मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ।। मानसहोळी ।।…संत जनाबाई यांची! ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ।। मानसहोळी ।।…संत जनाबाई यांची! ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

कराया साजरा । होलिकेचा सण ।

मनाचे स्थान । निवडीले ।।

 

ऐसे ते स्थान । साधने सरावले ।

भक्तीने शिंपिले । केले सिद्ध ।।

 

त्या स्थानी खळगा। समर्पणाचा केला।

त्यात उभा ठेला । अहंकार एरंड ।।

 

रचलीया तेथे। लाकडे वासनांची ।

इंद्रीयगोवऱ्याची। रास भली ।।

 

गुरुकृपा तैल । रामनाम घृत ।

अर्पिले तयात । ऐसे केले ।।

 

रेखिली भोवती । सत्त्कर्म रांगोळी ।

भावरंगाचे मेळी । शोभिवंत ।।

 

वैराग्य अग्नीसी । तयाते स्थापिले । 

यज्ञरूप आले । झाली कृपा ।।

 

दिधली तयाते। विषय पक्वान्नाहुती ।

आणिक पुर्णाहूती । षड्रिपु श्रीफळ।।

 

झाले सर्व हुत । वैराग्य अग्नीत ।

जाणावया तेथ । नूरले काही ।।

 

वाळ्या म्हणे जनी । व्हावी ऐसी होळी।

जेणे मुक्तीची दिवाळी।अखंडित ।। 

 

 होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा*

 

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 52 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 52 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

९७.

मी जेव्हा तुझ्याबरोबर खेळत होतो,

तेव्हा तू कोण आहेस ते मी विचारलं नाही.

लज्जा आणि भीतीचा लवलेश माझ्या मनात नव्हता.

माझं जीवन चैतन्यमय होतं.

 

माझ्या मित्रासारखा तू मला सकाळी

लवकर उठवायचास,

गवताच्या पात्यां-पात्यांतून पळताना

माझ्यापुढं असायचास.

 

त्या वेळी तू जी गीतं गाण्यास,

त्यांचा अर्थ मी समजून घेतला नाही.

मी माझ्या आवाजात गात राहिलो.

त्या गाण्याच्या तालावर माझे ऱ्हदय नाचायचं.

 

खेळायची वेळ आता संपलीय.

आता माझ्यावर ही काय वेळ एकदम आलीय?

 

तुझ्या पायाशी सर्व नजरा वळल्या आणि

शांत तारकांतून सारं जग

आश्चर्यचकित होऊन पाहात आहे.

 

९८.

माझ्या पराभवाच्या पुष्पमाला व विजयचिन्हांनी

मी तुझा सन्मान करीन.

अपराजित होऊन निसटणं माझ्या कुवतीत नव्हतं.

 

माझा गर्व नष्ट होईल.

असह्य दु:खात माझं जीवन संपेल,

पोकळ बासरीप्रमाणं माझ्या ऱ्हदयातून सुस्काऱ्यांचे स्वर निघतील,

दगडातून अश्रू वाहतील याची मला खात्री होती.

 

कमळाच्या सहस्र पाकळ्या कायमपणे मिटून राहणार नाहीत.

मधाच्या गुप्त जागा खुल्या होतील, हे मला ठाऊक होतं.

 

निळ्या आकाशातून एक डोळा माझ्याकडे

टक लावून पाहिल आणि शांततेत मला बोलवेल.

माझं असं काहीच असणार नाही, काहीच नाही.

केवळ मृत्यूच तुझ्या पायी मला मिळेल.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भारतात होळी साजरी करण्याच्या विविध परंपरा…” लेखक : प्रा. डॉ सुधीर अग्रवाल ☆ सुश्री हेमा फाटक ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “भारतात होळी साजरी करण्याच्या विविध परंपरा…” लेखक : प्रा. डॉ सुधीर अग्रवाल ☆ सुश्री हेमा फाटक ☆ 

होळी हा रंगांचा सण आहे. रंगांशी खेळण्यासाठी आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो. होळी हा भारतातील महत्त्वाचा सण असल्याने तो उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. होळी हा सण एकच असला तरी तो सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दक्षिण भारतातील लोक उत्तर भारतातील लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने होळी साजरी करतात. एकूणच, एकच सण साजरे करण्याची ही मनोरंजक विविधता भारताला विविधतेचे प्रतीक बनवते.  भारतातील होळी साजरी करण्याच्या विविध विचित्र आणि परंपरां.ज्या जाणून आपण  देखील आश्चर्यचकित व्हाल.

लाठमार होळी, बरसाना

बरसाणे यांची लाठमार होळी खूप प्रसिद्ध आहे. या निमित्ताने लोकांनी इथे यावे आणि लोक या परंपरेचे पालन कसे करतात ते पहावे. हे ठिकाण मथुरेपासून २७ किमी अंतरावर आहे. येथे होळी केवळ रंगांनीच नाही तर काठ्यांनीही खेळली जाते. असे म्हटले जाते की बरसाना येथे भगवान कृष्णाने राधाचा पाठलाग केला, त्यानंतर तिच्या मित्रांनी भगवान कृष्णाचा काठीने पाठलाग केला. तेव्हापासून येथे महिला पुरुषांचा काठीने पाठलाग करतात

योसांग, मणिपूर

मणिपूरमध्ये होळीचा सण पाच दिवस साजरा केला जातो. जो यावल शुंग या नावाने ओळखला जातो. या दिवशी लोक भगवान पखंगबाला वंदन करतात. सूर्यास्तानंतर, लोक यासोंग मैथबा नावाची झोपडी जाळण्याच्या विधीसह या उत्सवाची सुरुवात करतात. हे नाकथेंग परंपरेचे पालन करते, जिथे मुले घरोघरी देणगी गोळा करतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मुली दान मागतात. तर चौथ्या आणि पाचव्या दिवशी एकमेकांना रंग लावून अनोख्या पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातो.

होला मोहल्ला, पंजाब

पंजाबमध्ये होळीनंतर एक दिवस शीख धर्मीयांकडून होला मोहल्ला साजरा केला जातो. दहावे शीख गुरु गुरू गोविंद सिंग यांनी समुदायातील युद्ध कौशल्य विकसित करण्यासाठी होला मोहल्ला उत्सव सुरू केला. ती येथे योद्धा होळी म्हणून ओळखली जाते. येथे योद्धे आपले पराक्रम दाखवण्यासाठी स्टंट करतात.

मंजुल कुली, केरळ

दक्षिण भारतात होळी हा सण उत्तर भारतात तितक्या धूमधडाक्यात साजरा केला जात नसला तरी काही समुदाय हा सण साजरा करतात. केरळमध्ये होळीला मंजुळ कुली म्हणून ओळखले जाते. येथील गोसारीपुरम तिरुमाच्या कोकणी मंदिरात रंगांचा हा सण साजरा केला जातो. होळीच्या पहिल्या दिवशी लोक मंदिरात जातात आणि दुसऱ्या दिवशी सर्वजण एकमेकांवर हळदीचे पाणी शिंपडतात आणि लोकगीतांवर नाचतात.

शिग्मो, गोवा

गोवा हे खुद्द मौजमजेचे शहर आहे. होळीचा सणही येथील लोक मोठ्या थाटामाटात साजरा करतात. येथील लोक पारंपारिक लोकनृत्य आणि पथनाट्य सादर करून या उत्सवाचा आनंद घेतात. शिग्मो उत्सवाचे दोन प्रकार आहेत. धतोक शिग्मो आणि वडलो शिग्मो. ग्रामीण लोक धतोक शिग्मो साजरे करतात तर सर्व वर्गातील लोक वडलो शिग्मो साजरा करतात.

रंगपंचमी, महाराष्ट्र

महाराष्ट्रात रंगपंचमीची धूम असते. महाराष्ट्रात या दिवशी पुरणपोळी बनवली जाते. खासकरुन मासेमारी करणाऱ्यांच्या वस्तीत या दिवशी होळी साजरी केली जाते. नाचणे-गाणे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. काही ठिकाणी माठ फोडण्याच्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं जातं. मासेमारी करणारा समाजात हा दिवस लग्न ठरवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

महाराष्ट्रात होळी खूप वेगळ्या आणि मनोरंजक पद्धतीने साजरी केली जाते. होलिका दहनानंतरच्या दुसऱ्या दिवशी या उत्सवाला रंगपंचमी म्हणतात. या दिवशी लोक एकत्र येतात आणि एकमेकांना गुलाल लावतात. या दिवशी इथल्या प्रत्येक घरात पुरणपोळी खास बनवली जाते. या काळात तुम्ही इथे असाल तर नक्कीच त्याचा आस्वाद घ्यावा.

लेखक : प्रा. डॉ सुधीर अग्रवाल      

मो ९५६१५९४३०६

संग्रहिका : सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सत्संग म्हणजे काय — ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆  सत्संग म्हणजे काय — ✨ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

एकदा नारद मुनींनी श्रीकृष्णांना सहज विचारले- — ” देवा सत्संग सत्संग म्हणतात त्याचा एवढा काय हो महिमा?”

यावर देवांनी त्यांना काही एक उत्तर न देता एका कीटकाचा निर्देश करून सांगितले की तो कीटक तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. नारद मुनी त्या कीटकाला शोधत नरकापर्यंत गेले आणि त्यांनी त्या कीटकाला विचारले-

“सत्संगाचे काय फळ आहे तुला माहित आहे का?”

—कीटकाने त्यांचेकडे एक कटाक्ष टाकला आणि तो मृत झाला.

प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने ते पुन्हा श्रीकृष्णाकडे आले, म्हणाले, “ देवा तो कीटक तर काही बोलल्याविनाच मृत झाला. आता तुम्हीच उत्तर सांगा.”

देवांनी नारदांचे म्हणणे ऐकून घेतले, आणि ते म्हणाले, ” तेथे पहा त्या समोरच्या झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले पोपटाचे पिलू आहे. ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल.” नारदमुनी त्या पोपटाचे पिलाजवळ गेले आणि त्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला. पोपटाचे पिलाने एकदा डोळे उघडून त्यांचेकडे पहिले आणि त्याने डोळे मिटले ते कायमचेच. 

नारदमुनी मनाशीच विचार करू लागले ‘ काय सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे. कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला? ते मृत्यू पावले.’ 

अत्यंत दु:खी होऊन ते पुन्हा श्रीकृष्णापाशी आले. म्हणाले, “देवा आपल्याला सांगायचे नसेल तर नका सांगू.  पण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतोय ते मृत होत आहेत – अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचे धनी मला करणार आहात ?”

तेव्हा देव त्यांना म्हणाले, ” त्याची चिंता तू करू नकोस. तुला खरेच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर ते पहा, नुकताच तिथे एका गाईने बछड्याला जन्म दिलाय.. तो बछडा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल.”

दु:खी अन्त:करणाने नारदांनी तेथे जावून त्या बछड्याच्या कानाशी लागून त्यालाही तोच प्रश्न केला. त्यानेही नजर वळवून त्यांचे कडे पहिले आणि ते तेथेच लुढकले.

नारद मुनी घाबरून देवांकडे कडे परत आले.  तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून श्रीकृष्ण म्हणाले, “राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्माला आला आहे.  त्याचे कडून तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर मिळेल.” 

नारदांनी विचार केला, ‘आतापर्यंत कीटक, पोपट, व बछड्याच्या मृत्यूने माझ्यावर काही आपत्ती आली नाही.. पण राजकुमाराचे जर काही बरे वाईट झाले तर माझे प्राणही संकटात येवू शकतात.’ 

तथापि देवाचे भरवश्यावर ते राजकुमाराकडे गेले आणि त्यांनी धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले आणि पापा घेण्याचे निमित्त करून हळूच त्याचे कानात विचारले – “ सत्संगतीत राहिल्याने काय लाभ होतो? “

प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला आणि म्हणाला, “  मुनिश्रेष्ठ अजून आपण नाही समजलात ?

अहो आपण पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मी कीटक होतो..आपण मला हा प्रश्न विचारला 

आणि मी मेलो आणि पोपट झालो. नंतर आपल्या दर्शनाने मी घरट्यात मेलो आणि मला बछड्याचा देह प्राप्त झाला. पुन्हा आपले दर्शन घडले आणि बछड्याचा देह पडून  सर्व देहामध्ये श्रेष्ठ असा हा मनुष्य देह प्राप्त झाला — आणि पुन्हा आत्ताच्या दर्शनाने मला पूर्णत्व प्राप्त झाले. हे सर्व आपल्यासारख्या संतांच्या दर्शनाचेच फळ आहे. ज्यांना आपल्या सारख्या संतांचा सहवास मिळतो ते धन्य आहेत.” 

— नारदांना त्यांचे प्रश्नाचे उत्तर मिळाले व सत्संगाचा महिमाही कळला. 

“नारायण नारायण” म्हणत ते देवांकडे आले आणि म्हणाले,  ” देवा जशी आपली लीला अगाध

तशीच आपली समजावून देण्याची पद्धतही दिव्य आहे “

 

******म्हणून मित्रांनो जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे

**बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाटून जातात. 

**या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. 

**ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला. 

**श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला. 

**याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म, कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला. 

***** आपण ज्या सोबत रहातो त्याच्या विचारांचा,रहाणीचा, वागणीचा, अंमल हा आपल्यावर होत असतो.

**संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात . संगत कशी हवी याचा विचार करावा…

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उरलेलं अन्न… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ उरलेलं अन्न…  ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

घरात किंवा एखाद्या कार्यक्रमात उरलेलं अन्न तुम्ही गरीबांना दान म्हणून देणार असाल, तर‌ त्यापूर्वी हे आवर्जून वाचावे !

साधारण महिन्याभरापूर्वीची गोष्ट असेल. मी राहतो त्या चौकापासुन काही अंतरावर एक लहान गल्ली आहे त्या गल्लीतल्या अपार्टमेंटमध्ये राहणारे बरेचसे भाडेकरू I.T. मध्ये काम करणाऱ्यांपैकी आहेत. त्यांच्यापैकीच सुरज हा एक माझा मित्र आहे. मुळचा सोलापूरचा असणारा हा तरुण अभियांत्रिकीची पदवी मिळवून आता नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झाला आहे. अविवाहित असल्यानं तो आणि त्याच्याच कंपनीतील अजून दोघे असे फ्लॅट भाड्याने घेऊन राहतात. एखाद्या रविवारी सकाळी चहाच्या निमित्तानं आम्ही अधूनमधून भेटत असतो. अशाच एका सकाळी चहाच्या कपासोबत त्याने ऐकवलेला हा अनुभव…. 

..

— शनिवारी रात्री आमची जोरदार पार्टी झाली होती. घरमालकाच्या कडक सूचना असल्यानं आमच्या पार्ट्या घराबाहेरच साजऱ्या होतात. रात्री बऱ्याच उशिरा आम्ही आटोपतं घेतलं. अन्न बरंच शिल्लक राहिलं होतं, काही काही पदार्थांना तर अक्षरश: हात सुद्धा लावलेला नव्हता. अन्न वाया घालवणं माझ्या जीवावर आलं होतं, त्या मुळे मी त्यांना पार्सल करून देण्याची विनंती केली. रात्री खूप उशिरा आम्ही फ्लॅटवर परत आलो. मी आल्या आल्या सर्व अन्न फ्रीजमध्ये ठेवुन दिलं आणि झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा सकाळचे अकरा वाजले होते, दोन्ही मित्र अजूनही घोरत होते. मला चहाची खूप तलफ आली होती पण चहा बनवून घ्यायचा कंटाळा आला होता, दूध विकत आणण्यापासून तयारी होती.

असेच जाऊन खाली चौकातल्या टपरीवर चहा घ्यावा आणि परत येताना दूध घेऊन यावं असा विचार करून मी शॉर्ट्स आणि टी शर्ट वर बाहेर पडलो. चांगला एकाला दोन कप कडक चहा झाल्यावर थोडं बरं वाटलं.

..

मग जरा आजूबाजूला लक्ष गेलं, टपरी चौकातच असल्यानं गर्दी बऱ्यापैकी असते आणि गर्दी असते म्हणून मग भिकारीही बरेच असतात. असाच एक हडकुळा, गालफडं बसलेला, एका हाताने फाटक्या शर्टचा गळा घट्ट आवळुन धरलेला एक वयस्कर भिकारी माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि दीनवाणेपणाने काहीतरी पुटपुटत एक हात पुढं केला. मी शक्यतो पैसे देत नाही पण बऱ्याचदा जुने पण धडके कपडे, वापरात नसलेल्या वस्तु वगैरे देत असतो. त्याला पहाताच मला फ्रीजमधल्या अन्नाची आठवण झाली. आम्ही तिघांनी खाऊन सुद्धा बरचसं उरलं असतं एवढं अन्न शिल्लक होतं. त्यातील त्याला थोडंसं द्यावं म्हणुन मी त्याला विचारलं, त्यानंही मान डोलावून होकार दिला. मग पुढं मी आणि माझ्या मागुन रखडत्या पावलांवर तो असे फ्लॅटजवळ आलो. त्याला फाटकाबाहेरच थांबवून मी आतुन अन्नाची काही पॅकेट्स प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणली आणि त्याच्या हातात दिली. त्यानं एकवार त्याच्याकडं पाहिलं आणि कृतज्ञतेने दोन्ही हात जोडुन मला नमस्कार केला. आणि त्याच रखडत्या चालीने हळूहळू निघून गेला. मलाही हातून एक चांगलं काम घडल्याचं समाधान वाटलं.

..

पाहता पाहता रविवार संपला आणि दुसऱ्या दिवशीचे वेध लागले. माझी सकाळची ९ वाजताची ड्युटी असते त्यामुळं मी आठ वाजताच घरातून बाहेर पडतो. अंघोळ आटोपुन आरश्यासमोर भांग पाडत असताना कसला तरी आरडाओरडा आणि गोंधळ माझ्या कानावर पडला. काय झालंय ते पहावं म्हणुन मी दार उघडुन बाल्कनीमधून खाली डोकावून पाहिलं. सोसायटीच्या गेटबाहेर झोपडपट्टीतल्या असाव्यात अश्या वाटणाऱ्या आठ दहा स्त्रिया आणि सात आठ पुरुषमंडळी वॉचमन समोर कलकलाट करत हातवारे करत होती. मी बाल्कनीतुन खाली पहात असताना त्यांच्यातील एकाचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि तो माझ्याकडे बोट दाखवून काहीतरी ओरडायला लागला आणि मग सर्वच जण वरती पाहत गोंगाट करायला लागले.

..

मला कश्याचीच कल्पना नव्हती. तेवढयात वॉचमनने मला खूण करून खाली बोलावलं. दरवाजा लोटुन घेऊन मी खाली गेलो. त्या घोळक्यात तो कालचा भिकारीही दिसत होता पण त्याच्या आदल्या दिवशीच्या आणि त्या वेळच्या रूपात आता जमीन अस्मानाचा फरक होता. आदल्या दिवशी पुटपुटल्यासारखा येणार आवाज आता चांगला खणखणीत येत होता आणि कंबरेत वाकुन रखडत चालणारा म्हातारा आता चांगला दोन पायांवर ताठ उभा होता. मला समोर पहाताच त्यानं माझ्यावर एक बोट रोखुन अर्वाच्य शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली आणि मग बाकीचे लोकही ओरडु लागले.

..

मला नक्की काय घडतंय तेच कळत नव्हतं. अजून दहा पंधरा मिनिटे गोंधळ झाल्यानंतर मग मला असं सांगण्यात आलं की, मी आदल्या दिवशी दिलेलं अन्न खाऊन त्यांच्यातील एक लहान मुलगा आजारी पडला, त्याला दवाखान्यात न्यावं लागलं आणि त्यापोटी झालेला खर्च सात हजार रुपये हा मी द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. 

..

ते ऐकून मी सर्दच झालो, वास्तविक तेच अन्न आम्हीही रविवारी दुपारी खाल्लं होतं आणि आम्ही ठणठणीत होतो. आता त्यांच्यातल्या बायका पुढं झाल्या आणि त्यांनी अक्षरश: मला चहूबाजूंनी घेरून शिव्यांचा दणका उडवला. एव्हाना अपार्टमेंट मधील प्रत्येक बाल्कनीतुन चेहरे डोकावून पहायला लागले होते. मला मेल्याहुन मेल्यासारखं झालं होतं. तोपर्यंत मित्रही खाली आले होते.

..

ते लोक सरळ सरळ आम्हाला लुटतायत हे कळत असुनही काही करता येत नव्हतं. आमच्या अगतिक अवस्थेची त्यांना कल्पना आल्यामुळं आता त्यांच्यातील पुरुष मंडळी आमच्या अंगाशी झटायला लागली. बहुतांशी लोकांच्या तोंडाला आंबुस वास येत होता. मी कशीबशी सुटका करून त्यांच्या घोळक्यातून बाहेर आलो आणि पोलिसांना फोन लावावा म्हणून फोन बाहेर काढला (इतक्या वेळ फोन बाहेर काढला नव्हता, न जाणो त्यांनी कदाचित हिसकावूनही घेतला असता.)

..

“काय करताय साहेब ?” मला वॉचमनने विचारलं. “पोलिसांना फोन करतोय” मी उत्तरलो. “काही फायदा नाही साहेब, या लोकांना काही फरक पडत नाही. उलट उद्या पुन्हा शंभरभर लोकं येऊन गोंधळ घालतील, तुम्ही कशाला दिलात त्यांना खायला?” वाॅचमन म्हणाला.

..

माझ्या चांगुलपणाची ही परिणीती पाहून मी हबकुन गेलो होतो. वॉचमन मराठी होता, माझ्याच जिल्ह्यातील होता. अखेरीस त्याने पुढं होऊन रदबदली केली आणि दोन हजारांवर सौदा तुटला. मी आणि माझ्या मित्रांनी निमूटपणे पैसे गोळा करून त्यांच्या हातात दिले तेव्हाच जमाव हलला. 

..

माझ्या निर्णयाबद्दल मी क्षणोक्षणी पस्तावत होतो.

हल्ली मी उरलेलं अन्न फक्त कुत्र्यामांजरांनाच खाऊ घालतो किंवा चक्क फेकुन देतो. आणि गंमत म्हणजे तो म्हातारा भिकारी अजूनही मी दिसलो की निर्लज्जपणे फिदीफिदी हसत माझ्यापुढे हात पसरतो– “दादा, द्या काही गरिबाला पोटाला !”

..

माझ्या चांगुलपणापायी झालेली ही शिक्षा माझ्या नेहमीच स्मरणात राहणार आहे

..

ता. क. हल्ली पुण्यात तरी हा धंदा जोरात सुरू आहे असं दिसतं. आदल्या दिवशी शिळं पाकं अन्न घेऊन जायचं, अन दुसऱ्या दिवशी अख्खी वस्ती आणुन राडा करायचा. दिवसाला सात आठ हजार रुपयाला मरण नाही.

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले  ☆ ते आता दिसणार नाहीत … ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ते आता दिसणार नाहीत … ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

२६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी स्वा. वि. दा. सावरकरांचे निर्वाण झाले. लोककवी मनमोहन यांनी या दुःखद प्रसंगी आपल्या भावना पुढील काव्यातून व्यक्त केल्या… 

ते आता दिसणार नाहीत 

की जे निशाणातच नव्हे, प्राणातही भगवे होते !

 

ते आता स्पंदणार नाहीत 

की जे वेरुळचे शिल्प अंदमानात घडवीत होते !

 

ते आता बोलणार नाहीत 

की जे सत्तावन्न नंतरचे खरे ‘अठ्ठावन्न’ होते !

 

ते आता हसणार नाहीत 

की जे अमावस्येची प्रसन्न पुनव करीत होते !

 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आजी आजोबांचा व्हॅलेंटाईन वीक” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ आजी आजोबांचा व्हॅलेंटाईन वीक” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

एक होती साधीभोळी आजी , 

पण आजोबा होते कहर !

काहीतरी वेगळं करण्याची, 

आजोबांना मध्येच आली लहर !!

 

“यावेळेस आपण करूया का गं, 

प्रेमाचा आठवडा साजरा ?”

लाजत मुरडत हो म्हणत , 

आजीने लगेच माळला गजरा !!

 

 “रोझ डे” चा गुलाबी दिवस , 

केला गोडाधोडाचा भडीमार ! 

एकमेकांना भरवला गुलकंद , 

मग रोझ सरबत थंडगार !!

 

हिरो प्रमाणे गुडघ्यावर बसून , 

आजोबांनी मागणी घातली आजीला !

 “प्रपोज डे” साजरा करून गेले, 

दोघं आठवडी बाजारात भाजीला !!

 

आता “चॉकलेट डे” ला काय द्यायचं ?,  

म्हणून आजीने केला आटापिटा !

शेवटी ग्लास भरून दूध घेतलं , 

त्यात घातला भरपूर बोर्नविटा !!

 

 “टेडी डे” ला आजोबांनी आणली,  

छान अस्वलाच्या आकाराची उशी !

झोपेत दुखऱ्या मानेखाली ठेवताना, 

आजीने आजोबांनाच मारली ढुशी !!

 

दिवसभर लवंगा चघळण्याची, 

आजोबांना सवय होती फार !

 “प्रॉमिस डे” ला आजीने दिल्या, 

त्यांना प्रॉमिस टुथपेस्ट चार !!

 

म्हातार वयात काय हा चावटपणा ?, 

असं म्हणत आजी बसली अडून !

 “कीस डे” लाच झालं भांडण अन् , 

दिवस सरला शब्दांचा कीस पाडून !!

 

वाद मिटवायला आजोबांनी आणले, 

आजीच्या आवडीचे खास बटाटेवडे !

अरेरे दुसऱ्या दिवशी पोट बिघडलं, 

पार पडला मराठीतला “हग डे” !!

 

अखेर एकदाचा गाठला त्यांनी , 

 “व्हॅलेंटाईन डे” चा अवघड टप्पा !

गरमागरम चहासोबत रंगल्या ,  

राहिलेल्या बऱ्याच दिवसांच्या गप्पा !!

 

“जमायचं नाही बुवा आपल्याला, 

असलं नाटकी प्रेम करणं !”

नुसता सोहळा करायच्या नादात , 

असं उगाचच्या उगाच झुरणं !!”

 

“प्रेमाचा फक्त एकच दिवस , 

आपण म्हाताऱ्यांसाठी का असावा ? “ 

“प्रत्येक दिवस प्रत्येक श्वास , 

एकमेकांवर जीव लावून सोडावा !!”

 

सगळ्याचं प्रदर्शन करण्यापेक्षा, 

आपलं मनातलं प्रेमच बरं !

दिसलं नाही कुणालाच तरी, 

एकमेकांवर असतं मात्र खरं !!

 

सगळ्याचं प्रदर्शन करण्यापेक्षा, 

आपलं मनातलं प्रेमच बरं

दिसलं नाही कुणालाच तरी, 

एकमेकांवर असतं मात्र खरं !!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुख म्हणजे नक्की काय असतं ! ☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

🌼 आजी …  लेखक – अज्ञात 🌼 संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

निर्माल्याच्या जवळ असूनही,

कमाल असते ताजी !

अस्थिर हाती सुस्थिर माया,

म्हणजे खंबीर आजी !

 

आईहुनही घाली पाठीशी,

चूका करुनही माफ !

माया सांगे आत उकळती,

चश्म्यावरची वाफ !

 

एका पिढीला मधे ठेऊनी,

जिची उडी आवेगी !

तरलपणाने तिला समजते,

सगळे बसल्या जागी !

 

आता केवळ शतकासाठी,

नगण्य उरले कमी !

शतकपूर्तीची तिला असावी,

शंभर टक्के हमी !

 

रसाळ होता कमाल आंबा,

ठिबकत असते आजी !

पूर्ण फुलानी भरली फांदी,

तशीच झुकते आजी !

 

आजी असते निरांजनातील,

थरथरती फुलवात !

भविष्य आणि भूतामधली,

वर्तमानी रुजवात !

 

जरी उसवला तरीही असतो,

आजी भक्कम पीळ !

आणि घराच्या गालावरचा,

सौंदर्याचा तीळ !

 

घरात कायम आजी म्हणुनी,

दार घराचे खुले !

तिन्हीसांजेला अध्यात्माचे,

फूल भक्तिवर फुले !

 

🙏🏻 सगळ्या आजीना समर्पित  🙏🏻 

 

संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 51 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 51 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

९५.

या जीवनाचा उंबरठा मी प्रथम ओलांडला

त्या क्षणाची जाणीव मला नव्हती.

मध्यरात्री अरण्यात कळी फुलावी तसं मला

उमलू देणारी ती शक्ती कोणती बरं?

 

सकाळी उजेडात डोळे उघडून पाहिले

तेव्हा आपण या जगात परके नाही,

हे क्षणात माझ्या ध्यानी आले.

माझ्या आईच्या रूपानं निनावी आकारहीनानं मला आपल्या

हातात घेतलं आहे असं मला जाणवलं.

 

माझ्या मृत्यूच्या वेळी सुद्धा तीच अनोळखी शक्ती

जशी मी तिला ओळखत होतो,प्रकटेल.

जीवनावर मी प्रेम केलं तसंच मी मरणावरही प्रेम करेन,

हे मला ठाऊक आहे.

 

माता आपल्या उजव्या स्तनाजवळून बालकाला

दूर करते तेव्हा ते रडतं,

पण ती त्याला डाव्या स्तनाला लावते

तेव्हा क्षणात त्याला समाधान लाभतं.

 

९६.

मी इथून जाईन तेव्हा जातानाचा निरोपाचा शब्द

हाच असावा –

मी इथं जे पाहिलं ते उत्कृष्ट आणि अद्वितीय होतं.

 

प्रकाश सागरावर बागडणाऱ्या कमळातील लपलेला मध मी चाखला आणि मी पुनीत झालो.

हाच माझा निरोपाचा शब्द असावा.

 

अगणित आकाशाच्या खेळघरात मी खेळलो

आणि निराकाराचं दर्शन मला इथं झालं.

 

जे शब्दातीत आहे त्याचा स्पर्श मला झाला

आणि माझं सर्वांग थरथरून गेलं.

 

शेवटच व्हायचा असेल तर तो इथंच व्हावा.

हाच माझा अखेरचा शब्द असावा.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आईचे काही फ़ेमस डायलॉग… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आईचे काही फ़ेमस डायलॉग… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

आपल्या लहानपणीचे आईचे काही फ़ेमस डायलॉग …

 

१. आई भूक लागली …

“सारखं काय द्यायचं तुम्हाला खायला, आता मलाच खा”

( दहा मिनिटात आपल्यासमोर काहीतरी खायला असायचं तो भाग वेगळा)

 

२. सकाळची घाई गडबड आणि नेमकं गॅस सिलिंडर संपतं…अती त्राग्याने..” मरा, ह्या मेल्याला पण आत्ताच सम्पायचं होतं? एक एक दिवस अगदी परीक्षाच असते

( त्या परिक्षेत ती अगदी उत्तम पास होते तो भाग वेगळा)

 

३. आई वेणी घालून दे ना…

” एवढी घोडी झाली तरी आई लागते वेणी घालायला”

कृतःकोपा ने प्रेमळ धपाटा ..

( बोले पर्यंत वेणी घालून पण होते ते निराळं )

 

४. ” किती पसारा करता रे..आवरताना जीव मेटाकुटीस येतो, शिस्त नाही तुम्हाला, माझंच चुकलं, चांगले दणके द्यायला हवे होते..”

( तिच्या ही नकळत, रागाच्या भरात सर्व पसारा तीच आवरते)

 

५. पाणी प्यायला स्वयंपाक घरात गेलं की…

” दूध ठेवलय गं गॅस वर, लक्ष ठेव, माझी पाठ वळली की

पळून जाऊ नकोस, मी आलेच पटकन.

( गॅस इतका बारीक ठेऊन जाते, की ती परत आली तरी

किमान दहा मिनिटं तरी दूध तापायला लागतील , पण आपल्याला चांगलीच ओळखून असते त्यामुळे..)

” आणि ढणढण्या गॅस ठेऊ नकोस, दूध करपतं”

( काय बिशाद आपली गॅस मोठा करण्याची)

 

६. परीक्षेला जाताना…

” सगळं व्यवस्थीत घेतलंस ना? पेपर आधी नीट वाच,

धांदरटपणा करु नकोस “

( जगातल्या तमाम आयांना, आपलं परीक्षेला बसणारं

मुल धांदरट का वाटतं, हे न उलगडणारं कोडं आहे, अगदी मी आई झाले तरी)

 

७. आपण बाहेर जाताना…

“लवकर ये, उशीर करु नकोस…जास्त उशीर केलास तर दार उघडणार नाही “

आपल्याला यायला उशीर होतोच..

काळवंडलेल्या चेहर्याने दार उघडताच..

” कित्ती उशीर, काय झालं? सगळं ठीक आहे ना?”

( काळजीने प्रश्नांच्या सरबत्तीत, दार उघडणार नव्हती हे विसरुनच जाते)

 

काय अजब रसायन असतय ना आई म्हणजे?

आपल्याला म्हणते सुट्टी असली तरी लवकर उठावं 

आणि बाबांना म्हणेल, झोपू द्या हो एकच दिवस मिळतो..

 

आपल्याला म्हणते, असं घाबरून कसं चालेल?

आणि स्वतः मात्र सारखी घाबरते..

( हे घाबरणं आपल्यासाठी होतं हे आपल्याला कळे पर्यंत मात्र एक तप उलटतं)

 

पिढ्यांपिढ्या थोडया फार फरकाने हे संवाद असेच चालू रहातील, कारण आई सगळयांची सारखीच असते..आई ही आईच असते..

ती काल ही अशीच होती, आज ही अशीच आहे आणि उद्या पण अशीच राहील..

कारण आई ही फक्त आईच असते… कायम..

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares