श्री अरविंद लिमये
☆ विविधा ☆ ‘ताळतंत्र’..सुखी जीवनाचा मूलमंत्र! ☆ श्री अरविंद लिमये ☆
‘ताल’ आणि ‘ताळ’ हे सख्खी भावंडं शोभावेत असे दोन शब्द. यांच्यात अक्षरसाध्यर्म तर आहेच आणि अर्थसाध्यर्मही. ‘ताल’म्हणजे लय. उदाहरणार्थ द्रूत, मध्य, विलंबित, किंवा एकताल, झुमरा, दादरा यासारख्या संगीताशी संबंधित अर्थाचा हा ताल आहेच.
शिवाय ताल या शब्दाचे ‘तट’ ‘बांध’ असेही अर्थ आहेत. ताल हा असा नियमबद्धता,नियमितपणा यांच्याशी संबंधित शब्द. म्हणूनच त्याची तालबद्ध तालशुद्ध अशी इतर बारकावे ध्वनित करणारी रूपे सुद्धा आहेतच.
‘ताळ’ या शब्दाच्या विविध अर्थांमध्ये ‘ताल’या शब्दार्थातला नियमितपणा ध्वनित होतोच.ताल आणि ताळ यांना मी सख्खी भावंडे म्हणतो ते यासाठीच.
‘ताळ’हा मेळ,मिलाप, सुसंगती, एकवाक्यता,नियंत्रण, मर्यादा अशा विविध रंगछटांचे अर्थ ध्वनित करणारा शब्द! ताळमेळ, ताळातोळा, ताळतंत्र हे सगळे ‘ताळ’ या शब्दाचेच सगेसोयरे.
पूर्वी गणिताचा पाया पक्का करणारे पाढे, पावकी, दिडकी, नेमकी,अडीचकी अशा आकड्यांच्या अनेकपटींची घोकंपट्टी हा शाळापूर्व अभ्यासाचा घरगुती रिवाजच असायचा. त्या काळात मूल सात वर्षाचं होऊन पहिलीसाठी प्रवेशयोग्य होईपर्यंत हा पाया घरीच अतिशय भक्कम करून घेतला जात असे. विविध शोध लावून सोईस्कर, सहजसोपे मार्ग शोधता शोधता हे सगळे हिशोब चुटकीसरशी करु शकणारा ‘कॅलक्युलेटर’ हाताशी आला आणि सगळे चित्रच पालटले. पालटलेच नाही फक्त तर ते चित्र काहीसे ‘विचित्र’ च होऊन बसले. हे सगळं ‘ताळ’या शब्दाचं विवेचन सुरु असताना आठवायचं कारण म्हणजे आमच्या बालवयात सोडवलेली गणिताची उत्तरे अचूक आहेत का याची शहानिशा करून घेण्यासाठी गणित सोडवून झाले की त्याचा ताळा म्हणजे उलटा हिशोब करून पाहायला आम्हाला शिकवलं जायचं. ताळ म्हणजे जुळणी. त्याप्रमाणे गणितातला हा ताळा म्हणजे, आलेल्या उत्तराशी जुळणी करुन पहाणेच असे. हल्ली हे सगळं कालबाह्य झालंय हे खरं. त्यामुळे हा गणितातला ताळा आता अस्तित्वातच नाहीये.
हिशोबासाठी आलेल्या कॅल्क्युलेटरचा वापर सोपा वाटतो खरा पण हे वाटणं एक भासच ठरतं कधीकधी. कारण यामुळे ‘तोंडी हिशोब’ ही संकल्पना कालबाह्य झालेली आहेच शिवाय कॅल्क्युलेटर वापरताना आकडे किंवा चिन्हे प्रेस करण्यासाठी बोटे वापरावी लागतातच. आणि त्याचा कितीही सराव झाला, तरीसुद्धा बटणं प्रेस करण्यात कणभर जरी चूक झाली, तरी लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागत नाही. आणि ताळा करुन पहाण्याची सोय नसल्याने ती चूक चटकन् लक्षातही येत नाही. यंत्राचा असा सोयीसाठी उपयोग करता करता आपण त्याच्या किती अधीन होत होत परस्वाधीनही झालो आहोत याचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण! जगण्यातलं ताळतंत्र हरवून बसायला निमित्त ठरणारी कॅल्क्युलेटरच्याच मोबाईल, टीव्ही यासारख्या इतर भाऊबंदांची अशी अनेक उदाहरणेही देता येतील.
काळानुसार बदल अपरिहार्य असले तरी ते किती आणि कसे स्वीकारायचे याचं ‘ताळतंत्र’ न राहिल्याने आपण सर्वार्थाने ‘परतंत्र’होत जातोय याचे भान आपण हरवून बसलो आहोत. विकासात लपून बसलेला विनाशही आपण आपल्याच नकळत कवटाळतो आहोत.
‘ताळतंत्र ‘म्हणजे जीवन शैलीतल्या असंख्य घटकांच्या अचूकतेचे मंत्र’अशीही मांडणी करता येईल. जीवनपद्धतीतल्या पहाटे उठणे, मुखमार्जन, व्यायाम, खेळ, लेखन-वाचन, आपला पेहराव, आहारपद्धती, संवाद,आदरातिथ्य, स्वयंपाक, पूजाअर्चा, विश्रांती, झोप अशा असंख्य घटकांबाबतचे कृतीनियम म्हणजेच हे मंत्र! त्यांच्या विविध पद्धती काळाच्या कसोटीवर खऱ्या उतरलेल्या असल्यामुळे त्या जाणीवपूर्वक नियमित, काटेकोर पद्धतीने पाळण्याचा प्रयत्न सर्वांनीच करायला हवा खरंतर. पण हेच ताळतंत्र न राहिल्याने निर्माण होणारे आरोग्य, स्वास्थ्य, मन:शांती समाधान, शरीर आणि मनाच्या क्षमता अशा अनेक बाबतीतले जटिल प्रश्न आता नित्याचेच होत आहेत. याची पुसटशी जरी जाणिव झाली आणि आपल्या जीवनशैलीतील शिस्त, आत्मसंयमन, नियंत्रण, मर्यादा, सुसंगती, एकवाक्यता अशा अनेक ‘ताळ’ अर्थांचे अचूक भान आपल्याला आले तरच नकळतही ताळतंत्र कधीच सूटू न देण्याची अत्यावश्यक सजगता आपण दाखवू शकू अन्यथा…?
© श्री अरविंद लिमये
सांगली
९७२३७३८२८८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈