वाचताना वेचलेले
☆ “मुरलेला हात” – लेखक : श्री शिवप्रसाद मेढे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆
‘समोरची बंगाल्याची बायको स्वयंपाकात अजून मुरायची आहे. पदार्थ परतताना कढईचा केवढा आवाज करते!’ हे वाक्य मी लिहिलं आणि माझं मलाच हसू आलं.
करू दे ना तिला हवा तसा स्वयंपाक! ती तिच्या पद्धतीने करतीये. मी का वैतागावं?
पण तसं नाहीये. स्वयंपाक ही एक कला आहे. तसंच स्वयंपाकघरात वावरणं ही पण एक कला आहे.
महिलांचा आणि क्वचित काही पुरुषांचा दिवसभरातला खूपसा वेळ स्वयंपाकघरात जात असतो.
असे म्हणतात, स्वयंपाक घरावरून त्या संपूर्ण घराची ओळख पटते. हे नीटनेटकं, देखणं स्वयंपाकघर चालवायला गरज असते ती मुरलेल्या हातांची.
आपल्या भारतात स्वयंपाक करायच्या खूप पारंपारिक पद्धती आहेत. प्रत्येक प्रांतात, राज्यात, जातीत, धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने चवदार, चमचमीत, चविष्ट जेवण तयार करण्यात येतं. जेवण बनवण्याच्या परंपरा पूर्वापार चालत आल्या आहेत. काही काही पदार्थ तर पिढ्यानुपिढ्या पारंपारिक पद्धतीने जसेच्या तसे अजूनही बनत आहेत. पंचपक्वान्न (श्रीखंड, बासुंदी, रसगुल्ले), काही चमचमीत भाज्या (भरली वांगी, रस्से) उसळी, छोले भटुरे, मांसाहारी पदार्थ, (शाकुती), इडली डोसा असे अनेक पदार्थ. (यादी खूप मोठी आहे, हे केवळ उदाहरणादाखल पदार्थ.)
आपली खाद्य परंपरा ही आपल्या देशाची खासियत आहे. ती परंपरा टिकवून ठेवणे ही अजून एक खासियत! मला असं वाटतं, भारत सोडल्यास, जगातील इतर देशात अगदी चमचमीत असे जेवण – खाद्यपदार्थ क्वचितच बनत असतील.
ही परंपरा टिकवण्यामागे किंवा टिकण्यामागे एक खास कारण म्हणजे मुरलेला हात!
ओला – सुका मसाला बनवण्याची मक्तेदारी या मुरलेल्या हातांची.
वर्षभर टिकणारी लोणची ही ह्या मुरलेल्या हातानेच घालावीत.
चमचमीत पदार्थ करावेत मुरलेल्या हातानेच.
मुरलेल्या हाताला कधीही तवा, कुकर, कढईचा चटका बसत नाही किंवा चटक्याचे काळे डाग हातावर उमटत नाहीत.
वाफ कधीच तोंडावर येत नाही, की उकळतं पाणी अंगावर सांडत नाही.
मुरलेला हात स्वयंपाक करताना कधीच ढणढण भांड्यांचा आवाज करत नाही. कढईतला पदार्थ कसा हळूच कापसासारखा हलवला जाईल.
रवीने दही घुसळताना एक लयबद्ध आवाज येत राहील.
भात कधी चिकट होणार नाही किंवा ताटात तांदूळ वाजणार नाही.
आमटी फुळुक पाणी होणार नाही किंवा चटण्या, कोशिंबिरी, भाज्या वाहून जाणार नाहीत.
पोळ्यांचा आकार गोलाकार असेल.
लोणचं करताना मुरलेले हात, आधी ज्याचं लोणचं घालायचं तो जिन्नस (कैरी, लिंबू, मिरची, फ्लॉवर, गाजर, वगैरे, वगैरे) व्यवस्थित निवडून घेणार. मग ते देठ काढून, धुऊन, पुसून थोडा वेळ वाळत ठेवणार. त्याच्या जोडीला चिरायची विळी, ज्या काचेच्या बरणीत लोणचं घालायचं ती बरणी, ताटसुद्धा व्यवस्थित धुऊन, पुसून स्वच्छ कोरडे करणार. अजूनही पाणी राहण्याची शक्यता नको, म्हणून हलकेच पेटत्या गॅसवर सुकवून घेणार. मगच चिरून मसाला घालून लोणचे तयार करणार. मसाला पण घरीच बनवणार. तिखट, हळद, मीठ सुद्धा हलकेच तव्यावर गरम करून घेणार. सगळं कसं निर्जल करणार. काय बिशाद, लोणचे खराब होईल!
ती बरणी ठेवायची पण विशिष्ट पद्धत. खाली तळाशी मीठ पसरून, वरती लोणचं घालून, सर्वात वरती मिठाचा पुन्हा हलकासा थर. मग त्या बरणीच्या उघड्या तोंडावर स्वच्छ धुतलेला पांढरा कपडा, त्याचीच कड, एका बाजूला फाडून व्यवस्थित बांधणार आणि मग झाकण लावणारा हा मुरलेला हातच असतो.
मसाला करताना प्रत्येक घटक व्यवस्थित निवडून, साफ करून निरनिराळे भाजून, एकत्र करून मगच मिक्सरमध्ये बारीक करून ठेवणार. तेव्हाच तो मसाला खमंग होणार.
मुरलेल्या हाताला वयाचं बंधन नसतं. अनुभवाचं शहाणपण, आत्मविश्वास आणि स्वयंपाकाची आवड असेल तर पुरे!
मुरलेल्या हाताचा स्वयंपाक झटपट आणि चविष्ट होणारच.
पाच माणसांचा स्वयंपाक एका तासाच्या आत करावा तर मुरलेल्या हातानेच.
त्या हाताची आपली अशी पद्धत आहे. कुठच्या वेळी काय करायचं हे त्या हाताला पक्क माहीत असतं.
आता बघा. या पद्धतीने पायर्या पायर्यांनी स्वयंपाक केला तर काय बिशाद स्वयंपाकात जास्त वेळ जाईल.
कणीक भिजवून बाजूला ठेवली. डाळ-तांदूळ धुवून कुकर लावला. कुकरची शिट्टी होईपर्यंत भाजी चिरून घेतली. शिट्ट्या झाल्यावर गॅस बारीक ठेवून दुसर्या गॅसवर भाजीला फोडणी टाकून शिजायला ठेवली. तोपर्यंत कुकरची मंद गॅसवर ठेवायची वेळ संपलेली. कूकर उतरवून त्यावर पोळ्यांसाठी तवा ! तवा तापेपर्यंत पोळपाट लाटणे, फुलके असतील तर चिमटा, पीठ, तेल यांची जमवाजमव. पोळ्यांना सुरुवात करण्यापूर्वी, भाजी ढवळून मीठ, खोबरे, इतर वाटण, चिंचेचा कोळ घालून शिजेपर्यंत मंद आचेवर ठेवलं की तोपर्यंत तवा तापून तयार! पोळ्यांना सुरुवात केली की सलग दहा पंधरा मिनिटात पोळ्या होतात. एका पोळीला जास्तीत जास्त दोन मिनिटं लागणार. पोळ्या झाल्या की कढईतील भाजी एका छानशा पातेल्यात काढून डायनिंग टेबलवर झाकून ठेवायची . त्याच कढईत आमटी करण्यासाठी तवा उतरवून आमटी टाकता येते. जी काही डाळ, उसळ असेल तिला फोडणी टाकली; मिरच्या, कोथिंबीर मसाला इतर गोष्टी टाकून आमटी तयार! पोळ्या झाल्यावर त्याच गरम तव्यावर आमटीचा मसाला, इतर वाटण परतून घेता येईल.
आमटी उकळेपर्यंत ओटा आवरून पोळ्यांची परात, पोळपाट लाटणे धुवून जागेवर ठेवता येईल. उकळलेल्या आमटीवर झाकण ठेवलं की काम फत्ते. जेवायच्या वेळी फक्त गॅस पेटवला, गरमगरम आमटी खायला तयार! कितीसा वेळ लागला?
आहे न मुरलेल्या हाताची कमाल?
ह्या मुरलेल्या हाताची मोजमापं पण कशी तर, चिमुटभर, मुठभर, ओंजळभर. सगळा कारभार अंदाजपंचे.
ह्या मुरलेल्या हाताचा अंदाज इतका पक्का की पदार्थ कधी खारट, तिखट, आंबट, कडू होणार नाही. समतोल चवीचा रुचकर पदार्थ करावा तर मुरलेल्या हातानेच!
पदार्थ शिजला की नाही हे त्या मुरलेल्या हाताला बघूनच समजणार. वासावरून काय घातलं, राहिलं ते कळणार.
हे मुरलेले हात टीव्ही बघताना कधीच वेळ वाया घालवणार नाहीत. भाजी निवडणे, लोणी काढणे, डाळी, कडधान्यं निवडून ठेवणं ही काम लगेच टीव्ही बघता बघता करून टाकतात.
उन्हाळ्याची कामं (सांडगे, पापड वगैरे) भल्या पहाटे उठून नाश्त्याच्या वेळेपर्यंत उरकून टाकणारे मुरलेले हातच !
पुन्हा सगळी रोजची कामे वेळच्यावेळी करण्यासाठी.
अशा सर्व मुरलेल्या हातांना माझ्याकडून नमस्कार.
लेखक :श्री शिवप्रसाद मेढे
प्रस्तुती :सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈