मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सदगुरु ही एकच व्यक्ती नसते, नसावी— बा. भ. बोरकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ सदगुरु ही एकच व्यक्ती नसते, नसावी— बा. भ. बोरकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

सद्गुरू ही एकच  व्यक्ती नसते ; नसावी ! गुरु केवळ मानवस्वरुपातच असतो असेही नाही ! सारी सद्गुणी माणसे आपल्यासाठी गुरुवत् असतात . कधी एखादे पुस्तक , एखादे मूल्य , एखादे तत्व , एखादा अनुभव आपल्याला बरेच काही शिकवीत असतो . एखाद्याला गुरुपण दिले तरी ते डोळस असावे ! असा प्रवास करत जाता आपण पोहोचतो विवेकापर्यंत ! म्हणूनच बोरकर आठवतात ! 

देखणे ते चेहरे 

जे प्रांजळाचे आरसे

गोरटे वा सावळे 

या मोल नाही फारसे !

तेच डोळे देखणे 

जे कोंडिती सार्‍या नभा

वोळती दुःखे जगाच्या 

सांडिती चंद्रप्रभा !

देखणे ते ओठ जे 

की ओविती मुक्ताफळे

आणि ज्यांच्या लाघवाने 

सत्य होते कोवळे !

देखणे ते हात 

ज्यांना निर्मितीचे डोहळे

मंगलाने गंधलेले 

सुंदराचे सोहळे !

देखणी ती पाऊले 

जी ध्यासपंथे चालती

वाळवंटातून सुध्दा 

स्वस्तिपद्मे रेखिती !

देखणे ते स्कंध ज्या ये 

सूळ नेता स्वेच्छया

लाभला आदेश प्राणी 

निश्चये पाळावया !

देखणी ती जीवने 

जी तृप्तीची तीर्थोदके

चांदणे ज्यातून फाके 

शुभ्र पार्‍यासारखे !

देखणा देहान्त तो 

जो सागरी सूर्यास्तसा

अग्निचा पेरून जातो 

रात्रगर्भी वारसा !!!

~ बा. भ. बोरकर

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 20 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 20 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

२७.

प्रकाश? अरे, कुठं आहे प्रकाश?

सतत चेतलेल्या इच्छेच्या अग्नीने तो फुल्ल!

 

दीप आहे, पण थरथरणारी ज्योत नाही,

हे ह्रदयस्था! हे माझे दैव आहे!

तुझा दुरावा मरणप्राय वाटतो!

 

दु:ख तुझ्या दाराशी क्वचित येतं

 

त्याचा संदेश आहे, तुझा स्वामी जागा आहे.

रात्रीच्या अंधारातून

तो तुला प्रेमसंकेत देतो आहे.

 

आभाळ भरून आलंय,

पाऊस संततधार कोसळतोय.

 

माझ्या अंत: करणात कसली कालवाकालव होते

त्याचा अर्थ उमगत नाही.

 

क्षणात चमकून जाणारी वीज

माझ्या नजरेला अंधारी आणते.

रात्र- संगीताकडे नेणारा मार्ग

माझं काळीज शोधू लागतं.

 

कुठाय प्रकाश?

ज्वलंत इच्छेच्या ज्योतीनं तो चेतव.

विजांचा लखलखाट होतोय.

आकाशाच्या पोकळीतून सुसाट वारा वाहतोय.

काळ्या दगडासारखी रात्र काळीकुट्ट आहे,

अंधारातच सारी रात्र जायला नको.

 

प्रेमाचा दीप आयुष्य उजळू दे.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सारं काही स्वतःसाठी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ सारं काही स्वतःसाठी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

देवधर्म पूजाअर्चा

सारं असतं स्वतःसाठी

देवाला यातलं काहीही 

नको असतं स्वतःसाठी

 

फुलं अर्पण करतो देवाला

ती काय त्याच्याकडे नाहीत म्हणून?

सारी पृथ्वीच ज्याचा बगीचा

त्याला काय करायचंय फुलं घेऊन?

 

नैवेद्य जो आपण दाखवतो

तो काय देव खातो?

तो तर स्वतःच प्राणीमात्रांचं

भरणपोषण करीत असतो

 

निरांजनाच्या इवल्या ज्योतीने

ओवाळतो आपण प्रभूला

चंद्रसूर्य जातीने

हजर ज्याच्या दिमतीला

 

स्तोत्रं त्याची गातो ती काय

हपापलाय म्हणून स्तुतीला ?

निर्गुण निराकार जो

त्याला अवडंबर हवंय कशाला?

 

देऊन देऊन आपण किती ‘दान’ पेटीत टाकणार ?

या भूतलावरीलच नव्हे ,

तर समग्र सृष्टीचा सकळ संपदेचा मालकच तो ….

 

सारं काही जे करायचं

ते स्वतःसाठीच असतं करायचं —-

प्रार्थनेनं देव बदलत नसतो

स्वतःच स्वतःला असतं सुधारायचं…

जास्त काही नाही ,

फक्त ‘ माणूस ‘ म्हणून जगायचं ..…

 

हीच खरी भक्ती आणि खरी पूजा

पटतंय का बघा ,

—— नाही तर चालू द्या …

 

कवी : अज्ञात 

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आजी आणि नातवंडे… श्री संदीप खोरे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆  आजी आणि नातवंडे… श्री संदीप खोरे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

आजी आणि तिची नातवंडं यांच्या नात्यावरची एक खूप सुंदर कविता आहे, संदीप खरे यांची…

आजी म्हणते काढल्या खस्ता

जन्मभर मी केले कष्ट

तू म्हणजे त्या सगळ्याची

शेवट गोड असलेली गोष्ट

 

सगळं कथा पुराण झालं

देव काही दिसला नाही

कुशीत येतोस तेंव्हा कळतं

कृष्ण काही वेगळा नाही . . .

 

– संदीप खरे

 

ह्या  कवितेला  नातवाने दिलेले  उत्तर :

 

प्रश्न खूप पडतात ग, आजी,

देशील का मज उत्तरं त्यांची?

ठाऊक आहेत देवकी-यशोदा,

पण . . . .

आजी होती का कृष्णाची?

 

खाण्यासाठी चोरून माखन

उगाच करी सवंगड्यांसी गोळा?

खडीसाखरेवरती आजी

देई न त्या लोण्याचा गोळा?

 

बांधुन ठेवी माय यशोदा

उखळासी करकच्चुन त्याला,

धावूनी का ग गेली नाही

आजी त्याला सोडविण्याला?

 

कधी ऐकले, त्यास आजीने

दिला भरवुनी मऊ दूधभात?

निळ्या मुखावर का ना फिरला

सुरकुतलेला थरथरणारा हात?

 

असेल मोठ्ठा देव, तरी पण

आजी त्याला नव्हती नक्की,

म्हणूनी सांगतो मी सर्वांना ..

कृष्णापेक्षा मीच लकी.

 

– सर्व आज्यांना समर्पित 🙏🌹

  – श्री संदीप खोरे

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 19 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 19 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

२६.

       तो आला, माझ्या शेजारी बसला,

       पण मला जाग आली नाही.

 

       मी अभागी मला कसली

       शापमय निद्रा लागली.

 

      शांत रात्री तो आला.

     त्याच्या हाती वीणा होती.

     त्या वीणेच्या संगीताने,

     माझी स्वप्नं नादमय झाली.

 

    अरेरे! माझ्या रात्री अशा वाया का गेल्या?

 

      त्याचे श्वास माझ्या निद्रेला स्पर्श करतात,

     पण मला त्याचे दर्शन होत नाही.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फुले ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ फुले ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

किती छान लिहिले आहे फुलांविषयी—

फुले माळावी मोगर्‍याची

फुले वेचावी परिजातकाची

फुले जपावी फुले जपावी बकुळीची

फुले दरवळावी चाफ्याची

फुले खुलावी गुलाबाची

फुले वहावी अनंताची

फुले बहरावी बहाव्याची

फुले घमघमावी रातराणीची

फुले फुलावी कमळाची

फुले रंगावी जास्वंदाची

फुले झुलावी मधुमालतीची

फुले भरावी केळ्याची

फुले मोहरावी आंब्याची

फुले ओघळावी बुट्ट्याची

फुले दिखावी बोगनवेलीची

फुले स्मरावी बाभळीची

फुले लाघवी अबोलीची

फुले निगर्वी गोकर्णीची

फुले उधळावी झेंडूची

फुले तोलावी केशराची

फुले उमलावी ब्रम्हकमळाची

फुले निरखावी कृष्णकमळाची !

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काय बदलले आहे ? ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ काय बदलले आहे ? ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

काय बदलले आहे ? असे विचारल्यावर नेहमी ऐकिवात येते की, “ जग बदलत आहे “. पण जरा विचार करा, नेमके काय बदलले आहे जगात…!!!

आजपर्यंत मिरचीने तिखटपणा नाही सोडला.., तर आंब्याने गोडपणा नाही सोडला…!!!

वृक्षांच्या पानांनी हिरवेपणा नाही सोडला…., तर वृक्षांनी सावली देणे नाही सोडले…!!!

सूर्याने तळपणे नाही सोडले.., तर चंद्राने शीतलता नाही सोडली…!!!

फुलाने सुगंध नाही सोडला..,  तर वा-याने वाहणे नाही सोडले…!!!

नदीने आपला मार्ग नाही बदलला.., तर सागराने आपली मर्यादा नाही सोडली…!!!

पक्षांनी विहार करणे नाही सोडले.., निसर्गाने कोमलता नाही सोडली.., ईश्वराने दयाळूपणा नाही सोडला…!!!

मग नेमके बदलले आहे ते काय ?—–

 बदलला आहे तो फक्त माणूस.., माणसाने माणूसकी सोडली…!!!

सृष्टी त्रेतायुगात अशीच होती. सत्ययुगात पण अशीच होती. द्वापार युगातही अशीच होती. आणि आता कलियुगातही तशीच आहे…!!!

बदलला आहे फक्त केवळ माणूस आणि त्याचे विचार. पण तो मात्र साऱ्या जगाला दोष देत असतो…!!!

 माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा…!!!

आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की, आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ शकत नाही…!!!

 तसेच जग बदललेय म्हणून जगरहाटीला दोष देऊ नका, समाधानी रहा सर्वांचे आभार माना…!!!

आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो…!!!                              

संग्राहक : माधव  केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कॅप्टन विक्रम बत्रा – भाग – 2 ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

कॅप्टन विक्रम बत्रा – भाग – 2 ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

(“पुढे काय झालं..? ” शिक्षकाने विचारणा केली… ) इथून पुढे —–   

सैनिक पुढे म्हणाला, ” मी म्हणालो, ” त्यांचा गोळीबार चालूच राहील… वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही… मी हे उरलेले तीस फुट अंतर जिवावर उदार होऊन जातो, म्हणजेच मी शत्रूला सामोरे जात त्याच्या गोळ्या अंगावर झेलत त्यांच्या खंदक (बंकर) कडे पळत जातो आणि हातबाॅम्ब (ग्रेनेड) टाकून तो उध्वस्त करतो. बंकर नष्ट झाल्यावर तुम्ही सर्व त्याचा ताबा घ्या.” 

मी हातात हातबाॅम्ब (ग्रेनेड) घेऊन शत्रूच्या खंदकाकडे पळण्यास सज्ज होताच तुमच्या मुलाने माझ्याकडे पाहिले व म्हणाला ‘ तू वेडा आहेस का..? तुझी बायको आणि मुलं तुझ्यावर अवलंबून आहेत…. आणि मी अद्याप अविवाहित आहे. मी शत्रूला सामोरे जातो आणि तू मला संरक्षण (कव्हरिंग) दे,’– आणि उत्तराची वाट न पाहता, जबरदस्तीने माझ्या हातातून ग्रेनेड हिसकावून तो शत्रूच्या बंकरच्या दिशेने पळत सुटला.”

“ पाकिस्तानी हेवी मशीनगन (H.M.G.) च्या संततधार पावसासारख्या गोळ्या बरसल्या. आपल्या मुलाने तो गोळीबार चुकवत पाकिस्तानी बंकर गाठला आणि ग्रेनेडची पिन काढून तो थेट बंकरमध्ये टाकला व तेरा पाकिस्तानी सैनिकांना यमसदनास पाठवले. हेवी मशीनगनमधून गोळ्यांचा वर्षाव बंद झाला आणि ते क्षेत्र आमच्या नियंत्रणाखाली आले.”

“ सर्वप्रथम तुमच्या मुलाचे शरीर उचलून बाहेर आणणारी मी पहिली व्यक्ती आहे. सर, त्याच्या शरीरात बेचाळीस गोळ्या घुसल्या होत्या. सर. मी त्यांचे डोके हातात धरले, त्यानंतरच त्याने शेवटचा श्वास घेतला. “ 

“ मी आपल्या वरिष्ठांना, तुमच्या गावी त्याचे पार्थिव पोहोचवण्याची जबाबदारी मला देण्याची विनंती केली.  परंतु सर., मला नकार देण्यात येऊन दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण कामगिरीवर मला पाठविण्यात आले.”

“कदाचित मला या शूरवीराला त्याच्या अंतिम यात्रेत खांदा देण्याचा बहुमान मिळाला असता व मी ही फुले त्याच्या पायावर वाहिली असती. ते मी करू शकलो नाही. पण मला ही फूलं तुमच्या पायावर वाहण्याची संधी तरी मिळाली सर. ” आणि त्या सैनिकाने एक उसासा टाकला.

शिक्षकाची पत्नी साडीचा पदर तोंडावर लावून मूक अश्रू ढाळीत होती. शिक्षक रडले नाहीत. त्यांनी त्या सैनिकाकडे गांभीर्याने पाहिले आणि सैनिकानेही अश्रू ढाळले नाहीत आणि त्याने शिक्षकाकडे बघितले.

शिक्षकाने नक्की काय विचार केला हे माहित नाही. आपल्या खांद्यावरील पिशवीतून त्याने एक पुडके बाहेर काढले आणि त्या सैनिकाला दिले व ते म्हणाले, “ माझा मुलगा सुट्टीवर येणार होता तेव्हा त्याच्यासाठी मी सदरा विकत घेतला होता. पण तो आला नाही. आणि आली… त्याच्या वीरमृत्यूची बातमी…”

“आता तो सदरा कोण घालेल ? … जिथे त्याने अखेरचा श्वास घेतला तेथे ठेवण्यासाठी मी तो सदरा घेऊन आलो होतो. कदाचित माझ्या मुलाचा आत्मा याठिकाणी कधीतरी येईल व तो सदरा घालेल अशी माझी श्रद्धा होती. परंतू आता मला माहित आहे की हा सदरा कुणी घालायचा आहे ते. नकार न देता कृपया हा घ्या.”

त्या सैनिकाच्या डोळ्यातून आता मात्र अश्रूंचे पाट वाहू लागले. तो पुढे सरसावला व त्याने तो सदरा असलेले पुडके स्विकारले.

त्या कारगिल हिरोचे शेवटचे शब्द होते “ जय हिंद ।” 

आत्ता हे जाणण्याची वेळ आली आहे …..

कारगिल हिरोचे नाव: कॅप्टन विक्रम बत्रा.

हिरोच्या वडिलांचे नाव: गिरधारी लाल बत्रा.

हिरोच्या आईचे नाव: कमल कांता.

माझ्या प्रिय मित्रांनो, हे लोक आमचे वास्तविक नायक आहेत.

या बलिदानाचा इतिहास आपण कायम स्मरणात ठेवू या.

Celebrate the Real Activists and not Just Celebrities.

हुतात्मा कॅप्टन विक्रम बत्रा, आम्हाला तुमचा अभिमान आहे. 

जयहिंद. 

संग्राहक : विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कॅप्टन विक्रम बत्रा – भाग – 1 ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

कॅप्टन विक्रम बत्रा – भाग – 1 ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

( ही घटना साधारण २२ वर्षांपूर्वीची आहे याची कृपया नोंद घ्यावी. ) 

जवळपास एक वर्ष उलटले आहे. हिमाचल प्रदेश राज्यातील एका खेड्यातून एक पत्र संरक्षण मंत्रालयाकडे आले. पत्र लिहिणाऱ्याने स्वत:चा परिचय शाळेतील एक शिक्षक म्हणून करून दिला होता …..

पत्रात ते लिहितात, की त्यांच्या एकमेव पुत्राला कारगिल युद्धामध्ये वीरमरण आले होते, आणि त्याचा पहिला स्मृतिदिन काही दिवसातच, म्हणजेच ०७/०७/२००० रोजी येत आहे, आणि जर शक्य असेल तर त्याच्या या प्रथम स्मृतीदिनानिमित्त, त्याला जेथे विरमरण आले ती जागा त्यांना व  त्याच्या पत्नीला बघायची इच्छा आहे. जर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हे शक्य होणार नसेल तर ते आपली विनंती मागे घेण्यास तयार आहेत, असाही उल्लेख त्यांनी पत्रात केला होता. 

हे पत्र वाचणाऱ्या संरक्षण मंत्रालयातील विभाग अधिकाऱ्याने विचार केला की मंत्रालयाकडून तर अशा भेटीच्या खर्चाची परवानगी मिळणार नाही, परंतू या वीरमाता- वीरपित्याच्या भावना व त्याग बघता त्यांच्या या प्रवासाचा व भेटीचा खर्च या अधिकाऱ्याने स्वतःच्या पगारातून करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आदेश जारी केला.

या शूरवीराच्या हुतात्मादिनाच्या दिवशी या वयोवृद्ध वीरमाता- वीरपित्याला त्यांच्या एकुलत्या एक पुत्राला जेथे वीरमरण आले त्या जागेवर सन्मानाने आणण्यात आले. तेथे हजर असलेल्या सर्व सैनिकांनी सावधान होऊन त्यांच्या सन्मानार्थ कडक सलामी दिली.

तिथे फक्त एकच सैनिक असा होता ज्याच्या हातात खूप फुलं होती. त्याने शिक्षकांच्या पायांवर डोके ठेवले आणि फुलं वाहिली. त्याने आपले डोळे पुसले आणि नंतर तो इतरांसारखाच सावधान उभा राहून त्यानेही कडक सॅल्यूट ठोकला.

शिक्षकाला आश्चर्याचा धक्का बसला आणि ते म्हणाले… “ तुम्ही एक सन्माननीय अधिकारी आहात… तुम्ही माझ्या पायांना का स्पर्श केला व पाद्यपूजा का केली ..? तुम्हीही इतरांप्रमाणे सलामी देऊ शकला असतात आणि मी त्या सॅल्युटला प्रतिसाद दिला असता..! ”

“नाही सर. येथे मी इतरांपेक्षा थोडा वेगळा आहे, म्हणजे येथे प्रत्येकजण ड्यूटीवर सज्ज आहे आणि मागील एक वर्ष किंवा त्याहूनही कमी काळात येथे नियुक्त झालेले आहेत.”

 “मी तुमच्या शूरवीर मुलाबरोबर त्याच रेजिमेंटमध्ये होतो , त्याच डोंगराळ भागातील कड्यावर पाकिस्तानी शत्रूसमवेत लढा दिला होता, आणि स्वतः प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी तुमच्या मुलाचा वीरतापूर्ण पराक्रम बघितला होता. आणि फक्त हेच नाही….. ” तो काही क्षण बोलायचं थांबला …..

शिक्षकांनी त्या सैनिकाचा हात धरला आणि म्हणाले, “ मला सांगा… जे काही मनात असेल ते  कुठलाही किंतु न बाळगता मला सांगा… मी रडणार नाही…..”

“ मला माहित आहे तुम्ही रडणार नाही सर… पण मीही रडायला नको ना ….” तो सैनिक पुढे म्हणाला….

“ त्या तिथेच पाकिस्तानी सैनिक त्यांच्या हेवी मशीनगनने मिनिटाला शेकडो गोळ्या झाडत होते. आम्ही पाच जण सावधपणे साधारण तीस फुटांच्या अंतरापर्यंत पुढे सरकलो आणि त्या मोठ्या दगडाच्या आडोशाला कानोसा घेत कसेबसे उभे राहिलो. पाकिस्तानी सैनिकांची आमच्यावर नजर होती. त्यांना बहुधा आमच्या हाता- पायांचा किंवा पाठीवरील सामानाचा थोडाफार भाग दिसत असेल व ते आमच्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यास तत्पर होते. अजून ब्रिगेडच्या इतर सैनिकांची कुमक येण्यास विलंब होत होता. काय करावे ते आम्हाला सुचत नव्हते.. !! मग …. ” त्या सैनिकाने एक सुस्कारा सोडला.

” पुढे काय झालं..? ” शिक्षकाने विचारणा केली…    

क्रमशः…

संग्राहक : विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ती आणि लाॅकडाऊन… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ती आणि लाॅकडाऊन… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

कोरोना आला, आणि स्वयंपाकघर हे केवढं कला दालन आहे हे कळलं. 

 एवढ्याशा ओट्याच्या मंचावर किती मैफिली रंगतात. कढया,पातेल्या,झारे,पळ्या,शेगडी,तेल,डाळी,पीठं मुके नाहीत. ते बोलतात ,पण त्याची रूचिर भाषा आपण इतके वर्ष ऐकली नाही. कारण त्या रंगदेवतेकडे, स्त्रीकडे आपण दुर्लक्ष केलं. राजाचा मुकूट प्रधान घालत नाही आणि प्रधानाचा मुकूट राजा ! तसं हात, भांडी, ओटा पुसायचे फडकेही वेगळे असतात.  स्वच्छता हेच ध्येय पण भूमिका वेगवेगळ्या !  

पट्टीचा गायकीवर हुकूमत असलेला गायक जसा जरा असंबद्ध होत नाही. तसं कितीही मोठी तान घेऊनही, भांडी पुसायचं फडकं ती हात पुसायला वापरत नाही. साधी बाटल्यांची बुचंही अदलाबदल करायला घाबरतात तिच्या प्रेमापोटी ! उकळत्या दूधाचं भांडं पकडीत पकडून, दुसऱ्या हातानं साय अडवून, दूध कपाबाहेर न सांडता चहा नितळ ठेवण्याएवढी मोठी कला नाही. आपल्याला चहा पुन्हा गाळावा लागेल नि ओटा पुन्हा एकदा पुसावा लागेल. एकाच वेळी दुधाला उतू जाऊ न देणं नि लेकराला धडपडू न देणं,  ही विश्वाला थक्क करणारी सर्कस वा कसरत तीच करते. पाणी प्रमाणात झेपेल एवढा घोट घेतला तर तहान भागवतं नाहीतर ठसका लागतो. तसा गॅसही ! तो गरजेप्रमाणे कमी जास्त ठेवावा लागतो.  त्याच्या ज्वालेचं प्रमाण बटणावर नसतं. अन्नपूर्णेच्या प्रतिभेवर असतं.

प्रत्येक गोष्ट ती खाऊन पहात नाही. रंग,वास यावरून तिला अंदाज येतो. अंदाज हा माझा पुरुषी अहंकार. अंदाज नसतो, खात्रीच असते ती. आमचा असतो तो अंदाज आणि त्याना असते ती खात्री. अंदाज आणि खात्री यात दडलेली बाई आपण पहात नाही, तेवढा वेळ या कलामंदिरात रहात नाही.

 नेहमी लागणाऱ्या वस्तू मंचावर नि कधीतरी लागणाऱ्या उंचावर, हे तिचं शहाणं नि व्यवहार्य व्यवस्थापन असतं.

ती स्टूलही आणून ठेवते, नि हाक मारते, “अहो,एवढं काढून द्याल का?” आज्ञा आणि विनंतीतलं अंतर म्हणजे माया.  ते ती जपते, पण हातातला पेपर नि त्यातल्या उठाठेवीत ही मायेची ठेव विसरत आपण कुरकुरतो. ती कुरकूर तिच्या तरल संवेदनांना कळते.  आपल्याला फक्त पापडाची कुरकुर कळते.  स्वयंपाकघर ही खोली किती खोल आहे ते ज्याला कधीच कळत नाही, तो पुरुष.  

सर्वात लहान खोली स्वयंपाकाची, त्याहून लहान देवाची.  

एक विश्वाचा स्वयंपाक करते तर दुसरीचं विश्वच स्वयंपाक!

दिवाणखाना मात्र मोठा….परक्यांसाठी. आपल्यांसाठीचा विचार आपण घर बांधतानाही करत नाही. म्हणून नंतर तिला स्मरत नाही !

बेल दिवाणखान्यात वाजते, पण ती फोडणीच्या आवाजातही ऐकू जाते ती याच स्त्रीला. कारण ती पूर्ण घर आतून आपलं मानते.  सारखं करणं या शब्दात * सारखं म्हणजे सतत वा सारखं म्हणजे नीट करणं.*  पण तीच सगळं सतत नीट करत असते.  नुसतं एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाता जाता ती दरवाज्यावरचा टॉवेल सारखा करते, गादीवरचा पलंगपोस सारखा करते. 

पसरणं नि आवरणं, ही क्रियापदं नाहीत, कृती नाही. तर ती वृत्ती आहे –पहिली आपली, दुसरी तिची ! 

आपण पसरायचं, तिनं आवरायचं !

तिच्या दमण्याचा आवाज कधी ऐकणार आपण? लक्षात ठेवा, असं मुलांचं वेळापत्रक, होमवर्क, नवऱ्याचे कपडे, गोळ्या आणि गाड्यांच्या वेळाही लक्षात ठेवणारं स्वयंपाकघर घराबाहेर पडतं , तेव्हा खरं लॉकडाऊन होतं !

” बाहेर ऊन, तर घरात चूल ” , ही फक्त घामाची वेगवेगळी कारणं !  

ठेच लागली तरी डोक्यावरची घागर, आणि ” कमरेवरचं भविष्य ” जी खाली ठेऊ शकत नाही, तिच्याहून मोठी विवेकाची नि सहनशीलतेची कला कुणाला जमणार? 

—-ती थांबेल, तेव्हा पृथ्वीच नाही, त्रैलोक्य लॉकडाऊन होईल !

संग्राहिका : बिल्वा अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares