मराठी साहित्य – विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-4 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-4 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

या ट्रीप मधील पुढील आकर्षण राॅस आयलंड हे होते. तिथे अनुराधा राव मॅडम ना भेटायचे होते. निसर्गाच्या सान्निध्यात पशू-पक्षी आणि प्राण्यांबरोबर संवाद साधून जीवन आनंदात व्यतीत करणारी अनुराधा कशी असेल ते बघण्याची उत्सुकता होती. या आयलंडवर ब्रिटिशांनी उभारलेल्या बऱ्याच इमारतींचे भग्नावशेष पहायला मिळाले. बेकरी, प्रिंटिंग प्रेस,पाॅवर हाऊस, चर्च, बरॅक्स अशा विविध इमारती होत्या.

युध्दाच्या  काळात त्यातील काही  नामशेष झाल्या तर काही त्सुनामी, वादळे यामुळे नाश पावल्या.  हे आयलँड बरेच खचल्यासारखे झाले आहे. तिथे फारसे लोक राहात नाहीत. मोर, हरणे, ससे, खारी या सुद्धा अनुराधा मॅडमच्या हाकेला ओ देतात ही गोष्ट विशेष वाटली. त्या प्राण्यांना खाऊ घालण्यासाठी मोठ्या पिशवीत खाऊ घेऊन फिरत असतात. खरं निसर्गप्रेम त्यांच्यामध्ये दिसून येते.अनुराधा मॅडम नी आम्हाला तेथील खूप छान माहिती दिली. तिथे आम्ही भरपूर फोटो काढले.

पोर्ट ब्लेअर सोडण्यापूर्वी आम्ही एक संध्याकाळ वांडूर बीचवर गेलो होतो. येथील किनारा खूप मोठा, शुभ्र पांढरी वाळू असलेला होता.आम्ही शंख, शिंपले वेचत फिरलो. खुप फोटो काढले. समुद्रकिनारी उंच उंच झाडे होती.

समुद्रावर गेलं की सूर्यास्त होईपर्यंत हलायचंच नाही हे ठरलेले असे.

तो सूर्याचा गोळा अस्ताला गेला की परतायचं ! बीच वर शहाळ्याचे पाणी, खोबरे याचा मनसोक्त आस्वाद घेतला!

                      क्रमशः….

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ काय हरकत आहे…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

 ☆ विविधा ☆ काय हरकत आहे…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

विश्वविधात्याने विश्वाच्या पसा-यातील अनुरेणू एवढा नगन्य तुकडा आपल्या हाती सुपूर्द करून आपल्याला या धरेवर जीवन व्यथीत करायला या मोहमयी धरेवर धाडले आहे. याची आपणास जाणीव असायलाच हवी. इथे धाडतानाही त्याने आपल्याला रिक्त हातानेच पाठवले आणि इथून निघताना ही रिक्त हातानेच परतण्याची सक्त ताकीद देऊन ठेवली आहे. ती मोडण्याचे धाडस आपण करूच शकत नाही. कारण त्याने आपल्या आयुष्याची दोरी त्याच्या हातातच ठेवली आहे. इथे येतानाही विधात्याने आपल्याकडून आयुष्याच्या मर्यादेचा करार करून परतीची आपणास माहीत नसणारी तारीख  नोंदवून ठेवली आहे. तिचेही आपण उल्लघण करू शकत नाही. आपण इतके दुबळे आहोत हे माहिती असूनही माणूस किती तोरा मिरवतो यांचा आपल्या सहीत सर्वांचं अनुभव आहे.आध्यामवाद्यानी याचीअनेक वेळा जाणीव करून देवून ही कोणीच फारसा जागा होताना दिसत नाही. करण माणूस हा शेवटी माणूस च आहे. चतूर आहे. कर्तृत्व संपन्न आहे.सगळे मान्यकरूनही तो आपणच आपली तयार केलेली “प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे” ही म्हण विसरायला तयार नाही. कारण तो सातत्याने प्रयत्नवादीच राहीला आहे.पुढेही अनेक पिढ्या तो तसाच रहाणार आहे.त्याला माहीत आहे.आपल्या हाती ” काळ थोडा आणि सौंगे फार” आहेत. सामर्थ्याची दारू ठासून भरलेल्या शिवाय आयुष्याच्या रणांगणावर कर्तव्याच्या तोफा विजयी उन्मादाने धडाडत नाहीत.

इवल्याशा कर्तव्याचा साकव बांधून संकटाचा महासागर पार करायला निघालेलो आम्ही लोक आहोत.सामना महाबलीशी आहे.जिंकण्याची आशा तर

मूळीच नाही.पण जन्मताच मरण पदराशी बांधून घेतल्याने विजय पराजयाची तमा बाळगून लढण्याने काय हाशील होणार आहे.मग आहे ते कर्तव्य सोडून कशाला पळ काढायचा? लढा,कटा,मरा.  निदान त्या मुळे तरी संघर्ष करणा-यांच्या यादीत तुमचे नाव नोंदवले जाईल.तुमची पुढची पिढी ठरवेल ते योग्य की आरोग्य ते.फक्त एक लक्षात ठेवा तुमची लढाई लोक कल्याणासाठीच असायला हवी.देह तुमचाच आहे.तो असातसा खर्ची पडणारच आहे.पण जाता जाता काळाने दिलेली भेट स्विकारताना आनंदी व्हायला आणि समाधानाने जयला काय हरकत आहे.

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-3 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

☆ विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-3 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

छोट्या बोटीतून जाताना आम्हाला भीती वाटत होती,पण त्या बोटीवर काम करणारे लोक मात्र लीलया या होडीतून त्या होडीत जा -ये करत होते.

दूरवर दिसणारी छोटी छोटी बेटं हिरवीगार दिसत होती. त्या हिरवाईचे प्रतिबिंबच जणू पाण्यात दिसत होते! या बीच वर काचेच्या बोटीतून समुद्रात खोलवर घेऊन जातात, तेव्हा पायाशी असलेल्या काचेतून समुद्राच्या तळाशी असलेले तर्हेतर्‍हेचे रंगीबेरंगी मासे, कोरल्स, कासवं आणि खूप रंगीत रंगाचे दगड-गोटे आणि काय काय पहात होतो ते सांगता येत नाही. त्या बोटीतून बाहेर पडल्यावर आम्ही तिथे स्नाॅर्केलिंगही केले. समुद्राच्या तळातील दौलत बघता-बघता चार पाच तास कसे गेले कळलंच नाही.

या नंतर पोर्टब्लेअर चा मुक्काम संपवून आम्ही दुसऱ्या दिवशी राॅस आयलंड बघण्यासाठी निघालो.

क्रमशः…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-2 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ☆ विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-2 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

 अंदमानची उर्वरित सफर…

हॅवलॉक आयलंड..

पोर्ट ब्लेअर च्या सावरकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सेलर जेलच्या दर्शनाने भारावून गेलो होतो. पण आता निसर्गाच्या सानिध्यात समुद्रावर फिरून काही दिवस तोही अनुभव घ्यायचा होता. पोर्ट ब्लेअरच्या आसपास समुद्रात बरीच बेटे आहेत. त्यापैकी हॅवलॉक आयलंड  या ठिकाणी आम्ही जाणार होतो. एक दिवस माउंट हॅरियट येथे जाऊन आसपासचा अप्रतिम सुंदर निसर्ग पाहिला. गन पॉईंटवर फोटो काढले. ‘सागरिका’ म्युझियम पाहिले आणि हॅवलॉक आयलँड ला जाण्यासाठी तयार झालो.

हाय लॉक आयलँड ला जाण्यासाठी प्रथम समुद्रातून बोटीने साधारणपणे दीड तास प्रवास केला व पुढे कारने काही अंतर जाऊन ब्ल्यू रिझाॅर्ट या ठिकाणी पोहोचलो. इथून अगदी जवळ होता. त्यामुळे संध्याकाळी साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बीचवर आम्ही चालत गेलो. सेल्युलर जेल पाहून आलेला गंभीरपणा नकळत जाऊन  निसर्गाच्या या रम्य रूपात रमून गेलो. समुद्रकिनाऱ्यावर बरीच गर्दी होती. पाण्यात खूप वेळ खेळायला मिळाले. सूर्यास्त होत आल्यावर  दिसणारे सागराचे घनगंभीर रूप डोळ्यात साठवले गेले. सूर्यास्त लवकर म्हणजे साडेपाच वाजता  सूर्यास्त झाला की बीच बंद होत असल्याने पोलीस गाडी घेऊन सर्वांना बाहेर काढले जाते! आम्ही येताना गोड पाणी आणि खोबरे खाऊन रेसोर्ट वर आलो. त्या दिवशीचा मुक्काम तिथेच होता. सकाळी  लवकर उठून पुन्हा एकदा समुद्राला भेटायला जाऊन आलो. सकाळी नाश्ता करून एलिफंटा बीचवर जाण्यासाठी प्रथम कारने आणि पुढे छोट्या बोटी ने एक दीड तास प्रवास करायचा होता. समुद्राचे रूप कितीदा आणि कितीही पाहिले तरी मनोहारी वाटते. इथे तर पाण्याचा रंगही बदलताना दिसत होता. कुठे पाचू सारखा हिरवा रंग तर कुठे निळा, ग्रे कलर दिसत होता.

क्रमशः…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दृष्टीकोन ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

 ☆ विविधा ☆ दृष्टीकोन ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

दृष्टिकोन ही एक अशी गोष्ट आहे की, जी प्रत्येक माणसागणिक बदलत जाते. पण ती सकारात्मक असण फार आवश्यक आहे. मग ती एखाद्या माणसाकडे बघण्याची असो किंवा घटनेकडे. प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघण्याचा दृष्टीकोन असला पाहिजे. एखादे संकट जरी आले, तरी तेही आपल्याला खूप काही शिकवून गेले असा दृष्टीकोन पाहिजे, नाहीतर त्यावर रडत कुढत बसुन काहीच साध्य होत नाही. काहीजण प्रत्येक गोष्ट सकारात्मकपणे घेऊन पुढे जातात तर काही प्रत्येक गोष्टीतच रडत बसतात. काहीजणांना अर्धा ग्लास भरलेला दिसेतो तर तोच काहींना अर्धा रिकामा.

तिर्‍हाईत माणसांकडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा प्रत्येकाचा वेगवेगळा. एखाद्याला एखादी व्यक्ति खूप आवडते, दुसर्‍याला तीच व्यक्ति आजिबात आवडत नसते. मला एक कळत नाही की, एखाद्याशी चार वाक्य बोलली की लगेच आपण त्याच्या बद्दल मनात एक चित्र म्हणजेच आपला त्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टीकोन तयार करून टाकतो. आपल्याला सर्वसाधारण पणे अस वाटत असत की I’m  the best judge आणि आपण कोणत्याही व्यक्तीला आगदी पंधरा वीस मिनटात पूर्ण ओळखू शकू. पंधरा वीस वर्ष संसार करूनही जिथे आपण आपल्या जोडीदारला ओळखू शकत नाही तिथे तिर्‍हाईत माणसाला आपण पंधरा मिनटात ओळखू शकतो असं आपण ठामपणे कसं काय सांगू शकतो ह्याच मला नवल वाटते.

मी एवढेच म्हणेन की पटकन कोणाबद्दल दृष्टिकोन बनवू नका मग तो चांगला असेल किंवा वाईट त्याच्या मनात खोल शिरा, काही वेळा जे वर दिसत नाही, ते खोल दडलेले असते. जिभेवर साखर पेरून बोलणारा माणूस आतून कारल्या सारख्या कडू असू शकतो किंवा तलवारी सारखी जिभेला धार असणारा माणूस आतून मृदू.

माणूस सोडा एखाद्या निर्जीव वस्तूकडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा वेगवेगळा असतो. एकच वस्तू एखाद्याला विलक्षण आवडते, मोहून जाते हवीहवीशी वाटते तर तीच वस्तू दुसर्‍याला नको नकोशी, कुरूप तिटकारा आणणारी वाटू शकते.

एखाद्या फुलाची सुंदरता एखाद्याला मोहरून टाकेल तर दुसर्‍याला नाही. पहाटेच्या रम्य वेळी पक्ष्यांची किलबिलाट काहीजणांचा सुखकर वाटेल तर काहींना त्याच किलबिलाटीची कटकट वाटेल.

दृष्टिकोन दृष्टीकोन म्हणजे काय हो? आपणच आपल्या विचारांना दाखवलेली दिशा. आपल्याच मनाचे विचार एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे. काही वेळा आपण ज्याचा वेग इतका ठेवतो की आपल्या नकळत समोरच्या बद्दल, एक आपले मत बनवून बसतो.

प्रेक्षकांना सर्कशीत काम करणारा जोकर हा केवळ विदुषक असतो, सगळ्यांना हसवणारा पण त्याच्या दृष्टीकोनातून मात्र तो एक कलाकार असतो आणि आपला प्रत्येक कार्यक्रम उत्तम झाला पाहिजे असा असतो त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. लोक तुमच्या बद्दल काय विचार करतात याचा विचार करू नका सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे जात रहा.

शेवटी एवढचं म्हणेन की कदाचित माझा हा लेख वाचून तुमचा प्रत्येकाचा माझ्याकडे बघण्याचा किंवा माझ्या लिखाण बद्दलचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो हे नक्की?

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-1 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ☆ विविधा ☆ आमची‌ अंदमान सफर… भाग-1 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

अंदमान सहलीचे बुकिंग करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या ठिकाणी दहा वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगली तो सेल्युलर जेल बघणे हेच ध्येय मनाशी होते. सेल्यलर जेल म्हणजे भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र म्हटले पाहिजे. ब्रिटिशांनी सावरकरांना दोन जन्मठेपांची शिक्षा देऊन अंदमानला पाठवले होते. 1910 ते 1921 या कालखंडात स्वातंत्र्यवीर सावरकर देशासाठी कारावास भोगत अंदमानला होते. तीव्र बुद्धिमत्ता पण तितकेच कणखर मन आणि प्रतिभा त्यांच्या ठायी होती. आत्तापर्यंत ‘माझी जन्मठेप’चे पारायण झाले होते. त्यामुळे कोलू फिरवणे, काथ्या कूटणे यासारखे शारीरिक कष्ट, अंगावरची दंडा बेडी, बारी नावाच्या ब्रिटिशाच्या तुरुंग सुप्रिटेंडंटचा होणारा जाच,  स्वातंत्र्य सैनिकांना होणाऱ्या यातना ,काहींना फाशी या सर्व गोष्टी आठवून या परिसरात गेल्या बरोबरच मन खूप भारावून गेले. अंदमानच्या भिंती हा इतिहास बोलका करीत असल्या तरी प्रत्यक्ष तेव्हा त्यांचा छळ कसा झाला असेल याची कल्पनाच करवत नाही. सेल्युलर जेलमध्ये प्रवेश करताच उजव्या हाताला जो पिंपळाचा पार आहे तो आजही या सर्वांची साक्ष देत उभा आहे. या पाराखाली सावरकरांनी अनेकांना साक्षरतेचे, स्वातंत्र्याचे धडे दिले म्हणून हे जणू आपले  पहिले विद्यापीठच होते!

अंदमान सहलीच्या पहिल्याच दिवशी आम्ही सेल्युलर जेल पहायला गेलो. सात फूट रुंद, दहा फूट उंच आणि साडेतेरा फूट लांब कोठडी होती.तिथे फक्त एक खिडकी होती. इथेच सावरकरांनी भिंतीवर ‘कमला’ काव्य लिहिले.

आम्ही सावरकर कोठडीत काही वेळ थांबून सर्व परिसर बघितला. फाशी गेट तसेच सावरकरांना देण्यात येणाऱ्या शिक्षांची पुतळ्यांच्या रूपात दाखविलेली झलक पाहिली. तेथील साऊंड आणि लाईट शो बघून बाहेर आलो. मन खूप भारावून गेले होते. बाहेर सावरकर बागेतील इतर क्रांतिकारकांचे पुतळे पाहिले. संध्याकाळी हॉटेलवर परत आलो, पण मन अजूनही तिथेच होते.

दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आम्ही दुपारच्या वेळी सेल्युलर जेल ला गेलो तेव्हा शांतपणे सावरकर कोठडीत बसून ‘जयोस्तुते श्री महन्मंगले..’ हे गीत म्हंटले, तेव्हा मन आणि डोळे नकळत भरून आले.

                 क्रमशः…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बोलणे-विचार करून बोलणे ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी

श्री एस्.एन्. कुलकर्णी 

☆ विविधा ☆ बोलणे-विचार करून बोलणे ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी ☆ 

निसर्गाने बोलण्याची शक्ति फक्त मनुष्यालाच दिली आहे. कोणताही प्राणी, पक्षी बोलु शकत नाही. मनुष्यप्राणीच फक्त बोलु शकतो. हे निसर्गाने मनुष्याला दिलेले वरदानच आहे.

आपल्या भावना, विचार, इच्छा, गरजा व्यक्त करण्याचे ते एक मोठे साधन आहे. आपण बोललो ते बरोबर आहे का, योग्य आहे का अयोग्य हे मनुष्याला बोलल्यानंतरच त्याच्या परिणामावरूनच समजते. तेंव्हा मनुष्याने विचार करूनच बोलले पाहीजे. बोलल्यानंतर विचार करण्यात काय अर्थ? न विचार करता बोलले तर समोरची व्यक्ति दुखावली जाण्याची, दुरावली जाण्याची शक्यता अधिक असते. बोलल्यानंतर मी असे बोललोच नाही, मी असे कांही म्हणालोच नाही, मला तसे म्हणायचे नव्हते अशी सारवासारव करण्यात काय अर्थ? म्हणुन बोलल्यानंतर विचार करीत बसण्यापेक्षा  विचार करूनच बोलणे अधिक चांगले. त्यामुळे अनेक अनर्थ टळतील.

तुम्ही कसे आहात हे तुमच्या बोलण्याच्या पध्दतीवरून समजते. बोलताना तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातील खरेपणा, प्रामाणिकपणा यावरूनच तुमची पारख केली जाते. तसेच त्यावरून तुमचा “सुसंस्कृतपणा” लक्षांत येतो. आवाजाची पट्टी नेहमीच मध्यम असावी. वरच्या पट्टीत बोलणे टाळावे.बोलताना योग्य शब्द वापरले पाहीजेत. अयोग्य शब्द, अपशब्द टाळावेत. बोलण्यातुन समोरच्याबद्यल आदर व्यक्त झाला पाहीजे. बोलण्यात कोरडेपणा असु नये. आपुलकी जिव्हाळा असावा. आणि तो खरा असावा.त्यामध्ये तोंडदेखलेपणा नसावा. बोलणे नेहमी मुद्देसुद आणि मुद्याला धरूनच असावे. पाल्हाळ लावले की समोरचा माणूस कंटाळतो.ऐकुन घेण्यास टाळाटाळ करतो.

“कौन बनेगा करोडपती” मधील अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकत रहावे असे वाटते. समोरची व्यक्ति कितीही लहान असो अथवा मोठी, अमिताभ बच्चन त्यांच्याशी आदरानेच बोलतात. त्यांना प्रोत्साहित करतात. त्यामुळे समोरची व्यक्ति अधिक मोकळी होते, रिलॅक्स होते आणि ऊत्साहित होते. बच्चन यांचेबद्दलची भिती जाऊन तिही मोकळेपणाने बोलायला लागते. हे बच्चनजींच्या बोलण्याचे, संवाद साधण्यामागचे कौशल्य आहे. अशा निरीक्षणातुनच आपलाही विकास होतो.

कसे बोलावे हे खरे तर अनेक गोष्टीतून साध्य करता येते. अनेक दिग्गजांचे बोलणे ऐकुन, विद्वान लोकांचे मार्गदर्शन घेऊन आपण ही कला अवगत करू शकतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे साहित्य वाचुन आपण आपले शब्द सामर्थ्य वाढवु शकतो. यामधुनच बोलताना आपल्याला योग्य शब्दांची निवड करता येते.

भाषण देणारे अनेकजण असतात. पण मुद्दाम आवर्जुन ऐकावे ते आदरणीय श्री अटल बिहारी वाजपैयीजी तसेच प्राचार्य श्री शिवाजीराव भोसले सर यांची भाषणे,व्याख्याने. आपले बोलणे नेहमीच अर्थपूर्ण असले पाहीजे. निरर्थक बोलण्याला कांहीच अर्थ नसतो आणि कोणी ऐकतही नाही. बोलताना मोजकेच बोलले पाहीजे. अती बोलले की त्यामध्ये हमखास वावगे, अनावश्यक बोलले जाते. समोरचा माणुस त्यामुळे दुखावला जाऊ शकतो.

शब्द हे शस्र आहे. शस्रापेक्षाही अधिक घायाळ करण्याची शक्ती त्यामध्ये असते हे कायम लक्षांत ठेवले पाहीजे. तेंव्हा बोलताना विचार करूनच बोलले पाहीजे.

©  श्री एस्. एन्. कुलकर्णी

वारजे, पुणे-४११०५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ते” होते म्हणून… – भाग-5 ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

 ☆ विविधा ☆ “ते” होते म्हणून… – भाग-5 ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे ☆ 

शिर्डीचे साईबाबा खूप जणांना माहिती असतात. पण त्यांचे शिष्य उपासनी महाराजांबद्दल फार कमी माहिती असते. काशिनाथ गोविंदराव उपासनी हे नाशिकमध्ये सटाणा येथे जन्मले. कर्मठ सनातनी घराण्याचे संस्कार असलेला हा मुलगा औपचारिक शिक्षणाच्या बाबतीत उदासीन होता. पण जन्मतः अलौकिकत्वाची लक्षणे घेऊन आला होता. त्यांचं सविस्तर चरित्र सांगण्याची ही जागा नाही. पण लहानपणी विवाह झाल्यावर त्यांची ती पत्नी वारली. दुसराही विवाह (जो त्यांना नको होता..) त्या पत्नीच्या निधनामुळे संपुष्टात आला आणि महाराज योगसाधना करायला मोकळे झाले. ती साधना करीत असताना श्र्वासाचा त्रास होऊ लागला. त्यांना गुरुंनी साईबाबांकडे जायला सुचवलं. पण ते मुस्लिम असल्यामुळे महाराजांनी जायला नकार दिला. पण साईबाबा येऊन उपाय सुचवून गेले. असं दोन वेळा झालं पण उपाय न करण्यामुळे त्रास वाढला. शेवटी निरुपायाने ते शिर्डिला गेले आणि साईबाबांनी त्यांना बरं केलं. यानंतरही त्यांनी शिर्डि सोडून जायचा प्रयत्न केला पण जमला नाही आणि साईबाबांच्या इच्छेनुसार ते तिथेच राहिले. चार वर्षं अत्यंत कठोर, अकल्पनीय साधना केल्यावर ते सद्गुरुपदाला पोचले.

साईबाबांनी त्यांना दिलेल्या अंत: प्रेरणेनुसार त्यांनी शिर्डिजवळच साकुरी इथे कन्याकुमारी स्थान उभं केलं. त्यांच्या पहिल्या आणि त्यांच्यानंतर गुरुपदावर बसलेल्या शिष्या म्हणजे पू.गोदावरीमाता. उपासनी बाबांनी मूळ २४ कन्यांना साकुरीत ठेवून घेऊन चारही वेद, यज्ञकर्म, पौरोहित्य शिकवलं. त्यासाठी संस्कृतचा पाया भक्कम करून घेतला. स्त्रियांमधे पावित्र्य, सहनशीलता, श्रध्दा, चिकाटी, करूणा, समर्पणभाव असे गुण असतात हे एक कारण… पण बाबांना स्त्रियांना वेदाधिकार, साधनेचा अधिकार द्यायचा होता. कडक ब्रह्मचर्याचं तेज आणि स्त्रीत्वाची कोमलता यातून एक कार्य उभं करायचं होतं. पण त्यांच्या कार्याची दिव्यता लक्षात न आल्याने त्यांच्यावर खटला भरला गेला.. विलक्षण बदनामी झाली. स्त्रियांना घेऊन केलेलं काम… त्यामुळं चारित्र्य हनन करण्याचे प्रयत्न केले गेले. पण महाराज यातून अग्नीतून झळाळत्या सोन्यानं बाहेर पडावं तसे बाहेर पडले. अत्यंत सन्मानाने त्यांना दोषमुक्त केलं गेलं आणि त्यांच्या कार्याचा गौरव झाला. पुढे आकाशवाणीवर वेदांमधले काही भाग ऐकवण्याची योजना आखली गेली. तेव्हा अत्यंत अचूक, अधिकृत वेदोच्चार करणाऱ्या फक्त उपासनी महाराजांच्या शिष्याच आहेत हे लक्षात आलं. खूप वर्षे आकाशवाणीवर “उपासनी कन्यां” चे वेदपठण /उपनिषदांचे पठण/सूक्ते ऐकवली जात असत.

हिंदू स्त्रियांना विविध क्षेत्रात विविध लोकांनी स्थान मिळवून दिले आणि हिंदू स्त्रियांनीही या संधींचा सोनं केलं. वेद पठण, पौरोहित्य यांचा अधिकार देऊन यज्ञसंस्था त्यांच्याकरवी जिवंत ठेवण्याचं काम उपासनी महाराजांनी साईबाबांनी दिलेल्या अंत:प्रेरणेनं केलं आज सनातन हिंदु धर्मातील शास्त्रशुध्द पूजाअर्चा, यज्ञयाग, वैदिक ज्ञान साकुरीमधे व्रतस्थ स्त्रिया जतन करीत आहेत.

अशा विभूतींनी हा धर्म काळाबरोबर प्रवाहित ठेवला. त्याचं डबकं होऊ दिलं नाही.

क्रमशः ….

© सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

मो – 7499729209

(लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मत आहेत.)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उंबरठा.. घराचा आणि मनाचाही..! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

 ☆ विविधा ☆ उंबरठा.. घराचा आणि मनाचाही..! ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

घराची दारं जशी संरक्षक कवचं,  तसाच उंबरठा त्या दारांचा भक्कम आधार. दारं घट्ट मिटून निश्चिंत होतात दारांच्याच चौकटीच्या भरवशावर, पण त्या चौकटीला स्वबळावर तोलून धरत असतो तो उंबरठाच..!

उंबरठा एका क्षणकाळा साठीचाच पण अडसर असतो येणाऱ्या  आणि जाणाऱ्यां साठीही. योग्य विचारांसाठीचा एक थांबा..! या थांब्याची सवय, सराव असणारी पावलं न अडखळता निश्चिंत मनानं जा ये करीत असतात अगदी सहजपणे तिथं क्षणभर थांबून, पण त्या त्या वेळी उंबरठा असतोच प्रत्येकाच्या मनात, जाणाऱ्या आणि येणाऱ्यांच्याही, ठाण मांडून बसलेला मनाच्याच सताड उघड्या दारात मनाच्याच पहारेकऱ्यासारखा..!

त्या प्रत्येकांसाठी रांगोळी रेखला उंबराच असतो प्रत्येकाच्या मनात बालपणापासूनचा.  आजकालच्या रांगोळी नसलेल्या उंबऱ्यांच्या किंवा उंबराच नसलेल्या घरांमधल्याही त्या पूर्वकालीन सर्वांच्या मनातही उंबरा असतो तो रंग ओळी रेखलेलाच. तो दृश्य किंवा अदृश्य उंबराच होतो मग नंतरच्या पिढ्यांसाठीही एक प्रतिक मर्यादांचं. या संदर्भात स्त्री असो वा पुरुष, रोज उंबरा ओलांडून बाहेर पडावं लागतं ज्यांना, त्यांनी मनातल्या संस्कारांनी घालून दिलेलं मर्यादांचं उल्लंघन न करायचं भान ठेवणं ही अखेर त्यांचीच जबाबदारी. तिची तशीच त्याचीही. . !

या जबाबदारीचं भान सतत जागं रहाण्यासाठी प्रत्येकाच्या मनाच्या चौकटीला पेलून धरणारा हवाच एक उंबरठा, घराला नसला समजा तरीही. . !

हा मनाचा उंबरठा असतो मनाच्या घरात येणाजाणाऱ्या विचारांसाठीचा थांबा आणि अविचारांसाठीचा अडसरही. . !

तोच सांभाळत असतो तोल स्वतःबरोबरच मनाचाही. तोच जागती ठेवतो मनातली जाणिव जबाबदारीची आणि स्विकारलेल्या बांधिलकीचीही.

आजच्या काळात उंबरा ओलांडून जाणं आणि थकून परत येणं सर्वांसाठी नित्याचंच असतं. जाताना मिटल्या दारांना संध्याकाळी अंधारेपर्यंत अंधारं कुलूपच असतं उंबऱ्याच्या सोबतीला. क्वचित एखाद्या घरी येणाऱ्यांची वाट पहाणारंही असलंच कुणी घर सांभाळणारं किंवा त्यांच्या निगराणीखाली तग धरुन असलेलं थकून गेलेलं वार्धक्यही कदाचित, तर येणाऱ्या पावलांना भान देतो, मनातलाच उंबरा. पावलांच्या बूट चपलांबरोबर, बाहेरच्या कामांचे, जबाबदाऱ्यांचे सगळेच विचार, सगळीच दडपणं अलगद मनातल्या मनातच वेगळी करुन मनातल्याच एका खास कप्प्यात बंद करुन टाकायचं भानही तोच देतो. घरात उंबरा ओलांडून आत पुन्हा प्रवेश करताना घरातल्या वेगळ्या भूमिकाचंही. जाताना आणि येतानाच्याही परस्पर वेगळ्या भूमिका न् जबाबदाऱ्यांचं भान देणारा स्विच त्या त्या वेळी आॅन आॅफ करायचं भान मनातला उंबराच करुन देतो जाण्यायेणाऱ्या तिला आणि त्यालाही. समाधानी सहजीवनातील आनंदाचं असा अधिष्ठान असतो हा मनातला उंबरठा. . घराचं घरपण जपणाऱ्या घराच्या चौकटीतल्या उंबऱ्यासारखाच. . !!

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मजवरी तयाचे ‘प्रेम’ खरे ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

 ☆ विविधा ☆ मजवरी तयाचे ‘प्रेम’ खरे ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

मजवरी तयाचे ‘प्रेम’ खरे ??

हॅलो  सर तुम्ही पत्रिका बघता का? असा एखाद्या मुलीचा फोन येणे (आजकाल व्हाटसप मेसेज), किंवा सर तुम्ही पत्रिका जुळवून देता का? (न जुळणारी पत्रिका) असे फोन  यायला लागले की ओळखायचे “संत प्रेम बाबा दिवस” ( १४/२)  लवकरच येत आहे.

माझ्या जोतिषाच्या अभ्यासात ‘ग्रहांकित ‘प्रेम’ प्रकरणांची ‘प्रमेय’ मला अनेक गोष्टी शिकवून गेली. माझी सगळ्यात जास्त भकिते जी  बरोबर आली  आहेत  ती ‘ प्रेम ‘ – प्रकरणाबाबतच. ( लगेच हुरळून जाऊन माझा नंबर घेऊ नका, पुढे वाचा. भाकिते बरोबरच आली  यात शंकाच नाही पण ती भकिते  प्रेमभंग होईल /  अपेक्षित मुलाशी -मुलीशी लग्न होणार नाही अशीच होती. आणि ती एकूण एक बरोबर आली. बाकी संपर्क करायला हरकत नाही, तुमची मर्ज्जी ? )

शास्त्राच्या अभ्यासाबरोबर मानशास्त्राचा ही अभ्यास असणे जोतिषाला गरजेचे असते असे सांगितले जाते. याची प्रचिती  ग्रहांकित ‘प्रेम प्रकरणात’ नक्की येते. म्हणजे अगदी हातात पत्रिका नसताना ही समोरचा जातक  जे बोलतो त्यावरून  हे ‘प्रेमप्रकरण’ आहे हे लगेच लक्षात येते. त्याचवेळी शुक्र – मंगल  रुलींग मध्ये असला किंवा त्यावेळी  पंचमात चंद्र वगैरे असला की या गोष्टीची १०० % खात्री समजावी. याची सुरवातीलाच दोन उदाहरणे दिली आहेत.

नुसत्या पत्रिकेचा विचार करता  पत्रिकेतील पंचम स्थानाचे ( प्रेमप्रकरण ), सप्तम स्थानाशी ( विवाह) सूत जुळले की  प्रियकर/ प्रेयसी   ‘पंचम’दांची ‘ सप्त’ सुरांतील गाणी  आळवायला सुरवात करून सप्त-पदीच्या अपेक्षापूर्ती साठी झटू लागतात. खरं म्हणजे पाचव्या पासून सप्तम स्थान फक्त २ पाय-या दूर  पण पत्रिकेतील   ‘ मंगल, राहू ‘ सारख्या व्हिलनशी  सामना करून  जे तिथं पोहोचतात  ते प्रियकर/प्रेयसी चे नवरा/बायको होतात. जे पोहचू शकत नाहीत  ते अपेक्षाभंगाचे दु:ख कायम ठेऊन राहतात. टँरो कार्डेस मध्ये “२ ऑफ कप्स” ( आनंदी जोडपं असं चित्र असलेलं  कार्ड )  हे कार्ड मला पंचम ते सप्तम स्थान या दोन पाय-या यशस्वी पणे पार करणा-यांच  प्रतीक वाटत. तर “३ ऑफ स्वाँर्ड” हे कार्ड   प्रेमभंग झालाय हे स्पष्ट सांगतं

जेव्हा जेव्हा प्रेमभंग हा शब्द ऐकतो तेव्हा तेंव्हा वपुंचं हे लेखन आठवते //

प्रेमभंग झालेल्या तमाम मित्र-मैत्रिणींनो माझ्या अशाच एका मित्राला त्याच्या प्रेयसीनं जे सांगितलं, ते सुत्र हे –

संसार हा धीरगंभीर, उदात्त रागदारीसारखा असतो. तासंतास चालणारा. केंव्हा केंव्हा फार संथ वाटणारा. आणि मध्येच तुझ्यासारख्या मित्राची आठवण, ही मोठा राग आळवून झाल्यानंतर ठुमरीसारखी असते. दहा मिनिटात संपणारी; पण सगळी मैफल गुंगत ठेवणारी, मरगळ घालवणारी. पण त्याचं काय असतं, की काही काही स्वर वर्ज्यच असतात. त्याला काय करणार? – म्हणून तुझ्या आठवणीत, सहवासात माझा नवरा बसू शकत नाही आणि एकमेकांच्या संसारात आपणा एकमेकांना स्थान नाही. वर्ज्य झालेला स्वर वाईट नसतो, वगळायचा असतो, तर एक राग उभा करायचा असतो, त्यासाठी आपण तो खुषीनं विसरायचा असतो. वाद्यातल्या तेवढ्या पट्ट्या उपटून फेकून द्यावयाच्या नसतात. त्यांना गाता – गाता, वाजवता फक्त चुकवायचं असतं

हे सूत्र तुम्हाला पेललं, तर संसाराची तुमची मैफल, रागदारीप्रमाणे बहरेल.

//

‘प्रेम ‘ म्हणलं की पाडगावकरांची ही एक कविता हटकून आठवते. हीच कविता  “ग्रहांकित प्रेमाला”   अनुसरून अशी  लिहावीशी वाटली

 

प्रेम  म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम  असतं

तुमच्या आमच्या ‘पत्रिकेत’  अगदी सेम नसतं

 

काय म्हणता?

या ओळी चिल्लर वाटतात?

काव्याच्या दृष्टीने थिल्लर  वाटतात?

 

असल्या तर असू दे

फसल्या तर फ सु दे

 

तरीसुध्दा

तरीसुध्दा

 

प्रेम  म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम  असतं

तुमच्या आमच्या पत्रिकेत अगदी सेम नसतं

 

पंचमातील शुक्रकडून

प्रेम करता येतं

सप्तमातील  राहू कडून

‘अंतरजातीय” होता येतं

घरचा विरोध पत्करून

गुरुजींना धरता येतं

पत्रिका न पाहता ही’

पळून जाता येतं

 

प्रेम  म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम  असतं

तुमच्या आमच्या ‘पत्रिकेत’अगदी सेम नसतं

//

१४ फेब्रुवारी या ‘ संत प्रेमबाबा  दिनाच्या ‘ निमित्याने सदर लेखन  संत प्रेम बाबांना प्रेम पूर्वक  समर्पीत ?

(ग्रहांकित ‘ प्रेमी ) अमोल  ?

 

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print