मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आक्रोश…..(कविता)….प्रमोद जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ आक्रोश…..(कविता)….प्रमोद जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

मातीवरचा आक्रोश आता,

आकाशात पण नाही मावत !

बातमी केवढा आघात करते,

“आता नाहीत बिपिन रावत !”

 

नुसतंच शौर्य नव्हते रावत,

तिन्ही दलात समन्वय !

किती वीर रोज जातात,

तरी होत नाही सवय !

 

दर दिवशीच एकेक तारा,

उल्का होऊन पडत आहे !

खरंच गळ्यात हुंदका म्हणून,

एकेक घास अडत आहे !

 

शौर्य तिथेच घात असतो,

गांडुळं काय फिरतात कमी?

त्याना गाठू शकेन अशी,

यमालाही नसते हमी !

 

उंचावरती जाणंच सांगतं,

इंचा-इंचावरती धोके !

लोणी खावून जमिनीवरती,

खादीत निर्धोक,खादाड बोके !

 

चालती बोलती तटबंदीच ही,

“भारत-गड” सुखरुप ठेवते !

हुतात्म्यांच्या माळेमधे,

आपल्या सर्वस्वालाच ओवते !

 

काळालाही हेवा वाटतो,

म्हणून दगा हवेत देतो !

साक्षात् देव आसन सोडून,

असे वीर कवेत घेतो !

 

असह्य नि असहाय म्हणजे,

काय याचा अनुभव क्रूर !

पापणी सोडून एकेक थेंब,

त्यांच्यासोबत चाललाय दूर !

 

 -प्रमोद जोशी.देवगड.

9423513604

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्ट्रगलच संपला राव… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ स्ट्रगलच संपला राव !!! ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

सेल्फ स्टार्टर बाईक आल्यापासून..

हमारा बजाज तिरकी करून स्टार्ट करण्याचा आयुष्यातील  स्ट्रगलच संपला राव …!!

एलईडी टीव्ही आल्यापासून 

वुडन बॉक्स टीव्हीचे प्रक्षेपण बंद झाल्यावर “हमें खेद है ! “ वाचत प्रक्षेपण पुन्हा सुरू होण्याची वाट बघायचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव…!!!

डीटीएच आल्यापासून.. 

कौलावर चढून अँटेना फिरवत ‘ टीव्ही वरले चित्र दिसते का रे भो ? ‘ असे ओरडून विचारण्याचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव …!!!!

मोबाईल फोन आल्यापासून

रात्री दहानंतर एसटीडी बूथसमोर रांगेत उभे राहून आपल्या मुला-  मुलींची खुशाली– काय ..काय –करत विचारण्यात पल्सवर लक्ष ठेवत बिलाची चिंता करण्याचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव …!!!!

पेटीएम आल्यापासून..

हॉस्टेल रूमवर मनीऑर्डरची वाट बघत महिनाअखेरचे दोन दिवस भेळ भत्ता खाऊन काढायचा आयुष्यातला स्ट्रगलच संपला राव !!!

इमेल आल्यापासून..

गावाकडून येणाऱ्या पत्राची वाट बघत आख्खी दुपार लोळून काढण्याचा आयुष्यातला स्ट्रगलच संपला राव ..!!

गुगल आल्यापासून..

एखाद्या संदर्भावर लावलेली पैज जिंकण्यासाठी रात्र रात्र लायब्ररीतले दिवे जाळून पुस्तके चाळून काढण्याचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव !!!

गुगल मॅप आल्यापासून..

जिल्ह्याच्या रस्त्यावर हजार वेळा विचारूनही पत्ता हमखास चुकण्याचा आयुष्यातला स्ट्रगलच संपला राव!!!

व्हाट्सअप आल्यापासून..

कामावरून सुटल्यावर मित्रांच्या कट्टयावर जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडीचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव!!!

खरं सांगू ??

हे ग्लोबलायझेशन आल्यापासून….

माणसं सोडून यंत्राशी जमवून घेण्याचा आयुष्यातील मोठाच स्ट्रगल मात्र सुरू झाला ना राव !!!!

संग्राहक : माधव  केळकर 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विश्वविक्रम….उदयन ठक्कर – अनुवाद…अनामिक ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ विश्वविक्रम….उदयन ठक्कर – अनुवाद…अनामिक ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एका कवीने

लिम्का बुक ऑफ वल्ड रेकॉर्डला पत्र लिहिले,

मी नवीन काव्यप्रकाराचा शोध लावला आहे 

त्यात फक्त दोनच ओळी आहेत

पहिल्या ओळीत दोन शब्द व

दुसर्या  ओळीतसुद्धा दोन शब्द आहेत

म्हणून हा काव्यप्रकार  थोडक्यात थोडका आहे

आणि विश्वविक्रम आहे.

माझी विनंती आहे की आपल्या पुस्तकात याची नोंद कराल का?

कवींना उत्तर मिळाले ‘नोंद नाही करणार’

हे उत्तर थोडक्यात थोडके म्हणून उत्तरसुद्धा विश्वविक्रम आहे.

 

मूळ कवी  – उदयन ठक्कर

अनुवाद – अनामिक

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दिवाळीच्या फराळाची मैफल – भूपाल पणशीकर ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ दिवाळीच्या फराळाची मैफल – भूपाल पणशीकर ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित 

“रुके क्यू बेटा; गाओ सदाशिव गाओ, और गाओ” असे म्हणणारे खाँसाहेब असतील तर सदाशिव आणखीन झकास गातो… दिवाळीच्या फराळाचं असंच आहे. “रुके क्यू बेटा; खाओ और खाओ” असा आग्रह करणारे कोणी ‘खा’ साहेब असतील तर आणखीन एक बेसन लाडू तोंडात सरकवायला जास्त मजा येते !

फराळाचे पदार्थ करणे हे याग किंवा यज्ञकर्म असेल, तर तो असा साग्रसंगीत खावा की जणू संगीताची मैफलच आहे.

तुमचे बर्गर वगैरे टेबलावर बसून खावे, पण फराळासाठी झकास बिछायत असावी. लोड तक्के असावेत. अत्तराचा कानात बोळा आणि डाव्या पालथ्या हातावर ते फासलेलं असावं.

शक्यतो सुरवार-कुर्ता आणि स्त्री वर्ग साडीत असेल तर पदार्थांची चव दुपटीने वाढते.

पहिल्या षड्जासाठी कान आतुरलेले असतात, तसा पहिल्या घासासाठी घसा आतुर असावा. मैफलीच्या आधी जसे तंबोरे, तबला सुरात लावताना बाहेर गोड आवाज येतो, तसा आत डबे उघडल्याचा, चहाच्या कपाचा किणकिणाट बाहेर यायला हवा. मांडीवर शाल ओढून जसे गवई दोन तंबोऱ्यात बसतात, तसे रेशमी रुमालाने झाकलेले फराळाचे ताट दिमाखात खाद्यमंचावर यायला हवे; आणि जशी पहिल्या ‘सा’ ला ओठातून ‘क्या बात है!’ अशी दाद येते, तशीच लाडवाच्या पहिल्या तुकड्याला किंवा चकलीच्या पहिल्या तुकड्याला पोटातून ओठात आणि ओठातून जिभेवर दाद यायला हवी !

काही राग काफी थाटाचे असतात, तसे इथे देखील ‘ कॉफी ‘ थाट असेल तर मजा कुछ औरच ! अर्थात पदार्थाची बैठकही जमलेली असावी.

काही स्वर आरोहात वर्ज्य असतात, तसे पदार्थाचे बाह्य रूप असावे. म्हणजे चकली थोडी अबोली रंगाकडेच झुकलेली हवी. ती चवीला कितीही चांगली असली तरी काळपट दिसली की उगीच सम चुकते.

बेसन लाडू बाळसेदार आणि पठाणी जपानी अशा मिक्स- ब्रीड रंगाचाच हवा. अवरोह म्हणजे चव आणि जिभेवरील त्याचे विरघळणे.

भीमपलासी रागात अवरोहात धैवताला पंचम आणि रिषभला षड्जाचा कण जरा चिकटला की जशी खुमारी वाढते, तसेच चिवड्यात दाणे, काजू याचं अस्तित्व हवं. नाहीतर मूळ रागच बेसूर होऊन जातो. 

यमनात गंधार आणि निषाद हे वादी-संवादी आहेत, तसे लाडवात बेसन, रवा ही मंडळी वादी आणि साखर संवादी आहे. त्यामुळे यांचे प्रमाण अचूक हवे. गवयाच्या गळ्यासारखा रवा, बेसन व्यवस्थित तापलेला म्हणजे भाजलेला हवा. 

चकली ही अनेक रागांचे मिश्रण असलेली पण शृंगारप्रधान ठुमरी आहे. तिला एक ठसका आहे, लय आहे. चकली त्याच ठसक्यात असायला हवी. उगीच बेचव करून ठुमरीचं भावगीत करू नये.

शंकरपाळे वगैरे मंडळी हे मूळ गायक नव्हेत. मुख्य गायकाला श्वास घेण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी त्यांच्या बरोबर ते ओढे, म्हणजे कट्यारमधले चांद आणि उस्मान आहेत तसे असतात.

करंजी, अनारसे या बाबत मी फार भाष्य करणार नाही.

शेवटी सर्व स्वर कोमल असलेली भैरवी म्हणजे चहा, कॉफी, मसाला दूध ही मंडळी.

मैफिलीत सुरांनी सचैल स्नान घडावं आणि खाद्य मैफिलीत उत्तम चवीचं सचैल स्नान घडावं.

 

– भूपाल पणशीकर

संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ MMM ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ MMM – श्री सुनीत मुळे ☆ 

… कॉलेजला जाईपर्यंत मला MMM म्हणजे मालाडचा MM मिठाईवाला एवढंच माहीत होतं…

… पुढे कधीतरी MMM म्हणजे मदन मोहन मालवीय हे मला कळले…

… पण गमतीने जनता MMM म्हणजे Money Making Machine म्हणत असे…

… बनारस हिंदू विश्वविद्यालय बांधताना जमिनीपासून निधीपर्यंत… पंडित मदन मोहन मालवीय यांनी गोळा केलेली साधनसंपत्ती बघितली तर…” मनी मेकिंग मशीन “चा अर्थ कळतो…

… सुमारे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी बनारस हिंदू विश्वविद्यालय उभे करण्यासाठी त्यांनी काही कोटींचा निधी अत्यंत प्रेमाने व कुशलतेने गोळा केला होता…

… याच देणगीसाठी ते हैदराबादच्या निजामाला भेटले… विश्वविद्यालयाच्या नावातील “हिंदू” हा शब्द नबाबाला खटकत होता… पण निधीसाठी हिंदू या शब्दाशी तसूभरही तडजोड करायला पंडित मदन मोहन मालवीय तयार नव्हते…

… समोर बसलेल्या पंडितजींकडे पाहून आपल्या पायावर घेतलेला पाय हलवत नवाब बोलत होता… नबाबाच्या पायात मोजडी होती… एका अर्थी अप्रत्यक्षपणे नवाब पंडितजींना वहाण दाखवत होता… 

… पंडित जागेवरून उठले आणि अत्यंत नम्रतेने त्यांनी नबाबाच्या पायातली मोजडी काढून घेतली… नबाबाने दुसरा पाय पुढे केला.  पंडितजींनी तीही मोजडी काढून घेतली आणि ‘ बनारस हिंदू विश्वविद्यालयासाठी आपल्याकडून हीच देणगी असे मी समजतो ‘ म्हणून बाहेर पडले…

… आपण पंडितजींना जोडे दिले या आनंदात… नवाब खुशीत गाजरं खात होता…

… आणि तोपर्यंत नबाबाच्या कानावर बातमी येऊन धडकली… पंडितजी त्याच्या मोजड्यांचा हैदराबादच्या भर चौकात लिलाव करणार आहेत… नबाबाच्या अब्रूचं खोबरं व्हायची वेळ आली होती…

… आणि खरंच दुसऱ्या दिवशी सकाळी पंडितजी नबाबाच्या मोजड्या घेऊन लिलावासाठी हैदराबादच्या भर चौकात उभे राहिले… लिलावाची बोली सुरू झाली… नबाबाचा खास माणूस प्रत्येक बोलीच्यावर आपली बोली लावू लागला… पंडितजींचे जिवलग सहकारी गर्दीतून नबाबाच्या खास माणसाच्या बोलीच्या वर प्रत्येकवेळी बोली लावत होते… अर्थात तशी योजना खुद्द पंडितजींनीच केली होती…

…पंडितजींची अपेक्षा होती तेवढी बोली नबाबाच्या खास माणसाने लावली… बहुदा ती तीन-साडेतीन लाखाच्या आसपास असावी… पंडितजींनी आपल्या जिवलग सहकाऱ्यांना डोळ्याने इशारा केला… बोली थांबली… लिलाव संपला…

… आपल्याच मोजड्या… तीन साडेतीन लाख रुपये मोजून नबाबाने हैदराबादच्या भर चौकातून खरेदी केल्या… आणि हो–हे शे-सव्वाशे वर्षापूर्वीचे तीन साडेतीन लाख रुपये… जेव्हा ६४ पैशांचा रुपया होता, आणि एका रुपयाला ३२ नारळ मिळत होते… 

… “हिंदू” या एका शब्दासाठी आपल्या बुद्धीमत्तेचे सगळे कसब पणाला लावणारा… नबाबाची सगळी गुर्मी मस्ती उतरवून त्याच्याच मोजड्या त्याच्याच गळ्यात मारणारा… भारत मातेचा थोर सुपुत्र… MMM… देशाच्या स्वातंत्र्यासाठी तनमनधन अर्पण करणारा हा आधुनिक महर्षी… स्वातंत्र्यापूर्वी अवघे दहा महिने आधी स्वर्गवासी व्हावा हा काय दैवदुर्विलास…

पंडितजींच्या चरणी शतकोटी वंदन

संग्राहक :- श्री सुनीत मुळे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ असे एकदा तरी म्हण….☆ संग्राहक – श्री अनंत केळकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ असे एकदा तरी म्हण…. ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

अरे एकदा तरी म्हण—-

माणसाला हवा सदा आनंद,

पण देवाला देतो काही सेकंद.

विषयांमध्ये जातो  गढून,

देवाची आठवण अधून-मधून.

प्रपंच करतो आवडीने,

परमार्थ  मात्र सवडीने.

नाही पूजा नाही ध्यान, 

मोबाईलशी अनुसंधान.

नामस्मरण boring फार 

त्याने काय होणार यार?? 

देवाने करावी कृपा खास 

गप्पा मारतो तासंतास.

जप करतो माळेवर 

पण खरे प्रेम पैशावर.

खिचडीसाठी करतो उपास,

भक्तीमध्ये पूर्ण नापास.

स्वतःच्या पानात वाटयांची दाटी,

नैवेद्याला छोटी वाटी.

संकट आल्यावर देव आठवतो,

नवस बोलून deal करतो.

अभिषेक मोठ्या थाटात करतो, 

return वरती डोळा असतो.

सर्व करतो स्वतःसाठी,

पण देव हवा सदा पाठी.

 

देवाकडं सारख मागणं,

माणसा तुझं काय हे वागणं ??——

शक्ती दे, युक्ती दे, बुद्धी दे, विद्या दे

नोकरी दे, घर दे, बायको दे, मुलं दे

सुख दे, समाधान दे, यश दे, कीर्ती दे 

आणि हे  सारं कायम टिकू दे,  

असाही देवा वर दे ! 

 

हसून देव म्हणतो,

माणसा थकलो तुला देऊन सारखा— 

मागण्या मागतोस फारच मस्त,

पण एवढा मी नाही स्वस्त—-.

 

मागून मागून थकत नाहीस, थँक्यू सुद्धा म्हणत नाहीस !

भक्तीमध्ये करतोस लबाडी, अरे चाललीये कुठे तुझी गाडी.

 

एवढं सगळं द्यायचं म्हणतोस, पण माझ्यासाठी काय करतोस?? 

थोडीफार आठवण काढून, मलाच तुझी सेवा सांगतोस..!

 

अरे एकदा तरी म्हण राजा, देवा मला भक्ती दे. 

                                  मनी तुझे प्रेम दे, पायी तुझ्या मुक्ती दे.

 

तुझे गीत गाण्यासाठी कंठामध्ये सूर दे 

तुझे रूप बघण्यासाठी डोळ्यांमध्ये भूक दे 

 

तुझा महिमा ऐकण्याची कानांना या आस दे

                                     तुझे नाम घेण्यासाठी  माझा प्रत्येक श्वास दे. .! 

 

सुटो माझी आसक्ती, लाभो मला विरक्ती.

अंतकाळ साधण्याइतके नामामध्ये प्रेम दे—-

नामामध्ये प्रेम दे—-

 

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – याने जन्मभर बोलतच रहावे ! – भाग – 2 – श्री गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ याने जन्मभर बोलतच रहावे ! – भाग – 2 – श्री गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

(पण कोंझर सोडून पाचाडच्या चढाला लागलो, अन् जी वळवाच्या पावसाने झोडायला सुरूवात केली ! ) इथून पुढे ——-

गडाच्या चढाला प्रारंभ केला, त्या वेळी तर अक्षरश: काळोख दाटला, आणि त्यांत सुया टोचाव्यात, तसे अंगावर कोसळणारे पावसाचे थेंब. कसेबसे रात्री नऊ -दहाच्या सुमारास गडावर पोहोचलो, अन् शेडग्याने धर्मशाळेत गोळा करून ठेवलेले सर्पण जाळीत रात्रभर अंगे शेकीत बसून राहिलो. सहज चर्चा निघाली किल्ले बघण्याची. बाबाने बोलता बोलता म्हटले, की सिंहगड, पुरंदर, राजगड अन् तोरणा हे किल्ले मी असंख्य वेळा पाहिले आहेत ! एकूण दुर्ग किती पाहिले, ते आठवत नाही!

पुरंदर हे तर बाबाचे घरच. पुरंदरे हे नावच त्या किल्ल्यावरून पडलेले. एवढ्याने भागले नाही. या घराण्याला पर्वतीजवळची दोन चाहूर जमीन मलिकंबरने इनाम दिलेली. वतनाचे ते कागद अजून सुरक्षित आहेत. त्यानंतर मराठेशाहीत या घराण्याने तोलामोलाची स्वराज्यसेवा केलेली. पूर्वजांच्या कमरेला तलवार सदैव बांधलेली. 

पण अशा तर किती पूर्वजांच्या किती कुलदीपकांनी आपापल्या तलवारी मोडीत फुंकून टाकल्या आहेत. आपापल्या वतनांच्या कागदांनी पाणी तापवायचे बंब पेटविले आहेत. पूर्वजांच्या प्रतिष्ठेचे एरवी मोल ते किती ? 

पण ते या बहाद्दराने सांभाळले. त्याला शिकल करून, सहाणेवर धरून ते पाजळले. त्याची लखलखीत तलवार हाती पेलली ! 

बखरींचा अभ्यास तर अनेकांनी केला आहे. पण अशी शब्दकळा कुणाजवळ ? बाबाचे शिवचरित्र वाचू लागावे, तर भरजरी पाटाव नेसलेली, कानी-नाकी अलंकार ल्यालेली, वज्रचुडा पहेनलेली, कुण्या कुळवंताची कुळवंतीच हाती नीरांजन घेऊन उभी आहे, असा भास होऊ लागतो. बाबाने अवघ्या बखरी वाचल्या आहेत. अवघे शिवचरित्रसाहित्य साक्षेपाने, पदरमोड करून धांडोळले आहे. आणि मग एक नवी लखलखीत, तेजाने पुंजाळलेली सप्रमाण बखरच लिहिली आहे! धन्य आमची पिढी, की तिच्यात बाबासारखा बखरकार जन्मास आला !

पण हे एवढे शिवमहाभारत लिहूनही लटके प्रौढत्व कसे ते अंगी अजिबात नाही. अंगीचे शैशव या साऱ्या उद्यमामुळे हारपले नाही. एवढा प्रचंड खटाटोप, हा नजर फाडून टाकणारा प्रवास, हे डोंगरदऱ्या भटकणे, हे सगळे करूनही मूळचा अवखळपणा लवलेश उणावला नाहीं. 

छत्रपतींच्या जीवनाचा सारा तपशील जसा मितिवार, प्रहर-घटिकानिशी मुखोद्गत, तसेच, इतर पाठांतर काही कमी नाही. गडी जरा खुलू द्या. रानांत भटकत असतां सभ्यतेचे बंध थोडे सैल होऊं द्या. मग पाहा चुटक्या – चुटक्यांचा धबधबा कसा वाहूं लागतो, ते. कुणाकुणाच्या नकला, कुणाकुणाचे स्वर, कुणाकुणाचे खाकरणे, ठसकणे, अगदी सही सही ! इतिहासाच्या पंचपक्वान्नाच्या जोडीला लावणी- फटक्यांची चटणी-लोणचेही हजर ! 

पु.लं. नी ‘तुझे आहे तुजपाशी’ मध्ये कुण्या एका मुलीविषयी लिहिले आहे, की तिने जन्मभर चालतच रहावे ! 

बाबासाहेब पुरंदरे हा मनुष्य संगतीला लाभला. की वाटते, याने जन्मभर बोलतच रहावे ! असे साभिनय बोलणें, की त्याला तुलनाच नाही ! 

नागपूरचा एक प्रसंग सांगतो. विदर्भ साहित्य संघ आणि मोरभवन अशा दोन टोलेजंग इमारती एकीसमोर एक उभ्या आहेत. मध्ये सडकच काय ती. एका अतिशय विख्यात, वक्तृत्वाबद्दल सुप्रसिद्ध, एका काळी मराठी वाचकांवर अनभिषिक्त सम्राटपद गाजविलेल्या, पिकलेल्या प्राध्यापकांची शृंगाराने सिक्त झालेली व्याख्याने मोरभवनात सुरू होती. त्याच वेळी या तरूणाची शिवचरित्रावरील व्याख्याने समोरील विदर्भ साहित्य संघात चालू झाली. शिवचरित्र हे शिवधनुष्यच आहे. भलत्याने त्याला स्पर्श करू नये. 

पण कौतुक सांगतो, की ज्या वयात शृंगार अतिशय रोचक वाटतो, अशा तरूणांचे जथेच्या जथे मोरभवनातली शृंगाररसाने आर्द्र व्याख्याने टाकून विदर्भ साहित्य संघात गर्दी करू लागले. 

अशी ही जुगुलबंदी आठ दिवस चालली होती. शेवटी विदर्भ साहित्य संघाचे सभागृह तुडुंब भरून लोक बाहेर उभे राहून बाबांचा वाक्प्रवाह पिऊन जाऊ लागले. 

शेवटी मोरभवनांतील एका पेन्शनर श्रोत्याने कुतूहल म्हणून विचारले, 

“काय, हो ? इथे काय राज कपूर पाहायला लोक जमले आहेत काय ?” 

उत्तर मिळाले, 

“नव्हे ! इथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शिवराज्याभिषेकाचा प्रसंग सांगत आहेत !”

                                                                                                               समाप्त

लेखक  – गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर 

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – याने जन्मभर बोलतच रहावे ! – भाग – 1 – श्री गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

याने जन्मभर बोलतच रहावे ! – भाग – 1 – श्री गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

घड्याळांत सहाचे ठोके पडले, अन् आम्ही पन्हाळा किल्ला उतरायला प्रारंभ केला. आषाढ मासीच्या काळोख्या रात्री धूमधूम पावसात भिजत शिवछत्रपति पन्हाळा उतरून ज्या आडवाटेने विशाळगडीं पोहोचले, त्याच वाटेने जायचे, असा आमचा संकल्प होता. 

दहा-पाच पावले उतरलो, अन् पाहिले, की बाबासाहेब थांबले आहेत ! आता हा माणूस प्रवासाच्या आरंभीच हे असले करायला लागला, तर हा रानावनांतला पंचेचाळीस मैल प्रवास कसा पार पडायचा ! काहीसा चिडून मी हाका मारू लागलो. आपल्या मुद्रेवरचे हसूं मावळू न देता बाबासाहेब म्हणाले, 

“त्याचं काय आहे, अप्पासाहेब, उजवा पाय थोडासा लचकला. कसा, कोण जाणे ! पण निघताक्षणी त्यानं दगा दिला. हा निघालोच – गुडघ्याला रूमाल बांधताक्षणी !”

– अन् ते दु:ख वागवीत हा मराठी शाहीर ते रानावनांतले, अवघड वाटेवरले कंटाळवाणे पंचेचाळीस मैल तस्सा चालत राहिला ! मुद्रेवरचे स्मित त्याने कणभरही झाकोळू दिले नाही.

या माणसाला मी चांगला ओळखून आहे ! शिवचरित्रावरील भक्तीपोटी हा काय वाटेल ते करू शकतो, या विषयी माझ्या मनी तिळप्राय शंका नाही.

वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पावसाळा सुरू झाला होता. वरंध घाट बंद झाल्यामुळे महाडहून पुण्यास परततांना महाबळेश्वरमार्गे यावे लागत असे. मोटार महाबळेश्वरीं थांबली होती. पावसामुळे झडपा बंद करून घेतल्या होत्या. कुतूहलामुळे मी माझ्या मागची झडप उचलून पावसाचे झरपणे पाहात बसलो होतो. तों वाईकडच्या रस्त्याने कुणी सायकलस्वार चिंब भिजून आलेला दिसला. एकटाच होता. अंगातलें कुडते अंगाशी अगदी चिकटून गेले होते.  मस्तकावरून पाणी निथळत होते. दात थडथडत होते. 

पाहिले, तर गडी ओळखीचा वाटला. मी तिथल्या तिथून जोरजोराने हांक मारू लागलो. आइकून तो काकडलेला सायकलस्वार मोटारीकडे वळला. 

मी आश्चर्याने विचारले,

“बाबा, कुणीकडे ?”  

स्मित करून बाबासाहेबांनी म्हटलें, 

“प्रतापगडावर.”

“एवढ्या पावसांत ? अन् एकटे ? मोटारीने का गेलां नाही ?”

“तिथं एक कागद आढळांत आला, असा सांगावा पोचला. निघालो, झालं !”

एक जुना कागद आढळांत आला, असा म्हणे सांगावा आला. तेवढ्यासाठी हा माणूस पुणे ते प्रतापगड हा प्रवास वाटेतले तीन घाट चढून, या लागत्या पावसाळ्यांत, सायकलवरून करायला निघाला होता ! 

पण हे काहींच नव्हे. आम्हांला केवळ पुरंदर्‍यांचे शिवचरित्र दिसते. मोहोरेदार कागदावर छापलेले. चित्रे घालून सजवलेले. मराठी ग्रंथसंपत्तीचे केवळ शिरोभूषण असे श्री. ब.मो.पुरंदरेलिखित ‘राजा शिवछत्रपति’ ! पण त्यापाठीमागचे हे कष्ट, हे रक्त आटवणे कुणाला माहीत आहे ? जिथे जिथे शिवचरित्र घडले, तो बहुधा सर्व प्रदेश या तरूण पुरुषार्थ्याने पायांतळी घालून अक्षरश: विंचरून काढला आहे. अमुक एका खिंडीतून शिवछत्रपतिंचे सैन्य अमुक एका वेळी मुघलांसमोर उभे ठाकले, असे वाचले मात्र की त्या वाटेने तसतसा प्रवास करून तो सगळा प्रांत डोळ्यांखाली घातलाच पाहिजे. प्रतापगडाभोवतालचा तो पारघाट, ते जनीचे टेंब, ती जावळी, ते कोयनापार हे सगळे भटकले पाहिजे. या येडपट संकल्पात कोण जोडीदार मिळणार ? त्या भयानक प्रदेशांत भयानक झाडी. अस्वलांची आणि बिबळ्यांची वस्ती. हे रान तुडवीत बाबाबरोबर कोण हिंडणार ? ठीक आहे. न मिळो ! अंग काट्यांनी फाडून घेत हे महारण्य एकट्याने धुंडाळायचे. अन्न आहे आहे, नाही ! नाही ! चिंता करतो कोण ? देवाने तारूण्य दिले, ते कशासाठी तर मग ? 

या मस्ताना जोग्याने वाचले, की शिवछत्रपति आग्र्याहून नर्मदा ओलांडून दक्षिणेत शिरले. लगेच रेल्वेत बसून आग्रा गाठले, अन् भिडू निघाला तिथून पायी. सामानाचा लबेदा नाही. पाठीवर एक पिशवी, तिच्यांत कपड्यांचा जोड आणि एक पांघरूण. कोण करतो हो, हे सगळे ? कुणाच्या छातीत एवढी हिंमत ? 

आम्ही एकदा निघालो रायगडावर. दिवस होते सरत्या उन्हाळ्याचे. मी, पुरंदरे, अमरावतीचे देशमुख आणि बेदरकर. म्हटलें, की लवकरच पावसाळा लागेल, आणि मग मार्ग बंद होईल. पण कोंझर सोडून पाचाडच्या चढाला लागलो, अन् जी वळवाच्या पावसाने झोडायला सुरूवात केली !

क्रमशः….  

लेखक  – गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर 

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 23 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 23– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[१०९]

हल्ली हल्ली

माझ्याकडे

तरंगत तरंगत

हे जे ढग येतात

ते बसण्यासाठी नाही

की वादळाची वर्दी देण्यासाठीही नाही

ते येतात

माझ्या सायंकालीन आभाळाला

रंग देण्यासाठी

 

[११०]

दिवस ढळला की 

यावंच लागेल मला तुझ्यासमोर

पहाशील तेव्हा सारे ओरखडे

खुणा आणि व्रणसुद्धा  

आणि

उमगतील तुला

माझ्या जखमांची उत्तरं

माझी मीच शोधलेली

 

[१११]

रस्त्याच्या कडेने

मुसमुसणार्‍या गवता

एकदा तरी

आकाशातल्या त्या तार्‍यावर

मनोभावे प्रेम कर.

तेव्हाच तुझी स्वप्ने

फुलं बनून येतील

आणि लहरतील तुझ्यावर

 

[११२]

तुझ्या नि:शब्द गाभ्याशी

घेऊन चल मला

मग ओसंडतील

काळजातून माझ्या

लक्ष लक्ष गाणी

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆- Being alive is a special occasion. – ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ Being alive is a special occasion. – डॉ संजय मंगेश सावंत ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

Being alive is a special occasion !!! 

काल सकाळी सकाळीच माझ्या एका मित्राने, डॉक्टर दीपकने एक मेसेज पाठविला, Stop keeping your clothes & shoes for special occasion, Wear them whenever you can,, Now a days being alive is a special occasion !!! 

आजच्या परिस्थितीत लागू पडेल असा किती सुंदर आणि अर्थपूर्ण मेसेज आहे बघा,,, 

सणासुदीला किंवा लग्नसमारंभासाठी घालता येतील म्हणून तुमचे मौल्यवान कपडे आणि शूज  नुसते कपाटात ठेवून देऊ नका. आजचा दिवस तुम्ही जिवंत आहात हाच तुमच्यासाठी सर्वात मोठा सण व क्षण आहे,,, 

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.  एका वृद्ध दाम्पत्याकडे व्हिजिट साठी गेलो होतो. दोघेही ८० च्या आसपास असावे. राहणीमान, कपडालत्ता यावरून अत्यंत गरीब वाटायचे. फी देतानासुद्धा घासाघीस करायचे. औषधे लिहून दिली तरी अर्धीअधिक आणायचे. कसली चैन नाही, कोणा नातेवाईकांचं येणं जाणं नाही, कधी चांगलंचुंगल खाणं नाही, की कपडा नाही. परंतू असते एखाद्याची परिस्थिती नाजूक, असं म्हणून मी दुर्लक्ष करायचो. 

एक दिवस माझ्या व्हिजिट बॅगमधला  प्लास्टिकचा एक मोठा बॉक्स होता रिकामा होत आला होता. ते बाबा मला म्हणाले, “ डॉक्टर साहेब मला तो बॉक्स द्याल का ?”  मी लगेच त्यांना तो देऊन टाकला,,, कशासाठी पाहिजे असं विचारताच थोडं गडबडून गेले, पण बायको पटकन बोलून गेली, “ त्यांना 1000 च्या नोटा ठेवण्यासाठी पाहिजे, “– मी अचंबित –निघताना पुन्हा म्हणाले,” अजून एखादा असेल तर पुढच्या वेळी द्या मला. यात बसणार नाहीत.“ त्यावेळी माझी  व्हिजिट फी दहा रुपये होती, ती देण्यासदेखील ते नाखुश असायचे. विचारांचं काहूर डोक्यात घोंघावत असतानाच गाडीला किक मारून घरी आलो,,, 

दुसऱ्या दिवशी सकाळीच ओपीडी मध्ये शिरतो न शिरतो तोच कंपाउंडर म्हणाला, “ सर काल सकाळी तुम्ही व्हिजिटला गेला होतात, ते आजोबा सकाळीच गेले,,,”  पटकन माझ्यासमोर नोटांनी गच्च भरलेला त्यांचा तो प्लास्टिकचा बॉक्स आला,,, ‘ ना खुद खाऊंगा, ना खाने दुंगा ‘ असं आयुष्य जगतच, कसलाही उपभोग न घेता, नोटांचा बॉक्स खाली ठेवून बाबा वर गेले होते— आपण अमर आहोत किंवा अजून खूप जगणार आहोत या भ्रमातच ते गेले.  

मागच्या महिन्यात आईचे वर्ष श्राद्ध झाले.  तिच्याकडे भरपूर किमती साड्या होत्या.  मोठी बॅग भरली होती. काहींच्या तर घड्यादेखील मोडल्या नव्हत्या. परंतू ती नेहमी साध्याच साड्या वापरायची. अर्थात वयोमानाने विरक्ती आल्यामुळे असेल कदाचित, पण या साड्यांमुळे  नीताचा  व तिचा नेहमी वाद व्हायचा,” कशाला नुसत्या ठेवून दिल्या आहेत बॅगेत,,,  कुणी बघितलं तर म्हणतील डॉक्टरांची आई असून कसल्या साड्या घालते “ –वगैरे वगैरे. “ मला कोण बघणार 

आहे ?”, तिचे नेहमीचे उत्तर. जेवढ्या चांगल्या साड्या होत्या त्या गरजूंना देऊन टाकल्या, बाकीच्या साड्यांची बॅग तशीच पडून आहे !!

आपल्या वॉर्डरोबमध्ये अनेक नवीन साड्या, पॅन्ट शर्ट पडून असतात. एवढ्या भारी साड्या, शर्ट, पॅन्ट रोज कशाला वापरायच्या, म्हणून तशाच पडून असतात. कधीकधी त्या घालायचा  मुहूर्तही उजाडत नाही. आणि समजा लग्न समारंभ किंवा इतर सणासुदीला घालायच्या म्हटल्या तर त्याची फॅशन आउटडेटेड झालेली असते. त्या योग्य वेळी वापरल्या असत्या तर त्याचा उपयोग झाला असता. कपड्यांच्या बाबतीतच नव्हे, तर घरामध्ये अशा अनेक गोष्टी आपण ‘ नंतर वापरू ’ असं म्हणत म्हणत कालबाह्य होऊन जातात व तशाच लोळत पडतात,,, 

आपल्या आयुष्यामध्ये वस्तूंच्या बाबतीत जी गोष्ट घडत असते तीच आपल्या मनातील चांगल्या-वाईट विचारांच्या बाबतीत देखील घडत असते. बरेचदा आपल्या आयुष्यात येणारे मित्र, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य, यांच्याबद्दल आपल्या मनात असणारा स्नेह, प्रेम, आपुलकी, आपण आपल्या इगो किंवा संकुचित  वृत्तीमुळे बोलून दाखवत नाही. मग बरेचदा वेळ निघून जाते,  कारण बोलण्यासाठी ती व्यक्तीच उरलेली नसते. संचय वस्तूंचा असो वा मनातील विचारांचा, त्याचा योग्य विनियोग, वापर झाला नाही तर त्यांची किंमत शून्य होऊन जाते. तेव्हा मित्रांनो आजचा उगवलेला दिवस हाच आपल्यासाठी occasion असतो– त्याच्यावरच आपला अधिकार असतो.—म्हणून तुमच्याजवळ असलेले मौल्यवान–मग त्या वस्तू असोत वा विचार— आजच वापरून टाका– त्या ‘ आउटडेटेड ‘ होण्याअगोदर !!!

डॉ संजय मंगेश सावंत 

संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print