सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ पैशाचं डाएट… लेखिका : डॉ. शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
” रिया, लक्षात आहे ना ? उद्या लक्ष्मीपूजन आहे तर पैसे खर्च करायचे नाहीत. तुला काही हवं असेल तर आजच आणून ठेव ” आईने दम दिला.
” हो गं बाई, किती वेळा सांगशील ? मला तर हा फंडा कळला नाही, काय म्हणे पैसे खर्च करायचे नाही. ठीक आहे, जाऊ दे, एक दिवसाने फरक नाही पडत. दरवर्षी लक्ष्मीपूजनाला हेच असतं ” रिया चिडून म्हणाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान झालं आणि रियाच्या लक्षात आलं, शीट, यार moisturizer संपलय, काल आणता आणता विसरलो आपण. आता पैसे मागितले तर ही आई कटकट करेल म्हणून ती गप्प बसली. थंडी सुरू झालीये नेमकी, आज मेकप करायचा, बरं आईचा ब्रँड मला सूट होत नाही. पण नकोच, आई खवळेल चांगलीच! एक दिवस ऍडजस्ट करावंच लागेल.
” रिया, ए रिया, हे फराळाचं देऊन ये गं आत्याकडे. पटकन जा आणि पटकन ये, कुठे पैसे खर्च करू नको बरं ” आईने तिला पिटाळलं.
खाली येऊन रियाने चावीने तिची टू व्हिलर सुरू केली आणि बघते तर काय, पेट्रोलचा काटा आज माझी दिवाळीची सुट्टी आहे म्हणत शून्यवरून पुढेच सरकेना. रियाला समजलं, पेट्रोल भरलं नाही, उद्या भरू म्हणत तीन दिवस झाले आपण गाडी तशीच दामटतोय, आली का पंचाईत ? आईने काही पैसे दिले नाहीयेत, गुगल पे करून पैसे भरायचे म्हणजे हिला मेसेज जाणार म्हणजे परत आरडाओरडा ! जाऊ दे, पायी जाते आत्याकडे, तरी बरं जरा जवळ रहाते ती. छ्या, ही मात्र माझीच चूक हं अशी मनातल्या मनात रियाने कबुली दिली.
आत्याकडे डबा देऊन, दमून आलेल्या रियाला तिच्या मैत्रिणी खालीच भेटल्या. एका ऑनलाइन शॉपिंग ऍपवर सेल होता. कुर्ती, जीन्स, टॉप एकदम स्वस्त होते एक दिवसासाठी. खरं दिवाळीत आताच सगळ्याची खरेदी झाली होती पण सगळ्यांना खरेदी करताना पाहून रियाला मोह आवरेना. तिने न राहवून आईला फोन केला, ” आई, दोनच टॉप घेते, प्लिज, करू ऑर्डर ? ” आई पलीकडून उत्तरली, ” आज नाही, आज खर्च करायचा नाही ! ”
रिया जाम वैतागली. तणतणत घरी परतली. दिवसभर धुसफुसणाऱ्या रियाला कधी नेलपेंट आणायचं राहिलं आठवत होतं तर कधी अर्धवट राहिलेल्या डेकोरेशनसाठी आरसे आणायचं विसरल्याचं आठवत होतं. चिडल्यावर कॅडबरी खाऊन राग शांत करणाऱ्या रियाला आज ते ही करता येत नव्हतं.
संध्याकाळी मनासारखी नाहीच झाली तिची तयारी पण तरी चांगले कपडे घालून ती पूजेसाठी तयार झाली. पूजा सुरू असतानाच कामवाली सरुमावशी रडत रडत आली. ” ताई, पोरीला आठवा कालच लागलाय. पोटात दुखतंय म्हणून दवाखान्यात नेली तर डॉक्टर म्हणाले, पिशवीचं तोंड उघडलंय, डिलिव्हरी होईल. बाळाला काचपेटी लागेल म्हणे, दिस भरले नाहीत म्हणून. कसं करावं? थोडा ऍडव्हान्स द्याल का, लई उपकार होतील. दिवाळी दिली हाये तुम्ही पर आता हे अचानक आलंय. बघा ओ ताई, जमलं तर द्या ना ” सरुमावशीने हात जोडले.
आई उठली, कपाटातून तीन हजार आणून तिच्या हातावर टेकवले, तिला हळदीकुंकू लावलं, ओटी भरली आणि शिवाय “अजुन लागले तर सांग गं “म्हणत आश्वस्त केलं.
रिया, हे सगळं बघून चिडलीच. ” आता, आता, गेली ना लक्ष्मी घराबाहेर ? नियम फक्त आम्हालाच का ? आम्ही लहान आहोत म्हणून ? ” तिने मनातली आग ओकली.
आईने रियाला जवळ बसवलं. ” रिया, तुम्ही कसं वजन कमी करावं, हलकं वाटावं म्हणून डाएट करता तसं हे आज पैशाचं डाएट असतं. ह्यामागे दोन उद्देश, एक तर प्लँनिंग शिकणे. आपल्याला काय काय लागणार हा विचार, हे नियोजन आधीच केलं ना तर ऐनवेळी धावपळ होत नाही. गाडीत पेट्रोल नसल्यामुळे तू पायी गेलीस हे मी बघितलं गॅलरीतून. वेळेवर गोष्टी न केल्याने त्या इमर्जन्सी होतात आणि मग आपल्यालाच त्रास होतो, हो की नाही ? दुसरा उद्देश म्हणजे सय्यम ! कधी कधी काही वस्तू आपण उगाचंच घेतो, गरज नसतानाही! हेच बघ ना, एवढी खरेदी झाली तरी सेल लागला म्हणून आणखी खरेदी करायची का ? अगं मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते ती, आपण नाही बळी पडायचं. आता बघ, शांतपणे, वेळ घेऊन विचार केला तर तुला उद्या वाटेल की गरजच नाहीये त्या extra टॉप्स ची, हो की नाही ? ”
रियाने होकारदर्शक मान हलवली तरी चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह आईने ओळखलं होतं. आई पुढे म्हणाली, ” रिया, देव ही भक्ती असावी, भीती नाही. कोणी पाहिलंय गं देवाला? काही चांगल्या सवयी अंगीभूत व्हाव्या म्हणून बऱ्याच गोष्टींना देवाचं नाव देण्यात आलं पण म्हणून ती अंधश्रद्धा होऊ नये ही काळजी आपणच घ्यायची. आज सरूच्या पोरीतला, माणसातला देव जर मी नाही ओळखू शकले आणि तिला तिचं बाळ वाचवण्यासाठी नाही मदत करू शकले तर खरा देव अस्तित्वात असेल जरी तरी तो मला माफ करेल का ? तीच आज लक्ष्मी बनून पूजेच्या वेळी आली आणि तिची तृप्तता झाली म्हणून जाताना तोंडभर आशीर्वाद देऊन गेली. अगं स्वतःला शिस्त लावत, माणसातला देव शोधायचा आणि तो सापडला की ती ज्योत पुढे पुढे न्यायची, हीच तर दीपावली ! आता नाही ना रुसलीस आईवर ? ” आईने विचारलं.
‘आली दिवाळी आणि कळली दिवाळी ‘ म्हणत रियाने आईला मिठी मारली आणि पूजेतली लक्ष्मीची प्रतिमा समाधानाने हसली.
लेखिका : डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈