखवते ?
नवरा हा “पती परमेश्वर” म्हणून ? नव्हे तर याचं उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं.
“ताक”
सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या कि दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात, त्यांची आता सून होते, म्हणजे “ताक” होतं.
ताक दोघांनाही शांत करतं.. यांवर उत्तम उपाय असं आयुर्वेद म्हणतो.
“ताक” म्हणजे सुनेचं सासरशी नातं.सासरी स्त्री ताकासारखी बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय. तिथे दूध पचत नाहीच !
‘दूध’ पाणी घालून बेचव होतं पण ‘ताक’ मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष संसारातल्या सगळ्या प्रश्नावर कामी येतं .
“लोणी”
अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरतं. मग २० वर्षांनी जेव्हा माझं फलित काय असा प्रश्न ताक विचारतं तेव्हा, मऊ .. रेशमी .. मुलायम .. नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो .
हे लोणी म्हणजे नवऱ्याशी नातं. रवीच्या प्रत्येक घुसळणीत ह्या नात्याचे कण कण ‘लोणी’ होऊन हळूच बाजूला जमा होत असतात हे तिच्या लक्षात येत नाही. कानावरच्या चंदेरी बटा खरं तर रोज आरशात लाजून तिला सांगत असतात.पण तिला त्यांची ही भाषा कळत नाही.
तरुण दिसण्यासाठी ती त्याचं तोंड काळं करते.
‘ताकाला’ पुन्हा ‘दूध’ व्हायचं असतं, हा वेडेपणा नाही का ?
“तूप”
‘लोणी’ ही तिची अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही.
ते आपलं रूप बदलतं . नव-याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी,
नातवांसाठी आज्जीचं नवं रूप घेते;त्याच लोण्याचं आता कढवलेलं “साजूक तूप होतं”
वरणभात असो
शिरा असो
किंवा
बेसन लाडू असो
घरातल्या प्रत्येक गोष्टीत आता आजी नावाचं पळीभर साजूक तूप पडतं आणि जादू घडते.
देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात खोचलेली वात बघितली की मला घरासाठी येताजाता हात जोडणारी चंदेरी केसांची आजी दिसते.
घरासाठी कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे ‘तूप’ संपून जातं. हीच ती स्त्रीची अंतिम उच्च अवस्था होय.
“दूध ते तूप”
हा असा अनोखा स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास.
“स्री आहे तर श्री आहे हे म्हणणं वावगं ठरूं नये.”
“असा हा स्रीचा संपूर्ण प्रवास …. न थांबणारा, सतत धावणारा, न कावणारा, न घाबरणारा, कुटूंबासाठी झिजणारा, कुटूंबाची काळजी घेणारा”
… ह्या प्रवासास तथा ” स्त्री ” जातीस मानाचा मुजरा.ll.
लेखक : अज्ञात
संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ चोर हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
लोकांना हे खोटे वाटते, पण लक्षात ठेवा,
चोरामुळे तिजोरी आहे, कपाट आहे, त्यांना लॉक आहे,
चोरामुळे खिडकीला ग्रील आहे, घराला दरवाजा आहे, दरवाजाला कुलूप आहे, बाहेर अजून एक सेफ्टी दरवाजा आहे,
चोरामुळे घराला/सोसायटीला कंपाउंड आहे, त्याला गेट आहे, गेटवर वॉचमन आहे, वॉचमनला वर्दी आहे,
चोरामुळे CCTV कॅमेरे आहेत,मेटल डिटेक्टर मशीन आहेत, चोरामुळे सायबर सेल आहे,
चोरामुळे पोलीस आहेत, त्यांना पोलीस स्टेशन आहे, त्यांना गाड्या आहेत, काठ्या, पिस्तुल आणि बंदुका आहेत, त्यात गोळ्या आहेत,
चोरामुळे न्यायालय आहे, तिथं जज आहेत, वकील आहेत, शिपायापासून कारकून आहेत,
चोरामुळे तुरुंग आहे, जेलर आहे, जेलमध्ये शिपाई आहेत.
मोबाईल, लॅपटॉप, तत्सम इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच सायकल, बाईक, कार इत्यादी वस्तू चोरीला गेल्यावर माणूस नविन वस्तू खरेदी करतो, आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला हातभार लागतो,
चिनी लोकांत एक प्रथा आहे. ते परस्परांचे अभिष्टचिंतन करतात त्यावेळी ” तुला सर्व सहा सुखे मिळोत ” असा आशीर्वाद देतात. पाच सुखे म्हणजे – आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, चांगला जोडीदार व चांगली मुलं.
सहावे सुख म्हणजेच ज्याचे त्याला कळावे असे सुख. ते त्याचे त्यानेच आयुष्यात शोधून काढायला हवे. ते सहावे सुख समोरच्या माणसाला सापडावे, लाभावे असे अभिष्टचिंतन करणारा म्हणत असतो.
आपल्याकडे तर ज्ञानेश्वरमाऊलींनी सांगितले आहेच “जो जे वांछील तो ते l लाहो प्राणिजात “
प्रत्येकाचं हे सहावे सुख निराळे असेल.
समाजात प्रत्येकाचे राहणीमान वेगळे, आर्थिक स्तर वेगळे, गरजा वेगळ्या. ह्या सगळ्याचा विचार केल्यावर वाटलं त्याचं त्याचं सहावे सुख वेगळे.
आजच्या टप्प्यावर ज्या गोष्टी मला व्हायला हव्या आहेत त्या त्या माझं सहावे सुख असू शकतात.
पण त्या सहाव्या सुखामागे पळायला मला आवडणार नाही. जे आहे, जे मिळतंय ते माझं सहावं सुख आहे.
छान कार्यक्रम बघायला मिळावेत, ट्रिपला जायला मिळावं, आरोग्यपूर्ण असावं – निदान तब्येतीची तक्रार नसावी. चांगलं चांगलं लिहायला सुचावं. ही माझी सहावी सुखं आहेत. तसं तर यादी करू तितकी कमी वा जास्त होईल.
आत्तापर्यंत राहिलेल्या गोष्टी करायला मिळाल्या तर ते ही सहावं सुख असेल. ह्या लेखाच्या शेवटाकडे येताना शांताबाई ते सुख कसे सापडेल हे सांगतात. त्या म्हणतात, त्याचा शोध आपोआपच लागतो.
खरं आहे ते. सुखाच्या खूप मागे लागण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीच्या मागोमाग जाण्यातच खरं सुख आहे. त्या वाटेवर चालताना आनंदाचं झाडं मिळेल, खळाळणारा झरा लागेल, कधी ऊन कधी सावलीचा लपंडाव असेल, गाणारी वाट असेल…. स्वतःची चित्तवृत्ती समाधानी ठेवणं हे सहावं सुख सगळ्यांना लाभावं.
लेखिका : शांता शेळके
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “भांडणशास्त्र…” – लेखक :श्री विकास शहा ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆
आपल्या आयुष्यातला सर्वात जास्त फुकट गेलेला वेळ कोणता? तर निरर्थक, हेतुशून्य, आणि फक्त ‘मी’ ( ! ) जपण्यासाठी भांडणात घालवलेला.
हो. हेसुद्धा शास्त्र आहे,प्रशिक्षण आहे. जगाच्या शाळेत आपण ते शिकतो.एक भांडण आपलं नियतीशीसुद्धा सुरूच असतं, आतल्या आत.पद्धत चुकली की आपण चुकतो आणि जीवनाची रहस्ये कायम गूढच रहातात. उत्तरं न मिळता नियतीशी झगडण्यातच सगळं आयुष्य निघून जातं.
संतपदाला पोहोचणं प्रत्येकाला शक्य नाही. सॉक्रेटीसच्या बायकोने एकदा चिडून त्याच्यावर पाणी फेकलं. यावर तो म्हणाला,
“जरा जास्त तरी फेकायचेस. अंघोळीचं काम झालं असतं.”
लोकमान्य टिळक आणि आगरकर यांचा वाद सुद्धा एक आदर्श उदाहरण आहे. लक्ष्मीबाई टिळक यांचं ‘स्मृतीचित्रे’ वाचलं तर लक्षात येईल की तापट व्यक्तीसोबत भांडण टाळणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे,कौशल्य आहे.हे शिकून झालं, असं कधीच नसतं. आपण आयुष्यभर शिकतच असतो.
भांडण करताना काही नियम पाळले, तर आपलं जगणं सोपं होऊ शकेल.मनाला हे नियम पाळण्याची सक्ती करा.कुठेतरी लिहून ठेवा पण काहीही करून या नियमांना अनुसरूनच भांडण करायचे, हे आधी पक्कं करा.
सर्वात पहिला नियम म्हणजे मूळ मुद्दा,विषय सोडायचा नाही.आज, आत्ता समोर असणाऱ्या समस्येपुरतंच बोलायचं. भूतकाळ, भविष्यकाळ नकोच, विधाने करायची नाहीत. म्हणजे ‘तू नेहमी …, तू … ने सुरु होणारी वाक्ये टाळायची.नातेवाईक, मित्रमंडळी यांचे उल्लेख वेळ वाया आणि प्रकरण हाताबाहेर घालवायचेच असेल तरच करायचा.आपण भांडण करताना सुंदर दिसत नाही, हा विचार केला तरी संयम येईल.
प्रश्न सुटला पाहिजे हा हेतू हवा आणि भविष्यात पुन्हा हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तो सुटला पाहिजे ही तळमळ हवी.सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एका विषयावर एकदाच भांडायचं. पुन्हा कधीच नाही,वेळ आणि शक्ती वाया जाऊ द्यायची नाही हे मनात पक्के हवं.
आपल्या सगळ्या संस्कारांचा, वाचनाचा, शिक्षणाचा कस लागतो तो याच परीक्षेत.त्यामुळे हे शिकलंच पाहिजे.यशस्वी व्यक्ती,आपले आदर्श हे टीकेला किंवा नकारात्मक वर्तणुकीला कसा प्रतिसाद देतात, याचं खरंच सूक्ष्म निरीक्षण करायला हवं. यासाठी चरित्रे,आत्मचरित्रे वाचता येतील.
आपल्या नकळत आपण अनुकरण करत असतो आपल्या आई वडिलांचे, मोठ्यांचे, समाजाचे.सतत जिंकणारे,शब्दात पकडणारे काही हुन्नरी कलाकार या क्षेत्रात पहायला मिळतात.यांची स्मरणशक्ती दांडगी असते. शब्दांचे अचूक अर्थ यांना माहीत असतात.नवखे तर गोंधळून जातात यांच्या समोर.हे मात्र जिंकूनसुद्धा आतल्या आत हरलेले असतात. कारण कधीकधी जिंकण्यापेक्षा जे गमावलेले असते तेच मौल्यवान सिद्ध होते.
एकदा एका नवरा बायकोचं भांडण झाले.दोघांनी दोन कागद घेतले आणि एकमेकांचे दोष लिहायचे ठरवले. लिहून झाल्यावर बायकोने दोषांचा कागद वाचून दाखवला.आणि नव-याने तिच्या हातात कागद दिला त्यावर फक्त लिहिलं होतं,
… But I like you.
कधी कधी ‘हारके जितनेवाले बाजीगर’ असतात ते असे.
जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम,
फिर नहीं आते … हेच खरं !
असं म्हणतात की एखादा माणूस गेल्यावर आपण कधी कधी रडतो. ते तो गेला म्हणून नाही तर तो जिवंत असताना आपण त्याच्याशी किती वाईट वागलो, ते आठवून! अशी वेळ येऊच नये यासाठी हा अट्टाहास.
लेखक :श्री. विकास शहा
प्रस्तुती :सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पास होण्या पुरते ३५% मिळवूनही खूश होऊन पार्ट्या देणारे आणि ९५% मिळवून ही २% कमीच पडले म्हणून रडत बसणारेही बघितले.
जॉब अचानक गेल्यामुळे आता तसंही दुसरा जॉब मिळेपर्यंत अनायासे सुट्टीच आहे तर मस्त फिरुन येऊ म्हणणारे आणि अपेक्षित Increment मिळालं नाही म्हणून करुन ठेवलेले Flight Bookings कॅन्सल करुन घरात उदास बसून राहणारेही बघितले आहेत.
जिभेच्या कॅन्सर मुळे नाकात नळी असतांनाही उत्साहाने गर्दीत जाऊन पहिल्या रांगेत बसून नाटक एन्जॉय करणारा आणि नको त्या गर्दीत नाटक बिटक, उगीच कशाला आजाराला निमंत्रण म्हणून घरात बसून राहणाराही बघितला आहे.
बाल्कनीतून किती छान दिसतोय इंद्रधनुष्य म्हणून दोन्ही काखेत crutches लावून तरातरा बाल्कनीत बघायला जाणारा आणि कितीदा बघितलाय यार फोटोत, त्यात काय बघायचं म्हणत लोळत पडून राहणारा त्याचा रुम पार्टनर ही बघितला आहे.
फर्निश्ड थ्री बीएचके फ्लॅटमध्ये तेव्हाच थोडे पैसे अजून टाकून फोर बीएचके घेऊन टाकायला हवा होता म्हणून हळहळत बसणारे नवरा बायको आणि एकाच खोलीत काहीच पुरेसं नसूनही हसतखेळत आनंदात राहणारं पाच जणांचं एक कुटुंबही बघितलं आहे.
हे नको खायला- असं होईल, ते नको प्यायला- तसं होईल ह्या टेंशन मधे ठराविक मोजकं मिळमिळीत खाऊन पिऊनही अटॅकची चिंता डोक्यात ठेवणारे आणि जातील त्या ठिकाणी मिळेल ते झणझणीत चटपटीत बिनधास्त खाऊनही काही नाही होत यार म्हणत मजेत असणारे खवय्येही बघितले आहेत.
आयुष्य सगळ्यांना सारखंच मिळालेलं असतं. पण काही ते फुलवत जगतात , काही सुकवत जगतात, आता त्याला कोण काय करणार. प्रत्येकाला कधी, कुठे, कशात आनंद, सुख, समाधान मिळेल ते सांगता नाही येत. पण त्यांना ज्यात आनंद मिळेल ते त्याने करावे. कोणाला निसर्गात फिरण्यात आनंद मिळतो, तर कोणाला फक्त डोंगर दऱ्या चढण्यात आनंद मिळतो, कोणाला फक्त घरात लोळत राहण्यात तर कोणी कायम हसत खेळत मजेत राहण्यात आनंद मानतात.
आनंदी असण्याचे प्रत्येकाचे मोजमाप वेगवेगळे आहे.
कोणी वस्तू खरेदी करून आनंदी होतं. कोणी भटकंती करून आनंद मिळवतं . कोणाला नवनवीन पदार्थ करण्यात आनंद मिळतो तर कोणाला खाऊ घालण्यात आनंद वाटतो.
जितक्या व्यक्ती तितक्या प्रत्येकाच्या तऱ्हा असतात.
या सगळ्या आनंद व्यक्त करण्याच्या वाटा झाल्या.
मी आनंदी आहे. कसल्याही प्रकारच्या त्रासाशिवाय निरोगी आयुष्य जगतेय म्हणून. आई बाबा प्रत्येक निर्णयात सोबत असतात म्हणून. जीव लावणारी भावंडं आहेत म्हणून. ते प्रेम करणारे निस्वार्थ प्रेम करतात म्हणून. थोडाही चेहरा उतरला तर “तू ठीक तर आहेस ना” विचारणारी मित्र आहेत म्हणून. आणखी काय हवं?
अडचणी कुणाच्या आयुष्यात नसतात? आणि सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टी मला तरी नकोत! सतत आनंद वा मनाला समाधान देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी, ज्या कधी लक्षात सुद्धा आलेल्या नसतात, त्यांची किंमत अशावेळीच तर कळते.
एक निरोगी शरीर, जे लढण्यासाठी समर्थ असेल. बास्स. जास्त काहीच नको. माझ्यासाठी तोच आनंद आणि तेच समाधान!
प्रस्तुती : श्री अनंत केळकर.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
☆ फटाके आणि फाटके… – लेखक : श्री. बापूसाहेब शिंदे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
परवा सहज बाहेर पडलो. दिवाळी तशी म्हटली तर संपत आली होती.तसंही हल्ली दिवाळी पाचवरून दोन दिवसावर आली आहे.
म्हटलं,जरा सकाळी सकाळी फेरफटका मारून येऊ.
असाच रस्त्याने एकटा चालत होतो. अचानक माझी नजर रस्त्याचा दुसऱ्या बाजूला गेली.
४-५ पोरं-पोरी. जेमतेम ७-१० वयोगटातील असतील…
पोरं तशी फक्त चड्ड्या घालूनच होती आणि त्या पण बऱ्याच ठिकाणी फाटलेल्या, नायतर ठिगळं जोडलेल्या.पोरींचे कपडे पण तसेच ठिगळंच जास्त होती.
प्रत्येकाच्या हातात झाडू होता आणि ते रस्त्याला पडलेले फटाक्यांचे कागद झाडून काढत होते.
जेवढा आनंद आमच्या पोरांच्या चेहऱ्यावर फटाके फोडताना दिसत असतो, त्यापेक्षा दुप्पट त्यांच्या चेहऱ्यावर होता.
जणू त्यांच्यातच शर्यत लागली होती, जास्त कचरा कोण साफ करतोय.
मला कुतुहल वाटलं त्यांचा उत्साह आणि ती धावपळ पाहून .
मी सहज रस्ता पार करून त्यांचेकडे गेलो.
सर्वांना बोलावले आणि विचारले,
“का रे,एव्हढी का गडबड सुरू आहे तुमची..?”
हे ऐकून त्यातला एक पोरगा म्हंटला,
”आमचे आई- बाप रस्त्याची साफ सफाई करतात. आम्हाला दिवाळीची सुट्टी आहे,
म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलंय, जो जास्त झाडलोट करेल त्याला भरपूर दिवाळी फराळ आणि नवीन कपडे मिळतील आणि प्रत्येकानं आपल्या आपल्या कचऱ्याचे वेगळे वेगळे ढीग करायचे.मंग आमचे आय – बाप त्यात काय फटाके असतील तर ते आम्हाला शोधून वाजवायला देणार…”
हे ऐकून मी सुन्न झालो. त्यातून मी सावरून सहज विचारले,”अरे, तुम्हाला तर फटाके ह्यातले शोधून देणार. मग तुम्हाला नवीन कपडे आणि फराळ कसा काय देऊ शकतात ते..?” त्यांच्यातली सगळ्यात मोठी पोरगी बोलली,
”काका ते आमचे आई बाप झाडू मारत मारत जे बी घर रस्त्यात येतं,त्यांना विचारतात काय फराळ उरले असेल तर आमच्या पोरासनी द्या. कुणी देतो,कुणी असूनही हाकलून देतं.
काही लोक लय चांगली असतेत. ते न इचारता देतात.कपड्याचं पण तसंच. कुणी चांगली कापड देतं, कुणी फाटलेली मग आमची आई त्याला जमत असल तर शिवते नायतर ठिगळ लावून देते आणि मंग आम्ही ती आमची दिवाळीची कापडं म्हणून वरीस भर घालून फिरतो…”
हे माझ्यासाठी खूप भयानक होते,
असंही असू शकतं ह्यावर माझं विश्वास बसेना. माझ्या पायाखालची जमीनच सरकली….
सुख – समाधान कशात असतं,हे मला ह्या १० वर्षांच्या पोरांनी दोन मिनिटात शिकवलं होतं.
नाहीतर आम्ही १०० ची माळ आणली तरी त्या मोजत बसतो आणि १-२ फटाके जरी उडले नाही किंवा आवाज जरी कमी वाटला तरी सणासुदीला पण त्या दुकानदाराचा उद्धार करत बसतो…
कपडे तर आम्ही AC शोरूम शिवाय घालतच नाही. त्याशिवाय दिवाळी होतंच नाही, असा आमचा गैरसमज असतो.
कुठं ती AC त गारठलेले कपडे आणि कुठं ती ठिगळांची कपडे ज्यातून गारठापण रोखला जात नाही.
पण त्यासाठी त्या छोट्या जिवांची चाललेली धडपड .त्यांची धडपड आणि आमची धडपड पाहून एकच फरक जाणवला, ते आनंदानं समाधानाने मिळेल तेच सुख मानणारी वाटत होते , पण आमची धडपड ही कधीच आनंदी वाटली नाही.कधी चेहऱ्यावर समाधान दिसलेच नाही.
पण धडपडत राहत जायचे हेच आम्हाला माहिती. कारण आम्हाला सुख कशात आहे,
हेच समजत नाही .मी तसाच मागे फिरलो …घरातले सारे डब्बे शोधू लागलो. मिळेल तो फराळ पिशवीत घातला, पोरांचे मिळतील ते ५-६ कपड्याचे जोड, बायकोच्या कपाटातल्या ढीगभर साड्यातल्या ३-४ साड्या, माझी काही कपडे एका पिशवीत भरले आणि थेट त्या पोरांकडे निघालो.
इकडे माझं काय सुरु आहे, हे माझ्या बायको पोरांना समजत नव्हते .त्यांचा तिकडे दंगा सुरु होता. आमचे कपडे ,खाऊ घेऊन गेले.
मी ते सारं त्या पोरांना दिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. त्यांना काय करू आणि काय नको असं झालं होतं.
मी परत फिरलो आणि जाता जाता त्यांना सांगितलं, इथून पुढं कोणत्याही सणाला माझ्या घरी यायचं आणि इथून पुढे तुम्हाला दिवाळीचे नवीन कपडे ,फराळ आणि फटाके दरवर्षी मी देत जाईन …माझे डोळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पाण्याने डबडबले.
स्वतःला सावरत घरी आलो.
आता माझी बारी होती. मला घरी उत्तर द्यायचे होते …मी घरी पोहचणार तोच दारात सारी मंडळी उभी होती. मी तसाच पायरीवर बसलो. दोन्ही मुलांना जवळ घेतलं.बायको फुगून दाराला टेकूनच उभी होती. मी मुलांना जे काय पाहिलं ते सगळं सांगितलं.
आपण आपल्या ऐपतीप्रमाणे भारीत भारी कपडे, दागिने, सुगंधी साबण आणि सुगंधी उटणं लावले तरच दिवाळी होते, असं समजून आपण विनाकारण किती वायफळ खर्च करतो आणि समाजात असे किती तरी लोक आहेत ज्यांना साधं साबण , तेल अशा साध्या साध्या त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळत नाहीत.
हे समजावू लागलो. तुम्ही २ फुलबाजे कमी घेतले तरी रुसून बसता पण ती मुलं तुमच्या उडवलेल्या फटक्याच्या ढिगातून एकादी न उडलेली फटाकी मिळेल ह्या आशेने मन लावून तुम्ही केलेला कचरा साफ करत आहेत.
हे समजावण्याचा प्रयत्न करत होतो.
ती पोरं रस्ता झाडत झाडत आमच्या घराजवळ आली होती.आमच्या घरचे सारे टक लावून त्यांचेकडे पाहत होते.
साऱ्यांचे चेहरे पडले होते.
तोच माझा छोटा मुलगा माझ्या जवळून उठला, थेट घरात गेला आणि लपवून ठेवलेले एक टिकल्याचे पॅकेट आणि बंदूक घेऊन बाहेर आला नि सरळ त्या पोरांकडे गेला आणि त्यांना दिले.
हे पाहून त्या पोरांनी काम सोडलं आणि जणू काय आपल्या हातात हजाराची माळ पडल्यासारखे एक-एकजण ते टिकल्या बंदुकीत घालून वाजवत नाचू लागले.
माझा मुलगा तसाच पळत आला नि माझ्या कुशीत बसून रडायला लागला. त्याला काय समजलं मला माहिती नाही आणि मीही त्याला विचारणं मुद्दाम टाळलं,काहीही असेल…
तरी एक वात पेटली होती याची मला जाणीव झाली होती. ह्या साऱ्यातून एक गोष्ट मला आणि माझ्या कुटुंबाला समजली. ती म्हणजे “फटाके”आणि “फाटके” ह्यात फक्त एका “कान्याचा” फरक असतो आणि तो “काना” एकाद्या “काठी” सारखा असतो योग्य ठिकाणी लागला तर साऱ्या गोष्टींचा आनंद देणारा आधार बनतो. नाहीतर ते आयुष्याचं ओझं होतो ….
म्हणून ठरवलं आता कोणताही सण आला की अशा २ का होईना,पण ह्या पोरांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचं काम करायचं.
फटाके एकदा पेटले की एकदा मोठा आवाज करून कागदच होतात पण कोणाच्यातरी चेहऱ्यावर एकदा पेटवलेले आनंदरुपी समाधान आवाज न करता पण एखाद्या रंगीत फुलबाज्याप्रमाणे फुलत राहतं.
लेखक :श्री.बापूसाहेब शिंदे.
संग्राहिका :सौ. शशी नाडकर्णी-नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈