सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ श्रावण महिन्याची कहाणी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
एक मोठ्या मोठ्या उंच इमारतीचं नगर होतं. लोक खूप श्रीमंत होते. आधुनिक घरात रहात होते. आधुनिक तंत्रज्ञान वापरत होते. एका क्लिकवर सगळे पुढ्यात येत होते. भाजीपाला, सामान सगळे क्षणात दारात येत होते. हातात पैसाच पैसा होता. खाण्या पिण्याची चंगळ होती. आलिशान गाड्या होत्या. मुलं उत्तमोत्तम शाळेत जात होती. प्रत्येक हातात मोबाईल होता. टेबलवर संगणक होता. जग जवळ आलेले होते. नेटने जाळ्यात पकडलेले होते. सगळीकडे सुबत्ता होती. पण… कुठेतरी उणीव होती. आरोग्य मात्र बिघडलेले होते. डॉ. कडे मोठ्या रांगा होत्या. औषधांची दुकाने जोरात चालत होती. प्रत्येक माणशी काही ना काही आजार होता. मनस्वास्थ्य हरवले होते.
काय करावे कळेना. आरोग्य पैशाने विकत घेता येईना. सगळे होते चिंतेत. आपापल्या व्यथेत. तेवढ्यात एक माणूस आला. जणू देवदूतच भासला. खूप अनुभव त्याच्या गाठीला. एका मोठ्या कार्यक्रमात दाखल झाला. आनंदी राहण्याचा उपाय सांगतो म्हणाला. फक्त एक अट आहे म्हणाला. सगळे आवाज बंद करा. सर्वांनी जमिनीवर आसन धरा. लोकांनी तसेच केले. कारण सगळे होते शांतीचे आणि आनंदाचे भुकेले.
देवदूत म्हणाला “ खरेच मन:शांती व आनंद हवा असेल, तर माझे ऐकावे लागेल. एक व्रत करावे लागेल. सगळ्यांनी होकार भरला. प्रत्येक जण कान टवकारून ऐकू लागला. देवदूत बोलू लागला. चांगल्या गोष्टीची सुरुवात करायला श्रावण महिना आहे चांगला. फरक पडला तर कायम हे व्रत करा. आता फक्त सुरुवात करा……
या व्रतात काय करावे? सांगतो ऐका लक्ष द्यावे. आठवड्यात एक दिवस हे व्रत करावे. सकाळी लवकर उठावे. प्रथम मोबाईल, इंटरनेट बंद करावे. मोकळ्या हवेत फिरून यावे. फिरता फिरता स्वसंवाद करावे. उत्साहात घरी यावे. आई वडील यांच्या जवळ बसावे. छान छान बोलावे. सर्वांनी एकत्र चहा, नाश्ता घ्यावा. घरात मुलांशी खेळावे. गप्पा गोष्टी कराव्यात. थोडे स्वयंपाक घरात डोकवावे, मदतीसाठी विचारावे. जमेल ते काम करावे. दुपारी निवांत वेळी जुने कपाट आवरायला घ्यावे. त्यातील जुने फोटोंचे अल्बम बघावे. आठवणींना जागवावे. कपाट आवरताना मनही आवरावे. वाटले तर दुपारी आळसावून झोपावे. नाहीतर आवडते संगीत ऐकावे. एक दिवस स्क्रीनचा उपास करावा. आरोग्याचा मार्ग धरावा. आनंदाचा रस्ता शोधावा. रात्री सर्वांनी हसत खेळत, गप्पा मारत सहभोजन करावे. सर्वांनी एक दिवस हॉलमध्ये गाद्या घालून झोपावे. असे व्रत करावे. फायदे अनुभवावे. चांगल्या आरोग्यदायी परिणाम मिळण्यासाठी आठवड्यातून एकदा हे व्रत करावे. पुढच्या वेळी येईन तेव्हा अनुभव सांगावे.” … एवढे सांगून देवदूत निघून गेला. व्रत आचरणात आणण्याचा प्रत्येकाने निश्चय केला.
आपणही असे आचरण करावे. हे आपल्या चार्जिंगचे साधन समजावे. एक दिवस सुट्टी मिळाली म्हणून इकडे तिकडे जाऊन टेन्शन घेण्यापेक्षा हे उपाय करून बघावे. आपणच आपला आनंद शोधावा.
व्रत कसे वाटले सांगावे. आवडले न आवडले जरुर सांगावे. आवडल्यास कृपया नावासहित पुढे पाठवावे.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.
सांगवी, पुणे
– ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈