सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
विविधा
☆ अस्तित्व… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
गेले सात-आठ महिने आपली अस्तित्वाची लढाई चालू आहे.
एवढ्याशा सूक्ष्म विषाणूने सगळ्या मानवजातीला अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला. पश्चिमेकडील काही देशांत गेल्या डिसेंबरपासून ‘करोना’ रोगाने आपला प्रभाव दाखवला आणि लाखो लोक या रोगाला बळी पडले. आपल्या भारतापर्यंत ही लाट येण्यास दोन-तीन महिने गेले. साधारणपणे मार्च २०२० पासून आपण कोरोनाचा सामना करीत आहोत. सुरवातीला प्रधानमंत्री यांनी आपल्याला या गोष्टीची वेगवेगळ्या प्रकारे जाणीव दिली.
सुरवातीला घंटानाद, त्यानंतर दीपप्रज्वलन तर एकदा ठराविक काळ दिवे घालवणे यासारख्या गोष्टींनी भारतात एकात्मतेची भावना निर्माण केली. त्यानंतर लॉक डाऊन चा काळ आपण
घालवला.आता या कोरोनालाच आपण सरावल्यासारखे झालो आहोत.. आणि पुन्हा कामाला लागलो आहोत अर्थात मनातील चिंतेचा जंतू काही गेलेला नाही. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझरचा उपयोग करुन आपण रोगापासून दूर राहण्याचा आणि आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत.
हा अस्तित्वाचा प्रश्न फार प्राचीन काळापासून सजीवांना भेडसावत आहे . लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली. मत्स्य, कूर्म, वराह ….. अशा अवस्थेतून स्थित्यंतर होत मानवी सृष्टी अस्तित्वात आली आणि त्यानंतर मानवाने मेंदूच्या जोरावर साऱ्या जीवसृष्टीला वेठिला धरले. निसर्गाचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतला. विज्ञानाच्या जोरावर मानवाने स्वतःची प्रगती केली. त्यामुळे आपण निसर्गावर अवलंबून नाही असा काहीसा ‘भ्रम’ माणसाला झाला. हिंदू संस्कृतीत पंचमहाभूतांना म्हणजेच निसर्गाला देव मानून महत्व दिले गेले. त्यामुळे माणसाचे अस्तित्व टिकवले किंवा निसर्गानुरूप आपण आपले जीवन समृद्ध केले. निसर्गाप्रती कृतज्ञता ठेवली पण हळूहळू काळ बदलत गेला आणि विज्ञान मोठे की निसर्ग असा प्रश्न निर्माण होऊ लागला. निसर्गातील प्रत्येक प्रश्नावर माणूस उपाय शोधू लागला. जसे बाहेर खूप ऊन असले तरी आपण एसीत बसून थंड हवा घेऊ शकतो किंवा एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना जलदगती वाहन म्हणून विमानाचा वापर करू शकतो.
घरातील प्रत्येक वापराची गोष्ट करताना ते अधिक सुलभ होण्यासाठी विज्ञानाचा उपयोग करतो. यामुळे आपले ‘अस्तित्व’ आपण सुखकर झाले असे म्हणतो. काही वर्षांपूर्वी रोगराई, वादळे, भूकंप, अतिवृष्टी यासारख्या संकटांनी माणसाला हतबल केले होते. पण विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण बऱ्याच रोगांवर मात केली आणि भूकंप, वादळं यासारख्या संकटा संबंधी पूर्वसूचना मिळतील अशी यंत्रसामग्री निर्माण केली की ज्यामुळे मनुष्यहानी कमी होईल याची काळजी घेता येते. माणूस आपले’ ‘अस्तित्व” टिकवण्यासाठी सतत कार्यरत राहिला.
पण नैसर्गिक नियमानुसार जसे सजीव निर्माण होतात तसा त्यांचा नाशही होणे गरजेचे असते. यावरून मला परिक्षीत राजाची गोष्ट आठवते. त्याला नाग कुलापासून धोका होता म्हणून सर्पकुलातील प्राण्यांना प्रवेश करण्यास त्याने जागाच ठेवली नव्हती. स्वतःभोवती त्याने जणू पिंजराच उभारला होता. पण खाण्याच्या बोरातून त्याला गिळंकृत करणा-या तक्षकांने कधी प्रवेश केला हे कळलेच नाही आणि त्याचा मृत्यू ओढवला!
यावरून असे दिसते की, कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपले अस्तित्व नष्ट करण्याची यंत्रणा या निसर्गात आहे आणि त्याच्याशी सामना करायची जिद्द माणसात आहे.
सध्याचा कोरोना हा जगातील लोकसंख्या नियंत्रणाचा एक परमेश्वराचा उपाय असेल किंवा माणसाच्या अति लोभी आणि अहंकारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी हे’ ‘ कोरोनास्त्र’ आले असेल. कोरोनाच्या या काळात माणसाला स्वतःची हतबलता जाणवली आहे .तसेच या निमित्ताने काही चांगले बदल ही झाले आहेत.गरीब-श्रीमंत लहान-मोठा ,जाती भेद यासारख्या गोष्टी कोरोनाच्या सार्वत्रिक आजारामुळे थोड्या कमी होण्यास मदत झाली आहे.
एकमेकांविषयी चांगली सहभावना ही जागृत झाली आहे.
ही माणसाच्या अस्तित्वाची निकराची लढाई आहे. या रोगावरील औषधे लस थोड्याच काळात येईल आणि आपण या संकटातूनपार पडू.
२०२० सालच्या आठवणी काढताना लक्षात येतंय की’ संपेल हे सर्व’ या आशेवर एक वर्ष संपून गेलं! व्हॅक्सीनेशन सुरू झाले, तरी अजून कोरोना गेला नाहीये. अजूनही मनावर या सगळ्याचे टेन्शन तर आहेच, पण पहिली लाट ओसरली म्हणेपर्यंत दुसऱ्या लाटेचे आगमन!या सर्वातून बाहेर केव्हा पडणार कुणालाच माहीत नाही!फरक इतकाच की आपण या सर्व गोष्टींना सरसावलो आहोत. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंन्सिंग हे जगण्यासाठी अविभाज्य घटक झाले आहेत.मुक्त जगायचं विसरूनच गेलो आहोत.अजून काही दिवस, काही महिने असेच जातील!मग तिसरी लाट येईल असं ऐकतोय! या सर्वातून माणसाच्या अस्तित्वाची जाणीव अधिक तीव्र झाली आहे. ज्या ज्या वेळी कोणतीही गोष्ट अति होते तेव्हा परमेश्वर म्हणा किंवा निसर्ग आपले अस्तित्व दाखवून देतो आणि आठवते…..
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈