विविधा
☆ ज्येष्ठतेचा ‘देहशतवाद’.. ☆ सुश्री वैशाली पंडित ☆
(मजेशीर हलका फुलका लेख जरूर वाचा)
ज्येष्ठ नागरिक या इयत्तेत प्रवेश केला की पहिल्या दिवसापासूनच सावध रहावं लागतं.आता मागच्या इयत्तांतल्या पाठ्यपुस्तकांचा अर्थातच काय्येक उपयोग नाही. नवा अभ्यासक्रम, नवनवीन चाचणी परीक्षा, त्याही ठराविक वेळापत्रकानुसार वगैरे फाजील लाड नाहीत. अचानक परीक्षा जाहीर की बसा सोडवत पेपर. अभ्यास चांगला झालेला असेल तर व्हालच पास. अन्यथा भोगा…!
तर ‘ज्येष्ठ’ झाल्यावर ‘ताबा’ हा पहिला धडा सतत पाठ करावा लागतो.बरं तो नुसता घोकंपट्टी करून नव्हे; तर आचरणात आणावा लागतो तरच आरोग्याच्या सीमेवरचे सैनिक आपलं रक्षण करतात.
कसला ताबा ?
कुणावर ताबा ?
अर्थातच पहिला ताबा जिभेवर !
आत्तापर्यंत काय खाल्लं काय पचवलं, काय नाही पचवलं याचा सव्याज हिशेब फेडायची वेळ आलेली असते.ज्येष्ठत्व आता आहारातही दिसणं सक्तीचं असतं. मनाला येईल तेव्हा हाणायचे दिवस मागे पडले.आपल्याला काय आणि किती खाल्लेलं पचतं हे स्वतःला प्रामाणिकपणे विचारूनच ठरवावं लागतं.
” ओ, आता अरबटचरबट खाणं बंद करा.”
” आता आम्हाला सांगायची वेळ आणू नका तुम्ही खाण्यावरून.”
असे सल्ले आपल्या मुलाबाळांकडून ऐकणं कमीपणाचं वाटत असेल तर मुळात तशी वेळच का आणा आपण ?
दुसरा ताबाही जिभेवरचाच.पण तो मिताहाराबरोबरच मित शब्दांचा.
खूप काही शेकडो, सहस्र, लाखो, अनंत गोष्टी खटकू लागलेल्या असतात आता.अगदी फडाफड सुनवावं नि सरळ करावं एकेकाला असं वाटत असतं… कबूल… पण सबूर… आता मनात आलेले विचार आणि तोंड यांच्यात एक बारीक जाळीची चाळणी फिट करून घ्यायची.म्हणजे मनातले शब्द बुळुक्कन बाहेर येणार नाहीत.तारतम्याने चाळूनच शब्दयोजना व्हायला हवी.
तीही आवश्यकता भासली तरच ! उगाचच मुलाबाळांच्या ज्यात त्यात आपलं नाक खुपसून तोंडाची चाळण उघडायची नसतेच मुळी.
विचारला(च समजा ) सल्ला तर मनापासून द्यावा पण तो ऐकावाच असा आग्रह बिल्कूल धरू नाही.त्यावरून रूसू रागवून आपली शोभायात्रा तर मुळीच काढून घेऊ नाही.
ज्येष्ठ ‘अगं’ ना निदान घरकामातल्या लुडबुडीचा थोडा तरी विरंगुळा असतो.पण ‘ अहों ‘ ना तोही नसतो.रिकामपणत्यांना त्रास देतं नि अहो अगंना छळतात.नको जीव करतात.अहो आणि अगंना आता एकमेकांच्या दुख-या नसा पुरत्या माहीत झालेल्या- असतात.अशा वेळी दोघांनी गुण्यागोविंदाने भांडत बसावं.एकमेकांच्या औषधपाण्याची मधूनच भांडणाच्या एपिसोडमध्ये ब्रेक घेऊन आठवण करावी.
दुर्दैवाने एकटा जीवच या इयत्तेत असेल तर मात्र स्वतःचा अभ्यासक्रम स्वबळावरच पूर्ण करावा लागतो.त्यासाठी स्वयंसमुपदेशनाची सवय लावून घ्यावी लागते.
आता शरीर आपल्याकडे कर्जफेडीचा तगादा लावत असतं.तिकडे प्राधान्याने लक्ष द्यावं लागतं.
चालतानाही प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकावं लागतं.वा-यावर उधळून घेणा-या तरूणपणासारखं आता किधर भी देखना न् किधर भी चलना चालतच नाही.चालता चालता आता इकडे तिकडे बघायचे दिवस संपलेले आहेत.पायांकडची नजर हटी तो दुर्घटना घटीच समजा.
देह नावाचा प्राणी आता त्याच्याकडेच…त्याच्याकडेच्च लक्ष द्यावं म्हणून हटून बसलेला असतो.
लहरी झालेला असतो. त्याची लहर केव्हा, कशी फिरेल हे खुद्द आपल्यालाही कळत नसतं.
त्या देह नावाच्या प्राण्याच्या प्रत्येक अवयवाची मिजास आता पुरवावी लागते.
आत्ता आत्तापर्यंत सुरळीत असणारा एखादा बारकुस्सा स्नायूसुद्धा कधी तुम्हाला वेठीला धरील सांगता येता नाही.सुखासुखी बसलेलो असताना उठताना कमरेतून सणकच काय येईल, पोटरीतून वळच काय येईल,मस्तकातून भिरभिरंच काय फिरेल काय काय मजामजा होईल काही विचारायचं कामच नाही.
प्रत्येक हालचाल करताना मुळी आता त्या त्या अवयवाची परमिशन घेतल्याशिवाय चालणारच नाही ते !
पायांनो, उठून उभं राहू का ?मानेबाई,मागे वळून बघितलं तर चालेल का ?*
दंडाधिका-यांनो, जिन्याच्या कठड्याला जोरात धरलं तर तुमची काही हरकत नाही ना ?
दंतोपंत, कणीस खाताना त्यातच नाही ना मुक्काम करणार ?
अगदी हातापायांच्या चिरमुटल्या करंगळ्याही वरपक्षाकडच्या करवल्यांसारख्या मिजाशीत मुरडतात कधीकधी.
असे देहाचे लळे आता पुरवावेच लागतात; नाहीतर तो ‘देहशतवाद’ आपल्या जगण्याचा सगळा नकाशाच बदलून टाकू शकतो.वेगवेगळ्या व्याधींची अफाट शस्त्रसेना आणि असहाय्यतेचा दारूगोळा त्याच्या पोतडीत ठासून भरलेला असतो.
हे सगळं त्या इयत्तेतच जायच्या आधीच माहीत करून घेतलं तर या असल्या देहशतवादाशी सामना करावाच लागणार नाही.पटतंय ?
सुश्री वैशाली पंडित
(व्हाॅटस्अॅप वरून साभार)
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈