मराठी साहित्य – विविधा ☆ नातं – आईची आई ☆ सौ.दीपा पुजारी

☆ विविधा ☆ नातं – आईची आई ☆ सौ.दीपा पुजारी 

एकावर एक दोन ड्रेस चढवून वर स्वेटर, त्यावर ओव्हरकोट, डोक्याला माकडटोपी, हॅंडग्लोव्हज, मोजे, बूट अशी जय्यत तयारी करून मी तयार झाले. तेव्हढ्यात हातात गरम चहाचा कप घेऊन माझी लेक समोर ऊभी. सरणारा ऑगस्ट महिना. डब्लिन मधील एक पहाट. डब्लिनवासियांसाठी प्लेझंट पण आमच्यामते गारठलेली पहाट. मुलीने हट्टाने एक दिवसाची Galway-Belfast-Gaints Causeway ची खास आमच्या साठी ठरवलेली ट्रीप. थोड्या नाईलाजानेच मी ऊबदार, मऊ दुलईतून बाहेरआले व स्वत:ची तयारी करू लागले. हे तर केंव्हाच तयार होऊन बसलेले.

हसतमुखपणे गुडमॉर्निंग म्हणून तिने कप मला दिला व ती पुन्हा लगबगीने किचनकडे वळली.काल रात्रीच तिने  आलू पराठे करून ठेवले होते . सोबत शिरा व इतरही किरकोळ खाऊ होता. छानशा पिशवीत सगळे पॅक करून तयार होतेच. “चला चला ,इथे बस  वेळेवर सुटते हं. बाबा, आई आवरा लवकर.” ती हातात लॅच की घेऊन ऊभी.

तिने आम्हांला बाहेर काढलेच. रस्यातून जाताना तिच्या सूचना सुरु होत्याच. काय बघायचे ? कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या? बस कुठे थांबेल? गाईड कशी माहिती सांगेल? इथले नियम कसे कडक असतात. वगैरे….वगैरे….

“आई, २० मि. दिली असतील एखाद्या स्पाॅटला तर १५. मि. बस कडे ये हं. २० मि. म्हणजे अर्धा पाऊण तास नाही हं. वेळ लागला तर ओरडून घेशील मग मूड जाईल तुझा.”

“बाबा,एखाद्या ठिकाणी खूप चालावे लागले पण दमलात तर बसून रहा बाजूच्या बाकावर . नाही चालावे वाटले तर राहू दे.” असे म्हणत तिने स्वत:चे एक कार्ड बाबांच्या हातात ठेवले. बरोबर थोडे युरोही होते. “आई बाबा चहा काॅफी घ्या. काही खावेसे वाटले तर खा. आणी खरेदी ही करा हं.”

मी बसच्या खिडकीतून बाहेर पाहिले. ती हसत हसत हात हलवून निरोप देत होती. ही एव्हढी मोठी कधी झाली? माझ्या नजरेसमोर तर अजून ऊड्या मारत स्कूल युनिफॉर्म मधलीच आहे. शाळेच्या सहलीला जाताना तिची बस दिसेनाशी होईपर्यंत गेटजवळ मी ऊभी असायची हात हलवत. तिचा ऊल्हासित चेहरा, मैत्रिणींच्या बरोबर चाललेल्या गप्पा, टाळ्या, आणी इतक्या मुलींमधूनही एव्हढ्या किलबिलाटात ही ओळखता येणारी तिची हास्य लहर!! तिचा तो अवखळपणा, अल्लडपणा, निरागसपणा जाऊन हा बदल कधी झाला? दुसर्‍या ईयत्तेत असताना एकदा वर्गात रडत होती. बाईंनी कारण विचारले तर आईची आठवण आली म्हणाली. एव्हढ्या लांब परक्या जगात,परक्या वातावरणात कसा निभाव लागणार हिचा? कधी काही बोलली नाही. आज जग फिरुन अनेक अनुभव घेऊन अधिकच समंजस झालीय. आणी आज तर हिने नात्यांचीच अदलाबदल केली.

ही तर माझीच आई झाली. सुजाण, सुशिक्षित, कर्तबगार तरीही आपल्याच आई बाबांची छोटी आई!! मला वाटले हा दिवस लवकर संपावा व घरी जाऊन या ‘आईचीच आई झालेल्या आईच्या’ मांडीवर डोके ठेऊन शांत झोपावे. पिकनिक हून आल्यावर ती दमून शिरायची तसे……अगदी तसेच…….

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सत्यवानाची सावित्री ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ सत्यवानाची सावित्री  ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

जवळपास गेली चाळीस वर्षे इंदू माझ्या घरी काम करते ती माझ्याकडे आली तेव्हा आम्हा दोघींची मुले पहिलीत होती आज आम्हा दोघींच्या घरी गोकुळ आहे.

इतक्या वर्षांचा ऋणानुबंध आमचा! आता ती आमच्या कुटुंबातीलच एक झाली आहे. स्वतःचं एवढं मोठं कुटुंब असूनही ती माझ्या घरात रमलेली असते. आणि माझ्यात गुंतलेली!

तिचा सगळा जीवनप्रवास तसा खडतरच! अशिक्षिततेची झालर असलेलं जिणं तिच!! ठेंगणी ठुसकी अशी इंदू कष्ट करून नीटनेटका संसार करणारी अशी.. ‘तुमच्या वानी तुमच्या वानी’असं म्हणून जमेल तेवढं माझं अनुकरण करणारी . अशी ही इंदू……

माझ्याच घरात तिने स्वयंपाकाचे धडे घेतले. जेवढ्या म्हणून माझ्या गोष्टी तिने डोळ्याने पाहिल्या हाताने शिकल्या त्याचं तिला अप्रूप आहे. वेळोवेळी केलेल्या मदतीचे भान ती ठेवते पण तिच्या नशीबाची गाडी मी पळवू शकत नाही हे तिला चांगलेच ठाऊक आहे.

तिचा नवरा पहिल्यापासूनच व्यसनी…रोजची भांडण रोज वाद, कधीकधी होणारा नशेचा अतिरेक हे मी इतकी वर्ष पाहात आले आहे जीवनाचा समतोल राखत ती बिचारी जन्मभर राबते आहे.

सततच्या व्यसनासाठीच्या पैशाची मागणी आणि पुरवले नाहीत की होणारी मारहाण यांनी कातावून गेलेली इंदू माझ्याकडे आल्यावर सगळं दुःख विसरते आताशा तर रोजचेच रडगाणे गायचे ही तिने सोडून दिलेआहे.

कधीतरी तिचा चेहरा पडलेला दिसला की मी खोदून तिला विचारत असते पण दुःखाचं प्रदर्शन मांडायचं आणि नवऱ्याला नावं ठेवायची हे तिच्या स्वभावात नाही पण अती झाले की कधीतरी ती माझ्यापुढे मोकळी होते.

करोनाचे अस्मानी संकट आले तशी तिच्या जीवनाची घडीच विस्कटली यंत्रमाग बंद पडले. दोन्ही मुलांचं काम गेलं. पैशाची चणचण भासू लागली. माझ्याकडून होता होईल तेवढी मदत करत होतेपण ती खिन्न आहे.

त्यात आणखी तिच्या नवऱ्याची रोजची दारूसाठी पैशाची मागणी

चार दिवस सलग ती आलीच नाही तिच्या मुलाचाही फोन लागेना.एखादा दिवस वाट बघावी आणि मग पाठवावं कुणालातरी तिच्याकडे असा मी विचार करत होते तोवरच दारात उभी !मान खाली घालून काहीशी अस्वस्थच दिसली .घरात आली आणि मटकन खाली बसली. आणि ओक्साबोक्शी रडायला लागली माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली ती दुसऱ्याच कारणासाठी….कुणा मुलाला कोवीड झाला की काय असे वाटले. बऱ्याच वेळानंतर बोलती झाली…

“मालक गेलं वहिनी “…..

“अगोबाई कशानं गं? मला एकदम धक्का बसला.”

“वहिनी जनमभर मी त्याला दारूला कधीबी कमी केलं न्हाई.त्यांच्या व्यसनासाठनं राबलो.तुम्हाला ठाव आहे. घरात दुध नसलं तर चालल पर त्याच्यासाठनं मी कायम पैका दिला. परवा दिवशी त्यांच्या हातात पैसे हुतं पर दारू मिळना म्हनूनशान लै चिडचिड चिडचिड करत हुतं आणि कुठं जाऊन ते हाताला लावत्यात ते काय म्हणतात शनि टायझर पिऊन आलं बघा आनी दवाखान्याला न्यूस तो पतुर डोळ्या देखता गेलं.” असं म्हणून तिने अक्षरशः हंबरडा फोडला.

“म्या त्यांची दारू कवा बंद केली न्हाई. मी त्यांच्या दारू साठनच राबलो का न्हाई वहिनी? मला ठाव असतं दारू कुठं मिळतीया ते तर कुठून बी दारू आनून पाजली असती. त्यांच्यासाठनं काय बी केलं असतं म्या”….. आणि पदर डोळ्याला लावून ती हमसाहमशी रडू लागली

मी आ वासून पाहत बसले त्या सत्यवानाच्या सावीत्रीकडे !!……

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राष्ट्रीय कर्करोग जागृती दिन विशेष – ‘को-जागर्ति’ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे 

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ विविधा ☆ राष्ट्रीय कर्करोग जागृती दिन विशेष – ‘को-जागर्ति’ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

नुकतीच आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी केली. एक आख्यायिका सांगतात की, या दिवशी रात्री लक्ष्मीदेवी ‘को-जागर्ती ‘ म्हणजे ‘कोण जागे आहे ?’ असे विचारते. या दिवशी देवीचा कृपाशीर्वाद मिळतो. समृद्धी येते असे म्हणतात.

हेच कॅन्सरच्या आजाराच्या बाबतीतही म्हणता येईल. को-जागर्ती असे विचारणारी देवी जो “जागृत “आहे त्याला निश्चित प्रसन्न होते आणि त्याला आरोग्य धन मिळते. आरोग्यम् धनसंपदा ! हे तर आपल्याला ठाऊकच आहे.

आज ७ नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागृती दिन (National Cancer Awareness Day ) आहे.  या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधायची संधी मिळाली आहे.

आज-काल प्रगत तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रात अनेक आजारांवर सुलभ आणि प्रभावी उपचार करता येऊ लागलेले आहेत. कॅन्सरसारख्या आजाराचा विचार केला की,एक काळ असा होता की ‘कॅन्सर म्हणजे मृत्यू ‘ असेच जणू समीकरण झालेले होते.

पण आज प्रगत, प्रभावी उपचारांनी क्रांती घडविलेली आहे. कॅन्सर रोग पूर्णपणे बरा होणे आजकाल शक्य झाले आहे.  यामध्ये हा आजार सुरुवातीच्या टप्प्यावर लक्षात येणे हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. या आजारावर प्रतिबंधात्मक औषधोपचार नाहीत.  पण,

Early detection is prevention .

असं नक्की म्हणता येईल. म्हणून प्रतिबंधात्मक चाचण्या (प्रिव्हेंटिव्ह चेकअप )खूप महत्वाच्या ठरतात.

महिलांमध्ये कॅन्सर बाबत जागृतीचे काम करताना बऱ्याच वेळा या दुखण्याबद्दलची भीती,तपासणी टाळण्याची वृत्ती, स्वतःच्या स्वास्थ्या बाबतची उदासीनता यांचा अनुभव येतो. हे औदासिन्य,भीती किती ? तर या आजाराची माहिती देणार्‍या व्याख्यानाला येण्याची सुद्धा अनेकांची तयारी नसते .

घरातल्या गृहिणी घरातील इतर सदस्यांच्या तब्येतीच्या छोट्या मोठ्या तक्रारींची लगेच काळजी घेऊन उपचार करून घेतात. पण स्वतः मात्र बारीकसारीक तक्रारी अंगावरच काढतात आणि आजार वाढला की दवाखाना गाठतात. पण काही आजारांच्या बाबतीत बराच उशीर झालेला असू शकतो. शिवाय लाज,संकोच हे जन्मजात स्वभावधर्म साथीला असतातच.

यामुळे कॅन्सर प्रतिबंधात्मक चाचण्यांसाठी सहजासहजी तयार होणाऱ्यांची संख्या तुलनेने खूपच कमी असते. पण वेळेवर सावध होऊन तपासणीला गेलेल्या,आजाराचे अगदी प्राथमिक स्थितीत निदान झाल्याने पूर्ण बऱ्या झालेल्या मैत्रिणी पाहिल्या की खूप समाधान मिळते. पण समजून-उमजून तिकडे दुर्लक्ष करणाऱ्या मैत्रिणी पाहिल्या की वाईट वाटते. हे म्हणजे तोंडावर पांघरूण घेऊन ‘मी झोपलोय’असं म्हणण्यासारखं झालं.

अहो, भाजीची एक जुडी घ्यायची तर आपण ५-६ जुड्या खालीवर करून बघतो. मग आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण किती जागरूक असायला हवे हे लक्षात येतंय ना ? आयुष्यातील प्रत्येक बाबतीत आपण चोखंदळ असतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला चांगलीच हवी असते. आपल्याला अनमोल असे शरीर लाभलेले आहे. मग त्याचे स्वास्थ्य शेवटपर्यंत चांगलेच राहायला हवे ना ! त्यासाठी कोणतेही आजारपण,दुखणे झाले तरी ते वेळेवर लक्षात येऊन त्यावर लगेच उपचार झाले पाहिजेत हे पाहणे हे आपलेच काम आहे.

त्यासाठी दरवर्षी आरोग्यविषयक सर्व तपासण्या करायला हव्यात.  विशेषत: पॅप स्मिअर,मॅमोग्राफी,काही पॅथॉलॉजी तपासण्या करून घेणे खूप आवश्यक आहे. यातून संभाव्य धोक्याची पूर्वसूचनाही वेळेवरच कळू शकते. त्यावरील उपचारांनी आजाराला वेळेवरच रोखता येते. यातून एक लक्षात येते की आज-काल कॅन्सर हा दुर्धर आजार राहिलेला नाही. त्यावर चांगले प्रगत उपचार उपलब्ध झालेले आहेत. प्राथमिक अवस्थेतील कॅन्सर पूर्ण बरा होऊ शकतो. म्हणूनच सर्वांनी जागरूकपणे नियमित कालावधीनी तपासण्या करून घ्यायला हव्यात.

एकूणच कॅन्सर बाबत जागरूक कसे रहावे याबद्दल समजून घेतल्यावर प्रतिबंधात्मक चाचण्यांची उपयुक्तता आणि गरज,सकारात्मक विचारधारा,जीवनातील डोळस वाटचाल यांचे महत्त्व लक्षात आले असेलच. त्यासाठी आपल्या शरीरातील लहान-सहान बदल सुद्धा वेळेवर लक्षात घेतले पाहिजेत.  त्यांची नीट काळजी घ्यायला पाहिजे. घरातल्या अनुवंशिक आजारांची,जवळच्या नातलगांच्या मोठ्या आजारपणाची नोंद ठेवायला हवी. एकूणच नेहमी जागरूक राहायला हवे. कारण शेवटी आपले आरोग्य हे आपल्याच हाती असते. यासाठीच हे कळकळीचे आवाहन—–

 

इकडे जरा द्या तुम्ही ध्यान

कॅन्सर जरी रोग महान

वेळेवर करता त्याचे निदान

मनुजा मिळते जीवनदान !!

 

उत्तम आरोग्याचा आदर्शमंत्र

रोगा आधीच त्यासाठीची तपासणी

आपण सारे मिळून करू या आरोग्य मंत्राची अंमलबजावणी !!

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शेवटची पंगत ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

☆ विविधा ☆ शेवटची पंगत ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

एकत्र कुटुंबांमधल्या कर्त्या बायकांची पंगत म्हणजे शेवटची पंगत.  हिंगणघाटला माझ्या आजोळी आणि विजापूरला परमपूज्य अण्णांच्या घरची… अशा दोन्ही घरच्या शेवटच्या पंक्ती माझ्या सवयीच्या आणि त्या पंक्तींमधले जेवण तर अतिविशेष आवडीचे.

माझ्या लहानपणी आजोळी खूप माणसे असायची.  त्यामुळे पहिली पंगत मुले आणि बाहेर कामासाठी जाणा-या पुरुषांची,  नंतरची लेकुरवाळ्या मुली आणि सुनांची.. आणि सर्वात शेवटी स्वैपाक करणा-या बायकांची म्हणजे आजी, मामी वगैरे लोकांची.  कधी कधी तर या पंक्तीला इतका उशीर होई की पहिल्या पंक्तीत जेवूनही शाळेला सुट्टी असलेली पोरे परत त्या शेवटच्या पंक्तीत परत जेवायला बसत. सणासुदीला तर असे हमखास होई.

या पंक्तीत अनेकदा भाज्यांनी आणि भाताने तळ घातलेला असे.  कधी पोळ्याही पुरेशा नसत. माझी सदा हसतमुख आजी म्हणे… चांगला झाला असणार स्वैपाक…  म्हणून सर्व भरपेट जेवले!  असे म्हणत ती विझू घातलेल्या निखा-यावर तवा ठेवून  पटकन होणा-या भाज्या किंवा पिठलं करी,  त्यात तेल,  तिखट आणि मसाले सढळ हाताने पडे शिवाय त्या शेतातून नुकत्याच आलेल्या त्या ताज्या रसदार भाज्या अर्धवट शिजल्या तरी खूप चवदार लागत.  उरलेल्या वरणावर थोडे तेल,  मीठ,  तिखट आणि मसाला घालूनही एखादे कालवण होई.

पोळ्याच्या परातीत उरलेल्या पीठात थोडे ज्वारीचे पीठ घालून त्यात मिरच्या कोथिंबीर घालून चुरचुरीत खमंग धिरडे करत.  त्याचा वास थेट झोपलेल्या आजोबांच्या नाकात जाई आणि तेही उठून स्वैपाकघरात येत. एकदा जेवल्यावर ते काही पुन्हा जेवत नसत पण मग तिथेच एका पाटावर बसून काहीबाही मजेच्या गोष्टी सांगून सर्वांना हसवत.   आजी ठेवणीतली लोणची काढी.  भाताच्या खरपूडी लोणच्याबरोबर कालवताना पाहून आजोबा हमखास सूर्याच्या थाळीची गोष्ट रंगवून रंगवून सांगत.

त्या पंक्तीत जेवणा-या बायकांसाठी सुबक विडे लावून देत.

दुस-या दिवशी स्वैपाकाच्या अगोदर आजीला बोलावून…थोडे तांदूळ,  डाळ,  कणिक आणि भाज्या जास्तीच्या घ्यायला आवर्जून सांगत.

विजापूरच्या त्या श्रीमंत घरातही मोठ्या बायकांची शेवटची पंगत असे. या पंक्तीला आक्का,  वहिनी,  वाढणा-या मुली,  स्वैपाकाच्या काकू आणि सगळ्या कामाच्या बायका एकत्र बसत. त्या घरी फारसे काही संपलेले नसे पण अन्न गार झालेले असायचे.  कोशिंबिरींनी माना टाकलेल्या असत  तरी मालकीणींपासून ते नोकरवर्गापर्यन्तच्या बायका समाधानाने जेवत.  त्यांच्याकडे या पंक्तीला आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे फ्लाॅवरच्या पानांची चटणी,  ती पण फ्लाॅवरची भाजी केली असली तरच होई. फ्लाॅवरची पाने चिरताना बाजूला काढून ठेवलेली असत. ती बारीक चिरून त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट आणि किंचित मीठ घालत.  त्यावर लिंबू पिळून तांबड्या मिरच्यांची फोडणी देत. सगळ्या बायकांचा तो अगदी आवडता पदार्थ होता.

आज मी एकटीच जेवत होते अचानक या दोन्ही ठिकाणच्या शेवटच्या पंक्ती आठवल्या आणि गलबलल्यासारखे झाले.

अनेक प्रश्नांनी मनात काहूर माजवले वाटले, अन्नपूर्णेच्या हातातल्या त्या ओगराळ्याची दिशा कायम दुस-यांच्या पोटात ताजे घास पडावेत म्हणून… तिच्याकडे ते कधीच का नाही पहिल्यांदा वळत?  सर्वाना गरमागरम खायला घालून स्वतः मात्र  गारढोण अन्न गिळताना… वरवर समाधानाचा आव आणला तरी घशात किती आवंढे दाटत असतील!  भाजी संपली म्हणून लोणच्याबरोबर भात कालवताना…माझ्या वैद्यकी जाणणा-या आजीला स्वतःच्या तब्बेतीची हेळसांड केल्याबद्दल किती वेदना होत असतील…!

अर्थात हे सर्व विचार आत्ता मनात आलेत.  पण हिंगणघाटला असताना त्यांच्या त्या लोणचे भात आणि धिरड्यात वाटा मागताना यातले काही सुध्दा वाटत नसे.

आता विभक्त कुटुंबात सगळे एकत्र जेवत असले तरी शेवटचे.. उरले सुरले संपविण्याचा मक्ता त्या घरातल्या बाईकडेच!  त्यामुळे सर्वांनी हात धुतले तरी ही आपली अजून डायनिंग टेबलावरच बसलेली असते. एकत्र कुटुंबात निदान त्या पंक्तीला इतर बायका तरी असत…आताची शेवटची पंगत तशी सर्वार्थाने तिची एकटीचीच…!

 

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ !! मनातलं कागदावर !! ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ विविधा ☆ !! मनातलं कागदावर !! सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

दवांत भिजूनी बहरली

पाने फुले

लागली डोलू लागली हसू

लागली झंकारू

गीत नवे उषेचे..!!

वा..वा..पांघरुणात शिरूर जोजविणारी पहाट…घरासमोरच्या वाटांनी धुक्याची शाल पांघरलीय. ..कोपर्‍यातला सोनचाफा तोही पहाटेच्या थंडीने गारठून गेलाय. फांदयांच्या कुशीतला कळया हळूहळू डोळे टक्क उघडून सभोवार पाहू लागल्यात…हातातलं पेन वहीच्या कागदावर टेकवत मी तोंडासमोर हात धरला आणि वाफांचा एक ढग तोंडातून बाहेर पडला..तेवढ्यात आईने आवाज दिला. ..”अगं, संगीता आत ये,  बाहेर बघं किती गारवा आहे. .!! ” हो, गं आई” मी बसलेल्या खुर्चीतूनच मागे न पाहता बोलली. ..

आधी तू आत ये नाहीतर तुला थंडीनं सर्दी खोकला व्हायचा. आईची ही प्रेमळ सुचना मानून मी वही व पेनाच्या लवाजम्यासहीत  आत आले.आई ” काय मस्त वाटतय ग बाहेर ” बसल्या बसल्या मला कविता पण सुचली. .हो का? ‘बरं बाई ‘, हसून आईने उत्तर दिले. .

मी कवितेचा कागद दप्तरात भरला माझ्या बालमित्राला आकाशला दाखविण्यासाठी. ..आकाशचं घर आमच्या पासून पाच ते दहा मिनीटांच्या अंतरावर. ..आम्ही एकाच शाळेत एकाच वर्गात अगदी शिशू वर्गापासूनच. .एकमेकांच्या खोड्या काढतच आम्ही शाळेत जायचो. .माझा आवडता विषय मराठी. .त्यात कविता, कथा, लघुकथा खूपच आवडायच्या. ..सहावीत वगैरे असेन. .शर्यतीत हरलेल्या सश्यावरची कविता मला आवडली होती. तेव्हापासूनच माझी कवितेशी गट्टी जमली….

“आई गं सांग ना गवतफूल  कसं असत? ” आई, गं सांग ना..!!” माझ्या हाताला धरून माझी छोटीशी लेक अजया मला विचारीत होती. .या प्रश्नाने मी भानावर आले. .मघापासून ती विचारीत होती कवितेविषयी. ..तिच्या पुस्तकात इंदिरा संतांची  “गवतफुला ” ही कविता होती. तिची छोटी छोटी बोटं कवितेच्या शब्दांवर नाचत होती. ..

अजया माझी छोटीशी गोंडस गोड मुलगी. तिला नव्या शब्दांविषयी, वस्तूंविषयी खूप शंका असतात. आणि तिच्या या शंकांचे निरसन करण्यात मला खूप आनंद होतो. तिला तिच्या प्रश्नांचे उत्तर मिळाल्यावर तिचे निरागस हास्य माझ्या मनाला खूपच सुखावते तसेच तिच्या सतत चालणार्‍या चिवचिवाटाने घर आनंदाने भरून जाते. .नंतर नक्की सांग हं आई,  असं सांगून ती खेळायला निघून गेली.

माझे मन भूतकाळाच्या खिडकीपाशी घुटमळू लागले. .आणि आकाशने भेट दिलेले कुसुमाग्रजांचे

“प्रवासीपक्षी ” हे पुस्तक आठवले. ..

नवी दुनिया बसवताना कविता माझ्या पासून कधीच दूर गेली नाही. जशी माझी कवितेशी गट्टी जमली तशीच अजया चीही कवितेशी गट्टी जमली. ..

कविता. .तिची नाळ माझ्याशी घट्ट जोडली होती. .मंद पावलांनी अजया च्या रूपात माझ्या आयुष्यात आली आणि अंगणात आनंदाचे झाड लावले. ..

आनंदाने हुंदका बाहेर पडला आणि कागदावर शब्द उमटले. ..

दौडत जाई काळ

ठेवूनी मागे

क्षणांचे ठसे. .

पात्र. .कण न कण जसे

भरलेले भासे. .!!

एवढ्यात अजया ने हाक मारली ” आई “… या शब्दाने तंद्रीतून जागी झाली आणि कामाला लागली. ..

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सुख ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ सुख ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

सुख कोणी पाहिले आहे का?

सुख म्हणजे नक्की काय, कोठे मिळते सुख?

सुखाच्या कल्पना आणि सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते.

मला बरेचदा हा प्रश्न पडतो की सुख म्हणजे नक्की काय? कोठे मिळते ? शांत पणे विचार केल्यावर लक्षात आले की सुख तर आपल्याला प्रतेक टप्प्यावर मिळते ते आपण कस स्वीकारतो हे आपल्यावर आहे.

प्रत्येकाच्या अपेक्षेप्रमाणे त्याचे स्वरूप बदलत जाते.काहीना खूप पैसा, अफाट संपती नोकर चाकर, भरपूर दागदागिने ऐशोआराम म्हणजे सुख. तर काही लोकांना आपल्या मनासारखे वागवून घेणे, आपली सत्ता गाजवणे, मी म्हणीन ते आणि तसच ह्यात सुख मिळते.

प्रतेक जण आपापल्या वया अनुसार सुख शोधत असतात.

तान्हं मूल आईच्या कुशीत. तर शाळकरी मुलं आपल्या मित्र मैत्रिणींच्या घोळक्यात.

काहींना प्रत्येक  गोष्ट जींकण्याची नशा असते त्यांना त्यातच सुख मिळते. प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या कल्पना वेगळ्या वेगळ्या असतात. माझ्या मते,

श्रम केल्या नंतर गादी वर पडल्या पडल्या शांत झोप लागणे म्हणजे सुख.

गरम गरम वरण भात खाऊन दिलेली तृप्तीची ढेकर म्हणजे सुख.

रणरणत्या उन्हात अचानक मिळालेली झाडाची सावली म्हणजे सुख.

एखाद्या व्यक्तीला मदत केल्यानंतर त्याच्या चेहर्‍यावरचे समाधान म्हणजे सुख.

वेदनांचा दाह कमी होण्या साठी कोणी मायेने हात फिरवणे म्हणजे सुख.

आपल्या जोडीदाराने मी आहे, हो पुढे हे ऐकणे म्हणजे सुख.

लेकीने आई तू दमलीस, अस म्हणत गरम पोळी करून वाढणे म्हणजे सुख.

आजी आजोबांनी नातवंडांवर केलेली माया म्हणजे सुख.

बापरे किती गोष्टीतून आपल्याला सुख मिळत असते नाही का??

मग आपण सुख का शोधत फिरतो असाच आलेला मनात एक प्रश्न

 

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

10.08 20202

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कळतंय पण ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ विविधा ☆ कळतंय पण ☆ डॉ मेधा फणसळकर☆ 

\गेल्या महिन्यात वर्तमानपत्रात “मौजमजेसाठी युवाईकडून ‛वाट्टेल ते’ …”ही बातमी आली होती.  काही अल्पवयीन मुले डुप्लिकेट चावी वापरुन एका व्यक्तीची रेल्वेस्टेशनवर दिवसभर पार्किंग केलेली गाडी फिरवायचे व संध्याकाळी पुन्हा जागेवर नेऊन ठेवायचे. शिवाय हल्ली काही तरुणांमध्ये अशा डुप्लिकेट चाव्या वापरुन गाड्या चोरण्याचे प्रमाण वाढले आहे असेही त्यात  म्हटले होते. परंतु या बातमीतच चौकटीमध्ये मांडलेला विचार मला जास्त महत्वाचा वाटला . “अशी कृत्ये करणाऱ्या मुलांच्या  पालकांवर आधी गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा या मुलांना अल्पवयीन असूनही योग्य ती शिक्षा झाली झाली पाहिजे.”

मुळात मुलांना योग्य वयात आल्याशिवाय हातात गाडी देणे ही चूक आहे हेच  पालकांना पटत नाही. आज अनेकदा बऱ्याच पालकांना आपली मुले “लहान वयात उत्तम गाडी चालवतात” ही आत्मप्रौढी मिरवण्यात धन्यता वाटते. वास्तविक ज्यावेळी 18 वर्षे ही स्वयंचलित गाडी चालवण्याचे वय ठरवले आहे त्यामागे काहीतरी शास्त्रीय  अभ्यास आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. समजा तुमच्या दहा ते बारा वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला हातात पैसे देऊन संपूर्ण घरखर्च चालवायची जबाबदारी दिली तर ते योग्य होईल का ?  तीच गोष्ट गाडी चालवण्याच्या बाबतीत आहे. कदाचित या मुलांची शारीरिक क्षमता परिपूर्ण असेल , पण मानसिक क्षमतेचे काय? सिनेमात बघून ‛धूम’ स्टाईल गाडी चालवणे इतकाच मर्यादित अर्थ वाहन चालवण्याच्या बाबतीत त्यांच्या दृष्टीने असतो. त्याच्या परिणामांची पर्वा या वयात त्यांना नसते.

अगदी दोन दिवसांपूर्वीच माझ्या डोळ्यासमोर एक प्रसंग घडला. रहदारीच्या रस्त्यावरुन एक स्कुटर सरळ जात होती. त्याच वेळी एका 15 ते 16 वर्षाच्या मुलाने एका दुकानासमोर पार्क केलेली आपली स्कुटर काढली. त्याच्या कानाला हेडफोन होते व तो गाणी ऐकत होता. त्या नादात समोरुन येणारी गाडी त्याला दिसली नाही व दोन्ही गाड्या एकमेकींवर आपटल्या. सुदैवाने दोन्ही गाड्यांचा वेग जास्त नसल्याने कोणताही गंभीर प्रकार घडला नाही. पण असे काही घडले असते तर ? हा त्या वयातील मानसिकतेचा, अपरिपक्वतेचा परिणाम नाही काय?

एकंदरीतच पालक म्हणून सर्वच गोष्टींमध्ये आपले मूल प्रवीण असावे अशी आपली धारणा झाली आहे. त्यामुळे केवळ स्पर्धेपोटी आपण शिक्षण, क्रीडा, कला किंबहुना सर्वच क्षेत्रात आपल्या मुलांना घुसमटून टाकत आहोत का? किंवा अकाली त्यांच्या हातात स्वयंचलित वाहने, अँड्रॉइड फोन, लॅपटॉप यासारखी उपकरणे देत आहोत का? हल्ली एखादे पाच- सहा महिन्यांचे मूल सुद्धा मोबाईल हातात घेण्यासाठी हट्ट करते.त्याने नीट खावे म्हणून मोबाईल दाखवला जातो. त्यामुळे काहीही भरवताना तो मोबाईलशिवाय तोंडात घास घेत नाही. ही परिस्थिती अनेक ठिकाणी दिसते. वास्तविक सुरवातीला आपणच ही सवय लावल्यामुळे हे होत असते. त्यामुळे जे साध्य व्हावे असे आपल्याला वाटते त्याऐवजी  बूमरँगसारखी ती आपल्यावरच उलटत आहेत. याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याचा अर्थ ही उपकरणे मुलांनी वापरु नये असा नसून ती क्षमता त्यांच्यात निर्माण झाल्यावर जर ती त्यांना दिली तर  ते हाताळण्याची प्रगल्भता त्यांच्यात येईल.

अर्थात काहीजण असेही समर्थन करतील की आमची मुले लहानपणापासून या गोष्टी हाताळत आहेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पण नियमाला अपवाद असतोच. झी टीव्हीच्या संगीत कार्यक्रमात एखादा आठ वर्षाचा चिमुरडा इतके अप्रतिम गाऊन जातो की दिग्गज कलाकारसुद्धा तोंडात बोटे घालतात. पण म्हणून सर्वच आठ वर्षांची मुले इतके अप्रतिम गाऊ शकतील असे नाही. कारण ती क्षमताच त्यांच्यात नाही. एवढेच सत्य जरी लक्षात घेतले तरी आज ज्या अनेक समस्यांना पालक म्हणून आपल्याला तोंड द्यावे लागत आहे त्या समस्या बऱ्याच अंशी कमी होतील.

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आरसा ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

☆ विविधा ☆ आरसा ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆ 

आरसा ज्याला दर्पण ‘असेही म्हणतात, तो आरसा सर्वांचाच एक आपुलकीचा-जिव्हाळ्याचा विषय आहे. ‘

सांग दर्पणा दिसे मी कशी? असं गुणगुणत दर्पणात पाहणार्या या फक्त युवतीच असतात असं नाही बरं का!

तर अगदी दुडुदुडु चालायला शिकलेली बालके, जगातील अनेक किंवा अगदी सर्व ठिकाणच्या सर्व वयोगटातील लोकांसाठी अर्थातच आबालवृद्धांसाठी आरसा ही एक आवश्यक बाब ठरते.

तयार होऊन शाळेला जाण्यापूर्वी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी आपली केशभूषा, पआपली वेशभूषा ठीकठाक आहे कि नाही हे आरसाच सांगतो. कांही शाळात अगदी दर्शनी भागात आरसा टांगलेला असतो कारण विद्यार्थ्यांने गणवेश, केस वर्गात प्रवेश करण्यापूर्वी व्यवस्थित आहेत कि नाहीत हे पाहिल्यानंतरच पुढे व्हावे,नसेल तर व्यवस्थित हो असे आरसा सांगतो. सण-समारंभ,लग्नकार्य अशावेळी तरी  या आरशाची खूपच मदत होते.

पण मित्र हो,आपले बाह्यांग,आपले बाह्यव्यक्तिमत्व जसे आरशात पाहून कळते तसा आणखीहीएक आरसा आपल्या जवळ सतत असतो . तो आरसा म्हणजे मनाचा आरसा. ज्या मनाचा तळ लागत नाही असे म्हणतात त्या मनातील भाव-भावनांचे प्रगटीकरण चेहरारुपी आरशाद्वारे प्रगट होते. मनातील आनंदी,दुःखी, प्रसन्न, काळजीपूर्ण, रागीट, भयभीत असे सर्व भाव चेहरारुपी आरसा स्पष्ट करतो. म्हणूनच म्हंटले जाते.

चित्तं प्रसन्नं भुवनं प्रसन्नं

चित्तं विषण्णं भुवनं विषण्णं।

आपलं आपल्या मनावर नियंत्रण असणं गरजेचं असतं कारण त्यामुळेच आपण व्यक्तिगत भावना लपवून बाहेर ील व्यवहार सुरळीतपणे पार पाडू शकतो. पण याउलट काही वेळा मनाचा आरसा जर चेहर्यावर प्रगट झाला तर त्याचा फायदाही होतो. म्हणजे चेहर्यावर दुःख दिसल्यानंतर जवळच्या व्यक्तीने आपली विचारपूस केली तर दुःख निम्मे  हलके होते.

ब्युटीपार्लर, केशकर्तनालय या ठिकाणी तरी आरसा पाहिजेच. याखेरीज सपाट आरसे आणि गोलीय आरसे प्रकाशाच्या अभ्यासात ,प्रतिमा मिळविण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. गोलीय आरशांचा उपयोग काही ठिकाणी प्रदर्शनात अशा प्रकारे केला जातो कि आपली छबी कधी जाड व बुटकी दाखविली जाते तर कधी उभट व लांब दिसते. त्यामुळे आपली करमणुक होते.

म्हणूनच आरसा हा आपला एक जवळचा मित्र आहे असे म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही.  उभा,आडवा,चौकोनी, गोल,षटकोनी असे सर्व प्रकारचे आरसे आपण पाहतो. पर्समध्ये किंवा अगदी पावडरच्या डबीत मावणार्या छोट्या आरशापासून मोठ्यात मोठे,प्रचंड आरसे असतात. मोठे आरसे आपण राजवाड्यात, आरसेमहालात किंवा वस्तुसंग्रहालयात आपण पाहू शकतो.

गावाकडील आमच्या जुन्या घरात मी भिंतीत बसविलेले आरसे पाहिले। आहेत. चित्रपट स्रुष्टीतही आरशांचा उपयोग अगदी लाजवाब पणे केलेला दिसतो. चला तर, आपणही आरसा बाळगुया नि व्यवस्थित, नीटनेटके राहू या.

© सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

भ्र. 9552448461

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आळी मिळी गुप चिळी ☆ सौ. राधिका भांडारकर

☆  विविधा ☆ आळी मिळी गुप चिळी ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

लहानपणी छोटेमोठे कित्येक गुन्हे केले आणि ते लपवण्यासाठी आळी मिळी गुप चिळी हे शस्त्र बिनबोभाट वापरले.घड्याळ फुटलं,बरणीतला खाऊ संपवला,कधी शाळा सुटल्यावर परस्पर मैत्रीणीकडे खेळायला गेलो,कधी वहीत लाल रंगातला शेरा मिळाला, कधी वर्गाच्या बाहेर ऊभं राहण्याची शिक्षाही भोगावी लागली…पण सगळे अपराध कबुल करायलाच हवेत कां?  काही अवश्यकता नाही .”आळी मिळी गुपचिळी..” हेच मस्त. मला वाटते ,अभिनयकला ही जन्मजात देणगी प्रत्येकालाच मिळालेली असते. म्हणूनच “मला काय माहीत?” “मी काय केले.?.”असे निरागस भाव चेहर्‍यावर वागवून आळी मिळी गुप चिळी यशस्वी करता येते… पण एक प्रसंग मात्र खूप कठीण होता.

माझे आजोबा म्हणजे अतिशय शिस्तीचे.नीटनेटके.  स्वच्छता ,टापटीप वाखाणण्यासारखी असली तरी अत्यंत त्रासदायक. वस्तुंच्या जागा ठरलेल्या. एक पेन्सील जरी इकडची तिकडे झाली तरी त्यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटायचे नाही. मग त्यांच्या कोर्टात आरोपी म्हणून आम्हाला ऊभं रहावं लागायचं… किरकोळ शिवणकामासाठी लागणारी आजोबांची एक सुई होती.सांगितलं तर खोटं वाटेल, अतिशयोक्ती वाटेल! ती एकच सुई ते ३३वर्ष वापरत होते..वापरुन झाल्यावर लहानशा दोर्‍यासकट ते सुताच्या गुंड्यात टोचून ठेवत. त्याचीही विशीष्ट पद्धत होती आणि विशीष्ट जागाही…

एक दिवस मला काय बुद्धी झाली कोण जाणे! आजोबा घरात नसताना मी रूमाल शिवण्यासाठी ती सुई घेतली.

माझा मावसभाऊ रंजन होताच तिथे. त्याने मला फटकारलेही. भांडणच ऊकरुन काढलं आणि त्याच्याशी वाद घालता घालता ती सुई तुटुनच गेली…बाप रे!!

आता काय होणार? खालच्या मजल्यावर माझी मैत्रीण रहायची .तिच्याकडे धावत गेले.तिला सर्व सांगितले.

ती म्हणाली ,”हात्तीच्या! इतकी काय घाबरतेस..ही घे सुई.

आणि ठेवून दे तिथे..सुयांसारख्या सुया…काही कळणार नाही आजोबांना..आळी मिळी गुप चिळी…

रंजनने जमेल तशी ती गुंड्यात खोचून जागच्या जागी ठेवलीही..तेव्हढे बंधुप्रेम दाखवले त्याने….

ही आळी मिळी गुप चिळी मात्र आजोबांच्या मृत्युपर्यंत टिकून राहिली.मैत्रीणीच्या सुईने ३३वर्षांची परंपरा सांभाळली…

पण आज आठवण झाली तरी वाईट वाटतं. अपराधीही वाटतं. महत्व वस्तुचं नसतं.शिकवणीचं असतं.

संस्काराचं असतं. सांभाळणं, जपणं, बारीकसारीक गोष्टींबाबतही निष्काळजी नसणं,जबाबदारी जाणणं, हा मौल्यवान संस्कार आजोबांच्या वागणुकीतून ,अगदी सहज रुजला होता….

धन्यवाद!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

१६/१०/२०२०

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आमची मुलं ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ विविधा ☆ आमची मुलं ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

मिरजेच्या पासून जवळ असलेल्या आरग या रेल्वे स्टेशन वर माझं लहानपण गेल. आसपास काहीच नव्हतं. पण मागच्या बाजूचा गाई-म्हशींचा गोठा त्यांची लहान पिल्ल कुत्री मांजर अशा प्राणिसंग्रहालयाच्या सहवासातच लहानपण गेल. शिक्षणानिमित्त मिरजेला आलो. प्राणिमात्रांची आवड फक्त मांजरावरच भागवावी लागली. मी अभ्यास करताना आमची सोनाली मांजरी माझा अभ्यास होईपर्यंत मांडीवर जागत बसायची. माझ्या यशाचा वाटा माझ्या या मुलीला दिल्याशिवाय रहात नसे.

लग्नानंतर आमची गावाबाहेर पोल्ट्री आणि त्याला लागून घर होत. टॉमी आणि बंड्या दोन कुत्र्यांच्या आधारावरच आम्ही रहात होतो म्हणा ना! ओसाड परिसर साप विंचू गोम मुंगूस बेडूक आणि चोर अस चित्र होत. एकदा रात्री अकरा वाजेपर्यंत कोणीच घरी आले नाही. लाईट गेले काय कराव सुचेना. अखेर माझ्या बाळाला घेऊन मी बाहेर टॉमी आणि बंड्या यांच्याजवळ येऊन बसले. 100% खात्रीचे अंगरक्षक. बाळाला नवख्या कोणी घेतले आणि तो रडायला लागला की दोघे बेचैन व्हायचे. “बाळ रडतोय लक्ष आहे की नाही” अस नजरेतून मला सांगायचे. सकाळच्या कोवळ्या उन्हात बाळाला मीत्यांच्याजव,ळ ठेवायची. काम होईपर्यंत जबाबदारपणे दोघे त्याला सांभाळायचे. टॉमी, मी साडी बदललेली दिसली की, “मी पण येणार” असं म्हणून मागं मागं यायचा. दोघांच्या भुंकण्यातून साप आहे की चोर आहे की त्याला काही हवंय, हे बरोबर समजायचं. आठ नऊ वर्ष या मुलांनीच आम्हाला सांभाळलं म्हणायला हवं. टॉमीला कॅन्सर झाला. ऑपरेशन झाले. निमूटपणे तोंड वर करुन औषध घ्यायचा. दिवाळीचा सण साजरा झाला. दिवाळीचा लाडू थोडासा खाल्लान आणि दुसरे दिवशी स्वर्गवासी झाला. बंड्या ही किरकोळ दुखण्याने गेला. दोन मुलांची उणिव सतत भासू लागली. लवकरच आपण होऊन छानशी गोंडस कुत्री पिंकी आपण होऊन आली. आणि आमचीच झाली. पहिल्या वेळेला दहा पिल्ले झाली. तिला कोणीतरी पळवून नेल.तीन आठवड्यानी पोट खपाटीला गेलेलं, अंगावर गोमाशा भरलेल्या अशा अवस्थेत परत आली. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. प्रथम पिलानी आईला ओळख ले नाही. नंतर मात्र आनंदाने नाचायला लागली. कोरडीच आचळ ओढायला लागली. नाईलाजाने एक पिल्लू ठेवून घेतलं. टोनी. दिसायला पिवळाबारीक, गोरा रंग ,उंच, कायम ताठ बसणारा असा टोनी नौ वर्षे  साथ दिलीन त्यानं. त्याला फिरायला मीच न्यावं असा त्याचा हट्ट असायचा. “तूच चल” अस म्हणून माझ्या मागे लागायचा. मुलांबरोबर चेंडू खेळायचा. एकदा मुलांच्या मागे लागून शाळेत ही गेला. शेवटी त्याला घेऊन मुलं परत आली. किती अनुभव सांगावे तितके कमीच. चिमा मांजरी पिलांना शिकार शिकवण्यासाठी काहीना काही घेऊन यायची. एक दा तर जिवंत साप घेऊन आली. पिलांसाठी उंदीर पाली किडे सगळ्यांचा फडशा पाडायची. मागे बांधलेली जयू नावाची गाय ही एक मुलगी. तीच शिंगाचा ऑपरेशन झालं होतं. डॉक्टरांनी सांगितले की तिच्या जखमेवर रोज औषध घालायला हव ती माझ्याशिवाय कोणालाच घालून देत नव्हती. आपल्या सूक्ष्मातल्या भावभावना ही तिला कळत असाव्यात याची खात्री झाली. या सगळ्या मनाच्या नात्याच्या मुला-मुलींनी अनेक  संकटांपासून चोर, विंचू, साप, यापासून वाचवलंयआम्हाला. आता आमच्याकडे चिंगी आणि गोल्डी ही श्वान जोडी काळूराम सुंदरी आणि टिल्ली हे मार्जार त्रिकूट मस्त मजेत राहून आम्हालाही खूप आनंद देतात. या मुलांशी मी गप्पा मारत असते. म्हणजे आपण त्यांच्याशी बोलायचं ,प्रश्न विचारायचे, आणि उत्तरही आपणच द्यायचं. बाहेरून घरी आलो की पहिलं स्वागत तेच करतात  किती आनंद वाटतो ना! ही सगळी आमची मुलं आणि आम्ही त्यांचे आई वडील अस नातं आहे म्हणाना. रस्त्यात जखमी झालेल्या प्राण्यांनाही “राहत “,पीपल फॉर अनिमलच्या” मदतीने उपचार करतो. निपचित पडलेल्या बैलाच्या पोटाचे ऑपरेशन झाले. आणि चार बादल्या प्लास्टिक पिशव्या काढल्या. पिशव्यातून खरकटे टाकणाऱ्यांना काय सांगावे?बऱ्या झालेल्या प्राण्यांच्या डोळ्यातले भाव पहाताना जे समाधान मिळते ते शब्दात सांगता येत नाही. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं “जीव सेवा हीच ईश्वरसेवा” हे तत्व मनोमन पटत.

कर्मयोग, ज्ञानयोग, आणि भक्ती मार्गाद्वारे आमची मुलं-मुली, (प्राणिमात्र )यांच्यामधील परमेश्वराच्या रूपात पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. त्यांच्या सहजीवनाच्या धाग्यांच्या गुंफणीतूनच माझ्या जीवनाच सुंदर वस्त्र विणलं गेलंय. किती सुंदर  म ऊ मुलायम उबदार आणि रंग बिरंगी.

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली

फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print