मराठी साहित्य – विविधा ☆ आपले मरण पहिले म्या डोळा… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ आपले मरण पहिले म्या डोळा…  ☆ सौ शालिनी जोशी

आपले मरण पाहिले म्या डोळा l

तो झाला सोहळा अनुपम्य ll

संत तुकारामांचा हा अभंग. आपले मरण आपणच पाहणे आणि मरण हा अनुपम्य सोहळा होणे, सामान्य माणसाच्या दृष्टीने हे सगळेच अतर्क्य, अद्भुत, विचित्र. त्यामुळे हा एक वेगळाच विचार करायला लावणारा अभंग. कारण मरण ही कल्पनाच सामान्य माणसाला भीतीदायक, दु:खद वाटते. लौकिक जगातील सुखोपभोगाना चटावलेला माणूस मरण ही कल्पना सहन करू शकत नाही. पण येथे मरण आहे ते पंचभूतीक देहाचे नव्हे तर देहबुद्धीचे आहे. अहंकाराचे आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या मी माझेपणाचे आहे. मी माझे पणामुळे दोरीला बांधलेल्या माकडासारखे माणसाची स्थिती होते. तो आपल्या संकुचित विश्वाचा मी शहाणा, मी विद्वान, माझे घर, माझे मुले, एवढाच विचार करतो. पण यांतून बाहेर पडणारा जगाचा विचार करतो. मी देह हा मर्यादित विचार जाऊन हे विश्वाच माझे आहे. मी आत्मा आहे. हा भाव निर्माण होतो. म्हणजे देह असून विदेही अशी ही अवस्था, तुकाराम येथे मृत्यूच्या रूपकाने वर्णन करतात.

खरे पाहता तुकाराम सर्वसामान्य माणसांसारखे प्रापंचिक, व्यावसायिक व सुखवस्तू होते. विठ्ठल भक्ती परंपरागत होती. पण घरातील व बाहेरील प्रतिकूल प्रसंगाने त्यांचे चित्त उद्विग्न झाले. संसार तापाने तापलेले मन ईश्वरचिंतनात रमू लागले. गुरुउपदेश आणि ईश्वरचिंतन यामुळे ‘नित्य नवा जागृतीचा दिवस’ अनुभव लागले. देहबुद्धी कमी झाली. मी माझे पणाची जागा ईश्वराने घेतली. दुष्काळ संपला. सुकाळ आला. माया, मत्सर, काम, क्रोध हे देहाची निगडीत विकार, सुखदुःख इत्यादी द्वंद्वे आणि नाम, रूप, कुळ या सर्व उपाधी लोप पावल्या. त्यांची राख झाली. म्हणजे एका दृष्टीने सर्व देहभावाचे मरणच. शरीर आहे पण विकार नाही. असा हा मुक्तीचा सोहळा तुकारामांनी आपल्या डोळ्यांनी जिवंतपणेच पाहिला. त्यांना परमेश्वराच्या ठिकाणी स्थान मिळाले. त्याचाच ध्यास राहिला. ते भगवंतमय झाले. सर्वत्र तोच हा अनुभव आणि मी तोच, मग जन्म मरण कोठून आणि त्याच्याशी निगडित सोयर सुतक व इतर विधीही नाहीत. असा हा अनुपम सोहळा. सच्चिदानंदाची ऐक्य, अखंड आनंद. त्रैलोक्य त्या आत्मानंदाने भरून गेले. ‘ आनंदाचे डोही, आनंद तरंग’ अशी ही अवस्था. अणु रेणु एवढा तुका आकाशाप्रमाणे व्यापक झाला. संकुचित देह बुद्धीतून विश्वव्यापक झाला. हे विश्वचि माझे घर आणि मग त्याच्यासाठीच कार्य, तोच ध्यास. अशा प्रकारे झालेल्या या पुनर्जन्माचे वर्णन ‘मीच मज व्यालो l पोटी आपुलिया आलो’ असे तुकाराम करतात. जिवंतपणे झालेले हे मरण’ जिता मरण आलेl आप पर गेलेl मूळ हे छेदिलेl संसाराचेll’ संसाराचे चिंता संपली. चिंता करितो विश्वाची अशी अवस्था प्राप्त झाली. म्हणून हे मरण अनुपम्य झाले. मी ची जाणीव संपली. ‘आता उरलो उपकारापुरता. ‘ स्वतून विरक्त होऊन स्वकियांसाठी कार्य सुरू ठेवणे, हा अनुभव, हा बदल, हे मरण आणि पुन्हा जन्म तुकारामांनी स्वतः अनुभवले आणि लोकांना सांगितले.’

तुका म्हणे दिले उमटून जगी l

घेतले ते अंगी लावूनिया ll

सर्व जगापुढे आदर्श ठेवला. म्हणूनच महात्मा फुले, अण्णासाहेब कर्वे यांचे सारखे समाज सुधारक निर्माण झाले. स्वतःला विसरून जगाचे झाले. जगाचा प्रपंच केला. त्यामुळे त्यांचे कार्यही मीच्या मरणातून, स्वर्गाची- आनंदाची निर्मिती या स्वरूपाचे झाले. क्रांतिकारकांनी स्वतःच्या घराची, स्वतःची पर्वा कधीच केली नाही. त्याचे मरण पत्करून भारत मातेला मुक्त करण्याचा प्रयत्न केला. तो तुकारामांसारख्या संतांच्या पावलावर पाऊल ठेवून. ‘बुडते हे जन देखे डोळा’ यासाठीच हा सगळा अट्टाहास. प्रत्येकाची पद्धत वेगळी. कुणी अभंग ही शस्त्रे आणि बाण केले. तर कुणी (सावरकर, सुभाषचंद्र बोस) खऱ्या शस्त्रांची प्रेरणा दिली. गांधींनी सत्याग्रहाचा तर टिळकांनी लेखणी व वाणीचा मार्ग अनुसरला. पण त्यासाठी आधी देह भावाचे मरण सगळ्यांनीच अनुभवले. अशा प्रकारे संत तुकारामांनी जन्म आणि मरण यांना वेगळा अर्थ दिला, जगद्गुरु झाले.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वाचक…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “वाचक…☆ श्री जगदीश काबरे ☆

वाचक तीन प्रकारचे असतात.

पहिल्या प्रकारचे वाचक हे एखादा विचार वाचला की तात्काळ व्यक्त होणारे म्हणजेच प्रतिक्रिया देणारे असतात.

दुसऱ्या प्रकारचे वाचक एखादा विचार वाचल्यावर त्यावर चिंतन मनन करून त्या विचाराला योग्य शब्दात प्रतिसाद देणारे असतात.

आणि तिसऱ्या प्रकारची माणसे विचार वाचल्यावर कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाहीत. पण स्वतः मात्र त्या विचारावर विचार करत असतातच. अशा वाचकांना ‘सायलेंट रीडर्स’ असे म्हणतात. कुठल्याही ग्रुपमध्ये अशा सायलेंट रीडर्सची संख्या मोठ्या प्रमाणात असते.

तेव्हा आपण जे काही विचार मांडतो त्या विचारावर इतरांची व्यक्त व्हायलाच पाहिजे अशी अपेक्षा करणेच मुळात चूक आहे. त्यासाठी तो माणूस विवेकी नाही, त्याला बोलायची भीती वाटते, अशा पद्धतीचे आपले मत मांडणे हेच तर खरे अविवेकीपणाचे लक्षण म्हटले पाहिजे.

आपण जे विचार मांडतो ते दोन गोष्टींसाठी… एक तर आपल्याला आपले मन मोकळे करायचे असते म्हणून आणि दुसरं म्हणजे तो विचार मांडून इतरांकडून आपल्याला काही नवीन ज्ञान मिळवायचे असते म्हणून.

मग अशा वेळेला आपल्या विचारावर कोण किती प्रतिसाद देतोय हा मुद्दा अत्यंत गौण आहे. आपण आपले विचार मांडत राहावे, वाचणारे वाचत राहतील, प्रतिसाद देणारे प्रतिसाद देत राहतील, प्रतिक्रिया देणारे प्रतिक्रिया देतील आणि सायलेंट रीडर्स तो विचार वाचून त्यांना पटला असेल तर स्वतःमध्ये मुरवण्याचा प्रयत्न करत रहातील अन्यथा वाचून सोडून देतील. या पलीकडे आपला विचार मांडल्यानंतर त्यावर कोणी कसे व्यक्त व्हावे यावर आपला कुठलाही हक्क राहत नाही. म्हणून आपण कुठलीही अपेक्षा न ठेवता कोणालाही दोष न देता शांतपणे आपले विचार मांडत राहावे हेच खरे.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – संत मुक्ताबाई… भाग – १ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

🔅 विविधा 🔅

☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – संत मुक्ताबाई… भाग – १  ☆ सौ शालिनी जोशी

चौदाशे वर्षाच्या चांगदेवाना या बारा तेरा वर्षाच्या मुलीने ‘चांगदेव पासष्टीचा’ अर्थ उलगडून सांगितला. ‘चांगा कोरा तो कोराच’ अशा शब्दात चांगदेवांची थट्टा करणारी मुक्ताई चांगदेवांची गुरु झाली. यांनी तिचे शिष्यत्व पत्करून तिचा गौरवच केला. नामदेव तिच्याविषयी म्हणतात, ‘लहानगी मुक्ताबाई जशी सणकाडी। केले देशोधडी महान संत।’ते योग्यच आहे. हटयोगी, वयोवृद्ध, ज्ञाननिष्ठ चांगदेवांना ज्ञान देणारी मुक्ताई खरोखरच जगावेगळी. चांगदेवानी तिला आपली आई  मानलं. बौद्धिक, ज्ञानमय, मनोमय मातृत्व मुक्ताबाईंनी चांगदेवाना दिले. चांगदेवाना उद्देशून  रचलेल्या पाळण्यात त्या म्हणतात,

पाळणा लाविला हृदय कमळी। मुक्ताई जवळी सादविते।

वटेश्वर सुत चांगा अवधूत। मुक्ताई शांतवीत ज्ञानदृष्टी।

समाजाभिमुख व अर्थपूर्ण असे ४० अभंग मुक्ताबाईंनी लिहिले. त्यातील एक प्रसिद्ध अभंग,

मुंगी उडाली आकाशी, तिने गेलेले सूर्यासी।

थोर नवलावर झाला, वांझे पुत्र प्रसवला।

विंचू पाताळासी जाय, शेष वंदी त्याचे पाय।

माशी व्याली घार झाली, तेणे मुक्ताई हासली।

समाजातील तीन प्रवृत्तीच्या लोकांचे वर्णन करणारा हा अभंग. विद्वांनानाही विचार करायला लावणारी अशी ही गुढ रचना, लहान वयात मुक्ताबाईंनी केली. यातील पहिली ओळ त्यांचेच वर्णन वाटते.

संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतल्यानंतर सासवडला सोपानदेवानी समाधी घेतली. नंतर निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना घेऊन तिर्थ- यात्रा करत निघाले. १२ मे १२९७ रोजी तापी नदीच्या तीरावर अचानक वीज कडाडली. आदिमाता लुप्त झाली. मेहुण येथे त्यांची समाधी आहे. ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे रूप असणाऱ्या भावांची ही बहीण आदिमाया मुक्ताई. तिच्या समाधी प्रसंगाचे वर्णन नामदेवाने केले,

वीज कडाडली निरंजनी जेव्हा। मुक्ताई तेव्हा गुप्त झाली।

अशाप्रकारे अभिमान, अस्मिता, परखडपणा यांचे बरोबर मार्दव व हळूवारपणा यांचे रूप म्हणजे मुक्ताई. जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद तालुक्याला मुक्ताईनगर नाव दिले आहे.

स्त्री-पुरुष भेदाच्या पलीकडे गेलेली, तीन आत्मज्ञानी भावांची बहीण असुनही वेगळे व्यक्तिमत्व असणारी मुक्ताबाई अमर झाली. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील पहिली संत कवियत्री ठरली. नामस्मरणाने विदेही होण्याचा मार्ग त्यांनी स्त्रियांना तसेच सर्व लोकांना दाखवला. सदेह मुक्तीचा अनुभव त्यांनी घेतला होता. स्त्री पुरुष समानतेची त्या प्रचारक ठरतात.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “International Day of Happiness, जागतिक आनंद दिन” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

 

🔆 विविधा 🔆

☆ “International Day of Happiness, जागतिक आनंद दिन” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

नमस्कार नमस्कार,

20 मार्च.

हा दिवस आहे  International Day of Happiness, जागतिक आनंद दिन.

जगामधल्या सगळ्यांनी सदैव आनंदी राहावं आणि आपल्या आजूबाजूला आनंद पसरवावा, ही या दिना मागची कल्पना आहे.

दरवर्षी या दिनाकरता वेगळी वेगळी थीम असते.

यावर्षीची थीम आहे care and share. ही थीम आपण कशी आचरणात आणायची ते बघूया –

आपल्या आसपास असणाऱ्यांची आणि ज्यांना गरज आहे अशांची नेहमी काळजी करणे, काळजी घेणे आणि आनंद पसरविणे. नेहमी सोशल मीडिया वरती सकारात्मक संदेश पाठवणे. लोकांची काळजी घेणाऱ्या सामाजिक संस्थांमध्ये सहभागी होणे किंवा त्यांना सहकार्य करणे आणि आनंद सगळीकडे पसरवणे.

हे सगळे करण्याकरता सगळ्यात महत्त्वाचे काय असेल तर आपण स्वतः आनंदी असणे आणि ते पण 24/7, हे फार महत्त्वाचे आहे.

आनंदी राहणे हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच, हे आपल्या सगळ्यांचच्  ब्रीदवाक्य असायला पाहिजे. आनंदी राहायला आवडत नाही, अशी व्यक्ति शोधून पण सापडणार नाही; आणि कायम आनंदी आहे, अशी व्यक्ति पण शोधून सापडणार नाही. म्हणूनच म्हणतात, “आनंदी  माणसाचा सदरा कुणाकडेच मिळू शकत नाही”. जेव्हा हा वाक्-प्रचार अस्तित्वात आला, तेव्हा सगळ्याच स्त्रिया कायम आनंदी असाव्यात; आणि म्हणूनच हा वाक्-प्रचार फक्त माणसाचा सदरा, या शब्दानी प्रचलित झाला असावा. जमाना बदलला, स्त्रियांनी शर्ट म्हणजे सदरा आणि पॅन्ट घालायला सुरुवात केली, आणि आता सरसकट सगळेच सदरा घालणारे, म्हणून हा वाक्-प्रचार आता सगळ्यांनाच  लागू होतो आहे.

मन आनंदी ठेवण्याकरता आनंद कुठून पकडून आणावा लागत नाही, आणि तो पकडून आणता पण येत नाही. आनंद हा सगळीकडे असतोच. आपण आपले ताण – तणाव, रागीटपणा, चिडचिडेपणा, प्रत्येक गोष्टीत “मी आणि माझे”, हे  जर आपण दूर करू शकलो, तर आनंद आपोआपच प्रकट होतो. अंधार आणि उजेड यांच्या सारखेच हे  नाते आहे. अंधार कुठून पकडून आणता येत नाही. उजेडाचा अभाव झाला, तर आपोआपच अंधार होतो.

कसे जगावे, कसे आनंदी राहावे, हे शिकण्याकरता निसर्ग हा उत्तम गुरु आहे असे म्हणतात. मोठे वृक्ष आनंदानी डोलत असतात आणि छोटे गवत पण तेवढ्याच आनंदानी डोलत असते. काही झाडांची फुले देवाला आवडतात, म्हणून ती तोडून देवाला वाहतात, म्हणून ही  झाडे आनंदी असतात. काही झाडांची फुले देवाला वहात नाहीत. आपली फुले कुणी तोडत नाहीत, म्हणून ही झाडे पण खुश असतात. काही झाडांना लाल फुले लागतात म्हणून ती खुश असतात, तर कुणाला पिवळी फुले लागतात, म्हणून ती खुश असतात. एकमेकांशी तुलना नाही, एकमेकांविषयी मत्सर नाही, एकमेकांचे पाय ओढणे नाही. फक्त आनंद आणि आनंद.   

नारळाचे झाड सरळ वर वर जाते. सूर्याची उन्हे अंगावर घेणे हाच त्याचा आनंद असतो. समजा बाजूला एखादा मोठा वृक्ष असेल आणि त्याच्या फांद्या  नारळाच्या वर येत असतील तर नारळाचा मार्ग खुंटणार आणि त्याचा आनंद संपणार. फांद्या बाजूला सारून वर जाणे आपल्याला शक्य नाही , हे नारळ ओळखून असतो. थांबला तो संपला, हे पण नारळाला माहित असते. अशावेळेस आपल्या झावळ्या आणि नारळ असा  भला मोठा पसारा घेऊन झाड चक्क तिरपे होते आणि सूर्य प्रकाश घेण्याकरता जिथे वाट दिसेल तिकडे वळून पुन्हा सरळ वर जायला सुरुवात करते.

आनंदी राहायचेच, असे जर आपण ठरवले, तर आसपासच्यांना न दुखावता, थोडे ऍडजेस्ट करत करत, आपण आपले ध्येय नक्कीच पूर्ण करू शकतो, हेच नारळाकडून शिकायचे आहे. प्रत्येक झाडाकडून अशाच प्रॅक्टिकल टिप्स मिळू शकतात. म्हणूनच जाणकार सांगत असतात – निसर्गात रमा.  

आपण बहुतेक जण आनंदी नसण्याचे आणखीन एक कारण म्हणजे, घरातल्यांनी किंवा इतर कुणी कसे रहावे, कसे वागावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, हे बऱ्याच जणांना   समजत नसते. आणि यामुळे घरामधे आणि बाहेर, रोजच क्षुल्लक कारणांवरून अप्रिय परिस्थिती तयार होत असते. अप्रिय परिस्थिती आली, म्हणजे ताणतणाव सुरु होतात आणि आनंद गायब होतो. इतरांना बदलवण्यापेक्षा, स्वतःला थोडेसे  बदलणे खूप सोपे असते. मी रस्त्यानी चाललो आहे आणि डोळ्यावर ऊन येते आहे. सूर्य लवकर हलणार नाही, हे आपल्याला माहित असते, तरीपण आपण उन्हाला शिव्या मोजतो, ग्लोबल वॉर्मिंग च्या नावानी तणतण करतो आणि दुःखी होतो. त्यापेक्षा आपला मार्ग आपण थोडा बदलला किंवा डोळ्यांवर गॉगल घातला, तरी आपले रस्त्यावर चालणे सुकर होऊ शकते. माझा आनंद मीच शोधणार आहे, आणि पर्याय उपलब्ध आहेत, हे समजणे  महत्वाचे असते. 

“आनंदी राहणे हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच ” असे जर आपण आजच्या शुभ दिवशी ठरवले आणि योग्य विचारसरणीने वाटचाल सुरू केली, तर आनंदी माणसाचा सदरा माझ्याकडे आहे, असे आपण खात्रीशीर रित्या म्हणू शकू. आणि आनंदी माणूस जिथे जिथे जातो तिथे तिथे आनंदी वातावरण निर्माण होते हे आपण जाणतोच.

आजच्या जागतिक आनंद दिनाच्या तुम्हाला, तुमच्या परिवार सदस्यांना आणि मित्रमंडळींना शुभेच्छा….

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक चिमणी दिन… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ जागतिक चिमणी दिन… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

चिमणी म्हटलं की मला वि. स. खांडेकर यांच्या एका कादंबरीतील, बहुतेक ‘अमृतवेल’ या कादंबरीतील वाक्य आठवते, ‘मुली म्हणजे माहेरच्या अंगणातील दाणे टिपणाऱ्या चिमण्या! कधी भुरकन उडून जातील सांगता येत नाही!’लग्न झालं की मुली दुसऱ्या घरी जातात. खरंच, मुलीचा लहान असल्यापासून चिमणीसारखा चिवचिवाट, नाजूकपणा, अंगणात खेळणं बागडणं डोळ्यासमोर येतं! मुलं मात्र पोपटासारखी वाटतात असं मला उगीचच वाटतं! पण मुलगी मात्र चिमणी सारखीच असते. छोट्या चणीच्या मुलीला लहानपणी ‘चिऊ’म्हटलं जातं, मग ती चाळीशीची झाली तरी आपल्यासाठीच ‘चिऊ’च रहाते!

साधारण चाळीस पन्नास वर्षांपूर्वी अशा करड्या रंगाच्या छोट्या दिसणाऱ्या चिमण्या खूप होत्या. अंगणात काही धान्याचं वाळवण घातलं की या चिमण्यांचे ‘ चिमण घास’ चालू असायचे पण त्यांना हाकलायला नको वाटायचं! माझी मुलगी लहान असताना आम्ही शिरपूरला होतो. तिथे इतक्या चिमण्या असत की त्या चिमण्यांसाठी म्हणून आम्ही खास बाजरी आणून ठेवली होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात मुलांना बसवायचं आणि समोर बाजरी फेकायची! की तेथे चिमण्या गोळा होत असत, माझी छोटी त्या चिमण्या बघत आनंदाने तिच्या चिमण्या हाताने टाळ्या पिटायची! आता त्या चिमण्या गेल्या अंगणाची शोभा वाढवणाऱ्या! शहरात सिमेंटच्या घराच्या जंगलात चिमण्या आता दिसतच नाहीत. चिमणीच्या आकाराचे, चॉकलेटी रंगाचे, ऐटबाज पंखांचे, छोटे पक्षी दिसतात पण त्या खऱ्या चिमणीची सर काही त्यांना येत नाही!

कावळा चिमणीच्या गोष्टीतील चिमणी हुशार असे, ती नेहमीच कावळ्या पेक्षा अधिक समंजस आणि शहाणी, त्यामुळे कावळ्याचे शेणा चे घर वाहून गेले तरी चिमणी आपल्या मेणाच्या मऊ मुलायम, न भिजणार्या घरट्यात राही!’घर माझं शेणाचं पावसानं मोडलं, मेणाचं घर तुझं छान छान राहिलं’ म्हणणाऱ्या कावळ्याला चिमणी तात्पुरता आसरा सुद्धा देत असे. देवाण-घेवाणीचं हे प्रेम निसर्गातील पक्षी आणि प्राण्यात सुद्धा असं दिसतं! पूर्वी पहाटे जाग येई ती चिमण्यांच्या कलकलाटाने! लहान गावातून निसर्ग हा सखा असे. शहरात येऊन या निसर्गाच्या मैत्री ला आपण मुकलो असंच मला वाटतं! सकाळ होते तीच मुळी गाड्यांचा खडखडाट ऐकत आणि कामाची गडबड मागे लावून घेत.. स्वच्छंदी आयुष्य जगायचंच विसरलो जणू!

कोरोना च्या काळात माणसं बंदिस्त झाली पण पक्षी थोडे मुक्त झाले. सकाळचा पक्षांचा किलबिलाट पुन्हा एकदा ऐकू येऊ लागला. निसर्गात असणार्‍या प्रत्येक जिवाचे काहीतरी वेगळेपण असते! तसेच या चिमणीचे! चिमणीचा एवढासा जीव थोड्याशा पाण्यात पंख फडफडवून स्वच्छ आंघोळ करताना दिसतो तेव्हा मन कसं प्रसन्न होतं तिला बघून! कोणत्याही गोष्टीला छोटी किंवा लहान सांगताना आपण चिमणीची उपमा देतो. नोकरीवरून येणाऱ्या आईची वाट बघत असणारी मुलं चिमणी एवढं तोंड करून बसलेली असतात तर या छोट्यांच्या तोंडचे बोल हे ‘ चिमणे बोल ‘ असतात. लहान बाळाचे पहिले बोल, चिमखडे, चिमणीच्या चिवचिवाटासारखे वाटतात. नव्याने अन्न खाणाऱ्या

बाळाला आपण ‘हा घास काऊचा, हा घास *चिऊचा म्हणून’ भरवतो आणि बाळ मटामटा जेऊ लागते!

कोणत्याही छोट्या गोष्टीचं प्रतीक म्हणजे चिमणी! रानात एक नाजूक गवत असतं त्याला आपण ‘ चिमणचारा’ म्हणतो.

लहान बाळाचे लाहया, चुरमुर्याचे छोटे घास म्हणजे चिमणचाराच असतो.

पूर्वी वीज नसायच्या काळात कंदीला बरोबर चिमणी असायची. छोट्या आकारातील हा दिवा म्हणजे चिमणीसारखा!

आज जागतिक चिमणी दिनाच्या दिवशी ही छोटीशी चिमणी विविध रुपात आठवणीत आली. आपल्या साहित्यरुपी प्रचंड विश्वात मी दिलेला हा छोटासा चिमणाघास !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- “साहेब, माझे काका व्यवसाय म्हणून पत्रिका बघत नाहीत. ते इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेत. या विषयाचा त्यांचा सखोल अभ्यास आहे आणि मुख्य म्हणजे ते स्वतः दत्तभक्त आहेत. पत्रिका पाहून उत्स्फूर्तपणे ते गरजूंना योग्य तो मार्ग दाखवतात. कुणाकडूनही त्याबद्दल अजिबात पैसे घेत नाहीत. तुम्ही प्लीज या साहेब.”

 जोशींच्या बोलण्यातली तळमळ मला जाणवत होती. त्यांना दुखवावं असं मला वाटेना.

 “ठीक आहे, मी येईन. पण मी कशासाठी पत्रिका दाखवतोय हे मात्र त्यांना सांगू नका. पत्रिका पाहून जे सांगायचं तेच ते सांगू देत. ” मी म्हंटलं.

कावरेबावरे झाले. काय बोलावं ते त्यांना समजेना.

 “साहेब, मी.. त्यांना तुमची लखनौला बदली होणाराय हे आधीच सांगितलंय. पण म्हणून काय झालं? पत्रिका बघून त्यांचं ते ठरवतील ना काय ते. ” अशोक जोशी मनापासून म्हणाले. )

 मी जायचं ठरवलं. लखनौला होणाऱ्या बदलीपेक्षा अधिक धक्कादायक माझ्या पत्रिकेत दुसरं कांही असूच शकणार नाही याबद्दल मला खात्रीच होती. त्यामुळे तिथे गेलो तेव्हा मनात ना उत्सुकता होती ना कसलं दडपण. पण मी तिथं गेल्यावर जे घडलं ते मात्र तोवर कधी कल्पनाही केली नव्हती असं मला हलवून जागं करणारं, मला एक वेगळंच भान देणारं होतं.. ! सगळंच स्वप्नवत वाटावं असंच. अतर्क्य तरी सुखद धक्कादायकही !!

 आज ते सगळं आठवतानाही माझ्या अंगावर शहारा येतोय. वर्षानुवर्षं मनात तरंगत राहिलेल्या अनेक अनुत्तरीत प्रश्नांना त्या घटितांतून कधी कल्पनाही केलेली नव्हती इतक्या आकस्मिकपणे मिळालेली ती समर्पक उत्तरं जशी माझं औत्सुक्य शमवणारी होती तशीच ते वाढवणारीही. त्या अनुभवाने जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमधील अतूट धाग्यांची अदृश्य अशी घट्ट वीण अतिशय लख्खपणे मला अनुभवता आली. ‘त्या’च्या कृपादृष्टीचा माझ्या अंतर्मनाला झालेला तो अलौकिक स्पर्शच होता जो पुढे वेळोवेळी मला जगण्याचे नवे भान देत आलाय!

 अशोक जोशींचे काका म्हणजे एक साधंसुधं, हसतमुख न् प्रसन्न व्यक्तिमत्त्व होतं. मी त्यांना नमस्कार केला. स्वतःची ओळख करुन दिली.

 ” हो. अशोक बोललाय मला. तुम्ही तुमची जन्मपत्रिका आणलीय ना? द्या बरं. मी ओझरती पाहून घेतो. तोवर चहा येईल. तो घेऊ आणि मग निवांत बोलू. ” ते म्हणाले.

 त्यांचं मोजकं तरीही नेमकं बोलणं मला प्रभावित करणारं होतं.

 मी माझी पत्रिका त्यांच्याकडे दिली. त्यांनी ती उलगडली. त्यांची एकाग्र नजर त्या पत्रिकेतील माझ्या भविष्यकाळाचा वेध घेऊ लागलीय असं वाटलं तेवढ्यांत चहा आला. त्यांची समाधी भंग पावली. त्यांचे विचार मात्र त्या पत्रिकेमधेच घुटमळत होते. कारण चहाचा कप हातात घेताच त्यांनी अतिशय शांतपणे माझ्याकडे पाहिले. सहज बोलावं तसं म्हणाले,

 ” तुमच्या पत्रिकेत सध्यातरी घरापासून तोडणारा स्थलांतराचा योग दिसत नाहीय. “

 ऐकून खूप बरं वाटलं तरी ते खरं वाटेना. असं कसं असू शकेल?

 “हो कां.. ?” मी अविश्वासाने विचारलं.

 ” हो. ” ते शांतपणे म्हणाले. “पत्रिकेत दिसतंय तरी असंच. पत्रिका बिनचूक बनलीय कीं नाही तेही पडताळून पाहू हवंतर. ” चहाचा रिकामा कप बाजूला ठेवत ते म्हणाले. त्यांनी पत्रिका पुन्हा हातात घेतली. कांहीशा साशंक नजरेने माझ्याकडे पहात त्यांनी विचारलं,

 ” तुम्हाला.. यापूर्वी कधी पुत्रवियोगाचं दु:ख सहन करावं लागलंय कां? “

 मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत उत्सुकता होती आणि माझ्या नजरेसमोर समीरचा केविलवाणा, मलूल चेहरा.. !

 ” हो… खूप वर्षांपूर्वी.. ” माझा आवाज त्या आठवणीनेही ओलसर झाला होता.

 “आणखी एक.. ” ते अंदाज घेत बोलू लागले, ” तुमच्या वडिलांच्या बाबतीत कांही एक अस्वस्थता, कांही एक रुखरुख कधी राहून गेली होती कां तुमच्या मनात? “

 मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. त्यांची नजर भूतकाळात हरवल्यासारखी कांहीशी गूढ वाटू लागली!

 “हो.. बाबांच्या बाबतीतली अतिशय रुतून बसलेली रुखरुख होती माझ्या मनांत…. ” तो सगळा क्लेशकारक भूतकाळच माझ्या मनात त्या एका क्षणार्धात जिवंत झाला होता !…

 ‘आयुष्यांत पहिल्यांदाच मु़ंबईला जाण्यासाठी मी घराबाहेर पडताना अडखळलेली माझी पावलं,.. तेव्हा अंथरुणाला खिळून असलेले माझे बाबा.. , त्यांना नमस्कारासाठी वाकताच आशीर्वाद म्हणून त्यांनी दिलेला दत्ताचा तो लहानसा फोटो, ‘ हा कायम जपून ठेव. याचे नित्य दर्शन कधीही चुकवू नको. सगळं ठीक होईल. ‘ हे त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यातून शुभाशीर्वाद दिल्यासारखे उमटलेले शब्द, साध्या साध्या गोष्टीत माझ्या लहानपणापासून सतत मला त्यांच्याकडून मिळालेलं कौतुकाचं झुकतं माप,… मी तिकडं दूर मुंबईत असताना त्यांच्या बळावलेल्या आजारपणांत मी त्यांची सेवा करायला त्यांच्या जवळ नसल्याची माझ्या मनातली सततची खंत, नंतर त्यांना तातडीने पुण्याला ससूनमधे हलवल्याचा निरोप मिळताच त्यांना भेटण्यासाठी माझ्या मोठ्या बहिणीला आणि तान्ह्या भाचाला सोबत घेऊन रात्रीच्या मुंबई-पुणे पॅसेंजरचा संपूर्ण रात्रभराचा प्रवास करीत आम्ही त्यांना भेटण्यासाठी घेतलेली धाव आणि त्यांची रुम शोधत त्यांच्याजवळ जाऊन पोचेपर्यंत त्यांनी सोडलेला त्यांचा अखेरचा श्वास…. !! तो सगळाच भूतकाळ एखाद्या चित्रमालिकेसारखा नजरेसमोरुन क्षणार्धात सरकत गेला आणि तो रेंगाळत राहिला बाबांच्या अंत्यविधी वेळच्या माझ्या मनातील अव्यक्त घालमेलीत.. !’

….. “तुम्ही आयुष्यभर माझे खूप लाड केलेत. कौतुक करतानाही दादाच्या तुलनेत प्रत्येकवेळी झुकतं माप देत आलात ते मलाच. असं असताना तुमची सेवा करायची वेळ आली तेव्हा मात्र मला दूर कां हो लोटलंत? तुमच्या आजारपणात माझी आई आणि दोन्ही भाऊ तुमच्याजवळ होते. त्यासर्वांनी तुमची मनापासून सेवा केली, तुम्हाला फुलासारखं सांभाळलं,.. पण मी.. ? मी मात्र तिकडे दूर मुंबईत अगदी सुरक्षित अंतरावर पण तरीही अस्वस्थ…. ” बाबांशी हीच सगळी खंत मी मूकपणे बोलत रहायचो त्यांच्या अंत्यविधीच्यावेळी! पुढे कितीतरी काळ आपल्या हातून त्यांची सेवा न घडल्याची रुखरुख माझ्या मनात रेंगाळत राहिलेली होती… !!

 ” मी सहजच विचारलं हो. आठवत नसेल तर राहू दे हवं तर. ” जोशीकाकांच्या आवाजाने मी दचकून भानावर आलो.

 ” नाही म्हटलं,.. तशी खंत, रुखरुख असं कांही नसेल आठवत तर राहू दे.. “

 ” मला आठवतंय.. बाबा गेले तेव्हा अखेरच्या क्षणी थोडक्यात चुकामूक झाल्याची, त्यांची साधी दृष्टभेटही न झाल्याची खूप अस्वस्थता होती माझ्या मनांत.. ! हो.. आपल्या हातून त्यांची सेवा न घडल्याची रुखरुख त्यांचा अखेरच्या निरोप घेतानाच्या प्रत्येकक्षणी मला खूप त्रास देत होती आणि पुढेही बरीच वर्षं ती मनात रूतून बसली होती… ” मी म्हणालो. ते ऐकून मनातला तिढा अलगद सुटल्यासारखा त्यांचा चेहरा उल्हसित झाला.

 ” तुमच्या मनातली ती रुखरुख नाहीशी करण्यासाठीच तुमच्या पहिल्या अपत्याच्या रूपाने ते तुमच्या सहवासात आले होते. फक्त तुमच्याकडून सेवा करुन घेण्यासाठी.. ”

 माझ्या गतकाळातल्या त्या सगळ्या घटनाक्रमांमधला कण न् कण अतिशय मोजक्या शब्दांत जोशीसरांनी नेमकेपणाने असा व्यक्त केला आणि मी अंतर्बाह्य शहारलो.. ! पण ते मात्र क्षणार्धात माझ्या भूतकाळातून अलगद बाहेर आल्यासारखे मुख्य विषयाकडे वळले.

 ” याचा अर्थ तुमची पत्रिका अचूकपणे तयार केलेली आहे. ठीकाय. मग आता चिंता कसली? तुमच्या पत्रिकेत दूरच्या स्थलांतराचे योग नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ! तेव्हा निश्चिंत रहा. दत्तमहाराज तुमच्या पाठीशी आहेत. सगळं विनाविघ्न पार पडेल. “

 जोशीकाकांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो तेव्हा खरंतर मी आनंदात तरंगत असायला हवं होतं. पण तसं झालं नव्हतंच. कारण दूर स्थलांतराचा योग नाही याचा अर्थ लखनौची बदली रद्द होईल असंच. पण ते होणं इतकं सहजशक्य नाहीय हेही तेवढंच खरं होतं. शिवाय लखनौच्या बदलीची शक्यता कांहीशी धूसर होत चालल्याचा आनंदही अजून कांही दिवस कां होईना माझ्या पोस्टींगची आॅर्डर येईपर्यंत अधांतरी तरंगतच रहाणार होता !

 या मन उदास करणाऱ्या विचारांना छेद देत एक वेगळाच विचार मनाला स्पर्शून गेला. माझ्या लखनौ पोस्टींगची बातमी आल्यापासून भराभर घडत गेलेले हे घटनाक्रम पूर्वनियोजित असावेत असंच वाटू लागलं. जोशीकाकांना भेटण्यास अशोक जोशी आग्रहाने मला प्रवृत्त करतात काय आणि माझ्या स्थलांतराचा योग नसल्याचा दिलासा देत, माझ्या आयुष्यात अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांची कांहीही पूर्वकल्पना नसतानाही जोशीकाका समीरच्या जन्म आणि मृत्यूची सांगड सहजपणे घालत असतानाच त्यातून माझ्या बाबांच्या पुनर्जन्माचं सूचन करून मला विचारप्रवृत्त करतात काय,… सगळंचअघटित, अतर्क्य आणि मनातल्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं देत असतानाच त्यातून मनात नवीन प्रश्न निर्माण करणारंही! हेच विचार मनात असताना हे सगळं मला दिलासा देण्यासाठी ‘त्या’नेच घडवून आणल्याचं लख्खपणे जाणवलं आणि मनातलं मळभ हळूहळू विरू लागलं!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदी मन, आनंदी तन, आनंदी  जग… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

आनंदी मन, आनंदी तन, आनंदी  जग ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

एकेकाळी भारतात औषध म्हणूनही उपलब्ध नसलेला मानसिक आजार नावाचा रोग आता जवळजवळ प्रत्येकाच्या पाचवीला पुजल्याप्रमाणे डोके वर काढू लागला आहे. याला जबाबदार कोण ? अमेरिका, इंग्लंड की अन्य कोणी ? बघा, विचार करा ?

याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत असे आपल्या लक्षात येईल.

* आधुनिक जीवनपद्धती,

* विभक्त कुटुंब व्यवस्था,

* हातात खेळणारा पैसा,

* मी कसा आहे हे दिसण्यापेक्षा मी  कसा असायला हवा हे दाखवण्याची अहमहिका आणि त्यातून स्वतःच निर्माण केलेली अनावश्यक स्पर्धा,

  • नकार पचविण्याची कमी होत चाललेली क्षमता,
  • मुलांना फुलझाडांसारखे न वाढवता फुलांसारखे जपणे,
  • सनातन वैदिक परंपरांबद्दल अनादर…,
  • सामाजिक माध्यमांचा अति आणि गैरवापर, स्वतःची क्षमता न पाहता स्वतःकडून ठेवलेल्या अनावश्यक अपेक्षा
  • वस्तुस्थिती स्वीकारण्याची तयारी नसणे.
  • व्यायामाचा अभाव
  • आधुनिक तंत्रज्ञानामुळे शाररिक हालचालींवर आलेली मर्यादा.

* अनावश्यक आणि चमचमीत अन्नपदार्थ

* अमली पदार्थांचे सेवन

* वेदना शामक गोळ्यांचा अतिवापर

* स्टेटस जपण्याची स्पर्धा

यात आपण आणखी काही मुद्दे जोडू शकाल…

मागील दहा वर्षांचा अभ्यास केला तर हृदयरोग आणि हृदयाला झटका  येऊन गेला आहे अशा लोकांचे प्रमाण वाढत आहे. यात प्रामुख्याने ४५ ते ६० या वयोगटाचे प्रमाण जास्त आहे. आपल्या कुटुंबात अथवा मित्रपरिवारात कोणाला तरी हृदय विकार असेल किंवा कधीतरी झटका येऊन गेल्याचे आपल्याला स्मरत असेल. त्यावेळी त्यांची झालेली मानसिक, शाररिक, भावनिक आणि आर्थिक घालमेल आणि ओढाताण आपण पाहिली असेल….

 मानसिक आरोग्य उत्तम असणे ही निरामय जीवन जगण्यासाठी  अत्यावश्यक आहे.

 आपण समस्या पाहिली, आता यावर उपाय पाहूया.

  1. स्वतः का प्रश्न विचारा. आपल्याकडे सुख, समाधान, शांती आहे का ?
  2. मेंदू सशक्त हवा त्यासाठी मन आरोग्य महत्वाचे.
  3. शांत मन, चिडचिड नको, मानसिक आरोग्य यासाठी आनंदी रहावे
  4. छोट्या गोष्टीत आनंद शोधा.
  5. सुखाच्या मागे धावल्याने आजचे सुख गमावताय.
  6. प्रेमाच्या माणसांबरोबर वेळ घालवा.
  7. काळजीत वेळ घालवू नका.
  8. छंद जोपासा.
  9. मन मोकळे करा, नंतर करु असे नको.
  10. पक्षांचे (BIRDS’) आवाज आनंदी करते.
  11. सकाळी फिरायला जा.
  12. योग, प्राणायाम व ध्यान.
  13. हसतमुख रहा/ Be Cheerful
  14. मेंदूचे दोन्ही भाग वापरा कलागुण यात येते. LEFT side of BRAIN is for ROUTINE ACTIVITIES & RIGHT SIDE of BRAIN is for CREATIVE ACTIVITIES. Make more use of Right side of brain.
  15. मन मोकळे करा, मनांत काही ठेऊ नका.
  16. आध्यात्मिक विकास व्हावा ही काळाची गरज यासाठी म्हातारपणाची वाट बघू नका.
  17. शांत झोप ही हेल्दी मनाची पायरी.
  18. आत्मपरीक्षण/ Think on your DAILY ACTIVITIES. Is there any room for improvement ? मोबाईल ऊठल्या ऊठल्या नको. मोबाईल मेंदू दुषीत करतो.
  19. मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी श्लोक म्हणा, किंवा Utube वर लावा. त्यामुळे मेंदूत चांगल्या लहरी तयार होतील.
  20. नकारार्थी विचार मेंदूला दूषित करतो. 21. सकारात्मक विचार रुजवा Negative विचार दूर करा.
  21. कंटाळा हा शब्दच नको. सतत स्वत:ला कार्यमग्न ठेवा.
  22. दैवी गुण रुजवणे आवश्यक. असुरी गुण नको.
  23. मनाचे श्लोक आत्मसात करा. , रोज किमान १० श्लोक म्हणा.
  24. श्रध्दा व ऊपासना महत्वाची.
  25. रोज तुमचा आरसा (मनाचा) स्वच्छ ठेवा. Stay away from Negativity.
  26. चांगले वाचन करा. मन प्रसन्न राहील.
  27. मेंदूचा वापर सतत असावा.
  28. रोज किमान चार ओळी लिहीत जा. दिसा माजि काही लिहीत जावे…
  29. मागण्या कमी ठेवा. मन आनंदी राहील.
  30. रोजच्या रोज वेळेचे नियोजन करा
  31. एकावेळी एकच काम लक्षपूर्वक करा याने मेंदूतील झिज कमी होईल.
  32. वर्तमानात जगा. भूतकाळाचा व भविष्यकाळाचा विचार नको.
  33. अनुभवातून शिकणे हवे. पण त्याचा बाऊ नको.
  34. वाईट विचारांना तिलांजली व चांगल्या विचारांना चालना.
  35. चढउतार (IN LIFE) पचवणेची क्षमता वाढवा.
  36. मी काही चूकीचे करतोय का ? स्वत:ला विचारा. मनाचे ऐका.
  37. पैशांच्या मागे नको. झोप उडेल व मन दुःख:ी होणार. पैसा आवश्यक असेल तेवढाच हवा. (MONEY: साध्य नसून साधन).
  38. SHREESUKTA पठण व आत्मसात करा. KNOW THE REAL MEANING OF “LAKSHMI”.
  39. TRY TO BE A MAN OF VALUE NOT JUST A MAN OF SUCCESS.
  40. चांगली मुल्ये आनंदी करतात.
  41. श्रेयसाची वाट धरा. PREYAS will give you a short pleasure.
  42. रागावर नियंत्रण. मेंदूचे रसायन बदल. ANGER causes Mental as well as Physical imbalance.
  43. खरं बोलणे पालन. खोटे बोलणे मुळे ऊपयुक्त रसायनांत बदल.
  44. संस्कार जतन, चूक काय व बरोबर काय याकडे लक्ष हवे. सोंग नको. मनाला विचारणा करा.
  45. नात्यांचा आदर करा. एकी ठेवा. एकीतच बळ आहे. बंधनातच आनंद असतो.
  46. ध्यानधारणा करा व मेंदूला आराम द्या. PRANAYAM, YOGA & MEDITATION play an important role in keeping your brain cells healthy by producing dopamine like chemicals.
  47. आईवडिलांवर प्रेम करा व आदर करा.
  48. भावनांचा दिखावा नको. फसवू नका.
  49. नातेसंबंध दृढ करा. आपल्या आवडत्या लोकांबरोबरच रहा नावडत्यांना दुर ठेवा. Nurture Relationships.
  50. परस्परावर विश्वास ठेवा.
  51. लोकांचे आवडते बना.
  52. सॉरी म्हणायला शिका.
  53. जबाबदाऱ्या जाणा.
  54. गैरसमज टाळा. “आपणच बरोबर” हे नको. दुसऱ्याचे म्हणणे ऐका. आत्मपरीक्षण करा.
  55. विवेकाने वागायला शिका.
  56. माणूस बनायला शिका प्राणी नको.
  57. बुध्दीचे मनावर नियंत्रण हवे.
  58. मेधा, मती, प्रज्ञा, ऋता हे आचरण.
  59. चांगला दृष्टीकोन हवा.
  60. व्यक्त व्हा…. !
  61. मन आनंदी तर हृद्य आनंदी…. !
  62. सत्संगती

देवावर विश्वास ठेवा, आजपर्यंत ज्याने सांभाळले तो पुढेही सांभाळेल हा विश्वास मनाला उभारी देईल… !

मन करा रे प्रसन्न ।

सर्व सिद्धीचें कारण ।

मोक्ष अथवा बंधन ।

सुख समाधान इच्छा ते ॥१॥

*

मनें प्रतिमा स्थापिली ।

मनें मना पूजा केली ।

मनें इच्छा पुरविली ।

मन माउली सकळांची ॥ध्रु. ॥

*

मन गुरू आणि शिष्य ।

करी आपुलें चि दास्य ।

प्रसन्न आपआपणास ।

गति अथवा अधोगति ॥२॥

*

साधक वाचक पंडित ।

श्रोते वक्ते ऐका मात ।

नाहीं नाहीं आनुदैवत ।

तुका म्हणे दुसरें ॥३॥

 *

–  जगद्गुरु श्रीतुकाराम महाराज

 सर्वांनी आपापले मानसिक आरोग्य उत्तम राखण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला प्रयत्नांना प्रभू श्रीरामांनी सहाय्य करावे अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करीत आहे.

आपला

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

विशेष आभार :- या लेखास नाशिक येथील जगप्रसिध्द न्युरोलोजिस्ट डॉ. महेश करंदीकर यांच्या एका भाषणाचे सहाय्य झाले आहे.

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बदल हाच आहे स्थायीभाव…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “बदल हाच आहे स्थायीभाव…☆ श्री जगदीश काबरे ☆

मित्रांनो, आपले आयुष्य म्हणजे एका तळ्यातील साचलेल्या पाण्यासारखे आहे. त्यात जर कोणी एक दगड फेकून मारला की, ज्या प्रमाणे पाण्यावर तरंग निर्माण होतात, तसे काम विज्ञान-तंत्रज्ञान आपल्या आयुष्यात आज करत आहे. त्यामुळे आपल्या थांबलेल्या शांत आयुष्यात लगेच बदल घडायला सुरु होतो. असे रोज नवनवीन दगड पडत आहेत. ज्या ज्या वेळी नवीन दगड पडणार त्या त्या वेळी तुम्हाला मला बदलावेच लागणार आहे. आपल्याला नवीन अपडेट ज्ञान घ्यावेच लागणार आहे. तुम्हाला आणि मलाही कामाची नवीन पद्धत आणावीच लागणार आहे. तुम्हाला-मला नवनवीन कौशल्य आत्मसात करावेच लागणार आहे. तुम्हाला-मला आपली प्रवृत्ती बदलावीच लागणार आहे. यातून एक गोष्ट नक्कीच होणार आहे… ते म्हणजे आपल्याला सातत्याने बदलावेच लागणार आहे. कारण हा दगड पडण्याचा कार्यक्रम बंद होणार नाही. विज्ञान सतत नवनवीन दिशेने भरारी घेत रहाणार आहे.

यामुळे झालेय काय की, अनेक लोक आपल्या भविष्याबद्दल भयभीत होत आहेत. “माझे पुढे कसे होणार?, माझ्या मुलांचे कसे होणार? माझ्या आयुष्याचे काय होणार? काही थोडकेच जण असे आहेत की, जे त्यांच्या आयुष्यात शांत आहेत, आनंदी आहेत. बाकी मोठ्या प्रमाणात अशी लोकसंख्या आहे, जी आपल्या भविष्याबद्दल भयभीत आहे, प्रचंड तणावाखाली आहे. अनेक लोक तर या विचारात आहेत की, हे जे झपाट्याने बदल होत आहेत हे सर्व आम्हाला कसे झेपणार?

प्रत्येक गोष्टीचा वेग वाढला आहे.  विज्ञान-तंत्रज्ञानातील हे बदल रोज आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर परिणाम घडवून आणत आहेत. आजूबाजूला जे झपाट्याने बदल घडत आहेत त्यामुळे अनेक नवीन गोष्टी तुमच्या-माझ्यावर आदळत आहेत. यामुळे एक खूप मोठा गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे आपला आत्मविश्वास हरवत आहे. या अशा अशांत वातावरणाने आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. माणसे प्रचंड तणावाखाली वावरत आहेत.

मागील २०० वर्षात जितके शोध नाही लागले तितके शोध मागील ५ वर्षात लागले आहेत आणि हा प्रत्येक शोध आपल्या आयुष्यात अशी घुसखोरी करत आहे की, आपल्याकडे थांबून पाहायला वेळच नाही. माझे पुढे काय होईल? या अशा विचारांचा गोंधळ, सातत्याने वाढत जाणारी भीती, या सर्वाचा परिणाम म्हणजे आपण आत्याधुनिक साधने तर वापरू लागलो आहोत; पण विचारांनी मात्र अजूनही 400 वर्षे मागेच आहोत. म्हणूनच आपल्या आयुष्यात गोंधळ उडालेला दिसतोय. यावर उपाय एकच… जेव्हा आपण विवेकाने वागायला शिकू, वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगायला शिकू, प्रत्येक घडणाऱ्या घटनेतील कार्यकारणभाव शोधायला शिकू, अंधश्रद्धेतून मुक्त होऊ, नवीन ज्ञान आत्मसात करायची जिगीविषा बाळगू, तेव्हाच या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या भारारीला कवेत निश्चितपणे घेऊ शकू.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्रावण… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

🔅 विविधा 🔅

☆ श्रवण☆ सौ शालिनी जोशी

तीन मार्च हा श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त लेख:

☆ श्रवण ☆

‘श्रवण’ हे पहिले भाषिक कौशल्य आहे. त्याचे नंतर भाषण, वाचन, लेखन इत्यादी. श्रवण मध्ये मूळ धातू’ श्रु’ ऐकणे. पण ऐकणे आणि श्रवण यात फरक आहे. आपल्या कानावर बरेच आवाज पडत असतात त्यातील विशिष्ट आवाज लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे श्रवण (listening)आणि ऐकणे म्हणजे नुसते आवाज कानावरून जाणे(hearing). वेदांना श्रुती म्हणतात. मग वेद वचन ऐकणारा तो श्रोता. आणि त्याने ऐकलेली वचने म्हणजे श्रुत. यावरून ज्ञानी माणसाला बहुश्रुत म्हणतात. ऐकणारे इंद्रिय कान याला कर्ण, श्रोत्र, श्रवण असे प्रतिशब्द आहेत.

आपल्या वैदिक संस्कृतीत श्रवणाला पूर्वापार महत्त्व आहे. कारण श्रवणाद्वारेच ज्ञानगंगा प्रवाहित राहिली. गुरु शिष्य शिक्षण पद्धतीत गुरुने सांगावे. शिष्याने ते मनापासून ऐकावे, मग कंठस्थ करावे व पुढील पिढीला सांगावे. अशी पद्धत होती. ज्ञानेश्वर म्हणतात ‘वक्ता तो वक्ताची नोहे। श्रोतेविण।’अधिकारी श्रोता नसेल तर वक्त्याचे बोलणे वाया जाते. इतके श्रवणाचे महत्व. विश्वामित्रांनी रामलक्ष्मणाना यज्ञ रक्षणासाठी आपल्याबरोबर नेले. वाटेत चालता चालता त्यानी जो ज्ञानोपदेश केला तो राम-लक्ष्मण यांनी श्रवण केला. चित्तात धारण केला. तेथे लिहून घेण्याची गरज पडली नाही. श्रवण असे एकाग्रतेने करायचे असते. ते जेव्हा परमेश्वराच्या लीला गुणांचे होते. तेव्हा ती ‘श्रवण भक्ती ‘होते नवविधा भक्तीतील ही पहिली भक्ती.

गौतम बुद्ध एकदा झाडाखाली बसले होते. तेव्हा कोणी एक जण येऊन त्यांना अपमान कारक बोलू लागला. पण गौतम बुद्ध शांत होते. त्यांच्या शिष्याला याचे आश्चर्य वाटले. तेव्हा गौतम बुद्ध म्हणाले देणाऱ्याने दिले तरी काय घेणे ते आपण ठरवायचे असते. हाच श्रवण विवेक. तो माणूस मुकाट्याने निघून गेला. श्रवण केलेल्या गोष्टीचा माणूस विनियोग कसा करतो हे सांगणारी अकबर बिरबलाची एक गोष्ट आठवते. एकदा अकबराने तीन सारख्या धातूच्या मूर्ती आणल्या आणि बिरबलाला त्यांच्यातील फरक ओळखायला सांगितला. बिरबल चाणाक्ष होता. त्याने एक तार घेतली. एका मूर्तीच्या कानात घातली. ती दुसऱ्या कानातून बाहेर आली. म्हणजे असे काही लोकांचे श्रवण वरवरचे असते. नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, अशा प्रकारचे. दुसऱ्या मूर्तीच्या कानात तार घातली, तर तोंडातून बाहेर आली. म्हणजे त्याने ऐकले ते लगेच बोलून टाकले. पण तिसऱ्या मूर्तीच्या कानातील तार पोटात गेली. ती बाहेर आली नाही. म्हणजे त्याने ऐकले त्यावर विचार मनन केले. हे खरे श्रवण. समर्थ रामदास म्हणतात ‘, ऐसे अवघेची ऐकावे। परंतु सार शोधून घ्यावे ।असार ते जाणूनी त्यागावे ।या नाव श्रवण भक्ती । पण सगळेच ऐकले तरी त्यातले सार तेवढेच घ्यावे. म्हणून गणपतीला शुर्पकर्ण म्हणतात. सुपासारखे कान असलेला. सुप जसे फोलपट टाकून स्वच्छ धान्य ठेवते. तसेच गणपतीचे कर्ण. त्याचे श्रवण हा गुण सर्वांनीच घ्यावा.

कान हे श्रवणाचे प्रतीक. तो आपला आपण बंद होत नाही. जसे तोंड व डोळा बंद करता येतो. त्यामुळे त्याला नकार देता येत नाही. डोळा फक्त समोरचेच पाहतो. पण चारी बाजूच्या लहरी कानावरती सहजच पडतात. घरात बसलेले असताना विविध आवाज आपल्या कानावर ती पडतात. पक्षी किलबिलत असतात. रेडिओ सुरू असतो. पंख्याचा आवाज येत असतो. कोणीतरी काही बोलत असते. अशा गडबडीत कोणत्यातरी एका इच्छित आवाजावर लक्ष केंद्रित करणे हेच श्रवण कौशल्य. त्यासाठी गरज मनाच्या एकाग्रतेची. हाच खरा श्रोता. यालाच ज्ञानेश्वर अवधान म्हणतात. श्रोत्यांना वेळोवेळी सांगतात, ‘ आता अवधान ऐकले द्यावे ।मग सर्व सुखाची पात्र होईजे।’

कानावरून आलेले विविध वाक्प्रचार व म्हणी आपल्या मराठी भाषेचे सौंदर्य वाढवतात. उदाहरणार्थ बळी तो कान पिढी, कानामागून आला तिखट झाला, भिंतीला कान असतात, कान व डोळा या चार बोटाचे अंतर, कान टवकारणे इत्यादी

माणूस हा सौंदर्याचा भोक्ता. त्यामुळे कानाला सजविण्यासाठी त्याला दागिन्या घालण्याची पूर्वापार प्रथा आहे. त्याला कुंडल असे म्हणतात. त्यासाठी बारशाच्या दिवशीच कान टोचतात. आपल्या सोळा संस्कारतील हा एक संस्कार. कानाच्या वरच्याभागी पुरुषही भिकबाळी नावाचा दागिना घालतात. ‘मकर कुंडले तळपती श्रवणी’ असे विठ्ठलाच्या कुंडलाचे वर्णन करतात. कुंडलांचा कुंडली जागृतीशी संबंध आहे असे म्हणतात. कान टोचण्यामध्ये शास्त्रीय कारणही आहे त्यामुळे आजारांची शक्यता कमी होते व स्वास्थ्य टिकते. या कुंडलावरून ‘वारियाने कुंडल हाले’ किंवा ‘बुगडी (म्हणजे कानातील दागिना) माझी सांडली ग’ अशी गाणी हे रचली गेली. असो कितीही दागिने घातले तरी

हस्तस्य भूषणानं दानं।सत्यं कंठस्यभूषणम्।

कर्णस्यभूषण शास्त्रं।भूषणैः किं प्रयोजनम्।

शास्त्र श्रवण करणाऱ्याच्या कानाला दुसऱ्या दागिन्यांची गरज नाही.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जगण्यातला अर्थ… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

जगण्यातला अर्थ… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

‘मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने… ‘ असं मुकेश यांनी गायलेलं एक गीत आहे. जगण्याची आशा जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत माणूस इंद्रधनुषी सात रंगांची स्वप्न पहात असतो. मंगेश पाडगावकर म्हणतात, ” या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.”

खरोखरच हे जीवन विविधरंगी आहे. पण कधी कधी हेच जीवन एखाद्यासाठी भयंकर असे दु :स्वप्न बनू शकते. आयुष्य जिवंतपणी नरक बनतं. अशा वेळी जगणं नकोसं होतं. परंतु अशाही विपरीत परिस्थितीत काही माणसं हार मानत नाहीत. कारण जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांच्याकडे असते. अशा परिस्थितीत ते असं काही जगतात की ते त्यामुळे त्यांचं जीवन सफल तर होतंच पण ते इतरांसाठी प्रेरणादायी बनतं. अशीच एक कथा ऑस्ट्रियातील विक्टर फ्रँकल यांची.

ते न्यूरोलॉजिस्ट आणि मानसोपचार तज्ञ होते. अभ्यास आणि संशोधन हेच जणू त्यांचे जीवन झाले होते. आत्महत्या करणाऱ्या स्त्रियांसाठी ते काम करत होते. जीवनाला कंटाळून निराश झालेल्या आणि आत्महत्या करणाऱ्या स्त्रियांना त्यापासून परावृत करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. अशातच दुसरे महायुद्ध सुरू झाले. विक्टर फ्रँकल आणि त्यांच्या कुटुंबीयांना अटक करून नाझी छळ छावण्यात पाठवण्यात आले. तिथे ते सगळे अपरिमित छळाचे बळी ठरले. या कालावधीत फ्रँकल यांनी आपल्या वडिलांचा, आईचा मृत्यू पाहिला. त्यांच्या गर्भवती असलेल्या पत्नीचे निधन झाले. परंतु या सगळ्या भयंकर, भीतीदायक वातावरणातून ते सुदैवाने वाचले, बाहेर आले आणि पुन्हा त्यांनी आपल्या कार्याला वाहून घेतले. त्यांनी आपल्या जीवनातील जे अनुभव घेतले त्यावर आधारित Man’s Search for Meaning या नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचे ‘ अर्थाच्या शोधात ‘ या नावाने मराठी भाषांतर झाले आहे. डॉ विजया बापट यांनी हा अनुवाद केला आहे. फ्रँकल यांनी एकूण ३२ पुस्तके लिहिली. या पुस्तकांचे एकूण ३४ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.

फ्रॅंकल यांच्या अनुभवाचे आणि जीवनाचे सार म्हणजे अर्थाचा शोध हे पुस्तक. त्यात ते म्हणतात, ” हे जीवन जर अर्थपूर्ण असेल तर मानवी जीवनातील दुःखालाही अर्थ असला पाहिजे. आपले भाग्य आणि मृत्यू या गोष्टी ज्याप्रमाणे टाळता येत नाहीत त्याप्रमाणेच दुःख ही न टाळता येणारी गोष्ट आहे. मानवी जीवनात येणाऱ्या दुःखाचे महत्त्व कमी लेखून चालणार नाही. दुःखाशिवाय मानवी जीवनाला परिपूर्णता येत नाही.

आपल्या जीवनाला जर अर्थ नसेल तर जीवन भरकटते. आपण वाईट सवयींच्या आणि व्यसनांच्या आधीन होतो. माणसाच्या हातून सर्व काही हिसकावले जाऊ शकते. परंतु विपरीत परिस्थितीतही जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती जर त्याच्याकडे असेल तर ती त्याच्याकडून कोणी काढून घेऊ शकत नाही. आपल्या भोवताली असणारी, आपल्या विरुद्ध असणारी परिस्थिती बदलण्याची क्षमता जर आपल्यात नसेल तर आपण स्वतःला बदलले पाहिजे. आपण घेतलेल्या भूमिकेत जगण्याचा अर्थ शोधण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे.

जीवनात संकटे तर येणारच परंतु अशा परिस्थितीत खचून न जाता आपल्या जगण्याला नवा अर्थ देता यायला हवा. असा अर्थ तीन प्रकारे आपल्याला देता येऊ शकतो आणि त्यामुळे आपले जगणे अर्थपूर्ण होऊ शकते. त्याबरोबरच ते इतरांसाठीही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी होऊ शकते.

१. आपल्याला आपल्या जगण्याचा अर्थ प्रत्यक्ष कामातून शोधत यायला हवा.

२. इतरांवर प्रेम करण्यातूनही तो शोधता येतो. आणि

३. दुःख, वेदना सहन करतानाही तो शोधता येतो.

असे हे तीन मार्ग आपल्या जगण्याला एक दिशा देऊ शकतात. यासाठी काही उदाहरणे आपण पाहूया. म्हणजे फ्रँकल यांना नेमके काय म्हणायचे आहे ते आपल्याला लक्षात येईल.

त्यांनी सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष कामातून जगण्याचा अर्थ, जगण्याची दिशा शोधता यायला हवी. ‘इकीगाई’ हे प्रसिद्ध पुस्तक सुद्धा हेच आपल्याला सांगतं की आपल्याला का जगायचं हे कळलं, तर कसं जगायचं हे नक्कीच कळेल. बाबा आमटे यांनी एका महारोग्याला अत्यंत भयानक अवस्थेत वेदनांनी तळमळताना पाहिलं. समाजाने आणि त्याच्या नातेवाईकांनी त्याला जणू मरण्यासाठीच सोडून दिलं होतं. बाबांनी त्याची सेवा सुश्रुषा केली आणि मग कुष्ठरोग्यांच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. आपले संपूर्ण जीवनच त्यांच्यासाठी समर्पित केले. त्यातून त्यांना जगण्याचा अर्थ कळला. त्यांचे जीवन म्हणजे समाजासाठी एक आदर्श असा वस्तुपाठ होता. पुणे येथे भिक्षेकर्‍यांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असणारे डॉक्टर अभिजीत सोनवणे यांनी भीक मागणाऱ्यांची वाईट अवस्था पाहिली. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावे असे त्यांना आतून वाटू लागले आणि आपले जीवन त्यांनी त्यांच्यासाठी समर्पित केले. अनेक भिक्षेकर्‍यांना त्यांनी रोजगार मिळवून देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आहे. त्यांना स्वाभिमानाने जगणे शिकवले आहे.

प्रत्येक व्यक्ती स्वतःवर आणि स्वतःच्या कुटुंबावर प्रेम करतेच परंतु त्यापलीकडे जाऊन इतरांवर मानवतेच्या भावनेतून प्रेम करणे, इतरांप्रती कृतज्ञतेच्या भावनेतून काहीतरी समाजकार्य करणे हे सुद्धा जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी महत्त्वाचे आहे. अशी अनेक मंडळी आहेत की जी आपले काम करतानाच, इतरांसाठी देखील काम करतात, त्यांच्यावर प्रेम करतात. ती माणसे जगावीत, त्यांना चांगले खायला प्यायला मिळावे, चांगले कपडेलत्ते मिळावे म्हणून प्रयत्न करतात. संभाजीनगर येथील श्री चंद्रकांत वाजपेयी आणि त्यांचे सगळे सहकारी वाया जाणारे अन्न गोळा करून ज्यांना त्याची गरज असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. नाशिक येथील श्री अशोक धर्माधिकारी आणि त्यांचे सहकारी आदिवासी स्त्रिया, मुले यांना आवश्यक त्या वस्तू दरवर्षी त्यांच्या भागात जाऊन पुरवतात. त्यांची दिवाळी आनंदाची करतात. अशी अनेक माणसे आहेत ही दोन नावे फक्त मी उदाहरणादाखल दिली. अनेक माणसे वृद्धाश्रमात जाऊन सेवा करतात, आपला वेळ देतात. आपले काम करता करताच या समाजोपयोगी गोष्टीही ते करत असतात. यातून त्यांना आपल्या जीवनाचा अर्थ सापडतो आणि खरोखरीच त्यांचे जीवन धन्य होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशावर प्रेम केले. ‘ स्वतंत्रतेचे स्तोत्र ‘ या कवितेत ते म्हणतात

तुजसाठी मरण ते जनन

तुजवीण जनन ते मरण.

एक सुंदर सुविचार आहे, ” फक्त स्वतःसाठी जगलास तर मेलास, पण स्वतःसाठी जगून इतरांसाठी जगलास तर जगलास. “

ज्यांनी स्वतः यातना सहन केल्या आहेत, वेदनांना तोंड दिले आहे अशी माणसे केवळ स्वतःचे दुःख कुरवाळत न बसता इतरांसाठी काम करून आदर्श घालून देतात. अशी पण खूप उदाहरणे आहेत. संतोष गर्जे हा स्वतः अनाथ असलेला तरुण! त्याने प्रचंड यातना सोसल्या आणि जगण्यासाठी संघर्ष केला. परंतु आपल्यासारख्या अनाथ लेकरांना अशा प्रकारचे जीवन जगावे लागू नये म्हणून अशा अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी बीड जिल्ह्यातील गेवराई या ठिकाणी त्यांनी मोठे कार्य उभे केले आहे. तो आणि त्याची पत्नी अनाथ मुलांना आई-बापांची माया देत आहेत, त्यांना जगण्यासाठी समर्थ बनवत आहेत. असेच एक उदाहरण आहे राहुल देशमुख यांचे. आता ते एका राष्ट्रीयकृत बँकेत अधिकारी आहेत. पण त्यांना लहानपणी शिक्षण घेत असताना काही काळानंतर अंधत्व आले. शिक्षण घेताना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अंध असल्यामुळे कोणी त्यांना होस्टेलला प्रवेश देखील देत नव्हते. आपल्या बुद्धिमत्ता आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. पण इतर अंध विद्यार्थ्यांना आपल्यासारखा त्रास शिक्षण घेताना होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी राहूल यांनी वस्तीगृह सुरू केले, त्यांना शिक्षण घेता येईल अशी व्यवस्था केली, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवस्था केली आणि त्यातून अनेक तरुण आज नोकरीला लागले आहेत मोठ्या हुद्द्यावरती काम करत आहेत. हरमन सिंग सिद्धू हा अपघातात गंभीर जखमी झाला आणि अनेक वर्षांपासून व्हीलचेअरला खिळून राहिला आहे. आपल्या वेदना शमवण्यसाठी अनेक प्रकारच्या गोळ्या त्याला घ्याव्या लागतात. परंतु तो आपल्या वेदनांबद्दल चकार शब्दही बोलत नाही. लोकांनी अपघातापासून वाचावे म्हणून त्यांनी ‘ सुरक्षित पोहोचा ‘ ही संस्था सुरू केली आणि आज तिचे कार्य ते करीत आहेत. अशी प्रेरणादायी कितीतरी उदाहरणे आपल्या अवतीभवती आहेत. या आणि अशा बऱ्याच व्यक्तींवर मी माझ्या पुस्तकांमधून लेख लिहिले आहेत आणि त्यांचे कार्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

या सगळ्या गोष्टींचे तात्पर्य असे की आपल्या जीवनातील परिस्थिती जरी आपल्याला प्रतिकूल असेल तरी आपण निराश न होता किंवा खचून न जाता त्या परिस्थितीला धीराने तोंड देऊन आपले जीवन जगण्याची दिशा प्राप्त करू शकतो. मानवी जीवनात दुःख हे अपरिहार्य आहे परंतु अशा दुःखाला कुरवाळत न बसता काही माणसे आपले दुःख विसरून इतरांसाठी मानवतेच्या भावनेतून कार्य करत राहतात आणि आपल्या जगण्याचा अर्थ शोधतात. अशावेळी जगण्याचा अर्थ कळतो जीवनाच्या अशा टप्प्यावर मग हे जीवन सुंदर आहे अशी जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. संत तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे तर

जे का रंजले गांजले

त्यासी म्हणे जो आपुले

तोचि साधू ओळखावा

देव तेथेची जाणावा.

अशी माणसे म्हणजे आधुनिक संतच होत. ते दीपस्तंभ होत.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares