श्री तुकाराम दादा पाटील
विविधा
☆ तू…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
तू तुफान वेगाने धावणा-या आयुष्याला एका अवघड वळणावर भेटलीस. हळूवार कुजबुजताना म्हणालीस.
“जे नको असतं तेच नेमकं गरजेपोटी पदरात पडतं. ते नाइलाजानं घ्यावही लागत. त्यालाच जन्मभर झेलाव लागत . काळीज दगडाच करून . आपल्याच माणसासाठी, आपलं आपलं म्हणत लागतं आत्मसमर्पण करायला. अस्तित्व आपलं गहाण ठेवून, आपल्याच काळजात . पराकोटीचा सोसावा लागतो छळ बिनबोभाट , आतला आणि बाहेरचा सुद्धा. उरतोच कुठे आपण आपले ! होवून जातो कळसुत्री बाहुले वास्तवाच्या हातातले. असे कैकजण असतात. संस्काराच्या आणि जुनाट संस्कृतीच्या प्रचंड ढिगा-या खाली दडपलेले.”
तू प्रथम भेटलीस. बोललीस, तुझे पाणीदार अबोल डोळे आतलं खोलवरच खूप काही सांगून गेले. तुझ्या नकळत मी समजून घेतलं सारं. कोरलच म्हण ते मी माझ्या काळजावर . मग या त्या निमित्ताने वरचेवर भेटलो. व्यथांच्या कथा मात्र कधीच ऐकवल्या नाहीत तुझ्या तोंडून. तूझं ते तुझं होत तुझ्याच काळजात साठवलेल. दडपून टाकलेलं. मला जाणवत होतं हे सारं . पण ते मला तुला विचारण्याच धाडस कधीच होत नव्हतं. कारण त्या मुळं वर्तमानच बदलून गेलं असतं याचा अंदाज होता मला. म्हणून मी ही गप्प गप्प.
पुढच्या अनेक भेटीत समज गैरसमज दृढतर होत गेले. तू अबोल मी अवाक. तुझ्या भेटीची आस बाळगून रानभर भिरभिरणारा चातक.
तेव्हा पासूनची तुझी तीचती अवस्था. आजही तशीच . बदलं काहिच नाही. तो होणार तरी कसा ? पण तुझं सोसण आणि इतरांसाठी भरभरून करणं दोन्हीही ग्रेट. प्राण जाय पर वचन न जाय म्हणतात तसं. तू वृतस्थ देवभोळी , श्रद्धाळू दैवात गुंतून देवासाठीच नव्हेतर सा-या साठीच चंदन होऊन झिजणारी. खंबीर विश्वासावर टिचून जगणारी. हे सारं वरवरचं जगाला दाखवण्या साठीचं . पण इथेच एक पण हळूच डोक वर काढायचा आणि सहजतेने विचारायचा तुला.
“कधी कुणी केली का कदर तुझी ? तुला विचारल का कधी काय हवं नको ते ? राबलीस तू तुझं विसरून अस्तित्व. पदरात बांधत राहिलीस गाठोडं पदोपदी होणा-या अपमानाच. वठवलीस भुमिका आदर्श स्त्रीची. भारतीय सुसंस्कारित नारीची . पोशिंदी बनलीस कुटुंबीयांची. मिळणारी मौलिक संधी ठोकरून. या शिवाय काहीच नव्हत तुझ्या मुलायम नाजूक सतत राबणा-या हातात. तू कधीच समाधानी
नव्हतीस हातात पडणा-या ढिगभर पैशावर . फक्त पैसाच पुरेसा पडत नसतो संसाराला. इतरही मोप लागत, जे विकत घेता येत नाही ते. त्याचे बाजारच भरत नाहीत कुठे. पण नेमक तेच तू दिलस . तू कमवू शकली नसतीस काय पैसा, सांग बरं? पण तुझ्या मनाला तो विचारसुद्धा शिवला नाही कधी, तुझा तेवढा अधिकार असूनही. फक्त राहिलीस राबत. सगळ्या साठी . सारकाही पाठीवर टाकून. शिणलीस ,भागलीस, थकलीस पण बोलली नाहीस कधी. हेच तुझं दातृत्व सोईस्कर विसरून गेलेत सारे पाटचे, पोटाचे, आणि मालकीहक्क सांगणारेही.”
तुझ्या प्रथम भेटीपासून तूला मी तशीच पहात आलोय आज तागायत. पण तू जशीच्या तशी स्थितप्रज्ञ. कमाल आहे तुझी. तुला भेटल्या पासून मी तसा बनण्याचा फक्त विचारच करत राहिलोय. पण बनलो काहीच नाही. कारण मी संवेदनाशील आणि हळवा नाही तुझ्या इतका. मी आता तुझ्या सारखाच चाकोरीबद्ध जगण्यात मुरून गेलोय. केवळ तुझ्या उदारमतवादी विचारांनी. म्हणूनच प्राकर्शान आठवतेस तू, तुझीच प्रतीमा समोर उभी रहाते. आणि काळजावर कोरली जातेस फक्त तू.
???
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈