सुश्री मंजुषा सुनीत मुळे
वाचताना वेचलेले
☆ द टर्न ऑफ टाईड ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
(आर्थर गॉर्डन या लेखकाने त्यांच्या व्यक्तिगत अनुभवावर आधारित ‘द टर्न ऑफ टाईड’ नावाची एक सुंदर कथा लिहिली आहे.)
त्यांच्या जीवनात एकदा खूप निराशेचा कालखंड आला.
शेवटी त्यांना वैद्यकीय मदत घ्यावी लागली…
शारीरिक दृष्टीने ते तंदुरुस्त असल्याचे पाहून उपचार करणारे डॉक्टर म्हणाले …
‘‘मी तुमच्यावर उपचार करायला तयार आहे.
बरे व्हाल याची खात्रीही देतो.
पण माझ्या पद्धतीने उपचार घेण्याची मनाची तयारी हवी.’’
गॉर्डन तयारच होते…
त्यांना चार चिठ्ठ्या देऊन डॉक्टर म्हणाले,
‘‘या चार चिठ्ठ्या घेऊन सकाळी समुद्रावर जा.
सोबत खाण्याकरिता काही घेऊन जा.
पण पुस्तक, वृत्तपत्र, रेडिओ नको.
दिवसभर कोणाशीही बोलायचे नाही.
या चिठ्ठ्यांवर लिहिलेल्या वेळी चिठ्ठ्या उघडायच्या आणि त्यातील सूचनांचे तंतोतंत पालन करायचे.’’
दुसरे दिवशी सकाळी गॉर्डन बीचवर गेले…
सकाळी नऊ वाजता त्यांनी एक चिठ्ठी उघडली…
त्यावर लिहिले होते … ‘ऐका.’
काय ऐकायचे… ?
त्यांना प्रश्न पडला…
ते एका निर्मनुष्य जागी नारळाच्या झाडीत जाऊन बसले…
एकाग्रपणे लाटांचा आवाज ऐकणे सुरू केले…
झाडीतून वाहणारी हवा…
मध्येच समुद्रावरून येणारा वारा,..
विभिन्न पक्षांचे आवाज,..
दूरवर आकाशात चित्कार करत उडणार्या पक्षांचे आवाज…,
अशा किती तरी गोष्टी त्यांना हळूहळू स्पष्टपणे ऐकू येत होत्या…
जणुकाही स्वतःचे अस्तित्व विसरून ते निसर्गाशी एकरूप होत होते…
आपणही या निसर्गाचा असाच साधा,
सहज भाग आहोत,
हे त्यांना जाणवले…
मनातला सर्व कोलाहल थांबला…
एका प्रगाढ शांततेचा त्यांना अनुभव येत होता…
बारा कधी वाजले त्यांना कळलेही नाही…
दुसर्या चिठ्ठीची वेळ झाली होती…
त्यावर लिहिले होते,…
‘मागे वळून पहा.’
त्यांना काय करायचे कळले नाही.
पण सूचनांचे पालन करायचेच होते.
त्यांनी विचार करणे सुरू केले….
भूतकाळ त्यांच्या डोळ्यासमोर आला…
आई-वडिलांचे निरपेक्ष प्रेम,..
बालपणीचे सवंगडी,..
कट्टी आणि क्षणात होणारी दोस्ती,..
त्या हसण्या-रडण्यातील सहजता,..
अकृत्रिम वागणे,..
इंद्रधनुष्यी आयुष्याच्या त्या सुखद आठवणीत ते रमले….
भूतकाळातले आनंदाचे क्षण ते पुन्हा जगले….
आज दुरावलेल्या माणसांनीही कधीकाळी किती प्रेम केले होते,
हे आठवून त्यांचा ऊर भरून आला…
आपण बालपणातली निरागसता हरवून बसलो.
संबंधात कृत्रिमता, दिखावूपणा, औपचारिकता जास्त आली.
या विचारात असतानाच त्यांनी तिसरी चिठ्ठी उत्सुकतेने उघडली…
त्यात लिहिले होते,
‘‘आपल्या उद्दिष्टांची छाननी करा.’’
गॉर्डन म्हणतात, मी स्वतःला विद्वान समजत असल्यामुळे सुरुवातीला याची मला गरज वाटली नाही.
पण मी सखोल परीक्षण केले…
आपले उद्दिष्ट काय..?
यश, मान्यता, सुरक्षितता ही काही महत्त्वाची उद्दिष्टे असू शकत नाहीत…
त्यांच्या लक्षात आले, मनात उद्दिष्टांच्या बाबतीत स्पष्टता नसेल तर सर्वच चुकत जाते…
सायंकाळ होत आली होती. सूर्य अस्ताला जात होता. त्यांनी चौथी चिठ्ठी उघडली.
त्यात लिहिले होते,
“सर्व चिंता, काळज्या वाळूवर लिहून परत ये.’’
त्यांनी एक शिंपला घेतला …
आणि ओल्या वाळूवर सर्व चिंता सविस्तर लिहिल्या…
आणि ते घरी जायला निघाले…
समुद्राला भरती येत होती…
त्यांनी मागे वळून पाहिले..,
एका लाटेने लिहिलेले सर्व पुसले गेले होते….
गॉर्डन म्हणतात, त्या दिवशी माझा पुनर्जन्म झाला…
संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈