कविराज विजय यशवंत सातपुते
विविधा
☆ नाती आणि विश्वास… भाग-२ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(तसेच आपण, “आपल्या पत्नीला/पतीला, मुलांना आपण समाधानी,खूष ठेवले आहे का..?” याचा विचार प्रत्येक पुरुषाने/स्त्रीने नाती निभावताना करायला हवा.) – इथून पुढे —-
अमक्यानं दारूच्या नादापायी बायकोला जन्म भर छळलं… बाहेरख्याली पणा केला.. तोच वारसा त्याचा मुलगा चालवत असेल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. त्याची पुढची पिढी देखील हाच वारसा गिरवून आपले माणूसपण धोक्यात आणू शकतो.
समाजात वावरताना आपले कुटुंब, कुटुंबीय आपल्या पासून दूर नसावे.. काही कारणांमुळे कुटुंबापासून दूर जाऊन रहावे लागले तर नात्यांतील विश्वास अतिशय दृढ असावा.विश्वासाचे नाजूक बंध हे कौटुंबिक सौख्य जिवापाड जपतात.
नाती दिखावा निर्माण करणारी नसावीत. इतरांच्या मनाचा विचार करून जोपासलेली नाती तुमचे अस्तित्व जास्त प्रगल्भ ठरवतात.
नवीन पिढीला आता संस्कारापेक्षा व्यवहार जास्त महत्वाचा वाटतो. पैसा असेल तर माणूस ताठ मानेने जगू शकतो हा अनुभव त्याला आपल्या माणसात दुरावा निर्माण करायला भाग पाडतो. जुन्या पिढीतील नातवंडे सांभाळणारी जुनी पिढी ,त्यांचे विचार , नव्या पिढीला नकोसे वाटतात. ”पैसा फेको तमाशा देखो ” हे ब्रीद वाक्य घेऊन नवीन पिढी माणुसकी पेक्षा मतलबी पणाला प्राधान्य देताना दिसते.
जमाना बदललाय भाऊ असं म्हणत प्रत्येक पिढीने सोयीस्कर रित्या आपले रहाणीमान बदलले. चुकांचे समर्थन करण्यासाठी नवे साधन मिळाले. सुनेने सासू ला आत्याबाई सोडून आई म्हणायला सुरवात केली. मामंजीचे पप्पा झाले. पण नात्यातला संघर्ष होतच राहिला. जनरेशन गॅप तशीच राहिली. फक्त तिचे स्वरूप बदलले.
सासुबाई नऊवारी साडीतून पंजाबी ड्रेस मध्ये आल्या. मामंजी धोतरातून सुट बूट, सलवार कुडता अशा पेहरावात आले. नातवंडे मुलांच्या इच्छेने वाढू लागली. वडील धा-यांनी नातवंडांचे फक्त लाड करायचे आणि वेळप्रसंगी आजी आजोबांनी नातवंडांचा संभाळ करायचा एवढ्या परीघात नाती फिरू लागली.
मौज मजा, ऐषोराम, एकमेकांवर केलेला खर्च यात नात्याचा हिशोब होऊ लागला. रक्ताची नाती गरजेपोटी उपयोगात आणण्याचा नवा प्रघात सुरू झाला आणि ग्रामीण भागातील समाज पारावर पिंपळपारावर खळबळ माजली. वृद्धाश्रम आणि पाळणाघर यांना काळाची गरज आहे अशी शहरी लोकांनी दिलेली मान्यता गावातील वृद्धांना घातक ठरू लागली. गावातल्या गावात एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांची दोन घरे झाली. शेतातल घर अर्थातच म्हाताऱ्याच्या वाट्याला आले. आणि गावातील घर दुमजली होऊन दोन भाऊ स्वतंत्र दोन मजले करून वरती खाली राहू लागले. शेती करण्यासाठी पगारी मजूर बोलावताना जुनी पिढी हळहळली पण त्याच वेळेस आलेले उत्पन्न वाटून घेताना उगाचच कुरकुरली.
समाज पारावर देखील अनेक बदल घडत आहेत. माणूस माणसापासून दूर जातो आहे. आणि याला कारणीभूत ठरला आहे तो पैसा आणि नात्यांमधील विश्वास.
बदलत्या जमान्यात माणूस ओळखायला शिकले पाहिजे हेच वारंवार कानी पडते. हा माणूस ओळखायच्या स्पर्धेत आपण मात्र कंपूगिरी करत आहोत. आपल्या उपयोगी पडणारा तो आपला. गरज सरो नी वैद्य मरो या उक्ती प्रमाणे आपल्या माणसाची व्याख्या बदलते आहे. बदलत्या काळात जात पात धर्म भेदभाव नष्ट होत असले तरी आर्थिक विषमता हे मूळ माणसामाणसात प्रचंड दरी निर्माण करीत आहे. ही विघातक दरी जनरेशन गॅप पेक्षा ही विनाशकारी आहे.
भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीणी, पती, पत्नी,आई, वडील, गुरू जन, आप्तेष्ट या नात्यापेक्षा पैसा मोठा नाही याची जाणीव माणसाचं माणूस पण शाबूत ठेवते. आपण घेतलेले निर्णय,जपलेली नाती, कमावलेला विश्वास यांवर आपली यशस्वीथा अवलंबून आहे. दृष्टीआड सृष्टी अशी वागणूक नसावी.आपल्या माणसाचं आपली सृष्टी विश्वासानं बहरावी हा जीवन प्रवासाचा खरा हेतू आहे.
आपण सर्व जण ज्या मार्गाने जात आहोत त्या मार्गावर वाडवडिलांचे आशिर्वाद, संस्कार अभावानेच आढळतात. पण महत्व कांक्षी विचारांना पुढे करून स्वार्थाला दिलेले अवाजवी महत्त्व माणसाला एखाद्या वळणावर तो एकटा असल्याची जाणीव करून देत आहे.
माणूस किती शिकला? काय शिकला? यापेक्षा तो आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आहे का याची चर्चा माणसातला आपलेपणा नष्ट करते. बसा जेवण करूनच जा असा आग्रह करणारे आज फालतू कारणे शोधून बाहेर हाॅटेलमध्ये स्नेहभोजनाचे जंगी बेत आयोजित करतात यातून व्यवहार सांभाळत पुढे जायचे हा कानमंत्र एकमेकांना देत ही कंपूगिरी समाजात एकमेकांना धरून रहाते.
मन दुखावले की नाती संपली. भुमिका बदलल्या. पात्रे बदलली. पैसा सोबत असला की माणसांची गरज नाही. पैशाने माणूस विकत घेता येतो हा विचार करत सर्व जीवन प्रवास चालू आहे. संवाद माध्यमातून प्रबोधन करणारी पिढी समोरासमोर आली तरी ओळख दाखवताना दहा वेळा विचार करून ओळख दाखवते अशी सद्य परिस्थिती आहे. नवीन पिढीला आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करून देताना आपण आपल्याच लेकरांना चार भिंतीची ओळख करून देतो पण त्या भिंतीवर असणाऱ्या छप्पराचे , त्या चार कोनाचे कौटुंबिक महत्त्व सांगायला विसरतो.
नव्या वाटेने चालताना जुन्या आठवणींना उजाळा देणारे प्रसंग घडतात. तेव्हा आपली माणसे आपल्या सोबत असावीत. नव्या जमान्यात वावरताना आपण कुठे चाललो आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपला जीवनप्रवास ह्रदयापासून ह्रदयापर्यत व्हायला हवा इतके जरी आपण ठरवले तरी मला वाटत आपण माणसांना घेऊन, माणसासोबत अत्यंत विश्वासाने , कोणत्याही बाबतीत खोटेपणा न करता, आपल्या वर मनापासून प्रेम करणाऱ्या माणसांची कदर करीत, आपण आपला जीवन प्रवास सुरू ठेऊ. आपण एखाद्या व्यक्तीशी नाते जोडताना कींवा जोडलेले नाते तोडताना आपण ते नाते विश्वासार्ह पद्धतीने निभावले आहे का याचा विचार केला आपला जीवन प्रवास नक्कीच यशस्वी ठरेल.
संशयास्पद वर्तन असणे यांत कोणताही पुरूषार्थ, मर्दुमकी, कींवा आत्मसन्मान नाही कींवा तेमाणूसकीच लक्षण देखील नाही. माणसाचं माणूस पण त्याच्या अस्तित्वात असावं आणि त्याचं अस्तित्व कुठल्याही असत्यावर आधारलेलं नसावं तरच नाती अबाधित रहातात आणि जीवन प्रवास सुखकर, समृद्ध आणि समाधानी होतो. माणूस श्रीमंत होतो आणि आमरण प्रवास करतो..होय.. या ह्रदयापासून ह्रदयापर्यत…!
— समाप्त —
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈