सुश्री त्रिशला शहा
परिचय
नँशनल असोसिएशन फाँर दि ब्लाईंड या संस्थेच्या सभासद. अंधांचे बचतगट १० वर्षांपासून चालवितात. महाराष्ट्रातील पहिला प्रयोग म्हणून याला मान्यता मिळाली आहे. स्वतः अंशतः अंध. अपंग सेवा केंद्र, सांगली व सांगली महापालिका या दोन्ही चे ‘प्रेरणा पुरस्कार’ मिळाले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा सांगली यामध्ये सक्रिय कार्यकर्ती म्हणून काम.
चमत्कारामागील विज्ञान यासाठी ‘हसत खेळत विज्ञान’ या नाटयप्रयोगात अभिनय, तसेच चळवळीची गाणी म्हणणे, इतरही अनेक कामे या समितीतर्फे केली जातात. जटानिर्मुलन, सत्यशोधक विवाह, भोंदूबाबा पकडणे याकामात सहभाग असतो.
कविता, लेख लिहून सादर करतात. काही अंधांसाठीचे व्हाँटस अँप ग्रुपवर असे कविता लेख रेकॉर्डिंग करून पाठविते.
काही एकट्या रहाणाऱ्या जेष्ठांची बँकेची कामे करते.
लग्नसमारंभात मंगलाष्टके रचून म्हणते तसेच काहीइतरही खास समारंभासाठी गाणी लिहून सादर करतात.
नँब शाखा सांगलीवरही मागणीवरून गीत लेखन केले आहे.
विविधा
☆ भय ☆ सुश्री त्रिशला शहा ☆
जीवन खूप सुंदर आहे. जगताना प्रत्येक गोष्टीचा पुरेपुर आनंद घेत गेलो तर दुःखाचा लवलेशही उरणार नाही, दुर्दैवाने ज्या वाईट घटना घडतात, त्यांना मागे टाकून जीवनाची पुढील वाटचाल करीत राहिलो तर आयुष्य खूप सुंदर होईल हे नक्की, परंतु या वाटचालीत काही वेळा मात्र भयदायी असतात. अगदी लहान असताना बालपणात एक भय आपली पाठ सोडत नाही, ते म्हणजे बागुलबुवा. थोडा जरी हट्ट केला, रडून निषेध नोंदवला तर घरातील आई, आजी, बाबा हे सगळे एकच भिती घालतात, “तो बघ बागुलबुवा आला “मग आम्ही आपल घाबरून गप्प!शिकत असताना शाळेतील शिक्षकांची भिती, परिक्षेची भिती, अभ्यास कितीही चांगला झाला तरी निकालाची भिती. यशस्वीपणे पास झालो तर नोकरीची भिती, नोकरी चांगली लागली तर बाँसची भिती. लग्न झाल्यावर तर विचारुच नका. पैसे पुरवायची भिती, मुलांच्या शिक्षण, पालनपोषणाची जबाबदारी युक्त भिती कायमच असते. सगळं सुरळीत झालं, आयुष्यातील बऱ्यापैकी जबाबदाऱ्या पार पाडल्यावर एक मोठी भिती आपल्या मनात ठाण मांडून बसते ती म्हणजे असलेल्या किंवा होणाऱ्या आजाराची भिती. त्यातून परत जोडीदाराची काळजीयुक्त भिती असतेच. हे सगळं निभावताना वार्धक्यात मुलं आपल्याला बघतील कि नाही हि भिती तर मरेपर्यंत सुटतचं नाही. एकूण काय भय आपली पाठ सोडत नाही. जीवन आहे तिथे आनंद, उत्साह, सुख असतेच, आनंदाने जीवन जगावे हेही खरेच पण त्याच्या जोडीला दुःख, भय हे सुध्दा आहे. याच वाटचालीत जगत असताना हे सुध्दा लक्षात ठेवावे वाटते, ‘भय इथले संपत नाही.’
© सुश्री त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈