‘ चांदण्यांचं खळं ‘ या सदरात श्रीअभिजीत साळुंखे यांनी दिलेले ग्रामीण लेखन. सीतामाईचे वनवासी जीवन हे स्त्री जीवनाच्या त्रासाचे मूळ आहे असे या महिलांना वाटते, हे या शब्दांमधून जाणवते. भाषेचा बाज पूर्ण ग्रामीण, ओवी रचनेत आहे. ….
न्हवायिळा ग राम बाई चैताचा गारयीवा
सीता ग मालनीचा रख रख वैशाखी जारयिवा
….. चैत्र पालवीच्या गारव्यात रामाचा जन्म झाला तर वैशाख शुद्ध नवमीला वैशाखाच्या उन्हात सीतामाईचा शेतात शोध लागला
आकाशाचा पाळणा खाली धरती मावली
नांगराच्या ताशी सीता जई- अभिव्यक्तीनकाला गावली
राम सीतेची जोडी लोक वाङ्मयात जानपद लोक घेतात ती एकरूप झाली आणि बाया बापण्यांनी आपली संसारीक सुख दुःख या भावभावनांची बिरुदं त्यांना लावून आपल्या आयुष्याशी जोडली.
कवसलीचा राम न्हाय शितंच्या तोलायाचा
शिता ग हिरकणी राम हलक्या कानायाचा
सीतेला तीन सासवांचा सासुरवास होता हे सांगताना म्हणतात-
कैकयी सुमती कवसला शितला तीन सासा
लेक धरतीची सीता त्यांनी धाडला वनवासा
शितला सासुरवास केला ग केशोकेशी
सयांस्नी वाटून दिला तिने गं देशोदेशी
बायांचा जाच हा सीतेचाच वाण-वसा असं त्या मानतात.
वनवास आला शितंसारख्या सतीला
बारा वर्ष झाली डुई धुतली नहिला
सासुरवासाचा फास शिते सारख्या सतीला
घडोघडी परीक्षा बाई जन्माच्या परतीला
रावणाच्या कैदेतून सुटल्यावरही तिला चारित्र्य शुद्धतेसाठी अग्नीपरीक्षा द्यावी लागली
सतीपणाचं सत्व दाह आगिनं इजल
सीता ग मालनिचं मन घडी घडी न झुंजल
गरोदर असतानाही तिच्याबरोबर कोणीही नव्हतं वार्ड चालू होती रडत होती
आटंग्या वनामध्ये कोण रडत ऐका
शीतंला समजावती बोरीबाभळी बायका…
सिता सतीला वनवास असा किती करतील
लवकुश पोटाला येतील सूड रामाचा घेतील
नंतर लवकुश्यासह सीतेचा स्वीकार केला आणि तिला आणायला लक्ष्मणाला रथ घेऊन पाठवला
लक्ष्मणदीर रथ सांगाती घेऊन
वहिनीला न्याया आला मुरळी होऊन
लक्ष्मण हाका मारी वहिनी चला व घराला
वाट बघती समधी डोळे लावून दाराला
सीता लव कुश बाळांना त्यांच्याकडे देऊन निश्चयाने म्हणते
‘आता कशाला जोडू बाई फिरून नातीगोती ‘
वर पडलाय जीव झाली आयुष्याची माती
वसर वसर माऊली माझे माय धरत्री
घेई लेकीला पोटात जीव निवू दे अंतरी
…. सीतेचं मातीत सापडणं आणि नंतर कौटुंबिक सुखदुःख भोगून फिरून मातीत जाणं याचा दुवा थेट आपल्या जगण्याबरोबर जोडून या मायमालयांनी मातीच्या लेकीने तिला आपल्या लोकगीतात लोकलयीनं अजरामर केलं.
लेखक : श्री अभिजित साळुंखे
माहिती संकलन : सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी
सातारा
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
लहानपणी गौरी गणपतीच्या दिवसांत पारिजातकाच्या झाडाखालची पांढरीशुभ्र, शेंदरी देठाची फुलं वेचताना आमची तारांबळ उडत असे. कोणाच्या परडीत, कमी वेळात जास्त फुलं जमतात, ह्याची जणू चढाओढच लागत असे. ‘माझी परडी’, ‘माझी फुलं’ ह्या’ मी’ पणाचा भारी अभिमान वाटे.
एकदा का ही फुलं देवाच्या चरणी अर्पण केली की मात्र ही फुलं, ‘माझी फुलं’ रहात नसून ‘त्याची फुलं’ होऊन जात. निर्माल्य होईपर्यंत ती त्याचीच फुलं बनून रहात. फुलांद्वारे ‘मी पणा’ देखील नकळत देवाला अर्पण होत असे.
खरंच, किती क्षणिक असते, मी पणाचे सुख! कळ्यांची फुलं होताना, ती अंगाखांद्यावर खेळवताना तो पारिजातकही अभिमानाने म्हणत असेल, ‘माझ्या कळ्या’ , ‘माझी फुलं’. पण एकदा का ही फुलं धरतीला अर्पण केली की होतोच की तोसुद्धा मीपणातून मुक्त!
आयुष्य देखील असंच असतं. ह्या क्षणभंगुर आयुष्यात माझं घर, माझे कपडे, माझे दागिने, हे किती काळ आपण मिरवणार असतो? एकदा का आपला नश्वर देह अनंतात विलीन झाला की ह्या माझेपणावर आपला काहीही हक्क उरत नाही. हे सगळं तत्त्वज्ञान माहीत असूनही आयुष्यात माझेपणाच्या मिठीतून केवळ वस्तूंनाच नव्हे, तर व्यक्तिंनादेखील सोडणं जमत नाही.
मुलाचं लग्न झालं, तरी आईला स्वतःला मुलापासून अलिप्त करता येत नाही. ‘तिचं घर’, ‘तिचा मुलगा’, ‘तिचा संसार’ सुनेच्या ताब्यात सोपवणं तिच्या ‘पझेसिव्ह’ स्वभावाला जमत नाही. सुनेचं स्वतःच्या वेळेनुसार उठणं, स्वतःच्या वेळेनुसार घर आवरणं सासूला बघवत नाही. सासूचा जीव स्वतःच्या संसारात गुंतलेला असतो. सासरच्या पद्धतीच नवीन सुनेने अंगीकाराव्यात अशी तिची मनोमन इच्छा असते.
वडील जेव्हा आपल्या व्यवसायात मुलाला सामावून घेतात, तेव्हा त्यांच्या पद्धतीनेच मुलाने व्यवसाय करावा असं त्यांना वाटतं. मुलाला त्याच्या कल्पनाशक्तीप्रमाणे व्यवसायाचा विस्तार करु देण्याइतकं अलिप्त त्यांना होता येत नाही.
आयुष्य जसं जसं पुढे जातं, तसा माणूस त्यात अधिकाधिक गुंतत जातो. गुंतण्यामुळेच कलह निर्माण होतात. सासू सुनेचं पटत नाही, बाप लेकात मतभेद होतात, आई मुलांत वाद होतात. आणि ह्या सर्व संघर्षांचं मूळ कारण असतं, ‘गुंतणं’.
आयुष्यात ‘सोडणं ‘जमलं पाहिजे. केवळ वस्तू अन् व्यक्तीच नव्हे, तर दुःख, भीती, यातना, वाईट आठवणी सुद्धा सोडता आल्या पाहिजेत. फुलं ज्याप्रमाणे परमेश्वर चरणी अर्पण केल्यावर ती त्याची फुलं होतात, त्याप्रमाणे दुःखसुद्धा परमेश्वर चरणी अर्पण करून आपल्याला त्यातून रितं होता आलं पाहिजे.
आयुष्य सुखदुःखाची झोळी आहे. दुःखं गाळता आली पाहिजेत. दुःखांना ‘डिलीट’ करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. लोभ, मोह टाळता यायला हवेत. आशेपासून दूर रहाता आलं, तर निराशेचं दुःख पदरी पडत नाही.
साध्या साध्या गोष्टीतून देखील मोह सुटत नाही. माझ्या फेसबुक पोस्टला ‘लाइक’ केलं पाहिजे. ‘व्हाॅट्स अॅप पोस्टवर कॉमेंट टाकली पाहिजे. माझ्या जवळच्या लोकांनी माझी पोस्ट शेअर केली पाहिजे असा हट्ट, माझ्या कामाचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे हा आग्रह, मी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे अशी इच्छा, अशा सगळ्या अपेक्षांना जेव्हा पूर्णविराम देता येईल, तेव्हा आपल्याला खऱ्या दृष्टीने अलिप्त होता आलं, असा त्याचा अर्थ होईल.
अलिप्त होण्याचा प्रयत्न करुन तरी बघा. मनातील सारं मळभ निघून जाईल. कोसळून मोकळ्या झालेल्या निरभ्र आकाशासारखं मनदेखील स्वच्छ, सुंदर होईल, ज्यात दुःखद आठवणींचे काळे ढगही नसतील किंवा मोहमयी पांढरे ढग देखील नसतील.
रिक्त होण्यातही सुख आहे. आपलं जीवन कोणाच्या तरी उपयोगी पडतंय, ही भावनाच खूप सुखावह आहे. पारिजातकाचं झाड तेच तर सुचवतंय. अगणित फुलांचं दान अर्पित करून, परत नव्याने बहरण्यासाठी सज्ज होतोच की बापडा… अगदी रोज… कोणत्याही पाशात न अडकता… अलिप्तपणेच !
संग्राहक :श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ जुने कपडे… ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी घेण्यासाठी खूप घासाघीस करत असलेली, श्रीमंत घरातली ती महिला, एका मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या मोबदल्यात आपल्या दोन जुन्या साड्या दारावर भांडी विकायला आलेल्या त्या भांडेवाल्यास द्यायला शेवटी कशीबशी तयार झाली.
“नाय ताई ! मला न्हाय परवडत. एवढ्या मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या बदल्यात मला तुमच्याकडून कमीत कमी तीन तरी साड्या पायजेत.” म्हणत भांडेवाल्याने ते भांडे त्या बाईंच्या हातातून अदबीने काढून आपल्या हाती परत घेतले.
“अरे भाऊ …, फक्त एकदाच नेसलेल्या साड्या आहेत या दोन्ही. बघ अगदी नवीन असल्यासारख्याच आहेत. तुझ्या या स्टीलच्या पातेल्यासाठी या दोन साड्या तशा तर फार जास्त होतात. मी म्हणून तुला दोन साड्या तरी देतेय.”
” ऱ्हावू द्या, तीनपेक्षा कमीमध्ये तर मला अजिबातच परवडत न्हाय.” तो पुन्हा बोलला.
आपल्या मनासारखा सौदा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ते दोघं प्रयत्न करत असतानाच घराच्या उघड्या दारात उभं राहून भांडेवाल्याशी हुज्जत घालत असलेल्या घरमालकिणीकडे पाहात पाहात समोरच्या गल्लीतून येणाऱ्या एका पारोश्या, केस पिंजरलेल्या, वेडसर महिलेनं घरासमोर उभं राहून घरमालकिणीला ‘मला कांही खायला द्या’ अशा अर्थाच्या काही खाणाखुणा केल्या .
त्या श्रीमंत महिलेनं एकवार किळसवाण्या, जळजळीत नजरेनं त्या वेडसर महिलेकडे पाहिलं. तिची नजर त्या वेडसर दिसणार्या महिलेच्या कपड्यांकडे गेली. जागोजागी ठिगळ लावलेल्या तिच्या त्या फाटक्या साडीतून आपली लाज झाकायचा तिचा केविलवाणा प्रयत्न दिसून येत होता.
त्या श्रीमंत महिलेनं आपली नजर दुसरीकडे वळवली खरी, पण मग पुन्हा सकाळी सकाळी दारी आलेल्या याचकाला विन्मुख परत जाऊ देणं योग्य होणार नाही, असा विचार करीत आदल्या रात्रीच्या शिळ्या पोळ्या घरातून आणून देत त्या तिनं त्या वेडसर भिकारणीच्या ओंजळीत टाकल्या आणि भांडेवाल्याकडे वळून ती त्याला म्हणाली, “हं. तर मग काय भाऊ? तू काय ठरवलंयस ? दोन साड्यांच्या ऐवजी ते पातेलं देणार आहेस की परत ठेवू या साड्या?”
यावर काही न बोलता शांतपणे भांडेवाल्यानं तिच्याकडून मुकाटपणे त्या दोन्ही जुन्या साड्या घेतल्या, आपल्या गाठोड्यात टाकल्या. पातेलं तिच्या हवाली केलं आणि तो आपलं भांड्यांचं टोपलं डोक्यावर घेऊन लगबगीनं निघाला.
विजयी मुद्रेनं ती महिला हसत हसतच दार बंद करायला रेंगाळली आणि दार बंद करताना तिची नजर समोर गेली.तो भांडेवाला आपल्याजवळचं कपड्यांचं गाठोडं उघडून त्या वेडसर महिलेला त्यानं आताच पातेल्याच्या मोबदल्यात त्याला मिळालेल्या दोन साड्यांपैकी एक साडी तिचं अंग झाकण्यासाठी तिच्या अंगावर पांघरत होता. त्याने ती साडी पांघरली आणि तो शांतपणे तिथून निघूनही गेला.
आता मात्र हातात धरलेलं ते पातेलं त्या श्रीमंत महिलेला एकाएकी फार जड झाल्यासारखं वाटू लागलं. त्या भांडेवाल्यासमोर आता तिला एकदम खुजं झाल्यासारखं वाटायला लागलं. आपल्या तुलनेत त्याची कसलीच ऐपत नसतानाही भांडेवाल्यानं आज आपला पराभव केला हे तिला जाणवलं.
तासभर घासाघीस करणारा तो आता न कुरकुरता फक्त दोनच साड्या घेऊन ते मोठं पातेलं देऊ करायला एकाएकी का तयार झाला होता,याचं कारण तिला आता चांगलंच उमगलं होतं.
आपला विजय झाला नसून आज त्या यःकश्चित भांडेवाल्यानं आपल्याला पराभूत केलं आहे ह्याची तिला आता जाणीव झाली होती.
तर…कुणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्त्वाची नसते, तर मनानं मोठं असणं महत्त्वाचं असतं.
आपल्याजवळ देण्यासारखे काय आहे आणि किती आहे यानं काहीही फरक पडत नाही.
ज्याच्याकडे जे आहे , ते त्याने द्यावं. मदत फक्त पैसा खर्च करूनच करता येते असं नाही. तर वेळ,मानसिक,भावनिक आधार देऊन एखाद्याचे जीवन आपण अधिक सुसह्य बनवू शकतो.
रस्ता ओलांडण्यास केलेली मदत,एखाद्याचं ओझं उचलून देण्यास केलेली मदत तितकीच मोलाची.
आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून जर एखाद्यात सकारात्मक बदल होत असतील, तर तीही एक प्रकारची मदतच.
गरज आहे ती आपले विचार करण्याच्या पद्धतीत व नियतीत शुद्धता असण्याची.
संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एके दिवशी मी रस्त्याने जात होतो. वाटेत एक बोर्ड दिसला, ‘ईश्वरीय किराणा दुकान…’
माझी उत्सुकता वाढली. या दुकानाला भेट देऊन त्यात काय विकले जाते ते का पाहू नये?
हा विचार येताच आपोआप दार उघडले. थोडेसे कुतूहल असेल तर दरवाजे आपोआप उघडतात. ते उघडावे लागत नाहीत.
मी दुकानात पाहिले तर सर्वत्र देवदूत उभे होते. एका देवदूताने मला टोपली दिली आणि म्हणाला, “माझ्या मुला, काळजीपूर्वक खरेदी कर, माणसाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट इथे आहे.”
देवदूत पुढे म्हणाला, “जर तुला टोपली एकाच वेळी भरता येत नसेल, तर पुन्हा ये आणि पुन्हा टोपली भर.”
आता मी सगळं बघितलं. आधी संयम विकत घेतला, मग प्रेम, मग समजूतदारपणा, मग विवेकाचे एक-दोन डबे घेतले.
पुढे जाऊन विश्वासाचे दोन-तीन डबे उचलले. माझी टोपली भरत राहिली.
पुढे गेलो.पावित्र्य दिसले. विचार केला- कसं सोडू? तेवढ्यात शक्तीची पाटी आली.शक्ती पण घेतली..
हिंमतसुद्धा घेतली.वाटले की हिमतीशिवाय आयुष्यात काहीच चालत नाही.
आधी सहिष्णुता घेतली. मग मुक्तीची पेटीही घेतली.
माझे सद्गुरू प्रभुजींना आवडणाऱ्या सर्व वस्तू मी विकत घेतल्या. मग एक नजर प्रार्थनेवर पडली.मी त्याचाही डबा उचलला.
कारण सर्व गुण असूनही माझ्याकडून कधी काही चूक झाली, तर मी देवाला प्रार्थना करेन की देवा,मला माफ कर.
आनंदी होऊन मी टोपली भरली, मग मी काउंटरवर गेलो आणि देवदूताला विचारले, “सर.. या सर्व गोष्टींसाठी मला किती पैसे द्यावे लागतील?”
देवदूत म्हणाला, “माझ्या बाळा, इथली बिल भरण्याची पद्धतही दैवी आहे. आता तू जिथे कुठे जाशील, तिथे या गोष्टींची उधळपट्टी कर, सर्वांना मुक्तपणे वाट. या गोष्टींचे बिल असेच भरले जाते…”
या दुकानात क्वचितच कोणी प्रवेश करतो. जो आत जातो, तो श्रीमंत होतो. तो या गुणांचा भरपूर उपभोग घेतो आणि लुटतो.
प्रभूंच्या या दुकानाचे नाव आहे ‘सत्संगाचे दुकान’….
सद्गुणांचा खजिना भगवंताने दिला आहे. रिकामा झाला तरी सत्संगाला या आणि टोपली भरा.
देवाच्या या दुकानातून मी एकतरी वस्तू आपलीशी करू शकेन असा मला आशीर्वाद द्या.
संग्राहक – श्री कमलाकर नाईक
फोन नं 9702923636
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
खूप वर्षांपूर्वी मी पावसाळी दिवसात लोणावळा एसटी स्टँड वर एका खूप गरीब आणि खूप म्हाता-या आजीकडून एक रुपया देऊन बारा आण्याच्या भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा घेतल्या आणि एसटी कडे धावलो. माझी जागा खिडकीकडे होती. एसटी सुटायला वेळ होता. मी खिडकीशी जागा पकडली आणि तितक्यात मी त्या म्हाता-या आजीला निरनिराळ्या एसटी बसेस मध्ये डोकावून लंगडत लंगडत धावत येताना पाहिलं.
आमच्या एसटीत तिला मी दिसताच तिचे डोळे चमकले आणि ती निर्मळ हसली. तिने हात उंचावून मला तिच्याकडून येणे असलेले चार आणे दिले आणि म्हणाली “भ्येटला रं तू, लय शोधला म्या तुला. ह्ये घे तुजं चार आनं. म्या म्हटलं की तुजं पैसं देण्यासाठी आता फुडला जल्म घ्यावा लागतोय मला बग.”
एसटी सुटायला वेळ होता, म्हणून मी तिला थांबायला सांगून आणि शेजा-याला ‘येतोय’ अशी खूण करून खाली उतरलो.
मी तिला विचारलं, ‘काय गं आज्ज्ये, एवढ्यासाठी तुझी पाटी तिथे तशीच सोडून मला शोधत आलीस होय ? त्यावर ती म्हणाली “बाबा, आंदळ्याची गुरं द्येव राखतोय बग. आनी बाजूची म्हतारी हाय की लक्ष ठिवायला”. मी विचारलं, “आज्ज्ये, राहिले असते चार आणे तुझ्याकडे तर काय झालं असतं गं एवढं ?”
त्यावर ती जे उत्तरली, ते मला निरुत्तर करणारं होतं. ती म्हणाली, ‘असं बग बाबा, ऱ्हायलं असतं चार आनं माज्याकडं तर आपला दोगांचा पुन्ना जल्म काय चुकत न्हवता बग. माजा तुजं चार आनं देन्यासाटी आन् तुजा चार आनं घेन्यासाटी, आन् त्येला जबाबदार व्हते मी. आन् पुन्ना फुडला जल्म कंचा येतुंय कुणाला ठावं, माणसाचा, प्रान्याचा कीं आणखी कुनाचा, म्हंजी आला का पुन्ना चार आण्यासाटी पुन्ना पुन्ना जल्माचा फ्येरा ? आणि त्यात आपण पुण्य करतोय की पाप काय म्हाईत, आन् मग ह्ये चक्र बंद व्हनार कदी ?” मी खल्लास !
एसटी सुटायला अजून वेळ होता. मी मनात म्हटलं, की अजून जरा आजीकडून काही तरी शिकावं, आणि म्हणून मी तिला म्हटलं, “आज्ये, माझे चार आणे देऊन टाकायचे कुणाला तरी गरीबाला.” त्यावर आजी म्हणाली “आरं, कुनाचं तरी पैसं कुनाला तरी द्यायचा अदिकार मला न्हाय, पैसं तुजं आणि त्यावर मी कशापाई पुण्य कमवू? मी तुजं चार आनं तुला दिलं, आता मी सुटले बग.”मी निरुत्तर झालो.
तितक्यात कंडक्टर आला, त्याने घंटी मारली, मी पटकन् त्या आजीला वाकून नमस्कार करून एसटीत शिरलो तर ती आजी मोठ्या समाधानात पाठमोरी आपल्या पाटीकडे लंगडत लंगडत निघाली होती. माझे डोळे भरून आले होते.
या घटनेतून मी इतकाच बोध घेतला की माझ्याहून ती कितीतरी अधिक सुसंकृत होती आणि म्हणूनच सुखी, समाधानी होती, मी ‘शिक्षित’ असेन पण ती ‘सु-शिक्षित’ होती, सु-संस्कृत होती.
म्हणून मी तत्क्षणी तिला गुरूपदाचा मान दिला.
संग्रहिका : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
जपानमध्ये ‘टीचर्स डे’ नाही, हे माहीत झाल्यावर आश्चर्यचकित होऊन मी एका सहकाऱ्याला विचारले.
तो म्हणाला: “आमच्याकडे ‘टीचर्स डे’ असा अस्तित्वात नाही.”
माझ्या मनात एक विचार आला. ‘एक देश जो आर्थिक, विज्ञान आणि तंत्रज्ञानात खूप अग्रगण्य आहे, तो शिक्षकांप्रती आदर दर्शविण्यासाठी ‘शिक्षक दिन’ का साजरा करत नाही?’
एकदा, कार्यालयातील कामानंतर, यमामोटा नावाच्या त्या मित्राने मला आपल्या घरी आमंत्रित केले. त्यासाठी आम्हाला मेट्रोने जावं लागलं. तिथं लोकांची गर्दी होती. माझ्याकडे एक बॅग सुद्धा होती. अचानक, माझ्या बाजूला बसलेल्या वयस्क व्यक्तीने स्वतः उठून मला त्यांच्या आसनावर बसण्याची विनंती केली. वृद्ध व्यक्तीच्या अशा सत्कारपूर्ण व्यवहाराने मी ओशाळून गेलो.
हा वृद्ध माणूस मला त्यांची जागा बसायला का देत असेल, हा प्रश्न मी यमामोटा यांना विचारला. माझ्याकडे असलेल्या ‘शिक्षक’ या टॅग कडे पाहून त्यांनी बसायला आसन दिले आहे, असं तो म्हणाला. मला अभिमान वाटला.
ही यमामोटांना भेटण्याची माझी पहिली वेळ होती, त्यामुळे एखादी भेटवस्तू त्यांच्यासाठी घ्यावी, असं मला वाटलं. मी दुकानाबद्दल विचारलं. ते म्हणाले की थोडं अंतरावर खास शिक्षकांसाठीचं एक दुकान आहे, ज्यात विविध वस्तू कमी किंमतीने विकत घेण्याची सुविधा दिली जाते. हा मला दुसरा सुखद धक्का होता.
या सोयीसुविधा फक्त शिक्षकांसाठीच आहेत का? मी प्रश्न केला.
यमामोटा म्हणाले:
जपानमध्ये, शिक्षकी पेशा हा सर्वात प्रतिष्ठित पेशा आहे आणि शिक्षक ही सर्वात आदरणीय व्यक्ती आहे. जपानी उद्योजकांना शिक्षक त्यांच्या दुकानांमध्ये येताच अत्यंत आनंद होतो.त्यांना तो त्यांचा सन्मान वाटतो.
जपानमध्ये माझ्या प्रवासाच्या काळात, मला शिक्षकांच्या प्रती जपानी लोकांकडून अत्यंत सम्मान मिळतो, याची अनेकदा प्रचिती आली. त्यांना मेट्रोमध्ये विशेष आसने आरक्षित असतात, त्यांच्यासाठी विशेष दुकाने आहेत, जपानमध्ये शिक्षकांना कोणत्याही प्रकारच्या प्रवासाच्या तिकीटांसाठी रांगेत उभं राहावं लागत नाही.
म्हणूनच की काय ! जपानमध्ये शिक्षकांसाठी ‘शिक्षकदिन‘ या दिवसाची गरज नाही, कारण तिथे शिक्षकांच्या जीवनातील प्रत्येक दिवस हा सणच असतो.
मी आपणां सर्वांकडून अनेक चांगल्या ज्ञानांचे धडे शिकलो…त्या माझ्या शिक्षकांनो, माझा तुमच्या चरणी प्रणाम!
संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“काहीतरी कमी करा आणि कढीपत्ता द्या. त्याचे पैसे देणार नाही.”
“माउली, तुमच्याकडून कशाला जास्त घेईन? दोनशे वीस झाले.दोनशे द्या.”
म्हातारबा हसून एवढ्या प्रेमानं बोलले की आपसूक हात पर्समध्ये गेला. पैसे काढत असतानाच मोबाईल वाजला.
बॉसचा फोन.
“येस सर.”
“मेल चेक कर, दहा मिनटात रिप्लाय दे. इट्स अर्जंट.” फोन कट झाला.
बॉसच्या आवाजावरून टेन्शनची कल्पना आली. तातडीने भाजीची पिशवी गाडीला लावून घाईघाईने घरी निघाले.
“माउली, अवो ताई,”
म्हातारबा हाका मारत आहेत, असं वाटलं. पण मी लक्ष दिलं नाही. अर्जंट मेलच्या नादात घरी पोहोचले अन लॅपटॉपमध्ये तोंड खुपसून बसले.
तासाभराने काम संपलं . टेन्शन कमी झालं. कॉफी पिताना भाजीची पिशवी पाहिल्यावर लक्षात आलं की अजून भाजी ठेवायची आहे. सगळ्या भाज्या बाहेर काढल्या आणि हिशोबाला सुरवात केली. म्हातारबांनी केलेला हिशोब बरोबर होता. चक्क कढीपत्ता फुकट दिला होता. रिकामी पिशवी पुन्हा एकदा झटकली, तेव्हा शंभरच्या दोन नोटा खाली पडल्या. नोटा पाहून डोक्यात लख्ख प्रकाश पडला, की मेलच्या नादात पैसे न देताच आपण भाजी घेऊन आलो आहोत.
“अय्योsssss ”मी जोरात किंचाळले.
“काय गं,काय झालं?” घाबरून नवऱ्यानं विचारलं.
सगळा प्रकार सांगितला. त्यावर तो म्हणाला,
“बरंय की मग.भाजी फुकट मिळाली…”
“काहीही काय!”
“म्हातारबा बिचारे माझ्याशी चांगले वागले आणि मी पैसे न देताच…
माझ्याविषयी ते काय विचार करत असतील?”
“हे बघ, उगीच इमोशनल होऊ नकोस.”
“त्यांचं विनाकारण नुकसान झालं हो..”
“पण तू मुद्दाम केलं नाहीस ना.”
“हो. तरी पण नुकसान ते नुकसानच.”
“मग आता काय करणार ???”
“मी जाऊन पैसे देऊन येते.”
“अग…बाहेर मुसळधार चालूये. उद्या सकाळी दे…”
“अरे पण…
मनाला चुटपूट लागलीय. म्हातारबा हाक मारत होते पण दुर्लक्ष केलं. मी अशी का वागले?डफर…”
“तू ओव्हर रिऍक्ट करतेस.
एवढं पॅनिक होण्यासारखं काही झालेलं नाही.”
नवरा वैतागला.
“मला खूप अपराधी वाटतंय.
म्हातारबांचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाही.”
“मग चेहरा पाडून दु:ख व्यक्त करत बस. मला काम आहे.”
कुत्सितपणे बोलून तो लॅपटॉपमध्ये हरवला.
माझी अवस्थता वाढली. ‘शिकलेली माणसं अशीच फसवाफसवी करतात. नावालाच चांगल्या घरातली.बाकी …..’.असं म्हणत भाजीवाले बाबा शिव्या हासडतायेत असं वाटायला लागलं.
नको त्या विचारांचे डोक्यात थैमान सुरु झालं. कामात लक्ष लागेना. झालेल्या गोष्टीबद्दल मनात दहा वेळा बाबांची माफी मागितली.
तडक जाऊन पैसे देऊन यावे असा विचार आला. पावसाचा जोर होताच तरीही नवऱ्याचा विरोध असतानाही गाडीवर बाहेर पडले परंतु म्हातारबा भेटले नाहीत.
निराश होऊन घरी परतले. माझ्या पडलेल्या चेहऱ्यावरून काय झालं ते नवऱ्याला समजलं. काही बोलला नाही, पण खवटपणे हसला.
नंतरचा माझा सगळा वेळ प्रचंड बेचैनीत गेला. दुसऱ्या दिवशी घाईघाईत घरातली कामं आटपून पैसे द्यायला गेले पण म्हातारबा दिसले नाहीत. आजूबाजूला चौकशी केली पण कोणालाच बाबांविषयी माहिती नव्हती. प्रचंड निराश झाले.अपराधी भाव प्रचंड वाढला. त्यामुळे विनाकारण चिडचिड सुरु झाली.
“बास आता,अति होतंय”
नवरा डाफरला.
“तुला माहितीय. म्हातारबांना पैसे दिल्याशिवाय मला चैन पडणार नाही.”
“तू प्रयत्न केलेस ना. थोडी वाट पहा. जेव्हा त्यांना भेटशील तेव्हा दे.
आपल्याला पैसे बुडवायचे नाहीत.”
“आता आठ दिवस लॉकडाऊन आहे”
“म्हणजे दोनशे रुपयांचे भूत आठ दिवस डोक्यावरून उतरणार नाही.”नवऱ्यानं चिडवलं, तेव्हा मला सुद्धा हसायला आलं.
लॉकडाऊनच्या काळात सुद्धा काहीतरी निमित्त काढून भाज्यांच्या गाड्या जिथं असतात, तिथं रोज जात होते. पण एकदाही बाबा भेटले नाहीत.
म्हातारबांविषयी सारखी चौकशी करत असल्याने तिथले भाजीवाले ओळखायला लागले होते. लॉकडाऊन संपल्यानंतर एका भाजीवाल्याने म्हातारबांच्या भाजी विकणाऱ्या नातवाविषयी सांगितले.
“दादा, मला तुमच्या आजोबांना भेटायचे आहे.”
नातवाने विचित्र नजरेने माझ्याकडे पाहत विचारलं,
“कशासाठी ?काय काम आहे ?”
“कुठं भेटतील ?”
“आज्याची तब्येत बरी नायी. घरीच हाय. ते आता गाडीवर येणार न्हाईत.”
“मला त्यांना भेटायचंय. पत्ता देता, प्लीज.”
नातवाच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून मी घडलेला प्रकार सांगितला.
“माज्याकडे द्या. आज्याला देतो.”
“नाही. मला बाबांनाच भेटायचंय. त्यांची माफी मागायचीय.”
त्याने घरचा पत्ता दिला.
ताबडतोब नवऱ्याला घेऊन वस्तीत गेले. एकाला एक लागून असलेली घरे आणि त्यांच्यामधेच असलेला जेमतेम पाच फुटांचा रस्ता. अरुंद बोळ, उघडी गटारं, धो धो वाहणारे नळ, तिथंच कपडे धुणाऱ्या बायका, खेळण्यात हरवलेली लहान मुलं…अशा परिस्थितीत पत्ता विचारत वस्तीच्या आत आत चाललो होतो. अलीबाबाच्या गुहेसारखं वस्तीच्या आत एक निराळंच जग होते.
अर्ध्या तासाच्या पायपिटीनंतर एकदाचं घर सापडलं.
“आजोबा आहेत का?”
दारात तांदूळ निवडत बसलेल्या आजींना विचारल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्नचिन्हं ?
त्यांनी हाका मारल्यावर म्हातारबा बाहेर आले.
“आजोबा, ओळखलं का ?”
चटकन डोळ्यात पाणी आलं. “वाईच थांबा.चष्मा आणतो.”
म्हातारबा चष्मा घालून आले. मी तोंडावरचा मास्क बाजूला केला.
“आ…,माउली..,तुमी इथं?आत या.”
म्हातारबांचे आदरातिथ्य पाहून आम्ही दोघंही भारावलो.
घरी आलेल्यांचे मनापासून स्वागत होणं,हे आजकाल दुर्मिळ झालंय.
“बाबा,पुन्हा येईन. आज जरा घाईत आहे. पैसे द्यायला आले होते.”
“कसले पैसे?”
“भाजीचे. त्या दिवशी गडबडीत…..”
दहा दिवसांपूर्वी घडलेला प्रकार मी सांगितला, तेव्हा म्हातारबा प्रसन्न हसले.
“माफ करा. चुकून झालं.”
मी हात जोडले.
“अवो, कामाच्या गडबडीत व्हतं अस. माऊली, हे पैशे मिळणार याची खात्री व्हती.”
“कशावरून??”
“माणूस चांगला की लबाड, हे माणसाच्या बोलण्या-वागण्यावरून ह्ये अनुभवी नजरंला बरुबर समजतं.”
“ताई, पैशासाठी यवडी इतवर आलात तवा घोटभर च्या तरी घ्याच.”
आजीबाईंचा आग्रह मोडता आला नाही. चहा घेऊन निघताना….
“बाबा, पुन्हा सॉरी…..”
मी वाकून नमस्कार केला. तेव्हा म्हातारबांनी थरथरता हात डोक्यावर ठेवून भरभरून आशीर्वाद दिला.
“हॅप्पी ?” घरी जाताना नवऱ्याने विचारलं…
तेव्हा मी मान डोलावली.
“पैसे दिले नसते तरी चाललं असतं.बाबा तर साफ विसरले होते.”
“ते विसरले होते. पण मी नाही. त्या चुकीची सल मला त्रास देत होती.”
“काय मिळवलं एवढं सगळं करून??”
“ मनःशांती…!”
मोजता येणार नाही असं समाधान मिळालं. ही धावपळ बाबांच्या पैशासाठी नाही तर स्वतःसाठी केली.
माझ्यातला चांगुलपणा जिवंत ठेवण्यासाठीच हा सगळा आटापिटा.
संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈