☆ मानवी सवय…(एक खरी गोष्ट)☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
एक महिला आहे जयपूरमध्ये, ती PG ( पेइंग गेस्ट ) ठेवते. त्यांचे वडिलोपार्जित घर आहे, ज्यामध्ये मोठ्या १०-१२ खोल्या आहेत. 3 बेड प्रत्येक खोलीत ठेवल्या आहेत. त्यांच्या पीजीमध्ये जेवणही उपलब्ध आहे.
त्या मनापासून स्वयंपाक करतात. खाणाऱ्यांनाही ते आवडते. इतके उत्तम की सर्वोत्तम शेफला बनवता येणार नाही. नोकरदार लोक आणि विद्यार्थी त्यांच्या PG मध्ये राहात.
प्रत्येकजण सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण घेई, ज्यांना गरज आहे त्यांना दुपारचे जेवण पॅक करून मिळे.
पण त्यांचा एक विचित्र नियम आहे, प्रत्येक महिन्यात फक्त 28 दिवस अन्न शिजवले जाई, उर्वरित 2 किंवा 3 दिवस स्वयंपाकघर बंद. ते दिवस हॉटेलात खा अथवा काहीही करा, पण बाहेर.
मी विचारले, “ हे का ? किती विचित्र नियम आहे हा. तुमचे स्वयंपाकघर फक्त २८ दिवसच का ?”
“ आमचा नियमच आहे. म्हणूनच आम्ही फक्त २८ दिवसांसाठीच जेवणाचे पैसे घेतो. “
मी म्हणालो, “ हा काय विचित्र नियम आहे ? आपणच बनवला आहे, मग नियम बदला.”
ती म्हणाली, “ नाही. नियम हा नियम असतो.”
एके दिवशी मी त्यांना पुन्हा चिडवले, २८ दिवसांच्या त्या विचित्र नियमावर.
त्यादिवशी ती बोलली आणि म्हणाली, “ तुला समजणार नाही भाऊ, सुरुवातीला हा नियम नव्हता. मी खूप प्रेमाने असा स्वयंपाक करून खायला घालत असे. पण त्यांच्या तक्रारी कधी संपतच नसत. कधी ही उणीव, कधी ती उणीव, नेहमी असमाधानी आणी नेहमी टीका…… त्यामुळे वैतागून हा नियम केला. २८ दिवस प्रेमाने खायला द्या आणि उरलेले 2-3 दिवस बाहेरचे खा. आता त्या ३ दिवसात नानी आठवते. मैदा आणि मसूर यांचे भाव कळतात. बाहेर किती महाग आणि तरीही निकृष्ट अन्न मिळते हे कळते. चहाचे दोन घोट १५ ते 20 रुपयांना मिळतात.—- माझे मूल्य त्यांना या ३ दिवसांतच कळते, त्यामुळे उरलेले २८ दिवस अतिशय नरम राहतात.”
खरंय — जास्त आरामाची व आयत्याची सवय माणसाला असमाधानी आणि आळशी बनवते.
अशीच परिस्थिती देशात राहणार्या काही जनतेची देखील आहे, ज्यांना देशाच्या प्रत्येक परिस्थितीत नेहमीच काही उणिवा दिसतात. अशा लोकांच्या मते देशात काहीही सकारात्मक घडले नाही, होत नाही आणि होणारही नाही.
अशा लोकांनी काही दिवस पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा श्रीलंकेत घालवावे, जेणेकरून त्यांची बुद्धी बरोबर ठिकाणावर येईल.
संग्राहक : विनय गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
बाहेर दिवाळीची धामधूम सुरु असताना वेटिंग रूम मध्ये बसून ICU मध्ये ऍडमिट असलेल्या नातेवाईकांच्या टेन्शनमध्ये जे कोणी बसलेत, त्यांचा नातेवाईक लवकर पूर्ण बरा होऊन घरी सुखरूप यावा ही शुभेच्छा….!
फटाक्यांच्या दुकानातली गर्दी पाहूनही जे बालगोपाळ आपल्या बाबांच्या बजेटमुळे मनसोक्त खरेदी करू शकत नाहीत त्यांना भरपूर फटाके खरेदी करता यावेत ही शुभेच्छा…..!
शेजारणीच्या घरचा भरगच्च दिवाळी फराळ नुसता पाहून घरी परत आलेल्या गरीब गृहिणीला मनासारख्या लाडू, करंज्या, चिवडा करून आपल्या कुटुंबाला तृप्त करता यावं ही शुभेच्छा…..!
काचेमागच्या मिठाईला नुसता डोळ्यांनी स्पर्श करून सुखवणाऱ्या गरीब डोळ्यांना आता चवीचं सुखही जिभेला मिळावं ही शुभेच्छा…..!
बायकोला एखादा सोन्याचा दागिना करावा ही अनेकांची अनेक वर्षाची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण व्हावी ही शुभेच्छा…..!
गेली दोन वर्ष एकही नवा ड्रेस न शिवलेल्यांना यंदा मनासारखा ड्रेस शिवता यावा ही शुभेच्छा…..!
आपल्या खिशाला कात्री लावून आपल्या कुटुंबाची आनंदाची दिवाळी साजरी व्हावी यासाठी स्वतःकरता काही न घेता मन मारुन दिवाळी साजरी करतात अशा वडलांना मन न मारून दिवाळी साजरी करता यावी त्याबद्दल शुभेच्छा..!
सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ दे आई जगदंबे—- हीच इच्छा…
संग्राहक – श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ स्वर आले… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
” नवकिरणांचे दूत निघाले पूर्व दिशेहुन नाचत नाचत
नवीन गाणी ओठावरती किलबिलते पक्षांची पंगत
सोनेरी स्वप्नांची झालर पहाटवा-यावरती विहरत
नवी चेतना भरून घ्यावी जाने त्याने हृदयागारी
उल्हासाचे रंग भरले नभांतरी दशदिशांतरी “🌅
दिवाळी सुट्टीचा शेवटचा रविवार, उद्यापासून परत रोजचा दिनक्रम सुरु होणार. मस्त पडलेल्या या थंडीत नव-उत्साहात ,नव्या चेतना नवीन स्वप्ने घेऊन सुरवात करायची.
” स्वप्नचूर लोचनात एक रम्य आकृती
सूर सूर होता सर्व भावना निनादती 🎼
वाजतात पायीची बघ अजून नुपूरे
तेच स्वप्न लोचनात रोज रोज अंकुरे”
“दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी” म्हणता म्हणता दिवाळी येऊन केंव्हा गेली हे कळलच नाही. मात्र प्रत्येकाच्याच आनंदाची ‘जीवनातली घडी अशीच राहू दे, प्रितीच्या फुलावरी वसंत नाचू दे “
आता फूल घ्यायचे तर काट्यांचा सामना करायलाच पाहिजे का दरवेळेला? तरीपण
” हे फूल तू दिलेले मजला पसंत आहे
आहे फुलात काटा तो ही पसंत आहे
कधी सांगता न आल्या शब्दात प्रेमगोष्टी
श्रीमंत अक्षरांची इतुकीच खंत आहे “
ही देव गाणी आठवत, मनात गुंजन करत पुढे जात रहायचे
कवी यशवंत देव यांचा ३० आँक्टोबर स्मृतीदिन तर १ नोव्हेंबर जन्मदिन त्यांच्या स्मृतीस विनम्र 🙏🙏
☆ आई वडिलांचे आईवडील ” होता आले पाहिजे…! …जयंत जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆
“आई वडिलांचे आईवडील ” होता आले पाहिजे…. !
….एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो. जो जातो तो सुटतो , पण परीक्षा असते मागे राहणाऱ्याची…. कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार ? हे तर भगवंतालाच माहीत…
जो मागे रहातो त्याला आठवणी येणं, अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं !
आता प्रश्न असा असतो की ही आसवं, हे रडणं थांबवायचं कुणी…? मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ? पाठीवरून हात कुणी फिरवायचा ?….
निश्चितपणे ही जबाबदारी असते मुलांची , मुलींची , सुनांची….
थोडक्यात काय तर….दोघांपैकी एकजण गेल्यानंतर मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडील होता आलं पाहिजे…..!
लक्षात ठेवा, लहानपणी आई वडिलांनी नेहमी मुलांचे अश्रू पुसलेले असतात, आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात, स्वतः उपाशी राहून , काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात,
परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात.
म्हणूनच आता ही आपली जबाबदारी असते… त्यांच्या सारखंच निस्वार्थ प्रेम करण्याची….
असं झालं तरच ते आणखी जास्त आयुष्य समाधानाने जगू शकतील. नाहीतर ” तो माणूस म्हणजे वडील ” किंवा ” ती स्त्री म्हणजे आई ” तुटून जाऊ शकते , कोलमडून पडू शकते !
आणि ही जवाबदारी फक्त मुलं , मुली आणि सुना यांचीच असते असे नाही,
तर ती जबाबदारी प्रत्येक नातेवाईकाची , परिचिताची , मित्र मैत्रिणींची …….सर्वांची असते !
फक्त छत , जेवणखाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरंच, ही माणसं जगू शकतील !
आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय ? हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं ……
म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या ! केवळ माया , प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा. त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या !
उद्या हा प्रसंग प्रत्येकावर येणार आहे याची जाणीव ठेवून नेहमी त्यांच्याशी प्रेमाने,मायेने आणि आपुलकीने वागा !
लक्षात असूद्या,आई वडील हेच आपले खरे दैवत, त्यांची जिवंतपणीच काळजी घ्या, ते गेल्यावर तुमचे चारिधाम अथवा लाखोंचे दान देखील तुमच्या कामी येणार नाही…..!!
लेखक : जयंत जोशी
संग्राहिका : वीणा छापखाने
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
रेडिओवर हे गाणे लागले होते. ऐकताना ती तल्लीन झाली होती आणि तिच्या डोळ्यापुढून तिची वादळवाट गेली. होय अगदी खडतर वाट, बिकट वाट अशी तिच्या आयुष्याची वाट.
हिला जन्म देताच तिची आई देवाघरी गेली आणि तेथूनच दु:ख वाटेत आडवे आले . तिची ही पाऊलवाट खाचखळग्याची वाट झाली.
जणू दु:ख तिच्या वाटेत पडले होते. ते वाटेत अडथळे निर्माण करत होते. शेवटी तिनेच दु:खाशी वाटाघाटी केल्या. त्या अनवट वाटेवरची वाटसरू होऊन वाट भरकटू नये म्हणून ती वाटाड्या शोधत होती.
आता कोणती वाट धरायची हे ठरवायला तिला चारी वाटा मोकळ्या होत्या. थोडा विचार करून तिने एक वाट निवडली. पण हाय रे दुर्दैव! तेथेही दु:ख वाट वाकडी करून तिच्यापर्यंत आलेच. जणू त्या वाटेवर तिला वाटचकवा लागला होता. पुन्हा पुन्हा ती दु:खापाशी येत होती.
आता तिला वाटेत येणार्या दु:खाला वाटेला लावायचे होते. त्याचीच वाट लावून न परतीच्या वाटेवर त्याला सोडायचे होते. दु:खाच्या मागे आनंद सुखे वाटेवर पायघड्या घालून उभे आहेत हे तिला जाणवत होते.
पण आनंद सुखाच्या वाटेला जाणे वाटतं तितकं सोपं नव्हतं. त्यासाठी तिला वाट फुटेल तिकडे जाऊन उपयोगी नव्हत. जवळची वाट, लांबची वाट असा विचार न करता सुसाट वाट तरीही भन्नाट वाट तिला निवडायची होती.
एक दीर्घ श्वास घेताच आत्मविश्वास तिच्याच वाटेत उभा असलेला दिसला. तिला वाट दिसत नव्हती म्हणून तिची वाट तिनेच निर्माण करण्याचे ठरवले. दु:खांची वाट चुकवून त्यांची लागलेली वाट पाहून सुखाच्या वाटेकडे ती डोळे लावून बसली होती.
प्रयत्नांचा असलेला वाटेवरचा दगड तिला खुणावत होता. जिद्द, चिकाटी तिचे यशाचे वाटेकरी झाले होते. ही डोंगराची वाट, वाकडी तिकडी वाट, वळणावळणाची वाट असली तरी आता जणू नवी वाट फुटली होती. सगळ्या य़शस्वी लोकांची धोपट वाट त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीत असते हे तिला कळले होते. म्हणून हीच निसरडी वाट तिला तिच्या यश फुलांची वाट करायची होती.
म्हणूनच दुसर्या कोणाचेही न ऐकता मनाची साद ऐकून दुसरी वाट न स्विकारता दुर्मुखतेची वाट सोडून चोर वाटा , पळवाटा यांना काट देऊन रानवाटेलाच वहिवाट करून मेहनतीने तिने दगडी वाट तयार केली.
आता कोणी तिच्या यशाची, सुखाची वाटमारी करत नव्हते. उलट तिला आपला आदर्श मानून तिच्या वाट दाखवण्या कडे, तिची यशोगाथा तिच्याच मुखाने ऐकण्यासाठी डोळ्यात प्राण आणून तिची वाट बघू लागले.
ती सगळ्यांचा अभिमान बनून, एक चांगला आदर्श बनून, उजळमाथ्याने तिची यशोगाथा सगळ्यांना सांगत होती••••
“दु:खाने कितीही वाट अडवली ,आपली वाट मळलेली वाट झाली असली तरी वाईट विचारांच्या आडवाटेने न जाता आपल्या मेहनतीने जिद्द चिकाटीची वाट हीच सरळसोट वाट आहे मानून आत्मविश्वासाला सहवाटसरू करून आपलीच वाट आपल्या पायाखालची वाट केली तर यश किर्ती केवळ तुमची आणि तुमचीच आहे,” या वाक्याने संपलेल्या तिच्या स्फूर्तीकथेने टाळ्यांचा कडकडाट झाला आणि आनंदाश्रूंना तिने वाट मोकळी करुन दिली . साश्रू भरल्या नयनाने ती म्हणाली, ” याच खर्या प्रकाशवाटा असतात.”
लेखिका : सुश्री वर्षा बालगोपाल
संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
११ ऑक्टोबरला अमिताभ ८० वर्षांचा झाला . म्हणजे साधारण माझ्या वडिलांच्या वयाचा अमिताभ. तरी त्याला ‘अहो-जाहो’ करणं अशक्य आहे. जग एवढं बदललं. नेहरू गेले. मोदी आले. साधी थिएटर गेली. मल्टिप्लेक्स आली. आता तर सिनेमा मोबाइलवर आला. टांगेवाला मर्द गेला आणि ओलासह उबेरही आली. कारखाना मालक आणि कामगार यांच्यातल्या ‘नमक’चा संदर्भ बदलला. तरीही अमिताभ नावाचा ‘सिलसिला’ सुरूच आहे. या चमत्कारानं आपलंच डोकं जड होतं. तरी, नवरत्न तेलानं मसाज करायला हा आहेच हजर!
आज ऐंशीव्या वर्षीही अमिताभ पहाटे पाचला उठून सकाळी आठला सेटवर हजर असतो. आजही दिग्दर्शकांच्या सूचनांबरहुकूम काम करत असतो. अमिताभचे समकालीन काळाच्या पडद्याआड गेले. जे आहेत, ते उपकारापुरते उरले. पण अमिताभ आहेच. कोण्या पन्नाशीतल्या बाल्कीला अमिताभसाठीच ‘चिनीकम’ करावा वाटतो वा ‘पा’मध्ये अमिताभला लहान मूल करावे वाटते. ‘मी भूमिकेसाठी अमिताभची निवड नाही केली, तर अमिताभसाठी भूमिका निवडली’, असं बाल्की सांगतो. चाळीशीतल्या नागराज मंजुळेला, ऐंशी वर्षांच्या अमिताभनं आपल्या सिनेमात काम नाही केलं, तर आपल्याला ‘मोक्ष’ मिळणार नाही, असं वाटतं. शूजित सरकारलाही अमिताभ हवा असतो आणि करण जोहरलाही.
काय आहे हे?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, अमिताभ संपला नाही. कारण, तो थांबला नाही. तो साचला नाही. “आमच्यावेळी असं होतं!”, असं, माणसं दिवसातला निम्मा वेळ म्हणू लागली, की ती संपतात. आपली मुलं-बाळं रांकेला लागली की आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली, असं जे मानतात, ते अकाली म्हातारे होतात! सकाळी वॉक, दुपारी एक पोळी, रात्री ग्लासभर दूध एवढंच ज्यांचं आयुष्य होतं, ते त्या शेड्यूलचे गुलाम होतात. तेही ८० वर्षे फीट जगतात, पण केव्हाच संपून गेलेले असतात.
अमिताभ संपला नाही. कारण, त्याच्या त्या ‘ॲंग्री यंग मॅन’ रूपाप्रमाणेच तो सदैव कार्यरत राहिला. अपघात, आजारपणं, दुखणी त्याच्यामागे कमी नाहीत. कौटुंबिक ताण, पोराबाळांची चिंता नाही, असं नाही. उद्योगधंद्याचं तर पार दिवाळं निघालं. राजकारणात अपयशी ठरला. तरी तो उभा राहिला. धावत राहिला. अमिताभ हा अभिनेता वा माणूस म्हणून थोर आहे, असे माझे मत अजिबात नाही. पण, हे जे आहे ते का आहे? काय आहे? ते नाकारून कसे चालेल? अमिताभचा जादुई आवाज, अमिताभचा करिष्मा, कवीचा मुलगा असलेल्या अमिताभची साहित्याची समज, त्याचा आवाका, त्याची खोली हे कसं नाकारणार? रूढ अर्थानं अमिताभकडे ना चेहरा, ना ॲक्शन हीरोची शरीरसंपदा. पण, अमिताभ हा अमिताभच असतो. त्याचे डोळे, त्याचे नाक, त्याचा चेहरा, त्याची उंची, त्याचे शरीर असं सुटं सुटं करून चालत नाही. या सगळ्याचा म्हणून जो एकत्रित परिणाम आहे, तो अभूतपूर्व आहे. तो अमिताभ आहे!
परवा लॉ कॉलेज aरस्त्यावरच्या बरिस्तात कॉफी पित होतो. पलीकडच्या टेबलवर एक वयोवृद्ध जोडपं बसलं होतं. तर, दुस-या टेबलवर काही तरूण मुलं-मुली बसली होती. म्हातारा-म्हातारी पेन्शनपासून टेन्शन आणि मुलीच्या लग्नापासून ते फॉरेन टूरपर्यंत बरंच बोलत होते. तिकडं पोरं एक्झामपासून ते आयपीएलपर्यंत ब-याच गप्पा ठोकत होते. दोन्ही टेबलवरून दोन नावं मात्र सारखी ऐकू येत होती – अमिताभ बच्चन आणि शरद पवार. हे म्हातारे कॉलेजात होते, तेव्हा शरद पवार आमदार झाले, तर अमिताभच्या ‘आनंद’नं लक्ष वेधून घेतलं. किती उन्हाळे-पावसाळे पाहिले, पण हे दोघं आहेतच. पवारांचा पक्ष हरेल. अमिताभचा सिनेमा पडेल. पण, ते आहेत.
“सध्या काय करताय?” असं विचारल्यावर पवार परवा एका मुलाखतीत म्हणाले होते- “सेल्फी काढायला शिकतोय!”
हेच ते कारण आहे, ज्यामुळे माणसं ऐंशीव्या वर्षीही कार्यमग्न असतात. बाकी, तुम्हालाही नसतील, अशा व्याधी, अशी आजारपणं, अशा समस्या, असे ताण, असे प्रश्न त्यांच्या वाट्याला आहेत. पण, ‘ॲंग्री यंग मॅन’ला डोक्यावर घेणा-यांची नातवंडं कॉलेजात जाऊ लागली, तरीही हा ‘यंग मॅन’ अमिताभ आहेच. आणि, पवार ३८व्या वर्षी मुख्यमंत्री झाले, तेव्हा पवारांविषयी बोलणा-यांना आज त्यांची नातवंडं शरद पवारांविषयी सांगू लागली आहेत!
हे दोन्ही ‘बच्चन’ आजही कार्यरत आहेत, पण ते दोघेच नाहीत. तिकडे ८५ व्या वर्षी आमचे भालचंद्र नेमाडे नव्या प्रकल्पावर अहोरात्र काम करताहेत. त्यांच्या लिहिण्याने नव्या मुलांना आजही झपाटून टाकताहेत. त्याच वयाचे रतन टाटाही पहाटे पाचला उठून दिवस सुरू करताहेत.
शुभ्रा गुप्ता म्हणते ते खरंय. अमिताभच्या घरावर एकच पाटी आहे –
“Work in Progress!”
अमिताभला ‘हॅपी बड्डे’ म्हणणं म्हणजे अखंड, अविरत, अव्याहत अशा कार्यमग्नतेचं सेलेब्रेशन आहे! अमिताभ एका रात्रीत जन्माला येत नाही. तो अव्याहत कामातून, कार्यमग्नतेतून, अविचल निष्ठेतून ‘अमिताभ’ होत असतो.
हे ‘अमिताभ’पण लक्षात घ्यायला हवं.
(फक्त माहिती म्हणून सांगतो – अमिताभ हे महायान पंथातल्या बुद्धांचे एक नाव आहे.)
अविरत चालणं हा अमिताभचा ‘पासवर्ड’ आहे’. सो, चालत राहा. मुक्काम आणि मोक्षाच्या आशा करू नका.
पडद्यावर धावणारा अमिताभ आठवा आणि तसेच पॅशनेटली धावत राहा. चालत राहा. अविरत कार्यरत राहा.
तुम्हीही बच्चन व्हाल! माझी गॅरंटी.
लेखक – स्वामी संजयानंद
संग्राहिका -सौ. शशी नाडकर्णी- नाईक
फोन नं. 8425933533
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈