मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जीभ…” – लेखक : श्री चंद्रकांत जोशी ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “जीभ…” – लेखक : श्री चंद्रकांत जोशी काका ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

जेणे जिंकीली रसना ।

तृप्त जयाची वासना ।

जयास नाही कामना ।

तो सत्वगुण ।

…समर्थ रामदास

ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ ! रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय ! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्विकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची ! एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचे सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे जीभ.

एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना जिंकता येणे सहज शक्य आहे, असा एकमेवाद्वितीय अवयव म्हणजे जीभ.

सर्वात जास्त रक्तपुरवठा असणारा हा रसमय अवयव जीभ ! तोंडात आलेला घास घोळवत घोळवत, इकडे तिकडे फिरवत फिरवत, बत्तीशीच्या ताब्यात देत देत, त्यांच्याकडून बारीक पीठ करवून, तयार लगद्याला आतमध्ये ढकलण्याचे महत्त्वाचे काम करणारा अवयव म्हणजे जीभ.

प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेपणाने ओळखता येणारी, ही आगळीवेगळी जीभ. भातातून नजर चुकुवून येणारा दगड शोधून काढतेच, पण डोळ्यांना सहजपणे न दिसणारा, अगदी दाताच्या फटीत लपून बसलेला केसही शोधून काढते. ही सीआयडीची दृष्टी असलेला हा कलंदर अवयव म्हणजे जीभ !

सतत बत्तीस दातांच्या संरक्षणात फिरणारा, पण चुकून मनात आणलं तर चुकीच्या क्षणी, चुकीचा शब्द, चुकीच्या व्यक्तीसमोर बोलून, बत्तीसच्या बत्तीस दात हातात काढून दाखवण्याचे सामर्थ्य असलेला एक चमत्कारिक अवयव म्हणजे जीभ !

बेधुंदपणे अखंड बडबडण्याचे प्रमुख काम करणारा आणि अन्नाला फावल्या वेळात पाठीमागे ढकलण्याचे काम करणारा, पण हे “काम” करताना, कधीही न दिसणारा अवयव म्हणजे जीभ ! दिसतो तो फक्त “आऽऽ कर” असं म्हटल्यावर.थोडाच वेळ दर्शन देणारा अवयव म्हणजे जीभ ! काम करताना मात्र कधीही दिसत नाही, असा “कामानिराळा” राहणारा हा बिलंदर अवयव जीभ !

दाताशी युती करत तथदध, ओठाशी युती करत पफबभ, दंतमूलाशी युती करत चछजझ, टाळूशी युती करत टठडढ, अशा अनेक युत्या, युक्तीने करत ध्वनी निर्मितीत सहाय्य करणारा युतीबाज अवयव म्हणजे जीभ !

पोटात काय चाललंय, याची बित्तंबातमी बाहेर डॉक्टरांना दाखवणारा, तोंडात बसवलेला पण पोटाचा जणु काही सीसीटीव्हीच असलेला एक अवलिया अवयव म्हणजे जीभ!

ओठाबाहेरील जगाला वेडावून दाखवून, आपल्या आतल्या मनाचं, तात्पुरते का होईना, समाधान करून देणारा, हा एक हुश्शार अवयव म्हणजे जीभ !

ज्या एका अवयवाला ताब्यात ठेवले तर शंभर वर्षापर्यंत सहज जगता येईल, अशी दिव्य अनुभूती देणारा एक योगी अवयव म्हणजे जीभ !

आजारी पडेपर्यंत खाणाऱ्यांनी बरे होईपर्यंत उपवास करावा, असा संयम शिकणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ !

तिला जर भगवंताच्या नामात अडकवले तर नराचा नारायण करण्याची ताकद असणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ.

उगाच नाही म्हटलंय, जेणे जिंकिली रसना……

त्याची जिरोनी गेली वासना….

लेखक :श्री.चंद्रकांत जोशी काका, ठाणे

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चला मिळवून आणू या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ चला मिळवून आणू या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

“करंजीच्या सारणात थोडी कणीक भाजून घालावी. म्हणजे मग सारण नीट मिळून येतं. नाहीतर करंजीचा खुळखुळा होतो. ” लहानपणी आईकडून हमखास ही टीप मिळायची. “पण कणीकच का? तांदळाचे पीठ का नाही?” तर त्यावर “अग, गव्हाच्या पिठाच्या अंगी सगळ्यांना धरून ठेवण्याचा गुणधर्म असतो. तसं तांदळाच्या पीठाचे नाही. ते अगदी सरसरीत असतं. “

“मग आपण खव्याच्या किंवा मटारच्या करंजीत का नाही घालत हे गव्हाचे पीठ?” माझा अजून एक आगाऊ प्रश्न. तर त्यावर “अग, मटार किंवा खव्याच्या सारणात मूळचा ओलावा असतो. त्याला मिळून आणण्यासाठी दुसऱ्या घटकाची आवश्यकता नसते”  – तितकेच शांत, पण तत्पर उत्तर.

अगदी सहजपणे माझ्या आईने  जीवनातल्या दोन गोष्टी मला समजावल्या.

१. अंगी ओलावा असेल, तर गोष्टी मिळून येतात.

२. ओलावा कमी असेल, तर मिळून आणणारा घटक आवश्यक ठरतो.

नंतर लग्न झाल्यावर वडे, कटलेट इत्यादी रेसिपी करताना binding factor चे महत्व पटत गेले. आणि आता दिवाळीसाठी करंज्या करत असताना एक गोष्ट लख्ख जाणवली.

नात्यांचंही असंच आहे. प्रत्येक नातेवाइकांच्या गोतावळ्यात असा एखादा binding factor असतो, जो सर्वाना धरून ठेवतो. मग ते असे मित्र/ मैत्रीण असतील, जे बऱ्याच वर्षांनी कारणपरत्वे दुरावलेल्या सगळ्यांना एकत्र आणतात.

व्हॉट्सॲप ग्रुप बनवतात आणि “contact मध्ये रहायचं हं” अशी प्रेमळ दमदाटीही करतात. कधीकधी असा binding factor आपल्या नात्यातील एखादी बुजुर्ग व्यक्ती असते, तर कधी आपल्या शेजारी पाजारीही अशी व्यक्ती सापडून जाते.

आजच्या virtual जगात सुद्धा असे binding factors दिसतात. आपण त्याना अनेकदा भेटलेलोही नसतो… पण ते मात्र आपली चौकशी करतात. काळजीही करतात.

अशा सगळ्या binding factors ना माझा मानाचा मुजरा. ते आहेत, म्हणून समाजातील माणूसपण टिकून आहे, अन्यथा समाजाचाही खुळखुळा व्हायला वेळ लागणार नाही.

मंडळी, आपण वयाने मोठे झालो, मिळवते झालो, चला तर – आता मिळवून आणणारे होऊ या.

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खरंच का फक्त भाव महत्त्वाचा?…” – लेखिका : डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “खरंच का फक्त भाव महत्त्वाचा?…” – लेखिका : डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

” हे बघा आई, मी बिझी आहे. उद्या मला मिटींग्स आहेत.एवढा काही वेळ नाही मला, मी कुमारिकेच्या घरी अथर्व बरोबर बांगड्या , फ्रॉक पाठवून देईन,” सायली म्हणाली .

” अगं, संध्याकाळी बोलवू ना पण मग तिला. नीट पूजा करू, तुझ्या वेळेनुसार बोलवू, ” सासूबाई म्हणाल्या .

” आई , अहो, भाव महत्त्वाचा !  पूजा केली काय आणि नाही केली काय.संध्याकाळी कंटाळा येतो खूप, ” सायलीने चप्पल घालता घालता म्हटलं.

” सायली , दोन मिनिटं बोलू ? वेळ आहे आता? “

कपाळावर आठ्या आणत सायलीने होकार दिला. सासूबाई म्हणाल्या, ” शिरीष, तू पण ऐक रे . भावच सगळ्यात महत्त्वाचा ह्यात दुमत नाहीच. पण भाव  ह्या गोंडस नावाखाली आपण आपल्या जबाबदाऱ्या , कर्तव्य विसरतोय, असं नाही वाटत का तुला ? तू सून आहेस म्हणून नाही, शिरीषलासुद्धा मी हेच विचारते आहे . देवधर्म म्हणजे अंधश्रद्धा नाही, पण वेळेचा अपव्यय, असं तुम्हाला वाटतं ना ? गणपतीत रोज रात्री वेगवेगळ्या स्पर्धा असतात. तेव्हा उत्साहाने भाग घेता तुम्ही, पण गणपतीला दुर्वा तोडून आणा म्हटलं की तुम्हाला वेळ नसतो , थकलेले असता. घरच्या आरतीलाही चार वेळा ‘या रे’ म्हणावं लागतं. कुठलाही उपास म्हटलं की मला झेपत नाही , माझा विश्वास नाही, असं म्हणून मोकळे होता. पण ते कोणतं किटो डाएट का काय त्याला तयार होता…”

सायली म्हणाली ,  “आई , तुम्ही दोन वेगळ्या गोष्टी compare करताय.”

” नाही , माझं ऐकून घे पूर्ण . अरे, उपास तापास , देवधर्म म्हणजे स्वतःच्या मनाला , शरीराला लावून घेतलेलं बंधन . हे unproductive आहे, असा तुम्ही गैरसमज करून घेतलाय . आहेत , बऱ्याच प्रथा अशाही आहेत की त्यात तथ्य नाही , मग त्या सोडून द्या किंवा थोड्या बदला. आता सायली, तुला म्हटलं, आजेपाडव्याला तुझ्या बाबांचं श्राद्ध घाल , तू म्हणालीस, भाव महत्त्वाचा. मी त्यांच्या नावाने दान देईन.अगं, दे ना तू दान. पण त्यांच्या फोटोला हार घालून त्यांच्या आठवणीत त्यांच्या आवडीचे पदार्थ करशील, अथर्वला सांगशील- आजोबांना नमस्कार कर , तुझ्या कळत नकळत त्यांच्या आठवणी त्याला सांगशील तर त्यालाही कळेल की आईला घडवण्यासाठी त्या आजोबांनी कष्ट घेतलेत, त्यांचाही आदर करावा. पण तुम्हाला भाव महत्त्वाचा, ह्या पांघरुणाखाली लपत कामं करायचा कंटाळा असतो . उद्या अथर्व तुला, मला , शिरीषला कुमारिकेची पूजा करताना बघेल, तर स्रियांबद्दलचा आदर त्याला वेगळा शिकवावा लागेल का ? गिफ्ट तर काय देतच असतो गं आपण तिला . परवाचंच घे , घरी भजन आहे, म्हटल्यावर तू नाक मुरडलंस , वेळ नाही म्हणालीस पण घरी परत आलीस तेव्हा आमचं भजन सुरू होतं, त्यात रंगून गेलीस.फेरदेखील धरलास आमच्याबरोबर. हो की नाही ? ” सासूबाईंनी विचारलं .

” हो , हे मात्र खरं आई. इतकं प्रसन्न वाटलं त्या दिवशी!आणि मी ठरवून टाकलं की दरवर्षी वेळ काढून भजनाला उपस्थित रहायचंच!” सायली म्हणाली .

“हो ना ? तू रे शिरीष ,  सोवळं नाही,पण निदान आंघोळ करून आरती कर, म्हटलं की हेच- भाव महत्त्वाचा . अरे, त्या निमित्ताने शरीराबरोबर मनाचीही शुद्धी होते. आंघोळ करून मनही प्रसन्न होतं आणि मग आरतीच काय कुठलंही काम करायला फ्रेश वाटतं . एरवी मित्रांची पार्टी असली की जागताच ना तुम्ही. मग गोंधळ घालायचा का विचारलं की ‘आई , भाव महत्त्वाचा, देवी म्हणते का गोंधळ घाला’ म्हणून उडवून लावलं मला . अरे देव-देवी काहीच म्हणत नाहीत , हे सगळं आपल्या आनंदासाठी , आरोग्यासाठी आहे . एखादेवेळी नाही जमलं तर काहीच हरकत नाही. पण कालानुरूप बदल करून का होईना, प्रथा जपा रे . हे बघ. नेहमीच मागची पिढी जेवढं करते तेवढं पुढची पिढी करतच नाही . मी देखील माझ्या सासूबाई करत होत्या, तेवढं नाही करू शकले आणि सायली, तू पण नाही माझ्याएवढं करणार हे मलाही मान्य आहे . तरीही सारासार विचार करून जे जे शक्य आहे ते ते करायला काय हरकत?  भाव महत्त्वाचा पण कृती नसेल तर तो भाव निष्फळ होईल ना ? मी खूप बलवान आहे किंवा हुशार आहे हे सांगून होत नाही, त्यालाही काहीतरी कृतीची जोड द्यावीच लागते .

हे सणवार मनाला वेसण घालायला शिकवतात .मनाचे डाएट म्हणा ना. ते किती प्रमाणात करायचं, ते ज्याचं त्याने ठरवावं. पण करावं, असं मला वाटतं. असं म्हणजे असंच ह्या आपल्या कोषातून बाहेर पडून इतर गोष्टीतला आनंद दाखवतं. आपण आपली पाळंमुळं विसरून इतरांचं अनुकरण करतोय आणि ते आपल्या लक्षात येत नाहीये. भोंडला खेळायला आपल्याकडे वेळ नसतो. पण दांडिया खेळायला मात्र अगदी आवरून , मेकप करून आपण जातो . दांडिया खेळू नये, असं नाही. पण आपलीही संस्कृती, परंपरा आपणच जपल्या, त्यासाठी खास वेळ काढला तर काय हरकत ? आणि अर्थातच ते करण्यासाठी भाव आणि कृती दोघांची सांगड घालणं महत्त्वाचं. तरच पुढची पिढीही ह्या परंपरा पुढे नेईल. तुम्ही जाणते आहात , काय खरं खोटं किंवा योग्य अयोग्य तुम्हाला चांगलंच कळतं ना. मग श्रद्धा , अंधश्रद्धा हेही तुम्हाला कळेलच की. जे चुकीचं वाटेल ते नका करू ,सारखं भाव महत्त्वाचा म्हणत विशेषतः धार्मिक कर्तव्यांपासून पळू नका . बाकी तुमची मर्जी.उद्या असेन मी, नसेन मी…” गुडघ्यावर हात टेकत सासूबाई आत गेल्या .

शिरीष आणि सायली स्तब्ध झाले होते . असे  शिरीष सायली प्रत्येक घरात आहेत . पटत असलं तरी त्यांचा इगो आणि peer pressure आड येतं .

असो , माझा संस्कृती रक्षणाचा भाव तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून मी त्याला लेखन कृतीची जोड दिली , एवढंच !

लेखिका : डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर

प्रस्तुती : सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शास्त्रीय जागर… – लेखिका :डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

शास्त्रीय जागर… – लेखिका :डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी

“काय कटकट आहे!” म्हणत, पाय आपटत श्रुतिका आरतीला आली. तिच्या चेहेऱ्यावरचा त्रासिक भाव आईने टिपला होता. आरती झाल्यावर प्रसादासाठी पुढे आलेल्या हातावर चापट देत आई म्हणाली, “आता कशाला प्रसादाला पहिला नंबर? यायचं नव्हतं ना आरतीला?”

अर्धवट कळत्या , १३ वर्षे वयाच्या श्रुतिकाला हे पूजा, आरती, नवरात्र सगळं बोरिंग वाटत होतं. आज आईने तिला समजवायचं ठरवलं. “काय गं, तुला माहीत आहे का, नवरात्र का करतात?” आईने विचारलं. तशी ती रागाने म्हणाली, “त्यात काय, काहीतरी ऑर्थोडॉक्स रूढी. कुठे देवी पाहिली कोणी? पण म्हणे ९ देवींची पूजा असते. मम्मा , तू काहीही म्हण, मला पटत नाही हे.” “अगं, पण तुला कोणी सांगितलं की देवींची पूजा करण्यासाठीच नवरात्र आहे, असं. त्याला शास्त्रीय आणि वैचारिक दोन्ही आधार आहेत.ऑर्थोडॉक्स आहे की नाही, तूच ठरव,” आई म्हणाली. “हँ, त्यात काय शास्त्रीय? ” श्रुतिका.

“बाळा, नवरात्र हे बी- बियाणांच testing kit आहे. पूर्वी आतासारखी खूप बियाणं किंवा खतं नव्हती. मग सगळ्या प्रकारची धान्यं थोडी थोडी टाकून त्याचं एकप्रकारे टेस्टिंग केलं जातं नवरात्रात की ह्यांच्यापासून पीक कसं येईल? ” “हो का? Interesting आहे. पण मग आताच का?” श्रुतिकाला प्रश्न पडला, म्हणून आईला बरं वाटलं. “बरोबर विचारलंस.अगं, या दरम्यान रब्बी पिकांचा हंगाम सुरू होतो, आणि ती पिकं पाण्यावर वाढतात ना मग हा trial pack बरं का!” आईने उत्तर दिलं.

“wow, मम्मा, भारीच की, आणि लोकांनी ते मनापासून करावं म्हणून देवाचं नाव, हो ना?” श्रुतिका एकदम excite झाली होती. ” पण मग आई ते, तू जोगवा मागायला का पाठवते? मला नाही आवडत. खूप embrassing वाटतं” श्रुतिकाने आईला मनातलं सांगितलं. “हे बघ बाळा, मी म्हटलं ना, वैचारिक पण पार्श्वभूमी आहे. जोगवा मागणे म्हणजे काय?तर आपला वृथा अभिमान बाजूला ठेवून शरण जाणे. पूर्वी लोक ह्या मागितलेल्या जोगव्यावर पोट भरायचे. तुमच्या भाषेत इगो बाजूला ठेवून गरीब लोकांची दुःखं समजून घ्यायची. आता तुम्ही जाताच ना ते चॅरिटी का काय साठी पैसे मागायला? मग देवाच्या नावाने मागितलं तर छिद्र पडतं का अंगाला?”

“Right मम्मा, तो ‘फुलोरा’ का? त्यातली पापडी खूप आवडते मला.” श्रुतिकाचं डोकं आता शंकांनी भरलं होतं. आई हसून म्हणाली, ” किती चौकशा त्या! अगं , मी म्हटलं ना, रब्बी पिकाचा हंगाम सुरू होतो, मग दिवसभर शेतात राबायचं तर घरी काहीतरी कोरडा खाऊ असावा, मुलंही खातात. ते तुम्ही इव्हनिंग स्नॅक म्हणतात ना, तेच! आणि हो तेच त्याकाळचे chatting चे साधन होते फुलोरा लाटायला एकत्र आलेल्या बायकांना! Live whatsapp!”

 “आई, कसले हुशार होते गं  आपले पूर्वज! मग आता सांग, कुमारिकेची पूजा कशाला? आता मला का नाही बोलवत आणि, लहान मुलींनाच का?”

“वेडाबाई, प्रत्येक स्त्री मध्ये प्रचंड शक्ती आहे. ही देवीची रूपं त्याचीच जाणीव करून देतात, ती लहानपणीच करून दिली तर त्यांना गम्मत पण वाटते आणि आपण काही तरी भारी करू शकतो हे त्यांच्या मनावर ठसतं. पूर्वी, लवकर लग्न व्हायची, पाळी यायच्या आधीच, त्यामुळे कुमारिका ह्या छोट्याच असायच्या एवढंच! ते काय तुम्ही म्हणता ना toddler, teenager वगैरे-त्यांचं मोटिवेशन गं.” -आई.

“आयला, सॉरी, म्हणजे कमाल ग आई. प्रत्येक दिवसाला आणि सणाला काहीतरी आधार आहे. आता लास्ट , ते धान का धाण म्हणजे तो तुरा लावून का जायचं सीमोल्लंघनाला?” श्रुतिकाची प्रश्नावली संपणार म्हणून आईने हुश्श केलं. “मी म्हटलं ना, टेस्टिंग किटमधलं कुणाचं बियाणं चांगलं आहे, हे त्या दिवशी कळतं. मग, तुमची काय ती पायलट स्टडी गं!” श्रुतिकाच्या डोळ्यातली चमक आईला बरंच काही सांगत होती.

“आणि आई , मला माहीत आहे, दसरा म्हणजे, आपल्यातल्या रावणाला किंवा दुर्गुणांना, रामाने म्हणजे सद्गुणांनी जिंकायचं आणि ते हृदयापासून करायचं म्हणून हृदयाच्या आकाराची आपट्याची पानं प्रतीक म्हणून लुटायची, बरोब्बर ना?”

“म्हणूनच तुला सांगते, भारतीय संस्कृती, right choice है बेबी.”- आई.

आज आईने सुप्त कल्पकता वापरून तिच्यातल्या सरस्वती आणि श्रुतिकामधल्या दुर्गाचा नवरात्रानिमित्त  शास्त्रीय जागर केला होता.

लेखिका : डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अन देवी प्रसन्न हसली… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ अन देवी प्रसन्न हसली… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम 

तिने परत एकदा आरसा

न्याहाळला, नथ पक्की दाबली

आणि पदर सावरून

ती हॉल मध्ये आली.

तो सुद्धा कुर्ता घालून तयार

होऊन बसला होता.

“अरे व्वा …!!

सुरेख तयार झाली आहे गं ..!!

लग्नानंतरचं पहिलं नवरात्र म्हणून यावर्षी मी खास ही

गर्भरेशमी पैठणी आणली आहे देवीसाठी.

यानी ओटी भर बरं का.

बाकी तांदूळ, नारळ आणि

ओटीचं सगळं सामान या

पिशवीत ठेवलंय.

जोड्याने जाऊन या दर्शनाला.”

सासूबाई नव्या सुनेला म्हणाल्या.

त्यांच्या उत्साहाचं तिला कौतुक वाटलं.

        

दोघे मंदिराजवळ पोहोचले

तेव्हा ओटी भरायला आलेल्या

बायकांची चांगलीच गर्दी झाली

होती. शिवाय पुरुषांची पण

दर्शनाची वेगळी रांग होती.

तिला रांगेजवळ सोडून तो

गाडी पार्क करायला गेला.

 

रस्त्याच्या कडेला फुलांची,ओटीच्या

सामानाची बरीच दुकानं होती,

तिने आठवणीने सोनचाफ्याची वेणी

देवीसाठी घेतली, 

तिच्या घमघमणाऱ्या गंधाने

तिला आणखीनच प्रसन्न वाटलं.

तिने स्वतःच्या केसात चमेलीचा

गजरा माळला. हिरवाकंच चुडा

सुध्दा तिने ओटीच्या पिशवीत

टाकला.

एव्हाना तोही दर्शनाच्या रांगेत

सामील झाला होता. 

ती ओटी भरणाऱ्या बायकांच्या

रांगेत जाऊन उभी राहिली.

आई सोबत लहान पणापासून

नवरात्रीत देवीच्या दर्शनाला ती

नेहमी जायची. तिथल्या गर्दीचा

कंटाळा यायचा खरं तर.

पण वर्षातून एकदाच गावाबाहेरच्या

देवीच्या मंदिरात तिला जायला

आवडायचं सुध्दा.

ती आईला म्हणायची,

“आई या मंदिरात ओटीच्या

नावाखाली किती कचरा

करतात गं या बायका.

देवीला पण राग येत असेल बघ.

तिचा चेहरा नं मला वैतागलेला

दिसतो दरवर्षी.”

आई नुसती हसायची. 

आईच्या आठवणीत ती

हरवून गेली थोडा वेळ.

 

तेवढ्यात आपला पदर कोणीतरी ओढतअसल्याचं

जाणवलं तिला.

काखेला खोचलेलं पोर घेऊन एक डोंबारिण तिला पैसे मागत होती. रस्त्याच्या पलीकडे डोंबाऱ्याचा खेळ रंगात आला होता. म्हणून त्याची बायको पैसे मागत मागत रांगेजवळ आली होती. तिने अंगावर

चढवलेला ब्लाऊज आणि

परकर पार विटलेला,

फाटलेला होता .

तिच्या मागे उभी असलेली

बाई तिच्यावर खेकसलीच, 

“एऽऽऽऽ, अंगाला हात लावू नको गं.”

 

तिने पैसे काढेपर्यंत डोंबरीण पैसे मागत बरीच पुढे निघून गेली.

हळूहळू रांग पुढे सरकत होती.

आता तिची सात आठ वर्षाची मुलगी सुद्धा येऊन पैसे मागत होती.

 

शेवटी एकदाची ती

गाभाऱ्याच्या आत जाऊन

पोहोचली.

पुजारी खूप घाई करत होते. तिने पटकन समोरच्या ताटात

पिशवीतली पैठणी ठेवली,

मग घाईने तिने त्यावर नारळ ठेवले, त्याला हळद कुंकू लावून तिने ओटीचे सगळे तांदूळ, हळकुंड , सुपारी, बदाम ,खारका,

नाणे ओंजळीने ताटात ठेवले.

पुजारी जोरजोरात

“चला,  चलाऽऽऽ ….” ओरडत होते.

देवीच्या उजव्या बाजूच्या

कोपऱ्यात नारळाचा खच पडला होता, तर डाव्या बाजूला पुजारी ओटीच्या साड्या जवळ जवळ

भिरकावत होते.

एवढ्या गोंधळात तिने देवीच्या मुखवट्याकडे क्षणभर पाहिले,

आजही तिला देवी त्रासलेली वाटत होती.

 

मग हात जोडून ती ओटीचं

अख्खं ताट घेऊन बाहेर आली. आणि तिने मोकळा श्वास घेतला.

 

तोसुद्धा दर्शन घेऊन तिच्या

जवळ आला.  “काय गं?

ओटी घेऊन आलीस बाहेर ?”त्याने विचारलं. 

 

 “तू थांब इथे.

मी मला दिसलेल्या देवीची

ओटी भरून येते.”

असं म्हणून ती ताट घेऊन

भराभर पायऱ्या उतरून खाली रस्त्यावर आली,

झाडाच्या सावलीत आडोशाला तिला डोंबारीण दिसली,

तिच्या बाळाला ती छातीशी घेऊन पाजत होती.

“दीदी, हलदी कुमकुम

लगाती हूं आपको.”असं म्हणून तिने तिला

ठसठशीत कुंकू लावले.

ताट बाजूला ठेवून तिने

तिची ओटी भरली.

सोबत सोनचाफ्याची वेणी

आणि हिरव्या बांगड्यांचा चुडापण दिला. मग तिने तिला नमस्कार केला. 

डोंबारणीचं पोर तिच्या कुशीत झोपून गेलं होतं. 

तेवढ्यात तोही तिथं आला

आणि त्याने फळांची आणि खाऊची पिशवी तिच्या हातात दिली. ती म्हणाली,”ये लो दिदी, छोटू और उसकी बहन

के लिये.”डोंबारीण परत एकदा डोळ्यांनी हसली.

ती पैठणीवरून हळुवारपणे हात फिरवू लागली.

तिच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव वेचून ती दोघं परत मंदिरात आले.

आता गर्दी बरीच कमी झाली होती. गाभाऱ्यात जाऊन दोघांनी डोळे भरून देवीचे दर्शन घेतले.

        

तिला आता देवीचा मुखवटा खूप प्रसन्न वाटला.

इतक्यात गाभारा

सोनचाफ्याच्या गंधाने दरवळून गेला. त्या दोघांच्या पाठीमागे

डोंबारीण तिच्या मुलांसोबत आणि नवऱ्या सोबत पैठणी

गुंडाळून , हिरवा चुडा आणि

वेणी घालून देवीचं दर्शन

घ्यायला आली होती.

देवीचा मुखवटा तेजाने

आणखीनच उजळून

निघाला होता.

लेखक – अज्ञात 

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अंतर… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ अंतर… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

एकदा गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना विचारले, “आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का?”

सर्व शिष्य विचार करु लागले. एक शिष्याने उत्तर दिले, “रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवून बसतो, आणि म्हणूनच कदाचित ओरडून बोलतो.”

यावर गौतम बुद्ध म्हणाले, “पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो, ती समोरच असते. तरीसुध्दा आपण ओरडतो.जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो.”

यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याच उत्तराने बुद्धांचे समाधान झाले नाही.

शेवटी बुद्धांनी स्वतःच उत्तर दिले.

ते म्हणाले, “जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरता ते चढ्या आवाजात बोलतात.”

“आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात, तेव्हा अतिशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?”

असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले, “कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते. आणि जसजसे दोन्ही मनात प्रेम वाढू लागते तसतसा त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याचीदेखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतूनच किंवा देहबोलीतूनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे, ते ओळखतात.

शिकवण – परस्परांत वादविवाद आणि भांडणतंटे होतच राहतात. मात्र कितीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढू देऊ नका.तसे होऊ दिल्यास दोन व्यक्तींमधील दरी इतकी मोठी होईल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “चौकट आक्रसत चाललीय..” – लेखक : श्री प्रभाकर जमखंडीकर ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “चौकट आक्रसत चाललीय..” – लेखक : श्री प्रभाकर जमखंडीकर ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

माझ्या घराजवळच एक लॉन्ड्री आहे. एक 65 वर्षाच्या आजी ती लॉंड्री चालवतात. तशा त्या ‘वेल टू डू’ फॅमिलीतल्या आहेत.त्यांचा मुलगा  इंजिनिअर आहे. पण वेळ छान जावा आणि तब्येत व्यवस्थित रहावी म्हणून त्या काम करतात. आठवड्यातून दोनदा मी लॉन्ड्रीत जातो. बरेचदा आजींच्या मैत्रिणी तिथे गप्पा मारण्या साठी जमलेल्या असतात. कधी कधी आजींची नातवंडं सुद्धा तिथे खेळत असतात. खोड्या करतात, भांडतात. आजी सर्वांना मायेनं सांभाळून घेतात.

असाच एकदा मी कपडे इस्त्रीला टाकण्यासाठी तिथे गेलो होतो. आजींच्या बाजूला त्यांचा नातू उभा होता. आज तो खूपच छान नटून आलेला. कपाळावर अष्टगंधाचा टिळा, छान नवे कपडे. तीन चार वर्षांचा त्यांचा नातू, छान गोरा, गुटगुटीत अन् गोड. तो त्याच्या आजीला सांगत होता, “आजी तू उद्यापासून त्या सुमंत आजीबरोबर बोलायचं नाही बघ.” आजीने विचारलं, “का रे, काय केलं त्या आजीनं तुला?”

तो: “काही नाही. असंच.”

आजीनं पुन्हा पुन्हा विचारलं, पण तो काही कारण सांगत नव्हता. त्याचं आपलं एकच पालुपद, “तू त्या आजीबरोबर नाही बोलायचं.” शेवटी आजी म्हणाल्या, “थांब मी त्यांना फोन करून बोलवून घेते अन विचारतेच, काय केलं आमच्या नातवाला म्हणून.”

मग नातू सांगू लागला, “मी त्यांच्या समोरुन दोनदा गेलो. तरी आजी मला ‘हॅपी बर्थडे’ म्हणाली नाही. तू नाही बोलायचं.” अच्छा! म्हणजे आजीनं ‘हॅपी बर्थडे’ म्हटलं नाही याचा त्याला राग आला होता तर.

मला आणि त्या आजींना, दोघांनाही हसू आवरेना. तरीही हसू आवरुन आजी म्हणाल्या, “अरे त्यांच्या लक्षात आलं नसेल. त्या आता म्हाताऱ्या झाल्यात. तू सांगायचं ना त्यांना, ‘आज माझा बर्थडे’ आहे म्हणून.”

नातू: “मग मागच्या महिन्यात दिदीचा कसा लक्षात आला त्यांच्या? त्यांनी मुद्दाम केलंय. तू त्यांच्याशी नाही बोलायचं आता.”

आजी: “बरं, जाऊ दे. नाही बोलत त्यांच्याशी.” नातू परत आपल्या खेळात रमला. मला गंमत वाटली. एवढ्याशा मुलाला सुध्दा किती इगो, मान – अपमान! मी त्याच्यापाशी गेलो, हात पुढे केला अन ‘हॅपी बर्थडे’ म्हणालो. त्याने हात पुढे केला आणि थँक्स म्हटलं.

तेवढ्यात आजी म्हणाल्या, “अरे काकांना नमस्कार कर.” पण त्याने ऐकलं नाही. आजीचं कपडे मोजणं चालू होतं. मी मग शेजारच्या दुकानातून एक कॅडबरी घेतली आणि त्याला दिली. त्याने ती पट्कन घेतली आणि चट्कन मला वाकून नमस्कार करुन तो पळून गेला.

गोष्ट छोटीशीच, पण मला खूप काही शिकवून गेली. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आज इगो आहे. ‘माझ्या अपेक्षेप्रमाणे प्रत्येकानं वागलं पाहिजे. अन्यथा मी त्याला माझ्या आयुष्याच्या चौकटीतून बाहेर काढणार! अथवा माझी चौकट आकसून घेणार. मी दुसऱ्याला सामावून घेण्यासाठी माझी चौकट मोठी करेन’ असं कोणीच म्हणायला तयार नाही.

परिणाम… आज प्रत्येकजण आपापली अरुंद चौकट घेऊन एकटाच जगतो आहे. नातेवाईकांमध्ये तेच, मित्रांमध्ये तेच, ऑफिसमध्ये तेच, समाजात तेच. स्वतःच्या मिळकतीवर अन हिमतीवर फाजील विश्वास असल्यानेच हे सगळं असं घडतंय. पूर्वी लोक एकमेकांवर अवलंबून होते तेच बरं होतं, असं म्हणायची वेळ आलीय. लाखोंच्या गर्दीतही माणूस एकटा पडलाय. पण इगो इतका झालाय, की त्याला तेही समजेनासे झालंय.

स्वार्थ तर इतक्या टोकाला गेलाय की आपला फायदा असल्याशिवाय कोणी कोणाला विचारतच नाही. जिथे फायदा दिसतो, तेथे लोटांगण घालतील. पण फायदा नसेल किंवा फायदा करून झाला असेल, तर ते तुमच्याकडे  पाहणार नाहीत. खरं तर आपण इतके वाईट कधीच नव्हतो. पण मग हे असं का व्हावं? नेमकं गणित कुठे बिघडलं अन आपली संस्कृती, संस्कार असे रसातळाला कसे गेले?

मला वाटतं, आपण पुन्हा नव्याने मुलांना ‘मी आणि माझा’ च्या पलीकडे पहायला शिकवलं पाहिजे. तेही आज आणि आत्ताच. अन्यथा परिस्थिती असहाय्यपणे बघत बसण्याखेरीज आपल्या हातात काही उरणार नाही एवढं खरं.

लेखक : श्री प्रभाकर जमखंडीकर

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नव रंग… अज्ञात ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ नव रंग… अज्ञात ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

झोपडीच्या दारासमोर आज

हजारो दुर्गा उदास बसल्यात

बंगल्यातल्या दुर्गा नवरात्रीला

नऊ रंगाच्या साड्या नेसल्यात …. 

 

नऊ दिवसाला नऊ रंगाच्या

साड्या नेसणे गुन्हा नाही

हजारो साड्या कपाटाची

शोभा बनणं बरं नाही …. 

 

अंगाची अब्रू झाकण्या,

हजारो दुर्गा आहेत बेजार

कपाट तुमचं रिकाम करून

बना त्यांचा तुम्ही आधार …. 

 

देवळातील देवीला वाहता

हजारोचे भरजरी पातळ

कधीतरी डोळे उघडून बघा

गरीब महिलांच्या साडीचे ठिगळ …. 

 

श्रद्धेला तुमच्या विरोध नाही

तुम्ही तुमच्या जीवावर करता

मी  बिचारा आपला

तुम्हाला सांगण्यापुरता …. 

 

झोपडीत एकदा डोकावून पहा

तुमची साडी तिला नेसवा

नक्कीच सांगतो मिळणारा

आनंद नसेल फसवा …. 

 

गरिबांच्या झोपडीत उधळा

नवरात्रीचे नऊ रंग

कधीच होणार नाही

तुमच्या भक्तीचा बेरंग …… 

 

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रिटर्न गिफ्ट – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

?वाचताना वेचलेले ?

☆ रिटर्न गिफ्ट – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

आताशा कनेक्ट होणं शिकलेय मी. नव्हे, फारच एन्जॉय करतेय म्हणा ना हवं तर.आणि हो. या कनेक्ट होण्याच्या खेळात सुरेख रिटर्न गिफ्ट पण मिळतं ते वेगळंच.

आता म्हणाल, हे काय नवीन? 

खूप सोप्पंय हो हे सगळं.

‘मॉर्निंग वॉक’ला जाताना प्राजक्ताच्या झाडाखाली पडलेल्या फुलांच्या गालिच्यातील  नारंगी देठ असलेली दोन शुभ्र फुलं हलकेच हातावर घेऊन नाकाजवळ नेली.त्यांचा सुवास थेट मनाला भिडला आणि कनेक्ट झाले मी त्यांच्याशी!

माहीत नाही, कशा कोण जाणे,मस्तिष्कातून मनापर्यंत चेतातंतूनी संवेदना वाहिल्या आणि पुढचे चार पाच तास त्या परिमलाने दरवळून टाकले.

मिळाले नं मला रिटर्न गिफ्ट…!

अशा शेकडो गोष्टी होत असतात; चांगल्या वाईट.

आपल्या सभोवताली. फक्त आपल्याला कनेक्ट होता आलं पाहिजे. बस्स!

परवा कामवाली सुजलेले डोळे आणि रडलेला चेहरा करून आली कामाला. तिच्या डोळ्यात पाहिलं तर नजर चुकवली तिने. काहीच न बोलता वाफाळलेला चहाचा कप आणि दोन बिस्कीट ठेवली तिच्या समोर, तशी चहाचा घोट घेत मोकळी झाली. मनात साचलेली सल बाहेर निघाली.

तिच्याशी कनेक्ट होताना हलकेच माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पण जातांना हसून “येती व्ह ताई,”म्हणून माझं रिटर्न गिफ्ट मला देऊन गेली.

बरं या कनेक्ट होण्याला जात, पात, धर्म, वर्ण, शिक्षण, सुबत्ता, सुंदरता या कशाचीही गरज नसते. फक्त लागते ती मनाची थोडी वेगळी मांडणी.

खेड्यातून शहरात आलेली मी, रमते थोडी गावाकडच्या वातावरणात. मग आठवडी बाजाराच्या दिवशी कधी मावशी, कधी मामा तर कधी दादा भेटतो त्या अनोळखी माणसांच्या गर्दीत. “कश्या आहात मावशी..?” एवढे दोनच शब्द पुरतात कनेक्ट व्हायला!

मग त्या गर्दीतून कुठूनतरी आवाज येतो, “ताई मेथीच्या ताज्या जुड्या ठेवल्यात गं.घेऊन जा.”

बळेच कडीपत्त्याच्या चार काड्या, भरलेल्या भाज्यांच्या पिशवीत खोचतात कोपऱ्यात बसलेले आजोबा, तर माप झाल्यावरही एक पेरू हलकेच सरकवत, “ठिवा ओ ताई लेकरांना.” म्हणणारा मामा सापडतो, घरी परतताना पिशवीसारखं मनही भरून जातं!

मुलांच्या क्लासबाहेर त्यांची वाट पाहत थांबलेले असतो आपण, मधूनच आठ दहा मुलांचा घोळका गोंधळ घालत येतो बाहेर. हसी मजाक, आरडाओरड, एकमेकांना चिडवत स्वतःतच रमलेली असतात ती.

हळूच आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो अन् मनाच्या कोपऱ्यातील आपला ब्लॅक अँड व्हाइट कॉलेज कट्टा समोर येतो, नकळत त्या कट्ट्यावर चहाचा ग्लास घेऊन आपण बसतो. मग आपोआपच हात मोबाईल कडे जातो.

जुन्या मैत्रिणीचा नंबर डायल केला जातो. मग तासभर झालेल्या गप्पांमध्ये आपणही वय विसरून त्या घोळक्यातील एक होऊन जातो. मग पुढचे कित्येक दिवस हे रिटर्न गिफ्ट सांभाळतो आपण.

आयुष्य तेवढं रटाळ नक्कीच नाही.थोडंसं हरवून बघा.काढून टाका हा ‘शहाणपणाचा मुखवटा’.थोडे वेडेच व्हा कधीतरी.

म्हणजे बघा.

ऑफिसमधून घरी परतताना पार्किंगमध्ये खेळणाऱ्या मुलांसोबत फुटबॉलला किक मारून बघा आणि उडवून टाका सगळ्या चिंतांना.

कधीतरी चाखून बघा थंडगार आईस-गोळा. लागू द्या तो नारंगी, लाल, पिवळा, हिरवा रंग ओठांना.

नकाच राहू एक दिवस टापटीप.होऊ द्या केसांना अस्ताव्यस्त, घाला तोच घळघळीत पण मनाला रिलॅक्स करणारा जुना ड्रेस.

वाचत पडा एखादं सुंदर पुस्तक आणि भिडू द्या मनाला बॅकग्राऊंडमधील लतादीदींच्या सुरेल सूर.

नाटक पाहताना आवडलेल्या एखाद्या डायलॉगला उठून दाद देऊन पाहा.

जगून पाहा एखादा उनाड दिवस आपल्या स्वतःसाठीच!

आवडली का कल्पना कनेक्ट होण्याची?

तर सुरू करा मनाचा योगा मग बघा किती सुंदर सुंदर रिटर्न गिफ्टस् मिळतात ते.

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नवरात्री जागर… — लेखिका : सुश्री मीनल सरदेशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ नवरात्री जागर… — लेखिका : सुश्री मीनल सरदेशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

मैत्रिणींनो नवरात्रोत्सव सुरू होतोय.  घरोघरी घटस्थापना होईल. अनेक मैत्रिणी आटापिटा करून कुलाचार जपण्याचा प्रयत्न करतील. हे करताना एक लक्षात ठेवा: मैत्रिणींनो, तुम्ही आनंदी तर घर आनंदी. त्यामुळे तेवढंच करा, जेवढं तुम्हाला मनापासून करावंसं वाटतंय, शारीरिक दृष्ट्या झेपतंय!

एखादीची भक्ती तिच्या सुंदर रांगोळीत दिसेल तर एखादीची भक्ती देवीची स्तोत्र पठण करण्यात असेल. एखादीला मनापासून रांधून देवीला तृप्त करण्यात समाधान मिळेल. एखादीला माणसाच्या सेवेत आपली देवी भेटल्याचा आनंद मिळेल. दिवसरात्र माळ हातात घेऊन, एका डोळ्याने सुनेने सगळं केलं ना इकडे लक्ष असेल, तर ती जपमाळ काय कामाची?

जे कराल ते मनापासून पटतंय, म्हणून करा. मनावर ओझं देवी देत नाही. तिला तुम्हाला आनंदी बघायलाच आवडतं. पिढी दर पिढी चालत आलंय ते करावंच लागतं, म्हणून ओझं घेऊन करू नका. प्रेमाने सुंदर सजवलेली चार फुलं सुध्दा देवीच्या दरबारी नक्की रुजू होतात.

एक गोष्ट सांगते. कोणतीही गोष्ट करताना पुढच्या पिढीने तस्संच केलं पाहिजे, अशी अपेक्षा ठेवू नका.कदाचित त्या पिढीच्या भक्तीच्या संकल्पना वेगळ्या असतील.

बकरीच्या गोष्टीसारखं एकीने उडी मारली म्हणून दुसरीने मारली असं नको. सजगतेने सण  उत्सव साजरे करा.

माझे बाबा मला सांगत असत. दोन हस्तक आणि तिसरं मस्तक एकत्र आलं की मनोभावे नमस्कार कर. फक्त ते मनापासून वाटू दे. एक मात्र कर. अडल्या नडल्याला मदत करताना हात आखडता घेऊ नकोस. माणसातल्या देवाला शोध. त्याची आरास कर, पूजा मांड. तिथे देवी नक्की येईल खात्री बाळग!

पूजा मीही करणार आहे. पण माझ्या मनातल्या देवीची. छान ताज्या फुलांची आरास करून.प्रसन्न देवघरात. मला जमेल तशी. कदाचित श्रीसूक्त तोंडपाठ नसेलही पण तरीही घरची गृहलक्ष्मी प्रसन्न असली की तिने घातलेली साद ऐकून माझ्याकडे आनंदाने वास करील माझी अंबाबाई, हो ना!

सूचना: नऊ  दिवस मिळालेच पाहिजेत म्हणून पाळी मागे पुढे करायला गोळ्या खाऊ नका.देवी घरातल्या सगळ्यांची आहे आणि आता बाजारात  सहज सर्व उपलब्ध असल्याने नैवेद्य करणं फार अवघड नाही.

लेखिका :मीनल सरदेशपांडे,रत्नागिरी.

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares