मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “टाहो…” – लेखिका : सुश्री सई परांजपे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “टाहो…” – लेखिका : सुश्री सई परांजपे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

मराठी भाषेवर चालून आलेली कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. खरं तर मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो? या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं..  

‘आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी’ कवी यशवंत यांची केवढी हृदयस्पर्शी ही कविता. पण आता ही गोड हाक कानी येत नाही. कारण सुमारे दहा-पंधरा वर्षांपूर्वी पाहता पाहता सगळ्या आया गायब झाल्या. रातोरात घराघरांमधून ‘मम्या’ अवतरल्या. त्यांनी अवघी भूमी व्यापली. ‘का गं?’ मी आमच्या गंगूबाईंना विचारलं, ‘मम्मी कशी काय झालीस? आई म्हणवून घ्यायला लाज वाटते?’ गंगूबाईंनी चोख उत्तर दिलं, ‘अवो साळंतल्या, शेजारपाजारच्या समद्या पोरी ‘मम्मी’ म्हणूनच हाक मारतात की. प्रियांकाबी हटून बसली बगा. काय करणार!’ खरं तर या मम्मीपदामुळे गुदगुल्या होत असणार या तमाम माऊली वर्गाला.

गोरा साहेब गेल्यानंतर, आज इतक्या वर्षांनी त्याच्या भाषेनं मराठी भाषेवर घाला घातला आहे. चोरपावलांनी इंग्रजी शब्द आपल्या भाषेत घुसले. या आक्रमणामुळे भल्या भल्या मराठी शब्दांचं उच्चाटण झालं. साहेबाची भाषा धड न का बोलता येईना, पण त्याच्या शब्दांची उधळण करीत मराठीतून तारे तोडीत राहिलं, की आपला भाव वधारतो अशी समजूत असावी. अशा किती शब्दांनी आपल्या बोलीमध्ये चंचूप्रवेश करून मूळ मराठी शब्द कालबा करून टाकले आहेत. वानगीदाखल सांगायचं म्हटलं तर रंग, खोली, स्वयंपाकघर, मोरी, दिवा, पंखा, रस्ता, रहदारी, गाडी, आगगाडी, इमारत, रजा, सण, इ. इ. आपले रोजचे चलनी शब्द आता वळचणीत दडून बसले आहेत. कलर, रूम, किचन, बाथरूम, लाइट, फॅन, रोड, ट्रॅफिक, कार, ट्रेन, बिल्डिंग, लीव्ह, फेस्टिव्हल या इंग्रजी प्रतिशब्दांनी त्यांचं उच्चाटण केलं आहे. हे घुसखोर शब्द लवकरच टेबल, स्टेशन, मशीन, फ्लॅट या मराठीत सामावून गेलेल्या शब्दांच्या पंगतीला जाऊन बसतील, यात शंका नाही. पण आपल्या साध्या सुटसुटीत शब्दांना का म्हणून रजा द्यावी? ‘लेफ्ट-राइट’च्या कवायतीत बिचारे डावे-उजवे दिशा हरवून बसले आहेत. रिक्षावाल्याला ‘डावीकडे वळा’ सांगितलं, की तो लगेच ‘म्हणजे लेफ्ट ना?’ अशी खात्री करून घेतो. मायबोलीला ही जी लागण झाली आहे, तिचा प्रत्यय रोजच्या जीवनात पदोपदी येतो. पावलोपावली साक्ष पटते. रस्त्यावरून जाताना दुतर्फा दुकानं न्याहाळली तर औषधाला एकही पाटी शुद्ध मराठीमध्ये दिसणार नाही. पैजेवर सांगते. अमुक टेलर, तमुक शू मार्ट, हे फ्रुट स्टोर, ते टॉय शॉप, व्हरायटी आर्केड, स्टेशनरी, ट्रॅव्हल कंपनी, मिनी मार्केट अशीच साहेबी बिरुदं मिरवणारी दुकानं आढळतात. चविष्ट फराळ म्हणायला ओशाळवाणं वाटतं. टेस्टी डिशेश (डिशेसचा अपभ्रंश) घ्यायला रिफ्रेशमेंट हाऊसमध्ये गेलं की कसं फुल सॅटिसफॅक्शन वाटतं. दादरला पूर्वी एक दुकान होतं. लाडूसम्राट. किती गोजिरं नाव! धेडगुजरी बिरुदांच्या दाटीमध्ये ही साधी पाटी कशी शोभून दिसे. अलीकडे नाही दिसली. इंग्रजी नावाच्या सोसाचा एक अतिरेकी नमुना सांगते. ‘रॅंस्र्’ या शब्दावरून ‘रॅ़स्र्स्री’ म्हणजे छोटेखानी गोदाम हा शब्द प्रचलित आहे. त्याचं स्पेलिंग वेगळं असलं तरी उच्चार ‘शॉप’ असाच आहे, ‘शॉप्पी’ नव्हे. पण बिचाऱ्या हौशी दुकानदारांना हे नाही ठाऊक. त्यांनी जर शब्दकोशात डोकावण्याची तसदी घेतली असती, तर ‘शॉप्पी’चे हास्यास्पद फलक झळकले नसते.

मराठी भाषेवर चालून आलेली ही कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. ही लाट वर्ण, वर्ग, वय, सामाजिक वा आर्थिक दर्जा वा शिक्षण- कोणत्याच बाबतीत भेदभाव करीत नाही. ती खरी लोकशाही पाळते. जरा सुस्थितीमधल्या मंडळींना सगळं काही ‘कूल’ हवं असतं. त्यांना घडीघडी ‘चिल्’ व्हायचं असतं. ती मंडळी ‘जस्ट’ येतात आणि जातात. अशिक्षित वर्गदेखील हौसेहौसेने इंग्रजी शब्दसंपत्ती उधळतो. ‘काल शीक होतो, मिशेश म्हटल्या की काय मोटा प्राब्लेम नाही. टेन्सन घेऊ नका’ अशी भाषा सर्रास ऐकू येते. आमच्याकडे सरूबाई कामाला होत्या. त्यांना मधुमेह असल्यामुळे सतत त्या ‘युवरीन’ (यूरीन) तपासायच्या गोष्टी करायच्या. हल्लीची तरुण मंडळी एकमेकांना ‘डय़ूड’ किंवा ‘ब्रो’ म्हणण्यात धन्यता मानतात. दोन-चार जण असतील तर ‘गाइज्’. गोऱ्यांच्या संभाषणशैलीचं अनुकरण करायला हरकत नाही, पण त्यांच्या शिस्तीचं काय? सुसंस्कृत पाश्चिमात्य पिढी आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याबद्दल दक्ष असते. गळ्यात गळे घालून तिघा-चौघांनी रस्ता अडवून चालणं, मोबाइलवर बोलत गाडी हाकणं, ऐन कोपऱ्यावर टोळक्याने ‘शाइनिंग करीत’ उभं राहणं, असले प्रकार सहसा प्रगत देशांमध्ये आढळून येणार नाहीत.

बहुसंख्य जाहिराती या तरुणांना उद्देशूनच योजलेल्या असतात. तेव्हा त्या तरुणाईच्या भाषेतून बोलल्या तर नवल नाही. पण मराठी (वा हिंदी) शब्द न वापरण्याची या जाहिरातवाल्यांनी शपथ घेतली आहे की काय, असा कधीकधी प्रश्न पडतो. ‘राहू यंग’ हे त्यांचं घोषवाक्य; अमुक क्रीम फेस क्लिअर करते; तमुक साबणाने स्किन सॉफ्ट आणि स्मूथ होते; या शांपूने केस सिल्की होतात, तर त्या ऑइंटमेंटने डोळ्याखालच्या ब्लॅक सर्कल्सना गुडबाय करता येते.. तर मंडळी, आता स्पीक!

करमणुकीच्या क्षेत्रातदेखील आपल्या मातृभाषेबद्दल विलक्षण उदासीनता आहे. नाटकांची नावे पाहिली की, मराठी शब्द सगळे झिजून गेले की काय अशी शंका वाटते. ऑल द बेस्ट, फायनल ड्राफ्ट, लूज कंट्रोल, बॅलन्सिंग अ‍ॅक्ट, गेट वेल सून, प्लेझंट सरप्राइझ, ऑल लाइन क्लियर आणि अशी किती तरी. चित्रपटांची तीच गत आहे. पोस्टर बॉयज, शुगर, सॉल्ट आणि प्रेम, पोस्टर गर्ल, फॅमिली कट्टा, हंटर, चीटर, लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड, सुपर स्टार, बाइकर्स अड्डा, हे झाले काही नमुने. आकाशवाणी आणि प्रकाशवाणीवर तर सर्व मंडळी आपली खास गंगाजमनी भेसळ भाषाच बोलतात. निवेदक, वक्ते, नट, बातमीदार, तज्ज्ञ, स्पर्धक आणि पंच, झाडून सगळे जण. उदाहरणं देत बसत नाही (किती देणार?) पण आपल्या टी.व्ही. सेटचं बटण दाबलं तर प्रचीती येईल. मी चुकूनही मराठी कार्यक्रम पहात नाही. आपल्या भाषेच्या चिंधडय़ा उडताना नाही बघवत. मुलं म्हणतात, ‘‘काही तरीच तुझं. जमाना बदलतो आहे. भाषा बदलणारच.’’ कबूल, पण दुर्दैव असं की, मी नाही बदलले. माझ्या या आग्रही वृत्तीमुळे घरात मराठी वृत्तपत्रदेखील मी घेत नाही. ‘आजची यंग जनरेशन फ्रस्ट्रेटेड का?’, ‘दबावांच्या टेरर टॅक्टिक्स’, ‘तरुण जोडप्याचा सुइसाइड पॅक्ट’ असे मथळे; आणि लाइफ स्टाइल, हेल्थ इज वेल्थ, स्टार गॉसिप, हार्ट टु हार्ट, अशी सदरं पाहिली की वाटतं, सरळ इंग्रजी वृत्तपत्रच का घेऊ नये? ‘तुम्हाला आपल्या भाषेचं प्रेम नाही?’ मला विचारतात. प्रेम आहे म्हणून तर हा कठोर नियम मी लागू केला आहे. माझा स्वत:चा असा खासगी निषेध म्हणून मी इंग्रजी बिरुदं मिरवणारी नाटकं आणि सिनेमे पहात नाही. दृष्टीआड भ्रष्टी.

इतका वेळ मी इंग्रजी शब्दांच्या आगंतुकीवर आग पाखडून, आपले शब्द नाहीसे होत आहेत याबद्दल खेद व्यक्त केला; पण शब्दच काय- अवघी भाषाच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आज आपल्या असंख्य लहान मुलांना मराठी नीट लिहिता- वाचता- बोलता येत नाही. ‘मम्मी, व्हॉट इज प्रतिबिंब?’ असं आमचा मिहिर विचारीत होता, अशी लाडाची तक्रार अलीकडेच कानी आली; पण त्याबद्दल खेद वाटण्याऐवजी मम्मीला खोल कुठे तरी अभिमानच वाटत होता. इंग्रजी येणं, हे आजच्या काळाची नितांत गरज आहे, याबद्दल दुमत नाही. सद्य:युगामधली ती प्रगतीची भाषा आहे, हे कुणीही मान्य करील; पण इंग्रजी अथवा मराठी, या दोन भाषांमधून एकीची निवड करा, असा प्रश्नच नाही आहे. इथे निवड नव्हे तर सांगड घालण्याबद्दलची ही किफायत आहे. आजच्या जमान्यात मुलांना तीन भाषा यायला हव्यात- मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषा- इंग्रजी. दुर्दैव असं की, या तिन्हीपैकी एकही भाषा उत्तम येते असं कुणी क्वचितच आठवतं. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी विशेष दक्ष राहिलं पाहिजे. हे अशक्य नाही, हे मी स्वानुभवाने सांगते. सात ते अकरा वर्षांमधल्या माझ्या बालपणीचा काळ ऑस्ट्रेलियात गेला, कॅनबेरा शहरात. साहजिकच शाळा इंग्रजी होती आणि झाडून सगळ्या मित्रमैत्रिणी इंग्रजी बोलणाऱ्या, पण घरात मात्र कटाक्षाने शुद्ध मराठी बोलले जाई.

मी मराठी पुस्तकं वाचीत असे आणि दिवसाकाठी दोन-तीन पानं काहीबाही मराठीतून लिहिण्याची मला सक्ती असे. दुर्दैवाने मला मिळालेला हा वसा पुढे चालू ठेवण्यात मी अपयशी ठरले. माझ्या मुलीची मुलं मराठीमधून विचारलेल्या प्रश्नांना इंग्रजीतून उत्तरं देतात. सुरुवातीला मी अन्शुनीला माझ्याबरोबर मराठीतून बोलायची सक्ती करीत असे; पण मग पुढे मी येणार आहे हे कळताच, आता मराठी बोलावं लागणार म्हणून ती धास्तावते, असं विनीने मला सांगितलं. तेव्हा मी तो नाद सोडून दिला. एका व्यक्तिगत पराभवाची नोंद झाली.

उद्याच्या मराठी भाषादिनी, या भाषेवर मनापासून प्रेम करणाऱ्या दोन व्यक्तींची आवर्जून आठवण करावीशी वाटते.

सुमारे चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी मॅक्सीन (आडनाव आठवत नाही) नावाची तरुण अमेरिकन विद्यार्थिनी मराठी भाषा शिकण्यासाठी महाराष्ट्रात येऊन राहिली होती. पाहता पाहता ती उत्तम मराठी बोलू लागली. एवढंच नव्हे तर पुढे तिने फलटणला चक्क मराठी शाळा काढली. फलटणला एका पार्टीत ती मला भेटली. ती काठापदराचं लुगडं नेसली होती. ‘छान साडी आहे तुमची,’ मी तिला म्हटलं. मॅक्सीन हसून म्हणाली, ‘मळखाऊ आहे.’ तिचा हा शब्द मी आजतागायत विसरले नाही. दुसरा उल्लेख आहे माजी तुरुंगाधिकारी उद्धव कांबळे यांचा. बिकट परिस्थितीला तोंड देऊन, उत्तम प्रकारे आपलं शिक्षण पूर्ण करत कांबळे यांनी पुढे यूपीएससीची परीक्षा दिली. ही परीक्षा मराठीमधून देणारे ते पहिले विद्यार्थी. पुढे त्यांच्या क्षेत्रात एक अतिशय सक्षम अधिकारी म्हणून त्यांनी नाव कमावलं. मराठी भाषेवर त्यांचं निस्सीम प्रेम असून समर्पक सुंदर प्रतिशब्दांची त्यांनी एक सुंदर यादी बनवली आहे. माझ्या ‘आलबेल’ नाटकाच्या आणि पुढे ‘सुई’ या एड्सवरच्या लघुपटाच्या तुरुंगाबाबतच्या प्रवेशांसाठी त्यांची बहुमोल मदत झाली.

काही वर्षांपूर्वी मराठी भाषा तारण्यासाठी शिवसेनेनं झेंडा फडकावला होता. कुरकुरत का होईना, पण जनतेनं- आणि विशेष करून दुकानदारांनी तिची दखल घेतली; पण पुढे हा संग्राम मंदावला आणि परकीय पाहुणीचं- इंग्रजीचं फावलं. खरं तर, मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो? या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? इमारतीला सदन, हवेली किंवा महाल म्हणण्याऐवजी ‘हाइट्स’ किंवा ‘टॉवर्स’ म्हटलं की तिची उंची वाढते का? कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं. त्यासाठी जागतिक मराठी परिषदेचं अधिवेशन भरण्याची वाट पाहू नये.

लहानपणी केलेले एक अवलोकन मला छान आठवतं. सभोवतालची वडीलधारी मंडळी बदलत्या चालीरीती, पुसट होत चाललेले रीतिरिवाज आणि तरुण पिढीचे एकूण रंगढंग, यावर सतत तोंडसुख घेत असत. त्याचं मला फार वैषम्य वाटायचं. आपण मोठं झाल्यावर चुकूनसुद्धा असं काही करायचं नाही, असा मी ठाम निश्चय केला होता; पण काळ लोटला तसा तो निर्धार शिथिल झाला असावा. मीही आता जनरूढीच्या बदलत्या आलेखाबद्दल तक्रारीचा सूर आळवू लागले आहे, याची मला कल्पना आहे. तसंच तळमळीचे हे माझे चार शब्द म्हणजे निव्वळ अरण्यरुदन ठरणार आहे याचीही मला पूर्ण जाणीव आहे. पण काय करू? मामलाच तसा गंभीर आहे. प्रसंग बाका आहे. आपली मायबोली काळाच्या पडद्यामागे खेचली जात आहे आणि ‘कुणी मला वाचवा होऽ’ असा टाहो फोडते आहे; पण ही हाक कुणाला ऐकूच जात नाही, कारण तिची लेकरं बहिरी झाली आहेत. डेफ् ..  स्टोन डेफ्!

  ☆

लेखिका : सई परांजपे

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुरुषाचे घर, घरचा पुरुष… – लेखक – डॉ. आशुतोष जावडेकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ पुरुषाचे घर, घरचा पुरुष – लेखक – डॉ. आशुतोष जावडेकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

‘ पुरुषाचं घर, घरचा पुरुष ‘ 

कुटुंब व्यवस्था निर्माण झाली आणि कर्तेपण आपसूक पुरुषाकडे आलं. पिढ्यान्पिढ्या हे पद सांभाळताना त्याची किती दमछाक झाली असेल याचा विचार केला जातोच असं नाही. कालौघात पुरुष म्हणून त्याचं असं एक व्यक्तित्व तयार झालं. हा पुरुष घराबाहेरचाही असतो आणि घरातलाही असतो. कसा आहे आजचा पुरुष? त्याच्याकडून असलेली अपेक्षा आणि त्याला इतरांकडून असलेली अपेक्षा यातून हा पुरुष स्वत:ला वेगळं काढू शकतोय का? कुटुंबातली कोणती भूमिका त्याला आवडतेय? की सगळ्याचंच त्याला ओझं होऊ लागलंय? की सगळ्यांसाठी करायचं तर आहे पण… अशा गोंधळलेल्या अवस्थेत तो आहे? 

१९ नोव्हेंबरच्या ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिना’निमित्ताने याविषयी…..

‘मॅडम सेक्रेटरी’ ही दूरचित्रवाणीवरील मला आवडणारी मालिका पुन्हा एकदा बघत होतो. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातील ‘पॉलिसी अॅडव्हायजर’ असलेला जे व्हिटमन अखंड कामात बुडालेला आहे. जगात या ना त्या उलाढाली होत असताना त्याने सतत ‘इमर्जन्सी’मध्ये अडकावं हेही स्वाभाविक. पण आता त्याची बायको या सगळ्याला कंटाळली आहे आणि तिच्या मुलीला घेऊन वेगळी राहायला गेली आहे. परराष्ट्र खात्याच्या सातव्या मजल्यावर लिफ्टपाशी ती हातात कायदेशीर कागदपत्रे घेऊन येते आणि जे ला सांगते, ‘‘जे, आपल्या मुलीची कस्टडी तू माझ्याकडे दे. ती या सगळ्यात गोंधळते आहे. ’’ आधीच्या सगळ्या चर्चांमध्ये स्वत:ला सांभाळून असलेला तो ‘पुरुष’ हे वाक्य ऐकल्यावर मात्र बेभान होतो. त्याची तीन वर्षांची मुलगी हा त्याचा प्राण आहे. तो लेकीला सोडणार नाही हे तो त्रिवार घोषित करतो. पण काम, व्यवसाय आणि कुटुंब यामध्ये आपण सुसंवाद साधू शकणार नाही याची त्याला कल्पना असते. काही दिवसांनंतर तो हृदयावर दगड ठेवून त्याच्या पत्नीला मुलीचा हक्क देतो. ती देखील त्याला म्हणते, ‘‘आपल्या मुलीला तिचा बाप उत्तम आहे हेच कायम मनात राहावं असा माझा प्रयत्न असेल. ’’ आता ती निघून गेली आहे. समजुतीचा अपार थकवा त्या पुरुषाच्या चेहऱ्यावर मला दिसतो आहे. असं वाटतं की, त्याने आता त्वेषाने शेजारच्या भिंतीवर एक ठोसा मारला तर बरं होईल! पण तसं होत नाही, होणार नसतं…

माझ्या नेहमीच्या चालण्याच्या वाटेवर मी कॉफी प्यायला नेहमीच्या ठिकाणी थांबलो आहे. दिवाळीचा काळ असल्यामुळे गर्दी अगदी कमी आहे. इथले वेटर मला आणि मी त्यांना नावानिशी ओळखतो. मी समोर आलेल्या उमेशची चौकशी करत विचारतो, ‘‘भाई उमेश, घर नहीं गए? दिवाली जो हैं!’’ तो हसून त्याची कथा सांगतो. तो उत्तर प्रदेशचा, पण गेली अनेक वर्षं महाराष्ट्रातच आहे. नुकतंच लग्न झालेलं असलं तरी इथल्या शहरी आर्थिक गणितांमुळे आणि त्याच्या पालकांकडे बघण्यासाठी देखील त्याची पत्नी तिथंच गावाकडे राहणार आहे. इथं तो त्याच्या मित्रांबरोबर पुण्यात राहताना भटकंती करेल, मजाही करेल; पण आता माझ्याशी बोलताना त्याच्या चेहऱ्यावर आपल्या घराला फार फार ‘मिस’ करणारा त्याच्यातला मुलगा, पती मला स्वच्छ दिसतो आहे…

मला एकदम पॅरिसच्या मेट्रोत माझ्याशेजारी बसलेला अल्जेरियाचा तो पुरुष आठवतो. आपल्या ‘लोकल’सारखी तिथल्या ‘मेट्रो’मध्ये अखंड बडबड नाही, पण ‘स्विस ट्रेन’मध्ये असते तशी स्मशानशांतताही नाही. त्याचा व्हिडीओ कॉल सुरू आहे. मी सहज स्क्रीनवर बघतो तर समोर वृद्ध माणूस आहे. त्याच्याशी तो हळू आवाजात फ्रेंचमध्ये काही तरी बोलतो. तो बोलताना Pè re असं फ्रेंचमध्ये बोलल्याने मला ते त्याचे वडील असावेत हे कळतं. काही तरी वाद बहुदा सुरू आहे किंवा विसंवाद तरी. तो फोन बंद करतो. ‘मेट्रो’ जोरात धावत असते. डोळे बंद करून तो आता बसला आहे आणि त्याच्या डोळ्यातून नकळत बाहेर पडलेले अश्रू मला नुसते दिसत नाहीत, जाणवत आहेत. आफ्रिकेमधील त्याचा देश सोडून पॅरिसमध्ये कुठल्या तरी हॉटेलमध्ये साफसफाईचं काम करणारा तो पुरुष आणि त्याचं ओरान किंवा अल्गेरियातील खेड्यातलं कुटुंब मी मनोमन कल्पित राहतो.

संपादकांनी मला जेव्हा ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिना’च्या निमित्ताने ‘पुरुष आणि कुटुंब’ या विषयावर लिहायला सांगितलं तेव्हा हे सगळं आठवत गेलं. ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ असतो तसा मुळात ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिन’ असावा की नसावा? यावर टीकाकार समाजमाध्यमांमध्ये उच्चरवात भाष्य करीत असतात. रॅडिकल फेमिनिस्ट मंडळी अजूनही तोंडलीची भाजी किंवा पुरणपोळी पुरुषाला करता येते का? यावर पुरुषाला पास किंवा नापास करणार असतात. दारू पिऊन बायकोला मारणारा पुरुष हे वास्तव अधोरेखित करताना नवऱ्याच्या पैशांवर स्वत: काहीही काम न करता मस्ती आणि माज करणाऱ्या बायकाही असतात हे वास्तव अनेकदा सोयीस्कर विसरलं जातं. आणि पुरुषाचे व्यावसायिक, कौटुंबिक आणि व्यक्तिगत पातळीवर स्त्रियांपेक्षा वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न असू शकतात याकडेही काही वेळा दुर्लक्ष केलं जातं. आणि म्हणून या सगळ्या पैलूंकडे लक्ष वेधून घेणारा ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस’ मला महत्त्वाचा वाटतो. हा पुरुष घराबाहेरचा असतो आणि एक घरातलाही असतो.

कुटुंबामधील पुरुष तरी कुठे एकसंध असतो? अनेक भूमिका तो निभावतो तिथं. म्हणजे ‘उडदामाजी काळे गोरे’ हे आपण गृहीत धरूनदेखील सहसा मुलांचा बाप असलेला पुरुष हा त्यांच्या रक्षणासाठी सिंह बनतो. तो सारखा पोरांकडे लक्ष देईल असेही नाही. पण जिथं आपल्या लेकाचं भावनिक अस्तित्व पणाला लागणार असेल तिथं तो समोरच्यावर तुटून पडेल हे नक्की. आणि लेकीचा बाप असेल तर विचारूच नका! मग तर तो अनेकदा सदोदित हातात तलवार घेऊनच असेल. जेव्हा पुरुष नवरा होतो तेव्हा मात्र तो आपल्या स्त्रीकडे वेगळ्या अर्थी बघतो. आपल्या वाढत्या मुलीविषयी वाटणारी अनुकंपा त्याला आपल्या नांदत्या, जुन्या झालेल्या बायकोविषयी सहसा वाटत नाहीच!

तो स्वयंपाकघरात मदत करतो का? हा प्रश्न खूपदा विचारला जातो. पूर्वीच्या काळापेक्षा नक्कीच आपल्याला चित्र पालटलेलं दिसेल. पण स्वयंपाकघरात काम करणं हीच पुरुषाची इतिकर्तव्यता आहे का? असंही मला कधी कधी वाटतं. एकदा स्वयंपाक करायचा म्हटलं तरी खरेदीपासून फोडणी टाकण्यापर्यंत अनंत कामे असतात. आमची एक मैत्रीण म्हणते तसं, नवरेमंडळींनी स्वयंपाक केला नाही तरी चालेल, पण त्यांनी त्याच्या आधी सतत भाज्या, डाळी आणि कडधान्यांचा स्टॉक बघत राहून खरेदी करणं आणि स्वयंपाक केल्यानंतर ओटा स्वच्छ पुसून ठेवणं एवढं केलं तरी तिला पुरेसं आहे. (मला व्यक्तिश: वाटतं की स्वयंपाक ही गोष्ट शाळेमध्येच मुलग्यांना आणि मुलींना शिकवली गेली पाहिजे. ) पण पुरुष हा पती म्हणून काही फक्त एवढाच कुटुंबात मदतनीस म्हणून नसतो.

शरीराच्या, मनाच्या आणि बुद्धीच्या पातळीवर आपल्या पत्नीसोबत आनंदाची देवघेव करताना किती पुरुष आपल्याला दिसतात? अनेकदा ती देवघेव एकतर्फी असते की काय? असंही मला आसपास बघताना वाटतं. सगळ्या कौटुंबिक भूमिकांमध्ये पुरुषाला सगळ्यात जास्त शिकण्याची संधी कुठे असेल तर ती पती या भूमिकेमध्ये! पतीला पत्नीमध्ये आपली मैत्रीण हवी असते, पण त्याला ती अनेकदा सापडत नाही. पण तो मैत्रिणीशी वागतो तसा पत्नीशी वागतो का हे त्यानेही स्वत:ला विचारण्याची गरज आहे!

पुरुष जसा पती असतो, पिता असतो तसा पुत्रही असतो. आजकाल ही त्याची भूमिका आयुष्यभर संपत नाही. कारण वाढलेली आयुर्मर्यादा! माझे एक साठीतले ज्येष्ठ स्नेही आहेत. त्यांचे वडील आता नव्वदीत आहेत आणि अजून धडधाकट आहेत. आपला मुलगा साठीत आहे हे विसरून ते त्याला अद्याप कुणाही समोर, काहीही बोलत असतात. या गृहस्थाचा तिशीतला मुलगा तर तरुण पिढीच्या ब्रीदाला स्मरून वडिलांचं काहीच ऐकत नाही! ते मला एकदा सांगत होते की, दोन्ही बाजूंनी त्यांची फार कुचंबणा होते. बाकी, आपल्या भारतात तर पुरुष हा कोणाचा भाऊ असतो, काका असतो, मामा असतो, पुतण्या-भाचा असतो आणि या सगळ्या भूमिकांमध्ये त्याला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेळोवेळी पार पाडाव्या लागत असतात. हे सगळे आयाम सांभाळताना पुरुष अनेकदा थकतो हे कधी कधी कोणाच्याच लक्षात येतच नाही.

‘कुटुंबातील पुरुष’ या विषयाकडे बघताना आपण त्याचे व्यावसायिक आयुष्य नजरेआड करू शकत नाही. २०१९ मध्ये भारत सरकारच्या सर्वेक्षणानुसार ८० टक्के भारतीय वडिलांना त्यांच्या मुलांबरोबर वेळ घालवणं महत्त्वाचं वाटतं, अत्यावश्यक वाटतं. पण त्यामधील केवळ ४० टक्के पुरुष हे प्रत्यक्षात त्यासाठी वेळ देऊ शकतात. आकडे खोटे बोलत नाहीत. पुरुषाची होणारी मानसिक कुतरओढ यामध्ये दिसते. पैसे मिळवणं ही पुरुषाची प्राथमिक जबाबदारी मानली गेलेली असल्याने तो बाहेरच्या जगात अधिक गुंतून राहतो- म्हणजे वेळ आणि मन या दोन्ही अर्थाने. ‘युनिसेफ’चा २०१७ मधील जो अहवाल आहे त्यानुसार भारतामधील केवळ २८ टक्के पुरुष हे खऱ्या अर्थाने मुलांचं संगोपन करत असतात. हे प्रमाण इतर अनेक देशांपेक्षा पुष्कळ कमी आहे. तसंही पुरुषांकडे कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कुठलंही ‘इन्स्ट्रक्शन मॅन्युअल’ वा नियमावली नसते. जे तो आसपासच्या समाजात बघतो त्याचाच नकळत कित्ता गिरवत असतो. हा परीघ ओलांडून स्वत:चा विचार करणारी माणसं तशी ही समाजात कमीच असतात. आणि समाजदेखील पुरुषांकडून मुळात आधी त्याने संसारासाठी भरपूर पैसे आणावेत हेच आजही अपेक्षितो! कुठल्याही विवाह संस्थेत नोंदणी केलेल्या लग्न करू इच्छिणाऱ्या तरुणाला याबाबत विचारा! तो कुटुंबप्रमुख स्वेच्छेने होतो की समाज त्याला तसं घडवतो हाही मोलाचा प्रश्न आहे.

खरं तर हा सगळाच एका मोठ्या पुस्तकाचा हा विषय आहे. पण जाता जाता अजून काही माझी निरीक्षणे सांगतो. पुरुषाला कुटुंब कितीही आवडत असलं तरी हजारो, लाखो वर्षांपासून शिकारीला गुहेबाहेर जाणारा आणि दिवसभर भटकणारा पुरुष अद्याप त्याच्या आत आहे. रात्री जेवण झाल्यावर पटकन पानवाल्याच्या इथं मित्रांसोबत जेव्हा पुरुष जातो किंवा रविवारी मुद्दाम सकाळी उठून तो ट्रेकिंगला किंवा सायकल चालवायला जातो तेव्हा तो त्याची ही ‘स्पेस’ मिळवत असतो. म्हणजे स्त्रियांना ‘स्पेस’ भरपूर मिळते असं मी म्हणत नाही. पण त्या त्यांच्या अदम्य उत्साहाने तो वेळ भरून काढतात आणि वर आनंदी राहतात. आत्ताही मी हॉटेलमध्ये बसून लॅपटॉपवर हा लेख लिहीत असताना समोर एक स्त्रियांचा मोठा भिशीचा ग्रुप आला आहे. त्या धमाल करीत आहेत. मजेत सांगायचं तर, त्या सगळ्या बायकांचे हसण्याचे किलकिलाटी आवाज ऐकताना हॉटेलमधील पुरुष काहीसे गांगरूनच गेले आहेत! आणि मला मार्गारिट अॅटवुड या समर्थ लेखिकेचं विधान आठवत आहे : Men are afraid that women will laugh at them. Women are afraid that men will kill them! अनेक कादंबऱ्यांमधून भविष्यातील दु:स्वप्ने दाखवणारी ही समर्थ लेखिका आणि हे तिचं दुर्दैवाने आजही लागू होणारे विधान!

ते विधान आहे तोवर स्त्री आणि पुरुष दोघांनाही बदलण्याची गरज आहे. आणि ती गरज अधोरेखित करणारे दोन्ही आंतरराष्ट्रीय महिला आणि पुरुष दिवस म्हणूनच फार फार अगत्याचे आहेत.

लेखक : डॉ. आशुतोष जावडेकर 

 ashudentist@gmail. com

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “किंमत … मताची…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “किंमत … मताची” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

एक उमेदवार मत मागण्यासाठी एका म्हाताऱ्याकडे गेला आणि 1, 000 रुपये धरून म्हणाला ” बाबाजी कृपया मला यावेळी मत द्या. “

बाबा जी म्हणाले:

” बेटा, मला पैसे नकोत पण तुला मत हवं आहे तर मला गाढव विकत घेऊन दे ! “

उमेदवाराला मते हवी होती, तो गाढव विकत घेण्यासाठी बाहेर पडला,

पण 40, 000 पेक्षा कमी किमतीचे गाढव सापडले नाही,

 म्हणून परत आला आणि बाबाजींना म्हणाला: 

” मला वाजवी किंमतीत एकही गाढव सापडले नाही, गाढवाची किंमत किमान 40, 000 आहे, म्हणून मी तुम्हाला गाढव देऊ शकत नाही पण मी 1, 000 देऊ शकतो ! “

बाबाजी म्हणाले: 

” साहेब, मला आणखी लाजवू नका, तुमच्या नजरेत माझी किंमत गाढवापेक्षा कमी आहे,

जेव्हा गाढव 40, 000 पेक्षा कमी विकले जात नाही, तेव्हा मी 1, 000 ला कसा विकला जाऊ शकतो ! “

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सहज काही साधं सोपं !” –  लेखक : अज्ञात – अनुवाद : स्मिता गानू जोगळेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “सहज काही साधं सोपं !” –  लेखक : अज्ञात – अनुवाद : स्मिता गानू जोगळेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

(आमच्या गुजराती शाळेच्या ग्रुपवर एक छान (गुजराती) मेसेज आला त्याचा स्वैर अनुवाद करायचा मोह आवरला नाही.)

नाही दुखत पावलं टाचा मुंगीचे कधी 

कि हत्ती नाही करत विचार वजन कमी करण्याचा 

 *

कोळ्याला नाही वाटत भीती चढताना पडण्याची 

घारीला नाही वाटत भीती उंच भरारी घेण्याची 

 *

हरणाला कधीच होत नाही गुडघेदुखी सांधेदुखी 

आणि नाही करत साप कंटाळा सरपटण्याचा कधी 

 *

सिंहाला नसते चिंता उद्याच्या शिकारीची 

जिराफाचे नाही झिजत माकडहाड किंवा मणका कधी 

 *

पाण्यात डुंबत राहूनही नाही होत सर्दी म्हशीला कधी 

आणि चोवीस तास उभे राहूनही थकत नाही घोडा कधी 

 *

उच्च स्वरात कूजन करूनही नाही बसत घसा कोकिळेचा कधी 

पक्षी नाही अपेक्षा करत वडिलोपार्जित घराची कधी 

 *

मग आपल्यालाच का 

भय चिंता कंटाळा थकवा झीज स्खलन 

काळजी माया भोग आणि रोग.. !

 *

पशु पक्ष्यांसारखे सहज सोपे साधे 

जगता आले तर ! 

प्रयत्न तर करून बघावा 

 *

मला हे अद्भुत शरीर देणाऱ्या हे परमेश्वरा…..

कोणताही अर्ज केला नव्हता 

नव्हता लावला कोणताही वशिला 

तरीही 

डोक्यावरच्या केसांपासून पायाच्या अंगठ्यांपर्यन्त 

चोवीस तास रक्त प्रवाहित ठेवतोस 

जिभेवर नियमित लाळेचा अभिषेक करतोस 

निरंतर पडत राहतात ठोके हृदयाचे लयबद्ध 

असं ते कोणतं यंत्र बसवलं आहेस देवा 

 *

पायाच्या नखापासून मेंदूच्या अंतिम टोकापर्यंत 

निर्वेध संदेशवहन करत राहतोस 

कोणती शक्ती आहे ही.. नाही कळत मला.

 *

हाडं आणि मांस यांच्यामधून वाहणारं रक्त 

याचे मूळ आणि अर्थ कसे मी शोधावे

 *

हजार हजार मेगापिक्सेलवाले दोन कॅमेरा 

अहोरात्र बारीक बारीक दृश्य टिपत असतात 

 *

दहा हजार चवी आणि अगणित संवेदनांचा अनुभव देऊ शकणारी 

जिव्हा नामक अफाट सेन्सर प्रणाली 

 *

विविध फ्रिक्वेन्सीचे आवाज काढणारी स्वरप्रणाली 

आणि येणाऱ्या असंख्य आवाजाचं कोडिंग डिकोडिंग करणारे कान 

 *

७५ टक्के पाणी असणाऱ्या शरीररूपी टँकरच्या 

त्वचेवर असणारी कोट्यवधी छिद्र 

पण नाही येत कधी प्रश्न लिकेज आणि सिपेजचा

 *

कोणत्याही आधाराशिवाय उभा राहू शकतो मी ताठ 

गाडीचे टायर झिजतात पण नाही झिजत माझी पावलं कधीही 

 *

केवढी अजब रचना, काळजी, शक्ती, यंत्रणा, प्रतिपाळ 

स्मृती शांती समज ही…… सगळंच अदभूत अविश्वसनीय 

माझ्या शरीररूपी अचाट यंत्रात कोणता तंत्रज्ञ बसला आहे न कळे 

या सगळ्याचे भान ज्ञान राहू दे बस,

तूच बसवलेल्या वसवलेल्या आत्म्यामध्ये.

राहो सदबुद्धी कृतज्ञता स्मरण, चिंतनाचे भान 

हीच एवढी प्रेरणा प्रार्थना.

परमेश्वरा…. तू कोण कुठे असशील त्या चरणी.

 

मूळ कर्ता : अज्ञात 

अनुवाद : स्मिता गानू जोगळेकर

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैत्री… तुमची नी माझी !! – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

मैत्री… तुमची नी माझी !!अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

पावसाच्या थेंबाचं शिंपल्यात पड़णं अन्

मोती म्हणून त्याचं नवजीवन घडणं…

अगदी तसंच

अनोळखी अनोळखी म्हणत असतानाच

अचानक एकमेकांची सवय होवून जाणं

म्हणजे…. मैत्री… !!

 

मोगऱ्याचा दरवळणारा मनमोहक गंध

म्हणजे मैत्री….

चुकलोच कधी वाट तर दिशा दाखवणारा दीपस्तंभ

म्हणजे मैत्री… !!

 

नकळत जडलेला एक स्वैर छंद

म्हणजे…. मैत्री

मनापासून जपावासा वाटणारा हा रेशीमबंध

म्हणजे…. मैत्री… !!

 

तुमच्या सारखी खूप खूप गुणी…

अन् माझ्यासारखी थोड़ी थोड़ी खुळी….

जशी कायम बहरलेली सदाफुली…

म्हणजे मैत्री… !!

 

हसवणाऱ्या, फसवणाऱ्या तर कधी कंटाळवाण्या गप्पा..

म्हणजे…. मैत्री….

मनात निर्माण झालेला तुमच्या आठवणींचा कप्पा…

म्हणजे…. मैत्री… !!

 

मनाने मनाशी गुंफलेली सुंदर वीण अन्

तुमच्या शी बोलताना विसर पडलेला शीण

म्हणजे…. मैत्री… !

 

मंदिराचे पावित्र्य जपणारा घंटेचा जणु मंजुळ नाद

सुखदुःखात हक्काने आवर्जुन मारावी अशी साद

म्हणजे… मैत्री… !!

 

अगदीच महागडं सुंदर फुलझाड नसेलही पण दुर्मिळ

गवताचं एक नाजुक पातं…

म्हणजे…. मैत्री….

देवानेही हेवा करावा अन् प्रेमानेही लाजावं असं पवित्र नातं

म्हणजे…. मैत्री… !!

 

उतरत्या वयाच्या सांजवेळीही ऐकु यावी अशी सुंदर तान

आणि आयुष्याच्या रुपेरी पुस्तकात सुवर्णाक्षरांनी लिहावं

असं पान….

म्हणजे…. मैत्री… !!

 

हसता हसता अलगद टीपावं असं डोळ्यातलं पाणी..

अन्…

स्वप्नवत वाटणाऱ्या स्नेहबंध जपणाऱ्या पवित्र नात्याची 

अशी ही कहाणी…

म्हणजे….

 मैत्री…….

 तुमची अन् माझी…… !!!!

☆   

 लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कोणावाचून काही अडत नाही…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “कोणावाचून काही अडत नाही…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

… रात्री २ वाजता अचानक फोन वाजला. थोड्या काळजीनेचं उचलला. तर समोरून वरूण बोलत होता. “काका, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या.. मधूला ऍडमिट केलेय आणि डॉ. म्हणतात घरातील मोठ्या माणसांना बोलवा. ” मी येतो बोलून फोन ठेवला आणि बायकोला घेऊन निघालो.

जाता जाता नकळत मन भूतकाळात गेले….

… वरूण एक I. T. इंजिनियर. MBA अतिशय हुशार मुलगा. माझा दूरचा नातेवाईक पण जवळचं राहणारा…. आईवडील गावी. तसा तो स्वभावानी हेकट. माझे कोणावाचून काही अडत नाही या वृत्तीचा. माझा मोबाइल आणि इंटरनेट हेच माझे विश्व असे मानणारा.

दोन वर्षांपूर्वी अचानक घरी पेढे घेऊन उभा राहिला. “काका…. लग्न ठरलंय. ” मी ताबडतोब मोठेपणाचा आव आणून विचारले, “अरे वा!!! कधी ?? कुठे पाहिलीस मुलगी ?? कोणी ठरविले??”

तो फक्त हसला, “काका काय गरज आहे कोणाची ??एका साईट वर तिला पाहिले, आवडली. व्हिडिओ पाहिला तिचा. तिचा आणि माझा प्रोफाइल जुळला आणि आम्ही ठरविले. इथून जात होतो म्हणून तुम्हाला सांगायला आलो. “

“अभिनंदन,… मग आता पत्रिका कधी छापूया, खरेदी वगैरे. “

.. माझा मोठेपणा चालू झाला. तर तो जोरात हसला.. “काहीही गरज नाही. मी व्हॉट्सअप वरून सगळ्यांना आमंत्रणे पाठवली आहेत, आणि खरेदीही ऑनलाइन केली आहे. इथे वेळ कोणाला आहे ?खूप कामे असतात. ” माझा थोडा हिरमोड झाला म्हटले, “अरे बायकोला तरी वेळ देतोस का ??? ” 

… “नाही हो, तीही माझ्यासारखी बिझीचं.. मग वेळ मिळेल तेव्हा व्हॉट्सअप वर चाट करतो सेल्फी काढतो, व्हिडिओ पाठवतो. ” मी न राहवून हात जोडले.

काही दिवसांनी आम्ही त्याच्या लग्नाला गेलो, फक्त ५० माणसे हजर पाहून धक्काचं बसला…

स्टेजवरही आहेर द्यायला गर्दी नव्हती. अरे ह्याने आहेर आणू नये असे लिहिले होते कि काय ? ह्या विचाराने थोडा सुखावलो. भेटायला गेलो तेव्हा विचारलं, “इतकी कमी माणसे कशी आली ???” तेव्हा परत तो हसला आणि म्हणाला, “सगळ्यांनी व्हॉट्सअपवर अभिनंदन केले शुभेच्छा दिल्या आहेत. तो बघा एक माणूसचं खास रिप्लाय द्यायला ठेवलाय. “

मी उडालोच….

“बरे आहेराचे काय ???” माझा बालसुलभ प्रश्न? त्यानेही लहान मुलाला समजवावे तसे मला सांगितले, “अहो काका, प्रत्येकाच्या घरी मिठाई आणि गिफ्ट्स पाठवले आहे curriar ने अगदी घरपोच डिलिव्हरी. “

धन्य आहेस बाबा तू…. मी हाथ जोडले आणि पोटभर जेवून निघालो.

दुस-या दिवशी पूजेला गेलो पण यावेळी घरात ६ माणसे बघून मुळीच आश्चर्य वाटले नाही. सर्व कसे आरामात बसले होते. म्हटले अजून भटजी आले नाही वाटते??तेव्हा उत्तर आले, “अहो काका… रेकॉर्ड लावून पूजा केली अगदी पूर्णपणे कुठेही शॉर्टकट नाही. कशाला हवाय भटजी?? प्रसादाची ऑर्डर दिलीय आता येईल, शिवाय १५ माणसांच जेवण सांगितले आहे. ” चला म्हणजे माझे जेवण होईल इथे. मी सुखावलो. परत एकदा पोटभर जेवून समाधानाने घरी आलो.

काही दिवसांनी तो रस्त्यात भेटला, एकटाचं होता म्हणून विचारले, “अरे कुठे गेलास कि नाही हनिमूनला?” तर नेहमीसारखे हसून बोलला, “कुठे वेळ आहे काका ?? तीही नवीन प्रोजेक्टमध्ये बिझी अणि मीही. “

मी अचंबित झालो. मग मित्रत्वाच्या नात्याने त्याच्या खांदयावर हाथ ठेवून विचारले, “कधीतरी सेल्फी आणि व्हिडिओ”, कप्पाळ!! मग नाटक सिनेमा तरी ???” “अहो, नवीन चित्रपट आला कि downoad करतो आणि पाहिजे तेव्हा बघतो. वेळही वाचतो. “

मी दरवेळी नवीन नवीन धक्के खात घरी येत होतो.

आता काही महिन्यापूर्वी त्याचा messege आला बायकोला दिवस गेले आहेत. पटकन मनात आले…. “हेही ऑनलाईन नाही ना??” फोन करून त्याचे अभिनंदन केले आणि काही मदत पाहिजे का असे विचारले. पुन्हा त्याचे परिचित हास्य ऐकून नवीन काय ऐकायला मिळेल याची उत्सुकता लागली. त्याने सांगितले, “काही गरज नाही काका. हिचे सर्व काही करण्यासाठी एका कंपनीला ऑनलाइन पॅकेज दिले आहे. आता ते लोकं हिची व्यवस्थित काळजी घेतील मला फक्त बाळाला हातात घ्यायचे आहे..!!”

हे मात्र अतीचं झाले, मी थोडा चिडलोच आणि तणतणतच घरी आलो…..

हॉस्पिटलमध्ये शिरत असताना हे सर्व आठवले आणि समोरचं हा उभा राहिला. रडवेला चेहरा, खांदे झुकलेले, आम्हाला बघून त्याचा बांध फुटला. माझ्या कुशीत शिरून हमसाहमशी रडू लागला. मी विचारले, “अरे काय झाले.. ?तू तर पॅकेज दिले होतेस ना ?? मग अचानक काय झाले ??”

तर म्हणाला, “त्यांनी मधूची क्रिटिकल कंडिशन पाहून हात वर केले, डॉक्टरांनीही सांगितले तुमचे कोणीतरी नातेवाईक बोलवा परिस्थिती गंभीर होत चालली आहे. इथे मला सगळ्यांनी एकटेचं सोडले. सगळेजण भावनाशून्य चेहऱ्यानी. वावरत होते. त्यांना फक्त त्यांच्या पॅकेजशी मतलब आहे. आज मला जाणवले आपलेपणाची भावना असलेले पॅकेज कितीही किंमत दिली तरी विकत मिळत नाही. ” 

“म्हणूनच मला तुमच्यासारखी माणसे नेहमी हवी आहेत.. “

अजून ही वेळ गेली नाही….

… आपली माणसे सांभाळा माणूस गेला की परत येत नाही, मग फक्त आठवणी राहतात. लॅपटॉप, टीव्ही, मोबाईल बाजूला ठेवा आणि आपल्या स्वतःच्या माणसांशी प्रेमाचेन शब्द बोला, तेच तुम्हांला प्रेम देतील.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “आपलं होताना…” – लेखिका : सुश्री विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “आपलं होताना…” – लेखिका : सुश्री विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

नक्षत्रासारखं लेकीचं लखलखतं रूप काकू खुर्चीतून न्याहाळत होत्या. नवरात्रात पाचव्या माळेला जन्मलेली, ललित पंचमीची… म्हणून तिचं नावही त्यांनी ललिताच ठेवलं होतं.

रूप, शिक्षणानं चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आत्मविश्वास… त्यात सासरही टोलेजंग मिळालेलं. सगळं तिला शोभून दिसत होतं आणि स्वतःजवळ असलेलं मिरवायची कला देखील तिला छान अवगत होती… कौतुक करून घेणं तिला फार आवडायचं. कुणाचं करण्याच्या बाबतीत मात्र‌ हात आखडता असायचा तिचा!

स्वतःभोवतीच फिरणारं तिचं व्यक्तीमत्व हल्ली काकूंना कर्कश वाटू लागलं होतं… आपलीच मुलगी होती, तरीही…!

तिच्या येण्यानं, अखंड ‘मी’ गोवत बोलण्यानं घरातली शांतता ढवळून निघते, असं कधीकधी त्यांना वाटायचं. आपलंच लेकरू… पण तरीही ती बऱ्याच वेळा, सर्वच बाबतीत ‘लाऊड’ आहे, असे न सांगता येण्यासारखे कढ त्यांना दाटून येत.

आजकाल थकल्यामुळं त्या घरातून थोड्या अलिप्त झाल्या होत्या. तिचं मोठेपण तिच्याच तोंडून ऐकायला त्या हल्ली फारशा राजी नसायच्या. कधीकाळी त्यांना तिच्या त्या मोठेपणाचं कोण कौतुक वाटतं होतं पण आजकाल नकोसं व्हायचं.

तिचा वाढदिवस, नवरात्रातलं सवाष्ण, माहेरवाशीण असं सगळं औचित्य साधत काकू तिला ललित पंचमीला जेवायला बोलवायच्याच. ती प्रथाच पडून गेली होती घराची.

काकूंच्या अखत्यारीत असलेला संसार सुनेच्या हातात जाऊनही आता काही काळ लोटला होता… पण सूनबाईंनी या प्रथेत खंड पडू दिला नव्हता. शांत, समंजस… तरीही काहीशी अबोल सून, काकूंना लेकीपेक्षाही कित्येकदा आपलीशी वाटायची. जन्माला घातलेल्या मुलींपेक्षाही ही परक्या घरातून आलेली पोर त्यांच्याही नकळत त्यांच्या जवळची होऊन गेली होती. फारसा संवाद नसायचा दोघींचा, एक तर तिची दिवसभर बॅंकेतली नोकरी आणि उपजतच गोष्टींची तिची समज… न बोलता कुटुंब एकसंध शांततेत नांदत होतं.

अनायसे रविवारच होता, त्यामुळं सूनबाईंनी नणंदेच्या आवडीचा ‘सुरळीच्या वडी’पासून ‘शाही रबडी’पर्यंत सगळा साग्रसंगीत स्वयंपाक केला होता. छानशा मोत्यांच्या महिरपींनी चांदीची ताटवाटी सजली होती. सवाष्ण, त्यात पुन्हा वाढदिवसाची उत्सवमूर्ती… सगळं कसं नेमकं, नेटकं टेबलावर मांडलेलं होतं.

काकांनी देखील आज सगळ्यांसोबत टेबलावर जेवायला बसायचा हट्ट धरला होता. काकू शक्यतो त्यांचं जेवणखाण लवकर आटोपून घेत. एकतर वेळ सांभाळावी लागे आणि दुसरं म्हणजे, थकलेल्या शरीरामुळं हात थरथरत कापत. जेवता जेवता सांड-लवंड होई. त्यामुळं काकू चारचौघात त्यांना जेवायला वाढायचं टाळतच असत.

पण आज मात्र काकांनी लेक, जावई यांच्यासोबतच जेवायचा हट्ट धरला… आणि सूनबाईंनी काकूंना थोपवत त्यांचा हट्ट मान्य केला.

“असू दे आई, जेवू दे त्यांना सगळ्यांसोबत… त्यांचीच तर लेक आहे ना! काही होत नाही… त्यांनाही कधीतरी वाटत असेलच ना, सगळ्यांसोबत जेवावं…! ”

गरम गरम आंबेमोहोराच्या भातमुदीवर पिवळं धम्मक दाटसर वरण येऊन विराजमान झालं… आणि त्याच्या वासानं सगळ्यांची भूक एकदम चाळवली.

लोणकढं तूप आणि लिंबाची फोड… त्या पूर्णान्नानं भरलेल्या ताटाकडे बघताना लेकीच्या चेहऱ्यावर तृप्तीचा भाव ओसंडून वाहिला.

काकू मनापासून आनंदल्या. असं सगळं कुटुंब टेबलाभोवती होतं हे बघून, “सावकाश जेवा…” त्यांनी लेक-जावयाला अगदी प्रेमानं सांगितलं.

थरथरत्या बोटांनी भातावर लिंबू पिळताना काकांच्या हातातून चतकोर लिंबाची फोड उडून टेबलाखाली पडली. सूनबाईंच्या लगेचच लक्षात आलं. तिनं पटकन बाऊलमधली दुसरी फोड घेत त्यांच्या ताटातल्या भाताच्या मुदीवर दोन थेंबात शिंपडली.

“सावकाश जेवा बाबा…” ती त्यांच्या खुर्चीच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली.

जेमतेम दोन घास तोंडांत गेले न गेले तोच… एक जोरात खोकल्याची उबळ काकांना आली आणि तोंडातल्या भाताचे कण चौफेर उडाले… काटकोनात बसलेल्या लेकीच्या अंगावर ही उडाले. ती एकदम चिडली,

“कशाला बसता बाबा सगळ्यांबरोबर जेवायला? तुम्हाला जेवताना नेहमी ठसका लागतो माहितीये ना…! ”

तिचं भरजरी नक्षत्र रुपडं एकदम चिडचिडलं. अंगावर उडवलेली भातशितं झटकत ती बेसीनपाशी‌ गेली.

“अगं सवाष्ण ना तू… उठू नकोस…”

काकूंचे शब्द तोंडातच विरले…

हातात पुऱ्यांची धरलेली चाळणी पटकन खाली ठेवत, सूनबाई धावत काकांच्या जवळ आली. आपली एका तळहाताची ओंजळ त्यांच्या तोंडाशी धरत, ती त्यांच्या पाठीवर हात फिरवत त्यांना म्हणाली,

“गिळू नकात बाबा तो घास. माझ्या ओंजळीत टाका… घशात अडकेल भाताचं शीत! ”

निमिषमात्र अडकलेल्या श्वासामुळं नाका-डोळ्यांतून वाहणारं पाणी मुक्तपणे वाहू लागलं. वाढताना ओढणी मध्ये येऊ नये म्हणून तिनं एका खांद्यावरुन घेऊन तिची गाठ कमरेशी बांधली होती. घाबराघुबरा झालेला त्यांचा चेहरा तिनं तीच ओढणी मोकळी करत पुसला.

सुनेचा आपलेपणानं पाठीवर फिरणारा हात त्यांना दिलासा देऊन गेला. ते हळूहळू शांत होत गेले.

लेकीच्या रिकाम्या खुर्चीकडे बघताना काकूंना त्या क्षणी उलगडलं… लेकीपेक्षा सून आपल्याला का आपली वाटते ते!

रक्ताचं नातं परकेपणाकडे झुकत होतं आणि परकं नातं आपलेपणा जपत होतं…!

परक्या घरी गेलेल्या लेकीचा ओसरत चाललेला आपलेपणा आणि परक्या घरातून आलेल्या सुनेच्या सहवासातून पाझरता ओलावा…!

नाती बदलत जातात… बघता-बघता…!

‘माझं’ असणं आणि ‘आपलं’ होणं…

यात कितीही नाही म्हटलं तरी फरक आहेच.

‘माझं’पण हे जन्मानं येतं, मात्र ‘आपले’पण आपुलकीतूनच निर्माण होत राहतं.

‘माझे’पणाला हक्काच्या मर्यादा आहेत,

तर ‘आपले’पण व्यापक आहे…

आणि व्यापक हे नेहमीच अमर्याद असतं…! ! !

लेखिका : सौ विदुला जोगळेकर

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दिसते तसे नसते… – लेखक – श्री मिलिंद घारपुरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

दिसते तसे नसते… – लेखक – श्री मिलिंद घारपुरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

अगदी आजचीच सकाळ ची गोष्ट…. 10 ते सव्वा 10 चा सुमार..

गोडवा.’ .. .. प्रसिद्ध मराठी फूड जॉईन्ट.

 

मी मला हवे असलेले पदार्थ  मागवले तेवढ्यात एक वयोवृद्ध जोडपं माझ्या अगदी समोर येऊन बसले.

पुरुष चांगल्या शर्ट पॅन्टमध्ये तर  बाई साडी नेसलेल्या sleeveless ब्लऊज … बॉबकट केलेल्या 

दोघे जवळपास 75 ते 80 पार केलेले..

 

तो सदगृहस्थ अगदी शांतपणे सगळे करत होता. त्यांची बायको सारखी त्याच्यावर करवादत होती 

साधे पाणी प्या… थंड नको.  काय मागवू ? “ 

त्याने सरळ मेनू कार्ड बायकोच्या हवाली केले 

मिसळ…. झणझणीत त्यांनी हळूच…’ 

काही नको तिखट ..  मग त्रास मला होतो तुम्हाला काय…”

बर मग बटाटे वडा….”

काही नको… साधा उपमा दे रे कमी तिखट आणि पातळसर….. आणि नंतर 2 कॉफी without sugar “.  

त्या बायकोने ऑर्डर सोडली…

बिचारे… मला त्या सदगृहस्थाची दया आली.. बायकोसमोर बिचारा अगदी गलित गात्र… झाला होता 

काहीच बोलू शकत नव्हता.  

त्यांचा उपमा आला… नंतर कॉफी आली… दोघे हळू हळू सावकाश खात होते 

इतक्यात घो घो करत दोन पोलीस van आणि एक जीप त्या ‘ गोडवा ‘ समोर थांबल्या 

धडा धड… तिन्हीमधून कडक ड्रेस घातलेले कितीतरी पोलीस ऑफिसर्स उतरले.  

त्या सदगृहस्थाच्या टेबलं वर येऊन… “ सर कधी आलात आम्हाला सांगायचे नाहीत का ? तुम्हाला कुठे जायचे आम्ही सोडतो… कसे आहात सर…” 

खटाखट पाय जुळवत सॅल्यूट केले गेले… आता ते सदगृहस्थ खडकन उभे राहिले 

त्यांची पत्नी म्हणू लागली… “ चालेल… आम्हाला …  “ 

त्यांनी हात वर केला. बायकोला एका क्षणात गप्प केलं. ठामपणे म्हणाले “ मी जाईन ऑटोने thanks “

…. सिंह परत नखें आणि आयाळीसह परतला होता 

 

काय 5 मिनिटात विलक्षण बदल झाला होता. त्यांनी झाडून सगळ्यांची तपशीलवार चौकशी केली 

आता चौकीवर कोण अधिकारी आहेत ते विचारले … ड्युटी… पेट्रोलिंग.. राऊंड…रायटर आता कोण आहे….. सगळ्यांना पटपट आदेश दिले.  

 

एक इन्स्पेक्टर बिल द्यायला पुढे झाला, त्याला सांगितलं … “ नो इन्स्पेक्टर… I will pay..” 

सगळ्यांना 10 मिनिटात रवाना केले. पैसे दिले. 

..  आता सगळेच त्यांचे हे आगळे रूप पाहून हतबुद्ध झाले होते. कितीतरी जणांनी खाणे तसेच सोडले होते 

वेटरने ऑर्डर घेणे थांबवले होते … घडलेली घटनाच अशी होती 

अर्ध्या तासापूर्वी दिन पतित गरीब वाटणारा…सगळ्यांचा बाप निघाला होता…

 

कोण होते ते माहिती आहे ??… ते नंतर सगळ्यांना समजले 

ते होते महाराष्ट्र राज्याचे “ पोलीस महासंचालक रमाकांत कुलकर्णी “ 

…. आणि त्यांच्या सोबत होत्या त्यांच्या पत्नी सौ. श्वेता रमाकांत कुलकर्णी.

 

निशब्द….

लेखक :  श्री मिलिंद घारपुरे

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एका टिंबामुळे पडणारा फरक…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

 

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ “एका टिंबामुळे पडणारा फरक…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

एका टिंबामुळे पडणारा फरक – –

आवरण आवरणं / साधणं सांधणं / शीळ शिळं / यात्रिक यांत्रिक / संख्या सख्या / निश्चित निश्चिंत / 

खाण खाणं / मेल मेळ मेलं / भाग भांग / हरण हरणं / देणं देण / वार. वारं / दगा दंगा / हंस ह्स / 

कस कसं / जात जातं जाते / सध्या संध्या / नागर नांगर / याच याचं / जंगले जगले / मंद मद / तळ तळं / एकात एकांत / संख्या सख्या सख्ख्या / जाळ जाळं / खोटं खोट / साग सांग / वदन वंदन / सार सारं / 

भाग भांग / पांडू पाडू /जून जुनं / शिक शिंक / भरत भरतं / खात खाते खातं / कस कसं / कडं कडे / बाधणे बांधणे / आयत आयतं / गड गंड / माडी मांडी / साधे सांधे / अशात अशांत / कायमच कायमचं / दुसऱ्याच ( दिवशी ) दुसऱ्याचं / सार सारं / डाबर डांबर / त्याच त्याचं त्याचे / स्वतःच स्वतःचं / ढंग ढग /

रग रंग / याच याचं / डाव डावं / कळत कळतं / जाण ( समज ) जाणं / होत होतं होते / बाधा बांधा / भांडं भाडं / बेबी बेंबी / नकोस नकोसं / संबंध सबंध / मंजूर मजूर / वश वंश / कोंबी कोबी

आडनावं = शेडगे शेंडगे, पागे पांगे, गावडे गावंडे

आहे की नाही गम्मत…….

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चोर – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ चोर – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

कालच इयत्ता सातवीची परीक्षा घेतली होती. त्या मध्ये एका विद्यार्थ्याने ‘ चोर ‘ या विषयावर लिहिलेला निबंध ….

” चोर हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे “

लोकांना हे खोटे वाटते, पण लक्षात ठेवा…..

चोरामुळे तिजोरी आहे, कपाट आहे, त्यांना लॉक आहे,

चोरामुळे खिडकीला ग्रील आहे, घराला दरवाजा आहे, दरवाजाला कुलूप आहे, बाहेर अजून एक सेफ्टी दरवाजा आहे,

चोरामुळे घराला/सोसायटीला कंपाउंड आहे, त्याला गेट आहे, गेटवर वॉचमन आहे, वॉचमनला वर्दी आहे,

चोरामुळे CCTV कॅमेरे आहेत, मेटल डिटेक्टर मशीन आहेत, चोरामुळे सायबर सेल आहे,

चोरामुळे पोलीस आहेत, त्यांना पोलीस स्टेशन आहे, त्यांना गाड्या आहेत, काठ्या, पिस्तुल आणि बंदुका आहेत, त्यात गोळ्या आहेत,

चोरामुळे न्यायालय आहे, तिथं जज आहेत, वकील आहेत, शिपायापासून कारकून आहेत,

चोरामुळे तुरुंग आहे, जेलर आहे, जेलमध्ये शिपाई आहेत.

मोबाईल, लॅपटॉप, तत्सम इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच सायकल, बाईक, कार इत्यादी वस्तू चोरीला गेल्यावर माणूस नवीन वस्तू खरेदी करतो, आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला हातभार लागतो,

चोर शब्दामुळे भाषेतील साहित्यकृतींमध्ये भर पडण्यास हातभार लागला आहे.

अलीबाबा चाळीस चोर ही कथा, प्रेम कथांमध्ये हमखास येणारा चोरटा कटाक्ष, चित्तचोरटी, क्रिकेट मधील चोरटी धाव व चोराची आळंदी हे गाव… यासारखे शब्दप्रयोग याची सर्वश्रुत उदाहरणं आहेत.

चोराच्या वाटा चोराला ठाऊक /चोरावर मोर /चोराच्या मनात चांदणे /चोर सोडून संन्याशाला सुळावर देणे /काडी चोर तो माडी चोर /चोराच्या उलट्या बोंबा /चोरांच्या हातची लंगोटी/ चोर तो चोर वर शिरजोर/ चोर चोरीसे जाये पर हेरा-फेरीसे न जाये…… यासारख्या अनेक म्हणी… यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे.

चित्रपटसृष्टीला अर्थ, प्रसिद्धी मिळवून देणारे चोरी मेरा काम / चितचोर /चोर मचाये शोर / चोरोंकी बारात यासारखे अनेक लोकप्रिय चित्रपट… अशा कित्येक घटकांना अस्तित्वात असणाऱ्या “चोर” या शब्दाचं सहाय्य मिळालं आहे.

राजकीय चोरांमुळे मात्र अर्थ-व्यवस्थेला कोणताही फायदा नाही….. ते फक्त स्वतः साठीच जगत असतात.

लेखक : अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares