☆ “मला अश्रु देशील का ?” – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
शनिवारी दुपारीच बंड्याचा फोन आला. “उद्या सकाळी वृध्दाश्रमाला भेट द्यायला येता का ?”
“ओके “! मी ही तयार होतोच. नाहीतरी बरेच दिवसांपासून वृद्धाश्रम बघायचं होतं.
सकाळी लवकर उठून बंड्याबरोबर निघालो. वाटेत बंड्याने चिवडा, मिठाई, पत्ते असे बरेच काही घेतले. आत शिरताच तिथली मंडळी खूष झाली. ” हाय हिरो ! ” हाय चिकण्या”!! अशा हाका सुरू झाल्या. सगळे वृद्ध आजी आजोबा आपले वय विसरुन बंड्याला हाका मारीत होते. बंड्याही त्यांच्याशी हसत उत्तरं देत होता. हातातील सर्व वस्तू ऑफिसमध्ये जमा करून फक्त एक छोटा मिठाईचा बॉक्स हातात घेऊन कोपऱ्यातल्या खोलीत शिरला.
त्या खोलीत व्हीलचेअरवर एक वृद्धा बसली होती. पंचाहत्तर एक वय असेल तिचे, पण चेहऱ्यावरील बुद्धिमत्तेचे तेज काही लपत नव्हते. डोळ्यातही वेगळीच चमक होती.
” ओय बुढी, कैसी हो ?” बंड्याने तिला पाहताच आरोळी ठोकली.
” नालायका आहेस कुठे ? तुझ्या मैत्रिणीला विसरलास की काय “? तिने खणखणीत आवाजात उत्तर दिले आणि हात पसरले.
बंड्या हसत हसत तिच्या मिठीत शिरला. माझी ओळख करून देताच तिने माझ्याकडे पाहून विनयाने हात जोडले. मी खाली वाकून पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताच नको नको म्हणत तिने व्हीलचेअर मागे घेतली.
” ही माझी मैत्रीण. थोडी म्हातारी दिसतेय, पण लय खोडकर. एकमेकांना शिव्या दिल्याशिवाय दिवस जात नाही आमचा. मेल्यावर तिची सर्व इस्टेट माझ्या नावावर करणार आहे, म्हणून सहन करतोय तिला,” असे बोलून बंड्या हसला.
” काही मिळणार नाही तुला माझ्याकडून. मरणावर टपलाय माझ्या. डायबिटीस आहे हे माहीत असूनही गोड मिठाई आणतोस नेहमी. माझी इस्टेट तुझ्या नाही तर तुझ्या नातवाच्या नावावर करणार आहे मी”, तिने जोरात उत्तर दिले.
आश्चर्यचकित झालेला माझा चेहरा पाहून दोघेही हसू लागले. मग ती सांगू लागली, “मी जयमाला. पेशाने शिक्षिका, विद्यार्थ्यातून चांगले नागरिक घडवायची जबाबदारी माझी. एका शाळेतून प्रिन्सिपॉल म्हणून निवृत्त झाले. घरात नवरा आणि मी, मुलगा हुशार होता म्हणून बाहेर गेला आणि तिकडचीच गोडी लागली आणि तिकडचाच झाला. आज कुटुंबाबरोबर सुखात आहे. मुलगी लग्न होऊन चांगल्या घरात गेली पंचवीस वर्षे संसार केला, पण माझ्याइतके आयुष्य नाही लाभले तिला. पाच वर्षांपूर्वी तीही एका छोट्या आजाराचे निमित्त होऊन देवाघरी गेली. त्या गोष्टीचा धसका माझ्या नवऱ्याने घेतला आणि दोन वर्षांपूर्वी तेही गेले .
मुलाने माझ्यासाठी चोवीस तास बाई ठेवली. परदेशातून पैसे पाठवत राहिला. मलाही हे गुडघ्याचे आजारपण सुरु झाले आणि ही व्हिलचेअर माझ्या नशिबात आली. माझ्या असल्या अवस्थेमुळे कुठलीच बाई टिकत नव्हती. मुलगी गेल्यावर जावयाने पण संबंध तोडले. मुलाला इकडे यायची इच्छा नाही. खूप निराश झाले होते मी.
शेवटी मुलाने नाइलाजाने वृध्दाश्रमाचा पर्याय आणला आणि मी आनंदाने स्वीकारला. इथे आल्यावर अवती भवती सर्व असायचे, पण एकटेपणाची भावना काही कमी व्हायची नाही. तेव्हढ्यात बंड्या भेटला. तो आणि त्याचे मित्र अनाथ आणि निराधार व्यक्तींवर आपले नातेवाईक समजून अंत्यसंस्कार करतात. देवा…. ! असेही लोक असतात तर समाजात. मग हे लोक मला आपले वाटू लागले.
हा बंड्या नेहमी हसरा. याला दुःख म्हणजे काय ते माहीत नसावे, असेच वाटते. कोणाच्या अंत्यसंस्काराची तयारी करताना याचा चेहरा गंभीर, पण डोळ्यांत दुःख दिसत नाही. पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मिठाईचा तुकडा हाती दिला. मी म्हणाले, मला डायबिटीस आहे, तर म्हणाला, “असे किती वर्ष जगायचे आहे तुम्हाला ? पुरे झाले आता आयुष्याची आणि तब्बेतीची काळजी करत जगणे. मरण लवकर येऊ दे म्हणता आणि तब्बेतीची काळजी घेता, खा गप्प, तेवढीच वर्ष कमी होतील. मन मारून जगू नका, आणि मीच येणार आहे तुम्हाला पोहचवायला” . त्याचे हे प्रवचन एकून दिवसभर हसत होते.
त्या दिवसापासून माझे आयुष्य बदलून गेले. आता फक्त प्रसन्न रहाणे, स्वतःवर हसणे एवढेच मला माहितीय.”
त्यांचे बोलणे ऐकून आम्ही हसू लागलो.
मी म्हटले ” हो. हा असाच आहे, मीही याला कधी गंभीर बघितले नाही “.
“बंड्या आज फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने मला एक गिफ्ट देशील ?” तसा बंड्या हसला.
“च्यायला या वयातही तुझ्या इच्छा आहेतच का ? काय पाहिजे ग तुला ? तुझे अंत्यसंस्कार तर मीच करणार. दिवस ही करू का ?”
“नको. दिवस नको करुस, फक्त थोडे रडशील का माझ्यासाठी ? आपण मेल्यावर आपल्यासाठी कोणी रडणार नाही ही कल्पनाच काहीतरी वाटते रे ? तुला मी मित्र मानते, पण तूही रडणार नाहीस याची खात्री आहे मला. म्हणून नाइलाजाने आज तुझे अश्रू मागतेय, देशील का रे ?”
अनपेक्षित मागणी ऐकताच बंड्या हादरलाच, एका क्षणासाठी त्याचा चेहरा दुःखाने पिळवटून निघाला. मी ही अस्वस्थ झालो.
“च्यायला! म्हातारे, काहीही मागतेस!”, असे म्हणत बंड्याने तिचे हात हातात घेतले.थोडा वेळ स्तब्ध होऊन तिच्या डोळ्यात पाहिले आणि डोळे पुसत पराभूत योद्ध्यासारखा खोलीच्या बाहेर पडला. पण डोक्यात “तुझे अश्रु मागते” हे शब्द फेर धरून नाचत होते…
संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
व्हिसा,विमानाची तिकिटं,प्रवासाची रूपरेषा… प्रवास कंपनीने सारं पाठवलं…तळटीप होती.. या वर्षापासून विमान कंपनी फक्त १५ कि. वजनच नेऊ देणार. मनामधे घालमेल चालू झाली. आता माझे नवे ड्रेस, गरम कपडे, accessories …कसं मावणार? बॅगेचंच वजन किती असतं! त्यात खाऊचं पॅकेट ..प्रवास कंपनीचं… चिडचिड झाली, विचारांचं वादळच आलं. पूर्वी किती छान होतं.
आता प्रवासी वाढले, विमानाचं आकारमान तेच राहिलं. नियम लागू होणारच.
स्वतःला शांत करताना लक्षात आलं. आपण मनाचा, आपल्या ह्रदयाचा विचार असा कधी करतो का? आता जीवनशैली बदलली आहे. प्रत्येकाचे ताणतणाव वाढताहेत. रक्तदाब वाढण्याची मर्यादा ओलांडली जातेय. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींनी मधुमेह वाढतोय..ताणतणावांनी,
मानापमानाच्या चुकीच्या कल्पनांनी वाहिन्यांमधे अडथळे निर्माण होताहेत. विमा कंपन्यांच्या भरभराटीला आपणच जबाबदार. तो एव्हढासा मेंदू आणि मूठभर ह्रदय कसं सांभाळणार हे सगळं? आपण विचारच करत नाही.
चला travel light सारखं live light शिकूया.
मनातले नको ते विचार, अति महत्वाकांक्षा, हव्यास,राग, लोभ… सार्यांना हळूहळू तिलांजली द्यायला लागूया. कारण एकदम थोडंच जमणार आहे.विचारांनीच हलकं वाटायला लागलंय मग प्रत्यक्षात…
travel light…live light चा मंत्र जपत घराबाहेर पडले…
लेखिका :डाॅ. माधुरी ठकार.
प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
चष्मा साफ करता करता एक वयस्कर काका आपल्या बायकोला म्हणाले : अगं,आपल्या जमान्यात मोबाईल नव्हते.
काकू : हो ना ! पण बरोबर 5 वाजून 55 मिनिटांनी मी पाण्याचा ग्लास घेवून दरवाजात यायची आणि तुम्ही पोहचायचे.
काका : मी तीस वर्षे नोकरी केली. पण मला आजपर्यंत हे समजलं नाही की , मी यायचो, त्यामुळे तू पाणी आणायचीस की तू पाणी आणायचीस,त्यामुळे मी वेळेवर यायचो.
काकू : हो . आणि अजून एक आठवतं, की तुम्ही रिटायर व्हायच्या आधी तुम्हाला डायबीटीस नव्हता. मी तुमची आवडती खीर बनवायचे, तेव्हा तुम्ही म्हणायचे की आज दुपारीच वाटलं होतं, की आज खीर खायला मिळाली, तर काय मजा येईल.
काका : हो ना .. अगदी. ऑफिसमधनं निघताना मी जो विचार करायचो घरी आल्यावर बघतो तर तू तेच बनवलेलं असायचं.
काकू : आणि तुम्हाला आठवतं ? पहिल्या डिलीव्हरीच्यी वेळी मी माहेरी गेले होते, तेव्हा मला कळा सुरू झाल्या होत्या. मला वाटलं, हे जर माझ्याजवळ असते तर ? आणि काय आश्चर्य! तासाभरात स्वप्नवत तुम्ही माझ्या जवळ होतात.
काका : हो. त्या दिवशी मनात विचार आला होता, की तुला जाऊन जरा बघूयात.
काकू : आणि तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून कवितेच्या दोन ओळी बोलायचे.
काका : हो. आणि तू लाजून पापण्या मिटवायचीस व मी त्या कवितेला तुझा ‘लाइक’ मिळाला असं समजायचो.
बायको : एकदा दुपारी चहा करताना मला भाजलं होतं. त्याच दिवशी सायंकाळी तुम्ही बरनॉलची ट्यूब अापल्या खिशातनं काढून बोलले, ही कपाटात ठेव.
काका : हो..आदल्या दिवशीच मी बघितलं होतं, की ट्यूब संपलीय. काय सांगता येतं कधी गरज पडेल ते? हा विचार करून मी ट्यूब आणली होती.
काकू : तुम्ही म्हणायचे की आज ऑफिस संपल्यावर तू तिथंच ये. सिनेमा बघूयात आणि जेवण पण बाहेरच करूयात.
काका : आणि जेव्हा तू यायचीस, तर मी जो विचार केलेला असायचा, तू अगदी तीच साडी नेसून यायचीस.
काका काकूजवळ जाऊन तिचा हात हातात घेत बोलले : हो , आपल्या जमान्यात मोबाइल नव्हते पण आपण कनेक्टेड होतो.
काकू : आज मुलगा आणि सून सोबत तर असतात. पण गप्पा नाही, तर व्हाट्सएप असतं. आपुलकी नाही तर टैग असतं. केमिस्ट्री नव्हे तर कॉमेंट असते. लव्ह नाही तर लाइक असतं . गोड थट्टामस्करीच्या ऐवजी अनफ़्रेन्ड असतं. त्यांना मुलं नकोत तर कैन्डीक्रश सागा, टेम्पल रन आणि सबवे सर्फर्स पाहिजे.
काका : जाऊ दे गं! सोड हे सगळं. आपण आता व्हायब्रेट मोडवर आहोत. आपल्या बॅटरीची पण एकच लाइन उरली आहे. अरे ! कुठं चाललीस ?
काकू : चहा बनवायला.
काका : अरे… मी म्हणणारच होतो, की चहा बनव म्हणून.
बायको : माहिती आहे. मी अजूनही कवरेज क्षेत्रात आहे आणि मेसेजेस पण येतात.
दोघेही हसायला लागले.
काका : बरं झालं आपल्या जमान्यात मोबाइल नव्हते.
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सात वर्षे वयाच्या मुलांनी लिहिलेल्या काही गमती जमती…
इतका सुंदर आरसा. आपला चेहरा नव्याने बघायला मजा येते.
– आजी एक बाई व आजोबा म्हणजे एक मनुष्य असतो,ज्यांना स्वतःची लहान मुलं नसतात.
– त्यांना इतरांची छोटी मुलं फार आवडतात.
– ते नोकरी करत नाहीत. त्यांना आईबाबांसारखं स्वतःचं काम नसतं, म्हणून ते माझ्याशी खेळतात.
– ते सारखे झोपतात.
– ते जास्त जोरात धावूपळू वा खेळू शकत नाहीत.
पण मला छान छान खेळ आणून देतात.
– फिरायला गेलं की हे लोक झाडाची पानं नाहीतर किडे बघत बसतात… फोनमधे वाट्टेल त्या गोष्टीचे फोटो काढतात व एकमेकांना दाखवत बसतात.
– फुलांचे रंग नि फळांचे गुण ते मला सांगतात. मला फक्त फळं खायला आवडतात.
– त्यांना कसलीही घाई नसते, म्हणून मलाही ते घाई करत नाहीत. निवांत असतात.
– बहुतेकदा ते जाडे, गुबगुबीत असतात, पण इतकेही जाड नसतात की मला बूट घालून देऊ शकत नाहीत.
– ते चष्मा लावतात व वेगळेच गमतीदार गबाळे कपडे घालतात.
– आजोबांना केस कमी असतात, तरी ते जोरजोरात तेल लावून भांग पाडत बसतात, मग आजी त्यांना हसते.
– आजीचे केस दरवेळी निरनिराळ्या रंगाचे असतात, पण आजोबा तिला हसत नाहीत, कारण त्यांचं तिच्याकडे फारसं लक्ष नसतं. ते पेपरमधे डोकं खुपसून बसलेले असतात. म्हणून ते हुशार असतात.
– आजीआजोबा दात व हिरड्या तोंडातून बाहेर काढू शकतात.
– ते दोघेही खूप स्मार्ट नसतात. तरीही ते गोड दिसतात. कधीकधी आईबाबांना तसं वाटत नाही.
– “देवाचं लग्न झालंय का नाही ?”, “कुत्रे मांजरांच्या मागे का लागतात?”अशा प्रश्नांची उत्तरं त्यांना येतात. यायलाच हवीत.
– झोपण्यापूर्वी मला तोंडात टाकायला खाऊ लागतो, हे त्यांना बरोब्बर कळतं.
– ते माझ्याबरोबर श्लोक, पाढे म्हणतात आणि म्हणताना माझं काही चुकलं, तरी माझ्या पाप्याच घेतात.
– आजोबा जगातील सर्वात हुशार व स्मार्ट मनुष्य असतात, कारण ते मला खूपखूप नवीन गोष्टी शिकवतात. मला ते जास्त वेळ मिळायला हवेत.
– आजोबा तर प्रत्येक छोट्या मुलाला हवेच. खासकरून जर आई-बाबा तुम्हाला टीव्ही वा टॅब बघायला देत नसतील तर आजोबा हवेच. ते आपली करमणूक करतात. त्यांना आपल्यासाठी खूप वेळ असतो.
आजीआजोबा नातवंडं नातं युनिव्हर्सली गोडच असतंय. नाही का ?
प्रस्तुती : सुश्री प्रफुल्ला शेणॉय
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
एकदा सहज मी म्हणाले होते,” त्याचं आणि माझं मैत्र आहे..! “
माझी मैत्रीण पटकन मला म्हणाली,”स्वप्नजा ,मराठी ची विद्यार्थिनी ना तू?तुला मैत्री म्हणायचं आहे का? “
” नाही ग मुली,मला मैत्रचं म्हणायचं आहे..”
ती हसत म्हणाली,” बोला. आता नेहमीप्रमाणे वेगळं काहीतरी सांगणार आमची आद्यजा…”
आद्यजा हे आरतीताईने दिलेलं नांव.
मी तिचा हात हातात घेत म्हणाले,” सखी, मैत्री होत असते,ठरवावी लागत नाही. मैत्र हे सहानुभावाने आत उतरत असतं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना..भूता परस्परे जडो मैत्र जिवांचे…! ते माझं मैत्र!
मैत्री आणि मैत्र यात फरक आहे थोडा वेलांटीचा.पण यातला गाभा समजून घेतला न, तर आपल्यासारखे आपणच सुखी.
मैत्री दोन समविचारी, समान आवडीनिवडी, सहवास,एखाद्याचा आपल्यावर पडत असलेला प्रभाव…यामुळे होत असते.
पण मैत्र एकमेकांच्या जवळ जसेजसे जाऊ तसतसं फुलतं,बहरतं.हे फुलणं असतं ना, सखे, जाणिवेच्या पल्याड असतं.असतं ते केवळ संवेदन.शब्दांच्या पलिकडे असणारं.
त्यासाठी रोज भेटायची गरज नसते,असते फक्त एकरुप व्हायची गरज!
मी लिहिलेल्या एखाद्या शब्दातून माझ्या मनातील खळबळ,वेदना ओळखते ते माझं मैत्र!
यात परत स्त्री-पुरुष अशी गल्लत करायची नाही.
पांचालीच्या मनातील द्वंद ओळखून तिला अबोल मदत करणारा कान्हा.हे त्याचं मैत्र!
सुदामाने काही मागितले नाही,द्वारकाधीशांनी काही दिलं नाही.पण सुदामाला सारं मिळालं.हे त्याचं मैत्र!
हे असं मैत्र आपल्या आसपास असलं ना, की आपण चिंतामुक्त असतो.
हे स्त्री-स्त्री,स्त्री-पुरुष , किंवा पुरुष-पुरुष असं लेबल लावलेलं नसतंच मुळी.
जो कोणी मैत्रभावाने आपल्या हृदयाशी जोडला जातो तेव्हाच होतं ते मैत्र!
जनाला मदत करणारा,तुकोबांची गाथा परत करणारा,चोखोबांची गुरं राखणारा,नाथांच्या घरी कावड वाहणारा, पुंडलीकासाठी अठ्ठावीस युगे विटेवर उभा राहणारा…
सखी,त्याच्याजवळ मैत्रभावाने कोण कोण गेलं, तो त्यांचा झाला…
साध्याच शब्दात बोलूया …मैत्र म्हणजे एकरुपता!
जिथे शब्देविण संवाद असतो ते मैत्र!
मांचा फोनवर आलेला वेगळा आवाज ऐकून कासावीस होणारी माझी लेक.हे तिचं आणि माझं मैत्र!
ती माझी घट्ट मैत्रीण आहे असं म्हणण्यापेक्षा, तिचं अन् माझं ह्रदयस्थ मैत्र आहे , असं म्हणू या न!
ज्ञानदेव म्हणतात,असं मैत्र विश्वात व्हावं.
हा मैत्रभाव सहजासहजी निर्माण व्हायचा नाहीच, पण अवघडही नाही.
आपण आपल्या परीने प्रयत्न करुन आपल्या भोवतालच्या परिघात का होईना,मैत्रभाव निर्माण करायला हवा.
त्यासाठी
मनाला सतत समजवायला हवं,कुणाचा मत्सर, द्वेष, ईर्षा,वैर,कुणाकुणाच्या माघारी बोलणं करु नकोस.
सखी,हे ह्यातलं थोडसं जरी आपल्याला जमलं, तरी आपण मैत्र या शब्दाच्या जवळ जाऊ शकू.कळलं?
ती मला मिठी मारत म्हणाली,यार हे लईच भारीय…तुझं माझं मैत्र असंच अखंड राहू दे…!
आमेन….असं म्हणत मी तिच्या पाठीवर थोपटत राहिले.
लेखिका : सुश्री स्वप्नजाघाटगे
कोल्हापूर. मो 8888033332
संकलक: प्रा. माधव सावळे
प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
असे म्हणतात, की एखाद्या देशाची परीक्षा तिथल्या सार्वजनिक रस्त्यावरुन होते. त्या धर्तीवर मी म्हणेन, की एखाद्या घराची परीक्षा त्या घराच्या फ्रिजवरून होते. माझी आजी फ्रिजला आळशी कपाट म्हणायची. तिला वाटायचे की ज्या वस्तू नीट ठेवायच्या नसतील त्या कोंबण्यासाठी असतो हा फ्रिज.
त्याच्या पुढे जाऊन मला असे वाटते की फ्रिज हा घरच्या घडामोडींचा आणि वातावरणाचा द्योतक असतो.
माझ्या निरीक्षणात आलेले विविध प्रकारचे फ्रिज:
आळशी फ्रिज :
या फ्रिजमध्ये काय सापडेल याचा नेम नसतो. या फ्रिजमधले पदार्थ तिहार जेलच्या कैद्यांसारखे बाहेर पडायची वाट बघत असतात आणि एकमेकाना तू इथे कधीपासून आहेस हा प्रश्न विचारताना आढळतात. फाशीची शिक्षा मिळूनही प्रत्यक्षात ती मिळेपर्यंत वाट बघणाऱ्या कैद्यांप्रमाणे बसलेल्या एक्सपायरी डेट बाटल्यांपासून कधीही घरचे लोक भेटायला न येणाऱ्या कैद्यांसारख्या दुर्लक्षित काही दिवसापूर्वीच्या उरलेल्या शिळ्या अन्नापर्यंत सर्व प्रकार असतात इथे ! काही जन्मठेप मिळालेल्या भाज्या निर्विकारपणे “सडत” पडलेल्या असतात. हा फ्रिज जेलरच्या थंड डोक्याने या सर्व गोष्टींना सामावून घेत असतो !
टापटीप फ्रिज
या फ्रिजमध्ये सर्व वस्तूंना ध्रुवबाळासारखे स्वतःचे स्थान असते. प्रत्येक डब्याला स्वतःचे झाकण असते. भाज्यांच्या ट्रेमधल्या भाज्या फ्लॅट संस्कृतीप्रमाणे बंद डब्यात बसलेल्या असतात. त्यांना शेजारच्या भाजीचा “गंध” देखील नसतो.
बॅचलर फ्रिज
हा फ्रिज सहसा रिकामाच असतो. भाड्याच्या घरात घरमालकांनी ठेवलेल्या या फ्रिजमध्ये हॉटेलरूमच्या फ्रिजसारख्या फक्त बाटल्या मात्र असतात. कधी काळी येऊन गेलेल्या आईने जाताना पुसून गेल्यावर त्या फ्रिजची कोणी विचारपूस अथवा घासपूस केलेली नसते. जाताना आईने करून ठेवलेली लोणची, मुरंबे सांभाळत आईची आठवण काढत हा फ्रिज बसलेला असतो. कधी काळी अचानक आलेल्या गर्लफ्रेंडला किचनमधील पसारा दिसू नये म्हणून वस्तू कोंबण्यासाठीही याचा उपयोग होतो.
नवविवाहित फ्रिज
हा फ्रिज उत्साहाने आणि तरुणाईने सळसळत असतो. घरच्या जुन्या वस्तूंच्या बरोबरीने सुपर मार्केटमध्ये मिळणारी एक्झॉटिक फळं आणि फ्रोझन पदार्थांची रेलचेल असते या फ्रिजमध्ये. सगळे नवे पदार्थ या फ्रिज मध्ये स्वतःचे स्थान शोधत असतात. काचेच्या नव्या कोऱ्या बाटल्यांमध्ये शेजारी शेजारी चिकटून बसलेली ऑलिव्ह ऑइलमध्ये केलेली लोणची पाहून जुनी मुरलेली लोणची नाक मुरडत असतात.
NRI फ्रिज
इतर कुठल्याही फ्रिजपेक्षा गच्च भरलेला हा फ्रिज असतो. माहेरून आणलेली पिठं मसाले, पापड, लोणची एकीकडे सांभाळताना दुसरीकडे मुलांच्या आवडीचे चीज, पिझ्झा, जेली प्रकारही तो लीलया सांभाळत असतो. मात्र जास्त जागा कुठल्या पदार्थांना द्यायची या संभ्रमात असतो. अगदी त्या घरच्या गृहिणीसारखा. तोच संभ्रम. मुलांची आवड सांभाळताना आपली आवड मात्र फ्रीझरमध्ये गोठवणारा !
ज्येष्ठ नागरिक फ्रिज
हा सर्वांत केविलवाणा असणारा. एकेकाळी मुले मोठी होत असताना भरलेल्या या फ्रिजला आता पुन्हा दोघेच राहत असताना आलेलं रिकामपण खायला उठत असतं. एकेकाळी चॉकलेटनी भरलेल्या कप्प्यांची जागा आता इन्सुलिन इंजेक्शनच्या पेनांनी घेतलेली असते. आईस्क्रीमऐवजी फ्रीझरमध्ये मुलांनी भारतभेटीत दिलेला सुकामेवा असतो. सणावारांना मुलांच्या आठवणींसारखीच हमखास बाहेर येतो तो. भाजीचा ट्रे रिकामा असतो. कारण विरंगुळा म्हणून रोजची भाजी रोज आणून संपवली जाते. उमेदीच्या काळातली वेळेची तारांबळ आता नसल्याने त्या ट्रेला काही कामच नसते.
कसाही असो मात्र फ्रिजला प्रत्येक घरात मानाचे स्थान असते. जुना असो व नवा हा जर बंद पडला तर साऱ्या घराचे चैतन्य थंड पडते !
प्रस्तुती : सौ.शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈