मराठी साहित्य – विविधा ☆ निर्मळ उदकाचं तळं… सुवर्णाची कमळं… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ निर्मळ उदकाचं तळं… सुवर्णाची कमळं… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर 

शहरातल्या मुलींचा पंचमीचा सण फांद्यांवर बांधलेल्या हिंदोळ्याविना सुना-सुना जातो, तसा आमचाही गेला खरा; पण ती उणीव भरून निघाली श्रावणातल्या श्रवणीय कहाण्यांनी, श्रावणातल्या एकेक दिवसाला संस्मरणीय करण्याच्या घरातल्या श्रध्दामय संस्कृतीनं, स्वरातल्या हृदय कारुण्यानं !

‘पहिल्या आदितवारी मौनानं उठावं, सचैल स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी… ‘

आजीनं कहाणी वाचायला बसवल्यानंतर मी ती एका सपाट्यात वाचून काढत असे; पण त्यातलं काही समजत नसे. मात्र, पुढे ऐकताना व स्वतः वाचताना त्या आवडू लागल्या. त्या सर्व कळेपर्यंत श्रावण संपून जाई; मग पुन्हा पुढच्या वर्षी श्रावणाच्या कहाण्यांना सुरुवात होई.

दिव्याच्या अवसेच्या कहाणीतले दिवे अदृश्यपणे झाडांवर येऊन बसत. एकमेकांत बोलत. शुक्रवारच्या कहाणीतली बहीण दागिन्यांना जेवू घालत असे. पाटमधावराणी, चिमादेवीरांणी, सोमा परटीण, गरिबांना मदत करणारे शंकर-पार्वती जवळचे वाटत. घावनघाटल्याचा, खीर-पोळीचा, लाडवांचा नैवेद्य… साठा उत्तरांची कहाणी सुफळ संपूर्ण करण्याचं आश्वासन, हे सर्व फार आवडे. कहाणी ऐकणं, सांगणं, त्यातली उत्कंठा, चित्रमयता, ओघवत्या भाषेचा डौल, लय, छोट्या तात्पर्यातलं जीवनसूत्र… माझ्या गोष्टीवेल्हाळ मनाला रिझवून जात असे. कहाणी संपल्यावर हुरहूर वाटे.

आता तर कहाण्या सरल्या. त्याबद्दल वाटणारं सुनेपणही उरलं नाही. खूप खोलवर हृदयात मात्र कहाण्यांचे शब्द नांदतात. निर्मळ उदकाचं तळ, सुवर्णाची कमळं कधीतरी थरथरतात. त्यांना कहाणी सांगून मीच जोजवलं आहे. नागचवथीनंतर पंचमी, शिळा सप्तमी, नारळी पौर्णिमा, जन्माष्टमी, श्रावणी सोमवार, जिवतीचे शुक्रवार… श्रावणातले एकेक दिवस भराभर येत आणि जात; पण घरातल्या माहेरवाशिणींच्या, नव्या सुनांच्या पहिल्या मंगळागौरीचा आठव येतो, तेव्हा श्रावण घमघमतो. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातला आनंद ओसंडून वाहत असे. पूजेचं साहित्य, फुलपात्री, फराळाची तयारी, मुलींची बोलावणी… याची घाई उडत असे. त्यांचे लग्नातले शालू सळसळत असत. समवयस्क नवविवाहित मैत्रिणींचे हास्यविनोद, दबत्या आवाजातलं काही बोलणं… दोन-चार वर्षांपूर्वी निरोप दिलेल्या शाळेच्या आठवणी… पूजेची सामग्री सावरण्याची घाई… आरती, फराळ, जागरण, खेळ… माझ्या डोळ्यांवर झोप अनावर होई… त्यांच्या सौख्याचा गंध प्राजक्ताच्या फुलांतून, केवड्यातून ओसंडत असे. पतीचं नाव घेताना झक्क लाजणाऱ्या मुलींचे चेहरे घेऊन आलेला श्रावण आता लोपला. मंगळागौर पूजणाऱ्या त्या स्त्रियांचे संसार… त्यातले चढ-उतार पाहिले. त्यांनी धीरानं सोसलेली दुःखंही पाहिली… जीवनकहाणी सुफळ संपूर्ण होण्यासाठी त्यांनी मंगळागौरीला मागितलेलं वरदान किती खरं ठरलं… बालकवींच्या ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ कवितेतल्या श्रावण महिन्याचं गीत ज्यांच्या चेहऱ्यावरून वाचून घ्यावं, अशा ‘ललना’ मी पाहिलेल्या आहेत… माझ्याच घरातल्या स्त्रियांनी श्रावणमासाचं सुरेल गाणं मला ऐकवलं आहे.

चित्रपटगीतांचा, भावगीतांचा पाऊस बरसत राहिला अन मी त्यातला श्रावण अलगद झेलला.

सावन-भादोची लयलूट असे गाण्यांतून. प्रियकरावाचून श्रावण म्हणजे भर पावसात जणू अग्नी तापतो आहे, श्रावणझडीसारखे डोळे झरत आहेत… अशा अर्थाच्या गीतांनी बहरलेल्या चित्रसृष्टीच्या गाण्यांतून माझ्या हाती पडलेल्या एक-दोन गाण्यांनी माझा श्रावण सजलेला आहे. सैगलच्या ‘देवदास’ मधल्या अजरामर गाण्यातली एक ओळ मला भिडते अन् त्यातल्या कारुण्यानं श्रावण भिजवून जाते……

 ‘सावन आया तुम ना आये… ‘

आजवर ऐकलेल्या श्रावणातल्या विरहगीतांतूनही ओळ नेमकी ओंजळीत येते.

‘बालम आये बसो मोरे मनमें ‘

या गीतातून सहा-सात दशकांचं अंतर पार होतं. ते जणू माझं सांत्वन करण्यासाठीच घडतं.

‘बंदिनी’तल्या शैलेंद्रच्या गाण्यातूनही मी श्रावण ऐकते.

‘अब के बरस भेज, भैय्या को बाबुल,

सावन में ली जो बुलाय के… ‘

लखनौकडे गायल्या जाणाऱ्या पारंपरिक चालीत बांधलेल्या गाण्यात आशाचा स्वर एका ओळीत रुद्ध होतो.

‘बैरन जवानीने छीने खिलौने

और मेरी गुडिया चुरायी

बाबुलजी मैं तेरे नाजोंकी पाली,

फिर क्यों हुई मैं परायी… ‘

सासर-माहेरमध्ये झुलणाऱ्या स्त्रीमनासाठी हिंदोळा नकोच. डोळे भिजायला पंचमीचा सण तरी कशाला हवा ! भातुकलीचा खेळ संपून खरा-खरा डाव हाती आला तरी ही हुरहूर का?

‘ क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे… ‘

… सारखा हा लपंडाव कशासाठी? श्रावण महिन्याची गीतं वाचायला ही आयुष्यं समजायला हवीत— की ती समजण्यासाठी श्रावण अनुभवायला हवा? मरगळलेल्या मनाला मात्र आता दूर रानात न्यायला हवं — बगळ्यांची माळ उडताना पाहायची आहे ना !

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘गण ‘पती‘☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ शिक्षक दिन ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

आज शिक्षक दिन… सर्वप्रथम माझ्या सर्व शिक्षकांना माझा सादर प्रणाम !!!

मनुष्य उपजल्यापासून मरेपर्यंत काहीना काही शिकत असतो, ज्ञान प्राप्त करीत असतो. ते ‘ज्ञान’ का ? कसे ? कोणासाठी ? व कधी आचरणात आणायचे हे ‘विवेका’ने ठरवावे लागते असे अनेक ‘महाजनां’नी आपल्या आचरणातून दाखवून दिले आहे. हा ‘विवेक’ अंगी बाणवण्यासाठी अनेक जण आपल्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत करीत असतात मार्गदर्शन करीत असतात. ही सर्व मंडळी लौकिक अर्थाने किंवा पेशाने शिक्षक असतातच असे नव्हे!!

आद्यगुरू आई आणि बाबा. त्यांना माझा साष्टांग नमस्कार. पूर्व सुकृत चांगले असावे आणि भगवंताची कृपा झाली असावी, म्हणून मला उत्तम आईबाप लाभले.

सर्ग हा आपला एक उत्तम शिक्षक आहे. या सृष्टीत अनेक प्रकारचे जीव, जंतू, वनस्पती, प्राणी, पक्षी आहेत, ते आपापले जीवन जगत आहेत, परंतु त्यांच्यात वैर नाही, दुजाभाव नाही, मत्सर नाही, द्वेष नाही, स्पर्धा नाही…

यातील एक गोष्ट जरी आत्मसात करता आली तरी मनुष्याचे जीवन अधिक सुखरूप होईल, नाही का ? एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की जो मनुष्य आपल्याशी वाईट वागतो, (खरे तर तो त्याच्या स्वभावानुसार वागत असतो, त्यात चांगल वाईट काही नसते) तोच आपला उत्तम गुरू असतो. “चांगल वागणारी माणसे कसे वागावं हे शिकवतात आणि वाईट माणसे कसे वागू नये ते शिकवतात’. थोडक्यात सर्वजण आपल्यासाठी *गुरू*ची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे या सर्वांप्रति आपण कृतज्ञ राहायला हवे.

आजपर्यंत, मला असे अनेक ‘शिक्षक’ लाभले. त्यांच्यामुळे माझे जीवन समृद्ध होत आले आहे. ‘शिक्षकदिना’चे औचित्य साधून मी या सर्व ज्ञातअज्ञात ‘शिक्षकां’ना वंदन करीत आहे. परमेश्वर कृपेने मला लाभलेला हा अमूल्य वारसा पुढील पिढीला देण्याचा मी प्रयत्न करेन.

सर्व ज्ञात-अज्ञात शिक्षकांना ही शब्द सुमनांजली सादर समर्पण !!!

भारतमाता की जय!!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कालाय तस्मै नम: ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ कालाय तस्मै नम:  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

सुखकर्ता, दु:खहर्ता श्री गणेश म्हणजे, प्राचीन काळापासूनचे हिंदू-धर्मीयांचे आराध्य दैवत. कोणत्याही देवतेचे पूजन करण्याआधी किंवा शुभकार्यास सुरुवात करण्याआधी श्रीगणेशाचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आजही मोठ्या श्रध्देने पाळली जाते. दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते चतुर्दशी हे दहा दिवस, घरोघरी, गणरायाच्या मातीच्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करून, तिची स्वतंत्र पूजा-अर्चा करण्याची प्रथाही गेली कित्येक वर्षे अखंडपणे पाळली जाते आहे. गणपती खरोखरच आपल्या घरी मुक्कामाला आले आहेत असे समजून, सारे घर, सारे वातावरणच त्यावेळी आनंदमय, चैतन्यमय होऊन जाते.

या घरगुती आनंदोत्सवाला, सार्वजनिक उत्सवाचे रूप द्यावे हा विचार सर्वप्रथम, स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांनी केला. तो काळ पारतंत्र्याचा होता. सारा देशच त्यात भरडला जात होता. ब्रिटिश सत्तेच्या जुलुमाविरुध्द आवाज उठवलाच पाहिजे म्हणून टिळकांसारख्या साहसी व देशप्रेमी व्यक्ती निर्धाराने सज्ज झाल्या होत्या. एवढ्या ताकदवान सत्तेविरुद्ध लढणाऱ्यांची ताकदही तितकीच जोरकस हवी हे जाणून, त्या दृष्टीने, समाजातील सर्व थरांतील लोकांना एकत्र आणणे, त्यांच्यात एकजूट निर्माण करणे, आणि त्या माध्यमातून ती परकीय राजवट उलथवून टाकणे सर्वप्रथम गरजेचे होते, हे लोकमान्यांना तीव्रतेने जाणवले. पण उघड उघड असे लोकांना गोळा करणे म्हणजे सरकारी रोष ओढवून घेणेच होते. म्हणूनच अत्यंत तल्लख बुध्दिमत्ता लाभलेल्या लोकमान्यांनी, देवाच्या नावाखाली समाजाला एकत्र आणता येईल, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांचे प्रबोधन करता येईल, हा एक अचूक विचार केला व तोपर्यंत घरगुतीपणे साजरा होणारा गणेशोत्सव, सार्वजनिकपणे साजरा करण्याची नामी युक्ती शोधून काढली. समाजातल्या प्रत्येक घटकाने त्यानिमित्त एकत्र यावे, जातीभेद विसरून, एकोप्याने, विचारांची देवाणघेवाण व्हावी, जनतेचे त्यादृष्टीने प्रबोधन व्हावे, व स्वातंत्र्याच्या विचाराचे लोण आपसूकच मना-मनांमध्ये पसरून, सर्वांनी मिळून पारतंत्र्याविरुध्द एकजुटीने आवाज उठवावा, असा लोकमान्यांचा यामागचा विचार व उद्देश होता. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी देशभर अनेक दिशांनी प्रयत्न केले जात होते. महाराष्ट्रात लोकमान्यांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेला असाच एक प्रयत्न होता. स्वातंत्र्याबाबत प्रबोधन करणारे अनेक वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम अशा उत्सवातून, सरकारला अजिबात शंका येणार नाही, याची व्यवस्थित काळजी घेत राबवले जाऊ लागले. आणि “स्वातंत्र्य” ही संकल्पनाच नव्याने माहिती झालेल्या अनेक देशवासियांसाठी ते अत्यंत प्रेरणादायक ठरू लागले…

यथावकाश भारताला स्वातंत्र्य मिळाले, लोकांचे स्वत:चे राज्य आले, तरी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा जपली गेली. काही वर्षे खरोखरच खूप साधेपणाने, सोज्वळपणे हा उत्सव साजरा होत राहिला. त्यानिमित्ताने, उत्तम संगीत, उत्तम साहित्य, उत्तम कला यांचा आस्वाद सर्वसामान्यांनाही घेता यावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जात असत. सार्वजनिक असूनही घरगुती वाटावा, अशा पावित्र्याने साजरा केला जाणारा, शब्दश: सर्वांचा, सर्वांसाठी असणारा हा उत्सव आहे असेच तेव्हा वाटत असे…

अर्थात सर्व सजग आणि सूज्ञ नागरिक हे सर्व काही जाणतातच.

पण स्वातंत्र्याचा परिपाक स्वैराचारात झाल्याचे अनेक सार्वजनिक क्षेत्रात जसे ठळकपणे दिसू लागले, तसे त्याचे पडसाद गणेशोत्सवावरही उमटू लागले अणि पहाता पहाता या सार्वजनिक उत्सवातले पावित्र्य, साधेपणा व आपलेपणाही हरवू लागल्याचे चित्र ठळकपणे दिसू लागले. ‘नको हा उत्सव’ असे वाटायला लावणारे त्याचे सध्याचे अनिष्ट रूप सूज्ञांना विचारात पाडणारे असेच आहे. सामाजिक भान ठेवून या निमित्ताने रक्तदानासारखे विधायक उपक्रम राबवणाऱ्या काही मोजक्याच मंडळांचा अपवाद वगळता, गणेशोत्सव म्हणजे धुडगूस, लोकांकडून बहुदा जबरदस्तीनेच गोळा केलेल्या ‘वर्गणी’ ची मूठभर लोकांकडून मनमानी उधळपट्टी, समाजहिताचा निर्लज्ज विसर, दुर्मिळ विजेची अनावश्यक व वारेमाप नासाडी, बेधुंदीसाठी नशेचा राजरोस वापर, आवाज, प्रकाश, धूळ यांचे प्रचंड प्रदूषण, त्यामुळे होणाऱ्या नागरिकांच्या हालांकडे सोईस्कर दुर्लक्ष, असे सर्वच आघाड्यांवरचे भेसूर चित्र पाहून, खरोखरच हतबल झाल्यासारखे वाटते. “ चला.. गणपती आले … आता जरा enjoy करू या “ एवढ्या एकाच उद्देशाने आता लोक गणपती ‘ बघायला’ मुलाबाळांसह आवर्जून बाहेर पडतांना दिसतात …आणि “ सार्वजनिकता “ या शब्दाचा मूळ अर्थच पार पुसला गेला आहे हे ठळकपणे जाणवते. लोकांच्या ‘एकत्र’ येण्याचा असा विघातक अर्थ आणि वापर, विचार करू शकणा-या सर्वांनाच खरोखरच अस्वस्थ करतो. या सगळ्या अनिष्ट आणि पूर्णतः अनावश्यक गोष्टींचा आपल्या मुलांवर तितकाच अनिष्ट आणि नकोसा असा विपरीत परिणाम नकळत होतो आहे, हे हल्लीच्या ‘शिकलेल्या’ पालकांच्या ध्यानीमनीही नसते ही खरोखरच सर्वांसाठी अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे.

खरे तर, लोकमान्यांच्या मनातला सार्वजनिक गणेशोत्सवामागचा उद्देश आणि या उत्सवाचे आत्ताचे बीभत्स स्वरूप यातली ही प्रचंड तफावत पाहिली, की ‘ हे पाहण्यास लोकमान्य इथे नाहीत ते बरेच आहे ’ असे वाटल्याशिवाय रहात नाही… आणि असेही खात्रीने वाटते की ते असते, तर ज्या करारीपणाने, धडाडीने आणि देशाच्या तेव्हाच्या परिस्थितीत अतिशय दूरदर्शी अशा विचाराने त्यांनी हा उत्सव सुरू केला होता, तितक्याच.. किंबहुना त्याहीपेक्षा जास्त करारीपणाने त्यांनी हा उत्सव बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असते….. अर्थात सतत बदलणारा काळ, प्रत्येक क्षेत्रात अकारण लुडबूड करणारे- स्वार्थाने बरबटलेले ‘ स्वदेशाचे राजकारण (?) ‘, आणि विचार करू शकणाऱ्या प्रत्येक जागरूक पण हतबल, आणि ‘ पण मी एकटा काय करू शकणार ? ‘ असा नाईलाजाने विचार कराव्या लागणाऱ्या नागरिकाला चिंतेत पाडणारी भरकटलेली.. दिशा चुकलेली सामाजिक मानसिकता – या सध्याच्या दारुण आणि दुर्दैवी परिस्थितीत लोकमान्यांना तरी हे काम आधीच्या सहजतेने करणे शक्य झाले असते का.. किंबहुना ( with due respect ) शक्य तरी झाले असते का ? — हा प्रश्न नक्कीच पडतो… वाऱ्याबरोबर तोंड फिरवणारे so called मुत्सद्दी राजकारणीच त्यांना असं करूच देणार नाहीत असं खात्रीने म्हणावसं वाटतं.

तसंही हा उत्सव आता खऱ्या अभिप्रेत अर्थाने “ सार्वजनिक “ राहिला आहे असं म्हणणं म्हणजे धादांत खोटं बोलण्यासारखंच आहे. सामाजिक मानसिकता जराशी तरी बदलू शकेल अशी शक्यता निर्माण करू शकणारा ‘ एक गाव एक गणपती ‘ हा साधा सोपा मार्ग सुद्धा हल्लीच्या तथाकथित दादा-भाऊ-अण्णा-काका-साहेब अशी ‘बिरुदं’ स्वतःच स्वतःला चिटकवणाऱ्या नेत्यांनाच विचारातही घ्यावासा वाटत नाही हे समाजाचे कमालीचे दुर्दैव आहे. आणि त्याची कारणे आता सगळा समाजच जाणतो.. पण.. पण तसे जाहीरपणे बेधडक बोलण्याची हिम्मत असणारा आणि त्याविरोधात लढण्यासाठी स्वतः सज्ज झालेला एकही अध्वर्यू “ लोकमान्य “ स्वातंत्र्योत्तर काळात उदयाला आलेला नाही हेच तर या देशाचे अतीव दुर्दैव आहे.

फक्त सार्वजनिकच नाही, तर घरगुती गणेशोत्सवातही काळानुरूप खूपच फरक पडलेला दिसतो. पूर्वीची एकत्र कुटुंबे विभक्त झाली, घरातल्या स्त्रीला अर्थार्जनासाठी बाहेर पडावे लागले. या सर्वांचा अटळ असा परिणाम, घरगुती गणेशोत्सवावरही अपरिहार्यपणे झालेला दिसतो. जगण्यासाठीची लढाई दिवसेंदिवस तीव्र होत असतांना, एकत्रितपणे सण-उत्सव साजरे करण्यातला निखळ आनंद, त्यानिमित्ताने सर्वांनीच एकमेकांना अधिक जाणून घेणे, एकमेकातले आपलेपणाचे बॉंडिंग नकळत वाढवणे, जबाबदारी वाटून घेणे आणि ती पेलण्यास उत्सुक होणे, आणि यातून निर्माण होणारी प्रसन्नता एकत्र साजरी करणे, हे सगळेच आता कुठेतरी हरवल्यासारखे.. खरं तर लोप पावल्यासारखे वाटते आहे.

घड्याळाचे गुलाम झाल्यावर, गणपतीसाठीही आता मोजून मापूनच वेळ उपलब्ध असतो, व तेवढ्याच वेळात या उत्सवाचे सर्व सोपस्कार बसवावे लागतात, ही अपरिहार्य म्हणावी अशी जीवनशैली बहुतेकांना बहुदा मनाविरूध्द स्वीकारावी लागलेली आहे. आणि हळूहळू ती अंगवळणीही पडलेली आहे. मग एकाच गावातले दोन भाऊ, गणपतीला एकमेकांकडे चार दिवस का होईना निवांत भेटतील, एकत्रपणे साग्रसंगीत पूजा-प्रार्थना करतील, घरीच हौसेने बनवलेल्या विविध नैवैद्यांवर ताव मारतील, आणि अगदी मनापासून या उत्सवात रममाण होतील, हे चित्र स्वप्नवत वाटू लागल्यास नवल नाही, आणि यात कुणाचीच, अगदी कळत-नकळत चूकही नाही, असे आजकाल अगदी प्रांजळपणे वाटत रहाते… तरीपण.. अगदीच न सोडवता येण्याइतका हा प्रश्न जटिल आहे का ?.. या प्रश्नाचे उत्तर नक्कीच नकारार्थी असायला हवे… यात अडचण फक्त एकच —- “ मी.. आणि माझे.. “ ही फक्त शरीरानेच नाही तर मनानेही मनापासून विभक्त करायला लावणारी ‘ आधुनिक ‘ आणि so called अत्यावश्यक मानली जाऊ लागलेली व्यक्तिगत मानसिकता… जी खरोखरच चिंताजनक आहे…. मग सामाजिक मानसिकतेचा विचारही सहज वेड्यात काढता येण्यासारखा…. ‘ असो ‘.. एवढेच एखादा सुजाण आणि दूरदर्शी असणारा माणूस म्हणू शकतो नाही का ?…. तर “ असो “.

पण.. पण … नुकत्याच दोन आशादायक आणि आनंददायक बातम्या कळल्या आहेत त्या अशा की…….

१ ) नुकताच अनेक ठिकाणी सार्वजनिक दहीहंडीचा जोरदार कार्यक्रम पार पडला. त्यातली एक हंडी होती पुण्यातल्या मंडईजवळ असलेल्या लोकमान्यांच्या पुतळ्यासमोरच्या रस्त्यावर बांधलेली – नेहेमीसारखीच – पण या वर्षी विशेषत्वाने सांगायलाच हवा असा बदल म्हणजे त्या परिसरातल्या चक्क ३५ मंडळांनी एकत्र येऊन एकच हंडी बांधली होती …. आणि हा उत्सव यशस्वीरित्या साजरा केला होता. भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव ट्रस्ट या मानाच्याच मंडळाच्या पुनीत बालन नावाच्या तरुणाने यासाठी पुढाकार घेतला होता आणि अंधारलेल्या सामाजिक मानसिकतेला आशेच्या उजेडाचा एक कोवळा कोंब फुटल्याची आनंददायक जाणीव झाली.

२ ) दुसरी बातमी गणेशोत्सवाची. कसबा गणपती हे पुण्याचे आराध्यदैवत, आणि देवस्थानाचा गणपती हा उत्सवातील मानाचा गणपती. तरी त्या चिंचोळ्या आणि गजबजलेल्या कसबा पेठेत गल्लोगल्ली अनेक मंडळे त्यांचा स्वतंत्र उत्सव साजरा करत होते आणि रहिवाशांना मुकाट त्रास सहन करावा लागत होता. पण या वर्षी देवस्थानाने असा प्रस्ताव मांडला आहे की संपूर्ण कसबा पेठेचा मिळून एकच सार्वजनिक गणपती बसवायचा आणि सहभागी प्रत्येक मंडळाने, त्यांनी गोळा केलेल्या वर्गणीतून एकेक दिवस आरतीचे सर्व नियोजन … सर्व खर्च सांभाळायचा…. आणि तिथल्या इतर सगळ्या मंडळांनी ह्या प्रस्तावाला चक्क मान्यता दिलेली आहे असे समजते. ….

‘सारासार आणि सामूहिक विचार उत्तम काम करायला उद्युक्त करतो ‘.. हा लोकमान्यांचा महत्वाचा विचार आणि उद्देश पुन्हा असा नव्या मार्गाने नव्या प्रकारे रुजू लागला तर त्यापरता दुसरा आनंद तो कोणता ?

… यावर्षी सुखकर्ता दु:खहर्ता या आरतीबरोबरच ‘आता हा नवा सकारात्मक विचार समाजात पक्का रुजू दे.. फुलू दे फळू दे.. ‘ ही प्रार्थना मनापासून करत गणपतीला नमस्कार करता करता, आपण त्या जोडीने असेही आवर्जून म्हणू की- ‘‘कालाय तस्मै नम:”

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘गण ‘पती‘☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ गण ‘पती… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांची अधिष्टात्री देवता म्हणजे गणपती. प्रामुख्याने प्रचलित असलेली गणपतीची रूपे खालील प्रमाणे आहेत. कोणी त्याला लंबोदर म्हणतं, तर कोणी वक्रतुंड, कोणी मोरया तर कोणी भालचंद्र, कोणी सुखकर्ता तर कोणी दुखहर्ता, कोणी सिद्धिविनायक तर कोणी वरदविनायक. अशी बरीच नावे आपापल्या श्रद्धेनुसार भक्तांनी गणपतीला बहाल केली आहेत आणि गणपतीने देखील वेळोवेळी आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जाऊन वरील सर्व संबोधने सार्थ सिद्ध केली आहेत. खरंतर कोणत्याही देवतेचे सर्व गुण हे आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी, सर्वांगीण उन्नतीसाठी, सकल मंगल साधण्यासाठीच असतात. त्या देवतेच्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा त्या देवतेचे महात्म्य वाढविणे असा त्यामागील हेतू नसतो. थोडा सूक्ष्म विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की साधना किंवा भक्ती वृद्धिंगत व्हायला लागली की त्या त्या उपास्य देवतेचे गुण त्या साधकाच्या/भक्ताच्या अंगात प्रगट व्हायला लागतात आणि त्या गुणांमुळेच त्या भक्तांचे संकट हरण होते. पू. रामकृष्ण परमहंस यांनी अनेक प्रकारच्या साधना /उपासना केल्या. जेव्हा त्यांनी हनुमंताची उपासना केली तेंव्हा त्यांना हनुमंताप्रमाणे शेपूट फुटले होते असे वर्णन त्यांच्या चरित्रात आढळते

मला मात्र गणपतीच्या ‘गणपती’ या नावा बद्दल आणि कार्याबद्दल विशेष आदर आहे. ‘गण’ हा संस्कृत शब्द असून त्याचा समूह असा अर्थ होतो. एका अर्थाने गणपती ही नेतृत्वगुण असलेली सामाजिक देवता आहे. कुशल नेतृत्वगुण दाखविणारे, समाजातील सर्व घटकांना एकसंघ करणारे आणि त्यांना कार्यप्रवृत्त करून विजयी बनविणारी देवता म्हणजे गणपती. सैन्य म्हटले की त्यात अनेक सैनिकांचा समावेश होतो. सैनिकांना अनेक कौशल्ये आत्मसात असावी लागतात, अमुक एक गोष्ट येते आणि अमुक गोष्ट येत नाही, असे सैनिक म्हणू शकत नाही. सैनिकाला एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढावे लागते आणि म्हणूनच या सर्वांचे नेतृत्व करणाऱ्या गणपतीकडे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे अधिपतीपद आले असावे. एक कल्पना अशी करता येईल की गणपती ही देवता असेलही, पण असे समाजाला संघटीत करून, योग्य नेतृत्व देऊन आणि त्याला कार्यप्रवण करणारे नेतृत्व जेंव्हा जेंव्हा आपल्या समाजात पुढे आले किंवा प्रयत्नपूर्वक संकल्पपूर्वक प्रस्थापित केले गेले, तेंव्हा तेंव्हा आपण विजयी झालो असे इतिहास सांगतो. अनेक राजे, महाराजे, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक या गुणांचे निःसंशय आदर्श आहेत.

खरंतर आपले सर्व सण हे सामाजिक अभिसरण, संस्कृती आणि पर्यावरण रक्षणाचे प्रतीक आहेत असे म्हटले तर नक्कीच सार्थ ठरेल. मधल्या काळात आपण हे सर्व विसरून गेलो होतो. पण आपल्याकडील सामाजिक आणि राजकीय पुनरुत्थानाचे/ पुढाऱ्यांचे अर्ध्वयु लोकमान्य टिळक यांनी या उत्सवाची सामाजिक बाजू आणि परिणामकारकता बरोबर हेरली आणि ‘माजघरा’तील गणपतीला ‘रस्त्यावर’ आणले ( सार्वजनिक केले) आणि त्यातून सामाजिक उन्नती साधण्याचा, बंधुभाव वाढविण्याचा आणि समाजातील जातीभेद नष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ब्रिटिश सरकार विरुद्ध वातावरण तयार करण्यासाठी सुद्धा त्याचा प्रभावी माध्यम म्हणून उपयोग झाला. एक सामाजिक चळवळ म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना जनमानसात लोकमान्यांनी रुजवली आणि आज सुद्धा अपवाद वगळता ही सर्व मंडळे सामाजिक उत्थानाचे कार्य करीत आहेत.

सार्वजनिक गणपती आणि खासगी गणपती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात प्राण प्रतिष्ठित केले जातात. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेले कार्य जर आपण त्या माध्यमातून करू शकलो तर ती खऱ्या अर्थाने सामाजिक उत्थापन करणारी सर्वात मोठी चळवळ ठरेल, त्यासाठी कालानुरूप या चळवळीत शिरलेल्या अनिष्ठ प्रथा आपल्याला खंडित कराव्या लागतील. त्या काळात ब्रिटिशांशी लढायचे होते, आज मात्र आपले स्वकीयच शत्रू आहेत. आणि खरं तर आपली लढाई आपल्याशीच आहे. “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग” अशी आपली प्रत्येकाची परिस्थिती आहे. पण ही लढाई तशी सोपी नाही, कारण शत्रू समोर दिसत नसल्यामुळे त्याचा प्रतिकार करणं अवघड आहे. मनातील सहा विकारांशी लढायचे आहे. त्यासाठी आपल्याला मन, बुद्धि, चित्त, वित्त, या सर्वांच्या साहाय्याने अंतर्मनातील या विकारांवर विजय मिळवायचा आहे. यात मन हे गणपतीचे प्रतीक आहे. मन गणपती होण्यासाठी मात्र आपल्याला साधना करावी लागेल, त्यासाठी आपल्याकडे अनेक मार्ग आहेत.

‘गणपती उत्सव’ साजरा करीत असताना मी व्यक्तिगत स्वरुपात काय काय करू शकतो याचा आपण थोडा विचार करूया. बहुतेक आपल्याही मनात असेच काही आले असेल. कारण सर्वाना बुद्धि देणारा एक गणपतीचं आहे.

# आजपासून माझा गणपती पर्यावरणानुकूल असेल.

# प्लास्टिक, थर्माकोल, मेणाचे दिवे, चिनी तोरणे यांचा वापर करणार नाही.

प्रसाद म्हणून घरी केलेला कोणताही पदार्थ असेल.

# कर्ण मधुर भारतीय संगीत असेल. (चित्रपट गीते नसतील)

# गणपतीच्या मूर्तीच्या उंचीची स्पर्धा न करता त्याचे गुण आत्मसात करुन माझ्या व्यक्तिमत्वाची उंची वाढविण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.

# गणपतीच्या आरत्या शुद्ध स्वरूपात आणि तालात म्हणेन.

# माझे गणपती स्तोत्र किंवा अथर्वशीर्ष तोंडपाठ असेल.

# आजपासून रोज सामूहिक रित्या गणपती स्तोत्राचे पठण करू.

# गणपती विद्येची देवता असल्यामुळे शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मी यथाशक्ती मदत करेन.

# आपण आपल्या कल्पकतेनुसार यात अनेक उपक्रमांची भर घालू शकतो.

आज चतुर्थीच्या निमित्ताने आपण सर्वानी मनाला ‘सबळ’ करण्याचा आणि आपल्याला शरीरातील सर्व इंद्रियांवर मनरुपी गणपतीच्या सहाय्याने विजय मिळवण्याचा संकल्प करूया. सुखकर्ता गणपती आपणा सर्वांना नक्कीच साहाय्यभूत होईल.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ याला जीवन ऐसे नाव… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  विविधा ?

☆ याला जीवन ऐसे नाव… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

जीवनाचा अर्थ अनेकजणांनी वेगवेगळ्या पध्दतीने सांगितला आहे. हे सांगताना, त्यांना आलेले अनुभव आणि एकूणच त्यांचे भावविश्व त्यातून दिसून येते.

भारताचे एक ज्येष्ठ क्रिकेटवीर सुनील गावस्कर एका गीतात हे ‘जीवन म्हणजे क्रिकेट राजा’ असं म्हणतात तर ‘आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे’ असं गीतकार अवधूत गुप्ते यांना वाटतं. कुणाला असं वाटतं की, माणसाचं जीवन हे दैवाच्या हातातलं खेळणं आहे. दैववादी लोक असं ‘प्राक्तन’हे महत्वाचं आहे, असं मान्य करतात तर, प्रयत्नवादी ‘तळहातावरच्या रेघा हे आपलं भविष्य ठरवत नाही तर, त्या तळहातामागील मनगट हे आपलं जीवन घडवतं’ असं म्हणतात.

माणूस हा या पृथ्वीवरील सर्वात बुध्दीवान सजीव आहे. आपली बुध्दी आणि कौशल्याच्या आधारे त्याने अनेक अवघड बाबी सहजसाध्य केल्या आहेत. माणसाच्या या कर्तृत्वाला शब्द देताना, ‘माणूस माझे नाव’ या कवितेत बाबा आमटे म्हणतात,

“बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर,

परी जिंकले सातहि सागर,

उंच गाठला गौरीशंकर…

 साहसास मज सीमा नसती,

नवीन क्षितिजे सदा खुणावती,

दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव,

माणूस माझे नाव”.

अमिताभ बच्चन यांना भारतीय चित्रपट क्षेत्रातील ‘बीग बी’ म्हणून ओळखले जाते. एक वेळ अशी आली, जेव्हा अमिताभ बच्चन इतके समस्यांच्या दरीत फेकले गेले की, चित्रपट क्षेत्रात त्यांना प्रचंड अपयश आलं, ज्या राजकारणात त्यांनी उडी घेतली होती, तिथेही ते अपयशी ठरले आणि त्यांनी चित्रपटसंन्यास घेतला, चित्रपट निर्मितीसाठी ए. बी. सी. एल्. नावाची जी कंपनी सुरू केली होती तिही डबघाईला येऊन ते दिवाळखोर बनले. कर्जदार घरी येऊन धमक्या देऊ लागले. अशा बिकट प्रसंगी, अमिताभ बच्चन यांनी, यश चोप्रांकडं जाऊन, “मला काम द्या” अशी विनवणी केली. त्यानंतर जिद्द, प्रचंड काम यातून, त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतली. आज भारतीय समाजमनावर राज्य करणारे, शतकातील महानायक म्हणून त्यांचा गौरव केला जातो (१).

फाळणीनंतरची अंगावर शहारे आणणारी आणखी एक सत्यकथा…

सीमेजवळच्या एका खेड्यात(जे खेडं बाहेरच्या जगापासून खूप दूर होतं)काही बाहेरच्या लोकांकडून, या गावातील लोकांवर भीषण हल्ला होतो. या नरसंहारात, तलवारीने घायाळ झालेला एक असहाय्य बाप आपल्या १५ वर्षाच्या लहान मुलाला म्हणतो,

“भाग मिल्खा भाग, जीव वाचव, इथून लगेच पळून जा”. वडलांची ती आज्ञा शिरसावंद्य मानून भेदरलेला लहानगा मिल्खा पळून भारतात येतो. वडलांचे अखेरचे शब्द जीवनासाठीचा संदेश मानून, प्रचंड मेहनतीने भारताचा वेगवान धावपटू बनतो. एका अटीतटीच्या धावण्याच्या लढतीत लाहोरमध्ये एका अव्वल पाकिस्तानी धावपटूला तो हरवतो आणि तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्रप्रमुख आयुबखान यांच्याकडून  ‘फ्लाईंग सीख ‘ हा किताब मिळवतो (२).

भारतीय मनांवर प्रभाव पाडणारी दोन तत्वज्ञानं काय म्हणतात?

‘तूच तुझ्या जीवनाचा दीप बन (अत्त दीप भव)’ असं गौतम बुद्ध म्हणतात. तर श्रीमद्भगवद्गीता सांगते की, ‘हे माणसा, तूच तुझा उध्दार कर (ऊध्दरेदात्मनात्मानम्)’.

… अशी महावाक्यं किंवा काही यशस्वी ठरलेल्यांचं जीवन जरी सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायक असली तरी एक बाब लक्षात घेतली पाहिजे, आणि ती म्हणजे, आजचा माणूस हा बेटावर एकटादुकटा रहाणारा प्राणी नाही तर, भोवताल (नैसर्गिक पर्यावरण आणि समाज) त्याचे यशापयश ठरवण्यास कारणीभूत असतात. यादृष्टीने तारतम्य बाळगून, निर्णय घेणे शहाणपणाचं ठरतं.

दोन उदाहरणं घेऊ…..

महाभारत काळातील भारतीय संस्कृतीतील एक यशस्वी नायक म्हणून श्रीकृष्णाचे नाव घेतलं जातं. आपलं अंतिम उद्दिष्ट लक्षात घेऊन श्रीकृष्णानं प्रसंगी, ‘रणछोडदास’ असा उपहासात्मक शेराही ऐकून घेतला. अलिकडच्या काळातील एक द्रष्टा राजा, छत्रपती शिवाजी महाराज. अफझलखान नावाचं महाबलशाली आणि तितकेच क्रूर संकट आल्यावरही, उघड्यावर त्याच्याशी सामना न करता, एका रणनितीने खानाचा पराभवच नव्हे तर, खातमा करण्याचं कौशल्य हे असंच अनुकरणीय आहे. म्हणूनच जगात अनेक ठिकाणी महाराजांचा एक कुशल, मुत्सद्दी व्यवस्थापन कलेतील वाकबगार सेनानी या भूमिकेतून अभ्यास केला जातो.

यासाठी, दुर्दम्य आशावाद, नेमकेपणाने ध्येयाची निवड, प्रयत्न यांचबरोबर, आलेले अपयश हा अनुभव समजून, त्यापासून धडा घेऊन, प्रसंगी साधनांना मुरड घालून, काही तडजोडी, तर कधी परिस्थितीशी जुळवून घेऊन, ध्येयाकडं वाटचाल करणं, हे नैसर्गिक शहाणपण ठरतं.

अखेरीस व्यवहारात माणूस जन्मतो तेव्हा श्वास घेऊन; एकदा का तो श्वास बंद झाला की, माणूस मरतो.

श्रेष्ठ मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या शब्दांत;

‘अरे जगनं मरनं,

एका सासाचं अंतर’.

…… म्हणून लढण्यासाठी, जिवंत रहाणं हे श्रेष्ठ मूल्य ठरतं.

(संदर्भ: १ आणि २- आर. जे. कार्तिक यांची व्याख्याने.) 

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आदर्शतेचा वारसा जपणारे – एक शिक्षकांचे गाव… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ आदर्शतेचा वारसा जपणारे – एक शिक्षकांचे गाव… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

(शिक्षक दिन विशेष) 

शिक्षक आणि समाज, गाव याचे खूपच निकटचे संबंध असतात. पुर्वी खेड्या-पाड्यातून गावातील शिक्षकांना लोक खुप मानत असत. गावात होणाऱ्या अनेक घरगुती कार्यक्रमातून शिक्षकांचा आवर्जून सहभाग होत असे. अनेक बर्‍या-वाईट प्रसंगात शिक्षकांचा सल्ला घेतला जायचा. इतकेच काय फार पुर्वी गावात एखांद्याचे पत्र आले तरी लोक ते पत्र गावातील शिक्षकांकडून वाचून घेत असत. घरगुती कार्यक्रमातून शिक्षकांचे आदरातिथ्य पण मोठ्या कौतुकाने होत असे. इतके समाजात शिक्षकांचे महत्त्व होते.

आज बदलत्या काळानुसार लोक बदलले. आणि समाज बदलत चालला आहे. आज समाजात पुर्वी असणारे शिक्षकांचे स्थान कुठेतरी मावळताना दिसत आहे. तरी सुध्दा मला एका गावाची गोष्ट मोठ्या कौतुकाने सांगावी वाटते. सांगली जिल्ह्य़ातील शिराळा तालूक्यात उत्तरेकडे पणुंब्रे-घागरेवाडी हे डोंगराच्या कुशीत वसलेले एक गाव आहे. खरोखर या गावाला ‘ आदर्श शिक्षकांचा ‘ गाव असे म्हटले तर काय वावगे ठरणार नाही. तुम्ही या गावाला भेट द्याल तर प्रत्येक गल्लीत एक तरी आजी -माजी शिक्षक तुम्हास भेटतीलच. आणि या सर्वच शिक्षकांचे गावच्या शैक्षणिक विकासात खूपच मोलाचे सहकार्य आहे.

या गावात जुन्या काळातील शिक्षक बी. एम. पाटील गुरूजी, एम. जी. पाटील गुरूजी, तसेच पांडुरंग घागरे गुरूजी, रंगराव भोसले गुरुजी, तानाजी परीट गुरुजी, आणि आदर्शतेचा वारसा जपणारे, अत्यंत शिस्तप्रिय असे तुकाराम बळवंत पाटील (तात्या गुरुजी) आजही त्यांचा आदर्श आणि शिस्त विद्यार्थ्यांमध्ये आहे, तसेच प्रसिद्ध कीर्तनकार मा. पी. सी. पाटील सर ( मराठीचे प्राध्यापक ), एम. टी. घागरे सर, कै शामराव पाटील गुरूजी, इत्यादी अनेक शिक्षकांचा वारसा या पणुब्रे-घागरेवाडी गावास लाभला. या सर्व गुरुजनांनी घडविलेले अनेक विद्यार्थी व याच गावचे सुपुत्र देशात व देशाबाहेर देखिल चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. गावातील मुले-मुली आज संपुर्ण क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, साहित्यिक, देशसेवेत, क्रिडा, कला, वैद्यकीय, वैज्ञानिक, औद्योगिक अशा प्रत्येक क्षेत्रात या गावातील अनेक युवक-युवती कार्यरत आहेत तर काही सेवानिवृत्त झाले आहेत. हे सर्व श्रेय या गावच्या शिक्षकांचे आहे या सर्व शिक्षकांनी फक्त चार भित्तीच्या आत शाळेतच विद्यार्थी घडविले नाहीत तर ते सदैव गावचा विद्यार्थी शिकून मोठा व्हावा, पंचक्रोशीत गावाचे चांगले नाव असावे म्हणून ही सर्व शिक्षक मंडळी सदैव झटत राहिले. आज या सर्व माजी शिक्षकांचे कितीतरी विद्यार्थी सेवानिवृत्त आहेत. पण गावात वावरताना समोरून त्यांचे हे सर्व माजी शिक्षक भेटले तर त्यांच्याबद्दलाचा तोच आदर, आणि आपले गुरूजी म्हणून त्यांच्याबद्दल तोच सन्मान नजरेत असतो. हेच या गावातील सर्व माजी शिक्षकांच्या ज्ञानाचे फळ आहे. पणुंब्रे-घागरेवाडी येथील दोन्ही मराठी शाळांना ‘ स्वच्छ सुंदर शाळा ‘ आणि ‘आदर्श शाळा ‘ असे पुरस्कार प्राप्त आहेत.

आज याच माजी शिक्षकांच्या आदर्शतेचा वारसा पुढे नेणारे याच गावचे अनेक आजी शिक्षक आहेत. या गावातील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मा. बाजीराव पाटील सर, पणुंब्रे मराठी शाळेत असणारे शिराळा तालूक्यात आदर्श शिक्षक म्हणून ज्यांचा सन्मान आहे ते मा. विलास घागरे सर, तसेच अशोक तातोबा घागरे सर, गावातीलच मा. यटम सर, इ. कितीतरी माजी शिक्षकांचे विद्यार्थी असणारे हे सर्व आजी शिक्षक गावच्या शैक्षणिक, , सामाजिक, तसेच सांस्कृतिक विकासासाठी झटत आहेत. हे सर्व आजी शिक्षक या माजी शिक्षकांचेच विद्यार्थी आहेत.

तसेच पणुंब्रे गावच्या पहिल्या महिला शिक्षिका कै. सावित्री भोसले पाटील मॅडम (पाचुंब्री), घागरेवाडीच्या पहिल्या शिक्षिका सध्या शिराळ्यात कार्यरत असणार्‍या आदर्श शिक्षका सौ. अनुराधा पाटील -घागरे मॅडम(बिऊर), सौ. जयश्री पाटील मॅडम, मुंबई येथे प्रिन्सिपल असणाऱ्या सौ. कविता पवार – भोसले मॅडम(ऐतवडे), प्रा. सौ. गीतांजली पाटील मॅडम या सर्व शिक्षिका याच गावच्या माहेरवाशीण आहेत त्या सुध्दा आपल्या सासरी जाऊन आदर्श शिक्षकेचा वारसा जपत आहेत तो याच गावचा आदर्श ठेवून.

खरोखर या पणुंब्रे-घागरेवाडी गावचा शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासात या सर्व आजी-माजी शिक्षकांचे ज्ञानदानाचे योगदान खुपच अमुल्य आहे. हे सर्वजण शिक्षक म्हणून गावाला लाभले हे या गावचे श्री भैरवनाथ कृपेने मोठे भाग्य आहे. म्हणून म्हणावे वाटते ” ज्या गावाला, समाजाला चांगले शिक्षक लाभले तो गाव विकासापासून कधीच दूर रहात नाही. “

मोठ्या अभिमानाने शेवटी लिहावे वाटते, असे शिक्षकांचे गाव मला माहेर म्हणून लाभले हे मी माझे थोर भाग्य मानते. येथील शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचीच ही माझी शब्दपुष्पे शुभेच्छा म्हणून या सर्व शिक्षकांना देत आहे.

“शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा”

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा, जि. सांगली, दुरभाष्य क्रमांक-९९२२७३०८१५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कृष्णा… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी  ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

🌸  विविधा  🌸

☆ कृष्णा… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

कृष्णा! तू अर्जुनाला युद्धभूमीवर गीता सांगितलीस आणि त्याचा मोह दूर केला व युद्धासाठी प्रवृत्त केलंस. कशाला रे! त्याने तर तुला म्हंटलं होतं नं? मला राज्यही नको व राज्याचा उपभोगही नको! मग तुला का सांगावसं वाटलं “तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः।” अन्याय सहन करण्याचा पायंडा पडायला नको. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो, म्हणूनच नं!

आमची पुण्यभू ‘भारतमाता’ अजूनही आम्हाला प्रियच आहे. पण आमच्यात अजूनही हिंमत आलेली नाही की कुणी धर्माचं नाव सांगून आमच्यावर अत्याचार करत असेल तर आमच्याही धर्मातच कृष्णानी सांगून ठेवलंय की अन्याय झाला तर प्रतिकाराला सज्ज रहा म्हणून! तसेच कुठलाही दाखला, आवश्यक कागदपत्र मिळविण्यासारख्या छोट्या छोट्या हक्काच्या गोष्टींपासून लाच देत रहातो आम्ही, अन्याय सहन करत रहातो आम्ही. काही वाटेनासं झालंय आम्हाला त्याचं!

अर्जुनाच्या मिषाने आम्हाला पण सांगितलं आहेस तू; “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन”  पण तुला दैवत मानतांनाही कानाडोळाच करतो आम्ही त्याच्याकडे! लोकांचं राज्य आहे म्हणतांनाही आम्हाला मनासारखं ‘खातं’ मिळालं नाही तरी सिंहासन गदागदा हलवतच रहातो आम्ही! आम्हाला पाहिजे ते खातं मिळवून, त्याचं फळ स्वतः खाऊन मुलाबाळांसाठीही राखून ठेवायचंय नं! माखनचोर कृष्णाची दहिहंडी पहा किती उत्साहात साजरी करतो आम्ही?पण अहमहमिका पहा कशाची सुरूं आहे!तू माखनचोरीचा पायंडा घातला कशासाठी?सगळ्या गोरगरीब मुलांना ते माखन मिळून राष्ट्रकार्यासाठी त्यांचं पालनपोषण योग्य व्हावं व समान वाटप व्हावं म्हणून!आम्ही मात्र प्रेताच्या टाळूवरचं लोणी खायलाही सज्ज आहोत! कुणाकुणाला कौरवांसारखी शिक्षा होते, ते मात्र आम्हाला कधीच कळत नाही. आमचे आजचे गुरूकुलंही भ्रष्टाचारात मागे नाहीत बरं!

दुःशासनाच्या तावडीत सापडलेल्या द्रौपदीला वस्त्र पुरवायला तू तातडीने धावून गेलास. आज कितीतरी ‘द्रौपदी’ उद्ध्वस्त होतांना दिसताहेत. भर सभेत मान खाली घातलेले तिचे पती, तिचा मान राखायलाही पुढे सरसावले होते नंतर. तिचे पातिव्रत्य नाही नाकारले त्यांनी! आज मात्र अशा अन्याय झालेल्या ‘स्त्री’लाच खाली मान घालून जगावे लागते. नाहीतर ‘अरुणा शानबाग’सारखं उद्ध्वस्त होऊन जगावे लागते तिला.

अशा कितीतरी गोष्टी आहेत रे कृष्णा! पण तू म्हंटलं आहेस नं! 

“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।”

मग आम्ही सारे अर्जुन झालो आहोत आणि तुझा जन्मोत्सव साजरा करतोय दरवर्षी. तू जन्म घ्यायची वाट बघत बसलो आहोत. दंग मात्र उत्सव साजरा करण्यातच आहोत. अरे बाबा, तू कृष्ण भगवान म्हणून ज्याच्या पाठीशी उभा राहिलास, ज्याला लढायला प्रोत्साहित केलेस, त्या अर्जुनाच्या अंगात लढण्याची धमक होती. पण आज एखादा कृष्ण उभा राहिला तर त्याला चहूं बाजूंनी घेरून नामोहरम कसे करायचे याची अहमहमिका लागली असते आमच्यात! त्यासाठी आम्ही सारे अर्जुन एक होतो. कारण तुझ्या दहिहंडीतून बाहेर आलेलं दही दुसर्‍या कोणाला घेऊ द्यायचे नसते नं आम्हाला!

त्यापेक्षा आता तू असंच कर!आम्हाला सगळ्यांनाच ठणकावून सांग!”धर्माला ग्लानि यायला तुम्ही सगळ्यांनी हातभार लावायचा. अन मी येऊन धर्माची संस्थापना केल्यानंतर तुम्ही परत गोंधळ घालायचा का? माझ्या एकट्यावर जबाबदारी का टाकता?घ्या सगळेच आपापल्या वाट्याचा जबाबदारीचा हिस्सा! सगळ्यांच्याच अंतःकरणात कृष्ण जन्म घेऊ द्या! मग कृष्ण जन्म घेण्याची तुम्हालाच ‘युगे युगे’ वाट बघावी लागणार नाही. “

कृष्णा तू खरंच असे ठणकावून सांग! आणि हो, या सगळ्यांमध्ये मी पण आहे बरं का? मी तरी कुठे काय करत असते?

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

 (पूर्वसूत्र- स्टॅंडच्या बाकावर बसून रात्र जागून काढताना सलगच्या धावपळीच्या प्रवासानंतरचा अपरिहार्य असा थकवा होताच पण त्याचा त्रास मात्र जाणवत नव्हता. पौर्णिमा अंतरली नसल्याचं समाधान माझ्या थकल्या मनावर फुंकर घालत होतं! त्याच मन:स्थितीत मी कधीकाळी ऐकलेले बाबांचे शब्द मला आठवले…

‘निश्चय केला तरी त्या निश्चयापासून परावृत्त करणारे प्रसंग सतत समोर येत रहातात, तेच आपल्या कसोटीचे क्षण! जे त्या कसोटीला खरे उतरतील तेच तरतात.. !’

त्या रात्री स्टॅंडवरच्या एकांतात बाबांच्या या शब्दांचा नेमका अर्थ मला माझ्या त्या दिवशीच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने समजला होता!!) इथून पुढे —- 

एरवी अविश्वसनीय आणि अतर्क्य वाटावीत अशी यासारखी अनेक घटीतं पुढे प्रत्येक वेळी मला मात्र ‘तो’ आणि ‘मी’ यांच्यातलं अंतर कमी होत चालल्याची आनंदादायी अनुभूती देत आलेली आहेत!

यावेळी पौर्णिमेची तारीख बघण्यात माझी नकळत झालेली चूक आणि त्यामुळे पौर्णिमेचं दर्शन अंतरण्याची निर्माण झालेली शक्यता हा बाबा नेहमी म्हणायचे तसा माझ्या कसोटीचाच क्षण असावा आणि केवळ अंत:प्रेरणेनेच मी सलग दोन रात्रींचं जागरण करून भुकेल्यापोटी आंतरीक ओढीने ‘त्या’च्याकडे धाव घेत कसोटीला खरा उतरलो असेन. कारण त्यानंतरच्या महाबळेश्वरमधील पुढच्या साधारण पावणेतीन वर्षांच्या कालावधीत अशी कसोटी पहाणारे क्षण कधी आलेच नाहीत. या प्रदीर्घकाळात ब्रॅंचमधील सगळी कामे, जबाबदाऱ्याच नव्हेत फक्त तर प्रत्येक पॅरामीटर्सवरील माझा परफॉर्मन्सही वरिष्ठांकडून मला शाबासकी मिळवून देणारा ठरत होताच, शिवाय दर पौर्णिमेलाही जाणिवपूर्वक नियोजन न करताच सगळं कांही निर्विघ्नपणे पार पडत होतं!आश्चर्य हे कीं या पौर्णिमेनंतरच्या पुढच्या अडीच-तीन वर्षातल्या कुठल्याच पौर्णिमेच्या प्रवासासाठी मला ना कधी रजा घ्यायला लागली ना कधी प्रवासासाठी कसला खर्चही करावा लागला. कारण नेमक्या त्यावेळी अचानक असं काही घडून जायचं की पौर्णिमेच्या जवळपास जसंकांही बँकेमार्फत दत्तमहाराजच मला बोलावून घ्यायचे!दरवेळी निमित्तं पूर्णत: वेगळी असत पण ती निर्माण होत ती मात्र पौर्णिमेच्या सलग आधी किंवा नंतर. आमचं रिजनल ऑफिस कोल्हापूरलाच होतं. तिथे कधी हिंदी वर्कशॉपसाठी ब्रॅंचतर्फे मला जावं लागे, कधी ब्रॅंच-मॅनेजर्स मीटिंगसाठी, कधी कोर्टात सुरू असलेल्या वसुली केसेसमधे साक्षीदार म्हणून कोल्हापूरच्या कोर्टात उपस्थित रहावं लागे किंवा कधी छोटे-मोठे ट्रेनिंग प्रोग्रॅमस्… कांही ना कांही कारण निघायचं आणि त्या त्या वेळच्या रुटीनचाच एक भाग म्हणून रिजनल-ऑफिसकडून मला बोलावणं यायचं आणि त्या निमित्ताने माझं पौर्णिमेचं दत्तदर्शन तर व्हायचंच शिवाय सगळे प्रवास खर्च आणि टीए डीए बँकेकडून मिळायचे.

खरंतर सहज घडलेल्या एका साध्या प्रसंगाच्या निमित्ताने सलग बारा वर्षांचा दीर्घकाळ दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला नियमित दत्तदर्शनाला यायचा मी केलेला तो संकल्प! ‘आपल्याला या पौर्णिमेला जायला जमेल ना? काही अडचण येणार नाही ना?’अशी टोकाची साशंकता या बारा वर्षांच्या दीर्घकाळात मनात कधीच निर्माण झालेली नव्हती. या एवढ्या वर्षांमध्ये माझ्या आयुष्यात आणि ‘सर्विस लाइफ’ मधेही प्रचंड उलथापालथ आणि स्थित्यंतरं व्हायचे अनेक प्रसंग आले. पण त्यावेळीही मन कधीच साशंक झालेले नव्हते. या दरम्यानच्या काळात मला मिळत गेलेली सलग प्रमोशनस् मला प्रगतीपथावर नेत असायची. त्या प्रत्येकवेळी प्रमोशन मिळालेल्या सर्वांच्याच मनात सेंट्रल-आॅफीसची ‘प्रमोशन पोस्टिंग पॉलिसी’ काय ठरते याच्या उत्सुकतेइतकेच दडपणही असायचेच. या प्रत्येक प्रमोशनच्यावेळी असणारी अनिश्चितता काय किंवा एरवीही वेळोवेळी कधीही होऊ शकणाऱ्या माझ्या बदल्या काय, त्या प्रत्येकवेळी माझ्या संकल्पपूर्तीत अडथळे निर्माण होऊ शकलेही असते, पण आश्चर्य म्हणजे तसं कधीही झालं नाही!आज मागे वळून बघताना मला तीव्रतेने जाणवते की त्या त्या प्रत्येकवेळी ‘त्या’नेच मला अलगदपणे अनपेक्षित आधार दिला होता, सांभाळलं होतं आणि त्यानेच एक अदृश्य, अभेद्य असं ‘संरक्षक कवच’च माझ्याभोवती तयार करून ठेवलं होतं जसंकांही!अशा अनुभवांपैकी एखाददुसरा प्रातिनिधिक प्रसंग लिहिण्याच्या ओघात पुढे कधीतरी येईलही. अशा प्रसंगी अगदी अचानकपणे मिळालेल्या अकल्पित कलाटणीने थक्क झालेल्या माझ्या मनाला ‘माझी संकल्पपूर्ती हा माझ्याइतकाच त्याचाही आनंद असणाराय’ असा भारावून टाकणारा विचार मनाला स्पर्श करुन जात असे. आज त्या कल्पनेनेसुध्दा मन भरून येते!

महाबळेश्वरनंतर माझ्या झालेल्या बदल्या आणि नंतरच्या प्रमोशन्सनंतर झालेली पोस्टिंग्ज् यावरून नजर फिरवली तरी माधवनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी या ब्रॅंचेसमधला कार्यकाळ मला आपसूक आठवतो. प्रत्येकवेळी प्रमोशननंतरही मला एकाच रिजनमधे असा सलग बारा वर्षांचा काळ व्यतीत करायला मिळाला आणि तोही कुणाच्याही खास ओळखी आणि जवळीक न वाढवता हे आमच्या बँकेपुरता विचार केला तरी माझे एकमेव उदाहरण असावे.. !

पण या सगळ्या खूप नंतरच्या गोष्टी. महाबळेश्वपुरतं बोलायचं तर महाबळेश्वरला फॅमिली शिफ्ट होईपर्यंतचा साधारण वर्षभराचा काळ हा अशा अनेकविध अनुभवांमुळे मला दिलासा देत आला होता. हा एक वर्षाचा काळ आम्हा उभयतांच्या दृष्टीने खरंच कसोटी पहाणारा होता. इकडे माझ्या रुटीनमधे मला कराव्या लागणाऱ्या तडजोडींपेक्षाही काॅलेज, प्रॅक्टीकल्स, अभ्यास यांचं श्वास घ्यायलाही फुरसत नसणारं ओझं आणि जोडीला लहान मुलाची जबाबदारी यांचा विचार करता माझ्या बायकोने, आरतीने केलेल्या तडजोडी निश्चितच कणभर कां होईना अधिक कौतुकास्पद होत्या असंच मला वाटतं. कारण लग्नानंतर तिला सहज योगायोगाने मिळालेली राष्ट्रीयकृत बॅंकेतली नोकरी सलिलचा जन्म झाल्यानंतर तशीच परिस्थिती निर्माण झाली तेव्हा बालसंगोपनाला प्राधान्य देत कर्तव्यभावनेने तिने पूर्ण विचारांती सोडलेली होती. तिला शैक्षणिक क्षेत्राची आवड होती आणि सलिल थोडा सुटवांगा झाला की त्यादृष्टीने काहीतरी करण्याचे तिने ठरवलेही होते. त्यानुसार योगायोगाने याच वर्षी तिला कोल्हापूरच्या सरकारी बी. एड् कॉलेजमधे ऍडमिशनही मिळालेली होती. माझी महाबळेश्वरला बदली झाली ती या पार्श्वभूमीवर! या सगळ्याचा लिहिण्याच्या ओघात आत्ता संदर्भ आला तो तिच्या करिअरला आणि आमच्या संसारालाही विलक्षण कलाटणी देणाऱ्या आणि त्यासाठी माझी महाबळेश्वरला झालेली बदलीच आश्चर्यकारकरित्या निमित्त ठरलेल्या, सुखद असा चमत्कारच वाटावा अशा एका घटनेमुळे !

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “निर्भयाचे नाव काय ?” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ निर्भयाचे नाव काय ? ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

उत्सुकता सर्वच जीवांचे वैशिष्ट्य आहे. नाक नावाचा अवयव हा श्वास घेण्यास दिला गेला असला तरी खुपसण्यास जास्त वापरला जातो. आपले झाकून ठेवताना दुसऱ्याचे वाकून पाहण्यासाठी डोळे आहेतच. तोंड तर free to air वृत्तवाहिनी! बघ्यांचे डोळे म्हणजे सीसीटिव्ही… खरं तर शी!शी! टीव्ही!

जंगलात झाडांच्या फांद्या उभ्या कापण्याचे काम करीत असलेल्या कारागिरांचे काम एक माकड पहात होते… आणि ते लोक नेमकं काय करत आहेत? याची त्याला उत्सुकता होतीच. पण एवढ्यावरच त्याने थांबले पाहिजे होते. करवतीने फांदीच्या मध्ये काप घेत असताना जर कापणे मध्येच थांबवले तर करवत लाकडाच्या दाबाखाली येऊन अडकून बसते आणि मग ती निरुपयोगी ठरते. म्हणून ती काढून घेण्याआधी कापलेल्या भागाच्या आत लाकडाचा एक उभट तुकडा ठेवला जातो.. त्याला पाचर म्हणतात! कारागीर जेवण करण्यास निघून जाताना त्यांनी ही पाचर नीट मारली होती… पण ती काढली तर काय होईल? हा प्रश्न माकडाला सतावत होता. त्याने ती पाचर काढण्याचा प्रयत्न केला.. ती निघालीही… पण त्याची शेपटी कापलेल्या झाडाच्या मध्ये अडकली… आणि मग कारागिरांनी माकडास बेदम झोडपून काढले! ही गोष्ट तशी लोकांच्या माहितीची आहे!

गोष्ट राहू द्या… कारण ते तर माकड होते! पण माणसांना कायदा ठावूक नसावा हे फार झाले! 

एकतर हल्ली फेसबुक हे बातमीपत्र बनले आहे. स्वयंघोषित बातमीदार बऱ्याच लोकांना आधीच माहीत झालेल्या सबसे तेज बातम्या सांगण्या, दाखवण्यात धन्यता मानतात!

कोलकाता येथील महिला डॉक्टरवर आलेला प्रसंग शत्रूवर ही येऊ नये. मुळात बलात्कार हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा आहे. यात पीडित व्यक्ती सर्वाधिक त्रास सहन करते. त्यामागे आपली सामाजिक मानसिकता मोठी भूमिका बजावते. गुन्हेगार उजळ तोंडाने आणि पीडित तोंड झाकून फिरतात.. असे दृश्य आहे. उपचार म्हणून पोलिस गुन्हेगारांची थोबाडं पिशव्यांनी झाकण्याचा प्रयत्न करतात हे ही खरे. पण ते चेहरे लोकांनी आधीच पाहून ठेवलेले आणि कॅमेऱ्यात कैद करून ठेवलेले असतात. पण हे चेहरे झाकण्यामागे न्यायालयीन प्रक्रियेतला एक महत्वाचा उद्देश दडलेला असतो.

बलात्कार, लैंगिक अत्याचार सारख्या खटल्यातील सुनावण्या in camera अर्थात अतिशय मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत घेतल्या जातात. पण हल्ली लोकांना सर्वच on camera पाहिजे असते! अपघात, हल्ले, आत्महत्या यांत dead झालेल्या लोकांची live चलतचित्रे जास्त पसंत केली जातात. यात खूप पैसे मिळत असल्याने हे प्रदर्शन विशेष लक्ष देऊन केले जाते!

एका तथाकथित शैक्षणिक चित्रपटात बलात्कार शब्दाच्या मदतीने विनोद निर्मितीचा चमत्कार खूप गाजला. पण तो चित्रपट गाजत असताना आणि आजवरही त्यातील बलात्कार – चमत्कार शब्दाच्या वापराबाबत, त्याच्या दुष्परिणामांबाबत कसे कुणाला काही वाटले नाही, याचे आश्चर्य वाटते! लहान मुले या दृश्याचा आनंद घेत असताना पाहणं ही खूप दुःखाची बाब म्हणावी लागेल!

खूप काम पडल्यावर एका सुमार अभिनेत्याने मला माझ्यावर सामूहिक बलात्कार झाल्यासारखे वाटते! अशी प्रतिक्रिया देणे सुद्धा अनेकांच्या कानांतून सुटून गेले! अनेक चित्रपटात बलात्काराच्या प्रसंगात उत्तम अभिनय करणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याने सुद्धा ” मी आताच दोन बलात्कार करून आलो.. असे वाक्य फेकून मित्रमंडळींना हसवले होते, असे ऐकिवात आहे. यातून बलात्कार शब्दास एक सहजपणा प्राप्त होत जातो, हे समाजाच्या मानसास कधी समजेल? …. हाच समाज The Rape of the lock नावाच्या इंग्रजी नाटकाच्या मुखपृष्ठावरील rape हा शब्द वाचून तुमच्याकडे तुम्ही अश्लील वाचता आहात, अशा नजरेने पाहू शकतो! असो.

बलात्कार पीडितेचे नाव, छायाचित्र इत्यादी माहिती प्रसिद्ध करू नये, असा न्यायालयाचा आदेश असताना काही अज्ञानी लोक नेमके असेच का करत सुटलेत? हा कायदेभंग केल्यास तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे, याचे अज्ञान हा बचाव ठरणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यापेक्षाही सदर पीडित आपलीच कुणी सख्खी असती तर आपण अशी प्रसिद्धी दिली असती का? हाही विचार व्हावा! उलट कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून गुन्हेगारांच्या कृत्यांना, अर्थात त्यांची भलावण होणार नाही अशा पद्धतीने प्रसिद्धी देण्याचं जमते का ते पाहावे! यात मग.. त्याचा गुन्हा कुठे सिद्ध झालाय अजून? असे cross जाण्याची गरज नाही!

जिचा काहीच गुन्हा नाही तिला जिवंतपणी आणि मरणानंतर शिक्षा का देता?

आणि माननीय न्यायालयाने याबाबतीत वेळोवेळी तसा आदेश दिलेला असतानाही लोकांनी असेच वागावे, याला काही अर्थ?

काही वर्षांपूर्वी एक मोठी अभिनेत्री इमारतीवरून पडून गतप्राण झाली होती.. त्यात तिचे शरीर अनावृत होते… ते ‘ पाहण्या ‘ साठी मुंबईमध्ये हजारो लोक जमले होते! 

काय झाकून ठेवायचे आणि काय वाकून बघायचे यातील विवेक कुणी कुणाला शिकवावा? हाच प्रश्न आहे!

बाकी एक महिला जिवानिशी गेली… तिच्या प्रकरणात कोलकात्यात जो हैदोस सुरू आहे.. ते पाहून डोळे, कान आणि मनाचे दरवाजे बंद करून बसावे, असे वाटते!

… ती मेली आणि तिला मारणारे अजून काही वर्षे जगणार आहेत, व्यवस्था त्यांना जगवणार आहे हे चित्र भयावह आहे.. की हेच आपले प्राक्तन आहे, न कळे!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘पिठोरी अमावस्या अर्थात वैश्विक ‘मातृत्व’ दिन‘☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ पिठोरी अमावस्या अर्थात वैश्विक ‘मातृत्व’ दिन… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

आज श्रावण अमावस्या !! बैलपोळा, पिठोरी अमावस्या आणि मातृदिन असा त्रिवेणी संगम असलेला पावन दिवस !!!

अशी कथा सांगितली जाते की एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती द्यूत खेळत होते. पंच (परीक्षक) म्हणून नंदी महाराज होते. खेळात माता पार्वती जिंकल्या होत्या. पण पंचाने म्हणजे नंदीने भगवान शंकर जिंकले असे जाहीर केले. याचा पार्वतीमातेला राग आला व तिने नंदीला शाप दिला की तुझ्या मानेवर लोकं जोखड ठेवतील आणि तुझा उपयोग शेतीच्या कामासाठी व इतर कामासाठी केला जाईल. नंतर नंदीने क्षमा मागितली तेव्हा पार्वतीमातेने त्याला वरदान दिले की श्रावण अमावस्येच्या दिवशी तुला काहीही काम सांगणार नाहीत, तुझी पूजा केली जाईल, तुला गोडधोड खाऊ घातले जाईल, तुझे कौतुक केले जाईल आणि तेव्हापासून आपल्याकडे ‘बैलपोळा’ हा सण साजरा करण्यात येतो. आपल्या संस्कृतीप्रमाणे घरात अगदी नवीन संगणक आणला तरी त्याची पूजा केल्याशिवाय आपण तो सुरु करत नाही, अशा निर्जीव वस्तूंचीही पूजा होते, तिथे जन्म देणाऱ्या मातेला ही संस्कृती कशी विसरेल? माता, जननी, मातृभूमी आणि जमिनीतून धान्य पिकायला सहाय्यकारी ठरणाऱ्या बैलाचीही आपल्याकडे पूजा होणे क्रमप्राप्त नव्हे काय?

या दिवशी बैलांना विश्रांती द्यायची. त्यांना ऊन पाण्याने आंघोळ घालायची, पुरणावरणाचा स्वयंपाक करून आधी त्याचे तोंड गोड करायचं. खूप ठिकाणी ‘ “शिंगे रंगविली, बाशिंगे बांधिली, चढविल्या झुली ऐनेदार ‘ असाही बैलपोळ्याचा थाट उडवून देतात. बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक गावात बैलपोळा सामूहिकरीत्या साजरा केला जातो.

श्रावण अमावास्येला ‘पिठोरी अमावास्या’ असेही म्हणतात. ज्यांची मुले जगत नाहीत, अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत करतात. हे व्रत पूजाप्रधान असून, चौसष्ट योगिनी या त्याच्या देवता आहेत. या व्रताचे विधान असे – श्रावण अमावास्येच्या दिवशी दिवसभर उपोषण करावे. सायंकाळी स्नान करून सर्वतोभद्र मंडलावर आठ कलश स्थापावे. त्यावर पूर्णपात्रे ठेवून त्यांत ब्राह्मी, माहेश्‍वरी, इ. शक्तींच्या मूर्ती स्थापाव्या. तांदुळाच्या राशीवर चौसष्ट सुपार्‍या मांडून त्यावर चौसष्ट योगिनीचे आवाहन करावे. त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर व्रतासाठी केलेले पक्वान्न डोक्यावर घेऊन ‘कोणी अतिथी आहे काय? असा प्रश्न विचारावा. मुलांनी ‘मी आहे’ असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे.

पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत. अलिकडे त्यांची छापील चित्रे मिळतात. या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. त्यावरून या तिथीला पिठोरी अमावास्या असे नाव पडले असावे. पूर्वी घराघरात ‘पिठोरी’ची पूजा होत असे. पिठोरी अमावस्येचंच दुसरं नाव मातृ दिन. या दिवशी महिला उपवास करतात. सायंकाळी स्नान करून घरातल्या मुलाला किंवा मुलीला खीरपुरीचे जेवण देतात. या दिवशी ६४ योगिनींच्या चित्राची महिला पूजा करतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत ‘अतीत कोण?’ असा प्रश्न विचारायचा असतो. त्याचे उत्तर म्हणून आपल्या मुलाचे नाव घ्यायचे. म्हणजे पुत्र किंवा कन्या दीर्घायुषी होतात, अशी श्रद्धा आहे. घरातली कर्ती स्त्री डोक्यावर ‘पिठोरी’चं वाण घेऊन ‘माझ्यामागे कोण आहे?, चा घोष करत असे. घरातील मुलं तिला ‘मीच, मीच’ म्हणत प्रतिसाद दिला जात असत. बेदाणे घातलेली भाताची खीर हा ‘पिठोरी’चा खास नैवेद्य.

मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी पिठोरी अमावस्येचे व्रत करण्याची प्रथा आहे. या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावास्येला मुले होत व ती लगेच मृत्युमुखी पडत. या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली. प्रसन्न होऊन चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले. पुढे ती पुन्हा घरी आली. विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी असे आठ पुत्र झाले. अशा प्रकारे संतति रक्षणासाठी चौसष्ट देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वत:च्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव पिठोरी अमावास्या करून देते. म्हणून ही अमावास्या महत्वाची आहे. आजच्या पावन दिनी दिवशी वंशवृद्धीकरिताही पूजा केली जाते. म्हणून यास ‘मातृदिन’ असेही म्हणतात. पण आज याला आणखी एक संदर्भ जोडला तर आणखी सयुक्तिक होईल असे वाटते. आपण आजच्या दिवसाला ‘मातृत्वदिन’ म्हणू शकतो. ‘माता’ होणे हे जन्म देण्याशी निगडित आहे तर मातृत्वभाव हा फक्त जन्म देण्याशी निगडीत नाही. हा तर वैश्विक भाव आहे. आजची सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली तर समाजाला आज ‘मातृत्वभावा’ची विशेषत्वाने गरज आहे असे जाणवते.

‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’, ‘आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही’; ‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई’ अशा विविधप्रकारे प्रतिभावंत कवींनी/मुलांनी आपल्या आईचे गुणवर्णन केले आहे. जरी असे वर्णन जरी केले असले तरी ते वर्णन पूर्ण आहे असे कोणताच कवी ठामपणे म्हणू शकत नाही. ज्या प्रमाणे भगवंताचे वर्णन करता करता वेद हि ‘नेति नेति’ असे म्हणाले, (वर्णन करणे शक्य नाही), अगदी तसेच आईच्या बाबतीत प्रत्येक मुलाचे / प्रतिभावान कवीचे होत असावे असे वाटते आणि म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृतीत पहिला नमस्कार आईला करण्याचा प्रघात रुजवला गेला असावा.

आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीकडे ‘मातृत्वभावाने पाहण्याचे संस्कार आपल्यावर बालपणीच केले जात असतात, त्यामुळे आपल्याकडे पूर्वीपासून ‘भूमाता’, ‘गोमाता’, ‘भारतमाता’ अशा विविध भावपूर्ण संज्ञा आपल्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. ही पद्धत अकृत्रिम पद्धतीने आचरली जात होती, त्यामुळे ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिकवावी लागत नव्हती की त्याची जाहिरात करावी लागत नव्हती. मनी रुजवलेल्या मातृत्वाभावामुळे कितीतरी चांगल्या गोष्टी नकळत घडत होत्या आणि त्याचा फायदा सर्व समाजाला, पर्यायाने देशाला होत होता. आज पुन्हा एकदा आईचे ‘आईपण’ (प्रत्येक गोष्टीतील मातृत्वभाव) जागृत करण्याची गरज जाणवत आहे. “छत्रपती शिवाजी शेजारणीच्या पोटी जन्माला यावा’ ही मानसीकता सोडून ‘मीच माझ्या बाळाची ‘जिजामाता’ होईन” हा विचार मातृशक्तीत रुजविण्याची गरज आहे असे जाणवते. भले मला माझ्या मुलास ‘शिवाजी’ बनवता आले नाही तर त्याला शिवरायांचा ‘मावळा’ बनवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन करेन असा पण प्रत्येक आईने करायला हवा. हा प्रयत्न थोड्या प्रमाणात जरी यशस्वी झाला तरी देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रणाम मोठ्या प्रमाणात कमी होतील.

आज ‘आंतरराष्ट्रीय मातृत्वदिन’ आहे. आपल्या आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मला असा जाणवलं की नुसती कृतज्ञता व्यक्त करून आपले कर्तव्य संपेल ? नक्कीच नाही. तर एक मुलगा म्हणून माझं काही कर्तव्य नक्कीच आहे. मी माझ्या जन्मदात्रीचा मुलगा आहेच, भारतमातेचे पुत्र आहे, समाजपुरुषाचा पुत्र आहे. प्रत्येकासाठी माझी वेगवेगळी कर्तव्ये आहेत, ती योग्य रीतीने पार पाडता यावीत म्हणून मी माझ्या जीवनात प्राधान्यक्रम कशाला देणार हे ठरवावयास हवे. माझ्या अंगातील कौशल्ये अधिकाधिक समाजाभिमुख कशी होतील याचा विचार करावयास हवा. ‘मी आणि माझे’ यातून बाहेर पडून संपूर्ण समाज ‘माझा’ आहे ही भावना बळकट व्हावयास हवी. आज त्याचीच नितांत गरज आपल्या मातृभूमीस आहे, असे वाटते.

जसे भक्तामुळे देवास ‘देवपण’, अगदी तसेच लेकरांमुळे आईला ‘आईपण’ प्राप्त होते. भक्तच आपल्या भक्तीतून देवाचे देवपण सिद्ध करतो, तसेच प्रत्येकाने यथाशक्ती चांगले वागून, चांगली कर्म करून आपल्या आईच्या आईपणास गौरव प्राप्त करून दिला पाहिजे. मग ती आई असो, गोमाता असो कि भारतमाता !!. दैनंदिन व्यवहार करताना आपल्या अंगी ‘मातृभाव किंवा पुत्रभाव’ ठेवता आला तर देशातील भ्रष्टाचार, सामाजिक भेदभाव आणि इतर सर्व अनैतिक गोष्टी तात्काळ बंद होतील, यात बिल्कुल संदेह नाही.

आज आईचे स्मरण करताना बऱ्याच गोष्टी चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून सरकत गेल्या. माझी आई ही एखादवेळेस जिजामाता नसेल, ‘श्यामची आई’ नसेल पण ती ‘आई’ होती हेच माझ्यासाठी पुरेसे होते. आज या नश्वरजगात आई नाही, पण तिने जे काही शिकविले ते ‘श्यामच्या आई’च्या शिकवणीपेक्षा कणभरही कमी म्हणता येणार नाही. ‘देवाला सर्व ठिकाणी जाता येत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली’* याची अनुभूती आपण सर्वच जण नेहमीच घेत असतो. सर्व संत मातृभक्त होते. सर्व क्रांतिकारक मातृभक्त होते आणि म्हणूनच अनंत हालअपेष्टा सोसूनही क्रांतीकारकांनी स्वराज्य प्राप्तीसाठी अथक प्रयत्न केले. आपणही आपल्या आईसाठी यथामती काहीतरी करीतच असतो. आपल्या आईची समाजातील ‘ओळख’ ‘सौ. अमुक अमुक न राहता ती अमुक अमुक मुलाची आई आहे’, अशी करून देता आली तर आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा यापेक्षा चांगला उपाय नसेल..

मी इथे प्रत्येकाच्या मनात असलेली ‘आई’बद्दलची भावना प्रातिनिधिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चुकभुल माफी असावी.

चार मातीच्या भिंती

त्यात राहे माझी आई

एवढे पुरेसे होई

घरासाठी….. !!

जगातल्या सर्व मातांस आणि मातृभावनेने कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांस ही शब्दसुमनांजली सादर अर्पण!! श्रीरामसमर्थ।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares
image_print