मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मनातली बडबड…” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? वाचताना वेचलेले ?

☆ “मनातली बडबड…” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

आपण जेवढी बडबड लोकांशी दिवसभर करतो ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त मनातल्या मनात करतो..

बघा हं… 

(सकाळचा अलार्म झाल्यावर)

यार्रर्रऽऽऽ झाली लगेच सकाळ..

आत्ता तर डोळा लागला होता..

(ब्रश करताना)

काय भाजी बनवू आता..?

(गॅस जवळ आल्यावर)

एवढीच झाली भाजी…! पोरं खातील की नाही देव जाणे… 

(आंघोळीला जाताना) 

कोणता ड्रेस घालू  याऽऽऽऽर… सापडत नाही एकही जागेवर… निळ्यानी गरम होईल.. काळा कालच घातला.. पांढरा पावसाने खराब होईल… जाऊ दे पिवळा अडकवते… (त्यात एखादा कपडा अंगावर पडतो… तेव्हा कपड्यांनाही आपण बोलतो..) 

या… या.. आता माझ्या अंगावर, पडा एकदाचे.. नाही, या ना या.. कितीही आवरा… पुन्हा तेच!

(घरातून निघताना) 

×××ला, काय घड्याळ पळतंय… कितीही लवकर उठा, तीच बोंब…

(रेडिओ बंद करताना, भीमसेन जोशींचा अभंग चालू असतो)

पंडितजी, तुम्ही कसलं भारी गाताय! पण माफ करा, मला जावं लागेल आता.. सात वाजलेत.. 

(गाडी चालवताना –  एखादा ओव्हरटेक करत असेल तर..) 

“नाही, ये ना ये… घाल माझ्या अंगावर एकदाचा… तूच राहिला होतास.. कुठं झेंडे गाडायचेत देव जाणे…. तूही यमसदनी जा आणि मलाही ने…. 

(खूपजण बॅक मिरर मधून मागे बघत असतात…. तेव्हा) 

अरे बाबा काय बघतोस मागे? दोन दोन पोरांची आई आहे मी… चल नीघ पुढं… 

(शाळेत पोचल्यावर) 

हुऽऽऽऽऽऽश्…. झालं एकदाचं टाईममधे इन.. झालं… देव पावला.. 

(लिफ्ट बंद असेल तर) 

नाही बरोबर आहे देवा…. माझ्या वेळीच तू लिफ्ट बंद करणार… घे अजून काबाडकष्ट करुन घे माझ्याकडून… हाडं मोडून जाऊ देत माझी… 

(जेवताना) 

किती लवकर ब्रेक संपतो… भारत सरकारने निदान जेवायला तरी नीट वेळ द्यावा.. 

(दुपारी पाठ टेकवताना) 

×××ला कंबरडं मोडतं का काय देव जाणे एखादं दिवशी…. टेकली एकदाची पाठ बाबा….. देवा.. 

(चहाच्या वेळी) 

कोणी एखादा कप चहा करुन देईल तर शपथ….. वॉकिंग करावं लागेल.. ढिगभर वजन वाढतंय… या वजनाचं एक काय करावं.. देव जाणे… 

(वॉक करताना) 

आताच फोन उरकून घ्यावेत, वॉकिंग टाईम पण लवकर संपतो….. 

एखादी बाई फास्ट वॉक करत असेल तर.. 

नाही जा अजून जोरात, करा वॉकिंग, मला काही फरक पडत नाही… कुणाकुणाला माधुरी दीक्षित बनायचंय? बना.. मला काही फरक पडत नाही.. 

(संध्याकाळी स्वयंपाक करताना) 

एखाद्या दिवशी पण कुणी म्हणत नाही.. 

आज काऽऽऽऽऽऽऽही करु नको.. 

अजिबात भूक नाही…. एवढी भूक लागतेच कशी माणसाला? 

(किचन आवरताना) 

नाही आवरतेना… मीच आवरते… सगळं मीच करते…. कुण्णी काही करु नका.. बसा सगळे सोफावर….. सिंहासन आणून देऊ का…?? 

(झोपताना) 

आता कुणीही माझ्या खोलीत टपकू नका तासभर….. जरा बघू द्या मोबाईल मला.. इतके मेसेज येतात, एक धड वाचून होत नाही…. 

(दुसऱ्याचे स्टेटस बघून) 

यांना बरा भटकायला वेळ मिळतो.. इथं मला मरायला फुरसत नाही….

काय बाबा, हल्ली तर कुणी काही पण कपडे घालतं…. 

(झोप आली असताना) 

झोपा बाबा आता…. पुन्हा पाचला उठायचं आहे….. सुट्टी नाहीये उद्या… परिक्षा चालू आहेत, वेळेच्या आधी तडमडावं लागेल.. 

(आणि मध्यरात्री जाग आल्यावर) 

बापरे, तीन वाजले…? दोन तासात उठायचंय… झोपा पटकन् थोडा वेळ..       

…….. 

लेखक : अज्ञात. 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आईचं गणित नेहेमीच कच्चं… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ आईचं गणित नेहेमीच कच्चं… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

जगातल्या तमाम लहान मोठ्या पोरांच्या आयांच गणित हे कच्चं असतं हे माझं ठाम मत आहे…मग ही आई ग्रामीण भागातील शेतकरी असो नाहीतर कॉर्पोरेट जगात मोठ्या हुद्द्यावर काम करणारी आई असो…दोघीही गणितात कच्च्या असतात हे मी सबळ पुराव्यानिशी सिध्द करू शकतो…

आता बघा परवाची गोष्ट…आमच्याचं घरातील हो…ही म्हाळसा एवढी इंजिनिअर झाली पण गणित कच्चं… परवा माझं बांगडू म्हणजे माझी कार्टी हो हॉस्टेलवर जायला निघाली… म्हाळसाने तिच्यासाठी सुक्यामेव्याचे पौष्टिक लाडू करून ठेवले होते …तो डबा तिच्या बॅगेत ठेवत ती पोरीला म्हणाली …” रोज एक लाडू सकाळी संपवायचाचं आहे, प्रत्येक दिवसाचा एक असे मोजून आठ लाडू दिलेत, ते रोज खाल्ले गेले पाहिजेत… ” 

पोरगी तिचं आवरता आवरता फक्त ‘हो हो’ म्हणत होती…मी आपलं सहज लाडू कसे आहेत हे बघायला पोरीच्या बॅगेतला तो डबा बाहेर काढून उघडला तर त्या डब्यात जवळपास बारा तेरा लाडू होते…आता ‘मोजून आठ लाडू दिलेत’ असं म्हणून डब्यात बारा तेरा लाडू कसे?…आता मला सांगा आहे की नाही म्हाळसाईचं गणित कच्चं…?

अजून एक किस्सा सांगतो… आमच्या सोसायटीत एक आत्राप कार्ट बागेत खेळत होतं… त्याचा नुसता उधम चालला होता…IT मध्ये उच्च पदावर काम करणारी त्याची आई ऑफिसातून नुकतीच सोसायटीत आली होती…पोराला खेळताना बघून ती थबकली…आई पोराची गळाभेट झाली, मग जरावेळ पप्प्यापुप्प्या, शोन्यामोन्या, लाडेगोडे वगैरे झाले अन क्षणात ते पोरगं पुन्हा उच्छाद मांडायला पसार झाले आणि त्याच्या मागे ही आई उगाचंच आरडाओरडा करत त्याच्या मागे मागे गेली…’हे नको करू ते नको करू…असं नको करू, तसं नको करू’…अशा तिच्या हजार सूचना सुरू होत्या पण पोरगं काय ऐकेना… मग त्या पोराच्या आईने शेवटचं हत्यार काढलं…

” रोहन आता तू माझं ऐकलं नाहीतर तुला दोन सटके वाजवली हां…” त्या आईने दम भरला… बहुदा त्या पोराला आईच्या कच्च्या गणिताची कल्पना असावी…ते काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हतं…आता फटाके वाजलेले बघायला मिळणार म्हणून मी ही थबकलो, …पण ते पोरगं स्वतःच्याच धुंदीत मस्त खेळत होतं आणि इकडे त्याच्या आईने ‘ तू ऐकलं नाहीतर तुला चार सटके वाजवील’  हे वाक्य दहा बारा वेळा म्हंटल, एकदा हातही वर उचलला पण एक साधा सिंगल सटका काही वाजवला नाही…बघा आहे की नाही आईचं गणित कच्चं?…

अशा रोजच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जाणवतं की आईचं गणित हे कच्चंच असतं…

“डब्यात दोन पोळ्या, भाजी, वरण भात दिलाय…चटणीही आहे,  वेळेत डबा खाऊन घे ” असे आई म्हणत असताना कॉलेजला जाणाऱ्या पोराच्या डब्यात तीन पोळ्या कशा असतात यावरूनच कळतं त्या आईच गणित कच्चं असतं…

” तुझ्या पर्स मध्ये दोन हजार ठेवलेत ” कॉलेजात जाणाऱ्या पोरीला असे एक आई म्हणतं असताना पर्स मध्ये पाचशेची एक नोट जास्त का निघते यावरून कळतं आईचं गणित कच्चं असतं…

” सकाळी एकदाचं उठविल, पुन्हा उठवणार नाही तुला कॉलेजला जायला उशीर झाला तू जबाबदार ” रात्री झोपायला जाताना अशी तंबी देणारी आई सकाळी दहा वेळा पोराला उठवायला जाते तेंव्हा कळतं आईच गणित कच्चं असतं…

पोरीला शॉपिंगला नेताना ” पाच हजाराच्या वर एक रुपया देणार नाही…” अशी धमकी देणारी आई जेंव्हा पोरीवर दहा हजार उधळून घरी येते तेंव्हा कळतं आईचं गणितं खूपच कच्चं आहे…

” भूक नाही म्हणजे काय?…चल दोन पराठे खाऊन घे…” अशी दमदाटी करून दोन पराठे खायला घालून पुन्हा तिसरा पराठा बळेबळेचं वाढताना ” छोटे छोटेचं आहेत खाऊन घे गपचूप ” अशी बतावणी करते ना त्यावेळी त्या पराठ्याच्या आकारावरून कळतं आईचं गणितंचं नाही तर भूमितीही कच्चं आहे…

सकाळी शाळेत गेलेलं पोरगं रोज बरोबर अकराच्या ठोक्याला स्कुलबस मधुन घरी येतं हे माहीत असूनही ती आई दहा वाजल्यापासून बाल्कनीत चार चकरा मारते ना तेंव्हा कळतं आईचं गणित कच्चं आहे…

” जास्त आवाज केला तर अशा उलट्या हाताच्या चार झापडी ठेऊन देईल ना…” असं म्हणून एकही झापड न मारणारी आई जेंव्हा चुकून रागाने दोन चापटी पोराच्या पाठीवर मारते अन मग स्वतःच डोळ्यातून दोनशे अश्रू गाळते ना तेंव्हा कळतं आईच्या गणिताची अवस्था फारच बिकट आहे…

जगाच्या पाठीवर कोठेही जा आईचं गणित कायम कच्चचं असतं पण त्याचं आईचं प्रेम, माया, ममत्व हे मात्र अगणित असतं…ते मात्र पक्कं असतं…

जगातील सर्व मातांना समर्पित …

संग्रहिका : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चालणे म्हणजे दुसरे हृदय… ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ चालणे म्हणजे दुसरे हृदय… ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले 

आपल्या पायाच्या पोटरीच्या स्नायूंना जर आपले ” दुसरे हृदय ” म्हटले तर ती अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही.

सर्वांना हृदयाचे कार्य काय असते ते ठाऊक असेलच….. हृदय म्हणजे शरीरातील एक पंप आहे. हा पंप रक्ताला पुढे पुढे ढकलत राहतो आणि त्यामुळे रक्त शरीरात धमण्या आणि नीला याच्यातून गोल गोल फिरत राहते, ते एका ठिकाणी साचून राहत नाही.

पण शरीरात आणखीही एक पंप कार्यरत असतो. होय. खर आहे. आपले पोटरीचे स्नायू हेच आपले दुसरे हृदय आहे… हृदयाचे काम काय तर रक्त वाहिन्यांच्या जाळ्यातून सतत वाहते ठेवणे. यालाच रक्ताभिसरण असे म्हणतात. रक्त असे गोल गोल सतत वाहत ठेवणे अत्यंत जरुरी आहे. तसे न झाल्यास आणि जर रक्त एकाच ठिकाणी साचून राहिले, तर शरीरातील अवयवांना रक्त पुरवठा होणार नाही आणि रक्ताच्या गुठळ्या बनून त्या प्राणघातक ठरू शकतात. हृदयाला शरीरात रक्त फिरते ठेवण्यास पायाच्या पोटरीचे स्नायू मदत करतात. जेव्हा आपण चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात आणि स्नायूतील रक्तवाहिन्यांमध्ये असलेले रक्त हृदयाच्या दिशेने ढकलून दिले जाते. निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच तशी केलेली आहे.

पायाच्या पोटरीमधील रक्त वाहिन्या ( नीला ) या एका प्रकारे रक्ताचा साठा करण्याचे काम करतात.

त्यांना ” मसल विनस सायनस असे ” म्हणतात. ज्यावेळी पायाचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी पायात साठलेले रक्त नीलांमधून वर, म्हणजे हृदयाच्या दिशेने ढकलले जाते. या पायांच्या रक्त वाहिन्यामध्ये विशेष प्रकारच्या झडपा असतात. या झडपा रक्त वाहण्याची दिशा ठरवितात. या झडपा, रक्ताला पायाकडून हृदयाकडे जाऊ देतात, परंतु हृदयाकडून पायाकडे जाऊ देत नाहीत. आपण उभे असताना गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे रक्त हे खालच्या दिशेनेच जाण्याचा प्रयत्न करणार हे साहजिकच आहे. या झडपा, गुरुत्वाकर्षणामुळे रक्त पायात साचू देत नाहीत आणि रक्ताला हृदयाच्या दिशेने जाण्यास भाग पाडतात. आपण जेव्हा चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात व हृदयास रक्ताभिसरण करण्यास मदत करतात.

घोट्याखालचा जो पाय असतो त्यात देखिल काही प्रमाणात रक्ताचा साठा केला जातो. आपण ज्यावेळी चालतो, त्यावेळी सर्वप्रथम तळपायातील स्नायू आकुंचन पावल्याने तेथील रक्त वर हृदयाच्या दिशेने ढकलले जाते, नंतर जेव्हा पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी सर्व रक्त गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने आणखी  पुढे ढकलले जाते आणि हृदयापर्यत पोहोचते. रक्त वाहिण्यातील झडपा रक्ताला खाली येण्यापासून रोकतात. आपण एकाच ठिकाणी खूप वेळ स्तब्ध बसून राहिलो ( विमानात, कारमध्ये, खुर्चीत   बरेच तास ) तर पोटरीचे स्नायू आकुंचन पावू शकत नाहीत. रक्त पायातच साचून राहते आणि रक्ताच्या गुठळ्या (DVT, Deep Vein Thrombosis) होण्याची शक्यता वाढते. म्हणून चालणे व पळणे किती महत्त्वाचे आहे ते कळते. 

एखादा रुग्ण खूप दिवस अंथरुणात खिळून राहिला तर त्याला DVT होऊ शकते. याचा अर्थ त्याच्या पायाच्या रक्त वाहिन्यामध्ये रक्ताच्या गाठी होतात. त्यामुळे पायाच्या पोटऱ्या दुखतात, तसेच सूज देखिल येते. अश्या प्रकारच्या रक्ताच्या गाठी पायातून निसटून फुप्फुसात जाऊन फसू शकतात, ज्याने जीवाला धोका उद्भवू शकतो.

जर पोटरीतील झडपा कोणत्याही कारणाने खराब झाल्या तरी देखील पाय दुखू शकतात. झडपा खराब झाल्या की रक्त पायात साचून राहते. पाय जड होणे, थकवा, पाय ठसठसणे, घोट्यात सूज, फुगलेल्या पायाच्या नसा, पायात अचानक चमक येवून दुखणे, खाज येणे, चमडीचा रंग बदलणे, पायात बरी न होणारी जखम होणे, इत्यादी त्रास होऊ शकतो.

थोडक्यात काय –- हे सगळे त्रास टाळायचे असतील तर …. चालत रहा, शक्य असल्यास धावत रहा.

निरोगी आणि सुदृढ रहा.

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वय असतं का पावसाला? ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

वय असतं का पावसाला? ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

असतं की…….

मऊ दुपट्यात आईच्या खांद्यावरून बघताना पाऊस एक वर्षाचा असतो.

वाजणारे बूट मुद्दाम डबक्यात आपटत चालताना पाऊस चार वर्षाचा असतो..

शाळेतून येताना छत्री मुद्दाम वाऱ्याच्या दिशेने धरून उलटी करताना पाऊस बारा वर्षाचा असतो..

ट्रेकिंग करताना चिंब भिजल्यावर टपरीवर चहा पिताना पाऊस टीन एज ओलांडत असतो..

तिला पाऊस आवडतो, रिमझिम गिरे सावन वगैरे गाणी ऐकताना अपरिहार्यपणे पाऊस गद्धे पंचविशीत असतो.

भिजायला नको वाटायला लागलं की पन्नाशी येते पावसाची..

गुडघे दुखू लागले की साठीशांत होते पावसाची..

नंतर नंतर पाऊस  मफलर कानटोपी गुंडाळून काठीच घेतो हातात आणि नातवंडांना ओरडतो….

….  “ अरे भिजू नका रे पावसात…… “ 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कपाळावर बुक्का लावलाय तो पुसून टाका”! ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “कपाळावर बुक्का लावलाय तो पुसून टाका”! ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

तिरुपतीच्या देवळात विद्वान ब्राह्मण श्रीनाथशास्त्री नित्यनेमानं रोज विष्णूसहस्त्रनामाचं पठण करीत बसत असत. शास्त्रीबुवा अत्यंत गरीब होते.घरात अठरा विश्व दारिद्र्य नांदत होतं. मुलांच्या अंगावरचे कपडे फाटलेले असत.शास्त्रीबुवांची पतिव्रता पत्नी ठिकठिकाणी विरलेल्या,फाटलेल्या लुगडयाला गाठी मारून नेसायची.रोजचं दारिद्र्य ते कसंबसं सहन करायचे.पण सणवार आले, दिवाळी आली की दारिद्रयाचे हे कांटे त्याना अधिकच रक्तबंबाळ करू लागायचे !आस-पास,शेजारी-पाजारी दिवाळीची रोषणाई व्हायची. घरा-घरातली बायका-मुलं को-या कपडयांत वावरायची.पण शास्त्रीबुवांची बायको-मुलं मात्र फाटक्या कपडयात हिंडायची ! संस्कारित असल्यामुळे ती आपल्या पित्याला दोष देत नसत.पण त्यांच्या मूक नजरेतील आर्तता श्रीनाथशास्त्रींच्या हृदयाला पिळवटून,भेदून जात असे. त्यांची पत्नीही त्याना एका शब्दानं कधी बोलत नसे.पण आपल्या देहावर असलेल्या लुगडयाच्या गाठीकडे ती अतीव दयनीयतेनं पहात असे.त्यावेळीही शास्त्रीबुवाना अत्यंत अपराध्यासारखं होई.

आजचा दिवसही सणाचा,दिवाळीचा होता !

घरातल्या दारिद्र्याच्या दर्शनाला कंटाळून पहाटेपासूनच श्रीनाथशास्त्री तिरुपतीच्या मूर्तीसमोर बसून विष्णूसहस्त्रनामाचं एक एक नाम वाचत होते. वाचता वाचता हळू हळू त्यांचा कंठ दाटून आला.तिन्हीसांज व्हायला आली तरी पुढयातल्या पाटावर फक्त दोन तीन मूठ तांदूळ जमा झाले होते .मुलं सकाळपासून उपाशी होती.आणि रात्रीच्या जेवणासाठी हे जमलेले तांदूळ कुणाच्याही दाती-ओठी लागण्यासारखे मुळीच नव्हते.

शास्त्रीबुवांच्या मनात विचार आला,’इतकी वर्षं आपण उपाशीपोटीसुद्धा परमेश्वराच्या नामस्मरणात कधी ना खंड पडू दिला,ना कधीही आपलं चित्त विचलीत होऊ दिलं ! पण आज अस्वस्थ का वाटतंय ? परमेश्वर दयाळू असतो,असं म्हणतात.मग त्याला आपली परिस्थिती का कळू नये ?आपल्यावर दया दाखवावी, असं का वाटू नये ?की परमेश्वर दयाळू आहे ही अफवाच आहे ?होय.तसंच असलं पाहिजे.तसं नसतं तर अनेक वर्षं आपणास एवढे हलाखीचे दिवस पहावे लागले नसते.’

विचार करता करता शास्त्रीबुवांचे डोळे भरून आले.

पुढ्यातल्या पोथीवर अश्रुंचे थेंब टपटप पडत होते.त्यातला एक अश्रू पोथीतील एका शब्दावर नेमका पडला ! शास्त्रीबुवांनी डोळ्यातील पाण्याच्या पडद्याआडून त्या शब्दाकडे निरखून पाहिलं.तो शब्द होता ”दयाघन” !

त्या शब्दाकडे बघून श्रीनाथशास्त्री उपहासानं हसले.

जवळच एक कोळश्याचा तुकडा पडला होता.तो त्यांनी उचलला आणि त्या ”दयाघन” शब्दावर फुली मारली !

त्याचवेळी श्रीनाथशास्त्रींच्या घरी कोणती घटना घडत होती, याची त्यांना सूतरामही कल्पना नव्हती.

त्या तिन्हीसांजेला श्रीनाथशास्त्रींच्या घरासमोर डोक्यास काठेवाडी पद्धतीची पगडी बांधलेला,सतेज चेह-याचा तरूण येऊन उभा राहिला होता. त्यानं आपल्यासमवेत आठ-दहा बैलगाड्या भरभरून सामान आणलं होतं. ते सर्व सामान त्यानं शास्त्रीबुवांच्या घरासमोर उतरवलं. शास्त्रीबुवांच्या पत्नीजवळ त्यानं एक मखमली कापडाची थैली दिली.त्या थैलीत सुवर्णमुद्रा होत्या.निघताना त्या तरुणानं शास्त्रीबुवांच्या पत्नीजवळ कसलासा निरोप दिला.

श्रीनाथशास्त्री अजून तिरुपतीच्या देवळातच बसलेले होते. अश्रूंनी पुढ्यातील पोथी भिजत होती.

इतक्यात त्यांच्या डोळ्यांसमोर नव्या-को-या कपड्यांतील त्यांची मुलं येऊन उभी राहिलेली दिसली.शास्त्रीबुवांना आश्चर्यच वाटलं. आपल्या मुलांनी हे नवेकोरे कपडे कुठून आणले असतील ? ह्या प्रश्नानं ते साशंक होत,

मुलांच्या अंगावर ओरडले,

” काय रे ! कोणी दिले हे कपडे ? कुठून चोरून-बिरून आणलेत की काय ?”

दरिद्री माणसाला वैभव नेहमी पाप केल्याशिवाय मिळत नाही,असंच वाटत असतं ; त्यामुळे चोरी केल्याशिवाय आपली मुलं नवे कपडे घालणारच नाहीत,असं क्षणभर का होईना,पण गृहीत धरल्यामुळं श्रीनाथशास्त्री ओरडले होते. पण मुलं खुशीत असल्यामुळे पित्याच्या ओरडण्याला न घाबरता ती उत्तरली,

” बाबा,इथे काय बसून राहिलात ? लवकर घरी चला !

आपल्या घरी खूप मज्जा मज्जा झालीय !”

श्रीनाथशास्त्री घाईघाईनं निघाले.

घरी येऊन पहातात तर काय? घरभर दिवे तेजाळत होते.सर्वत्र उदबत्ती-धुपाचा सुवास दरवळत होता.एवढे दिवे लावायला तेल आलं कुठून ?विचार करत असतानाच, नवं कोरं रेशमी लुगडं नेसलेली त्यांची पत्नी त्यांच्या स्वागताला आली. सुवर्णालंकारांनी ती सजली होती.शास्त्रीबुवा तिच्याकडे पहातच राहिले. त्यांनी विस्फारित नजरेनंच तिला विचारलं,”एवढं सगळं वैभव अचानक आलं कोठून ?”

” काठेवाडहून बाराबंदी घातलेला एक व्यापारी आला होता.त्यानं आपल्या घराचा पत्ता विचारला.आणि आपल्याबरोबर आणलेलं हे सगळं सामान तो ठेवून गेला.जाताना तुम्हाला एक निरोप देऊन गेलाय.”

शास्त्रीबुवांच्या पत्नीनं जे घडलं ते सांगितलं.

” काय निरोप दिलाय ?”

श्रीनाथशास्त्रींनी अत्यंत उत्कंठतेनं विचारलं.

” त्यानं निरोप दिलाय की..

‘शास्त्रीबुवांना म्हणावं पोथी वाचता वाचता कोळशानं माझ्या कपाळावर त्यांनी जो बुक्का लावलाय तो पुसून टाका !’…

कुणाला बुक्का लावलाय तुम्ही ?”

पत्नीनं गोंधळून विचारलं.

क्षणार्धात श्रीनाथशास्त्री सदगदीत झाले.

पत्नीच्या प्रश्नाचं उत्तर न देता,कमालीच्या घाईघाईनं ते देवळात परत आले. त्यांनी पाटावरची पोथी उचलून घट्ट हृदयाशी धरली.हळूवार उघडली.आणि पानावरच्या ”दयाघन” या शब्दावर मारलेली कोळशाची फुली त्यांनी अलगद पुसून टाकली.

पुढच्याच क्षणी पोथी हृदयाशी कवटाळलेल्या श्रीनाथशास्त्रींची पावलं घराच्या दिशेनं सावकाश पडू लागली.

श्रद्धा !

श्रद्धा असली म्हणजे  जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते..

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दुःखाना जबाबदार कोण?… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ दुःखाना जबाबदार कोण? ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

एक महिला दररोज मंदिरात जायची.  एके दिवशी बाईंनी पुजाऱ्याला सांगितले, की आता मी मंदिरात येणार नाही.

यावर पुजाऱ्याने  विचारले – का?

मग ती बाई म्हणाली – मी लोकांना मंदिराच्या आवारात त्यांच्या फोनवर त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलताना बघते. काहींनी गप्पा मारण्याचे ठिकाण म्हणून मंदिराची निवड केली आहे.  काही लोक पूजा, होम हवन प्रामाणिक  पणे कमी करतात, आणि देखावा अधिक!

यावर पुजारी काही काळ गप्प राहिला आणि नंतर म्हणाला – ते बरोबर आहे!  पण तुमचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, मी जे सांगतो त्यासह तुम्ही काही करू शकता का!

बाई म्हणाल्या – तुम्ही मला सांगा. काय करावे?

पुजारी म्हणाले – एक ग्लास पाणी भरा आणि मंदिराच्या आवारात दोनदा प्रदक्षिणा करा.  अट अशी आहे की त्या ग्लासातील पाण्याचा एकपण थेंब खाली पडता कामा नये.

बाई म्हणाल्या – मी हे करू शकते.

मग थोड्याच वेळात त्या बाईने तेच केले.  त्यानंतर मंदिराच्या पुजारीने महिलेला 3 प्रश्न विचारले –

  1. तुम्हाला कोणी फोनवर बोलताना दिसले का?

   2. तुम्हाला मंदिरात कोणी गप्पा मारताना  दिसले का?

  1. तुम्हाला कोणी देखावा करताना दिसले का?

बाई म्हणाली – नाही मी काही पाहिले नाही!

मग पुजारी म्हणाले – जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करत होता, तेव्हा तुमचे सर्व लक्ष ग्लासावर होते, जेणेकरून त्यातून पाणी पडू नये.म्हणून तुम्हाला काहीही दिसले नाही.

आता जेव्हाही तुम्ही मंदिरात याल, तेव्हा तुमचे लक्ष फक्त परमपिता परमात्म्याकडे केंद्रित करा, मग तुम्हाला काहीही दिसणार नाही.  सर्वत्र फक्त देवच दिसेल.

आयुष्यातील दुःखांना कोण जबाबदार आहे? देव आहे? कुंडली आहे ? की तुम्ही स्वतः आहात ?

अरे! देव नाही ,

  गृहनक्षत्र किंवा कुंडली नाही,

  नशीब नाही,

  नातेवाईक नाहीत,

  शेजारी नाहीत,

  सरकार नाही,

तुम्ही स्वतः जबाबदार आहात.

 1) तुमची डोकेदुखी फालतू विचारांचा परिणाम आहे.

 2) तुमची  पोटदुखी , तुमच्याच चुकीच्या खाण्याचा परिणाम आहे.

 3) तुमचे कर्ज तुमच्या हावरटपणामुळे होणाऱ्या जास्त खर्चाचा परिणाम आहे.

 4) तुमचे कमकुवत शरीर/वाढलेली  चरबी / आणि आजारी शरीर, तुमच्याच चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे.

 5) तुमच्या कोर्ट केसेस, तुमच्या असलेल्या अहंकाराचा परिणाम आहे.

 6) तुमच्यातील अनावश्यक वाद, तुम्ही नको तिथे जास्त आणि व्यर्थ बोलण्याचा परिणाम आहे.

वरील कारणांखेरीज शेकडो कारणे आहेत , ज्यामुळे तुम्ही नाराज किंवा दुःखी असता. दोष मात्र विनाकारण इतरांना देत राहता. 

यामध्ये कोठेही देव दोषी असत  नाही.

जर आपण या दुःखांच्या कारणांचा बारकाईने विचार केला तर आपल्याला आढळेल की कुठेतरी आपला मूर्खपणा त्यांच्यामागे आहे.

म्हणून योग्य निर्णय घ्या आणि त्यानुसार तुमचे आयुष्य निरोगी  आणि सुखी समृद्धी होवो!

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘काळा ठिपका…’ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘काळा ठिपका…’ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

कॉलेजमधील एका  प्राध्यापकांनी एके दिवशी वर्गावर आल्यावर अचानक जाहीर केले-

“आज मी तुमची सरप्राईज टेस्ट घेणार आहे.”

असे म्हणून प्राध्यापकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका दिली. ती हातात पडताच जवळपास सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. काहीजण तर पूर्ण बावचळून गेले. कारण प्रश्नपत्रिका पूर्ण कोरी होती.

कसलेच प्रश्न त्यावर नव्हते. फक्त त्या पेपरच्या मध्यभागी एक छोटा काळा ठिपका होता.

प्राध्यापक म्हणाले,

“आश्चर्य वाटून घेऊ नका. तुम्हाला पेपरवर जे काही दिसतंय त्यावर दहा ओळी लिहायच्या आहेत.”

मुलांनी मग जमेल तसे उत्तर लिहिले. सगळ्यांचे लिहून झाल्यावर प्राध्यापकांनी पेपर गोळा केले आणि एकेकाची उत्तरपत्रिका मोठ्याने वाचायला सुरुवात केली.

कुणी लिहिले होते, तो ठिपका म्हणजे मी आहे, माझे जीवन आहे, तर कुणी भौमितीकरीत्या लिहिले होते की, पेपरच्या मध्यभागी एक काळा ठिपका आहे. त्याचा व्यास अमुक तमुक मिलीमीटर असावा वगैरे वगैरे !

सगळे झाल्यावर प्राध्यापक म्हणाले,

“दुर्दैवाने तुम्ही सर्वजण नापास झालेले आहात.”

सर्वजण दचकले.

मग प्राध्यापक सांगू लागले,

“सर्वांनी एकाच दिशेने विचार केला आहे. सर्वांचा फोकस त्या काळ्या ठिपक्यावरच होता. ठिपक्याभोवती खूप मोठा ‘पांढरा’ पेपर आहे, हे मात्र कुणीच लिहिले नाही.”

आपल्या जीवनात देखील असेच होते. आपल्याला खरेतर जीवनरुपी खूप मोठा पांढरा पेपर मिळालेला असतो. ज्यात आनंदाचे रंग किंवा शब्द भरायचे असतात. पण आपण ते न करता केवळ काळ्या ठिपक्याकडे पाहतो.

जीवनातल्या अडचणी, मित्र मैत्रिणी सोबतचे वाद गैरसमज, घरातील विसंवाद हे सगळे ते काळे ठिपके असतात.

आपण त्यावर फोकस करतो आणि ‘खूप मोठा पांढरा’ पेपर हातात आहे याकडे दुर्लक्ष करतो.

खरेतर एकूण पांढऱ्या पेपरच्या आकारापेक्षा तो काळा ठिपका तुलनेने खूप लहान असतो. पण तरी आपण त्यातच गुंतून पडतो. आणि मोठा पांढरा भाग दुर्लक्षित राहतो.

म्हणून यापुढे काळा ठिपका न पाहता पांढरा पेपर पाहायला शिका!

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कधी कधी मला वाटतं… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ कधी कधी मला वाटतं… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे

कधी कधी मला वाटतं

विद्यार्थी व्हावं अन्

विंदा मास्तरांच्या वर्गात बसावं

‘कोणाकडून काय घ्यावं..’

ते त्यांनी शिकवावं.

वर्गातून बाहेर पडताना 

विंदांकडून कवितेची

हिरवी पिवळी शाल घ्यावी

आयुष्यभरासाठी समाधानाने

अंगावर ओढून घ्यावी. ।। १ ।।

 

कधी कधी मला वाटतं

साने गुरुजींच्या वर्गात बसावं

श्यामची आई लिहिणाऱ्या

प्रेमळ श्यामला अनुभवावं.

त्यांच्या डोळ्यातलं

अपार प्रेम, माया अनुभवावी.

‘खरा तो एकची धर्म’

शिकवण त्यांच्याकडून घ्यावी. ।। २ ।।

 

कधी कधी मला वाटतं

बोरकरांच्या वर्गात बसावं

त्यांचे सागरासारखे

सागरापरी गहिरे डोळे अनुभवावे

जे ‘जीवन त्यांना कळले हो’ 

ते मलाही शिकवाल का विचारावं. ।। ३ ।।

 

कधी कधी मला वाटतं

कुसुमाग्रजांच्या वर्गात जावं

‘कशास आई भिजविसी डोळे’

त्यांच्याकडून ऐकावं

रात्रीच्या गर्भातील उषा:कालाची

आशा जागवीत निघावं.

पाठीवर तात्यासाहेबांचा हात असावा

‘लढ रे पोरा…’ ऐकताना

‘कणा’ ताठ व्हावा. ।। ४ ।।

 

कधी कधी मला वाटतं

शांताबाईंकडे जावं

ऋतू हिरवा, ऋतू बरवा

कुठे भेटला जाणून घ्यावं. ।। ५ ।।

 

माझे जीवनगाणे लिहिणाऱ्या

पाडगावकरांच्या वर्गात

एक चक्कर मारावी

विचारावं त्यांना…

व्यथा असो आनंद असो

तुम्ही गात कसे राहता

आनंदाच्या रसात न्हात कसे राहता

त्यांच्या चष्म्याआडच्या

प्रेमळ, मिश्किल डोळ्यात

खोल खोल डोकावून बघावं

‘शतदा प्रेम करावे’चं

रहस्य समजून घ्यावं. ।। ६ ।।

 

कधी कधी मला वाटतं

ग्वाल्हेरला तांब्यांकडे जावं

‘कळा ज्या लागल्या जिवा…’

त्या जीवाला भेटावं

दिवसभर त्यांच्याजवळ राहावं

पहाटे त्यांच्याकडून

‘घनतमी राज्य करणाऱ्या शुक्राला’ बघावं

‘ते दूध तुझ्या त्या घटातले’चा गोडवा

त्यांच्याकडूनच अनुभवावा.

सायंकाळी त्यांच्यासोबत

‘मावळत्या दिनकराला’ प्रणाम करावा.

‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या…’

ऐकताना पुन्हा भेटण्याचं

‘देई वचन मला…’ म्हणावं. ।। ७ ।।

 

कधी कधी वाटतं

जावं बालकवींच्या गावा

पाय टाकुनी जळात बसलेला

तो ‘औदुंबर’ अनुभवावा.

‘सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुन घ्यावे’

‘आनंदी आनंद गडे’च्या सड्यात

न्हाऊन निघावे. ।। ८ ।।

 

कधी कधी वाटतं

सुरेश भटांना गाठावं

‘चांदण्यात फिरताना’

त्यांच्याशी संवाद साधावा

दुभंगून जाता जाता

मी अभंग कसा झालो

त्यांच्याकडून ऐकावं. ।। ९ ।।

 

कधी कधी मला

असं खूप काही वाटतं

कवी आणि कविता यांचं प्रेम

हृदयात दाटतं.

कवी असतात

परमेश्वराचेच दूत

घेऊन येतात प्रतिभेचं लेणं

तुमच्या माझ्यासाठी

ते असतं

नक्षत्रांचं देणं.।। १० ।।

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उतराई… ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆  उतराई… ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित

एक गृहस्थ लहानपणी अतिशय गरीब होते.पुढे जीवनात ते अतिशय यशस्वी झाले. श्री गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाला आले असता ते म्हणाले, ” महाराज, माझ्या अपेक्षेबाहेर माझी जी भरभराट झाली, ती माझी कर्तबगारी नाही. भगवंताच्या कृपेनेच ती झाली, यात शंका नाही. आता काय केल्याने मी त्याचा उतराई होईन?” हा प्रश्न ऐकून श्रीमहाराज प्रसन्न झाले व त्यांना म्हणाले, “आपल्यावर ज्याने उपकार केले, त्याच्याजवळ जी वस्तू नाही, ती त्याला देणे म्हणजेच खऱ्या अर्थाने उतराई होणे होय. जी वस्तू त्याच्यापाशी आहे तीच त्याला देण्यात फारसे स्वारस्य नाही. सर्व दृश्य वस्तूंची मालकी मूळ भगवंताचीच असल्याने दृश्य वस्तू  त्याला देणे म्हणजेच त्याचेच त्याला दिल्यासारखे आहे. त्याच्यापाशी नाही अशी एकच वस्तू आहे, ती म्हणजे त्याला स्वतःचे स्वतःवर प्रेम करता येत नाही. आपण त्याच्यावर मनापासून प्रेम केले म्हणजे त्याच्यापाशी नसलेली वस्तू त्याला दिल्यासारखे होते. भगवंतावर मनापासून प्रेम करणे शक्य होण्यासाठी त्याला शरण जावे. शरणांगती साधण्यास, मी कोणीही नाही ही भावना निर्माण झाली पाहिजे. ती नामस्मरणाने निर्माण होते. म्हणून मनापासून नाम घेण्याचा अभ्यास करावा”.

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माफक अपेक्षा… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

माफक अपेक्षा ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

एका निवांत क्षणी भावुक होऊन तिला त्याने विचारलं…”काही हवंय का तुला?”

अशा अनपेक्षित प्रश्नाने ती दचकली.40 वर्षाच्या संसारात साधं पाणीही न विचारलेला माणूस आज का असं विचारतोय?

कारण आज त्याला जाणीव झाली…. आपल्या जीवनाची नौका किती सहजपणे पार झाली, या भ्रमातून सुटून त्या नौकेची नावाडी त्याची बायको होती, याची जाणीव.

डोळ्यावरचा चष्मा सुरकुतलेल्या कानामागे सरकवत ती म्हणाली,

“हो, खूप काही हवं होतं. पण योग्य वेळी.आता या वयात काय मागू मी?

लग्न झालं आणि या घरात आले, हक्काचा माणूस म्हणून फक्त तुम्ही जवळचे होता. पण तुम्हाला ना कधी बोलायला सवड,ना माझ्यासोबत वेळ घालवायची आवड.सतत आपले मित्र, नातेवाईक आणि भाऊ बहीण…आपल्याला एक बायको आहे.तिच्या काही मानसिक गरजा आहेत,हे तुम्ही ओळखून मला तुमच्याकडून मानसिक ऊब हवी होती.

घरातली कामं करून दमायचे, आल्या गेल्याचं जेवण, नाष्टा, पाणी, त्यांचा मुक्काम.. अंगावर ओढून घ्यायचे.कितीतरी स्वप्नं पाण्यावर सोडायचे, आजारपण अंगावर काढायचे, जीव नकोसा व्हायचा, पण संसाराचे नाव येताच त्राण परत आणून पुन्हा सज्ज व्हायचे.

त्यावेळी गरज होती मला. दोन शब्दांनी फक्त विचारपूस केली असती, तर पुढची चाळीस वर्षं जोमाने आणि आनंदाने  जबाबदाऱ्या पार पाडल्या असत्या.

तुमच्या घरात जेव्हा सर्वजण एका बाजूला राहून माझ्यावर खापर फोडायचे, मला एकटं पाडायचे, तेव्हा मला गरज होती ती तुमची. तुम्ही मात्र तटस्थ.तेव्हाची झालेली जखम आजतागायत मनावर ओली आहे. वेळ निघून गेली, आता कशी पुसणार ती जखम?

गर्भार असतांना माझ्या आई- वडिलांवर जबाबदारी टाकून मोकळे झालात, पण माझे डोहाळे पुरवायचे तुमच्याकडून राहून गेलेत..त्या नऊ महिन्यांत तुम्ही माझ्यासोबत वेळ घालवावा,आपल्या बाळाशी बोलावं…हे हवं होतं मला तेव्हा.आज काय मागू मी?

माझंही शिक्षण झालं होतं, मलाही काहीतरी करून दाखवायचं होतं. तेव्हा प्रेरणा हवी होती, आधार हवा होता तुमचा.आज सगळं संपून गेल्यावर काय मागू मी?

मुलांमागे धावताना, त्यांच्यासाठी आयुष्य ओवाळून टाकताना तुम्ही माझा भार जरा हलका करावा हे हवं होतं मला, तेव्हा शरीराची जी झीज झाली त्याचे व्रण अजूनही तसेच आहेत…आज ती वेळ निघून गेल्यावर कसे पुसणार ते व्रण?

संसाराच्या नावाखाली झालेला अन्याय मी पदराआड लपवला…तुम्हाला कसली शिक्षाही नाही मिळणार.मी कोण तुम्हाला शिक्षा देणारी? पण एका स्त्रीचं आयुष्य तुम्ही तुमच्या गरजेखाली पणाला लावत तिचं आयुष्य व्यर्थ घालवलं, याची नोंद मात्र त्या विधात्याकडे अबाधित असेल…

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares