मराठी साहित्य – विविधा ☆ वळीव… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ वळीव… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

खिडकीतून बाहेर आकाशाकडे पहाताना उन्हाच्या झळा घरात बसून सुध्दा अंगाला जाणवत होत्या! एप्रिल महिन्याचा मध्य म्हणजे उन्हाळ्याची तीव्रता खूप जास्त! आकाशाच्या निळ्या पार्श्र्वभूमीवर ढगांचे पांढरे शुभ्र पुंजके विखुरलेले दिसतात होते आणि माझं मनही असंच विचारांच्या आवर्तात भरकटत होतं!

लहानपण डोळ्यासमोर आले,परिक्षा संपण्याच्या आनंदाबरोबरच मोठ्या उन्हाळी सुट्टी ची चाहुल लागलेली असे.ही सुट्टी कशी घालवायची याची स्वप्नं रंगवत दिवस जायचे. आतासारखे टिव्ही, मोबाईल, मोबाईल गेम, सिनेमा हे विश्व आमच्या समोर नव्हते, फार तर परिक्षा झाल्यावर एखादा सिनेमा बघायला मिळायचा! कोकणात तर सुटीत पत्ते खेळणे, समुद्रावर फिरायला जाणे आणि गाण्याच्या भेंड्या,डबा ऐसपैस सारखे खेळ खेळणे हीच करमणूक होती.सकाळी आटवल भाताचा नाश्ता झाला की दुपारच्या जेवणापर्यत आम्ही घरात फिरकत नसू!आंबे बाजारात सुरु झाले की रोज आमरसावर ताव मारणे,फणस,काजूचा आस्वाद घेणे यात दुपार कधी सरायची कळत नसे.घामाच्या धारा वहात असायच्या,पण संध्याकाळी ऊन उतरले की समुद्रावरचा वारा ‘शीतल विंझणवार्या’सारखा वाटायचा.

बालपण कोकण चा मेवा खात कधी संपलं कळलंच नाही आणि काॅलेजसाठी देशावर आले.देशावरचे उन्हाळी वातावरण खूपच वेगळे! ऊन खूप असे, पण घामाच्या धारा कमी! संध्याकाळी ४/५नंतर हवा एकदम बदलत असे या दिवसात! अभ्यासाच्या वार्या बरोबरच बाहेरची हवाही बदलती असे.दुपारचे कडक ऊन संध्याकाळी वार्या वावटळीत कमी तीव्र वाटायचे! हाॅस्टेलवर रहात असताना जानेवारी नंतर हवेतला गारवा कमी होऊन वातावरण तापत असे.आमच्या काॅलेजच्या परिसरातील झाडांची पाने पिवळी, करड्या रंगाची दिसू लागत, अधून मधून वावटळीत सुटे आणि दूरवर फुफाटा उधळत असे.वसंत ऋतूच्या चाहुलीने निसर्गात सृजनाची निर्मिती दिसायला सुरुवात होई.झाडांवर पालवी फुटलेली दिसे.कोकिळेचे कूजन ऐकायला येई, कुठेतरी निष्पर्ण चाफा पांढर्या, गुलाबी रंगाचे वस्त्र पांघरून दिसे तर कुठे पिवळ्या, जांभळ्या फुलांची शाल पांघरलेला कॅशिया असे! आकाशाच्या निळ्या पार्श्र्वभूमीवर गुलमोहराचे केशरी तुरे खुलून दिसत! मोगरा,मदनबाणाची छोटी छोटी झुडुपे  पांढर्या कळ्यांनी भरून गेलेली दिसत.संध्याकाळी त्यांचा सुगंध सगळा परिसर गंधमयी करत असे!अशा या वातावरणात आकाशात ढगांची बदलाबदली कधी सुरू होई कळत नसे! पांढरे शुभ्र ढग हळूहळू करडे बनत,बघता बघता आकाश काळ्या ढगांनी भरून जाईल.ढगांचा कडकडाट, आणि विजेच्या गडगडाटासह हवा आपलं रूपच पालटून टाकत असे.जोराचा वारा सुटला की पाखरे लगबगीने आपल्या घराकडे परतू लागत आणि मग जी वळवाची सर येई त मृद्गगंध उधळीत, जीवाला शांत करीत येई!तो पाऊस अंगावर झेलू की टपटप पडलेल्या गारा वेचू असं होऊन जाई, छपरावर, रस्त्यावर सगळीकडे गारांचा सडा पसरलेला दिसे.डोळ्यासमोर तो वळीव असा उभा राहिला की मन मोराचा पिसारा किती फुलून जाई ते वर्णनच करता येत नाही.पावसाची पहिली सर अंगावर घेतली कि तो वळीव प्राशन करून घ्यावासा वाटतो! पावसाची सर थांबता थांबताच आकाशात इंद्रधनुष्याची कमान बघायचं सुख अनुभवायला मिळते.पांढर्याशुभ्र ढगातून बदलत जाणारा तो काळा ढग!असा ओथंबून येतो की,त्याची होणारी बरसात मनाचे शांतवन करते. कधी कधी मनाला प्रश्र्न पडतो की,ते पांढरे ढग काळ्यामध्ये परावर्तित झाले तरी कधी? विजेच्या संगतीने कडकडाट करीत हे भावव्याकुळ ढग प्रुथ्वीवर रिते कसे बरं होतं असतील? पांढरे ढग श्रेष्ठ की काळे ढग?अशा आशयाचा वि.स.खांडेकरांचा धडा आठवून गेला! दोन्ही ही तितकेच महत्त्वाचे!काळ्या ढगांचे अस्तित्व च मुळी पांंढर्या ढगांवर अवलंबून! विचारांच्या आवर्तातही ही. ढगाळलेली अवस्था येते कधी कधी! विचारांचे पांढरे ढग जेव्हा परिपक्व होतात, तेव्हा ते हळूहळू करडे बनतात. पुढे दाटून येते आणि काळे बनतात.योग्य वेळ आली की डोळ्यातून सरीवर सरी बरसत रहातात आणि मनावरचे अभ्राचे पटल नष्ट करून स्वच्छ मनाने पुन्हा नाविन्याचा आस्वाद घेतात! नवनिर्मिती करणार्या त्या बरसणाऱ्या ढगांची माझे मन आतुरतेने वाट पहात रहाते!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! नवीन अंगाई गीत ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 नवीन अंगाई गीत ! 😅  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“नमस्कार पंत, हा तुमचा पेपर आणि आपल्या चाळीची बातमी आली आहे आजच्या पेपरात पान सहावर, ती आठवणीने वाचा, येतो मी !”

“कसली बातमी मोऱ्या ?”

“पंत तुम्ही वाचलीत तर तुम्हांला कळेल ना आणि त्या बातमीत माझं पण नांव छापून आलं आहे, अगदी फोटो सकट !”

“अरे गाढवा तू ती बातमी सांगितलीस तर तुझी जीभ काय झडणार आहे ? आणि तुझा फोटो कशासाठी छापलाय पेपरात ? तू साधा गल्लीतला नेता पण नाहीस अजून !”

“तसं नही पंत, तुमच्यामुळेच ती बातमी आणि माझा फोटो छापून आला आहे पेपरात !”

“माझ्यामुळे ? ते कसं काय ?”

“अहो पंत, तुम्हीच नाही का मला गेल्यावेळेस नवीन आयडिया दिलीत त्या बद्दलच ती बातमी आहे !”

“मोऱ्या, नेहमी तू मला ‘कोड्यात बोलू नका’ असं सांगतोस आणि आज तू स्वतःच कोड्यात बोलतोयस ! आता मला जर ती बातमी उलगडून नाही सांगितलीस तर उद्यापासून आमच्या पेपरला हात लावायचा नाही, कळलं ?”

“असं करू नका पंत ! अहो तुमचा पेपर वाचल्या शिवाय माझी ‘प्रातरविधी’ पासूनची सारी कामं अडतात हे तुम्हांला पण माहित आहे !”

“हॊ ना, मग आता मुकाट्यानं मला ती बातमी सांगतोस का उद्यापासून आमचा पेपर वाचण बंद करतोस ?”

“सांगतो सांगतो पंत ! आता तुम्ही माझ्या वर्मावरच वार करायला निघालात तर….”

“उगाच अलंकारिक बोलायला जाऊ नकोस, पट पट बोल !”

“पंत, अहो गेल्यावेळेला तुम्ही नाही का म्हणाला होतात, की आपल्या अहमद सेलरच्या आठ चाळीत रोज कोणाकडे ना कोणाकडे कसलं तरी मंगल कार्य असतं आणि लोकं हजारो रुपये खर्च करून DJ लावून ते साजर करीत असतात, त्या ऐवजी…….”

“त्याच पैशातून गरीब हुशार विद्यार्थ्यांना मदत करावी अथवा कुठल्यातरी सामाजिक संस्थेला देणगी द्यावी, असं मी सुचवलं होत खरं !”

“बरोबर पंत आणि चाळ कमिटीचा अध्यक्ष या नात्याने मी तो कार्यक्रम यशस्वीपणे राबवला त्याचीच बातमी आली आहे आजच्या पेपरात !”

“अरे व्वा ! तुझं अभिनंदन मोऱ्या !”

“धन्यवाद पंत, पण तुमच्यामुळेच हे शक्य झालं ! येतो आता !”

“मोऱ्या थांब जरा, माझं काम आहे तुझ्याकडे !”

“कसलं काम पंत ?”

“अरे माझा मित्र वश्या जोशी पूर्वी डोंबिवलीला रहात होता, अगदी स्टेशन जवळ आणि आता तो ठाण्यात घोडबंदरला आला आहे रहायला !”

“बरं मग ?”

“मोऱ्या वश्याला ठाण्यात आल्यापासून निद्रानाश जडला आहे, रात्रभर झोप म्हणून लागत नाही त्याला !”

“मग जोशी काकांना एखाद्या डॉक्टरकडे जायला सांगा ना !”

“अरे चार, पाच डॉक्टर करून झाले त्याचे पण काडीचा उपयोग झाला नाही त्याला, उगाच पैशा परी पैसे गेले ते वेगळेच !”

“पंत जोशी काकांच्या निद्रानाशावर जर चार पाच डॉक्टरांनी हात टेकले असतील तिथे मी बापडा काय करू शकणार सांगा ?”

“सांगतो ना ! अरे परवाच वश्याचा फोन आला होता आणि तो माझ्याकडे अगदी रडकुंडीला येवून, त्याच्या निद्रानाशावर काहीतरी उपाय सांग रे असं म्हणत होता ! त्यावर मी बराच विचार करून एक उपाय शोधला आहे, पण त्यासाठी मला तुझी मदत लागेल, म्हणून तुला थांब म्हटलं !”

“असं होय, बोला पंत काय मदत हवी आहे तुम्हाला माझ्याकडून ?”

“मोऱ्या त्या तुमच्या DJ च्या कर्कश्य आवाजावरूनच मला एक उपाय सुचलाय बघ !”

“कोणता?”

“सांगतो ना, अरे त्याची डोंबिवलीची जागा अगदी स्टेशन जवळ, म्हणजे दिवस रात्र ट्रेनचा खडखडाट बरोबर ?”

“बरोबर, मग ?”

“म्हणजे रोज रात्री झोपतांना वश्याला ट्रेनच्या खडखडाटाचे अंगाई गीत ऐकायची सवय आणि ते अंगाई गीत ठाण्यात त्याच्या कानावर पडत नाही, म्हणून वश्याला निद्रानाशाचा विकार जडला असावा असं माझं ठाम मत आहे !”

“मग पंत मी तुम्हाला यात काय मदत करू शकतो ते तर सांगा !”

“मोऱ्या तू मला फक्त एका CD वर, ट्रेनचा भरधाव जायचा आवाज, रेल्वे ट्रॅकच्या खडखडा सकट एखाद दुसऱ्या ट्रेनच्या हॉर्न बरोबर रेकॉर्ड करून दे, बास्स !”

“त्यानं काय होईल पंत ?”

“अरे तोच वश्याच्या निद्रा नाशावर उपाय, कळलं ?”

“नाही पंत !”

“अरे गाढवा, मी वश्याला सांगणार, ही CD घे आणि रात्री झोपतांना हे तुझं अंगाई गीत ऐकत ऐकत सुखाने झोप ! नाही तुला निद्रादेवी प्रसन्न झाली तर नांव बदलीन माझं !”

“धन्य आहे तुमची पंत !”

© प्रमोद वामन वर्तक

ताजा कलम – आपल्यापैकी कोणी नुकतीच स्टेशनं जवळची जागा बदलली असेल आणि वश्या सारखा झोपेचा प्रॉब्लेम आपणास सतावत असेल तर वरील उपाय करून बघायला हरकत नाही !

२२-०४-२०२२

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रावळगाव…अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? विविधा ?

☆रावळगाव…अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

रा व ळ गा व

भारतीय चॉकलेट, गोळ्यांसाठीचा एक मोठा पण तुलनेने थोडा विस्मृतीत गेलेला ब्रॅण्ड म्हणजे रावळगाव. एका पिढीचा शाळेत जायचा कंटाळा सुसह्य़ करण्याचं काम या ब्रॅण्ड्सच्या पानपसंद, मँगो मुड, कॉफी ब्रेक या आणि अशा अनेक चॉकलेट व गोळ्यांनी केलं. त्या ब्रॅण्ड्सची ही कहाणी.

सोलापूर जिल्ह्य़ात जन्माला आलेल्या हिराचंद वालचंद यांना अभ्यासाची फारशी गोडी नव्हती. व्यावसायिक होण्याचं स्वप्न मात्र त्यांना खुणावत राहायचं. वडिलांचा पारंपरिक अडतीचा व्यवसाय सोडून ते आपलं व्यावसायिक नशीब आजमावायला थेट बांधकाम व्यवसायात शिरले. फाटक नावाच्या बांधकाम व्यावसायिकाशी भागीदारीत फाटक-वालचंद बांधकाम व्यवसाय त्यांनी सुरू केला. बार्शी लाइट रेल्वेसह अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. या कामात त्यांना ब्रिटिशांचा दुजाभाव खटकत होता. मर्जीतील ब्रिटिश कंपन्यांना संधी देत भारतीयांना डावलण्याच्या ब्रिटिशनीतीला ठोस उत्तर देण्याची वालचंद यांची इच्छा होती. त्यांनी शेतकी जीवन लहानपणापासून पाहिलं होतं. आणि शेतकी व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर हा शेतीप्रधान भारत देश ब्रिटिशांना पुरून उरेल अशी त्यांची भावना होती. याच भूमिकेतून त्यांनी नाशिक जवळील रावळगाव येथे तब्बल दीड हजार एकर उजाड नापीक जमीन स्वस्तात घेतली. अनेक कृषीतज्ज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, अभियंते यांना हाताशी धरून त्या नापीक जमिनीचं रूपांतर काहीच वर्षांतच उपजाऊ  कसदार जमिनीत झालं. तिथे उसाची लागवड करण्यात आली. १९३३ मध्ये भारतातील पहिला साखर कारखाना रावळगाव येथे उभा राहिला. थोडासा दुर्लक्षित असा तो भाग त्यामुळे रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधांसह विकसित झाला. याच कारखान्याच्या जोरावर १९४० मध्ये रावळगाव चॉकलेट, गोळ्यांचं उत्पादन सुरू झालं. अगदी तसंच शेतकी प्रारूप त्यांनी पुण्याजवळील कळंब इथे राबवलं. ज्या परिसराला सध्या आपण वालचंदनगर म्हणून ओळखतो.

गोळ्या, चॉकलेट यांचं विलक्षण अप्रूप असण्याच्या काळात रावळगाव टॉफीजना लोकप्रियता मिळाली. बदलत्या काळानुसार आपली संस्कृतीही बदलत गेली. वाढदिवस, त्यानिमित्ताने शाळेत गोळ्या वाटणं, घरी जंगी मेजवानी साजरी होणं हे सारं रुजत असताना घाऊक प्रमाणावर चॉकलेट किंवा गोळ्यांची पाकिटं खरेदी करणंही अनिवार्य झालं. ८०/९० च्या दशकातील पिढीला आई-बाबांनी अशाच निमित्ताने घरी आणलेली रावळगाव चॉकलेटची थैली नक्की आठवत असेल. हिरव्या, लाल चकचकीत आवरणातली ती चॉकलेट्स म्हणजे वाढदिवस धमाल साजरा होणार याची ग्वाही असायची. त्या चॉकलेट्सवर विशिष्ट नाव नसायचं तर रावळगाव अशी छान लफ्फेदार अक्षरं असायची. या घाऊक खरेदीबरोबर शाळेजवळच्या दुकानातील हाका मारून बोलावणाऱ्या बरण्यांमध्ये रावळगावचं पानपसंद, मँगो मूड खुणावायचं. महागडी चॉकलेट भेट देऊन मैत्री करण्याचा तो काळ नव्हता. पण खिशातील पानपसंद, मँगो मूडने शाळेतील कितीतरी मैत्रीबंध पक्के केले. खिसा अशक्त असेल तर फक्त स्वत:पुरतं गोळी घेणंही लपून राहायचं नाही. लालभडक झालेली जीभ दगा द्यायची. ‘‘एकटीनेच पानपसंद खाल्लंस ना? आता मी देते का बघ’’ अशा धमक्या मिळायच्या.

रावळगाव हे ब्रॅण्डनेम मनावर ठसण्यात त्यांच्या जाहिरातीचा वाटाही मोठा होता. मँगो मूडच्या जाहिरातीतला तो गवतातला तरुण आणि नंतर पिकल्या मिशीचा आंबा आठवून बघा. पानपसंदच्या जाहिराती हिंदी असल्या तरी मराठी कलाकारांच्या दर्शनाने त्या अधिक जवळच्या वाटत. ‘शादी और तुमसे? कभी नहीं’ असं रागात म्हणणाऱ्या अर्चना जोगळेकर किंवा हातात लाटणं घेऊन ‘देखो मुझे गुस्सा मत दिलाओ, अपनी बिवीपे हुकूम चलाते हो?’ असं खडसावणाऱ्या भारती आचरेकर पडद्यावर दिसत. मग पानपसंद समोर येई. सोबत आवाज ‘पान का स्वाद गजब की मिठास’ आणि तीच वाक्यं लाडेलाडे बोलली जात. या जाहिरातीसुद्धा रावळगाव गोळ्यांइतक्या गोड होत्या.

नंतर अनेक परदेशी कंपन्यांच्या मार्केटिंगचा झंझावात आला आणि आपली ही देशी बनावटीची चॉकलेट्स गोळ्या कुठेतरी मागे पडली. आजही रावळगाव चॉकलेट वितरित होतात पण सध्याची पिढी त्या स्वादापासून अनभिज्ञ आहे. मध्यंतरी एका सर्वेक्षणात कोणती भारतीय चॉकलेट्स परत बाजारात यावीशी वाटतात? या प्रश्नाला अनेकांनी इतर गोळ्यांसह पानपसंद, मँगो मूड हे दिलेलं उत्तर बोलकं आहे.

रावळगाव गोळ्यांची टॅगलाइन आहे, स्वीट स्माइल ऑन मिलीअन्स ऑफ फेसेस. ही टॅगलाइन अनेक अर्थाने खरी होती. गोळ्या, चॉकलेट यांच्या गोडव्यासोबत तुलनेने स्वस्त अशी ही चॉकलेट सर्व थरांतील मंडळींना परवडत.

आज ७८ वर्ष जुना असा हा ब्रॅण्ड काहीसा झाकोळलाय, पण तरीही स्मृतींच्या पडद्यावर त्याच्या आठवणी लख्ख आहेत. लहान वयातील अप्रूप असणारे वाढदिवस, मैत्रीच्या आणाभाका, भांडणांची मिटवामिटवी यांचा हा गोड साक्षीदार म्हणूनच आजही केवळ नावाच्या उच्चाराने चेहऱ्यावर हसू फुलवतो.

– अनामिक (सोर्स व्हाॅटसअप)

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ किती किती रुपे तुझी..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ किती किती रुपे तुझी..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

दिसतं तसं प्रत्येकवेळी असतंच असं नाही याचं ‘किरण’ हा शब्द नेमकं उदाहरण म्हणता येईल.

पहाटप्रहरी मागे रेंगाळणाऱ्या अंधारकणांना हळूवार स्पर्शाने दूर सारत चैतन्याचं शिंपण करीत क्षितिजरेषेवरुन अलगद डोकावून तांबूस पायवाटांवरुन सर्वदूर पसरणारे कोवळे सूर्यकिरण आणि दिवसभराच्या अथक श्रमानंतर विसावू पहाणाऱ्या शरीरमनाला आपल्या शितल स्पर्शाने प्रसन्नचित्त करणारे सुखद चंद्रकिरण ही परस्परभिन्न अशी किरणांची दोन रुपे ! एक चैतन्यदायी ऊर्जास्त्रोत तर दुसरे हळूवार स्पर्शाने शांतवणारे ! तथापी वरवर दिसणाभासणारी ही सर्वप्रिय किरणे एवढीच किरण या शब्दाची परिपूर्ण ओळख म्हणता येणार नाही.

अतिनील किरणे,तसेच शास्त्रज्ञानी अथक प्रयत्नांती शोधलेले ‘क्ष’ किरण अशी किरणांची विस्मित करणारी परस्परवेगळी वैशिष्ट्यपूर्ण रुपे हा सविस्तर विवेचनाचाच विषय आहे.तरीही त्यांचा ओझरता परिचयसुध्दा उद्बोधक ठरेल.

सर्वसाधारण प्रकाशकिरण आपल्या शरीरातून आत प्रवेश करु शकत नाहीत.पण प्रकाशकिरणांच्या परावर्तनावर संशोधन करीत असताना एका जर्मन वैज्ञानिकाला अशा किरणांचा अचानक शोध लागला जी शरीराच्या अंतर्गत भागातसुध्दा  प्रवेश करु शकतात. हे त्याच्या लक्षात आले तेव्हा त्या किरणांचे नेमके नाव माहित नसल्याने त्या किरणांना त्याने ‘क्ष’ हे नाव दिले.X Ray हे या X Radiation चेच लघुरुप.पुढे त्यावरील अनेक प्रयोगांदरम्यान या X Radiation ची शरीराच्या आत प्रवेश करुन आतील शरीराच्या नेमक्या भागाची छायाचित्रे घेऊ शकण्याची आश्चर्यकारक क्षमता लक्षात येताच वैद्यकीय निदान आणि उपचारांसाठीच्या उपयोगितेसाठी संशोधनाची द्वारे  खुली होऊ शकली .त्याचे फलितआज आपण अनुभवतो आहोतच.या क्ष किरणांची अतिशय मर्यादित मात्रा शरीरांतर्गत छायांकनासाठी पुरेशी असते.मात्र याच किरणांची जास्त प्रमाणातली विध्वंसक मात्रा (गरजेनुसार कमी-जास्त) कॅन्सर वरील रेडिएशन ट्रीटमेंटमधे देण्यात येते.त्यामुळेच त्याचे होणारे साईड-इफेक्ट्सही लक्षणीय असतात.

अतिनील किरणे ही सुर्यप्रकाशात आढळणारी किरणे.यांचं सुर्यप्रकाशातील प्रमाण अत्यल्प असलं तरी हानीकारकता मात्र प्रचंड असते. वायुपटलावरील ओझोनच्या थरामुळे अतिनील किरणांना थोपवून धरले जाते.वाढत्या प्रदुषणामुळे ओझोनचा थर विरळ होत गेल्याने सजीवांच्या जीवाला निर्माण होऊ पहाणारा अतिनील किरणांचा धोका हा पर्यावरणाच्या दृष्टीने आजचा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे.

हे अतिनील किरण हानीकारक जसे तसेच उपयोगीही.याच किरणांचा वापर पाणी शुध्दीकरण आणि हवा शुध्दीकरण उपकरणांमध्ये केला जातो.

साधारणत: सूर्याची     प्रकाशकिरणे आपल्या शरीरावयवात प्रवेश करु शकत नाहीत या नियमाला एकमेव अपवाद म्हणजे आपले डोळे.आपल्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी पापण्या आणि भुवयांची निसर्ग योजना असली तरी डोळ्यांची ही सुरक्षाकवचे अतिनील किरणांना थोपवू शकत नाहीत.त्यामुळेच डोळ्यांच्या आरोग्याची विशेषतः उन्हाळ्यात जास्त काळजी घेणे हितकारक असते.

किरणांचा ‘उत्सव’ ही एरवी कवीकल्पनाच वाटली असती.पण वास्तुशिल्पकलेतील कल्पकतेने साकारलेला चमत्कार ठरलेला हा ‘किरणोत्सव’ याची देही याची डोळा पहाण्याचे भाग्य मिळते ते करवीर निवासिनी ‘श्री महालक्ष्मी मंदिरा’त !

आपलं शरीरस्वास्थ्य बव्हंशी आपल्या मन:स्वास्थ्यावर अवलंबून असते.सतत दडपणाखाली अस्वस्थ असणाऱ्या मनोवस्थेचा परिणाम शरीरावरही होत असतोच. अस्वस्थ मनातील हा नैराश्याचा अंधार एखाद्या आशेच्या किरणाच्या ओझरत्या स्पर्शानेही नाहीसा होऊ शकतो खरा पण त्या किरणांच्या आपल्या मनातील मुक्त प्रवेशासाठी आपण आपल्या मनाची कवाडे मात्र खुली ठेवायला हवीत !

किरणांची ही विविध रंगरुपे आश्चर्य वाटावीत अशीच.ती पाहून वाटणारं आश्चर्यच मनात उमटणाऱ्या ‘ किती किती रूपे तुझी ‘ या आश्चर्योद्गारांत प्रतिबिंबित होत रहाते !

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 13 – संगीत -२ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 13 – संगीत -२ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

नरेंद्र शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सर्वात आधी वेणी माधव अधिकारी यांच्याकडे जाऊ लागला आणि दुसरे गुरु होते उस्ताद अहमद खां. दोघांकडेही काही दिवस शिक्षण घेतले. हिन्दी, उर्दू आणि पर्शियन भाषेतली अनेक भक्तीगीतं शिकला. या बरोबरच शास्त्र पठण, सुरू होते, चीजांचा संग्रह व सरगम तयार करणे हे शिक्षण सुद्धा एकीकडे चालू होते.

गायना बरोबर नरेंद्र वादन पण शिकत होता. यातले वादन गुरु त्याचे सख्खे चुलत भाऊ अमृतलाल उर्फ हाबू दत्त होते. त्यांचे कलकत्त्यात संगीत विद्यालय होते. या विद्यालयात जागतिक किर्तीचे उस्ताद अल्लाउद्दीन खांसाहेब यांनीही सुरूवातीला सतार व सरोद वादनाचे शिक्षण अमृतलाल यांचे कडून घेतले होते असा उल्लेख आहे. यांच्याकडे नरेंद्राने सतार, पखावज आणि तबला वादनाचे धडे घेतले. गायन आणि तबला वादनात त्याने चांगले कसब कमावले होते. अगाध संपदा मिळवली होती. कुटुंबात आणि परिचयात, मित्रांमध्ये एव्हाना चांगली माहिती झाली होती की, नरेंद्र खूप छान गातो.

१८८१ मध्ये जेंव्हा नरेंद्र आणि श्री रामकृष्ण परमहंस यांची पहिली भेट झाल्याची घटना अशी, नरेंद्रच्या शेजारच्या गल्लीत, शिमला स्ट्रीटवर सुरेन्द्र बाबू राहत होते. त्यांनी एक दिवस अचानक तातडीने नरेंद्रला घरी बोलावलं. त्यांच्या कडे परमहंस आले होते. त्यांना ठाकुर म्हणत असत. ठाकूरांना गायन अत्यंत प्रिय होते. त्यांना एक दोन गीतं तरी नरेंद्र ने  ऐकवावीत, यासाठी नरेंद्रला बोलावले होते. तेंव्हा नरेंद्रने मल्हार रागातलं एकतालातलं , अयोध्यानाथ पाकडाशी यांची रचना ‘मन चलो नीज निकेतने…’ आणि मुलतानी रागातलं, एकतालातलं, बेचरम चट्टोपाध्याय यांची रचना, ‘जाबे की हे दिन आमार बिफले चालीये…’ ही दोन गीतं त्याने ऐकवली. पुढे प्रत्येक भेटीत श्री रामकृष्ण नरेंद्रला गायचा आग्रह करत असत. तो गाणी, भजन, कीर्तन त्यांना ऐकवीत असे.

तानपुरा सुरांत लावल्याशिवाय  नरेंद्र कधीही गाणं सुरू करत नसे. मनाचे समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तारा जुळवित असे. कधी कधी त्यात खूप वेळही जात असे. बाकीचे अस्वस्थ होऊन जात. एकदा तर अशा वेळी परमहंस इतके ऊतावीळ झाले की, ते दर दोन मिनिटांनी नरेंद्रला गायन सुरू करण्याचा आग्रह करु लागले.तानपुरा लागेपर्यंत नरेंद्र कोणाचेच ऐकत नसे. अगदी गुरूंचे सुद्धा. एकदा तानपुरा लगेच न मनासारखं तेंव्हा नातरेन्द्र हताश होऊन, ढीम्म बसून होता. गायन ऐकण्यास व्याकुळ झालेले परमहंस शेवटी, शिष्यांना म्हणाले. “उठा आता, आजचा दिवस तंबोरा जुळणीचा आहे. गाणं उद्या होईल”. असे इतके ते नरेंद्रला ऐकण्यासाठी आतुर झालेले असत.

नरेंद्रचा आणखी एक गुण ,म्हणजे  काव्य रचना करणे. बंगाली, संस्कृत आणि इंग्रजीत त्यांनी भावपूर्ण कविता रचल्या आहेत. ‘विरवाणी’  या पुस्तिकेत त्या संग्रहीत आहेत. त्याचे अनेक भाषांमधून भाषांतर पण झाले आहे. याशिवाय त्यांनी सहा बंगाली गीतं पण रचली. त्याला चाली लावल्या आहेत. ध्रुपद गातांना ते स्वताच पखावज वाजवित.  कवी आणि संगीतकार असून सुद्धा पुढच्या कार्यबाहुल्यात वेळे अभावी संगीताकडे त्यांचे दुर्लक्ष झालेले दिसते.

तरी पण गायन वादनातले आणि संगीत शास्त्रातले ते कसे मर्मज्ञ अधिकारी होते हे त्यांच्या ‘संगीत कल्पतरू’ या शास्त्रीय ग्रंथावरून दिसते. १८८७ मध्ये चंडीचरण बसक यांनी हे पुस्तक बंगालीत  प्रकाशीत केलं आहे. हे जवळ जवळ संपूर्ण नरेंन्द्रने लिहिले आहे काही भाग चंडीचरण यांनी लिहून पूर्ण केला आहे. नव्वद पानांचे नरेंद्रचे प्रास्ताविक त्याला आहे. ही तेवीसाव्या वर्षी लिहिलेली, सर्वांनी चकित व्हावी अशी प्रस्तावना आहे. स्वता आर्थिक दृष्ट्या अडचणीत असताना गरीब प्रकाशकाला काहीतरी आर्थिक सहाय्य व्हावे या हेतूने हे पुस्तक लिहिल्याचे सांगितले जाते.

या पुस्तकात , भारतीय परंपरेतील मौखिक संगीत आणि वाद्य संगीत यांच्या मागील असलेला शास्त्रीय दृष्टीकोन व त्याची विविध अंगे यात स्पष्ट केली आहेत. संगीतातील सिद्धांताचे विवेचन आणि गायनाच्या मैफिलीतील सौंदर्याचा अविष्कार याचे दर्शन यात होते. तसेच विविध भारतीय भाषातील, प्राचीन, आधुनिक आणि पाश्चात्य संगीत, वाद्य, कवी यांची माहिती आहे. एक हजार भक्तिपर आणि स्फूर्ति गीतांचा संग्रह यात आहे.

संगीताचार्य रामकृष्णबुवा वझे यांनी स्वामी विवेकानंदांकडून काही दिवस गायकीचे धडे घेतले होते. परिव्राजक म्हणून नेपाळ इथे गेले असताना स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण बुवा वझे यांची भेट झाली.त्यांना पंधरा दिवसांचा स्वामीजींचा सहवास लाभला होता. वझे बुवा तेंव्हा नेपाळच्या दरबारात राजदरबारी होते. तिथे त्यांच्याकडून काही चीजा बुवा शिकले होते.

एकदा स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या अमेरिकन युवतीला लिहीलेल्या पत्रात,ते म्हणतात,  “संगीत ही एक सर्वश्रेष्ठ कला आहे आणि ज्यांना समजू शकते त्यांच्या दृष्टीने ईश्वराची पूजा करण्याचा तो सर्वोत्कृष्ट प्रकार आहे”.                                                                                                                                                                                                  

नरेंन्द्रचे संगीतावरचे प्रेम आणि त्यावर असलेलं प्रभुत्व पाहून, ‘जर श्रीरामकृष्णांची भेट झाली नसती तर नरेंद्र एक उत्कृष्ठ गायक म्हणून कीर्तीमंत झाला असता’ असे सर्वांचे मत होते.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी करवली उमेची..! ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

?विविधा ?

🍃 मी करवली उमेची..! 🍃 सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

`गुढीपाडव्याची म्हणजे नववर्षाच्या प्रथम दिनाची तयारी करत असतांनाच नेहमीच माझ्या मनात वाजंत्री वाजू लागतात. कशाची म्हणाल तर, माझ्या बहिणीच्यालग्नाची.. . उमेची.. . श्रीपार्वतीदेवीच्या लग्नाची.. ! कारण पण मी करवली आहे तिची.

साताऱ्या जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर हे माझं माहेरचं मूळ गांव. शिव पार्वती हे माझ्या माहेरचे कुलदैवत. उंच डोंगरावर, भक्कम, दगडांच, हेमाडपंथी, सुरेख गोपुरे,उंच शिखर, कळस,असं शिल्पाकृतींनी नटलेलं महादेवाचं मंदिर हे वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना आहे. गाभा-यात शिवपार्वतीच्या दोन शाळुंका (पिंडी)आहेत. सभामंडपातील खांब व मूर्ती सुरेख आहेत. डोंगरउतारावरअमृतेश्वर,मंदिरआहे. ,आजूबाजूला उतारावरच गाव वसलं आहे.

माझं माहेरचं आडनाव जिराईतखाने. पार्वती कडून मानकरी. तेथील बडवे पुजारी हे शंकराकडून मानकरी जंगम म्हणजे शैव.. हेही  देवस्थानच्या मानकऱ्यांपैकी एक. चैत्र शुद्ध पंचमीला शिवपार्वती ला लग्नाच्या हळदी लागतात याच रात्री वाड्यावर ताशा वाजंत्री शिंग फुंकत देवस्थानचे सेवेकरी भालदार चोपदार गावातील प्रतिष्ठित हळदीच मानाच बोलावं पण करण्यासाठी आमच्या वाड्यावर येत. मग पुरुष मंडळी सर्वांसह देवळाकडे निघत. हे सर्व अनुभवताना आनंद भक्तिनं मनं भरून येतात.  लहानपणी मी आमच्या दादांना (वडिलांना) सोवळं नेसून असं मानानं जाताना, त्यांच्या चेहऱ्यावर भक्ती मिश्रित तेज पाहिलं आहे. हळद लावण्याचा पहिला मान आमचा नंतर मानाप्रमाणे सर्वजण व भक्तगण हळद लावतात. सगळीकडे `हर हर महादेव ʼचा गजर होत असतो. ही वेळ रात्री बाराची. भक्तगण नुसते पळत ही वेळ गाठतात यानंतर रोज  धार्मिक विधी असतात. मुख्य मंदिर ते अमृतेश्वर मंदिर यांच्या कळसाला हात मागाचा कापडी शेला दोन टोकांनी दोन बाजूंनी बांधतात. त्याला ध्वज असे म्हणतात. ध्वज विणणारा एक मानकरी आहे  रात्रीच्या वेळी ध्वज खाली न टेकवता भक्तीभावाने कुशलतेने करतात. चैत्र शुद्ध अष्टमीला रात्री बारा वाजता शिवपार्वती चे लग्न लागतं. मुलीचे बाजू असूनही आमच्या घराण्याला मान आहे. सारीपाटात हरल्यावर शंकर रुसून या डोंगरावर आले तेव्हा भिल्लिणीच्या रुपात आलेल्या पार्वतीवर, शंकरांनी मोहित होऊन त्यांनी तिला लग्नाची मागणी घातली पार्वतीने बरेच आढेवेढे घेतले अशी आख्ययिका आहे. यामुळे कदाचित तिची बाजू मानाची असावी. आम्हाला तो मान मिळाला नाहीतर वधू पक्षाला एवढा कुठला हो मान?

नवमीला भंडारा असतो त्यावेळी पंक्तीत उदक सोडण्याचा मान असतो. दशमीला कवडी घराण्याचा पुरुष घोड्यावरुन तळ्यापासून सर्व दगडी ,पायर्‍यांना कमानी ना पार करून देवदर्शनाला जातो त्यालाही भालदार चोपदारांचा मानअसतो. एकादशीला सासवडहूनʼ तेल्या भुत्याʼ आडनावाच्या भक्तांची,कावड येते. प्रचंड मोठी जडशीळ कावड आणि त्याला मोठी भगवी निशाण आणि पाण्यानं भरलेलं तांब्यांचे मोठे रांजण भक्तीभावाने चिंब होऊन वाटेत कुठेही न टेकवता अखंड चालत हे भक्त मुंगी घाटातून वर मंदिरात येतात खडकाळ डोंगराचा उंच,  खडा कडाच,भक्तीची परीक्षा घेतो असं वाटतं. वाटेत, सावलीला झाड नाही. भर उन्हाचा चटका, अशा स्थितीत खांद्यावर कावड घेऊन येणं केवळ अवघडच. तोंडानं अखंडʼ हर हर महादेव `ही गर्जना ,धावाही अन् असह्य झालं कि,चक्क`  महाद्या`अशा आपुलकिच्या-हक्काच्या आरोळ्याही. !भक्तांची सगळी जत्रा दिवसभर उन्हातान्हात त्या डोंगर माथ्यावर जमलेली असते सायंकाळी महादेवावर कावडीतल्या,पाण्याचा अभिषेक होतो.

लाखांच्या संख्येनं भक्त दर्शनासाठी धावतात शिवपार्वतीच्या लग्नाच्या वेळी पिंडीवर चांदीचे सुरेख मुखवटे चढवून मुंडावळ्या बांधतात. बाहेरच्या पटांगणात बाजूला होम हवन होतं. पालखी फिरवतात सगळीकडे आनंदाचा ,भक्तीचा जल्लोष आणि `हर हर महादेव ʼची देवाला हाक. ! हा आनंद सोहळा मी लग्नानंतर एकदाच अनुभवला. त्याला आता साठ वर्ष पूर्ण झाली. इतर जत्रा आणि प्रमाणे इथंही दुकान ,सिनेमा इत्यादींची रेलचेल असते. पण आम्हाला पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या विवाह सोहळ्याचं अप्रूप! माझे आजोबा व नंतर आमचे वडील दादा त्यावेळी आवर्जून जात असत. पण सेवानिवृत्तीनंतर व वयोमानाने त्यांना नंतर जमत नसे आता तेथील नातेवाईक यात सहभागी होतात. कधी भाऊही जातात. शिंगणापूर प्रमाणेच माहेर घरी,घाणा भरणे,हळद दळणे,फराळाचे लाडू,इ. पदार्थ, रुखवताचे, डाळं,-शेंगादाणे-चुरमु-याचे लाडू,देवाला हळद लावणे,लग्न असा सोहळा होत असे. भाऊही करतात. म्हणूनच म्हटलं.. “मी करवली आहे, उमेची.. !

©  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ऐसे दास्यत्व पत्करावे ! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?विविधा ?

☆ ऐसे दास्यत्व पत्करावे ! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

ऐसे दास्यत्व पत्करावे !

हनुमान म्हणजे रामरायाचा दास! प्रभुरामाच्या चरणी अगदी लीनतेनं बसणारा… आज्ञाधारक, बुद्धिमान, चपळ, साहसी अशी अनेक विशेषणं ल्यायलेला… याच हनुमानाची एक गोष्ट ऐकली जिनं त्याचं महत्त्व माझ्या मनावर बिंबवलं, त्याच्या उपासनेसाठी प्रवृत्त केलं. कीर्तनकार बुवा म्हणाले … हनुमानचं कर्तृत्व इतकं मोठं की त्यानं लक्ष्मणाप्रमाणेच रामाच्या शेजारी असायला हवं. तरीही तो पायाशीच… का… तर दास म्हणून नव्हे; प्रभुश्रीराम म्हणतात की जो कुणी माझ्याकडे मागणं किंवा गाऱ्हाणं सांगताना नतमस्तक होईल. त्याची नजर आधी माझ्या पायाशी असणाऱ्या या धर्मवीर, कर्तव्यदक्ष हनुमंताकडे जाईल. त्यानं हनुमंताची आराधना करावी. तोच तुमचं मागणं मनोवेगे माझ्यापर्यंत पोहोचवेल. दुसऱ्याच्या दुखाःशी समरस होण्यासाठीची भावोत्कटता हनुमानाजवळ प्रचंड आहे. त्यामुळे शक्य झालं तर तोच तुमचं मागणं पूर्ण करेल.’ हे ऐकताच मन हनुमाच्या विचारांत गुरफटलं… खुद्द रामानेच असं म्हणल्यावर हनुमानाशी जरा जास्तच गट्टी झाली.

दास्यत्व पत्करणं या शब्दाला आपल्याकडे एका संकुचित दृष्टीकोनातूनच पाहिलं जातं. पण मनुष्याच्या प्रगतीसाठी दास्यत्व किती महत्त्वाचं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हनुमानासारखं अद्वितीय उदाहरण नाही. 

पुढे कळतेपणी या सगळ्याबद्दल वेगळीच जाणीव झाली. हेच राम आणि हनुमंत वेगवेगळ्या रूपांत दिसू लागले. ‘मन’ म्हणजे हनुमंत आणि ‘बुद्धी’ म्हणजे राम. थोडक्यात बुद्धीपुढं मनानं नतमस्तक व्हावं. कुणीही कितीही नाकारलं तरी आपल्या मनाचे आपण दास असतो हे शंभर टक्के खरं. बुद्धी नेहमी योग्य-अयोग्य जाणून आपल्याला तसा सल्ला देते पण मन… वाहवत जातं… बुद्धीला आततायीपणानं प्रत्युत्तर देतं आणि पस्तावतं. या पस्तावणाऱ्या मनानं हनुमानाचा आदर्श ठेवावा. बुद्धीरुपी रामाचं वेळीच महात्म्य जाणावं. मन चंचल पण सामर्थ्यवान… तर बुद्धी सखोल पण अविचल… आणि जेव्हा या दोन्ही परस्परपूरक गोष्टी एकत्र येऊन काही कार्य घडतं तेव्हा हमखास यश मिळतंच.

अलीकडे तर मन आणि बुद्धी यांची फारच ताटातूट होत आहे. भवताल अस्वस्थ… अनपेक्षित घटनांनी भरलेला… त्यावर कसं व्यक्त व्हावं, त्याच्याशी कसा सामना करावा हे कळणं आकलनापलीकडलं. त्यामुळे मनाची चंचलता इतकी वाढली की बुद्धीलाही भ्रम व्हावा. अशावेळी मनानं दास्यत्व पत्करावं. स्वतःच्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेवून तिला सहकार्य करावं. कारण संकट येतं ते मनाच्या कमकुवतपणामुळे आणि परतवलं जातं तेही मन कणखर झाल्यावरच. जिथं राम आणि हनुमान एक होऊन लढतात तिथं संकट एकटं असो की दशमुखी त्याचा नाश होणारच. म्हणूनच या भवतालातून तारून जाण्यासाठी हनुमानाची उपासना करावी. कारण जिथं रावण नसेल तिथं प्रभूराम असेलच असं नाही पण जिथं भक्त हनुमान असेल तिथं प्रभूराम असणारच.

मनोजवं मारुततुल्यवेगं । जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।

वातात्मजं वानरयुथमुख्यं । श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘महाकवी गुणाढ्यआणि त्याची बड्डकहा ‘. भाग २ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

?विविधा ?

 ☆ ‘महाकवी गुणाढ्यआणि त्याची बड्डकहा ‘. भाग २ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(शर्ववर्मा मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला,” महाराज मी तुम्हाला सहा महिन्यात संस्कृत व्याकरण शिकवू शकेन. “) आता पुढे….

गुणाढ्याला ही गोष्ट अशक्य वाटली. त्याने मोठ्या हिरीरीने पैज लावली, “शर्ववर्माने जर  सहा महिन्यात राजाला संस्कृत व्याकरण शिकवून दाखवले  तर मी संस्कृत,पाली प्राकृत या तिन्ही भाषांचा त्याग करेन. “त्याच्या पैजेला उत्तर म्हणून शर्ववर्मा म्हणाला,”जर मी असे करू शकलो नाही तर पुढची बारा वर्षे डोक्यावर तुझ्या पादुका धारण करून वावरेन. “

….आता पैज जिंकणे ही मोठ्या प्रतिष्ठेची बाब झाली. शर्ववर्मा कुमारस्वामींकडून कातंत्र व्याकरण शिकला होता. हेच ते रोजच्या बोलचालीत उपयोगी पडणारे व्यावहारिक  व्याकरण… त्याच्या सहाय्याने त्याने खरोखरच सहा महिन्यात राजाला असे व्याकरण शिकवले की राजाला यापुढे कोणासमोरही बोलताना लज्जित व्हावे लागणार नव्हते.  

राजाचाआनंद गगनात मावेनासा झाला. खूप धनदौलत देऊन त्याने  शर्ववर्माची पूजा केली आणि त्याला नर्मदा तटावरील भृगुकच्छ (भडोच)देशाचा राजा घोषित केले.

मात्र जलक्रीडा प्रसंग… आणि ओघाने आलेला हा पैजेत हरण्याचा प्रसंग… दोन्हीही गुणाढ्याच्या पुढील आयुष्याला कलाटणी देणारे ठरले.त्यामुळे त्याच्या जीवनाची दशा आणि दिशाच बदलून गेली. त्याचा वाईट काळ सुरू झाला. कबूल केल्याप्रमाणे त्याने संस्कृत, पाली,प्राकृत भाषेचा त्याग केला. मौन धारण करून विंध्य पर्वतावर जाऊन   त्याने देवी विंध्यवासिनीच्या पूजाअर्चनेत स्वतःला गुंतवून घेतले. कालांतराने तेथील वन-वासीयांकडून तो पैशाची भाषा शिकला. पैशाची भाषा हा प्राकृत भाषेचा उपभेद होता.

गुणाढ्याने तेथे बड्डकहेची (बृहत्कथा)रचना केली. सात वर्षात अथक प्रयास करून सात लाख छंदात त्याने ती लिहून काढली. तीही पैशाची भाषेत! त्यामुळे ती बृहत्कथे ऐवजी बड्डकहा!

विंध्याद्रीच्या घनदाट अरण्यात शाई किंवा भुजपत्र उपलब्ध नव्हते. त्यामुळे मनस्वी गुणाढ्याने मृतप्राण्यांच्या कातड्यावर स्वतःच्या रक्ताची शाई करून ही विशाल कथा लिहिली. लिहिता लिहिता गुणाढ्य ती वाचत असे. ती ऐकण्यासारखी तेथे सिद्ध विद्याधरांचा मेळावा जमा होई. त्यातील गुणदेव आणि नंदी देव हे दोघे त्याचे शिष्य झाले. सात वर्षांनी जेव्हा बृहत्कथा लिहून पूर्ण झाली तेव्हा त्याचा प्रचार प्रसार कसा करावा हा प्रश्न गुणाढ्याला भेडसावत होता. त्याच्या शिष्यांच्या मतानुसार फक्त सातवाहन नरेश सारखा योग्य व्यक्तीच या कथेचा प्रसार करू शकला असता. त्यालाही हा सल्ला आवडला. त्याप्रमाणे दोघे शिष्य राजधानीत राजदरबारी जाऊन पोहोचले. त्यांनी गुणाढ्याच्या कृतीवर सविस्तर माहिती पुरवली. पण सात लाख श्लोकांची इतकी मोठी पोथी… पोथी नव्हे पोथाच….तोही  प्राण्यांच्या कातड्यावर … निरस अशा पैशाची भाषेत आणि मनुष्याच्या रक्ताने लिहिलेला!राजाने त्या कृतीकडे पाहण्याचे ही टाळले. अपमान करून त्याने गुणाढ्याच्या शिष्यांना परत पाठवले.

या प्रकारामुळे कवी गुणाढ्य अतिशय दुःखी झाला. जवळच्या एका टेकडीवर त्याने अग्निकुंड तयार केले.उंच उंच उठणाऱ्या ज्वालात आपल्या महान कलाकृतीचे एकेक पान वाचून तो अर्पण करत गेला. त्या श्लोक पठणात इतके  माधुर्य होते की अवतीभोवती वनात राहणारे प्राणी,पशू-पक्षी जमा झाले. एकेक पान अग्निकुंडात जळून जात होते… शिष्य डोळ्यात पाणी आणून हे दृश्य बघत होते ….पशुपक्षी खाण्यापिण्याची शुद्ध हरपून स्तब्ध होऊन डोळ्यात पाणी आणून बृहत्कथा श्रवण करत होते.

इकडे राजवाड्यात सामिष भोजनासाठी चांगले मास उपलब्ध होईना. कारण सारे पशुपक्षी निराहार राहिल्याने हाडे-काडे होऊन गेले होते. त्याचे कारण जाणून घेण्यासाठी विचारपूस, तपास सुरू झाला. त्यामुळे राजाला गुणाढ्य करीत असलेल्या काव्य-कथा हवनाची माहिती मिळाली. राजदरबारात घडलेला प्रकार राजाला आठवला. त्याला पश्चाताप झाला.

आपली चूक सुधारण्यासाठी तो ताबडतोब अरण्यात गेला. त्याला काहीही करून गुणाढ्याला व बड्डकहेला वाचवायचे होते. राजाने साष्टांग दंडवत घालून त्याची माफी मागितली. खूप अनुनय विनवण्यानंतर गुणाढ्याने आपले लेखन अग्नीत अर्पण करायचे थांबवले. पण….तोपर्यंत कथेचा एक सप्तमांश भाग….एक लाख श्लोकच शिल्लक राहिले होते.राजा त्याच्या प्रसार,प्रचाराचे आश्वासन देऊन त्याला त्याच्या अमूल्य वाड़मयाला सन्मानपूर्वक

 आपल्या राजधानीत घेऊन आला.

क्रमशः…

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘महाकवी गुणाढ्यआणि त्याची बड्डकहा ‘. भाग १ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

?विविधा ?

 ☆ ‘महाकवी गुणाढ्यआणि त्याची बड्डकहा ‘. भाग १ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

इसवी सन पूर्व दोनशे ते तीनशे असा कालखंड … त्यावेळी विंध्य पर्वताच्या दक्षिणेस म्हणजेच साधारण हल्लीचा गुजरात, दक्षिण मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा भाग….त्या काळात तेथे सातवाहन वंशाचे राज्य होते. तर त्यापैकी एका सातवाहन राजाच्या कारकिर्दीत घडलेली ही कहाणी आहे. प्रतिष्ठान( पैठण)प्रदेशात एक छोटेसे गाव होते सुप्रतिष्ठित….तेथे सोमनाथ शर्मा नावाचे एक विद्वान पंडित राहत असत. त्यांचा नातू म्हणजेच गुणाढ्य… तो लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान होता.दक्षिणापथ येथे विद्या प्राप्त करून तो आपल्या गावी परतला. या प्रतिभावान विद्वान तरुणाला सातवाहन नरेशाने मंत्रिपद बहाल केले.

असेच एकदा सातवाहन राजा आपल्या राण्यांबरोबर राजमहालाशेजारी असलेल्या वापीवर (मोठी विहीर) जलक्रीडा करीत होता. एक राणी त्याने उडवलेल्या पाण्याच्या माऱ्याने त्रासुन गेली होती. ती एकदम राजाला म्हणाली,

“मोदकैस्ताडय!”

राजाने ह्या संस्कृत वाक्याचा अर्थ केला होता की मला मोदकांनी( लाडूंनी) मारा. त्यामुळे त्याने ताबडतोब खूप सगळे लाडू आणण्याचा आदेश  सेविकांना दिला. हे बघून ती राणी हसली आणि म्हणाली,” राजन् येथे जलक्रीडेत लाडूंचे काय काम? मी म्हणाले होते ‘मा उदकैःताडय’ म्हणजेच माझ्यावर पाणी मारू नका… आपणास तर संस्कृत व्याकरणातील संधीचे नियम सुद्धा येत नाहीत. शिवाय आपण परिस्थितीचा अंदाज घेऊन माझ्या वाक्याचा अर्थ पण लावू शकला नाहीत”. ती राणी संस्कृत पारंगत विदुषी होती. तिने राजाला बरेच काही ऐकवले. ते ऐकून बाकीच्या राण्या पण हसू लागल्या. राजा एकदम लज्जीत झाला. पाण्यातून चुपचाप बाहेर येऊन तो आपल्या महालात निघून गेला. ही गोष्ट त्याच्या जिव्हारी लागली होती. तो एकदम मौन झाला. त्याने ठरवले जर संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवता आले नाही तर तो प्राणत्याग करेल. त्या नंतर राजाने दरबारात जायचे सोडले. इतरांशी बोलणे सोडले.इतकेच काय तो त्या दिवशी जेवला नाही की झोपला नाही.

दुसऱ्या एका शर्ववर्मा नावाच्या मंत्र्यांकडून गुणढ्याला ही हकिकत समजली. राजाचा झालेला अपमान..त्याची पूर्वीपासूनच संस्कृत शिकण्याची असलेली इच्छा याबाबत सर्व समजले. त्यानंतर तो व शर्ववर्मा  योग्य वेळ पाहून राजाला भेटायला गेले. दोघे राजाला बोलते करण्याचा प्रयत्न करू लागले. राजाचा उदास चेहरा पाहून शर्ववर्मा खोटे-खोटे त्याला स्वतःला पहाटेच्यावेळी पडलेले स्वप्न सांगू लागला. त्याच्या स्वप्नात आकाशातून पृथ्वीवर आलेले कमळ… त्याच्या पाकळ्यांना स्पर्श करणारा देव कुमार….त्या स्पर्शाने उमललेल्या कमळातून प्रकट झालेली साक्षात सरस्वती माता ….आणि राजाच्या मुखात शिरून तिने तेथे केलेले वास्तव्य… असे बरेच काही होते. त्याच्या या स्वप्नावर राजाचा विश्वास बसला नाही. पण तो बोलता झाला. म्हणाला,” मी मोठ्या प्रदेशाचा नरेश आहे. अपार धन संपत्ती माझ्याकडे आहे. पण विद्येशिवाय लक्ष्मीला शोभा नसते.” गुणाढ्याकडे वळून तो म्हणाला, “एखादी व्यक्ती परिश्रमपूर्वक किती दिवसात मला व्याकरणासहित संस्कृत शिकू शकेल?”

गुणाढ्य म्हणाला,” राजन्, व्याकरण म्हणजे भाषेचा आरसा… नियमित अभ्यास केला तरी व्याकरण शिकायला बारा वर्षे लागतात. पण मी तुम्हाला सहा वर्षात संपूर्ण व्याकरण शिकवेन. “गुणाढ्य  कोणत्या प्रसंगामुळे राजाला शुद्ध संस्कृत शिकायची तीव्र इच्छा झाली आहे हे ताडू शकला नाही. त्याला ही जाणिव झाली नाही की राजाला महापंडित व्हायचे नाहीय तर फक्त व्यवहारात बोलताना उपयोगी पडेल इतपत संस्कृत भाषेचे व्याकरण शिकायचे आहे. शर्ववर्माच्या मनात तसाही गुणाढ्याबद्दल द्वेष होताच, त्यात ही आयती चालून आलेली संधी!….मोठ्या आत्मविश्वासाने तो म्हणाला, “महाराज मी आपल्याला सहा महिन्यात व्याकरण शिकवू शकतो. “

क्रमशः…

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फाटकी झोळी…  ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ फाटकी झोळी… ☆ श्री अरविंद लिमये ☆

आजवरच्या इतिहासात अनेक समाजसुधारकांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी जनजागृतीचे व्रत स्वीकारले.सामान्य माणसावर नकळत होणारे अन्याय नाहीसे होऊन त्याचे जगणे अधिक डोळस आणि सुखकर व्हावे यासाठी त्यांचा अविरत संघर्ष सुरू असायचा.

संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम ही सलग चार शतकांच्या प्रदीर्घ काळात महाराष्ट्राला लाभलेली संतपरंपरा ! या मांदियाळीतील प्रत्येक संतमहात्म्याचे आयुष्य प्रचंड विरोध, त्याग आणि संघर्ष यांनी व्यापलेले होते. सकल जनांना निखळ समाधानाचा मार्ग प्राप्त व्हावा यासाठी ते सातत्याने जनजागृती करीत राहिले.

भारतीय संस्कृतीला अपेक्षित असणाऱ्या मूल्यांचे रोपण समाजमनात करीत, त्यांच्या उन्नतीसाठी जनजागृती करीत या थोर व्यक्तींनी आपली उभी आयुष्यं खर्ची घातलेली आहेत. तरीही ‘खऱ्या अर्थाने जागृती झाली आहे असे म्हणता येईल का?’ हा प्रश्न पडावा अशीच परिस्थिती आजही सभोवताली दिसून येते. अंधाराचे स्वरूप बदलले तरी भोवताली मिट्ट काळोखच असावा अशीच परिस्थिती आजही भोवताली दिसून येतेच.

तेराव्या शतकापासून आजच्या बाविसाव्या शतकापर्यंत प्रदीर्घ काळ उलटून गेल्यानंतरही सर्व संतमहात्म्यांच्या जनजागृती करणाऱ्या अभंग-रचना आणि मौलिक ग्रंथ भांडार अनेक पिढ्या प्राणपणाने जपणारे आपण खऱ्या अर्थाने जागृत झालेलो आहोत कां?की अजूनही आर्थिक न् भौतिक स्तर उंचावूनही समाजमन सुप्तावस्थेतच राहिले आहे ? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे उत्साहवर्धक असणे शक्यच नाही ही वस्तुस्थिती आहे.यात दोष नेमका कुणाचा? जनजागृतीचं अखंड व्रत प्राणपणाने जपत भरभरु‌न देणाऱ्या संतमहात्म्यांचा की ते दान घेणारी आपली झोळीच फाटकी असणाऱ्या समाजमनाचा ??

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares