मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ग्रुपची गंमत… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ग्रुपची गंमत… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

कोणीतरी त्यादिवशी व्हॉट्सअप ग्रुपवर ‘हॅपी बर्थडे अनिल ‘ अशा शुभेच्छा दिल्या. तेव्हा ‘आज अनिल चा वाढदिवस आहे’ हे ग्रृपमधील इतरांना समजले. लगेचच ग्रृपवर शुभेच्छांचा पाऊस सुरू झाला.

प्रत्येकाने त्वरित आपापले कर्तव्य पूर्ण केले. काहींनी मराठीत, काहींनी हिंदीत, काहींनी इंग्रजीत, काहींनी संस्कृतमध्ये तर काहींनी स्टिकर, GIF इत्यादी टाकून शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. काही क्षणातच ग्रुप ला उत्सवाचे वातावरण आले. यापैकी अनेक जणांना तर अनिल तो काळा की गोरा हे ही माहीत नव्हते.

दुपारी त्याच ग्रुपवर बातमी आली की ‘सदानंदच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे. लगेच ग्रुपवर दुःखाचा महापूर आला. ‘आर आय पी’ पासून ‘आम्ही सदानंदच्या  दुःखात कसे सहभागी आहोत’ याचे मेसेज येऊन आदळू लागले.

आता मध्येच अनिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात की नाही या संभ्रमात काही सदस्य पडले. पण यातूनही मार्ग निघाला.

जरा वेळाने वाढदिवस असलेल्या अनिलला शुभेच्छा आणि सदानंदच्या वडिलांना श्रद्धांजली असा ऊन – पावसाचा दुहेरी खेळ चालू झाला.

बघता बघता संध्याकाळ झाली आणि अनेकांच्या ‘दिवे लागणीची’ वेळ झाली.

त्यामुळे त्यातल्या एका दिवट्याने चुकून आज दुःखात असलेल्या सदानंदला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि अनिलच्या (हयात असलेल्या) वडिलांना श्रद्धांजली वाहिली.

पुढे ज्यांनी नुकताच ग्रुप उघडला होता त्यांनी (नेहमीप्रमाणे मागचे मेसेज न वाचता) आपापली अलौकिक प्रतिभा वापरून वाढदिवस असलेल्या अनिलचे (हयात असलेल्या) वडिलांच्या मृत्यूबद्दल मनापासून सांत्वन केले तर सदानंदला (आजच ज्याचे वडील मयत झाले होते त्याला) ‘हा अतीव आनंदाचा क्षण तुझ्या आयुष्यात अनेक वर्षे येवो’ असे म्हणत अभिष्टचिंतन आणि निरोगी दीर्घायुष्य चिंतिले.

भरीस भर म्हणून एका महाभागाने अनिलच्या वडिलांच्या मृत्यू करता दुखवट्याचे दोन मिनिटांचे शब्द रेकॉर्ड करून पाठवले, आणि सदस्यांना दोन मिनिटे मौन पाळायची विनंती ही केली.

काहींनी तर सदानंद कडून ‘भावा.. आज पार्टी पाहिजे’ अशी मागणी देखील केली.

सरतेशेवटी त्या संध्याकाळी ‘अनिल’ आणि ‘सदानंद’ दोघेही अचानक ग्रुपमधून लेफ्ट का झाले हे मात्र बऱ्याच जणांना आजतागायत समजलेले नाही. 😂

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रमाणामधे सर्व काही असावे… समर्थ रामदास स्वामी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रमाणामधे सर्व काही असावे… समर्थ रामदास स्वामी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

प्रमाणामधे सर्व काही असावे

कधी ते, कधी हेही वाचीत जावे,

अतीकोपता कार्य जाते लयाला,

अती नम्रता पात्र होते भयाला ।

अती काम ते कोणतेही नसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।

 

अती लोभ आणी जना नित्य लाज,

अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।

सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।

 

अती मोह हा दु:ख शोकास मूळ,

अती काळजी टाकणे हेही खूळ ।

सदा चित्त हे सद्विचारे कसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।

 

अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया,

अती खेळणे हा भिकेचाच पाया ।

न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।

 

अती दान तेही प्रपंचात छिद्र,

अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।

बरे कोणते ते मनाला पुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।

 

अती भोजने रोग येतो घराला,

उपासे अती कष्ट होती नराला ।

फुका सांग देवावरी का रुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।

 

अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड,

अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।

अती मत्सरे त्वां कशाला कुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।

 

अती आळशी वाचुनी प्रेतरूप,

अती झोप घे तोही त्याचाच भूप ।

सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।

 

अती द्रव्यही जोडते पापरास,

अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।

धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।

 

अती भाषणे वीटती बुद्धिवंत,

अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।

खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।

 

अती वाद घेता दुरावेल सत्य, 

अती `होस हो’ बोलणे नीचकृत्य ।

विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।

 

अती औषधे वाढवितात रोग,

उपेक्षा अती आणते सर्व भोग ।

हिताच्या उपायास कां आळसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।

 

अती दाट वस्तीत नाना उपाधी,

अती शून्य रानात औदास्य बाधी ।

लघुग्राम पाहून तेथे वसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।

 

अती शोक तो देतसे दुःखवृद्धी,

अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।

ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।

 

अती भूषणे मार्ग तो संकटाचा,

अती थाट तो वेष होतो नटाचा ।

रहावे असे की न कोणी हसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।

 

स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती,

अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।

न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।

 

अती भांडणे नाश तो यादवांचा,

हठाने अती वंश ना कौरवांचा ।

कराया अती हे न कोणी वसावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।

 

अती गोड खाणे नसे रोज इष्ट,

कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।

असोनी गहू व्यर्थ खावे न सावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।

 

जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी,

नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।

खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।

 

सदा पद्य घोकोनियां शीण येतो,

सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।

कधी ते कधी हेही वाचीत जावे,

प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।

— समर्थ श्री रामदास —

संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ऐब —(षडरिपु)☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ऐब —(षडरिपु)☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सहा दोष….. यांनाच षडरिपु म्हणतात. 

—-फार्सी भाषेत यांना ऐब म्हणतात.

 

हे सहा ऐब ज्याच्या अंगी ठासून भरलेले असतात, त्याला साहेब म्हणतात…..  

या सहा दोषांना सहज धारण करणाऱ्यास साधारण म्हणतात….  

या सहांना मान्य करणाऱ्यास सामान्य म्हणतात…..  

या सहांना आपल्या धाकात ठेवणाऱ्यास साधक म्हणतात….  

या सहांना अधू करणाऱ्यास साधू म्हणतात…..  

या सहांचा संपूर्ण अंत करणाऱ्यास संत म्हणतात…..  

आणि या सहांचा अर्थ नीट समजून घेऊन जो स्वतःची आत्मोन्नती करतो त्याला समर्थ म्हणतात….  

संग्राहक –  श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले  ☆ आयुष्य म्हणजे काय आहे ? ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ आयुष्य म्हणजे काय आहे ? ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

आयुष्य म्हणजे काय..

एक धुंद संध्याकाळ, ४ मैत्रिणी , ४ कप चहा, १ टेबल … 

आयुष्य म्हणजे काय..

१ इनोव्हा कार, ७ मैत्रिणी , आणि एक मोकळा पहाडी रस्ता ….

आयुष्य म्हणजे काय….

१ मैत्रिणीचे घर, हलकासा पाऊस, आणि खूप खूप गप्पा …

आयुष्य म्हणजे काय…

शाळेच्या मैत्रिणीसह, बुडवलेला तास, १ कचोरी, २ सामोसे,  आणि बिलावरून झालेला वाद …

आयुष्य म्हणजे काय…

फोन उचलताच पडणारी मैत्रिणीची  गोड शिवी, आणि सॉरी म्हटल्यावर अजून एक शिवी … 

आयुष्य म्हणजे काय … 

काही वर्षानंतर, अचानक जुन्या मैत्रिणीचा एक मेसेज, अंधुक झालेल्‍या काही ओल्या आठवणी, आणि डोळ्यातले पाणी …

 

आपण खूप मैत्रिणी  जमवतो…

काही खूप जवळच्या मैत्रिणी बनतात …

काही खास मैत्रीणी  होतात …

काहींच्या आपण प्रेमात पडतो…

काही परदेशात जातात…

काही शहर बदलतात …

काही आपल्याला सोडून जातात…

 

आपण काहींना सोडतो …

काही संपर्कात राहतात …

 

काहींचा संपर्क तुटतो …

 

काही संपर्क करत नाहीत … त्यांच्या अहंकारामुळे …

कधी आपण संपर्क करत नाही … आपल्या अहंकारामुळे  …

त्या कुठेही असोत… कशाही असोत… आपल्याला त्यांची आठवण असतेच … 

आपलं प्रेमही असतं…आपल्याला त्यांची उणीव भासते…आपल्याला त्यांची काळजीही असते ..

— कारण आपल्या आयुष्यात त्यांचं असं एक स्थान असतंच…

तुम्ही किती वेळा भेटता,  बोलता,  किंवा किती जवळचे आहात  ते महत्वाचे नाही …

 

जुन्या मैत्रिणींना कळू दे, की तुम्ही त्यांना विसरला नाहीत …

 

आणि नवीन मैत्रिणींना  सांगा, की तुम्ही त्यांना विसरणार नाही…

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ BF … बॉय फ्रेंड – (मनस्पर्शी नाते) — लेखक अज्ञात ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ BF … बॉय फ्रेंड – (मनस्पर्शी नाते) — लेखक अज्ञात ☆ डॉ. ज्योती गोडबोले  

काळानुसार बदलत जातो B F चा अर्थ …

 

एक छोटा मुलगा छोट्या मुलीला म्हणाला ! I am your BF! मी तुझा  BF आहे 

मुलीने विचारलं  — What is BF? 

मुलगा हसतो आणि म्हणतो… – म्हणजे Best Friend. खूप चांगला मित्र !

 

काही काळ जातो , मुलगा तारूण्यात प्रवेश करतो…

आणि ती मुलगी सुंदर युवती होते…

तो त्या युवतीला म्हणतो ; – I am your BF!

– मुलगी लाजत त्याच्या कानाशी हळूवार पणे विचारते… आता – What is BF? 

— मुलगा म्हणाला – म्हणजे पुरूष मित्र – Boy Friend 

 

काही वर्षानी त्यानी लग्न केले , त्यांना छान गोंडस बाळे झाली..

नवरा हसत बायकोला म्हणतो… — I am your BF! 

– बायको हसत नवऱ्याला विचारते — What is BF? -आता  BF म्हणजे काय 

— नवरा पुन्हा हसतो आणि मुलांकडे पहात म्हणतो… – तुझ्या मुलांचा मी बाबा.  Baby’s Father 

 

आणखी काही काळ जातो, दोघे वृद्ध होतात…समुद्रकिनारी बसून मावळता सूर्य ते पहात होते…

वृद्ध तिला पुन्हा म्हणाला.. – सखे   I am your BF!

– वृद्ध महिला हसली , आपल्या वृद्धत्वाच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या खूणांसह म्हणाली…

– What is  BF ? — आता सांग BF म्हणजे काय 

– वृद्ध आनंदात परंतु रहस्यमयी आवाजात म्हणाला…

— Be Forever — सदा एक दूजे के लिए !

 

जेव्हां वृद्ध जीवनाचा अखेरचा श्वास घेत होता , तेव्हाही म्हणतो…

 

— I am your BF!

— वृद्धा दु:खित अंतकरणाने विचारते : —- What is BF??? 

— डोळे बंद करत वृद्ध म्हणाला :

— म्हणजे Bye Forever — अलविदा सदा के लिए…

 

काही दिवसानी ती वृद्धा ही पंचतत्वात विलीन झाली….. 

…. भिंती वर दोघांचे फोटो लावले….

…. मुलांनी त्यावर एक सुंदर वाक्य लिहिले…

 

…….. BF…….  Besides Forever ….. कायमस्वरुपी जवळच आहेत…… 

 

संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काय गंमत आहे बोलण्यात— ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ काय गंमत आहे बोलण्यात— ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

काय पण गंमत आहे बोलण्यात , आपण “शब्द” किती पटकन बदलतो,

कशालाही नावं देताना आपण त्यांच्या “स्थाना”वरून निश्चित ठरवतो.

 

नितळ रस्त्यावरच्या खराब भागाला “खड्डा” म्हणून हिणवतो…….

तर नितळ गालावरच्या छोट्या खड्ड्याला “खळी” म्हणून खुलवतो…….

 

भिंतीवर पडलेल्या काळ्या ठिपक्याला “डाग” म्हणून डावलतो…….

तर चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागाला “तीळ” म्हणून गोंजारतो…….

 

तुटुन पडलेल्या केसांच्या पुंजीला “जटा” म्हणून हेटाळतो…….

तर चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या जोडीला “बटा” म्हणून सरकवतो…….

 

असंच असतं आयुष्यात आपल्याही “सोबती”नेच आपण तसे घडतो…….

चुकीच्या सोबतीने माणूस बहकतो, “योग्य” सोबतीनेच अधिक बहरतो……

 

एकदा प्रवीण दवणेंनी शांताबाई शेळके यांना विचारले की तुम्ही तुमच्या एका कवितेत आकाश आणि आभाळ असे दोन शब्द वापरले आहेत… दोन्हींचाही अर्थ पहायला गेला तर एकच आहे… मग असे दोन वेगळे शब्द का ..?

शांताबाईंनी किती सुंदर उत्तर दिले पहा.. त्या म्हणाल्या…… 

…चुकतोयस तू प्रवीण…

 ,..जे निरभ्र असते ते आकाश..

 आणि  ..जे भरून येते ते आभाळ..!!

…आणि म्हणूनच त्या निसर्गाच्या… त्या भगवंताच्या असीम कृपेला, त्याच्या मायेला आकाशमाया नाही तर आभाऴमाया म्हणतात ..!! 

अशीच आभाळमाया तुम्हा सर्वांमध्ये राहू देत. हीच प्रार्थना 

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 41 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 41 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

६९.

माझ्या धमन्यांमधून जो जीवनस्त्रोत वाहतो आहे

तोच अहोरात्र या विश्वातून वाहात असून

तालबद्ध नृत्य करतो आहे.

 

धरतीच्या मातीतून तो जीवनस्त्रोत

आनंद निर्भरतेनं अगणित तृणपात्यातून आणि आनंदानं नाचणाऱ्या फुलांच्या लहरीतून उमटतो .

 

जनन- मरणाच्या, सागराच्या भरती ओहोटीतून

तोच हेलकावे खात असतो.

 

जीवन – विश्वाच्या स्पर्शामुळं

माझी गात्रं दिव्य झाली.

 

या क्षणी युगांत जीवन स्पंदन

माझ्या अभियानातून नर्तन करत आहे.

 

७०.

या आनंदाच्या, तालाच्या भीषण भोवऱ्यात

फेकलं जाणं,नाहीसं होणं तुला अशक्य आहे का?

 

साऱ्याच गोष्टी धावतात, थांबत नाहीत.

मागे वळून पाहात नाहीत,

कोणाचीच सत्ता त्यांना रोखू शकत नाही,

त्या धावतच असतात.

 

त्या वेगवान व अस्थिर संगीताबरोबरच

ऋतू नाचत येतात, जातात.

निरंतर वाहणाऱ्या झऱ्यातून रंग, ध्वनी आणि

सुगंध यांचा आनंद पसरतो आणि नाहिसा होतो.

 

७१.

मी माझा अहंकार पुरवावा, तो मिरवावा,

तुझ्या तेजावर रंगीबेरंगी छाया फेकाव्यात-

ही सारी तुझीच माया.

 

तू स्वतःच्या अस्तित्वावर बंधनं घालतोस आणि

अगणित स्वरात स्वतःला विभागात राहतोस.

हे तुझं स्वतःचं अलगपण शरीररूपानं माझ्यात आलंय.

 

सर्वत्र आकाशात हे गान भरून राहिलंय.

त्यात किती रंगाचे आसू- हसू आशा नि धोके!

लाटा उठतात आणि विरतात.

स्वप्नं उमटतात आणि शिरतात.

माझा पराजय हा तुझाच पराजय आहे.

 

दिवस रात्रीच्या कुंचलानं अगणित चित्रं काढून

तू हा पडदा रंगवून सोडलास.

या पडद्यामागे तुझं आसन चितारलं आहेस,

त्यात निष्फळ, सरळ रेषा न वापरता

अद्भुतरम्य गोलाकार वळणांचा वापर केलास.

तुझा आणि माझा हा खेळ

सर्व आभाळात चालला आहे.

तुझ्या – माझ्या गीतानं सारं वातावरण

दुमदुमत आहे.

तुझ्या – माझ्या पाठशिवणीच्या या खेळात

लपंडावात किती युगं गेली?

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ऐका गोष्ट बाराची… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

ऐका गोष्ट बाराची… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

12/12/12/12/12

बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक…

— मोजण्यासाठी द्वादशमान पध्दती…१२ची

— फूट म्हणजे १२ इंच

— एक डझन म्हणजे १२ नग.

— वर्षाचे महिने १२,

— नवग्रहांच्या राशी १२

— गुरू,शनी, मंगळ हानिकारक समजले जातात….१२ वे

— तप….१२ वर्षाचे,

— गुरुगृही अध्ययन….१२ वर्षे

— घड्याळात आकडे…..१२,

— दिवसाचे तास …..१२,

— रात्रीचे तास …..१२ ,

— मध्यरात्र म्हणजे रात्रीचे..१२

— मध्यान्ह म्हणजे दुपारचे..१२

— एकादी गोष्ट तुटली फुटली म्हणजे तिचे वाजले….१२

— सकाळच्या बाजारात उरला सुरला माल १२ च्या भावात काढतात..

— पूर्वी मुलीचा विवाह १२ व्या वर्षी करत..

— इंग्लंडमध्ये १२ पेन्सचा १ शिलिंग

— बाळाचे नामकरण १२ व्या दिवशी केले जाते

— मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांचे..

— बलुतेदार,बारभाई,बारावाटा…सगळे १२,

— बेरकी माणूस म्हणजे १२ गावचं पाणी प्यायलेला

— तसेच कोणाचेही न ऐकणारी रगेल व रंगेल व्यक्तीला १२ चा आहे असे म्हणतात.

— ज्योतिर्लिंग…..१२ आहेत,

— कृष्ण जन्म….रात्री १२

— राम जन्म दुपारी…१२ ,

— मराठी भाषेत स्वर…१२ —- त्याला म्हणतात…बाराखडी

— १२ गावचा मुखीया,

— जमिनीचा उतारा ७/१२चा

— इंजिनिअरींग, मेडीकल, किंवा ईतर कोर्सेससाठी १२ वी नंतर प्रवेश 

— खायापिया कुछ नही , गिलास फोडा बाराना

— बारडोलीचा सत्याग्रह 

— पळून गेला ——पो’बारा’

—- पुन्हा पुन्हा ——-दो’बारा’

— एक गाव, भानगडी १२ 

— लग्न वऱ्हाडी ——— ‘बारा’ती

— काही लोकांच्या तोंडावर नेहमीच वाजलेले असतात ते पण १२. 

आणि

— सर्वात महत्त्वाचे…

— MH12 अर्थात ……पुणे

———- अशी आहे ही १२ चीं किमया….

— असे भन्नाट शोध फक्त आणि फक्त पुणेकर लावू शकतात–

— कोणालाच दोष देऊन उपयोग नाही….. 

कारण — महिनाच  “बाराचा” आहे… 

 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆  आयुष्य कुणी जास्त जाणलं?… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

☆ आयुष्य कुणी जास्त जाणलं?… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला….. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही.

तो एवढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत. गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही.

एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला —- खिशात दमडीदेखील नाही आणि फिरायला बाहेर पडतो.

त्याची नजर त्या भिकाऱ्याकडे – आणि त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते. त्या भिकाऱ्याच्या बाजूला एक पाटी, आणि दोन-तीन खडू पडलेले.

— हा लेखक त्या भिकाऱ्याकडे जातो आणि म्हणतो, ” मित्रा, मी एक लेखक आहे, ज्याच्याकडे एक पै देखील 

नाही. पण माझ्याकडे कला आहे. माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे. ती मी तुला देऊ शकतो. तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का? “

” साहेब” भिकारी म्हणतो, ” माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही. मी एक गरीब आंधळा भिकारी. तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं ते करा.”

— तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघून जातो.

— त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की, एकदम जाणाऱ्या – येणाऱ्यापैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्या पुढ्यात पैसे टाकू लागलाय. 

— थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते. तो भिकारी बेचैन होतो. नाण्यांची रास वाढतच जाते. तो एवढा अस्वस्थ होतो की पैसे टाकणाऱ्यांपैकी एकाचा हात पकडतो आणि म्हणतो, ” साहेब, माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल. मी एक गरीब आंधळा भिकारी आहे. मला कृपा करुन जर या पाटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील हो.”

— तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो—-

— “ वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी — आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी.”

— भिका-याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात.

——– आयुष्य कुणी जास्त जाणलं?—–

या ओळी लिहिणाऱ्या लेखकानं?—- त्या ओळी वाचून पैसे टाकणाऱ्या लोकांनी?— की इतक्या वर्षांनी रडणा-या त्या भिका-यानं?—–

 

तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल…

पण जर तुमची वाणी गोड असेल, तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल…

 

माणसाला बोलायला शिकण्यास (किमान) २ वर्ष लागतात…

पण ” काय बोलावे? ” हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते…

 

— ओढ म्हणजे काय? – हे जीव लावल्याशिवाय कळत नाही…

— प्रेम म्हणजे काय? – हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही…

— विरह म्हणजे काय? – हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही…

— जिंकण म्हणजे काय?–  हे हरल्याशिवाय कळत नाही…

— दुःख म्हणजे काय?– हे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही…

— सुख म्हणजे काय?– हे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही…

— समाधान म्हणजे काय? – हे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही…

— मैत्री म्हणजे काय?– हे ती केल्याशिवाय कळत नाही…

—आपली माणस कोण? – हे संकटांशिवाय कळत नाही…

— सत्य म्हणजे काय? –  हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही…

— उत्तर म्हणजे काय?–  हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…

— जबाबदारी म्हणजे काय?– हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…

आणि…. 

— काळ म्हणजे काय? –हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही…

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फुगलेलं आणि रुसलेलं दार… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ फुगलेलं आणि रुसलेलं दार… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

एक होती “ही” आणि एक होती “ती”.

दोघी समवयस्क आणि अनेक वर्ष शेजारी-शेजारी…. म्हणजे तशी “ही” राहायची पहिल्या मजल्यावर आणि “ती” दुसऱ्या. पण शेजारधर्म मात्र कायमच होता. कधी काही लागलं की हक्कानी सांगायच्या एकमेकांना. 

दोन्ही घरचा एक तरी डबा किंवा वाटी कायम दुसऱ्या घरी असायचीच. 

एके दिवशी “ही” च्या ह्यांना पावसामुळे किराणा आणायला जमलं नव्हतं. मग काय ?? “ही” गेली वाटी घेऊन साखर आणायला “ती” च्या कडे. “ती”नी सुद्धा “ही” चं हसत स्वागत केलं आणि दिली लगेच साखर…… 

“ही” चपला घालत थोडी आडोशाला काय गेली तशी “ती” जोरात पुटपुटली. “ रोजचाच ताप झालाय हा .. कटकट नुसती !!” … असं म्हणत वैतागून “धाडकन” दार लावलं जोरात.  “ही” ला ऐकू गेलंच .. बहुतेक ऐकू जाण्यासाठीच जोरात बोलली होती “ती”.

मग “ही” ची पण जरा सटकलीच. तणतणत वरती आपल्या घरी आली. “ एक वाटी साखर काय मागितली तर 

इतकं ?? जसं काही इस्टेट मागितली “ती” ची !!”…. असे ताशेरे झोडत “ही” नी दुप्पट जोरात आपलं दार लावलं. 

इतकंss  की खाली “ती” ला मुद्दाम ऐकू जावं. 

तेव्हापासून कानाला खडा…. “ही” आणि “ती” यांचं संभाषणच बंद. 

“ती”ला कळलंच नाही नेमकं काय झालंय. म्हणून एक-दोनदा गेली बोलायला. पण “ही” ढुंकुन सुद्धा बघायची नाही “ती”च्याकडे…… ‘ दोस्ती मे दरार… ‘

काहीच दिवसात बिल्डिंगला पालिकेकडून धोकादायकची पाटी लागली.  मग सगळेच वेगवेगळ्या दिशांना पांगले. 

दोघींचा काहीच संबंध आणि संपर्क उरला नाही. काळ लोटला .. वयं वाढली. 

जवळ एक आध्यात्मिक शिबिर होतं चार दिवसांचं. दोघींनीही तिथे नाव नोंदवलं होतं. योगायोगाने दोघींचीही राहायची व्यवस्था एकाच खोलीत. पण खूप गप्पा माराव्या असं वाटत असलं तरीही मनात दुरावा होताच अजून. 

पण “जुनं सगळं सोडून नव्याने संवाद साधा” अशी शिबिरातली शिकवण. म्हणून शेवटच्या दिवशी बोलल्या एकदाच्या…..  

“ही” ची तणतण मागील पानावरून पुढे.. 

“ काय गं ?? xxxxxxxx .. इस्टेट मागितली होती का ?”.. वगैरे वगैरे.

“ का गं ? असं का विचारतेस ??” 

“ मग रोजची कटकट म्हणत इतक्या जोरात तोंडावर दार आपटलंस ते माझ्या ? 

“ती” नी डोक्याला हात लावला.

“ बाप रे !! म्हणून बोलत नव्हतीस होय इतके वर्ष ??”  अगंss  ते मी तुला नाहीss  त्या दाराला म्हणत होते आमच्या !! आठवतंय ना,  पावसाळा होता तेव्हा ?? कसलं फुगलं होतं ते “दार”.. लावताना नाकी नऊ यायचे अगदी !! त्याला 

रोजचा ताप म्हणाले होते ss !! ”

“ अय्याss हो का?? .. हो बरोबर .. आमचं पण दार खूप फुगलं होतं तेव्हा. “ 

……. दोघींचा “रुसवा” कारण दाराचा “फुगवा” … एवढंच कारण फक्त… 

तेव्हा लक्षात ठेवा “ पावसाळ्यात दारं फुगतात ”. कुणी तुमच्या समोर असं धाडकन दार लावलं तर गैरसमज नसावा. 

बिल्डिंगमध्ये दारांचा असा जोरात आवाज येऊ शकतो…..  “ नवरा बायकोचं भांडण झालं असेल ” असे निष्कर्ष लगेच काढू नका. 

आणि हो ss  ……  

आपण सगळ्यांनीच “ मनाची दारं ” मात्र फुगण्यापासून वाचवूया…. किलकिली तरी ठेवूया निदान….. 

चांगले विचार आत यायला आणि वाईट बाहेर घालवायला. 

सरतेशेवटी सगळ्यात महत्वाचं… 

कधीही काही वाटलं तर आडपडदा न ठेवता लगेच बोलूया एकमेकांशी. बरेचदा कारण क्षुल्लक असतं पण आपण उगाच गंभीर समजतो. 

— बघितलं ना ss  “ही आणि ती”च्या चांगल्या मैत्रीची कितीतरी वर्ष वाया गेली. 

— आणि कारण काय तर “ घराचं फुगलेलं ” आणि “ मनाचं रुसलेलं ” ..  “दार”. 

संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares