विविधा
? आजीचा मेकअप बॉक्स ? सुश्री गौरी दातार ☆
‘ए अग, मेकअप बॉक्स काय म्हणतेस ग,. माझं नाव ‘फणेरी’ किंवा ‘फणी करंड्याची पेटी’ असं आहे. माझं वय अंदाजे ९५ वर्ष. ?♀️. माझा जन्म गुहागर मधल्या एका खेड्यात झाला. खास फणसाच्या झाडापासून बनवलय हो मला ?आणि म्हणूनच इतकी वर्ष अडगळीत असूनही वाळवी शिवली सुद्धा नाही मला?. जुनं खोड ना मी?
एका कोकणकन्येच्या म्हणजे यमीच्या रुखवतावर ठेवण्यासाठी मी खास घडवले गेले हो…☺️
एक आयाताकृती भक्कम पेटी आहे मी. आतमध्ये दोन खण आहेत. एकात हस्तिदंती फणी, केस बांधायचे आगवळ ( म्हणजे रबर गो), आकडे, खोबरेल तेल असायचे अन दुसऱ्या खणात मेणाची डबी, पिंजर, आंबड्यावर लावायच मोत्याच फूल अन् अस काय काय असायचं बर..
पोरांनो आगवळ म्हणजे गोफ. अन् पूर्वी कपाळावर मेण लावून त्यावर गोलाकार पिंजर म्हणजे कुंकू लावायचे बर. तेव्हा ओल कुंकू अन् टिकली चा जन्म व्हायचा होता.
पेटीच्या झाकणाच्या आतल्या बाजूला छोटासा आरसा असायचा. झाकणाच्या खोबणीत बरोबर अडकवलेला होता तो.
तुम्हाला सांगते पूर्वीच्या बायका अहोरात्र काम करायच्या बरे. अगदी परकऱ्या पोरी देखील दिवसभर लुडबूडत काम शिकायच्या. भल्या पहाटे न्हाणीघरातून आल्या आल्या काय तो नट्टापट्टा. ते देखील काय तर भल्यामोठ्या केसांचा तेल लावून घट्ट अंबाडा बांधायचा अन् वर आवर्जून एक तरी फूल किवा वेणी माळायची. कपाळावर टप्पोर लाल कुंकू रेखायच अन् काय ते दागिने ल्यायचे. पावडरचा जन्म देखिल नव्हता हो झाला तेव्हा. तरी देखील माझी यमी साक्षात लक्ष्मी दिसायची हो.. मग तिची लेक आली, सून आली.
पण हो माझा वावर काय तो माजघरात होता बर. ओसरी, पडवी ठावूक नव्हती मला अन् यमीलाही.. ?
हळूहळू कालपरत्वे माजघरातील पैजणाची किणकिण ओसरीवर ऐकू येऊ लागली म्हणजे थोडक्यात सांगायचं तर स्त्रीस्वातंत्र्याचे वारे वाहू लागले अन् मोठा आरसा, माझा शत्रूच म्हणा की, भिंतीवर विराजमान झाला. झालं तेव्हा पासून माझ्या अस्तित्वाला जणू उतरती कळा लागली. ?
माझा वापर कमी कमी होत मी कशी अन् कधी अडगळीच्या खोलीत गेले कळलच नाही हो. ?
गेल्या वर्षी अचानक माळ्यावर खूप गडबड चालू झाली. ? माझी यमी तर कधीच कालवश झाली होती. तिची सून, मुलगी पण वारल्या की पूर्वीच. मग कोण बर असेल. ?
अरे देवा भंगारवाला आलाय हो. ? माझा अंत जवळ आलाय कळून चुकलं होतं मला. साक्षात यमदेव दिसायला लागला समोर. मी डोळे मिटून राम म्हणणार तोच तिने मला भंगारवाल्याच्या हातून खेचून घेतलं.
” माझ्या पणजी ची पेटी आहे ही. ही नाही न्यायची, जुनं ते सोन,” असं म्हणून तिने मला जवळ घेतलं. तब्बल सहा दशकानंतर मला मानवी स्पर्श झाला आणि तोही माझ्या पणतीचा, गौरीचा.
गौराईने मला नाहू माखू घातले, रंगवले अन् नवा लूक दिला. मॉर्डन का काय म्हणतात ना तसा. अन् आश्चर्य म्हणजे आपल्या दिवाणखान्यात मानाचे स्थान दिले. ? आता मी तिच्या दिवाणखान्यात दिमाखात बसून तिच्या घरच्या किल्ल्या सांभाळते ? आहे की नाही माझी ऐट?.
एवढेच नाही तर माझे सगळे सवंगडी म्हणजे फिरकीचा तांब्या, हांडे, घागरी अन् पाट वगैरे पण खुश आहेत आता.
आम्हाला नवा लूक अन् स्टेटस मिळालं. अजून काय पाहिजे महाराजा या मॉडर्न युगात.?
चला तर मी तुमची रजा घेते. ?
माझा एखादा सवंगडी येईलच आता त्याचं मनोगत मांडायला. ??
सायोनारा…?
लेखिका :. गौरी गोरे दातार
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈