चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस म्हणजे गुढीपाडवा. या दिवसापासून हिंदूंचे नवे वर्ष सुरू होते. शिशीर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी फुटते, वृक्ष वेली टवटवीत दिसतात. ऋतूंचा राजा वसंत सुरू झालेला असतो. सर्व पृथ्वी चित्रासारखी सुंदर दिसते म्हणून या महिन्याला चैत्र हे नाव दिले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आनंदाचे प्रतीक म्हणून घराघरांतून गुढी उभारली जाते.गुढीसाठी काठी, रेशमी वस्त्र,धातूचा गडू,साखरेची माळ वापरले जाते.या सर्व वस्तू मधून आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवतात म्हणून समृद्धी व आनंद या सर्वांचेप्रतीक म्हणूनच गुढी उभारली जाते. या दिवशी कडुलिंबाची गूळ व मीठ,हिंग घालून केलेली चटणी खाण्याची प्रथा आहे. कडुलिंब हा औषधी असल्याने आरोग्य चांगले राहते.
दुष्ट प्रवृत्तीच्या राक्षसांचा व रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र अयोध्येला परतले तोच हा दिवस.हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो.
झुंजूमुंजू झालंय… पाखरांचा चिवचिवाट चालू झालाय… हवेत सुखद गारवा आहे. आणि वातावरणात एक शांत प्रसन्न नाद भरून राहिलाय. सगळीकडे सडासंमार्जन चालुये, लगबग चालू झालीय. मधुनच स्त्रोत्र पठणाचे स्वर ऐकु येतायत. काही स्त्रिया तुळशीवृंदावनापाशी वाकून एक सुरात प्रार्थना गुणगुणत रंगावली काढत आहेत. एक सारख्या लयीतल्या त्या मोहक वळणदार रेषा काही उगाच शोभेपुरत्या रेखाटल्या नाहीयेत. तर त्या रंगावल्या जणू साऱ्या विश्वाचं प्रतिक बनून या भुतलावर स्थानापन्न झाल्या आहेत. खरतरं तो आहे कृतज्ञता अर्पण करण्याचा एक नैसर्गिक सोहळा. अगदी चैत्राच्या आरंभापासून त्याच्या समाप्तीपर्यंत चालणारा.
अंगणाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या त्या नक्षीदार तुळशी वृंदावनात हिरवा हिरवा शालू नेसलेली तुळस प्रसन्नतेनं डोलत उभी आहे. जणू काही वाऱ्याला सांगतेय पहा बरं ! आज माझ्या भोवतालचं वातावरण किती गंधित, किती विलोभनीय झालं आहे. वाराही त्या दर्शनानं क्षणभर थबकलाय. आणि रक्तवर्णीय पार्श्वभूमीवर रेखाटलेल्या त्या शुभ्र रेखीव आकृत्या आपल्या नजरेत सामावून घेतोय. इतक्यात त्या चैत्रांगणाला पाहण्यासाठी सूर्यदेखील आला आणि त्याच्या पदस्पर्शानं त्या चैत्रांगणातल्या सगळ्या प्रतिमा मोहरल्या, चैतन्यमय झाल्या. अखेर सोहळा संपन्न झाला.
हा सोहळा आहे मानवानं आपल्या नैसर्गिक संपदेला कृतज्ञता अर्पण करण्याचा. जे जे घटक त्याच्या जगण्याला, त्याच्या अस्तित्वाला सहाय्यक ठरतात, त्याचं जगणं सुसह्य करतात त्यांचं स्मरण करण्याचा. त्याचं जतन, संवर्धन करण्याचा म्हणूनच तर या चैत्रांगणाचं महत्त्व. त्यात रेखाटले जाणारे ग्रह, तारे, पानं, फुलं, पशु, पक्षी, सौरक्षक साधनं, रोजच्या वापरातली साधनं आणि… हे सगळं न मागता देणारी ती आदिशक्ती, या सगळ्यांचं स्मरण सातत्यानं व्हावं. त्यांचा लाभही सातत्यानं व्हावा, म्हणूनच तर हा प्रतीकांचा सोहळा. अचेतनातून सचेतानाकडे नेणारा.
चैत्र पाडवा! नवीन मराठी वर्षाचा पहिला दिवस! श्री राम वनवासाहून परत आले तो हा दिवस! त्यांच्या स्वागता प्रित्यर्थ गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले गेले. मराठी कालगणनेनुसार चैत्र वर्षाचा पहिला महिना! रोजच्या व्यवहारात आपण इंग्रजी कालगणनेनुसार वर्ष सुरू करतो. परंतु हिंदू कालगणनेनुसार चैत्र हा पहिला मराठी महिना आणि नवीन वर्षारंभ सुरू होतो.
तोरण म्हंटले कि सण आठवतात. तसेच कोणत्याही शुभकार्याचा आरंभ करताना आपण तोरण बांधतो. दसरा,दिवाळी, पाडवा, चैत्र पाडवा या दिवशी आपण आंब्याच्या पानाचे तोरण दाराला बांधतो. तोरण हे शुभ गोष्टींचे प्रतीक आहे.
तोरण म्हंटले की आणखी एक प्रचलित वाक्य आठवते. ‘शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले’ वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी पहिला किल्ला घेतला आणि स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली. आपल्या नवीन कामाची सुरुवात करतानाही आपण तोरण बांधतो. नवीन आॅफिस, नवीन घर, नवीन कामाची जागा घेतली की तोरण बांधून मगच नवीन जागेत प्रवेश केला जातो.
पण मला आत्ता वेगळेच तोरण डोळ्यासमोर आहे! आकाशात ढग जमून आले आहेत. पावसाचा थेंब फुटला आहे. अशावेळी आकाशात सप्तरंगांची कमान दिसू लागते! जणू आभाळात सात रंगांचे सुंदर तोरण बांधले आहे असं वाटतं! ढगांचे पडघम वाजू लागतात. उंच उंच झाडे वाऱ्याबरोबर डोलू लागतात. चराचरामध्ये चैतन्याची चाहूल लागते. दिवसभर होणारी काहिली जरा कमी होऊन दुपारनंतर आभाळ बदलू लागते. अतिशय गर्मी ओसरून एकदम कुठून तरी धुरळा उठतो. आभाळ मेघाच्छादित होते. ढगांच्या गडगडाटात पावसाची एखादी सर येते. मृदगंधा चे अत्तर दरवळू लागते आणि अशावेळी ऊन-पावसाचा खेळ चालू होऊन आकाशात सप्तरंगी तोरण दिसू लागते. जणू नवचैतन्याची सुरुवात झालेली असते.
तसे तोरणाचे विविध प्रकार आहेत. आंब्याची पानं मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन सोडतात म्हणून दाराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधण्याची पूर्वापार पद्धत पडली असावी! झेंडूची फुले आणि आंब्याची पाने या दोन्हीचे एकत्र तोरण आपण बांधतो. अलीकडे प्लास्टिकची झेंडूची फुले किंवा पाने असलेली मण्यांची, टिकल्यांची अशी विविध प्रकारची तोरणे मिळतात.
त्यात पानांवर स्वस्तिक, कलश, श्री, देवी अशी विविध चित्रे वापरून तोरणे बनवली जातात. लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीचे चित्र असलेले तोरण सगळीकडे दिसते. तर साहित्यिक कार्यक्रमात सरस्वतीचे चित्र तोरणावर दिसते. दसऱ्याला विशेष करून झेंडूच्या फुलाचे तोरण बांधले जाते.
नवीन लेखनाची सुरुवात करून लेखक साहित्यिक तोरण बांधतो. तर राजकीय पक्षाच्या प्रसारासाठी, प्रचारासाठी पक्ष कार्यालयाला तोरण बांधून सुरुवात केली जाते. तोरण शब्दावरून आज विविध प्रकारची तोरणे डोळ्यासमोर आली आणि माझ्या नवीन लेखनाचा शुभारंभ करताना मीही आज चैत्र पाडव्याला शब्द मण्यांचे, शब्द कळांचे तोरण बांधत आहे.
लहान माझी बाहुली मोठी तिची सावली.या बालगीतानं लहानपणीच नकळत माझ्या बाल मनावर गारुड केलं होतं.बाहुली ही माझी प्रिय सखी! तिची सावली जणू मलाच छाया देणारी!आज मला जेव्हा हे बालगीत आठवते तेव्हा कवीचा हा केवळ यमक जुळवण्याचा प्रयत्न नसून बाहुलीची सावली कवीनं प्रतीकात्मक म्हणून वापरली असेल. असा विचार माझ्या मनात आला.माझ्या छोट्याशा निरागस मनविश्वात बाहुली आणि तिची सावली दोघी माझ्या सोबत होत्या.आईची सावली म्हणजेच मायेची सावली बाळासाठी!…..तसेच त्या बाहुलीची मोठी सावली म्हणजे प्रेमाची सावली माझ्यासाठी!….. मला लहानपणापासूनच सावल्यांचा अप्रूप होतं .आई बाबा भिंतीवर सावल्यांचे पक्षी,हरीण, ससा, उंट करून दाखवायचे आणि मला रिझवायचे. दुपारच्या वेळेला अंगणात आपल्याच सावली पासून लांब पळायचं… असा खेळ खेळण्यात ही मी रमून जायची.रात्रीच्या वेळी भिंतीवर चिऊ-काऊ, हम्मा, भू भू असे अनेक जण भेटायला यायचे.’ हा खेळ सावल्यांचा’ हे गूढ समजण्याचं ते वयच नव्हतं! मोठी झाले तशी सावली मोठी होत गेली. ती आपलीच सावली आहे हे ओळखता येऊ लागलं.कधी ठेंगणीठुसकी, कधी लांबलचक, कधी अस्ताव्यस्त पसरलेली, काळीसावळी अशी ही सावली!एक गुण असेल तर शप्पथ! पण तरीही ती माझीच प्रिय सखी. ती सतत माझ्याबरोबरच का असते?याचे उत्तर तिनच मला एकदा दिलं. “अगं तुझ्या सोबत दुसरं कोणी नसतं ना म्हणून मी असते.”
प्रतिबिंब पेक्षाही आभासी असणाऱ्या या सावल्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पहिल्या की वेगवेगळी नावे धारण करतात.आपल्याला साथ सोबत करणारी अगदी आपलीच असणार्या आईला मायेची सावली म्हणतात. छोटा गंधर्व तर देवालाच ‘तू माझी माऊली तू माझी सावली’ असं म्हणून स्वतःला देवाजवळ नेतात. भयाची सावली,पाठीराख्यांची सावली, झाडाची सावली अशा अनेक सावल्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून निर्माण झाल्या आहेत.
खरं म्हणजे सावली हे प्रकाशाचं अस्तित्व आहे. मग ते नैसर्गिक असो वा कृत्रिम! प्रकाश नसताना सावली दिसत नाही. सावलीही सत्य गोष्ट असूनही आभास वाटते. पण सावली या संकल्पनेला एक शास्त्रशुद्ध आधार आहे. सूर्यग्रहण चंद्रग्रहण तिच्यामुळेच होतात. आपण रोज रात्री पृथ्वीच्या सावलीत झोपतो.चंद्र झाकतो तेव्हा या महाकाय सावलीचे अस्तित्व जाणवते. पृथ्वीच्या सावलीतून चंद्र जातो तेव्हा चंद्रग्रहण होते.चंद्र स्वयंभू नाही त्याला सूर्याचं तेज आहे. त्यामुळेच सावल्यांचे खेळ चालतात.
या काळ्यासावळ्या सावली वर कवींनी किती सुंदर गाणी रचली आहेत.’हा खेळ सावल्यांचा’ या गाण्यातील ‘हसतात सावलीला हा दोष आंधळ्याचा’ ही ओळ सावली बद्दल बरंच काही सांगून जाते.’वेळ झाली भर माध्यान्ह या गाण्यात, ‘माझी छाया माझ्याखाली तुजसाठी आसावली कशी करू तुज सावली’ हे एका श्रमिक कामगार स्त्रीने आपल्या तान्हुल्या साठी आपली दुपारची ठेंगणी ठुसकी सावली अपुरी आहे या अर्थाने म्हटले आहे ‘मेरा साया साथ होगा’ म्हणत सावलीचे गुढ रहस्य प्रेक्षकांना चित्रपट भर खिळवून ठेवते ते निराळेच.
सत्य असूनही आभासी वाटणारी ही सावली माझी म्हणावी अशी!
काळाच्या ‘लाॅन्गमार्च’ मध्ये काळाचे तिसरे पाऊल पडते तो महिना म्हणजे मार्च महिना !भारतीय कालगणनेनुसार माघाचा शेवट होत,फाल्गुन महिना मुक्कामाला येतो आणि जाताना एक भारतीय वर्ष आपल्याबरोबर घेऊन जातो. फाल्गुन अमावस्या संपते आणि नवे भारतीय वर्ष चैत्र पाडव्याच्या मुहूर्ताने सुरू होते.
मार्च महिना खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे असे म्हणावे लागेल. वंदनीय व्यक्तिंच्या जयंती,पुण्यतिथी,अनेक प्रकारचे जागतिक दिन आणि आर्थिक वर्षाची अखेर असा भरगच्च कार्यक्रम या महिन्यात असतो.
देवांचा देव महादेव अशा शिवाची महाशिवरात्र याच माघ महिन्यात येते. फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशनि पौर्णिमा. होलिकोत्सव किंवा होळीपौर्णिमा. कुविचारांची होळी करून सद्विचारांची ज्योत तेवत ठेवण्याचा दिवस. त्याच्या दुसरे दिवशी धुलीवंदन किंवा धुळवड. नंतर फाल्गुन पंचमीला असते रंगपंचमी. भेदभाव विसरून ,विविध विचारांच्या रंगाना एक करून,एकाच रंगात न्हाऊन जाण्याचा दिवस. आयुष्यात रंग भरण्याचा दिवस. काही ठिकाणी धुलीवंदनाला तर काही ठिकाणी रंगपंचमीला रंगांची उधळण होत असते.
याच महिन्यात असते रामकृष्ण परमहंस यांची जयंती. तिथीनुसार याच महिन्यात शिवजयंती येते. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती असते बारा मार्चला. महाराष्ट्रात हा दिवस समता दिन म्हणून साजरा केला जातो .
ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथि असते दहा मार्चला तर फाल्गुन शुद्ध नवमी हा धर्मवीर संभाजी महाराज यांचा बलिदान दिन. फाल्गुन कृ. द्वितीया ही तुकाराम बीज म्हणजे तुकाराम महाराजांचा विठूमाऊली चरणी एकरूप होण्याचा दिवस. फाल्गुन कृ. षष्ठी हा संत एकनाथ महाराज यांचा जलसमाधी दिन. छ. राजाराम महाराज पुण्यतिथीही याच महिन्यात असते.
या निमित्ताने इतिहास आणि संस्कृती,परंपरा यांचे पालन होते,थोरांच्या विचारांची उजळणी होते आणि तो वारसा पुढे जपण्याचे भानही आपल्याला येते.
राष्ट्रीय व जागतिक स्तरावरील अनेक महत्वपूर्ण दिवसही या महिन्यात येतात.
चार मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन आहे. 04मार्च 1972 ला नॅशनल सेफ्टी काउन्सिल ची स्थापना झाली. सामान्य लोकांमध्ये सुरक्षेसंबंधी जागरूकता यावी म्हणून हा दिवस साजरा होतो.
08 मार्च हा जागतिक महिला दिन आहे. 1921 पासून जगभर आणि 1975 पासून भारतात हा दिवस साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांचे रक्षण करून त्यांना सन्मान देणे व स्त्री पुरूष भेद नष्ट करणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
15 मार्च जागतिक ग्राहक दिन आहे. 15मार्च 1962 रोजी अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष जाॅन केनेडी यांनी प्रथम ग्राहकांच्या हक्काविषयी भाष्य केले. म्हणून ग्राहक चळवळीतर्फे 1983 पासून ग्राहक दिन साजरा होतो.
20मार्च हा दिवस आहे जागतिक विषुव दिन आणि चिमणी दिन. जगभरात सर्वत्र बारा बारा दिवसांचे दिवस रात्र 21मार्चला होत असल्याने 20 मार्च हा विषुव दिन आहे. तर सर्वत्र चिवचिवाट करणा-या चिमणांची होणारी लक्षणीय घट लक्षात घेऊन त्याकडे लक्ष वेधण्यासाठी चिमणी दिन साजरा केला जातो.
21 मार्च हा जागतिक कविता दिनही आहे आणि जागतिक वन दिनही आहे. युनेस्कोच्या पॅरिस परिषदेने 21/03/1999पासून कविता दिनाला मान्यता दिली. ‘कविता हा एक झरोका असून याद्वारे मानवतेतील वैविध्य मनमोकळा श्वास घेऊ शकते’ असा कवितेचा गौरव युनेस्कोच्या त्यावेळच्या महासचिवांनी केला आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व शेती संघटनेतील देशांनी जागतिक वन दिनास सुरूवात केली. सर्वांना जंगलाचे फायदे समजावेत,जंगलातोड होऊ नये,वृक्ष लागवड वाढावी असे उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा दिवस साजरा होतो.
22मार्च हा जागतिक जल दिन आहे. वापरण्यास योग्य अशा पाण्याचे महत्व पटवून देणे,जलस्त्रोतांचे जतन व संवर्धन करणे,पाणी काटकसरीने वापरण्यासाठी जागृती करणे हे यामागचे उद्देश आहेत. युनोच्या ठरावानुसार 1993 पासून जलदिन साजरा होतो.
23 मार्च हा जागतिक हवामान दिन. हवामानात होणारे बदल व त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम याची दखल घेतली जावी यासाठीचा हा दिवस.
23 मार्च हा भारतीयांच्या साठी एक काळा दिवस. याच दिवशी सरदार भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरु यांना फाशी देण्यात आले. शहिदांच्या बलिदानाचे स्मरण रहावे म्हणून हा दिवस शहिद दिन या नावाने पाळला जातो.
24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन आहे. जागतिक शास्त्रज्ञ परिषदेत 1882 साली डाॅ. राॅबर्ट काॅक यांनी क्षयरोग जीवाणूंच्या शोधासंबंधीचा प्रबंध सादर केला व त्याला मान्यता मिळाली. क्षयरोग निर्मुलनासाठी जनजागृती व्हावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
असा हा विविध दिवसांनी सजलेला मार्च महिना. याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे आपले आर्थिक वर्ष याच महिनाअखेरला संपते. संपलेल्या आर्थिक वर्षाचा हिशेब मांडताना येणा-या नव्या आर्थिक वर्षाचे वैयक्तिक नियोजन प्रत्येकाने करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण वैयक्तिक नियोजन व त्याचे काटेकोर पालनच संपूर्ण समाजाला आर्थिक दृष्ट्या सशक्त बनवू शकते. सशक्त समाजच समर्थ राष्ट्र बनवू शकतो. आर्थिक नियोजनाचा संकल्प करूनच इथे थांबूया आणि नववर्षाच्या संकल्पांची गुढी उभारायच्या तयारीला लागूया.
कोकणातील काही चमत्कारिक चालीरीतींचा हा अद्भुत मागोवा……
मालवण-कुडाळ रस्त्याला चौक्याच्या पुढे असलेल्या धामापूर गावाजवळ कासार टाका नावाचे एक विलक्षण ठिकाण आहे. अगदी रस्त्यालगत, निर्मनुष्य जागेत असलेल्या कासार टाक्याला माणसे वेगवेगळे नवस बोलतात. त्यामुळे भक्ताची कसलीही अडचण दूर होते. अडलेली कामे होतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. नवस फेडायचा असेल तर कोंबडा, दारू व सिगारेट यांचा नैवेद्य इथल्या ‘‘ठिकाणा’’ला देण्याची प्रथा आहे. कारण पूर्वीच्या काळी गावोगाव फिरून बांगडया विकणाऱ्या कासाराला या आडवाटेवर गाठून वाटमारी करणाऱ्यांनी क्रूरपणे मारले. तेव्हापासून तो कासार इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीला धावून येतो असा समज आहे.
सावंतवाडी तालुक्यात दाभील नावाचे एक गाव आहे. या गावात एकही विहीर नाही. किंबहुना विहीर मारली तर पाणीच लागत नाही. परंतु वरच्या भागात गुळगुळीत काळ्याशार दगडात सात (बावी) विहिरी आहेत. या निसर्गनिर्मित विहिरींचे पाणीच साऱ्या गावाची तहान भागवते. कोकणात नैसर्गिक चमत्कारांची अशी उदाहरणे आहेत तशीच चमत्कारिक रीती-रिवाजांचीसुद्धा कितीतरी ठिकाणे आहेत.
मातोंड हे एकही चहाचे दुकान नसलेले गाव. येथील जत्रेतसुद्धा चहाचे हॉटेल लावत नाहीत. गावात दारू प्यायला बंदी. पण डोंगरात भरणारी घोडेमुखची जत्रा हा देव ब्राह्मण असून त्याला शुद्ध शाकाहारी नैवेद्य दिला जातो आणि त्याच्या गणांना मात्र कोंबडय़ाचा नैवेद्य द्यावा लागतो. म्हणून या जत्रेला कोंब्याची जत्रा म्हणतात.
देवगड तालुक्यातील नारिंग्रे गावात कोणीही कोंबडी पाळीत नाहीत. अगर बाहेरून आणून खाऊ शकत नाही. गावाचे तसे कडक नियम आहेत. तर म्हापण गावात येसू आकाच्या देवळात नवस फेडायचा असेल तर सुक्या बांगडयाची चटणी आणि नाचण्याची भाकरी असा अस्सल मालवणी बेत करावा लागतो.
उभादांडा येथे मानसीचा चाळा नावाचे एक जागृत स्थळ आहे. तिथे नवस फेडायचा असेल तर खेकड्यांची माळ आणि गॅसची बत्ती देतात. या चाळ्याच्या जत्रेला बत्तेची जत्रा म्हणतात.
परुळे गावच्या येतोबाच्या देवळात म्हणे, भिंतीला लोखंडी खंजीर चिकटतो. या उत्सवाला बाक उत्सव म्हणतात तर आरवली गावात वेतोबाचे सुप्रसिद्ध देऊळ आहे. त्याचा नवस फेडण्यासाठी सोनकेळीचा घड आणि चामडयाची चप्पल भेट म्हणून देतात. वेताळाला दिलेली ही चप्पले ठेवल्या जागेवर आपोआप झिजतात. अशी झिजलेली चप्पले आजही पाहायला मिळतात.
मालवण तालुक्यातील पेंडुर गावचे मसणे-परब लग्न लावण्याआधी देवळाच्या आवारात स्मशानातले सगळी विधी करून मग लग्नाच्या बोहल्यावर उभे राहतात. याच तालुक्यातील कोईल गावातील रहिवासी हे लग्नपत्रिकेवर गणपती प्रतिमा छापत नाहीत. कोणाच्याच घरी गणपती पूजन करीत नाहीत. भिंतीवर गणपतीचे कॅलेंडरसुद्धा लावीत नाहीत.
कणकवली तालुक्यातील कुर्ली गावचे पाटील घराण्यातले लोक तुळशीच्या लग्नादिवशीच म्हाळ घालतात. तर वालावल गावातील एकही माणूस पंढरपूरला जात नाही.
फोंडाघाट येथील वाघोबाचे मंदिर हे समस्त अनिष्ट शक्तींना रोखून धरणारे शक्तिस्थळ आहे असे मानतात. इथले मंदिर कोंबडा आरवायच्या आत फक्त एका रात्रीत बांधायचे अशी विचित्र अट होती. शेवटी गावकऱ्यांनी धाडस करून अतिशय नियोजनपूर्वक सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या वेळेत मंदिराचे बांधकाम पूर्ण केले.
पुराणात ज्याचा एकचक्रानगरी म्हणून उल्लेख आहे ते गाव वैभववाडी तालुक्यात सह्याद्रीच्या निबीड अरण्यात आहे. इथे मोठमोठ्या गुहा असून त्यात गाडाभर अन्न खाणाऱ्या बकासुराचे वास्तव्य होते असे सांगितले जाते. दगडात कोरलेला महाल आणि काळय़ा दगडाचा प्रशस्त पलंग आजही तेथे आहे. पांडवांना अन्न पुरवणाऱ्या ब्राह्मणाचा वाडाही जवळ आढळतो. या दुर्गम भागात प्रशस्त गुहा आहेत, पांडवांची लेणी आहेत आणि भरपूर पाण्याचे साठेही आहेत. अंगी खूप धाडस आणि चिकाटी असल्याशिवाय इथे पोहोचणे खूप अवघड आहे. अरण्यातील या विशिष्ट जागेला राकसमाळ असेही म्हणतात.
* कोकणातील अशा असंख्य ठिकाणच्या चालीरीती व गूढता समजून घेवून अश्या अद्भुत ठिकाणांना पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत
लेखक – अज्ञात
संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
काही दिवसांपूर्वी मेघालयातल्या whistling village विषयी ऐकलं. या Kongthong village मध्ये एकमेकांना बोलवायला शिट्ट्यांचा वापर करतात. इथं संवाद साधायला शब्द वापरले जात नाहीत. शिट्टी घालून संवाद साधला जातो. किती छान! बोलण्यासाठी जवळपास असणं गरजेचं नाही. काही अंतरावरुन देखील; आधुनिक तंत्रज्ञान न वापरता संपर्क साधता येतो.. . . . पण हो याकरिता शिट्टी घालता यायला हवी हं.
माणसाला बोलायला आवडतं. वेगवेगळ्या विषयांवर बोलता येणं ही एक कला आहे. ही कला तुम्हाला बहुश्रृत बनवते. समाजप्रिय बनवते. गप्पा मारणारी माणसं साळढाळ असतात. सहजपणानं कोणत्याही प्रकारच्या लोकांमध्ये मिसळून जातात. मनातलं सगळं सांगून टाकलं की कसं मोकळं मोकळं वाटतं. आपल्याला भावना, विचार व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात.मनातलं सगळं बकबक करुन सांगितल्या शिवाय चैनही पडत नाही आपल्याला. नुसत्या शिट्टीतून या माणसांना राग, लोभ, प्रेम कसं बरं व्यक्त करता येत असेल.शब्दाविना एकमेकांना समजून घेणं ही कला मात्र या लोकांना साधली असेल. योग्य शब्द शोधून बोलायचा प्रयत्न केला तरी गैरसमज होऊ शकतात. Whistling village मध्ये अशा गैरसमजांना थाराच मिळत नसेल. दुधारी हत्यारासारखे शब्दच न वापरल्यानं हे व्हिलेज खऱ्या अर्थानं स्वर्ग तर ठरत नसावं?
आजकाल आपण न बोलता ही खूप बोलतो. मोबाईलवर येणाऱ्या मेसेजेस ना उत्तर देताना शब्द वापरायचे टाळतो. इमोजी. . . स्मायलीज पाठवून रिस्पाॅन्स देतो. या स्मायलीज आहेतही खूप गोडुल्या. सर्व भाव भावना व्यक्त करण्यास समर्थ आहेत. राग, द्वेष, आनंद अशा मनतरंगा बरोबर त्या थंडी, उष्णता, पाऊस असे हवेतील बदलही त्या दाखवतात. न शिंकता सर्दी – खोकल्याची वर्दी देतात. शाब्बासकी, सहमती, नाराजी,इ. सांगतात. केक, बूके, फूलं पाठवून स्पेशल डेज देखील आपण लांबूनच साजरे करु शकतो. स्टीकर्स पाठवून जास्त आपुलकी दाखवू शकतो. GIF द्वारा गंमतीदार, हलके-फुलके संदेश पाठवू शकतो. नुसते हसरे ईमोजी सुध्दा किती प्रकारचे आहेत. फक्त हसरा चेहरा पाठवून खुषी व्यक्त करता येते. हसरा चेहरा, हसरे डोळे आणि गुलाबी गाल आनंदाबरोबर किंचित लाजरा भाव
व्यक्त करतात. डोक्यावर गोलाकार मुकुट मिरवणारा इमोजी एखाद्या विषयी असलेला अभिमान सांगतो.
हे सगळे चेहरे न बोलता खूप काही बोलतात. कमी वेळात योग्य भावना सांगणारं हे अनोखं तंत्रज्ञान आज जास्तीत जास्त वापरलं जातं. आपल्याजवळ सांगण्यासारखं खूप असतं. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आकलनक्षमतेनुसार आलेल्या अनुभवांची अभिव्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे करता येते. भोवताली घडणाऱ्या घटनांचा अर्थही स्वतः च्या क्षमतेनुसार, संवेदनशीलतेनुसार लावता येतो. त्यासाठी कथा, कविता, कादंबरी असे साहित्य प्रकार हाताळले जातात. काळ बदलला. भावविश्व उलगडून दाखवणारी नवीन साधनं आली. नवीन पिढीची व्यक्त होण्याची साधनं बदलली. भाषा बदलली. सुपरफास्ट जमान्यात सुपरफास्ट पध्दतीनं व्यक्त होता आलं पाहिजे. त्यासाठी भाषेची गरज राहिली नाही. इमोजी हे काम अधिक सुलभ आणि सुपरडुपर फास्ट करतात. शब्दातून सांगितल्या जाणाऱ्या अर्थापेक्षा ही चित्रलिपी वेगवेगळे अर्थ प्रतीत करु शकते. जो हवा तो अर्थ घ्यावा. भाषेची अडचण नाही. भाषा येत नसल्याचा न्युनगंड नाही. कमी वेळात जास्त तसंच योग्य विचार मांडता येतो. पाल्हाळ न लावता मुद्दा सांगता येतो. लिहिणाऱ्याचा आणि वाचणाऱ्याचा दोघांचाही वेळ वाचतो. आता हे शब्दाविना व्यक्त होणाऱ्या पिढीचं जग झालंय.
म्हणजे आपण पुन्हा भाषा नव्हती त्या काळात चाललो आहोत की काय? . . आपण पुन्हा इमोजीतून. . . चित्रलिपीतून . . . भाषेचा शोध लागण्याच्या आधीच्या काळात जाऊन पोहोचणार आहोत की काय?
☆ मेंदूचा व्यायाम….अनामिक☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर☆
मेंदूचा व्यायाम.
शरीर सुदृढ राहावं म्हणून आपण सगळेच व्यायाम करतो. वजन वाढलं की वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतो. खेळाडू सतत सराव करत राहतात. अभिनेता किंवा अभिनेत्री चेहऱ्यावरचे तेज टिकवण्यासाठी व्यायामासकट वेगवेगळे उपाय करत राहतात. म्हातारी होत चाललेली माणसं तरुण दिसण्यासाठी धडपडत असतात. पण मेंदू तरुण राहावा, मेंदू तल्लख राहावा, विचार चपळ राहावेत यासाठी मेंदूचे व्यायाम कोणीच करत नाही.
मेंदू हा इतर अवयवांसारखाच आहे. वापरला तर धावतो, नाही वापरला की गंज चढतो. आठवा, मोबाईल हातात येण्यापूर्वीचे दिवस. कमीत कमी १०० ते २०० टेलिफोन नंबर सहज लक्षात राहायचे. आता जेमतेम २० ते २५ नंबर लक्षात राहतात.
आज आम्ही तुम्हाला मेंदू तल्लख, चपळ, तरतरीत आणि यंग फॉरेव्हर राहण्यासाठी काही व्यायाम सुचवतो आहे.
१. वाद्य वाजवायला शिका एखादे वाद्य वाजवायला शिका. होतं काय, हे शिकताना अनेक सरगम (नोटेशन्स) लक्षात ठेवायला लागतात. सोबतच एखादा स्वर ऐकल्यानंतर तो कोणत्या नोटेशनचा भाग आहे, हे पण लक्षात ठेवावं लागतं.
उदाहरणार्थ, ‘सागर किनारे’ हे गाणं ऐकल्यावर मुकेशचं ‘यही है तमन्ना तेरे घर के सामने’ हे गाणं आठवणं ही नोटेशन लक्षात असण्याची खूण आहे. किंवा एखादी सुरावट ऐकल्यावर जुन्या स्मृती चाळवल्या जाणं ही पण नोटेशन लक्षात असण्याची खूण आहे. याखेरीज महत्वाचा मुद्दा असा की वाद्य वाजवताना मेंदू आणि हात या दोन्हीमध्ये समन्वय राहतो.
२. तोंडी हिशोब करा. कॅल्कुलेटर आल्यानंतर तोंडी गणितं करण्याचं आपण सगळेच विसरलो आहोत. कोपऱ्यावरचा भाजीवाला जो हिशोब तोंडी करू शकतो, तो तोंडी हिशोब चार डिग्र्या असणारी माणसं सुद्धा करू शकत नाहीत. बघा स्वतःची परीक्षा घ्या. १९ चा किंवा २३ चा किंवा २९ चा पाढा आठवतोय का? नसेल आठवत तर आजच पुन्हा एकदा पाढे पाठ करायला सुरुवात करा. यामुळेही मेंदू तल्लख राहतो.
३. गत आयुष्यातील प्रसंगांना आठवून बघा. कधीतरी एखाद्या रविवारी आठवून बघा आपल्या गत आयुष्यातील अनेक प्रसंगांना!! उदाहरणार्थ, २६ जुलैचा पूर आला तेव्हा तुम्ही कुठे होता आणि घरी कसे पोहोचलात? तेव्हा तुमच्यासोबत कोण होतं? तुम्ही किती वाजता घरी पोहोचलात? सगळं आठवण्याचा प्रयत्न करा आणि एखाद्या कागदावर नोंद करा. यामुळे मेंदूचा झोपी गेलेला भाग खडबडून जागा होईल. अर्थातच अशा व्यायामाने जुनी नावं, ठिकाणं, नाती, सगळं काही आठवायला लागेल. मेंदूला पुन्हा एकदा स्मरणशक्ती ताजी ठेवण्याची सवय लागेल.
४. नवीन भाषा शिका. आता असा एक उपाय बघू ज्यामुळे मेंदूची क्षमता वाढत जाईल. यासाठी सोपा व्यायाम आहे नवीन भाषा शिकण्याचा. भाषेतले शब्द हे मनावर उच्चारातून आघात करतात. त्यामुळे जुने शब्द, जुनी भाषा, यांचे संवर्धन तर होतेच, सोबत नवीन भाषेचे शब्द स्मरणशक्ती वाढवतात. स्वर्गीय विनोबा भावे यांना चौदाहून अधिक भाषा लिहिता वाचता येत होत्या. त्यांचे चरित्र वाचले तर असे लक्षात येईल की त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांची स्मरणशक्ती तरतरीत होती.
५. एरोबिक व्यायाम करा. मेंदूच्या चलनवलनाचा सर्व भर प्राणवायू आणि शुद्ध रक्त यावर असतो. आपल्या अन्नातून मिळणाऱ्या उर्जेपैकी २५ टक्के उर्जा एकटा मेंदू खर्च करत असतो. यासाठी रोज एखादा एरोबिक व्यायाम करणे जरुरी आहे.
६. चित्रकला, विणकाम, यासारखा एखादा व्यायाम करा. दृष्टी आणि हात यांचा समन्वय राहावा म्हणून चित्रकला, विणकाम, यासारखा एखादा व्यायाम करावा. हे शक्य नसल्यास रोज एक शब्दकोडे सोडवा. त्यामुळे मोटर स्कील वाढीस लागते. पन्नाशी पुढच्या सर्वांनी हा व्यायाम नक्की करा.
७. स्वयंपाक करायला शिका. एखादी पाककृती करताना दृष्टी, गंध, चव या तिन्हीची गरज असते. म्हणजे स्वयंपाक करायला शिकलात, तर पाचपैकी चार इंद्रियं कामाला लागतात.
येणाऱ्या स्पर्धात्मक युगात जर टिकून राहायचे असेल तर हे मेंदूचे व्यायाम अत्यंत आवश्यक आहेत.
☆ विचार–पुष्प – भाग १० वाचन – १ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
आज घरातला प्रत्येकजण, रस्त्यावरचा प्रत्येकजण , जिथे बघाल तिथला प्रत्येकजण मोबाईल मध्ये डोकं घालून काहीतरी वाचत असल्याचा भास होतो. ते बघून रसिक वाचक संख्या अनेक पटीने वाढली की काय असे वाटते. मोबाईल वर मेसेजस, विडिओ, इमेजेस, जोक्स आणि व्हाट्सअप वर जे जे असेल ते ते वाचत असतात. या आधी काही दशकांपूर्वी रेल्वे, विमान अथवा गाडी प्रवासात, जाता येता, सुटीत, आणि वेळ मिळेल तसे पुस्तके हातात घेऊन जाताना मुले आणि माणसे दिसायची. जिथे आज मोबाईल प्रत्येकाच्या हातात दिसतो.
शाळेत जाणारी लहान मुले सुद्धा या मोबाईलच्या आहारी गेली आहेत. पुस्तकं वाचायला नको असतात. या मुलांसाठीची पुस्तकं म्हणजे काय मनोरंजनाचीच असतात. लहान मुलांच्या विश्वातले ते विषय असतात. पण चांदोबा, विक्रम और वेताळ, गोष्टीची, इसापनीती अशी मनोरंजनाची असली तरी ती वाचनाची सवय, आई वडिलांनीच लावायला लागते. हीच सवय महाविद्यालयात गेल्यावरही, मोठ्ठे झाल्यावरही कायम राहते. आईवडिलांना वाचनाची आवड असेल किंवा महत्व असेल तर ते मुलांनाही असतं. जे आईवडील वाचत नाहीत त्यांची मुलेही वाचत नाहीत, म्हणजे आवड नसते, असा अनुभव आहे.
पण नरेंद्र मात्र अशा वाचनातूनच शालेय जीवनापासून घडत होता. त्याला तर बी.ए.ला असताना विश्वनाथबाबूंनी नेहमीच्या विषयांव्यतिरिक्त ‘तत्वज्ञान’ हा विषय घ्यायला लावला होता. माणसाच्या मनाचा विकास होण्यास आणि त्याची संवेदनशीलता परिपुष्ट होण्यास हे विषय अधिक उपयुक्त आहेत, असा विश्वनाथबाबूंचा त्या मागचा विचार होता आणि खरच विचारांची परिपक्वता येण्यास त्याचा उपयोग झाला होता. हे विवेकानंदाचे चरित्र वाचल्यावर लक्षात येतं.
परीक्षेत आपल्याला किती गुण मिळाले याकडे नरेंद्रचे लक्ष नसे. तर खर्या अर्थाने त्या विषयाचे ज्ञान आपल्याला किती मिळाले याकडे लक्ष असे. महाविद्यालयीन शिक्षण घेताना नरेंद्रने किती आणि काय काय वाचन केले होते हे पाहिले तर आश्चर्य वाटते आपल्याला. यातली अनेक नावे तर आपण कदाचित ऐकलीही नसतील.
नरेंन्द्रने, मार्शमन आणि एल्फिन्स्टन यांचे बंगाल आणि भारत यांच्या इतिहासाचे ग्रंथ वाचले, जे त्यांना अभ्यासाला नव्हतेच. तर्कशास्त्राचे ‘एलेमेंटरी लेसेन्स ऑन लॉजिक’ हे जेव्होंस चे पुस्तक, ‘स्टडीज इन डिडक्टिव्ह लॉजिक’ हे सखोल विवेचन करणारे ग्रंथ अभ्यासले. ग्रीन ने लिहिलेला इंग्लंडचा आणि अॅलिसन फिलिप्सने लिहिलेला युरोपचा इतिहास वाचला. गिबनचा जगप्रसिद्ध ग्रंथ ‘डिक्लाइन अँड फॉल ऑफ दि रोमन एम्पायर’ हा तर एका दमात वाचला. फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास काळजीपूर्वक वाचला होता. या सगळ्याचे संदर्भ त्यांच्या वेगवेगळ्या भाषणात बोलण्यात येत असत.
नंतर फ्रान्स मध्ये उदयाला आलेला नेपोलियन हा तर नरेंद्रला अत्यंत आवडणारा एक वीरपुरुष होता. नेपोलियन च्या अनेक लढयांचे वर्णन सांगताना नरेंद्र रंगून जात असे. नेपोलियन तर रणांगणावरचा योद्धा होता. त्याचा आध्यात्मिकतेशी काहीही संबंध नव्हता, पण विवेकानंदांना नेपोलियन बद्दल आकर्षण होते. कारण मनुष्याचे कर्तृत्व एखाद्या क्षेत्रात किती ऊंची गाठू शकतं याचं नेपोलियन हे एक उज्ज्वल उदाहरण होतं. तो केवळ झुंजार सेनानी नव्हता तर तो, उत्कृष्ट प्रशासक, उद्यमशील, भव्य आकांक्षा बाळगणारा, मन शांत ठेवणारा धीरोदात्त असा विद्या-कलांचाही भोक्ता होता. म्हणून तो आवडता होता. अशक्य हा शब्द त्याच्या कोशात नव्हता.
नरेंद्रने महाविद्यालयात असताना तत्वज्ञानाचा अभ्यास विशेष केलेला दिसतो. देकार्त, ह्युम, फिक्टे,स्पिनोझा, हेगेल, शॉपेनहौर, कांट, आणि डार्विन यांच्या विचारांचा परिचय त्याने करून घेतला होता. तो ते समजून घेई आणि त्यावर विचार करी. याबरोबरच हॅमिल्टन मिल, लॉक, प्लेटो यांचेही ग्रंथ वाचले. पुढे भारतीय तत्वज्ञान पाश्चात्यांसमोर मांडताना या वाचनाचा उपयोग त्यांनी केलेला दिसतो.
काय होतं वाचनाने? जीवन जगण्याचा दृष्टीकोन मिळतो, उमेद मिळते. एकमेकांच्या सुखदु:खाची तीव्रता कळते. मन संवेदनशील होते. शब्दसंग्रह वाढतो आणि बरच काही मिळतं. मुलांच्या हातातल्या मोबाईलची जागा पुस्तकं घेतील असा प्रयत्न आज होणं आवश्यक आहे.
☆ एका जमलेल्या कटिंगची कहाणी ☆ श्री विनय माधव गोखले ☆
दुकानात माझे आगमन झाल्यावर प्रसन्नपणे “या, बसा!” असे म्हणून त्याने एका बैठकीकडे निर्देश केला.
त्या आलिशान लोखंडी खुर्चीत माझी स्थापना केल्यावर एक पांढरेशुभ्र वस्त्र माझ्याभोवती आच्छादून गळ्याभोवती नाडीची एक हलकीशी गाठ मारून टाकली. थंडीच्या सुरूवातीला सारसबागेच्या तळ्यातील गणपतीला जसे स्वेटर परिधान करतात अगदी तसे…
नंतर ‘शुध्दोदक स्नान’ म्हणून डोक्यावर प्लास्टिकच्या पिचकारीतून फवारले.
ह्या सोपस्कारानंतर रेडिओ सुरू केला. त्यावर लता दीदींची, आशाताई, किशोरदा, मुकेशजी, रफीसाहेबांची गाणी लागत होती. मला ती सर्व गणपतीची, दुर्गेची, शंकराची, हनुमानाची, पांडुरंगाची आरती म्हटल्याप्रमाणे भासू लागली. त्याजोडीनेच त्याच्या कर्मपूजेला प्रारंभ झाला…
डोक्याशी “कटकट” “कटकट” करीत होता तो… पण ती सुखद वाटत होती. जणू काही कंगवा आणि कात्री ह्यांचे माझ्या डोक्याच्या मैदानावर द्वितालात केश-स्केटिंग चालले होते.
कधी ‘शिरगडा’च्या बालेकिल्यावरील गवताची टोके उडवली जात होते तर कधी तिन्ही उतारांवरील गवत कापले जात होते. कपाळावर केस पुढे ओढून कात्रीने समलांबीचा एक ‘साधना-कट’ मारून दिला. सरतेशेवटी कानामागील घळीमध्ये पाण्याचे बोट फिरवून वस्तर्याने अर्धकमानाकृती कोरण्याचे काम करणे चालू केले. तिथे वस्तर्याचा होणारा “खर्र खर्र” आवाज काळीज चिरल्याइतका स्पष्टपणे ऐकू येत होता. मानेवरील गवत वस्तर्याने हटवून गडाच्या पायथ्याशी वाहनतळासाठी जागा मोकळी केली. थोड्या वेळाने सर्व आवाज थांबले आणि मी भानावर आलो.
नंतर एखाद्या ‘घटम्’ वर ताल धरावा तसे त्याने डोक्याला बोटाने हलका मसाज करून दिला. फारच बरे वाटले.
तत्पश्चात त्याने मऊ ब्रशने गवताच्या सीमेवर पावडरची पखरण केली व एक खरखरीत ब्रश फिरवून तण काढून टाकावे तसे जमिनीला चिकटलेले सुट्टे गवत बाजूस काढले. नंतर जमीन नांगरटावी तसा माझा चौफेर भांग पाडून दिला.
पांढर्या वस्त्रावरील काळ्या गवतामध्ये बराच पांढरा-राखाडी रंग जमल्याचे पाहून मनात क्षणभर चिंतेचे काळे ढग दाटून आले. पण क्षणभरंच…
पांढर्या वस्त्राच्या नाडीची गाठ सोडून त्यावर जमलेले सर्व ‘निर्माल्य’ त्याने जमिनीवर हलकेच झटकून टाकले आणि नंतर केरसुणीने गोळा करून बादलीत माझ्या नजरेआड केले.
एकंदरीतच त्याने गवत मध्यम कापल्याचे आरशात पाहिल्यावर मला बरे वाटले. गेल्या वेळेस त्याने माझी मुंज करण्याचाच घाट घातला होता…असो.
“पुनरागमनाय च।” असा मनातल्या मनात विचार करून पुन्हा एकदा स्वत:ला आरशात निरखून मी माझे आसन हलवले. त्याच्या सलूनमध्ये कुठे “ग्राहको देवो भव।” किंवा “ग्राहक हाच देव।” असा संदेश चिकटवला आहे का ते मी शोधले पण नव्हता. त्याला दहा रुपये जास्त द्यावे असाही सुविचार मनात डोकावला.
तेवढ्यात त्याने मला नको तो प्रश्न विचारलाच… “अंकल, बाल कलर करवाने है क्या? अच्छे दिखेंगे…”😡😡
त्याने सांगितले तेवढेच पैसे चुकते करून घरी आलो. दोन बादल्या पाणी डोक्यावर ओतल्यावर ‘शिरगडा’स थंडावा पोहोचला.
उन्हाळ्यात थंड पाण्यासारखे आरोग्यदायी दुसरे काहीच नाही, तुम्ही सुध्दा अनुभव घ्या!😄