मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मी एकदा आळीत गेलो…” – पु. ल. देशपांडे  ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “मी एकदा आळीत गेलो…” – पु. ल. देशपांडे  ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

मी एकदा आळीत गेलो

चाळ घेऊन बाहेर आलो

तोंडात भरली सगळी चाळ

मी तर मुलाखाचा वाचाळ ॥१॥

 

कधी पायांत बांधतो चाळ

उगीच नाचतो सोडून ताळ

वजन भारी उडते गाळण

पायांचीहि होते चाळण ॥२॥

 

गाळणे घेऊन गाळतो घाम

चाळणीमधून चाळतो दाम

चाळीबाहेर दुकान माझे

विकतो तेथे हसणे ताजे ॥३॥

 

‘खुदकन हसू’ चे पैसे आठ

‘खो खो खो’ चे एकशे साठ

हसवण्याचा करतो धंदा

कुणी निंदा कुणी वंदा ॥४॥

 

कुणाकुणाला पडतो पेच

ह्याला का नाही लागत ठेच?

हा लेकाचा शहाणा की खुळा?

मग मी मारतो मलाच डोळा ॥५॥

कवी :पु ल देशपांडे

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एक चिमुकला थेंब… कवयित्री : सुश्री भारती पांडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ एक चिमुकला थेंब… कवयित्री : सुश्री भारती पांडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

अचानक सरारत आलेली 

पावसाची सर

क्षणार्धात विरूनही गेली.

एका चिमुकल्या पानावर

थबकून राहिलेला एक चिमुकला थेंब, 

 

त्याच्या मनात मात्र घनघोर वादळ. 

पाण्याची वाफ आणि वाफेचं पुन्हा पाणी. 

एवढंच का माझं आयुष्य?

नाहीतर मग 

असंच मातीत कोसळून 

नि:शेष होऊन जाण्याचं?

 

निराशेनं थेंब किंचितसा घरंगळला. 

पान खाली झुकलं. 

नव्यानेच उगवलेल्या एका किरणानं 

थेंबाला कवेत घेतलं…..  

…… आणि लाखो प्रकाश शलाका 

एकदम प्रकटल्या. 

त्याच रंगांनी नटलेलं एक चिमुकलंसं 

फुलपाखरू बागडत आलं 

आणि …. 

क्षणार्धात 

तो रंगीत थेंब पिऊन 

निघूनही गेलं कुठेसं….. 

 

कवयित्री : सुश्री भारती पांडे 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काही कळलंच नाही… कवी – ना.धो. महानोर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ काही कळलंच नाही… कवी – ना.धो. महानोर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

का कुणास ठाऊक, 

काही कळलंच नाही,   

*मन मात्र म्हणतंय तरुण आहे मी..*

 

कसा संपला ०६ पासून ६० वयापर्यंतचा हा प्रवास,

काही कळलंच नाही.

 

काय मिळवलं, काय कमावलं,

काय गमावलं,

काही कळलंच नाही.

 

संपलं बालपण,

गेलं तारुण्य,

केव्हा आलं ज्येष्ठत्व,

काही कळलंच नाही.

 

काल मुलगा होतो, 

केव्हा बाप आणि नंतर सासरा झालो, 

काही कळलंच नाही.

 

केव्हा ‘बाबा’ चा

‘आबा’ होऊन गेलो,

काही कळलंच नाही.

 

कोणी म्हणतं साठी बुद्धी नाठी,

कोणी म्हणतं हाती आली काठी,

काय खरं आहे, 

काही कळलंच नाही.

 

पहिले आई बापाचं चाललं,

मग बायकोचं चाललं,

मग चाललं मुलांचं, 

माझं कधी चाललं, 

काही कळलंच नाही.

 

बायको म्हणते, 

आता तरी समजून घ्या , 

काय समजू,

काय नको समजू, 

कां कुणास ठाऊक, 

काही कळलंच नाही.

        

मन म्हणतंय तरुण आहे मी,

वय म्हणतंय वेडा आहे मी,

या साऱ्या धडपडीत केव्हा 

गुडघे झिजून गेले, 

काही कळलंच नाही.

 

झडून गेले केस, 

लोंबू लागले गाल,

लागला चष्मा, 

केव्हा बदलला हा चेहरा 

काही कळलंच नाही.

 

काळ बदलला,

मी बदललो

बदलली मित्र-मंडळीही

किती निघून गेले, 

किती राहिले मित्र,

काही कळलंच नाही.

 

कालपर्यंत मौजमस्ती

करीत होतो मित्रांसोबत,

केव्हा सीनियर सिटिझनचा 

शिक्का लागून गेला, 

काही कळलंच नाही.

 

सून, जावई, नातू, पणतू,

आनंदी आनंद झाला, 

केव्हा हसलं उदास हे जीवन,

काही कळलंच नाही.

 

भरभरून जगून घे जीवा

मग नको म्हणूस की,

“मला काही कळलंच नाही……. 

 

कवी – ना.धो. महानोर

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विठूमाऊलीचा प्रसाद ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

विठूमाऊलीचा प्रसाद ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

आर्मी सर्व्हिसेस कोरचे कॅप्टन प्रकाश कदम पंढरपूरला विठूमाऊलीच्या दर्शनाला आले होते. आज त्यांची सुट्टी संपत होती. दर्शन झालं की इथून मुंबई आणि मग तिथून पोस्टिंगवर – ड्युटीवर रुजू व्हायचं म्हणून कॅप्टनसाहेब लष्करी गणवेषातच दर्शनाला आले होते.

दर्शन झालं, आता बाहेर पडणार एवढ्यात एका छोट्या मुलीनं त्यांना हटकलं – काका, तुम्हीपण सैन्यात आहात ना ? इथून आता शत्रूशी ढिशूम ढिशूम करायला तुम्ही काश्मीरला जाणार ना ? माझे बाबाही तिथेच आहेत. त्यांच्यासाठी हा विठोबाचा प्रसाद घेऊन जाल ? आई म्हणते बाबा आता कधीच परत येणार नाहीत, त्यांना एवढा प्रसाद तर द्या.

आणि कदमांचा पंढरपूरचा मित्र त्यांच्या कानात कुजबुजत सांगत होता – ही उमंग. शहीद मेजर कुणाल गोसावींची मुलगी. मेजरसाहेब २०१६ साली काश्मीरमध्ये नग्रोटा इथे अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले, तेव्हा ही फक्त ४ वर्षांची होती….

कदमांच्या डोळ्यात पाणी तरारलं आणि त्यांना पुढचं काही ऐकूच आलं नाही.

लेखक : मकरंद पिंपुटकर 

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ असेही… तसेही… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ असेही… तसेही… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

पास होण्या पुरते ३५% मिळवूनही खूश होऊन पार्ट्या  देणारे आणि ९५% मिळवूनही २% कमीच पडले म्हणून रडत बसणारेही बघितले.

जॉब अचानक गेल्यामुळे आता तसंही दुसरा जॉब मिळेपर्यंत अनायसे सुट्टीच आहे तर मस्त फिरुन येऊ म्हणणारे आणि अपेक्षित Increment मिळालं नाही म्हणून करुन ठेवलेले Flight Bookings कॅन्सल करुन घरात उदास बसून राहणारेही बघितले आहेत.

जिभेच्या कॅन्सरमुळे नाकात नळी असतांनाही उत्साहाने गर्दीत जाऊन पहिल्या रांगेत बसून नाटक एन्जॉय करणारा आणि नको त्या गर्दीत नाटक बिटक..  उगीच कशाला आजाराला निमंत्रण म्हणून घरात बसून राहणाराही बघितला आहे.

बाल्कनीतून किती छान दिसतोय इंद्रधनुष्य म्हणून दोन्ही काखेत crutches लावून तरातरा बाल्कनीत बघायला जाणारा आणि कितीदा बघितलाय यार फोटोत, त्यात काय बघायचं..  म्हणत लोळत पडून राहणारा त्याचा रुम पार्टनरही बघितला आहे

फर्निश्ड थ्री बीएचके फ्लॅटमधे,  तेव्हाच थोडे पैसे अजून टाकून फोर बीएचके घेऊन टाकायला हवा होता म्हणून हळहळत बसणारे नवरा बायको..  आणि एकाच खोलीत काहीच पुरेसं नसूनही हसतखेळत आनंदात राहणारं पाच जणांचं एक कुटुंबही बघितलं आहे.

हे नको खायला ..  असं होईल, ते नको प्यायला .. तसं होईल..  ह्या टेंशनमधे ठराविक मोजकं मिळमिळीत खाऊन पिऊनही अटॅकची चिंता डोक्यात ठेवणारे,  आणि जातील त्या ठिकाणी मिळेल ते झणझणीत चटपटीत  बिनधास्त खाऊनही ‘ काही नाही होत यार ‘ म्हणत मजेत असणारे खवय्येही बघितले आहेत.

आयुष्य सगळ्यांना सारखंच मिळालेलं असतं ..  पण काही ते फुलवत जगतात , काही सुकवत जगतात

आता त्याला कोण काय करणार —-  जगा की बिनधास्त…….. 

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवाशी संवाद … ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ देवाशी संवाद  ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆ 

माणूस :  देवा रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारु का ?

देव :  विचार ना .

माणूस :  देवा , माझा आजचा दिवस तू एकदम खराब केलास . असं का केलंस तू देवा ?

देव :  अरे काय झालं पण ?

माणूस :  सकाळी अलार्म वाजलाच नाही . मला उठायला खूप उशीर झाला .

देव :  बरं मग ?

माणूस :  मग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती . कशीबशी रिक्षा  मिळाली .

देव :  मग ?

माणूस  :  आज कँटीन पण बंद . बाहेर सँडविच खाल्लं . ते पण  बेकार होतं .

देव :  (नुसताच हसला )

माणूस :  मला एक महत्त्वाचा फोन आला होता . त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला .

देव :  बरं मग

माणूस  :  संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती . मी इतका थकलो होतो की ए . सी . लावून       झोपणार होतो . का तू असं केलंस देवा माझ्या बरोबर ?

 देव :  आता नीट ऐक —- आज तुझा मृत्यूयोग होता . मी माझ्या देवदूतांना पाठवून तो थांबवला . त्या गडबडीत अलार्म पण थांबला .तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरला अपघात होणार होता .कँटीनच्या जेवणातून तुला विषबाधा होणार होती . ते  सँडविच वर निभावलं .तुझा फोन मी बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात अडकवणार होता .संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्टसर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली .

माणूस :  देवा मला क्षमा कर .

देव :  क्षमा मागू नकोस . फक्त विश्वास ठेव . माझ्या योजनांविषयी कधीच शंका घेऊ नकोस . आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं त्याचा अर्थ फार उशीरा लागतो आपल्याला 

— आपण खरंच देवावर श्रद्धा आहे असं म्हणतो . मग श्रवणाच्या वेळी डुलक्या का येतात ? – तीन तासाच्या पिक्चरमध्ये जराही झोप येत नाही . …

— आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि  नको ते मेसेज फॉरवर्ड करतो …..

—  देवाशीच संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं

माणूस हा सवडीनुसार वागत असतो …! चहात माशी पडली तर चहा फेकून देतो , पण साजूक तूपात माशी पडली तर तो माशी फेकून देतो ..  तूप नाही .. अगदी तसच …आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही न बोलता ती पोटात घालतो, पण जर नावडत्याने केली तर आकांडतांडव करून बोभाटा करतो.  

—  ‘ माझं ‘ म्हणून नाही ” आपलं ” म्हणून जगता आलं पाहिजे …

—  जग खूप ‘ चांगलं ‘ आहे, फक्त चांगलं ” वागता ” आलं पाहिजे …

– सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।

— समुद्र आणि वाळवंट कितीही आथांग असले, तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही 

… देह सर्वांचा सारखाच।

           …… फरक फक्त विचारांचा।

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हातात सगळं आयतं पाहिजे….!!!! ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचताना वेचलेले ?

☆ हातात सगळं आयतं पाहिजे….!!!! ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

नागरीक मी भारत देशाचा

हातात सगळं आयतं पाहिजे….!!!! 

 

वीज कधी वाचवणार नाही

बील मात्र माफ पाहिजे….!!!! 

 

झाड एकही लावणार नाही

पाऊस मात्र चांगला पाहिजे….!!!! 

 

तक्रार कधी करणार नाही

कारवाई मात्र लगेच पाहिजे….!!!! 

 

लाचेशिवाय काम करणार नाही

भ्रष्टाचाराचा मात्र अंत पाहिजे….!!!! 

 

कचरा खिडकीतून बाहेर टाकीन

शहरात मात्र स्वच्छता पाहिजे….!!!! 

 

कामात भले टाईमपास करीन

दर वर्षी नवा वेतन आयोग पाहिजे….!!!! 

 

जातीच्या नावाने सवलती घेईन 

देश मात्र धर्मनिरपेक्ष पाहिजे….!!!! 

 

मतदान करताना जात पाहीन

जातीयता  मात्र बंद झाली पाहिजे….!!!! 

 

कर भरताना पळवाटा शोधीन

विकास मात्र जोरात झाला पाहिजे….!!!! 

 

नागरीक मी भारत देशाचा

हातात सगळं आयतं पाहिजे….!!!! 

हातात सगळं आयतं पाहिजे….!!!! 

 

 – कवी अज्ञात

संग्रहिका : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ”सा रं  का ही  स्व तः सा ठी…” – कवी :  मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुप्रिया केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

🍃 ”सा रं  का ही  स्व तः सा ठी…” – कवी :  मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

।। देवधर्म पूजाअर्चा

।। सारं असतं स्वतःसाठी

।। देवाला यातलं काही

।। नको असतं स्वतःसाठी

 

।। फुलं अर्पण करतो देवाला

।। ती काय त्याच्याकडे नाहीत म्हणून ?

।। सारी पृथ्वीच ज्याचा बगिचा

।। त्याला काय करायचंय फुलं घेऊन ?

 

।। नैवेद्य जो आपण दाखवतो

।। तो काय देव खातो ?

।। तो तर स्वतःच प्राणीमात्रांचं

।। भरणपोषण करीत असतो !

 

।। निरांजनाच्या इवल्या ज्योतीने

।। ओवाळतो आपण प्रभूला

।। चंद्रसूर्य जातीने

।। हजर ज्याच्या दिमतीला

 

।। स्तोत्रं त्याची गातो ती काय

।। हपापलाय म्हणून स्तुतीला ?

।। निर्गुण निराकार जो

।। त्याला अवडंबर हवंय कशाला ?

 

।। सारं काही जे करायचं

।। ते स्वतःसाठीच असतं करायचं,

।। प्रार्थनेनं देव बदलत नसतो

।। स्वतःच स्वतःला असतं सुधारायचं !

 

|। आवडलेल्या आमटीचा

।। आवाज करीत मारता भुरका

।। विश्वास ठेवा यात काही पाप नाही,

।। आनंदाने जगायचं नाकरणं

।। याच्यासारखा दुसरा शाप नाही !

 

।। जबरदस्त डुलकी येते

।। धर्मग्रंथ वाचता वाचता !

।। लहान बाळासारखे तुम्ही

।। खुर्चीतच पेंगू लागता !

।। विश्वास ठेवा यात काही पाप नाही,

।। आनंदाने जगायचं नाकारणं

।। याच्यासारखा दुसरा शाप नाही !

 

।। देवळापुढील रांग टाळून

।। तुम्ही वेगळी वाट धरता !

।। गरम कांदाभजी खाऊन

।। पोटोबाची पूजा करता !

।। विश्वास ठेवा यात काही पाप नाही,

।। आनंदाने जगायचं नाकारणं

।। याच्यासारखा दुसरा शाप नाही !

 

।। प्रेमाची हाक येते

।। तुम्ही धुंद साद देता !

।। कवितेच्या ओळी ऐकून

।। मनापासून दाद देता !

।। विश्वास ठेवा यात काही पाप नाही,

।। आनंदाने जगायचं नाकारणं

।। याच्यासारखा दुसरा शाप नाही !

कवी :  मंगेश पाडगावकर 

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पॉझिटिव्ह थिंकिंग — ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ पॉझिटिव्ह थिंकिंग — ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

शाळेत असताना  टीचरकडून हातावर छडी पडल्यावर मी नेहमी माझ्या हाफ पँटला हात पुसून दुसरा हात पुढे करत असे….

कारण मी हातावरील छडीची घाण पुसायचो..

तसा साफसफाईच्या बाबतीत मी खूपच जागरूक होतो!

माझ्या शालेय दिवसांमध्ये माझे शिक्षक बर्‍याचदा माझ्या आई वडिलांना घेऊन यायला सांगत. कदाचित ते मला काहीही  direct सांगायला मला घाबरत असावेत…

मी जे काही लिहायचो ते वाचायला माझ्या शिक्षकांना खूप आवडत असावं,  माझ हस्ताक्षरच त्याला कारणीभूत असणार.. म्हणूनच बऱ्याच वेळा ते मला एकच उत्तर 10 वेळा लिहून आणायला सांगत असत…

कितीतरी वेळेला शिक्षक मला न विचारता त्यांचा chalk माझ्या दिशेने फेकत असत…

उद्देश एकच होता की मी नेहमीच अतिशय दक्ष असावं.. 

परीक्षेच्या वेळी नेहमीच 3-4 शिक्षक मला सुरक्षा देण्यासाठी माझ्या बेंचच्या आजुबाजूलाच पूर्ण exam संपेपर्यंत उभे राहत असत..

अगदी Z security च असायची!

कितीतरी वेळा मला बेंचवर उभं करून माझा सन्मान करण्यात येत असे.. 

म्हणजे मी इतर सर्व मुलांना व्यवस्थित दिसून त्यांनी माझ्याकडून प्रेरणा घ्यावी, हाच प्रमुख उद्देश असावा…

शिक्षकांना माझ्या आरोग्याची विशेष काळजी होती..माझ्या शरीराला vitamin D आणि भरपूर ऑक्सिजन असलेली  मोकळी हवा मिळावी, ह्यासाठी मला बर्‍याच वेळा सकाळच्या कोवळ्या उन्हात बाहेर उभा करत असत. आणि मैदानाला रोज ५-५ फेर्‍या पण मारायला सांगितल्या जात असत…. हु:! तेव्हा बाकीची मुलं मात्र वर्गात घामाघूम होऊन त्या कोंडलेल्या,  गुदमरलेल्या वातावरणात शिकत असत.. 

तसा मी इतर मुलांपेक्षा खूपच हुशार असल्यामुळे माझे बहुतेक शिक्षक मला नेहमीच म्हणत असत…. 

“ तू शाळेत का येतोस? …खरं तर तुला ह्याची काहीच गरज नाहीये…” 

वा !!! काय सोनेरी दिवस होते ते ….  अजूनही आठवतात मला !

— यापेक्षा पॉझिटिव्ह थिंकिंग वेगळं असूच शकत नाही —–

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पत्त्यांचा खेळ… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ पत्त्यांचा खेळ… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

५२ पत्ते याबद्दल आजवर वाईट किंवा फारतर टाईमपास एवढेच आपण सर्वांनी ऐकले किंवा पाहिले असेल पण ही खालील माहिती नक्की वाचा. पत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो- ह्या पलीकडे आपल्याकडे माहिती नाही. पत्त्यांविषयी जाणून घेऊ.

पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुठ्ठ्याचे  किंवा प्लास्टिकचे बनविलेले असतात. 

बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट. या चार प्रकारात प्रत्येकी १३ पत्ते मिळून ५२ पत्त्याचा संच होतो.     

—  पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दश्शीपर्यन्त, गुलाम, राणी, राजा, याशिवाय 2 जोकर असतात.

१) ५२ पत्ते म्हणजे ५२ आठवडे

२) ४ प्रकारचे पत्ते म्हणजे ४ ऋतु. 

प्रत्येक ऋतूचे १३ आठवडे.

३) या सर्व पत्त्याची बेरीज ३६४

४) एक जोकर धरला तर ३६५ म्हणजे १ वर्ष.

५) २ जोकर धरले तर ३६६ म्हणजे लीप वर्ष.

६) ५२ पत्यातील १२ चित्रपत्ते म्हणजे १२ महिने

७) लाल आणि काळा रंग म्हणजे दिवस आणि रात्र.

पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ

१) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश

२) तिर्री म्हणजे ब्रम्हा,विष्णू आणि  महेश

३) चौकी म्हणजे चार वेद —  (अथर्ववेद, सामवेद,ऋग्वेद, यजुर्वेद)

४) पंजी म्हणजे पंचप्राण —  (प्राण, अपान, व्यान, उदान ,समान)

५) छक्की म्हणजे षडरिपू —  (काम ,क्रोध,मद,मोह, मत्सर, लोभ)

६) सत्ती- सात सागर

७) अठ्ठी – आठ सिद्धी

८) नववी- नऊ ग्रह

९) दश्शी – दहा इंद्रिये 

१०) गुलाम- मनातील वासना 

११) राणी- माया

१२) राजा-सर्वांचा शासक

१३) एक्का- मनुष्याचा विवेक

१४) समोरचा भिडू – प्रारब्ध

मित्रांनो, लहानपणापासून पत्ते बघितले. असतील काहींनी खेळले असतील.  परंतू त्या पत्त्यांच्या संचाबद्दल अशा प्रकारची माहिती होती का ? 

त्याचे उत्तर बहुदा नाहीच असेल. आहे ना गंमतीशीर आणि ज्ञानदायी.?

पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला, तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते !!!

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares